About

Wednesday 27 December 2017

वाकन

"ह्या वाकनात करायचा का नाय पेरा सोयरं ?"
"नाय, ही पट्टी वांध्यातली हाय पाव्हण, वळवा बैलं."
"किती रान हाय ह्ये?"
"आसन की अर्धा एकर"
"कुणा कुणाचं वांद हाय पर?"
"आमी तिग भाव आणि छबुराव पाटील"
"लय दिसापसन वांद सुरू हाय जणू ! पार गचपन माजलय वाकनात !"
"तर ओ, आता बगा झाली की 12 सालं"
"ऑ !! पैका बी बख्खळ गेला आसन मंग"
"पैका मंजी बगा, आमी तिगा भावानीबी एकर एकर इकला न्हवं या वांद्यापायी "
"आग बाबो, ह्यो कसला वेव्हार मनायचा सोयरं ? अरदा एकर रानापाई तुमी तीन एकर रान घालवून बसलाव. आपल्या त डोसक्यात नाय शिरल बा ह्ये"
"पाव्हण ह्यो आकडा बघितला का मिशीचा. ह्येला इरस मनत्यात. आओ तीन एकर काय समदं तीस एकर जाऊ द्या की, पण छबुरावपूड मान खाली नाय घालणार ह्यो हिंमतराव !!"
हिंमतराव बैलक्यासमोर मिशीला पीळ भरू लागला. व बैलक्या एका हातानं कासरं आकडून व एका हातात शाळूची मूठ तशीच धरून स्तंभित होऊन पाहत राहिला.
©सुहास भुसे


मटण झोल

सव्वा चार वाजत आले होते. कामावर शेवटचा हात मारत असताना टेबलवरचा फोन घणघणला. समोरून बायकोचा आवाज आल्यावर मध्याने शेजारच्या टेबलवरील अविवाहित गण्याला जळवण्यासाठी मुद्दामच मोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केली..

".......काय म्हणतेस ? लवकर घरी येऊ ?
........अच्छा, पण कारण सांगशील की नाही ?
...... ओह... काय सांगतेस ? मटण बनवतेयस ?
(शेजारच्या टेबलवरून की पॅड बडवण्याचा आवाज वाढला )
........व्वा, बंगाली झोल, मटण करी आणि मालवणी मटणवडे.
(शेजारी की बोर्ड आदळल्याचा आवाज )
..... लवकर म्हणजे काय, धावत धावत येतो,
.......चल मग बाकी आल्यावर"

गण्या चांगलाच वैतागला.
"खा लेको, मटण खा, तंगडी खा, वडे खा, मजा करा. आम्ही आपलं चिवडत बसतो खानावळीतली फुळुक भाजी आणि बेचव भाताची डिखळं .. "
खो खो हसत मध्या म्हणाला,
"साल्या कर ना लग्न मग, रोज नवी फर्माइश करत जा, चमचमीत खा व टुणटुणीत हो."
गण्याच्या त्राग्यामुळे खुश होत मध्याने टेबल आवरलं.

5 ला 2 मिनिटं कमी असताना पुन्हा फोन घणघणला.
मध्याने मुद्दाम स्पीकर ऑन केला.
"अहो, निघालात का?"
"निघतोयच हनी, तुझं आटपेपर्यंत हजर होतो."
"अहो, काय झालं माहितीय का ? ती माझी बालमैत्रिण बनी नाही का? ती घरी आली होती. तिच्या सर्किट नवऱ्याबद्दल सांगत होती.. "
" अच्छा, म्हणजे तुम्हा बायकांचा फेव्हरेट विषय"
"अहो ऐका न, तुम्ही बिल्कुल असे नाहीत, कित्ती चांगले आहात तुम्ही,
(मध्याने हळूच हसत डोळ्यांच्या कोपऱ्यातून गण्याकडे पाहिले)
"तेच बनीला सांगत होते, आणि तेवढ्यात एक छोटीशी गंमत झाली. "
"काय गंमत झाली हनी?"
"मी कढईत पाणी टाकायचं विसरले आणि मटण जळाल सगळं"
(मध्याने हातातील पेन्सील खटकन मोडल्याचा आवाज आला.)
".........."
"अहो, ऐकताय न, तर येताना कालच्या सारखं जेवण घेऊन या हॉटेलमधुन, आणि बनी पण थांबतेय बरं का जेवायला. "

रिसिव्हर खाडकन आदळल्याचा आवाज गण्याच्या गडगडाटी हसण्यात विरून गेला.
©सुहास भुसे


दाढीवाला वर्सेस दाढीवाला

ब मो पुरंदरे यांचा एक किस्सा प्रसिद्ध आहे.
गो नी दांडेकर यांच्या घरी भिंतीवर टांगलेली एक तलवार पुरंदरेंच्या मनात खूप भरली होती. या न त्या प्रकारे ती तलवार आपल्याजवळ यावी असं ब मों च्या फार मनात होतं.

एकदा गो नी दांडेकरांच्या घरी सकाळी सकाळी जाऊन ब मो त्यांना म्हणाले,
" आज माझ्या स्वप्नात भवानीदेवी आली होती. ती म्हणाली आज तू अशा न अशा दाढीवाल्या माणसाच्या घरी जा. तो तुला त्याच्याकडील तलवार भेट म्हणून देईल."
(एवढ्यावरून ब मो नी सगळ्या वस्तू अशाच जमवल्या असतील असा वाचकांनी निष्कर्ष काढू नये किंवा काढल्यास त्याला काय इलाज ? )

तर गो नी दांडेकर उर्फ आप्पासाहेब हे देखील एक पोहोचलेलं व्यक्तिमत्व होतं.. ते ब मो ना म्हणाले,
" माझ्याही स्वप्नात आजच भवानी देवी आली होती. ती म्हणाली आज असा असा दाढीवाला तुझ्याकड येईल, मी त्याच्या स्वप्नात आल्याचे सांगेल. पण मी तर इथं तुझ्या स्वप्नात असल्यामुळे त्याच्याकडे गेलेली नाही. तेव्हा त्या लबाड दाढीवाल्यावर तू विश्वास ठेवू नको. "

यावर अकबराला पाठवलेलं पत्र संभाजी राजांनी पकडल्यावर आण्णाजी दत्तोचा चेहरा झाला असेल तसा ब मों चा चेहरा झाला.
©सुहास भुसे


Tuesday 22 August 2017

गावाकडची टोपणनावे

गावाकडची टोपणनावे वेगळी असतात. ती शोनु, पिंकी, पप्पू, टिकू अशी गोंडस नसतात. आणि दुसरं म्हणजे ही टोपणनावे घरचे देत नाहीत तर समाज देतो. गावाकडे भावकी फार मोठी असते. एकेका आडनावाची अख्खी गावेच असतात. भोसले तर सगळे भोसलेच, काळे तर सगळे काळेच. राजू कोणाचा तर शिंद्यांचा एवढं सांगून भागत नाही. शिंद्यांच्यात आठ दहा राजू असतात. शिवाय ओळखीसाठी आडनाव वापरणे गावाच्या औपचारिकतेत बसत नाही..

मग एक प्रकार आई-बापाचे नाव जोडणे ..
यात आई व बाप यातलं गावात जो जास्त लोकप्रिय असेल त्याच नाव जोडले जाते.
उदा. छबुरावचा म्हारत्या, म्हाळाप्पाचा हानम्या किंवा बुकाबाईचा बाळू, तुळसानानीचा बंडू..

टोपणनावे ही कधी कधी गुणवैशिष्ट्ये बघून मिळतात..
उदा. खादुडा तुकाराम, खोडकर रामा.
आता हा खोडकर रामा म्हणजे एखादा 14-15 वर्षाचा मुलगा असावा असा सकृतदर्शनी समज होतो. पण हे नाव धारण करणारे चक्क 80 वर्षांचे आजोबा आहेत. गावाकडे असचं असतं.. एकदा टोपणनावाशी कमिटमेंट कर ली म्हणजे कर ली च. मग नो कॉम्प्रमाईज.

पण सगळ्यात जास्त टोपणनावे ही शारीरिक गुणवैशिष्ट्ये पाहून दिली जातात.
उदा. लांबरी अण्णा, काटाळ रामा, नकटा श्यामा, वाकडा आबा, मोठ्या डोळ्याची फुला, मिशाळू आबा.

बरं ही सन्मानजनक नावे गुपचूप किंवा कुचाळक्यासाठी वापरली जातात असं नाही. ती थेट संबंधिताच्या तोंडावर, मुलाबाळांच्या देखत, पै पाहुण्यांसमोर वापरली जातात. एखाद्याला नकटा, वाकडा अस म्हणण्यात काही अशिष्ट आहे, सभ्यतेला सोडून आहे असे म्हणणाऱ्यालाही वाटतं नाही व ऐकणाऱ्यालाही वाटत नाही.
©सुहास भुसे

एकजुटीचा आत्मविश्वास मराठा मोर्चा

कोपर्डीतली अमानुष घटना समोर आली आणि मराठा समाजाच्या कोंडलेल्या असंतोषाचा विस्फोट झाला. जातीय मुद्द्यांवर इतिहासात कधीही एकत्र न आलेला मराठा समाज फक्त समाजासाठी म्हणून एकवटला. आणि ऐतिहासिक मराठा मोर्च्यांना सुरवात झाली. २० लाख ते ३५ लाख लोक एकाच ठिकाणी एकत्र येऊ शकतात आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत निषेध व्यक्त करून परत जाऊ शकतात या अविश्वसनीय वस्तुस्थितीने विश्लेषक, राजकारणी भांबावून गेले. पाठोपाठ निघणाऱ्या विराट मोर्च्यांवर काय प्रतिक्रिया द्याव्यात आणि काय भूमिका घ्यावी याबद्दल अनेकांचा गोंधळ झाला. मोर्चाची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली. भारतीय लोकशाहीची मान जगात उंचावली. मराठा मोर्चाची इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली.

एवढा सगळ होऊनही नंतर मराठा मोर्च्यांनी काय साध्य केल किंवा या मोर्च्याचे फलित काय असे प्रश्न उपस्थित झाले. मराठा मोर्च्याचे फलित काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व मुद्द्यांचा सखोल परामर्श घ्यावा लागेल. मुळात या मोर्च्यांना इतका उदंड प्रतिसाद मिळण्याची कारणे काय होती? पंढरपुरच्या आषाढी वारीला विराट गर्दी असते. तरीही या गर्दीची मजल फार तर आठ ते नऊ लाखांपर्यंत मर्यादित असते. एखाद्या लोकप्रिय नेत्याच्या सभेला गर्दी जमते, तिचीही मजल सहा ते आठ लाखांच्या वर जात नाही. शिवाय राजकीय सभेला येणारे सगळेच लोक उत्स्फूर्तपणे आलेले नसतात. स्थानिक राजकीय दबाव, पैसा, कार्यकर्त्यांची मजबूत फळी, वाहनांची मोठी फौज असे घटक त्यावर परिणाम करतात. पण मराठा मोर्च्यांना जमणारी विराट गर्दी ही पूर्णपणे उत्फूर्त होती. मोर्चाला येताना स्वत:चे जेवण घेऊन यायचे हा मोर्चाचा महत्वाचा नियमच होता. लोक स्वत:च्या वाहनाने बायको,आईबाप,मुले घेऊन स्वत:चे जेवण स्वत: घेऊन मोर्च्यात सहभागी होत होते.

कोपर्डीतील घटनेच्या अमानवी, पाशवी स्वरुपाची खदखदणारी चीड हे कारण तर होतेच शिवाय इतर महत्वाची कारणे मराठा समाजाच्या स्वातंत्र्योत्तर अवनतीमध्ये, या समाजावर होणाऱ्या सातत्यपूर्ण राजकीय-सामाजिक अन्यायामध्ये आणि सत्ताधाऱ्यांच्या शेतीविषयक उदासीन धोरणांमध्ये दडली आहेत.  ब्राह्मण समाज व्यवस्थेतील महत्वाच्या जागा पूर्वीपासून पटकावून बसलेला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या अनुकूल धोरणांमुळे दलित समाजानेही आपली प्रगती साधून घेतली. मराठा समाज मात्र शेतीमध्ये अडकून पडला. पी व्ही नरसिंह रावांनी जागतिकीकरणाचा स्वीकार केला पण शेतीला त्यातून वगळले. शेती क्षेत्राकडे वारेमाप वाढणाऱ्या लोकसंख्येला स्वस्तात पोसण्याचे साधन म्हणूनच पहिले गेले. परिणामी शेतीतील समस्या व्यापक रूप धारण करत गेल्या. उत्तम शेती, मध्यम धंदा, कनिष्ठ नोकरी हे समीकरण उत्तम नोकरी, मध्यम धंदा, कनिष्ठ शेती असं कधी बदललं हे लक्षातच आलं नाही. पिढी दर पिढी गणिक शेतीचे तुकडे पडत गेले. दुष्काळ, नापिकी आणि लुटारू व्यवस्था यांनी शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्यांमधील जीवनरस शोषून घेतला व त्यावर आपली प्रगती साधून घेतली. या सर्व गोष्टींचा असंतोष या समाजात आतल्या आत धुमसत होता. मराठा मोर्च्यांच्या निमित्ताने या असंतोषाला बाहेर येण्यासाठी वाट मिळाली. आणि हा धुमसता राग अतिविराट मोर्च्याच्या रुपात बाहेर पडला. मराठा समाजाच्या चांगुलपणाचा व सौहार्द्याचा पिढ्यान पिढ्या अनुभव घेतलेल्या इतर समाज घटकांनीही ही तगमग समजून घेतली व मराठा मोर्च्यांना सर्वतोपरी पाठिंबा दिला.

मराठा मोर्च्याचे फलित काय या प्रश्नाकडे वळताना सद्य सत्ताधाऱ्यांची इतर सर्व जनआंदोलनातील भूमिका, जनतेच्या प्रश्नांबद्दल असणारी संवेदनशीलता तसेच आपल्या जबाबदारीचे, उत्तरदायीत्वाचे त्यांना असणारे भान या बाबी तपासून पाहिल्या पाहिजेत.   आरक्षणाचे मुद्दे घेऊन आंदोलन करणाऱ्या पटेल,जाट, गुर्जर मोर्च्यांना सरकारी यंत्रणांचा मनमानी वापर करून दाबून टाकण्यात आले. जंतर मंतरवर शेतकऱ्यांनी मानवता लज्जित व्हावी असं साप, उंदीर, मानवी मलमूत्र खाण्याचे उग्र व प्रदीर्घ आंदोलन करूनही त्याची साधी दखलही घेतली गेली नाही. त्यांचा सल, त्यांच्या वेदना समजून घेऊन त्यावर फुंकर घालणे, त्यांच्या मागण्या मान्य करणे तर दूरची बात. मध्य प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनावर चक्क गोळीबार करून मुख्यमंत्री शिवराजसिंह जनरल डायरच्या पंक्तीला जाऊन बसले. महाराष्ट्रात शेतकरी आंदोलनात तर सरकार आणखी खालच्या पातळीवर उतरले. आपली माणसे संपात घुसवून त्यांच्याशीच तथाकथित चर्चा, तीही भर मध्यरात्री करण्याचे प्रयोग झाले. जनआंदोलन हा विरोधकांचा राजकीय डाव असल्याचे आरोप करून झाले. वेळकाढूपणाचे धोरण अवलंबून शेतकऱ्यांच्या मागण्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. या सर्व बाबी ध्यानात घेतल्या तर आपलं सरकार हे अमरपट्टा लावून आलेलं सरकार आहे किंवा आपल्याला यापुढे निवडणुकांना सामोरे जायचेच नाहीये किंवा गेलो तरी निवडणुका हमखास जिंकण्याची गुरुकिल्ली आपणास मिळाली आहे ही राज्यकर्त्यांची बेगुमान बेफिकीर भूमिका स्पष्ट कळून येते. मराठा मोर्च्यांच्या कोणत्याच मागण्या मान्य झाल्या नाहीत ही गोष्ट मान्य करतानाच 2014 पासून महाराष्ट्रात किंवा भारतात झालेल्या कोणत्याच आंदोलनाच्या कोणत्याही मागण्या मान्य झालेल्या नाहीत अथवा त्या त्या सरकारने त्यावर कोणतीही पावले उचललेली नाहीत हे ही ध्यानात घ्यावे लागेल. तथापि सरकारदरबारी असा प्रतिसाद असला तरी मराठा मोर्च्यांचे दूरगामी व ठोस परिणाम निश्चितच येणाऱ्या काळात दिसून येतील. आपण समाज म्हणून एक होऊ शकतो, आपल्या एकजुटीच्या ताकदीने भल्याभल्याना हादरवू शकतो हा आत्मविश्वास मराठा समाजामध्ये निर्माण झालेला आहे.

आणि या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत, मुंबईत 9 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मराठा क्रांती मुकमोर्चा निघणार आहे. हा मोर्चा राज्यव्यापी असल्याने मागच्या सर्व विराट मोर्च्यांपेक्षा याचे स्वरूप अतिविराट असेल, तो गर्दीचे आजवरचे सर्व जागतिक उच्चांक मोडेल आणि सोबतच त्याच पूर्वीच्याच शांततामय व संविधानिक मार्गाने पार पडेल याबाबत कोणतीही शंका नाही. राज्यकर्ते या खदखदत्या असंतोषाची दखल घेतात व मोर्च्यांच्या मागण्याला न्याय देतात की नाही हे लवकरच कळून येईल. पण या मोर्च्यांचे दूरगामी परिणाम काय होतील, महाराष्ट्राच्या सामाजिक समिकरणांमध्ये व राजकीय मतपेढ्यांच्या पारंपरिक गणितामध्ये काय बदल होईल या प्रश्नांच्या उत्तरासाठी मात्र काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

©सुहास भुसे


Wednesday 26 July 2017

सत्ताबदलाने झालेला थेट फरक

देशात सत्ताबदल होण्याचे महत्वाचे कारण होते काँग्रेसचा भ्रष्टाचार व त्यामुळं तयार झालेले नकारात्मक जनमत. ह्या कथित घोटाळ्यांचे भाजपने असे काही मोठाले आकडे लोकांच्या मनावर बिंबवले की कोणाला ते आकडे धड लिहिताही येऊ नयेत. त्या घोटाळ्यांचे पुढे काय झाले ? कितीजणांवर काय कारवाई झाली ? देशाच्या बजेट पेक्षा मोठ्या घोटाळ्यांवर सत्ताबदल होऊनही कारवाई का होत नसावी हे मोठे गहन प्रश्न आहेत.

तर सांगायचा मुद्दा हा की कथित कोळसा घोटाळ्यामुळे जनजीवनावर कोणता दुष्परिणाम झाला होता ?
कथित टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे कोणाच्या खिशाला चाट बसली ?
कथित सी डब्ल्यू जी घोटाळ्यामुळे नागरिकांना कोणता त्रास सहन करावा लागला ?
कथित अगस्ता वेस्टलँड घोटाळ्यामुळे किती जणांना कोणत्या रांगेत उभे राहावे लागले ?

सध्याच्या सरकारचे भ्रष्टाचाराचे उस्से भी जादा कारनामे तर समोर येत आहेतच पण त्यांच्या मनमानी कारभाराचा लोकांना थेट फटका बसतोय. नोटबंदीमुळे विस्कळीत झालेली व्यवस्था अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. रांगेत कित्येक लोक प्राणास मुकले, अनेकांचे व्यावसायिक नुकसान झाले, लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या. रांगेत अनेकांचा बहुमूल्य वेळ गेला. GST असो, विविध दरवाढी असोत की नोटबंदी..  सरकार लोकांच्या थेट खिशात हात घालतय. सरकारी गायगुंड लोकांचे खून पाडत सुटलेत तो एक वेगळाच विषय. सरकारच्या कारभारातली अनागोंदी पूर्वी फक्त वृत्तपत्रांत वाचण्यापुरती व न्यूज चॅनेल वर पाहण्यापुरती मर्यादित गोष्ट होती पण आता हेडलाईन मध्ये "मितरो ... " ही भरतवाक्याची नांदी ऐकली की लोक खिसे चापचतात, पाचावर धारण बसते. आता काय नवीन लचांड गळ्यात पडते म्हणून गाळण उडते.

इतर कित्येक फरक असतील पण पूर्वीच्या व आताच्या सरकारमधील हा महत्वाचा फरक आहे. बाकी विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सरकार कोणतेही असले तरी त्याने फरक पडत नाही.
©सुहास भुसे

उदयनराजेंच्या मागे जनमत का एकवटतय?

उदयनराजेंच्या मागे लोकांची सदभावना एकवटत आहे. हे पाहून काही विजारवंतांच्या 'फ्लेग्जीबल' पाठीच्या कण्यातून थंड लहर दौडली. लोकांचा सरंजामशाहीकडे असणारा ओढा पाहून काही विजारवंतांची गाळण उडून ते घामेघुम झाले. तर काही मोदिशाही समर्थक विजारवंताना पुन्हा एकदा राजेशाही अवतरते की काय या भीतीने निद्रानाशाचा विकार जडला.

पण यापैकी कोणालाही या घटनाक्रमामागच्या षडयंत्राबद्दल बोलावेसे वाटले नाही. याचिकाकर्ता व पूर्वाश्रमीचा तडीपार गुंड पण सध्याचा एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यातील नातेसंबंधांवर शंका आली नाही.

कायदा व सुव्यवस्थेचे काय होणार या काळजीने अर्धमेल्या झालेल्यांना भाजपमधील विविध गंभीर आरोप असणारे पण मोकाट फिरणारे गुंड नेते दिसत नाहीत. एकनाथ खडसे, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, राम शिंदे, पंकजा मुंडे जवळ जवळ प्रत्येक मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. विनयभंगासारखा गंभीर गुन्हा असणारा गणेश पांडे मोकाट आहे. बलात्काराचा अजामीनपात्र गुन्हा  करणाऱ्या रोहित टिळकला तात्काळ जामीन मंजूर होतो पण राजकीय आरोप असणाऱ्या उदयनराजेंचा जामीन अर्ज फेटाळला जातो यातही कोणाला काळेबेरे दिसले नाही.

उदयन राजे तर छत्रपती आहेत व गडगंज श्रीमंत आहेत पण भाजप मधील पूर्वाश्रमीचे मंडप काँट्रॅक्टर, भेळवाले, मालगुजर आज कोट्याधीश कसे झाले ? निवडणुकीसाठी 50-100 रुपयांनी पट्टी गोळा करणाऱ्या सदाभाऊ खोतने मुलाचे राजेशाही लग्न कसे केले ? सभेच्या हॉलचे भाडे उधार ठेवणाऱ्या महादेव जानकरने फडणवीसला अकरा लाखांचा चेक कुठून दिला ? मंडपाच्या बांबूसाठी खड्डे रोवणाऱ्या रावसाहेब दानवेने मुलाच्या लग्नाचा पंचतारांकित मंडप कसा उभारला ? साधनशुचितेचा पाठ पढवणाऱ्या नितीन गडकरीने पत्रकार परिषदेत प्रेसनोटसोबत नोटांनी भरलेली पाकिटे का वाटली ? अश्या लघु/दीर्घ शंकाही कोणा विजारवंतांना भेडसावल्या नाहीत. कुठून आणतात हे पैसे ? खंडणी गोळा करतात की दरोडे घालतात ?

लोक आता सुजाण होत चालले आहेत. उदयनराजे केवळ छत्रपती आहेत म्हणून नव्हे तर त्यांना सत्तेचा गैरवापर करून अडकवले जात आहे, त्यांच्याविरुद्ध रचलेले हे खोटे कुंभाड आहे हे पक्के ठाऊक असल्यामुळे उदयनराजेंच्या मागे एकवटत आहेत. उदयनराजेही कायदा व संविधानाचा मान ठेवत पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. पण पुन्हा एकदा भाजपने दगा करत त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत डांबले आहे. भाजप सरकारच्या या कृतीने अजूनही भाजपच्या बदनितीबाबत संभ्रमित असणारांचे डोळे खाडकन उघडतील व ते या लोकांच्या संमोहनातून बाहेर येतील हीच अपेक्षा !!
©सुहास भुसे

Monday 24 July 2017

माझी देवपूजा

"आज श्रावण सोमवार आहे तेव्हा आज देवपुजा तुम्ही करा"
आमच्या कलत्राने सकाळी सकाळी असा अध्यादेश जारी करत वातावरण तंग करून सोडले. तसा मी अगदीच नास्तिक नाही. सहज जाणे झाले तर देवळातही जातो, नमस्कार करतो. पण पूजा, फुलं वाहणे, प्रदक्षिणा वगैरे आवाक्याबाहेरचे प्रकार, थोडक्यात देखल्या (दिसला तरच) देवाला दंडवत असा प्रकार.

पण कालच्या घमासान चर्चेत घरकामात मदत करायची म्हटलं की मी फडणवीसला कर्जमाफी मागितल्यासारखा चेहरा करतो, तो तुमचा अमका मित्र बघा, तो तमका भाऊ बघा असे मुद्दे पुढे आले. थोडक्यात इतर लोक घरकामात चीन आहेत तर मी 10 दिवसांचा दारुगोळा उरलेला भारत आहे असा निष्कर्ष काढला गेला. त्यावर भक्तांच्या राष्ट्रप्रेमाने भारलेल्या विजीगीषु बाण्याने मी चवताळून गर्जना केली की उद्यापासून जोरदार घरकाम अंगावर घेतले जाईल. त्याच पडत्या फळाची आज्ञा घेऊन हा अध्यादेश निघाला होता. मोदी वाटेल ती आश्वासने देऊन जनतेला फसवू शकतात पण बायकोला फसवणे इतके सोपे नसते हे त्यांना जसोदाबेन सोबत असत्या तर चांगलं कळलं असतं.

तर मन मारून अडवाणी जसं कोविंद यांचं अभिनंदन करत होते तसं मी देव्हाऱ्यापुढं उभा राहिलो. मुलांचं आवरत आवरत कलत्राच्या सूचनांचा सपाटा कानावर कोसळत होता. बेल वाहा, फुलं वाहा, धूप लावा, अगरबत्ती, कापूर लावा, गंधाच्या डब्या तिकडे ठेवल्या आहेत. आज शिवामुठ तांदूळ आहे ... यांव त्यांव ...वगैरे. त्या गाईडलाईन फॉलो करत कामगिरी पार पाडायची होती.

तर अस्मादिक सावरून देव्हाऱ्यापुढं उभे राहिले. देव्हाऱ्यात 33 कोटी देवांची मांदियाळी माजली होती. जागेची टंचाई व देवांची खचाखच गर्दी पाहता हा आमच्या गावातल्याऐवजी मुंबईतला देव्हारा वाटत होता. काय त्या पूजेचे अवडंबर माजवते ही.. हाय काय अन नाय काय.. दोन मिनिटांत होत्याचं नव्हतं करून टाकतो. असं पुटपुटत मी बेल, फुल, गंध जे हाताला लागेल ते जिथं मोकळी जागा दिसेल तिकडे ठेवून दिले. सुमारे साडे बहात्तर सेकंदात यथासांग देवपूजा आटोपून मी छाती काढत दिवाणखान्यात सोफ्यावर जाऊन बसलो. व पायावर पाय टाकत ऐटीत चहाची वाट पाहू लागलो.

पण चहाऐवजी आतून "अहो, काय करून ठेवलय हे, इकडे या पटकन" अशी भीमगर्जना ऐकू आल्याने मी दबकत दबकत आत गेलो.
" अहो, देव कुठं आहेत, फुल कुठं वाहिलीत? धूप विझलाय ? बेल कोणाला वाहतात ? पिंडी दिसते का कुठं आहे ? काय प्रकार आहे हा ? ***, ****, ***, ****, "
या माऱ्याने मी पुरता बावचळून गेलो. आधीच ही ट्रम्प तात्या मीडियावर चिडून असतात तशी तुंबलेली त्यात मोदीने नोटबंदी करून देशात धुमाकूळ माजवून दिल्यासारखा मी देव्हाऱ्यात धुमाकूळ माजवला होता. ड्यामेज कंट्रोल साठी पुन्हा देवपूजा करणं भाग होतं.
मग ही रखुमाई सारखी कमरेवर हात ठेवून शेजारी उभी राहिली..

"चला मी सांगते तसं करा, एक एक फुल घेऊन एका एका देवाच्या डोक्यावर व्यवस्थित ठेवा."
मी आपलं स्वयंसेवक जसं स्वतःच डोकं न चालवता सरसंघचालकांच्या आदेशाचे निमूट पालन करतात तसं करण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू केली.
"पिंडी शोधा आधी, ती बघा भैरवनाथाच्या मागे आहे. अहो, तिथं नव्हे तो जोतिबा, छे तो खंडेराया, घोड्यावर बसलेले सगळेच देव भैरोबा नसतात, हां हां ...आता तिला बाहेर पाटावर ठेवा, पाणी वाहा, बेल वाहा.. अमुक *** तमुक *** यांव ** त्यांव "
सुमारे साडे तेवीस मिनिटे निकराची झुंज दिल्यावर रखुमाईने कमरेवरचे हात खाली घेतले व समाधानाने मान डोलावली.
" याला म्हणतात पूजा, आता कसं प्रसन्न दिसतोय बघा देव्हारा "

मी घाम पुसत आजवर पूजा करणाऱ्या भटजींवर तोंडसुख घेतल्याचा मनातल्या मनात पश्चाताप व्यक्त करत देवपूजा म्हणजे खायचे काम नव्हे आणि आपले तर खचितच नव्हे असा निष्कर्ष काढत उद्यासाठी सोप्यातले सोपे कोणते घरकाम अंगावर घेता येईल याचा विचार करण्यात गुंग झालो.
©सुहास भुसे

Sunday 23 July 2017

उदयनराजेंचा वारसा

वैचारिक वारस वगैरे तात्विक चर्चा ठीक आहेत. पण
श्रीमंत छत्रपती उदयनराजे छत्रपतींचे वारस आहेत हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तुम्ही घरी माजघरात बसून फेसबुकवर काय मत मांडता त्याने त्यावर काही फरक पडत नाही.

छत्रपतींचा वारसा उदयन राजेंनी सांगू नये असं वाटत असेल तर आधी बापाच्या इस्टेटीवरील हक्क सोडा. स्वतःची जी काही मिळकत आहे ती दान करून टाका. मुलांना इस्टेटीतून बेदखल करा. मग वारश्याबद्दल 'क्रांतिकारी' मते मांडा. घरात असो की राजकारणात पुत्र पुत्री प्रेमापोटी पुतण्यांच खच्चीकरण केलं जातं. पोराऐवजी पुतण्या चालत नाही आणि हे वैचारिक वारसाच तत्वज्ञान मांडायला निघाले.

'लोकशाहीत' राजकीय पदे वारसा हक्कानेच मिळतात हे ही वास्तव ध्यानात घ्यायला हवं. पुढाऱ्याचा मुलगा वयात आला की बाय डिफॉल्ट युवा नेता होतो. सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते सतरंज्याच उचलत राहतात. एका घरात नेता, त्याची बायको, मुलगा, मुलगी, सून, जावई असं अख्ख कुटुंबच्या कुटुंब वेगवेगळी पदे भोगतं. एका 'समाजवादी' परिवारातील 50-60 सदस्य एकाच वेळी राजकीय पदे भोगत आहेत . हे सगळं चालतं पण उदयनराजे तेवढं खटकतात. असा सिलेक्टिव्ह एप्रोच कसा चालेल बरं ?

माणूस मूलतः इतिहासप्रेमी असतो. इतिहासाशी आणि ऐतिहासिक वारश्यांशी त्याच्या भावना निगडित असतात. आमचा राजा ही आमची भावनिक गरज आहे. बाकी लोकशाही, कायद्यापुढं सगळे समान हे आम्हालाही ठाऊक आहे व आमच्या राजालाही मान्य आहे. राहिला भावनिक राजकारणाचा प्रश्न. तर दंगली घडवून त्या भावनांच्या लाटेवर इथं सहज सत्ता मिळवता येते, आईच्या हत्येच्या सहानुभूतीच्या लाटेवर तत्पूर्वी राजकारणाचा गंध नसणारा मुलगा थेट पंतप्रधान बनतो. (ही टीका नव्हे वास्तव आहे). बापाच्या मृत्यूपश्चात केवळ सहानुभूती व भावनांच्या लाटेत कर्तृत्वशून्य मुली मंत्री बनतात. ज्या मतदार संघात तिथल्या आमदार खासदाराचे निधन होते तिथल्या पोटनिवडणुकीत हमखास त्याचा रक्ताचा वारसच निवडून येतो.

अश्या या देशात फक्त उदयनराजेंच्या बाबतीत वैचारिक वारश्याचे तत्वज्ञान मांडण किंवा फक्त उदयनराजेंच्या समर्थकांवर भावनिकतेचा आरोप करणे हा सिलेक्टिव्ह एप्रोच आहे, 'सोयीस्करवाद' आहे, पक्षपात आहे, छत्रपतींच्या घराण्याबद्दल खदखदणारा पावणे चारशे वर्षे जुना द्वेष आहे, दुसरं तिसरं काही नाही !!
©सुहास भुसे

कडवटपणाने काय साध्य होणार ?

देवस्थानच्या पूजेच्या वहिवाटीवरून मारामाऱ्या होतात. टीचभर दक्षिणेचा मोह सुटत नाही. कोर्टकज्जे होतात. झाटभर काजू, नारळाच्या कलमावरून भावभावकीच्या भांडणात वकिलांच्या अनेक पिढ्या जगल्या. बांधाच्या भांडणात सर्वाधिक खून पडतात. भावाभावाच्या वाटण्या होताना सुतळीचा तोडा सुद्धा अर्धा अर्धा तोडून घेतला जातो.

आणि हे तमाम दुतोंडे सार्वजनिक व्यासपीठावरून ज्ञान पाजळतात. उदयनराजांची हजारो एकर जमीन त्यांच्या डोळ्यात खुपते. जी जमीन राजे कसत नाहीत अगर कुळांकडून एक नया पैसा खंड, बटई दखल घेत नाहीत. प्रतापगड, शिंगणापूर राजांच्या मालकीचे कसे म्हणून हे 'सुतळी तोडा' फेम लोक आश्चर्य व्यक्त करतात. वारसा बिरसा सगळं झूट, राजेशाही केव्हाच संपली वगैरे कुठेतरी वाचलेली वाक्ये सटासट फेकून हाणतात.

परवा बीजेपी माझाने बातमी चालवली की,
"भोसले कुठं फरार आहेत ?"
हजारो वर्षे गुलामगिरीत काढलेल्या लोकांच्या हाती लोकशाही म्हणजे माकडाच्या हातात कोलीत या विस्टन चर्चिलच्या उदगारांचे स्मरण झाले. राजेशाही जरी कागदोपत्री संपली असली तरी माणूस हा भावनांवर जगतो. छत्रपतींच्या गादीशी, तिच्या वारसाशी त्यांच्या श्रद्धा निगडित आहेत. इंग्लड सारख्या लोकशाहीच्या जन्मदात्या राष्ट्रात राजा राणीला मानाचे स्थान आहे. औपचारिक सत्ताधारी जरी विधिमंडळ व पंतप्रधान असले तरी तिथल्या लोकांच्या मनावर अजूनही राजराणीच राज्य करतात.

स्वातंत्र्याचा व समतेचा अर्थ उद्दामपणा नव्हे अगर व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे कडवटपणा नव्हे. वारसा बिरसा सगळं झूट अशी भीमगर्जना करून तुम्ही विवेकवादी वगैरे म्हणून एकमेकांच्या टिरी खाजवून त्या लाल करून घेऊ शकाल. पण जिथे मान लववावी, ज्यामूळ तुमची छाती अभिमानाने भरून यावी अश्या जागा जर नसतील तर तुम्हाला जीवनात कडवटपणा व शून्याखेरीज काहीही हाती लागणार नाही.
©सुहास भुसे

मर्कटलीला

गावात एक माकड आलय. या भागात बजरंग बलीचा अवतार फारसा फिरकत नाही. त्यामुळं लोकांना पण अप्रूप वाटतं. लोक काही बाही खायला देत राहतात. माकडही आता गावात चांगलच रमलय. पण त्याच्या खोड्यानाही उत आलाय. एखादी बाई बापडी अंगणात एकटी दिसली की दात फिसकारत भीती दाखवतय.  हातात जे असेल ते हिसकावून घेतय. पोरा सोराना हात पाय उगारत भीती दाखवतय.
काल तर गंमतच झाली..
मंगला आक्का खाली वाकून अंगणातला केर लोटत होती. माकडाने शेजारच्या भिंतीवरून आक्काच्या पाठीवरच उडी मारली. व तिथच आरामात ठिय्या जमवला. माकड तसं छोटं व वजनाने हलकं असल्याने आक्काला वाटलं तिचा नेहमी अंगाला झटणारा नातू गण्याच आहे. त्याला लाडे लाडे रागे भरत ती उतर खाली काम करू दे मुडद्या म्हणत खाली वाकून लोटतच होती..
तिच्याकडे गप्पा टाकायला नेहमीच्या वेळेला आलेली तुळसा नानी हे दृश्य बघून हक्का बक्का झाली..
बोबडी वळल्याने तोंडातून कसं बसा आवाज काढत ती ओरडली.
"आक्काsss माकडsss "
तरीही आक्का तिच्याच नादात.. आक्का म्हणते,
"कुठय ग ? ये गण्या उतर मुडद्या. त्ये बग माकड आलय म्हण. "
नानी पुन्हा ओरडली..
"आग आक्का तुझ्याच पाठीवर बसलंय "
आक्काने वाकल्या वाकल्या मान वळवून पाठीवर बघितलं. माकडाने आक्काकडे बघत दात काढून फिस्स केलं. आता मात्र आक्काची पाचावर धारण बसली. आता उठावे की पळावे की ओरडावे काहीच कळेना. थरथर कापत तिने हातातला झाडू माकडाला मारला. तो चुकवण्यासाठी माकडाने खाली वाकत तिच्या गळ्यातच हात टाकले आणि आक्काला मिठीच मारली.
मग मात्र आक्का मागचा पुढचा विचार न करता जोरात ओरडत किंचाळत अंगणात इकडे तिकडे धावू लागली.
मघाच पासून आपल्याला पाठकुळी घेऊन निवांत लोटणारी ही म्हातारी अचानक का किंचाळायली हे माकडाला कळेना.. ते दचकून उडी मारुन शेजारच्या भिताडावर बसलं आणि घाबरून आक्काकडं बघू लागलं.
हा सगळा नाट्यमय प्रकार घडेपर्यंत तिथं जमा झालेल्या बाळगोपाळांची व आमच्यासारख्या बघ्यांची मात्र हसून हसून मुरकुंडी वळली.
©सुहास भुसे

अश्रू

मा प्रधानसेवक मोदीजी गांधी घराण्यावर कितीही टीका करत असले तरी त्यांचे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या लोकोत्तर प्रतिमेचे आकर्षण लपून राहिलेले नाही. विशेषतः इंदिराजींची भ्रष्ट नक्कल करण्याच्या ते सदैव प्रयत्नात असतात.

या संदर्भात एक सहज जाणवलेली तुलनात्मक गोष्ट.
संजय गांधी यांच्या अंत्यविधीच्या वेळी इंदिराजीनी काळा चष्मा घातला होता. राजीव गांधी यांच्या अंत्यविधीप्रसंगी सोनिया गांधींनी देखील काळा चष्मा घातला होता. अश्रू हे कमजोरपणाचे लक्षण मानले जाते. या कठीण प्रसंगी आपण गर्भगळीत दिसलो तर आपल्या कुटुंबियांवर, आपल्यावर प्रेम करणाऱ्या उपस्थित लोकांवर त्याचा चांगला परिणाम होणार नाही. त्यामुळे मोठ्या धीरोदात्तपणे अश्रू थोपवून धरले असले तरी त्यातूनही डोळ्यांतून ओघळणारा एखादा चुकार अश्रूबिंदू लोकांना दिसू नये हा उद्देश काळा चष्मा घालण्यामागे होता.

या पार्श्वभूमीवर आपले प्रधानसेवक भर सभेत धाय मोकलून रडतात. 'मैंने देश के लिये घर बार, सबकुछ छोडा' असं आर्त टाहो फोडून सांगतात. महनीय व लोकोत्तर व्यक्तिमत्वांचे अनुकरण करणेदेखील इतके सहजसाध्य व सोपे नसते. वागण्याबोलण्यातली सुसंस्कृता, शालीन वावर, वैचारिक परिपक्वता ही पिढ्यानपिढ्यांच्या संस्कारांमधूनच अंगात मुरत असते. शेवटी खानदानी, घरंदाज, सुसंस्कृत लोकांत आणि उठवळ, लाटेवर स्वार होऊन मोठ्या झालेल्या, उथळ, सवंग लोकांत फरक हा राहणारच...
कितीही झालं तरी .....
©सुहास भुसे

मेरे रशके कमर

मेरे रशके कमर ... ज्यांनी पूर्वी ऐकलं नव्हतं त्यांनीही अलीकडे ऐकलं असेल .. एकदा ऐकलं की मनावर गारुड होतं या गाण्याचं. ऐकतच राहतो माणूस. ऐकत नसतानाही मनात तेच सूर घोळत राहतात.. अर्थात हा अनुभव येण्यासाठी नुसरत फतेह अली खाँ साहेबांच्या आवाजातली मूळ कव्वाली ऐकायला हवी..

'बेहिजाबाना वो सामने आ गये
और जवानी जवानी से टकरा गयी'
खाँ साहेब हे अश्या नजाकतीने म्हणून जातात की तो टकराव आपण अक्षरशः अनुभवतो..ऐकता ऐकताच एक सूक्ष्म थरथर होते.
एका स्पीड मध्ये कव्वाली सुरू असताना शेवटच्या ध्रुवपदाला मेरे ss रशके ss के कमर नुसरत साहेब असं सावकाश असं लचकत म्हणतात जणू 'ती' समोरून ठुमकत, मुरडत येत असावी असा फील येतो.

फना बुलंद शहरी ची ही खर तर गजल आहे. पण नुसरत साहेबांनी ती गायली कव्वालीसारखी. आणि हे काँम्बीनेशन किती जबरदस्त जमून गेलेय ते तब्बल साडेसतरा मिनिटं आपण मंत्रमुग्ध होऊन अनुभवत राहतो.

प्रेम करावं तर उर्दूत.. उर्दूची लचक, शिद्दत, नजाकत जगातल्या दुसऱ्या कोणत्या भाषेत असेलसं वाटत नाही.
'चाँद के साये मे ए मेरे साकीया
तुने ऐसी पिलाई मजा आ गया'
साकीया शब्दाला काय प्रतिशब्द योजता येईल? कप बेअरर? बार अटेंडन्ट? किती रुक्ष वाटत हे. मराठीत तर हा साकीया बिकिया प्रकारच नाही.
'आँख मे थी हया हर मुलाकात पर
सुर्ख आरिझ हुये वस्ल की बात पर'
लाजण्याच वर्णन इतक्या गहिऱ्या उत्कटतेने दुसऱ्या शब्दात, दुसऱ्या भाषेत करणं कठीण!
'उस ने शर्मा के मेरे सवालात पर
ऐसे गर्दन झुकायी मजा आ गया ..'
लाजण्याच्या फँटसीने एक सुखद संवेदना उमटते. ते लाजणं काळजात आरपार होतं..
ऐकत ऐकत आपणही शेवटी या गाण्यावर त्या शेख साहिब सारखं आपलं इमान हरवून बसतो..
नुसरत फतेह अलींच्या इतर कव्वालींएवढी ही हिट झाली नसली तरी मला ती नुसरत फतेह अलींची सगळ्यात श्रेष्ठ कव्वाली वाटते ..
©सुहास भुसे

सुप्रिया ताईंशी एक मनमोकळा संवाद

सुप्रिया ताईं ची राहणी आणि व्यक्तित्व इतकं साधं आहे की त्यांच्याशी बोलताना कसलंही दडपण वाटत नाही.. कसलाही पोकळ डामडौल नाही की कसला बडेजाव नाही. सामान्यातला सामान्य माणूसही त्यांना सहज भेटू शकतो, संवाद साधू शकतो ..
आपल्या ऋजु, सौम्य शैलीत बोलत सुप्रियाताई त्याला बोलतं करतात.
काही दिवसांपूर्वी ताईंशी मनमोकळी अनौपचारिक चर्चा करण्याचा योग्य आला. सद्य राजकीय परिस्थितीची सुप्रिया ताई ना उत्तम जाण आहे. वादग्रस्त विषयांवरची त्यांची मते स्पष्ट व ठाम आहेत.

सध्या धर्माचे जे अवडंबर माजवले जात आहे त्याबद्दल ताईंना विचारले असता ताई म्हणाल्या,
"माझी श्रद्धा व माझा धर्म मी वैयक्तिक ठेवते. त्याच प्रदर्शन मांडायला मला आवडत नाही. मोठे साहेब तर कधीच कोणत्या मंदिरात जात नाहीत. मी क्वचित, मनात आलं तर एका मंदिरात जाते.. ते मी लपवत नाही अगर मुद्दामहुन सांगत ही नाही. तो नॉन ईश्शू व पूर्णतः पर्सनल मुद्दा आहे."

भाजपच्या मीडिया सेल ला उत्तर देण्यासाठी आपण तोडीस तोड मीडिया सेल का बनवत नाही असं विचारलं असता ताई म्हणाल्या,
"राष्ट्रवादीचा मीडिया सेल आहे. पण तो फक्त पक्षाचा प्रसिद्धी विभाग आहे. पक्षाच्या धोरणांना, शीर्ष नेत्यांच्या मतांना प्रसिद्धी देणे इतकेच काम तो करतो. त्यापुढे जाऊन आपल्याला पेड ट्रोल्स बनवायचे नाहीत."
भाजपच्या ग्लोबेल्स नीतीपुढं आपण कमी पडतो आहोत का याच स्पष्टीकरण देत ताई पुढं म्हणाल्या की " सकृत दर्शनी तसं वाटतं असलं तरी ते अर्धसत्य आहे. अश्या गोष्टींचा तात्कालिक परिणाम दिसतो पण दूरगामी विचार केला तर त्याचे दुष्परिणामच होतात. तुम्ही तीनच वर्षात कंटाळलात की नाही या जाहिरातबाजीला ? आणि आपल्याला कंटाळायला लोकांना 15 वर्षे लागली.
लोक जेव्हा पर्यायाचा विचार करतील तेव्हा त्यांच्यापुढे ऑप्शन हवा...
काम न करता जाहिरातींचा मारा करणारे
आणि काम करूनही जाहिरात न करणारे .."

सुप्रिया ताईं शी बोलताना आपल्या समाजवादी आजीचा व पुरोगामी पित्याचा वैचारिक वारसा समर्थपणे पेलण्याची धमक त्यांच्यात आहे याची मनोमन खात्री पटत होती ..
***

सुप्रियाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
अभिष्टचिंतन ....
©सुहास भुसे


नेत्यांविषयीची सामाजिक मानसिकता

मोदी व्हाइट हाऊसवर उतरले तेव्हा परंपरेप्रमाणे गार्ड ने मोदींच्या पत्नीसाठी गाडीचा दरवाजा उघडून धरला. बराच वेळ वाट पाहूनही त्या दरवाज्यातून कोणीच खाली उतरलं नसल्याने गार्डचा भ्रमनिरास झाला असावा.
पत्नी असूनही राष्ट्राध्यक्षांच्या 10-5 गर्लफ्रेंड असणे कॉमन मानणाऱ्यांच्या देशात देशसेवेसाठी (!) पत्नीचा त्याग करणारा प्रधानसेवक विजोड वाटल्यास नवल नाही.

आपली सामाजिक मानसिकता दांभिक आहे. महानतेच्या व्याख्या तकलादू आहेत. आपल्याकडे 'दिसणे' हे 'असण्या' पेक्षा जास्त महत्वाचे असते. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यांना आपण कधीच महत्व देत नाही. ज्यांचा विचारही करण्याची गरज नाही त्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या असतात..

आपण नोटबंदी का केली याचा जाब विचारण्यापेक्षा नेता 18 तास (!) काम करतो, योगा करतो यावर चर्चा रंगवणार.
3 वर्षांपूर्वी 14% GST ला विरोध करणारा नेता 28% GST कसं काय लादू शकतो याच्यापेक्षा आपल्याला तो काय 9 लाखांचा सूट घालतो, दीड लाखाचा मेकअप करतो, 34 हजारांचे मशरूम खातो यात जास्त रस असतो.

नेत्याने जनतेला भूलथापा देऊन सरळ सरळ फसवल्यास आपली तक्रार नसते. पण त्याच्या कथित शुचितेवर व राहणीवर आपलं अधिक लक्ष असतं. जीन्स, टी शर्ट घालून आपले नेते स्टेजवरून भाषण देऊ शकत नाहीत. पण त्यांनी भ्रष्टाचार केल्यास आपली फारशी हरकत नसते.

असल्या दांभिक सामाजिक मानसिकतेमुळे आपले नेते आपला दुटप्पीपणा लपवत नाहीत, भ्रष्टाचार लपवत नाहीत, पण प्रेमप्रकरणे लपवतात. 'स्नुपगेट' सारखी प्रकरणे चिरडून टाकली जातात. काही नेते 'ब्रह्मचारी' राहतात. तर काही पत्नीचा त्याग हे महानतेचे प्रतीक म्हणून प्रोजेक्ट करतात. गुड गव्हर्नन्स सारख्या फालतू गोष्टी प्रोजेक्ट करण्याची  गरजच काय !!
©सुहास भुसे

इतिहासाची ऐसीतैशी

इतिहासावर एक सचित्र ग्रंथ लिहिण्याचा मनोदय आहे. त्यात पानपताच्या युद्धात मराठ्यांचा विजय झाला व अब्दाली पराभूत होऊन पळून गेला अस लिहिण्याचा मानस आहे. तसेच शक, हूण, मुघल, पोर्तुगीज, इंग्रज यांना प्रत्येक लढाईत एत्तदेशीयांनी पराभूत केले व हा देश कधीही गुलाम नव्हता अस क्रांतिकारक प्रकरण टाकणार आहे.
यातुन प्रेरणा घेऊन भारतीय लोकांची गुलाम, पराभूत मानसिकता बदलावी असा माझा उदात्त हेतू आहे.

पेशवे हे ब्राह्मण नसून शूद्र होते हे मी आवर्जून नमूद करणार आहे. तसेच दुसऱ्या बाजीरावाने वटहुकूम काढून आपल्या राज्यात आंतरजातीय विवाह सक्तीचे केले होते. त्यामुळे त्या काळात झालेला प्रत्येक विवाह हा आंतरजातीय होता यावरही एक प्रकरण लिहिण्याचा मानस आहे. यामुळे ब्राह्मण द्वेष कमी होऊन जातीय सलोखा वाढीस लागावा असा उदात्त हेतू आहे.

शिवाजी महाराजांच्या सैन्यात 2245 तुकड्या होत्या. व त्या प्रत्येक तुकडीत भारतातल्या 2245 नोंदीकृत जातींचा एक एक प्रतिनिधी शिलेदार होता. आणि या सर्व तुकड्यांवर 2245 वेगवेगळ्या जातींचे सेनानायक होते. यावर विस्तृत प्रकरण लिहिणार आहे. छत्रपतींच्या प्रतिमेचा फायदा होऊन या लेखनामुळे जातीअंताच्या लढ्यास बळ मिळावे, एकसंध समाज निर्माण व्हावा असा आदर्शवाद यामागे आहे.

या सर्व लेखनाला मी कोणताही पुरावा देणार नाही. कारण लिखित पुराव्याना आम्ही ब्राह्मणी पद्धत मानतो. 'जाणीवेला' जाणवते तेच सत्य मानण्याने आपली फसगत होते. 'नेणिवे' तल्या नोंदीच दिशा दिग्दर्शनाचे काम करतात. त्यामुळे हे सर्व तर्कट मी केवळ 'तर्काच्या' आधारे रचणार आहे.

प्रस्तावना लिहिण्यासाठी होतकरू इतिहास लेखक श्री श्रीमंत कोकाटेना विनंती करणार आहे. हे पुस्तक कोणीच प्रकाशकाने प्रसिद्ध केले नाही तर स्वतःच फेसबुकवर प्रसिद्ध करण्याचा व कोणीच वाचले नाही तर स्वतः च 200 फेक अकाऊंट काढून प्रत्येक अकाउंट वरून आठवडाभर अस वाचून पारायणे करण्याचाही मानस आहे.

©सुहास भुसे

अभ्यासू ब्राह्मण

एका गावात देवेंद्रपंत नावाचा एक दशग्रंथी ब्राह्मण राहत होता. स्नान, संध्या, जपतप सगळं सोवळ्यात काम. कोणत्याही गोष्टीची अभ्यासाच्या नावाखाली अतिचिकित्सा करून प्रश्न लोंबकळवत ठेवण्याची त्याला उत्तम हातोटी होती.

एक दिवस नदीवर गेला. स्नान करून ओल्या वस्त्रात परतताना पायाखाली एक चिंधी आली. देवेंद्रपंतांचे अभ्यासू चिकित्सक मन जागे झाले. ही चिंधी कोणाची ? स्पृश्याची की अस्पृश्याची ?
शंकेला जागा नको म्हणून पंत पुन्हा नदीवर गेले व चार बुड्या मारल्या. ओंजळीत पाणी घेऊन आचमन करताना भाताचे एक शीत तोंडात गेले. झालं. देवेंद्रपंतांचे चिकित्सक मन पुन्हा जागे झाले. हे कुणाचं खरकट ?
या प्रश्नाचा आता समूळ अभ्यास केला पाहिजे.

शीत कोणाचे याचा अभ्यास करण्यासाठी देवेंद्रपंत नदीकाठाने वर निघाले. चांगले पाच सहा मैल चालत गेल्यावर वरच्या अंगाच्या गावात काही लोक मोठं मोठी भांडी धूत होते.
पंतांनी विचारलं, भाताचे भांडे तुम्हीच घासले का ?
लोक म्हणाले, हो.
पंतांनी पुढचा अभ्यासू प्रश्न केला. 'कशाचे जेवण होते ?'
लोक म्हणाले, ' पाटलाच्यात काल जागरण गोंधळ होता, पाच बोकडं कापली होती. त्याचीच भांडी आम्ही धूत होतो.'
पंत कुचमले. शिव शिव म्हणत नदीत पुन्हा चार बुड्या मारल्या.

हा सगळा प्रकार होईपर्यंत त्यांना चांगलीच भूक लागली होती. गावात एखादे ब्राह्मणाचे घर आहे का याचा अभ्यास करून आधी जेवले पाहिजे बुवा.
विचारत विचारत पंत एका घरासमोर आले. घरातून बाई म्हणाली,
'हो, हे ब्राह्मणाचे घर आहे.'
भरपेट जेवण झालं. सगळं व्यवस्थित झाल्यावर बाईनी विचारलं,
'तुम्ही फार अभ्यासू दिसता तोंडावरून. मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला योग्य मार्ग दाखवा.'
पंत म्हणाले बोला.
बाई म्हणाली, ' माझा नवरा ब्राह्मण आहे व मी मुसलमानाची आहे. त्यामुळे प्रश्न असा निर्माण झालाय की आमचा जो मुलगा आहे त्याची सुंता करावी कि मुंज ?'

पंत पुन्हा कुचमले. चिकित्सक मन जागृत झालं. प्रायश्चित्त म्हणून जंगलात जाऊन तपोभ्यास करावा म्हणून स्वारी निघाली.
जंगलात अभ्यास करता करता रात्र झाली.
देवेंद्रपंत आपलं पोट सावरत एका झाडावर चढले.
वर जाताना एका फांदीवरून पाय घसरला. पंत फांदीच्या जाळ्यातून खाली पडू लागले.
पडता पडता हाताला एक फांदी लागली. पंत तिला पकडून लोंबकाळू लागले.
आता काय करावे ? बिकट प्रश्न असला तरी अभ्यास केल्याशिवाय निर्णय कसा घ्यायचा बरं ? खाली खोल दरीच असली म्हणजे ?
देवेंद्रपंत रात्रभर त्या फांदीला धरून लोंबकळत राहिले.
सकाळी फटफटल्यावर खाली पाहतात तो दोन फुटावर जमीन !

:- साठा उत्तराची कहाणी.. अभ्यास पूर्ण झाल्यावर सगळी चिकित्सा करून पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करण्यात येईल.

©सुहास भुसे


Friday 2 June 2017

ग्रामीण खाद्य जीवन

शीर्षटीप :- कमजोर ह्रदयाच्या आणि सोवळ्या लोकांनी स्वतःच्या जबाबदारीवर वाचावे.

मटण म्हटलं की आपल्याला दोनच प्रकार ठाऊक असतात. बोकडाचे किंवा कोंबडीचे.
ग्रामीण भागातले खाद्य जीवन पूर्वापारपासून या बाबतीत खूप समृद्ध आहे. रानडुकराची शिकार करून अत्यंत चवीने खातात लोक. डुकराचे मांस चवदार व चरबीयुक्त असते. ते खाताना चवीपुरतीच भाकरी भात घेतात लोक. बोकडाचे मटण ताटात. तर हे डायरेक्ट पातेलीच घेऊन बसतात. याची कातडी तर खोबऱ्यासारखी चवदार लागते असं जाणकार म्हणतात.  शिकारीत कातड्याच्या वाट्यावरून वाद होतात.
बरं रानडुकराचं वजन अफाट असतं. वाटे घालून, घरी खाऊन, पै पाहुणे बोलावून, गल्लीत वाटून ही संपत नाही. मग या मटणाचे लोणचे घालतात. पोर्कचे लोणचे हा अत्यंत चवदार व लोकप्रिय प्रकार आहे. त्याची किंमत 2000 ते 3000 रु किलो पर्यंत असते.

सश्याची शिकार हा तर पोरा ठोरांचा खेळ.
त्यासाठी लागणाऱ्या घरघुती मेडच्या वाघरी अर्थात जाळी गल्लोगल्ली उपलब्ध असतात. सश्याचे माग शोधणे, गवताचे खुडलेले शेंडे, मातीतली पावले हा शॉरलॉक होम्सच्या तोंडात मारणारा इंटरेस्टिंग प्रकार आहे. पोरं सगळा माल मसाला सोबतच घेऊन असतात. शिकार साधली की लगेच माळावरच त्याचा फन्ना उडवला जातो. कधी भाजून तर कधी तिकडेच तीन दगडांची चूल मांडून.

घोरपड ही क्वचित सापडणारी अपवादात्मक शिकार. त्यामुळे त्याला फार भाव. घोरपड छोटी असते बऱ्याचदा. म्हणून शिकारकरे गुपचूप कार्यक्रम करतात. घोरपड सापडली असं मंडळाला कळलं तर एक एक मणी वाट्याला येणे मुश्किल. घोरपडीच्या मटणापुढे बोकडाचे मटण म्हणजे अळूचे फदफदे.

तित्तर ही एक अशीच अवघड शिकार. हा पक्षी फार चलाख व चतुर असतो. म्हणून याला चतुर असही म्हणतात. याचे खास पिंजरे असतात. महिनोन महिने नजर ठेवून मोक्याच्या जागी ते लावले जातात. तित्तराचा लेगपीस खाताना खाद्यानंदी टाळी लागते. काळ्या तिखटातला त्याचा रस्सा तर ओरपुन ओरपुन पितात. ताटे फोडून खातात.

पारवे, होले हे स्टार्टर म्हणून वापरतात. ड्रिंक वगैरे करत असाल तर चखना म्हणून भाजलेले होले खाणे हा जेवणावर कडी करणारा प्रकार आहे. होले खाण्याच्या नादात प्रसंगी ग्लास तसाच भरलेला राहून जातो.

पाऊस पडला की ओढ्या नाल्यांना खेकड्यांची शिकार केली जाते. काठावर बिळे असतात. त्यात बाहेरची पावलवट ओळखून आत खेकडा आहे की नाही हे हेरतात. क्वचित त्या बिळात साप असण्याचा धोका असतो. एकदा कोणत्या बिळात खेकडा आहे कळलं की पुढे खूप सोपा प्रकार. एक गवताची काडी बिळात घालून हलवायची. खेकड्याने ती पकडली की पटकन बाहेर काढून खेकड्याची नांगी मोडायची आणि पाटीत टाकायचा. चांगला एरिया असेल तर तासाभरात पाटी भरते. त्यात जर एखादी गाभण मादी मिळाली तर शिकारकरे भयंकर खुश होतात. गाभण मादीला अमृततुल्य चव असते असं त्याचं निरीक्षण असत.

अजून बऱ्याच प्राण्यांच्या- पक्षांच्या शिकारी साधण्यात ग्रामीण भारतीय वस्ताद आहेत. वरील शिकारी फक्त देशावरच्या आणि पठारी भागातल्या. कोकणात आणि जंगल जवळ असणाऱ्या भागात अजूनच व्हरायटी असते शिकारींमध्ये. भटक्या विमुक्त जमातींत तर वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण तऱ्हा आहेत शिकारींच्या. उदा. कातकरी उंदरांची शिकार करतात. ढिगाने उंदीर पकडून मेजवानी करतात. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.
©सुहास भुसे


Sunday 23 April 2017

पुरोगामी शरद पवार

शरद पवार साहेबांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक विधायक व महत्वाची कामे पार पाडली आहेत. त्यापैकी काही कामे पुरोगामी चळवळीला वरदान ठरणारी आहेत.

महात्मा फुले जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारने फुले चरित्र समितीची स्थापना केली होती. तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार या समितीचे अध्यक्ष होते. या समितीने 16 खंडात महात्मा फुले यांचे समग्र वाङमय इंग्रजी, हिंदी व मराठी या तीन भाषांत प्रसिद्ध केले.

साधारण त्याच सुमारास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्यही पवार साहेबांनी 18 खंडात व इंग्रजी, मराठी या दोन भाषांमध्ये प्रसिद्ध केले.  तसेच पवार साहेबांनी या फुले-आंबेडकर समग्र साहित्य खंडांच्या जनआवृत्त्या काढायचे ठरवले. त्यामुळे हे साहित्य मुबलक प्रतींमध्ये व अत्यल्प दरात सामान्य वाचकांसाठी उपलब्ध झाले.

काही दिवसांपूर्वी एका प्रकाशक मित्रासोबत एका दुर्मिळ पुस्तकाबद्दल चर्चा सुरु होती . मित्राला प्रकाशित करण्यासाठी ते पुस्तक हवे होते . पण त्याची छापील प्रतच त्याला एक वर्षापासून उपलब्ध होत नव्हती. चर्चेच्या ओघात त्या प्रकाशक मित्राने सांगितले की सांस्कृतिक सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची मांडणी करणारी अशी अनेक दुर्मिळ पुस्तके आज पुर्नप्रकाशनासाठी उपलब्ध नाहीत. भारताचा जातीय व वर्चस्ववादी इतिहास पाहता असं होण्याचे कारण स्पष्ट आहे.

महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे क्रांतिकारी मूल्य व स्वरूप पाहता हे साहित्य जर राज्य शासनाने प्रसिद्ध केले नसते तर कदाचित त्यापैकी अनेक पुस्तके आज उपलब्ध नसली असती. आणि कदाचित चार्वाक साहित्याप्रमाणे इतरत्र सापडणाऱ्या खंडणमंडणावरून आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागला असता.

हे रचनात्मक काम हा पवार साहेबांच्या पुरोगामी कारकीर्दीतला मानाचा तुरा आहे आणि त्यांच्यावर जातीयवादाचा आरोप करणारांना सणसणीत चपराक आहे..

- पुस्तक दिनाच्या निमित्ताने

©सुहास भुसे


Tuesday 4 April 2017

राम हा रामच !

रामाबद्दल काही थियऱ्या आजकाल वाचण्यात येत आहेत.
राम नावाची कोणी व्यक्ती नव्हतीच तर
1. पुष्यमित्र शृंग हाच राम होता.
2. सम्राट अशोक हाच राम होता.
3. इजिप्तचा फॅरोव रामासीस हाच खरा राम.

रामायण महाभारत हे निव्वळ काव्य आहे असे मानले तरीही त्यातले महानायक शतकानुशतके जनसामान्याच्या मनात घर करून राहिले आहेत याकडे डोळेझाक करता येणार नाही. इतर पूर्णपणे काल्पनिक महाकाव्यांच्या बाबतीत हे झालेले दिसत नाही. इतिहासपौराणिक मिथके उलगडताना
"कथेशिवाय दंतकथा होत नाही " या महत्वाच्या नियमाकडे डोळेझाक करून चालणार नाही. घटना प्रक्षिप्त करून वेगळ्या पद्धतीने मांडणे वेगळे आणि टोकाचे बदल करून पूर्ण पात्रच दुसऱ्या पात्रावर थोपणे वेगळे.
शंभू महाराजांचा इतिहास प्रक्षिप्त करून त्यांच्यावर नसलेली व्यसने थोपता येतील पण शंभू महाराज ही व्यक्तीच नव्हती असं दाखवून ते चरित्र पूर्णपणे दुसऱ्याच पात्राचे आहे वगैरे बदल करणे शक्य आहे काय ?

दुसरी गोष्ट रामायण काल्पनिक की सत्य इतिहास ?
या संदर्भात एक समांतर किस्सा अगदी पाहण्यासारखा आहे. आपल्या रामायण महाभारताप्रमाणेच ग्रीस मध्ये होमर या महाकवीची इलियड आणि ओडिसी ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. रामायण महाभारताप्रमाणेच ती ही काल्पनिक मानली जात होती. त्यातील अखिलीस, हेक्टरसारखे महानायक देवतास्वरूप मानले जात. अ‍ॅगॅमेम्नॉन खलनायक तर हेलन म्हणजे प्रतिद्रौपदी किंवा सीताच.. युद्धाचे कारण. पण हेन्रिच श्लीमन या ध्येयवेड्या माणसाने आपले पूर्ण आयुष्य ट्रॉयसाठी समर्पित करून ट्रॉय हे शहर उत्खनन करून शोधून काढलेच. आणि अख्खे जग विस्मयचकित झाले. ही पुरातत्वशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची घटना होती. एक दंतकथा इतिहासाचे रूप घेऊन समोर आली होती.

काळाचा प्रवाह अनंत आहे. त्याचे आपल्याला झालेले ज्ञान म्हणजे दर्यामे खसखस. पुराणऐतिहासिक गोष्टींबद्दल ठाम मत मांडणे कठीण आहे. काळाच्या पटाला शक्यतांचे अनेक पदर आहेत. न जाणो येत्या काही शतकात अयोध्या, द्वारका किंवा हस्तिनापूरही ट्रॉय किंवा मायसिनीप्रमाणे जसेच्या तसे सापडू शकेल. त्यामुळे राम नव्हताच, कृष्ण नव्हताच, ही युद्धे कधी झालीच नाहीत वगैरे निष्कर्ष काढणे भविष्यात सणकुन तोंडावर आपटवणारे ठरू शकते.

©सुहास भुसे


Wednesday 1 March 2017

एबीवीपीचा माज

अमेरिकेतल्या कोणा माथेफिरुने श्रीनिवास या भारतीय तरुणाची हत्या करणे आणि ABVP च्या गुंडांचा नंगानाच यात एक साम्य आहे.
प्रत्यक्ष कृती करणारे गुंड, माथेफिरु नाममात्र असतात. त्यांच्यामागे असणारी विचारसरणी ही खरी ट्रिगरचे काम करत असते.
ट्रंप यांचे परदेशी वंशाच्या नागरिकांबद्दलचे प्रक्षोभक विचार, त्यांनी या संदर्भात वेळोवेळी केलेली प्रक्षोभक विधाने यानी एक  वातावरण निर्मिती केली आहे . ट्रंप सत्तेत येताच या विचारसरणीच्या लोकांना जोर चढणे साहजिक आहे. अश्या घटना पुढेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तोच प्रकार भारतात होत आहे. 2014 पूर्वी कोणाला फारशी ठावुकही नसणारी ABVP ही मवाल्यांची, गुंडांची गैंग आज खुलेआम स्त्रियांना बलात्काराच्या धमक्या देत आहे.  विद्यार्थ्यांना मारहाण करत आहे. हा माज त्यांच्या विचारसरणीचे लोक सत्तेत आल्याने आलेला आहे हे उघड गुपीत आहे.

गांधीहत्येस नथुराम पेक्षा ज्या विचारसरणीने गांधीविरोधी वातावरण तयार केले ती अधिक कारणीभुत होती. नथुराम कोणीही मिळाला असता. दाभोळकर पानसरे यांच्याबद्दलही तेच.

घटना, विचार, प्रतिके, संघटना यांचे आपसात गुंतलेले हे जाळे आहे. यांचा मुकाबला करायचा असेल तर मुळावर घाव घालुन ते निष्प्रभ केले पाहिजे. हे लोक काय चीज आहेत याची जाणीव समाजात सदैव धगधगती ठेऊन याना सर्वंकष सत्तेपासून सदैव दूर राखले पाहिजे. यांना ताकद द्याल तर उद्या हे दुधारी शस्त्र तुमच्यावरच उलटण्याची शक्यता नजरेआड करू नका.
©सुहास भुसे.


उजनीचे पाणी कुठे मुरतेय ?

उजनी धरण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 3 वर्षे दुष्काळ पडला तरी पाणी पुरावे हा हिशोब ठेऊन बांधलेले आहे. 2000 ते 2015 या 15 वर्षात 5 दुष्काळ पडले. दरवेळी पाण्याचे व्यवस्थित नियोजन केले गेले. लातूर आणि मराठवाड्याएवढी भयंकर अवस्था सोलापुरवर कधीही ओढवली नाही. थोडी फार वैरण, थोडी पीके आणि माणसांना, गुरा ढोरांना पुरेसे पाणी .. कडक मधल्या कडक दुष्काळात एवढे तरी जपले जायचेच !!

या नियोजनाला सुरुंग लागला 2016 साली.
आदल्या वर्षी बऱ्यापैकी असणारा पाणी साठा कोरडा पडला आणि सोलापुरला पहिल्यांदा आपण राजकीय दृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रात असलो तरी भौगोलिक दृष्ट्या मराठवाड्यात आहोत याची जाणीव झाली. 15-20  वर्षात कधीही पूर्णपणे  कोरडे न पडलेले कालवे कोरडेफट्ट पडले.

मागच्या वर्षी पाऊस चांगला झाला. धरण 100 % भरले. आता तीन राहिली किमान दोन वर्षे तरी चिंता नाही अस म्हणत बळी राजा निर्धास्त झाला. पण आज उजनी मधील 60 % पाणीसाठा संपला अशी बातमी आली आणि बळीराजाच्या काळजाचा ठोका चुकला. पावसाळा संपुन पुरते 4 महीने उलटतात न उलटतात तो 151 टीएमसीच्या प्रचंड धरणातले 60 % पाणी गेले कुठे ? उद्योगानी पळवले की बेसुमार वापर झाला ?

पण हे कळू शकेल अशी यंत्रणा अस्तित्वात नाही. पाण्याचे ऑडिट होत नाही. करोडो लोकांचे जीवन अवलंबून असणारे पाणी कोण किती वापरते याची माहिती सामान्य माणसाला मिळणे दुरापास्त आहे. ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. उजनी धरणाच्या लाभधारक शेतकऱ्यांनी पाण्याच्या ऑडिटची मागणी लावून धरायला हवी. मोठ्या प्रमाणात जागृती झाली नाही तर हे लोक असेच आपले पाणी पळवत राहतील, धरणातले पण आणि तोंडचे पण !!!
©सुहास भुसे




Sunday 26 February 2017

इव्हीएम मशीन घोटाळा

EVM मशीन्स मधल्या घोटाळ्यांच्या तक्रारीना पराभवानंतरचे रडगाणे समजून उडवून लावणे आत्मघातक ठरेल. राज्यभर अनेक उमेदवारांनी न्यायालयात याबद्दल तक्रारी दाखल केल्या आहेत. काही माजी नगरसेवकांना प्रचंड कामे करून, प्रभागात चांगली लोकप्रियता असून, समोर कमजोर उमेदवार असूनही शून्यापासून हजारांपर्यंत संशयास्पद रित्या कमी मते पडली आहेत. एखाद्या उमेदवाराला शून्य मते कशी काय मिळू शकतात ? शिवाय एकूण मतांच्या बेरजेमध्ये प्रचंड तफावती आहेत. EVM मशीनला पेपर ट्रेल लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात निर्देश देऊन सुद्धा निवडणूक आयोगाने ते निर्देश धाब्यावर बसवत पेपर ट्रेल विरहित मशीन्स वापरल्या आहेत.

हा सर्वच प्रकार खुप चिंताजनक आहे. कोण जिंकले कोण हरले हे गौण आहे. पराभूत उमेदवार व पक्ष याबद्दल काही करतील न  करतील, जनतेकडून याबद्दल एक उत्स्फूर्त व्यापक जनआंदोलन छेडले जायला हवे.
सर्वपक्षीय अगदी भाजपा समर्थक नागरिकांनी देखील यात सहभागी होणे गरजेचे आहे.

भारतीय लोकशाहीचे एक सर्वात मोठे वैगुण्य आहे की एकदा तुम्ही चुकीचे लोक निवडून दिले की त्यांना पाच वर्षे सहन करण्याशिवाय कोणताही पर्याय असत नाही.  पण याचा सकारात्मक पैलू हा की चुकीच्या लोकांना तुम्ही किमान पाच वर्षांनी तरी त्यांची जागा दाखवु शकता.

पण EVM मशीन्स मधील घोटाळ्यांमध्ये जर तथ्यांश असेल तर हे घोटाळे करणारे, करू शकणारे लोक तुमच्या बोडक्यावरुन खाली उतरणारच नाहीत. हे अत्यंत भीतिदायक वास्तव आहे. स्वायत्त संस्थांच्या अधिकारात सत्ताधीश करत असलेली ढवळाढवळ आपण नोटबंदी प्रकरणात पाहिली आहेच. रिजर्व बँकेसारख्या ताकदवान स्वायत्त संस्थेला पायाची बटिक बनवणे इतके सहजसाध्य असेल तर निवडणूक आयोग यापासून अस्पर्श राहील अशी अपेक्षा करणे निव्वळ भाबडेपणा होईल !!
©सुहास भुसे


Wednesday 22 February 2017

शरद पवार : संसदीय कारकिर्दीची पन्नास वर्षे

आज पवार साहेब संसदीय कारकिर्दीची 50 वर्षे पूर्ण करत आहेत. पवारांबद्दल अनेक प्रकारचे मतप्रवाह आढळतात. पण या मुद्द्यावर जवळ जवळ सर्वांचे एकमत आहे.

' पवार साहेब प्रचंड क्षमता असणारा नेता आहे. पण त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार पद मिळाले नाही. अर्थात पंतप्रधान पद !!'

का मिळाले नाही यासाठी विरोधकांचीे बेभरवशीपणा, घातपाती राजकारण वगैरे कारणे असतात. तर समर्थकांची कॉंग्रेस श्रेष्ठीची सततची इनसिक्युरिटीची भावना आणि त्यासाठी महत्वाकांक्षी नेत्यांचे पंख छाटणे वगैरे कारणे असतात. पण पवार साहेब या पदासाठी त्यांच्या कारकिर्दीच्या काळातले सर्वात लायक उमेदवार होते यावर विरोधक समर्थकांचे एकमत असते.

या सगळ्या कारणांपेक्षा मला पवारांना महाराष्ट्रातुन एकमुखी पाठिंबा न मिळणे हे याचे महत्वाचे कारण वाटते.  मोदींना गुजरात मधून एकमुखी पाठिंबा मिळाला कारण गुजरात आणि इतर राज्ये आणि महाराष्ट्र यात एक बेसिक फरक आहे.

महाराष्ट्र हा जसा फुले शाहू आंबेडकरी परंपरेसाठी ओळखला जातो तसा तो पूर्वीपासून सनातनवादाचाही अड्डा राहिलेला आहे. मराठी लोक कधीच एका झेंड्याखाली एक झालेले नाहीत. पेशावाई ते थेट टिळकांच्या काळापासून इथल्या सनातनी कारवाया आज तागायत अथकपणे सुरु आहेत. याची काही उदाहरणे बघायची झाली तर महाराष्ट्रातील बहुसंख्य ब्राह्मण वर्ग कधीही बीजेपी सोडून मतदान करत नाही. इतर राज्यात असे नाही. दाक्षिणात्य राज्यात तर भाजपा औषधालाही नाही. उत्तर प्रदेश मध्ये ब्राह्मण आणि दलित मोट बांधून बहन मायावती सत्तेत आल्या होत्या. बिहार, बंगाल, पंजाब कुठेही बीजेपीला ब्राह्मणांचे एकगठ्ठा मतदान नाही.

आजचे सनातनवादाचे सर्वोच्च केंद्र असलेल्या संघाची सुरवात इथेच झाली. हेगड़ेवार इथलेच, गोळवलकर इथलेच.
बहुजन वर्ग संसदेत जाऊन काय नांगर हाकणार का असे प्रामाणिक मत असणारे टिळक इथलेच.
जोतिबा, सावित्री माई वर शेण फेकणारे इथलेच.
दाभोळकर, पानसरे यांच्या हत्या याच राज्यात झाल्या.

या सनातनी वर्गाला महाराष्ट्रात कधीही पुरते पाय रोवु न देता 50 वर्षातली बहुतेक वर्षे त्यांना सर्वंकष सत्ता हस्तगत करण्यापासून दूर ठेवले हे पवार साहेबांचे सर्वात मोठे काम आहे असे मी मानतो. हेच कारण आहे की पवार साहेब हे धर्मांध आणि सनातनी शक्तींच्या कायम निशाण्यावर राहिले आहेत. 'बदनाम करा, बाजूला सारा' या सनातन्यांच्या मोड्स ऑपरेंडीचे सर्वाधिक शिकार बनले आहेत.

वाईट फक्त इतकेच वाटते की सनातन्यांच्या या हेतुपुरस्पर केल्या जाणाऱ्या अपप्रचाराला बहुजन वर्गही बळी पडला, पडतोय आणि पवार साहेबांच्या कर्तुत्वाला एका जातीच्या सिमित परिघात बंदिस्त करू पाहतोय !!
येणाऱ्या काळात सनातनी विरोधक आणि पुरोगाम्यांना उपरती होऊन ते एकमुखाने साहेबांच्या मागे एकवटोत या सदिच्छांसह पवार साहेबांच्या 50 वर्षांच्या दैदीप्यमान कारकिर्दीला सलाम आणि साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐
©सुहास भुसे


Monday 20 February 2017

लोकशाहीचा सडलेला चौथा स्तंभ

'भले तरी देऊ गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठी देऊ माथा ।।
जगदगुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग गाथेचे संकलन करणाऱ्या विष्णुशास्त्रीना अश्लील वाटला. त्यांनी 'गांडीची ' हा शब्द बदलून 'कासेची' या शब्दाची योजना केली. आणि पुढे तो शब्द रूढ़ झाला.
तुकारामांच्या गाथेत आज अनेकांना अश्लील वाटू शकतील असे अनेक शब्द आहेत. रांडा हा शब्द तर कित्येक अभंगात येतो.
ग्रामीण भागात बोलीभाषेत अश्या अनेक अश्लील वाटणाऱ्या शब्दांची, म्हणीची, वाकप्रचारांची सहज येताजाता योजना केली जाते.
त्यात कोणालाही काहीही अश्लील वाटत नाही.
'........ मग काय मुतु काय ? '
हा वाकप्रचार तर अगदी सहज बोलता बोलता कोणीही वापरते.
गाडीत पेट्रोल नाही तर काय मुतु काय ?
विहीरित पाणी नाही पिकाला काय मुतु काय ?
ज्याची ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे अश्या कोणालाही हा शब्द खटकणार नाही. अगदी थोडक्यात सांगायचे तर अभिजन म्हणवल्या जाणाऱ्या वर्गाची आणि ग्रामीण बहुजन वर्गाची अश्लीलतेची परिभाषा वेगळी आहे. तुंपभातात आणि भाकरी-मिर्चीच्या खर्ड्यात जेवढा फरक आहे तेवढाच अभिजन व बहुजन भाषांमध्ये आहे.

राष्ट्रवादी हा ग्रामीण भागात पाळेमुळे असणारा पक्ष आहे. राष्ट्रवादीचे नेते हे शहरी भागात मोठे झालेले, ए सी ऑफिसच्या काचेच्या खिडकीतुन समाज बघणारे नेते नाहीत. सतत ग्रामीण भागात फिरणे आणि नेहमी ग्रामीण लोकांत वावर याचा परिणाम म्हणून बहुतांश राष्ट्रवादी नेत्यांची भाषा आणि तिचा बाज ग्रामीण ढंगाचा आहे.

अजितदादा ' धरणातच पाणी नाही तर काय मुतु काय ' हा वाकप्रचार अगदी सहजपणे बोलून गेले होते. त्यात त्यांचा कोणताही गैरहेतु नव्हता हे ग्रामीण भाषेची साधी तोंडओळख असणारा कोणीही सांगू शकेल. पण त्यावेळी मिडियाने केलेला गहजब आठवा. रात्रंदिवस पाच पाच मिनिटाला या विधानाच्या बाइट्स दाखवल्या जात होत्या. अजितदादा पवार या तरुण, तडफदार नेत्याला सुपारी घेऊन मेन स्ट्रीम मधून बाजूला सारण्याचे काम मिडियाने किंवा मीडियामधील अभिजनांनी हेतुपुरस्पर केले. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीची सत्ता जाण्याच्या काही कारणांपैकी या विधानाला ठरवून दिलेली प्रचंड प्रसिद्धी हे एक महत्वाचे कारण होते.

2014 साली राज्यातली आणि केंद्रातली सत्ता भाजपाच्या ताब्यात आली. तेव्हापासून भाजपाच्या शीर्षगामी नेत्यांसहित दुसऱ्या तिसऱ्या फळीच्या अनेक नेत्यांनी कमालीची आक्षेपार्ह विधाने केली आहेत. शेतकरी नामर्द आहेत, लफड़ेबाज आहेत, मोबाईल बील भरायला पैसे असतात वीज बिल भरायला नसतात, शेतकरी फॅशन म्हणून आत्महत्या करतात, आदिवासी मुले कुपोषणाने मरतात तर मरु द्या अशी एकापेक्षा एक असंवेदनशील आणि संतापजनक विधाने भाजपा नेते जवळ जवळ दररोज आणि चढाओढीने करत असतात.
असंवेदनशील विधानांचा कळस मागच्या चार दिवसात दोन भाजपा नेत्यांनी केला आहे.
‘आत्महत्या करणारे शेतकरी म्हणजे सवलती लाटणारे व्यापारी’
– रामेश्वर शर्मा, भाजपा आमदार
'सैनिक बॉर्डरवर असताना त्याची बायको बाळंत होते, तो वर्षभर घरी आलेला नसतो. त्याला तार येते पोरगा झाला आणि तो तिकडे पेढे वाटतो'
-प्रशांत परिचारक, भाजपा आमदार

या एकूण एक सर्व विधानाना केवळ सोशल मीडियातुन वाचा फुटल्याने जगाच्या लाजे काजे एखादा दूसरा दिवस न्यूज चॅनेल्सनी पाच दहा मिनिटे वेळ दिलेला आहे. ही विसंगती अगदी प्रकर्षाने नजरेत भरते. अजितदादा बोलले तो केवळ एक वाकप्रचार होता. धरुन चालू की तो अश्लील किंवा आक्षेपार्ह शेरा होता. केवळ शाब्दिक निवडीतील चुकीवर इतका कांगावा आणि ज्यांचा शब्द न शब्द निर्लज्ज माजोरडेपणाने आणि असंवेदनशील हरामखोरीने बरबटला आहे त्यांच्या विधानाना इतकी कमी प्रसिद्धी आणि टीका ?

शेवटी लोकशाहीचा हा चौथा स्तंभ पैसा आणि सत्तेच्या वाळवीने पूर्णपणे पोखरला आहे आणि काही ठराविक शक्तिंसाठी तो न्यूजमेकिंगचे काम करत असतो असाच या सर्वांचा निष्कर्ष काढावा लागेल. जनतेने यापुढे मिडियाचा उपयोग एखाद्या पक्ष, नेता किंवा विचारसरणी बद्दल आपली मते बनवण्यासाठी करू नये हेच उत्तम !!!
©सुहास भुसे.


Thursday 2 February 2017

ढोंगी प्रतिगांधी

अण्णा हजारे ! एकेकाळी राळेगणसिद्धिचे गांधी म्हणून अण्णा हजारेना लोक ओळखत असत. अण्णांच्या लोकपाल आंदोलनात सगळा देश त्यांच्या मागे उभा राहिला. लोक अण्णांमध्ये आपल्या प्रिय बापुंना बघत. बापुंसारख कोणीतरी या देशात असावे या लालसेपोटी ते अण्णांच्या दोन तासाला बदलल्या जाणाऱ्या, कधीही एक सुरकुतीही नसणाऱ्या शुभ्र धवल परीटघडीच्या कपड्यांकडे दुर्लक्ष करत. तो महात्मा आयुष्यभर एक साधा पंचा नेसुन वावरला हे लोकांना ठाऊक नसे अस नव्हे. महात्म्याचे खपाटीला गेलेले पोट, गाल, बारीकशी कुडी आठवत लोक अण्णांचे लाली चढलेले, वर येणारे गाल बघत असत. महात्म्याच्या तोंडावरचे जनसेवेचे, सत्याच्या प्रयोगांचे तेज आठवत अण्णांच्या तोंडावर चढणारे सुखाचे तेज बघत असत.
बापुंचा अराजकीय वारस म्हणून अण्णाना हजार गोष्टी लोकांनी माफ करून टाकल्या. कॉंग्रेसचे सरकार पाडण्यात, सरकारविरोधी जनमत तयार करण्यात अण्णाचा फार मोठा हात होता.

सरकार बदलले. लोकपाल गंगेला मिळाले. घोटाळे नव्या दमाने सुरु आहेत. पण अण्णानी जे तोंडाला कुलुप लावले आहे ते उघडायचे नावच नाही. जणु यूपीए चे सरकार पाडणे हेच त्यांचे अवतारकार्य होते. अण्णा अजुनही क्वचित तोंडाचे कुलुप किलकिले करतात ते पवारांवर आरोप करण्यासाठीच. पण लोकांनी आता या ढोंगी नकली गांधीला पुरते ओळखले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांची त्यांचे पित्तेही दखल घेत नाहीत. मिडिया आणि जनता तर दुरच. अण्णा हे प्रतिगांधी नसून सरकारराज मध्ये दिलीप प्रभावळकरांनी साकारलेले महापाताळयंत्री रावसाहब आहेत हे लोकांच्या लक्षात आले आहे.
एका गालावर मारली तर दूसरा गाल पुढे करा म्हणणाऱ्या त्या थोर महात्म्याची शिकवण या  क्रोध, मोह ,मद ,मत्सर आदि षड्रिपुनी पोखरलेल्या ढोंगी माणसाने ज्या क्षणी ' फक्त एकच ? ' हे निर्लज्ज उद्गार काढले तेव्हाच धुळीला मिळवली आहे.
©सुहास भुसे


Wednesday 18 January 2017

पुतळ्याचे एकांगी कवित्व

गडकरी पुतळा प्रकरणावरचे शेवटचे पोस्ट...

-गडकरीच्या पुतळा प्रकरणाचे 15 दिवस कवित्व सुरु आहे. सगळ्या वाहिन्यांनी यावर पूर्ण एकांगी चर्चा आयोजित केल्या. संभाजी ब्रिगेडवर टोकाची टीका केली. पत्रकारीतेेचा अत्यंत खालचा स्तर गाठत पुतळा हटवाणाऱ्या मुलांना गुंड म्हणून संबोधले. आम्ही पुतळा पुन्हा बसवु अश्या राणा भीमदेवी थाटात गर्जना करून झाल्या.

पण गडकरी यांनी राजसंन्यास या नाटकात शंभु राजांची बदनामी केली आहे का ? केली असेल तर का केली ? गडकरीचा पुतळा मुद्दामहुन नेमका संभाजी उद्यानातच बसवण्याचे काय कारण होते ? या प्रश्नांच्या अनुषंगाने किमान एखादी तरी चर्चा आयोजित करावी अस एकाही चॅनेलला वाटले नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. वस्तुस्थिती दाखवणे, न्यूज दाखवणे हे मिडियाचे काम नाही तर न्यूज बनवणे हेच मिडियाचे खरे काम आहे हे या निमित्ताने पुनश्च एकदा अधोरेखित झाले.

चिटनीस बखरीत शंभु राजांची विपर्यस्त प्रतिमा होती त्या आधारे गडकरी यांनी लेखन केले हा युक्तिवाद मान्य केला तरीही रंडीबाज, छकटा, दारूबाज अशी टोकाची विशेषणे गडकरी यांना का वापरावीशी वाटली असावीत ? तुळसा हे पात्र जी नात्याने शंभु राजांची चुलत बहिण लागत होती त्यांचे प्रेम कल्पुन बीभत्स श्रृंगार वर्णने गडकरीना का रंगवावीशी वाटली ? हे गलिच्छ लेखन वाचुन गडकरी हे शेक्सपियर नसून सेक्सपियर आहेत की काय ? असे प्रश्न एकाही विचारवंताला पडू नयेत ही खरोखर आश्चर्यकारक बाब आहे. मी पैज लावायला तयार आहे की यावर हिरीरीने चर्चा करत गडकरीची बाजू लावून धरणाऱ्या बहुसंख्य विचारवंतांनी / सांस्कृतिक गुंडानी राजसंन्यास हे नाटकच् मुळात वाचलेले नाही.

जाता जाता मराठीचे 'सेक्स'पियर गडकरी महोदयांच्या वैयक्तिक चरित्र, स्वभाव, जीवनाबद्दलही थोडीफार चर्चा करता आली असती. कारण या सर्व गोष्टिंचा प्रभाव लेखकाच्या लेखनावर पडत असतो. अंतरीचे धावे ..स्वभावे बाहेरी. आचार्य अत्रे यांनी गडकरी हे टोकाचे सनातनी होते असे लिहून ठेवले आहे. तसेच गडकरीनी एकच प्याला लिहिले हे अनेकांना ठाऊक असले तरी स्वतः गडकरी अट्टल दारूबाज मद्यपी होते हे अनेकांना ठाऊक नसेल. आदरणीय भाऊसाहेब खांडेकर जेव्हा आपल्या पाहिल्या वाहिल्या कवितांवर गडकरी यांची प्रतिक्रिया घ्यायला गेले तेव्हा गडकरी यानी दारूच्या नशेत धुत्त असल्यामुळे ती वही दिव्यावर धरुन जाळून टाकली. काय वाटले असेल नवलेखक खांडेकरांना त्यावेळी ? किती यातना झाल्या असतील त्यांना ? गडकरी चरित्रातले असे काही निवडक प्रसंग देखील या निमित्ताने लोकांपुढे आणून या एकंदर प्रकरणाचा समतोल राखता आला असता.

पण सांस्कृतिक क्षेत्रातील नामचीन गुंड विचारवंतांकडून आणि व्हाइट कॉलर गुन्हेगार चॅनेलवाल्यांकडून अश्या निस्पृह, निष्पक्ष पत्रकारितेची अपेक्षा करणे व्यर्थ आहे याची पुनश्च एकदा पक्की खात्री पटली.
©सुहास भुसे


Sunday 15 January 2017

ती सध्या काय करते ?

ती सध्या काय करते हा प्रश्न माझ्यापुरता त्या सध्या काय करतात असा व्यापक करुन घेतो.
याचे कारण म्हणजे मी भयंकर दिलफेक ...
दिसली जरा बरी पोरगी की फेकलेच दिल.
आता मी फेकले म्हणजे तिने झेलले असे क्वचितच होई हा भाग अलहिदा. पण प्रँक्टिस मेक्स म्यान परफेक्ट या उक्तीप्रमाणे उत्तरोत्तर फेकने आणि झेलने यातले व्यस्त प्रमाण कमी होत गेले.
सच्चा प्यार सिर्फ एक बार ही होता है
आपल्या तमाम सिनेमावाल्यांनी हा हग्या दम देऊन ठेवल्यामुळे आजवर हे सांगायचे धाडस मात्र होत नव्हते ...
पण आता कळले की हा सगळा पुरुषाला चु बनवण्याचा प्रकार आहे, निव्वळ मोदीगिरी , दूसरे काही नाही!!

हे खरे प्रेम एकदाच वाली भानगड मला कधीच कळली नाही.  या सगळ्या पोरींवर मी तेवढयाच उत्कटतेने, सच्चे दिल से वगैरे प्रेम केले. तिने मला घास डाला, तिने  नही डाला असला आपपर भाव ठेवला नाही. म्हणून तर मला त्या सगळ्या लख्ख आठवतात आणि बऱ्याच जणी सध्या काय  करतात हे ही ठाऊक आहे.
पहिलीपासून माझी फेकाफेकी सुरु असावी असे अंधुक अंधुक आठवते. स्पष्ट आठवते ती पहिली पोरगी पाचवीत तिच्याकडे दिल फेकलेले.  दहावीपर्यंत दुसऱ्या कोणाकडे दिल फेकण्याचा अजिबात मोह झाला नाही.

या बाबतीत मात्र मी भयंकर एकवचनी आणि तत्वनिष्ठ माणूस होतो. हायस्कूलमध्ये ती एकच, ज्युनियरला ती एकच, सिनियरला एकच, बीएड  ला एकच, एम ए ला एकच,  गावात एकच, तालुक्याला एकच, शेजारच्या गावात एकच. अर्थात या सगळ्याजणी वेगवेगळ्या होत्या. पण तरीही या आगळया एकवचनी बाण्याला दाद मिळायलाच हवी.

तर पहिली ती पाचवीतली .. तिच्यावर मर मर मरायचो. 6 वर्षे डोळे झिजवले तिच्यासाठी. पण कधी एक चकार शब्द ही बोलणे झाले नाही तिच्याशी. अगदी पाहिल्यांदा तिच्याशी बोललो ते इथे फेसबुकवर. तोवर तिला दोन पिल्ली व मला दोन पिल्ली झाली होती. तरीही आताही तिच्याशी पहिल्यांदा च्याट करताना काळीज धडधड करत होते. तिने माझ्या लिखानाचे कौतुक केले तेव्हा मनावर मोरपीस फिरले. मी तुझी वॉल नियमित वाचते आणि फक्त तुझीच वॉल वाचते अस म्हणाली तेव्हा कृतकृत्य झालो मी.
तर ही वाली ती काय करते ते इकडे समजले.

दूसरी ती दहावीच्या समर व्हेकेशनमध्ये भेटली. ही माझी दिलफेक फेक झेलणारी पहिली ती होती. ही देखील काय करते ते मला इथेच फेसबुक वर ठाऊक झाले. अर्थात यांना फेसबुकवर शोधण्यासाठी व संपर्क करण्यासाठी मला किती श्रम पडले असतील ते जे आपली ती इथे शोधतात त्यांनाच समजेल.

इथून पुढे ही ती, ती ती, इकड़ची ती, तिकड़ची ती असा सपाटा सुरु होता.

एक आठवणीत राहील अशी ती बी एड मध्ये माझ्या आयुष्यात आली. ती जास्त आठवणीत राहण्याचे कारण म्हणजे तिच्यापेक्षा तिची मैत्रिण. आणि ही मैत्रीण आठवणीत राहण्याचे कारण म्हणजे 'ही' ने मी फेकलेले दिल असे झेलले की परत सोडलेच नाही. अर्थात ती आता माझी सखी राज्ञी जयती बायको आहे.

आता इथून पुढे मात्र माझ्या दिलफेक वृत्तीला लगाम बसला (काय म्हणालात ? विश्वास बसत नाही ? कठीण आहे बुवा तुम्हा संशयी लोकांचे )

आणि ही गोष्ट इथेच संपवणे माझ्या सुरक्षेच्या व पोटाच्या दृष्टीने हिताचे आहे.
©सुहास भुसे.


मोदींच्या तोडीचा नेता कोण ?

चर्चेत काँग्रेसच्या नेत्यांना हमखास विचारला जातो असा पत्रकारांचा आवडता प्रश्न म्हणजे
' मोदींच्या तोडीचा कोणी नेता आहे का तुमच्याकडे ? '

याचे सुयोग्य उत्तर काय असू शकते हे जाणून घेण्याआधी हा प्रश्न समजून घ्यायला हवा.
मोदींच्या तोडीचा याचा अर्थ काय ?
लोकशाही धाब्यावर बसवुन सर्व सत्ता व्यक्तीकेंद्री बनवणारा हुकुमशाह ?
वाट्टेल त्या थापा मारून जनतेला मुर्ख बनवणारा जुमलेबाज ?
प्रतिमाप्रेमापोटी अंध होऊन जनतेला शिसारी येईल इतपत स्वतःच्या चेहऱ्याचा जनतेवर मारा करून हसू करून घेणारा आत्ममग्न विदूषक ?
संसदेला फाट्यावर मारून लोकशाहीला काळीमा फासणारा खलनायक ?

मोदींच्या तोडीचा किंवा मोदींसारखाच नेता हवाय कोणाला ?
भारतात अध्यक्षीय लोकशाही नाही तर संसदीय लोकशाही आहे. लोकांना आता प्रभावी नेतृत्वाच्या मोहात हुकुमशाही लादून घ्यायची नाही. आता नेता हवा तो जरा कमी समज असलेला, कमी प्रभावशाली असेल तरी चालेल, पण सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, सहकाऱ्यांच्या सल्ल्याची गरज असणारा व त्यांचा आदर ठेवणारा नेता हवा. संसदेचा सन्मान करणारा, तिला बांधील असणारा नेता हवा.

मोदींच्या तोडीचा कोणी नेता आहे का हा प्रश्नच मुळी गुलाम मानसिकतेचे द्योतक आहे.
©सुहास भुसे


हुमनं

गावाकडे 'हुमनं ' हा एक फार मनोरंजक प्रकार असतो. शेतात काम सुरुय. खुरपण्याची पात धरलीय आणि एक बाई हुमन घालते... पात लावत लावत बाकीच्या बायका विचार करत राहतात .. दोन, तीन पाती लागेस्तो अनेक उत्तरे ट्राय करून होतात... पण सहसा योग्य उत्तर हुमन सांगणाऱ्याकडेच असते ...
ती उत्तर सांगते तेव्हा वाटत ' अरेच्चा, हे कळल कस नाही आपल्याला ? अगदी सोपे तर होते '

आता ही हुमनं फार कौशल्याने तयार केलेली असतात. बहुसंख्य हुमनं अशी असतात की याचे उत्तर अगदी अश्लील असणार अस वाटावे ...
उदा. " वरचे फुकट, खालचे विकत "
अस हुमन घातले की ऐकणाराच्या मन में लड्डू फुटतो .
तो त्याच ट्रैकवरुन उत्तर शोधत राहतो.. आणि चकतो .. हुमनाला दिलेली अश्लील डूब निव्वळ चकवण्याचा प्रकार असतो ...
आणि शेवटी उत्तर येते ते अगदी साधे .. ' कुंकवाचा करंडा '
अर्थात वरचा करंडा फुकट म्हणजे बिगर महत्वाचा, खालचे/आतले कुंकु खरे महत्वाचे !

अनेक हुमने मध्यमवर्गीय श्लील, अश्लीलतेच्या परिभाषेमुळे इथे उध्रुक्त करणे कठीण आहे.
एकच उदाहरण दखल ..
"लाल लाल करुन काळं आत सारलं,
चवड्यावर बसून हापकं दिलं "
आता असल्या भयंकर हुमनाचे प्योर वेज उत्तर असेल अस कोणाला वाटेल ?
ऐकणाऱ्याला भयंकर गुदगुल्या होतात. वेगवेगळया इंटरेस्टिंग उत्तरांवर तो विचार करू लागतो, पण दरवेळी चकतो ..
आणि नेहमीप्रमाणे उत्तर अगदी साधे असते.
'लोहाराचा भाता '

अशी अनेक हुमनं ग्रामीण प्रतिभेचा खजिना आहेत. कल्पकता, मनोरंजन, काव्यालंकार आदी गुणांनी नटलेली आहेत. पण आता जवळ जवळ विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहेत. यांचे संकलन करून हा ग्रामीण मनोरंजनाचा अस्सल देशी ठेवा जतन करण्याची गरज आहे.
©सुहास भुसे.


Thursday 12 January 2017

राज ठाकरेंचा इतिहास

राज ठाकरे यानी काल छत्रपती शंभु महाराजांबद्दल जे वक्तव्य केले ते खरे तर सगळ्यांनाच या सर्व प्रकरणाबद्दल नव्याने विचार करायला भाग पाडनारे आहे. बाळाजी आवजी चिटनिसाला राजद्रोहाच्या आरोपाखाली हत्तीच्या पायी दिले याचा डुख मनात धरुन त्याचा खापरपणतु मल्हार रामराव चिटनिसाने 'श्रीशिवछत्रपतींची सप्तप्रकरणात्मक बखर' या आपल्या कुप्रसिद्ध बखरीत शंभुराजांची बदनामी करून त्यांचे चरित्र विपर्यस्त करून टाकले.  यानंतर गडकरीनी हीच बखर समोर ठेऊन त्यात आपल्या मनाची अधिक भर घालत 'राजसंन्यास' या नाटकात ही प्रतिमा आणखीनच विपर्यस्त करून टाकली. राजसंन्यासाच्या प्रभावाखाली त्यानंतरच्या काळातही जी नाटके, ललितकृती, सिनेमे आले त्यात शंभुराजांची ही गडकरीप्रभावित प्रतिमाच रंगवली गेली. सर्वसामान्य माणूस ऐतिहासिक साधने वाचत नाही. त्याच्या मनातील इतिहासाची घडण ही या ललित साहित्यातुनच होत असते.

वा सी बेंद्रे यांनी 40 वर्षे अथक मेहनत घेऊन, सगळ्या अस्सल संदर्भांची आणि ऐतिहासिक साहित्याची चाळणी करून शंभु चरित्रावरचे डाग धुवून काढले. रियासतकारांपासून चिटनिसापर्यंत सगळ्यांचे अवास्तव लेखन पुराव्यानिशी खोडून काढत शंभु चरित्राची नव्याने मांडणी केली. 'छत्रपती संभाजी महाराज' या त्यांच्या शंभु चरित्रानंतर शेकडो वर्षे अन्याय झालेला इतिहासनायक पुन्हा एकदा नव्या तेजाने झळाळुन उठला. हे जरी वास्तव असले तरी पुन्हा आपला पहिलाच महत्वाचा प्रश्न उरतो तो असे जड जड ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ वाचतो कोण ?

सामान्य माणसाच्या मनावर ललितकृतींचाच पगडा असतो.
राज ठाकरे, ज्यांच्या घराण्याने केवळ 'शिवाजी ' या एका नावाच्या महात्म्याखाली आपल्या राजकारणाची पाळेमुळे रोवली, जे प्रबोधनकारांचे नातू म्हणवतात त्यांना ही सगळी पार्श्वभूमी ठाऊक नसावी हे आश्चर्यकारक असले तरी विचारप्रवृत्त करणारे आहे. या वरुन लक्षात येते की गडकरीनी तयार केलेल्या शंभु राजांच्या अवास्तव प्रतिमेचाच अजुनही सामान्य लोकांवर किती पगडा आहे. तसेच गडकरींच्या पूतळयाचे उच्चाटन करुन यासंदर्भातील चर्चेला तोंड फोडणे देखील किती आवश्यक होते हेच राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरुन दिसून येते.

या सगळ्या प्रकरणानंतर तरी सामान्य लोक, गडकरीना बाप मानणारे कलावंत, गडकरींना देव मानणारे साहित्यिक वा सी बेंद्रे, कमल गोखले संशोधित इतिहास वाचतील. हळू हळू शंभु राजांची विपर्यस्त प्रतिमा समाजातून नाहिशी होण्यास या पुतळा प्रकरणापासून सुरवात होईल अशी आशा आहे.

ता क - संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे यांना वासी बेंद्रे लिखित शंभु चरित्र समारंभपूर्वक भेट देऊन ठाकरे घराण्याची वाचन संस्कृतीशी मागील दोन पिढ्यांत तूटलेली नाळ पुन्हा सांधन्याचे समाजकार्य करावे अशी संबंधिताना आग्रही विनंती..
©सुहास भुसे.


Wednesday 4 January 2017

संभाजी ब्रिगेड- समज आणि वास्तव

संभाजी ब्रिगेड या संघटनेची मला फेसबुकवर येईपर्यंत फारशी ओळख नव्हती. इथे आल्यावर हिंदुत्ववाद्यांनी पेरलेल्या समजुतीबरहुकुम पहिली ओळख झाली ती तरुणांची माथी भडकवणारी ब्राह्मणविरोधी संघटना म्हणून.. आणि आज जी शेरेबाजी होतेय तशी अडाणी, अशिक्षित लोकांची संघटना म्हणून ...

हळू हळू ब्रिगेडमधील अनेक मित्रांच्या संपर्कात येत गेलो, अनेक दिग्गज अभ्यासकांचा दुर्मिळ सहवास लाभला आणि मनावरील गैरसमजुतीची पुटे निखळत गेली.

संभाजी ब्रिगेड ही मिडिया हातात असणाऱ्या सांस्कृतिक दहशतवाद्यांनी इमेज बनवली आहे त्याच्या पूर्ण उलट संघटना आहे. वाचनसंस्कृती हा संभाजी ब्रिगेड चा आत्मा आहे. ही माणसे अखंड वाचत असतात. माणसांची श्रीमंती ते पुस्तकात मोजतात.
एक ब्रिगेड मधील स्नेही एकदा सांगत होते, " त्या अमक्याच्या घरी गेलो होतो, दाराशी 20 लाखाची गाडी, भला मोठा आलिशान बंगला, आम्हाला सगळा फिरून दाखवला, आम्ही बघत होतो पण घरात एकही पुस्तकांचे कपाट नाही. एका शेल्फवर दोन पुस्तके दिसली तेवढी चुकुन. अगदीच दरिद्री माणूस !"
यांची नजर आणि पारख ही अशी आहे.

अजुन एक स्नेही आहेत, यांना अमुक पुस्तक कुठे मिळेल, किंवा अमुक संदर्भ अमुक पुस्तकात सापडेल का ? अस नुसते विचारण्याचीच खोटी, तुमच्या पत्त्यावर ते पुस्तक घरपोच झालेच म्हणून समजा. मग ते पुस्तक दोनशे रूपयांचे असो की दोन हजार रूपयांचे. ब्रिगेड मधील इतर लोक ही अखंड पुस्तके भेट देत असतात. तुम्ही फक्त दोनेक वर्ष या लोकांच्या संपर्कात राहिलात तर एक नया पैसा खर्च न करता तुमचे कपाट पुस्तकांनी आणि जीवन ज्ञानाने समृद्ध झालेले असेल.

इतिहास म्हणजे या लोकांचा श्वास. अगदी सामान्य कार्यकर्ता असू द्या. त्याला सत्य जाणून घेण्याची आस असते. प्रत्येकजण सोबतच्या लोकांचे अखंड प्रबोधन करत असतात. किरकोळ संदर्भ विचारला तर तासन तास बोलत राहतील. माझे काही स्नेही असे आहेत ज्यांना मी जेव्हा दोनेक तास निवांत वेळ असेल तेव्हाच कॉल करतो. त्याच्या आत सुट्टीच नाही. 😀
शरद पाटिल, आ ह साळुंखे, न र फाटक, वा सी बेंद्रे, कमल गोखले, वि का राजवाडे, डॉ नीरज साळूंखे, इंद्रजीत सावंत यांच्या जिभेवर खेळत असतात. असंख्य संदर्भ, सनावळया अगदी मुखोदगत.

ब्रिगेडच्या काही मेळाव्याना, इतिहास चिंतन शिबिरांना जाण्याचा योग आला. ज्ञान घ्या ज्ञान द्या, माथी भडकवणाऱ्या राजकारणापासून दूर रहा, आपल्या आणि आपल्या समाजाच्या सर्वंकश प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील रहा यापरता दूसरा संदेश कधी कानावर आला नाही.

ब्रिगेडच्या लोकांची वार्षिक महायात्रा म्हणजे 12 जानेवारीला मातृतीर्थावर भरणारा महामेळा. ही तर फक्त ग्रंथयात्राच असते. सगळीकडे फक्त भारावलेली माणसे आणि ग्रंथ.

इतकी ज्ञानपिपासु दूसरी संघटना माझ्या पाहण्यात नाही. गडकरीचा पुतळा फोडणे हे अनेकांना योग्य वाटेल अनेकांना नाही. ब्रिगेडवर टीका होईल, होत आहे फक्त त्यांना अडाणी आणि अशिक्षित समजण्याची चुक करू नका. तुम्ही जेवढे वाचले आहे त्याच्या दसपट ब्रिगेडीनी वाचलेले असते. त्यांना इतिहास शिकवण्याच्या फंदात पडू नका. इतिहासाच्या ज्ञानाच्या बाबतीत ते तुमचे बाप आहेत.
©सुहास भुसे