About

Monday 20 July 2015

हल्ला की वैचारिक मुस्कटदाबी ?



काल सांगलीत झालेल्या शिवसन्मान जागर परिषदेवर संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून जितेंद आव्हाड यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. कालपासून चेह्रापुस्तीकेवर याविषयी उलट सुलट पोस्ट चा पाउस पडतोय. आव्हाडांना फोडला, तोडला, अडला, नडला वगैरे भाषेत. आता या पोस्ट खऱ्या आहेत असे गृहीत धरू. संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांवर हल्ला करून आव्हाडांना मारले. तिथल्या स्टेजवरील सन्माननीय लोकांना मारले. त्यांची गाडी फोडली वगैरे. यात समर्थन करण्यासारख काय आहे ? किंवा अभिमानाने सांगण्यासारखे काय आहे? जितेंद्र आव्हाड हे त्यांची बाजू ती चूक असेल किंवा बरोबर असेल...लोकशाही मार्गाने मांडत आहेत. त्यांच्यावर हल्ला करणे हा मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न नाही का ? कि हा प्रकार म्हणजे त्यांच्या विचारांचा सामना विचाराने करता येत नाही या पराभूत मानसिकतेतून झाला आहे ? जितेंद्र आव्हाड हे खरेच बोलत आहेत याचे प्रमाणपत्र तर नव्हे ना हे ?



अश्याच पोस्ट जेव्हा दाभोळकर आणि पानसरे यांचा नृशंस भ्याड खून करण्यात आला (कि वध ?) तेव्हाही पडत होत्या. त्याचे समर्थन करणारे आणि कालच्या घटनेचे समर्थन करणारे एकाच मानसिकतेचे लोक आहेत. किती दिवस चालणार आहे हि ऐतिहासिक मुस्कटदाबी अजून ? त्यावेळेसही आव्हाडांना धमक्या दिल्या जात होत्या. आता तिसरा नंबर आव्हाडांचा अश्या स्वरूपाच्या पोस्टही काही लोक फेसबुकवर टाकत होते. आणि दाभोळकर पानसरे आव्हाड यांचे फोटो एका ओळीत..दाभोळकर पानसरे यांच्या फोटोवर एलीमिनेटेड च्या खुणा व आव्हाडांच्या फोटोवर प्रश्नचिन्ह हा प्रकारही अनेकांनी पाहिला असेल.

प्रश्न कोणाची बाजू बरोबर किंवा चूक हा नाही. तर ती बाजू कशी मांडली जाते हा आहे. आपल्या लोकशाहीने आपल्याला अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिले आहे.प्रत्येकजण त्याला पटणारी बाजू मांडू शकतो. अस असताना हे हिंसक हल्ले करणे, धमक्या देणे असे प्रकार का करावे लागतात ? जर तुमच नाण खणखणीत आहे जर तुमची बाजू योग्य आहे तर ती लोकशाहीप्रधान मार्गाने मांडा. काय चूक काय बरोबर याचा फैसला लोक करतील. ही वैचारिक मुस्कटदाबी हा अंतर्गत दहशतवादाचाच प्रकार आहे. बाह्य दहशतवाद मोडून काढता येऊ शकतो. पण हा अंतर्गत दहशतवाद त्याहून घातक आहे. यात अनेकांचे हितसंबंध गुंतले असल्याने भारतासारख्या देशात तो मोडून काढणे खूप कठीण आहे. तो फोफावायच्या आतच त्याचा बिमोड करणे गरजेचे आहे.



आता काल प्रत्यक्षात काय झाले ते पाहू आव्हाड हे संभाजी भिडेंना अपशब्द वापरतात. अपशब्द काय तर एकेरी उल्लेख करतात असे कारण देऊन भिडेंच्या गुंडांनी शिवसन्मान जागर परिषदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आधी बाहेर उभी असलेली आव्हाडांची गाडी फोडली. तेव्हा आव्हाड हे अर्थातच स्टेजवर होते. नंतर हे पाच पंचवीस गुंड मोठ्या आवेशात स्टेज वर घुसले. लगेच तिथे असलेल्या चार दोन पोलिसांनी त्यांना अटकाव केला. आव्हाडांना त्यांचे वारेदेखील लागले नाही. त्यांचा प्रयत्न हाणून पाडत स्टेजवरील आणि प्रेक्षकांतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या गचांड्या धरून स्टेजवरून खाली फेकले. आणि गराडा घालून लाथा बुक्क्यांनी त्यांना यथेच्छ बडवले. खुर्च्यांचा त्यांच्यावर पाउस पडला. tv9 मराठी, मी मराठी, एबीपी माझा, झी न्यूज जय महाराष्ट्र सर्व चानेल वर हे फुटेज कालपासून दाखवत आहेत. इच्छुकांनी प्रत्यक्ष बघून खात्री करून घ्यावी. एक पांढरा शर्ट आणि एक चटयापट्याचा टी शर्ट घातलेल्या गुंडाला तर कपडे फाटेस्तो फोडलेले फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.

दाभोळकरांवर पानसरेंवर हल्ला करणारे वेगळे असतील पण कालचा हल्ला आणि त्यामागील मानसिकता तीच आहे. पण इथ गोम अशी आहे की दाभोळकर किंवा पानसरे यांच्यासारखे जितेंद्र आव्हाड हे असंरक्षित सामाजिक कार्यकर्ते नाहीत. राजकीय नेते असल्याने आणि त्यांची बाजू खरी असल्याचे कालच्या हल्ल्याने सिद्ध झाल्याने त्यांच्यामागे भरपूर जनाधार आहे. तेव्हा “ इथे उपाय केलिया अपाय होईल !” असा संदेश कदाचित हल्ला करणाऱ्या गुंडांना नक्कीच मिळाला असावा.  

Saturday 11 July 2015

महान बोधीधर्म - ३

    बोधीधर्म साधारण इ.स. ५२० ते इ. स. ५३६ या कालखंडात चीनला गेला असावा. या काळात चीनमध्ये एक भयंकर संकट येणार आहे. अशी तात्कालिक चीनी भविष्यवेत्त्यांनी भविष्यवाणी केली होती. सुरवातीला बोधीधर्म म्हणजेच ते संकट असे समजून चीनी लोकांनी त्याची अवहेलना केली. काही काळाने चीनमध्ये एका भयंकर अनाकलनीय रोगाची साथ आली. अनेक लोक या रोगाचे शिकार होऊन धडधड मरण पावू लागले. तेव्हा बोधीधर्माने आपल्या दिव्य औषधी ज्ञानाचा वापर करून या रोगावर औषधी तयार केली व या रोगाच्या साथीचे उच्चाटन केले. बोधीधर्माप्रती लोकांमध्ये एक आदराची भावना उत्त्पन्न झाली. त्यानंतर चीनवर दुसरे महाभयंकर संकट आले. ते म्हणजे परचक्र. यावेळेपर्यंत चीनी लोक बोधीधर्म फक्त औषधी विद्येचे ज्ञानी आहेत असे समजत होते. पण या प्रसंगी बोधीधर्माच्या युद्धकलेचा आणि संमोह्न विद्येचा त्यांना परिचय झाला. पुढे लोकांनी त्यांना ही विद्या आपल्यालाही शिकवण्याची बोधीधर्माला विनंती केली. व ती मान्य करून बोधीधर्माने शाओलीन टेंपल या महान कुंग फु प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. शाओलीन टेंपल मध्ये महागुरू म्हणून बोधीधर्म उर्फ चिन्यांचा लाडका धामू याचा पुतळा शीर्षस्थानी आहे. त्याच्या पुढे नतमस्तक होऊनच कुंग फु विद्येचे धडे गिरवले जातात.
 
    बोधीधर्म हा चीनमधला एक प्रमुख पुराणपुरुष असल्याने त्याच्याविषयी अनेक आख्यायिका आणि दंतकथा चीनमध्ये प्रचलित आहेत. त्यापैकी काही निवडक पुढील प्रमाणे ..

आख्यायिका १

बोधीधर्मांची कीर्ती ऐकून एकदा चीनच्या सम्राटाने त्यांना भेटीस बोलावले. त्यांना आपण प्रजेसाठी, दीन दुबळ्यासाठी करत असलेले धर्मकार्य मोठ्या आत्मीयतेने दाखवून त्यांना विचारले.
“ हे भिक्षु, मी करत असलेले हे श्रेष्ठ कार्य पाहून आपणास काय वाटते ? धर्माच्या व धर्मकार्याच्या दृष्टीने माझी योग्यता काय ?”
बोधीधर्म आधीच ध्यानाचार्य ! ते फारस बोलत नसत. त्यांनी अल्पाक्षरी उत्तर दिले.
“काहीच योग्यता नाही”
यावर तो सम्राट अतिशय चिडला. मोठ्याने ओरडला,
“ कोण आहे हा जो सम्राटाशी अश्या अपमानास्पद तऱ्हेने बोलण्याचे दुस्साहस करत आहे?”
यावर बोधीधर्माने पुन्हा शांतपणे अल्पाक्षरी उत्तर दिले.
“कोणीच नाही व काहीच नाही !”

सम्राट हे उत्तर ऐकून क्षणभर स्तब्ध झाला. त्याच्या अंतर्मनात एक नाद उठला. त्याला तीव्रतेने जाणवले की आपल्या धनाच्या बळावर तो करत असलेल्या समाजकार्य व दानधर्माचा त्याला गर्व झाला आहे. समोर उभ्या असलेल्या त्या नंगधडांग भिक्खू कडे त्याने पाहिले. त्याची वाढलेली दाढी व फाटके कपडे यामागे दडलेलं एक महाज्ञानी, निगर्वी, निर्व्याज व्यक्तिमत्व त्याला जाणवले. आणि त्याला हेही जाणवले की या भिक्खूपुढे आपण खऱ्या अर्थाने दरिद्री आहोत. कंगाल आहोत. हा भिक्खू ‘ कोणीच नाही व काहीच नाही.’ त्याला त्या क्षणी आत्मज्ञानाची प्राप्ती झाली.



 आख्यायिका 2.

 चहा पेय म्हणून प्रचलित करण्याचे व त्याचा दैनंदिन जीवनात सातत्याने वापर करण्याचे प्रथम श्रेय चिन्यांना जाते हे तर आपणास ठाऊक आहेच. पुढे बौद्ध भिक्खुनीच हा चहा भारतात आणला. व आज तो आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग बनला आहे.

ही दुसरी आख्यायिका मोठी गंमतीशीर आहे. व चहाच्या शोधाशी निगडीत आहे. बोधीधर्म चीनमध्ये असताना सलग नऊ वर्षे एका मंदिरात त्याचे वास्तव्य होते. त्याने मंदिरातील एकाच भिंतीकडे पाहून ध्यानधारणा केली. सतत त्याच भिंतीकडे पाहिल्याने थकून त्याला झोप आली. जागा झाला तेव्हा त्याला साधनेच्या मध्येच झोप लागल्याने स्वतःचीच घृणा वाटली. त्यामुळे त्याने स्वतःच्या डोळ्यांच्या पापण्या कापल्या आणि तिथेच जमिनीवर फेकल्या. आख्यायिकेनुसार, त्या जागी चहाचे झुडूप उगवले. बोधीधर्माने त्या झुडुपाच्या पानांची चव घेतली आणि अमृतदायी चवीमुळे तो सदैव ताजातवाना आणि जागा राहिला.

या व अश्या अनेक आख्यायिका आणि दंतकथा चीनी साहित्य आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. एकंदरच बोधीधर्माने चीनी भावविश्व पूर्णपणे व्यापून टाकले आहे.



7 am arivu अर्थात 7 th sense

हा एक नितांतसुंदर तमिळ चित्रपट आहे. नेहमीप्रमाणेच हॉलीवूडपटांच्या तोंडात मारेल अश्या उच्च तंत्रज्ञानाने परिपूर्ण ज्याच्यासाठी तमिळ चित्रपट प्रसिद्ध आहेत. याची कथा ही बोधीधर्म याच्या भोवती गुंफली आहे. अनेक भारतीयांना बोधीधर्म या हरवलेल्या महान भारतीयाशी परिचित करून देण्याचे प्रमुख कार्य हा चित्रपट करतो. मला स्वत:ला काही दिवसांपूर्वी हा सिनेमा पाहूनच बोधीधर्म कोण ते माहित झाल.
सुरवातीची १५ मिनिटे आणि मुख्य थीम सोडली तर हा चित्रपट बोधीधर्माचा फारसा इतिहास दाखवत नाही. तरीही अवश्य पाहावा असा आणि बोधीधर्मांवरचा एकमेव चित्रपट आहे.


     अश्या अनेकानेक महान व्यक्तींचं कार्य भूतकाळाच्या पडद्याआड दडल आहे. या देशातील प्राचीन ज्ञान, विज्ञान, कला, स्थापत्य, अध्यात्म किती प्रगत होत याच्या पाउलखुणा लुप्त झाल्या आहेत. लुप्त होत आहेत. बोधीधर्मासारखे अवचित गवसणारे तुटक तुटक धागे आपण जपायला हवेत. पसरवायला हवेत. अजून खूप माहिती अज्ञात आहे. बोधीधर्माबद्दल.. गुगला , वाचा , शोधा, संशोधन करा. आपल्या महान संस्कृतीतील महानायकाच्या हरवलेल्या पाउलखुनांचा शोध घ्या.



     ही लेखमाला आपल्या विद्येची दुदुंभी सातासमुद्रापार वाजवणाऱ्या आणि गाजवणाऱ्या इतिहासाच्या महानायक बोधीधर्माला समर्पित _/\_

- सुहास भूसे


महान बोधीधर्म - 2

बोधीधर्म हा अल्पकाळात अनेक विद्यात निपुण झालेला एक महान भारतीय महामानव होता. चीनच्या औषधी शास्त्राची याने मुहूर्तमेढ रोवली. आणि कुंग फु ही महान आत्मरक्षापर कला चिन्यांना शिकवून शाओलीन टेम्पल या गौरवशाली प्राचीन कुंग फु प्रशिक्षण केंद्राची त्याने स्थापना केली. बौद्ध धर्माचा चीनमध्ये प्रसार केला. झेन किंवा जेन संप्रदायाची स्थापना केली. बोधीधर्म हा चीन जपान आणि कोरियामध्ये अत्यंत श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक ठिकाणी बोधीधर्माचे पुतळे आहेत. चीनी लोक बुद्धानंतर बोधीधर्मापुढेच नतमस्तक होतात. त्याला पूजनीय मानतात. चीनी त्याला प्रेमाने धामू म्हणतात. त्याच्याविषयी विपुल वांग्मय चीनी आणि जपानी भाषांत उपलब्ध आहे. पण आपल्याला ते दुर्दैवाने अगम्य आहे. इंग्रजीमधील माहिती फारच किचकट आणि क्लिष्ट आहे. आणि भारतीय भाषांमध्ये तर बोधीधर्माचा कुठेही मागमूस आढळत नाही.


बोधीधर्म हा मूळ क्षत्रिय राजकुमार होता. त्याचे डोळे निळे आणि गहिरे होते असे संदर्भ सापडतात. दक्षिण भारतातील कांचीपुरम येथे राज्य करणाऱ्या सुगंध नामक राजाचा तृतीय पुत्र होता. तो औषधविद्या आत्मरक्षाविद्या आणि संमोहन विद्या तसेच जनुक शास्त्र यातला तज्ञ होता. जनुक शास्त्र (genetic engineering )  या अर्वाचीन प्रगत विज्ञानाचा बोधीधर्माशी जोडला जाणारा संदर्भ व त्याचे येणारे उल्लेख हे थक्क करणारे आहेत. पण मी आधीच म्हटल्याप्रमाणे बोधीधर्माविषयी फारशी माहिती सध्या उपलब्ध नाही. हे ज्ञान त्याच्याबरोबरच लुप्त झाले आहे.
पुढे जाऊन बौद्ध धर्मातील ध्यान परंपरेचा वारसा त्याच्याकडे आला. असे म्हणतात की तथागत बुद्धांना आपल्या अनुयायांमध्ये आपल्या ज्ञानाचा वारसा सांभाळू शकेल असा महाकश्यप हा एकमेव शिष्य लायक वाटला. म्हणून आपला वारसा त्यांनी महाकश्यपाकडे सोपवला. या परंपरेतील २८ वा ध्यानाचार्य म्हणजे बोधीधर्म त्यालाच बोधीसत्व या नावानेही ओळखले जाते अशीही मान्यता आहे. बुद्धांचे भिक्षापात्र व त्यांचे काषायवस्त्र परंपरेने पुढील ध्यानाचार्यांकडे देण्यात येत असे. ही परंपरा पुढीलप्रमाणे
१. महाकश्यप
२. आनन्द
३. शनवसिन
४. उपगुप्त
५. धीतिक
६. मीशक
७. वासुमित्र
८. बुद्धनन्दी
९. बुद्धमित्र
१०. पाश्व
११. पुंययश
१२. अनबोधी
१३. कपीमल
१४. नागार्जुन
१५. कणदेव
१६. राहुलभद्र
१७. संघनन्दी
१८. संघयथता
१९. कुमारलता
२०. शयात
२१. वासुबंधु
२२. मनोरथ
२३. हक्लेनयश
२४. सिंहबोधी
२५.बशाशित
२६. पुण्यमित्र
२७. प्रज्ञाधर
२८. बोधीधर्म

ही परंपरा पुढे चीन मध्ये चालू राहिली ती पुढील प्रमाणे
१. बोधीधर्म
२. हुइ को
३. सेंग त्सान
४. ताओ ह्सिन
५. हुंग जेन
६. हुई नंग

यानंतर मात्र हुई नंग ने ध्यानाचार्य पदासाठी बौद्ध भिक्खुंमध्ये होणाऱ्या भांडणामुळे निराश होऊन ही परंपरा विसर्जित केली.


बोधीधर्म चीनमध्ये एकूण नऊ वर्षे काहीही न बोलता मौनव्रत धारण करून राहिला. ध्यानाचा व ध्यानसंप्रदायाचा त्याने चीन मध्ये प्रसार केला. पुढे हा संप्रदाय जपान व कोरिया ला ही पोहोचला. याला चीनी भाषेत जेन किंवा जपानी भाषेत झेन संप्रदाय म्हणतात.
बोधीधर्म चीन ला का गेला याविषयी तीन आख्यायिका प्रामुख्याने प्रचलित आहेत.
१ राजमातेच्या आज्ञेवरून बौद्ध धर्म प्रसारासाठी
२ भारतात ध्यानाचार्य परंपरेसाठी सुयोग्य शिष्यवर न मिळाल्याने
३ गुरूंच्या आज्ञेवरून चीनमध्ये येऊ घातलेल्या भीषण संकटात चीनी लोकांचे रक्षण करण्यासाठी.
बोधीधर्म साधारण इ.स. ५२० ते ५२६ या कालखंडात चीनला गेला असावा.
बोधीधर्माच्या चीन मधील कार्यासबंधी पुढील लेखात...

-सुहास भूसे



                                 

Friday 10 July 2015

महान बोधीधर्म - १

बोधीधर्म कोण होता ? ९० % भारतीयांना हा प्रश्न विचारला तर उत्तर 'माहित नाही ' असे असेल. पण हाच प्रश्न जर चीनी किंवा जपान्यांना विचारला तर ९९ % लोक ' होय माहित आहे ' असे उत्तर देतील. यावरून बोधीधर्म हा कोणी जपानी किंवा चीनी व्यक्ती असावा अशी समजूत व्हायला काही हरकत नाही. पण बोधीधर्म हा भारतीय होता. भारतीयांना माहित नसणारा पण चीनी, जपानी, कोरियन लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कोण होता हा गूढ भारतीय ?

निळ्या डोळ्यांचा बौद्ध भिक्खु धामु ऊर्फ बोधीधर्म

आज हॉलीवूडच्या एक्शनपटांत कुंग फु चा बोलबाला आहे. मार्शल आर्ट मध्ये सर्वात प्रमुख आहे ती कुंग फु ही आत्मरक्षा विद्या. आणि या विद्येचे महारथी महानायक जाकी चेन, ब्रूस ली, जेट ली जगभरातील चित्रपटरसिकांच्या गळ्यातील ताईत आहेत. कियोनो रीव्युज हा हॉलीवूडचा महानायक तर कुंग फु च्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे. चीनच्या प्राचीन संस्कृतीचे गौरवशाली प्रतिक बनला आहे तो हा कुंग फु. चीनी संस्कृतीविषयी चर्चा सुरु आहे आणि कुंग फु चा विषय नाही असे होत नाही. किंवा चीनी चित्रपट आहे आणि त्यात कुंग फु नाही असेही उदाहरण अपवादात्मकच.

कुंग फु ही  एक श्रेष्ठ दर्जाची आत्मरक्षात्मक युद्धकला आहे. शरीराच्या अत्यंत वेगवान हालचालीसाठी ही विद्या प्रसिद्ध आहे. आपल्या योगामध्ये जसे अत्यंत उच्च पातळीवर गेल्यावर कुंडलिनी शक्ती जागृत होतात असा समज आहे. तसाच कुंग फु मध्ये देखील अंतिम कौशल्य म्हणून अशीच गूढ विद्या आहे. जी शारिरी अवयवांच्या अत्युच्च प्रदर्शनाला मदत करते. कुंग फु शिकवणाऱ्या अनेक गुरुशिष्य परंपरा चीन जपान मध्ये प्रसिद्ध आहेत. या विद्येचे प्रशिक्षण देणारी अनेक केंद्रे प्राचीन काळापासून चीन मध्ये आहेत. आता या सर्व केंद्रांचे मॉडर्न कुंग फु स्कुल मध्ये रुपांतर झाले आहे. या सर्व प्रशिक्षण केंद्रांमध्ये सर्वात आदिम, सर्वात प्राचीन, सर्वात मानाचे असे कुंग फु प्रशिक्षण केंद्र आहे शाओलीन टेम्पल. आणि हे विद्यालय स्थापन करून चीनी लोकांना कुंग फु शिकवला तो बोधीधर्म या भारतीयाने.



हा धक्का अनेक भारतीयांना सहन होणार नाही. अनेकांचा विश्वास बसणार नाही. आधीच वैदिक विमाने वगैरेवरून प्राचीन भारतीय ज्ञानाचा उपहास करण्याचे अनेक विद्वानांचे कार्य जोरात सुरु आहे. ताजमहाल हा तेजोमहल होता असे सांगणारे, त्यासाठी अनेकानेक संदर्भ पुरावे देणारे पु ना ओक या विद्वानांच्या लेखी वेडपट गृहस्थ ठरतात.प्राचीन दैदीप्यमान काळ, मग सांस्कृतिक धार्मिक आक्रमणे आणि मग हजारो वर्षांची गुलामगिरी, जातीभेद, उच्चनीचतेने भंगलेला समाज आणि मग अर्चाचीन लोकशाही कम ठोकशाही असे भारताच्या सामाजिक सांस्कृतिक प्रवासाचे ढोबळ टप्पे आहेत. या सर्वांचे दोन प्रमुख परिणाम झाले.

1. आपले प्रगत ज्ञान त्याचे संदर्भ पुरावे त्याचा वारसा आपल्यापासून हिरावला गेला.
2.आणि भारतीय समाजाची मानसिकता पराभूत, गुलाम बनली.

दोन्ही परिणाम विघातकच. पण तुलनेने दुसरा परिणाम जास्त घातक ठरला, ठरतोय. आपल्या देशात काही चांगल होत. ते श्रेष्ठ दर्जाच होत हे लोकांना खरेच वाटत नाही. आणि त्याचाच ओघाने येणारा परिणाम म्हणजे काही चांगल घडू शकत किंवा आपण घडवू शकू यावरही विश्वास न बसणे. संपूर्ण समाजमनाचा नकारात्मकतेच्या दिशेने प्रवास आणि कृतीशुन्यता.

या विषयीचा गटेचा एक सिद्धांत माझा खूप आवडता आहे. माझ्या लिखाणात मी तो वारंवार मांडतो. आणि भारताच्या अधोमुखी प्रवासाचे आणि गुलाम पराभूत मानसिकतेचे ते एक प्रमुख कारण आहे.

“ज्याची जपणूक करावी, ज्याचे रक्षण करावे, ज्याचा विकास करावा असे काहीही नाही  अशी एकदा समाजाची मानसिकता तयार झाली की कृती करण्याचे काही कारणच उरत नाही.”

यासाठीच प्राचीन भारतीय तत्वज्ञान प्राचीन भारतीय स्थापत्यविद, दार्शनिक, वैज्ञानिक यांची भारतीयांना नव्याने ओळख करून घेण्याची गरज आहे. चार्वाक, बोधीधर्म किंवा मयासुरासारखा अतिप्राचीन स्थापत्यविद यांच्यावर संशोधने व्हायला हवीत. त्यांचे ज्ञान, त्यांच्या कला यांचा अभिमान भारतीयांच्या मनात पुनश्च रुजायला हवा.

बोधीधर्माविषयी सविस्तर पुढील लेखात  ...

-सुहास भूसे.

बोधीधर्म ऊर्फ दारुमु यांचे एक प्राचीन जपानी चित्र

Thursday 9 July 2015

पारावरच्या गप्पा आणि सत्तेचे डोळे

" रंगे जरा देवळात जाऊन येतो ग वाइच "
दगडूने पायतान पायात सरकवत दारातूनच रंगुला आवाज दिला. दिवसभर रानात राबुन आलेला शीन देवळाच्या पारावर बसून दोस्तांसंग चार गप्पा हानल्या की वाइच हलका होत असे.
देवळाच्या पारावर चौगुल्याचा शिरप्या ,नकटा दत्तू , तिमान्या उर्फ सदया आन शिवा मास्तर ही दगडूची दोस्त मंडळी नुकतीच जमा झाली होती.

" तिमान्या, काढ चंची, वाइच पान खाऊ दे मर्दा !"पारावर आलकट पालकट बैठक जमवत दगडूनं फरमाइश केली.
चंची त्याच्यापुढ करत तिमान्यानं इचारल.
 "का र दगड्या ..लई ढेपाळल्यावनी दिसायलाच मर्दा !"
चंचीतुन दोन चांगली जूनवांन पान काढुन त्यांच्या शिरा खुडत दगडू म्हणाला,
" आर कामानं पिट्टा पडायलाय.. तिच्या बायली काय काम म्हणाव का स्वाॅंग बागायतीतल, ..कितीबी वड़ा वसरतच नाय "
शिरप्या न मान कलती करून इचारल
 "एवढा काय नांगुर वडला र दगड्या ?"
एव्हाना चांगला मस्त जमवलेला विडा तोंडात टाकत दगडू म्हणाला..
" आर काल कांद्याच्या रोपाला सारं सोडल व्हत..आज इळभर ढेकळ हावार केली रॉप टाकल भिजीवल बग ..यंदा बक्कळ कांदा करणार हाय "
शिवा मास्तरन हे ऐकून च च च केल.
"का व मास्तर..चूक चूक करायला काय झाल ?"
दगडून इचारल ..
" अरे काही उपयोग नाही बाबांनो. कांदावाला शेतकरी यंदा माती खाणार "
हे ऐकून चरका बसला दगडूला ..
"मास्तर तुमी कवपसन भाकनुक करायला लागले "

" अरे भाकनुक नाही दगडू.. अरे मोदीनी निर्यातमूल्य वाढवलय 175 रु. नी कांद्याच. आता कांदा निर्यात करने व्यापाऱ्याना परवडणार नाही. म्हणजेच निर्यात होणार नाही, मग मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यावर जे होते तेच होईल."
क्षणभर शिवा मास्तर च्या तोंडाकडे स्तब्ध होऊन बघत बसले समदे.

"जाऊंदे मरू दे तिच्यामारी कांद्याचा ह्यो न्हेमीचाच वांदा हाय, गेला बाजार उस तर कुठ जात न्हाय"
चौगुल्याच्या शिरप्याची आशा लई अनंत.


"आता हाय का , राजाला दिवाळी म्हायीतच न्हाय म्हण कि, लेका शिरप्या पुढच्या हंगामात उसाला १२०० रु टन भाव जाहीर झाला."
नकट्या दत्तू ने बॉम्ब टाकला.
"मायला कायतर बदल होन, म्हणून मुदीला डोक्यावर घेतल आमी, आन यानी त शेतकऱ्याच्या डोस्क्यावर मीरं वाटल कि ओ !"
तीमान्या हळहळला.
"अरे याचं कस झालय माहित हाय का.. तुम्हाला एक गोष्ट सांगतो"
शिवा मास्तर ची गोष्ट म्हणताच सगळे सावरून बसले.
..

"फार फार वर्षापूर्वी एका विहिरीत काही खोडकर पोर पोहत होती. दणादण उड्या ठोकत होती. पाणी उडवत होती. आणि त्यांची मौज चालली होती.आणि एक मुलगा मात्र काठावर उदास होऊन बसला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होत.
त्याला हि मौज करता येत नव्हती. कारण तो ठार आंधळा होता.
वरून शंकर पार्वतीच विमान चालल होत. पार्वतीला या पोराची फार द्या आली.
तिने शंकराकडे हट्ट धरला कि या पोराला डोळे द्या. शंकर महाज्ञानी. म्हटले नको. आग बाई तो आहे तसाच ठीक आहे.
मग काय बालहट्ट राजहट्ट आणि स्त्रीहट्ट यापुढे कोणाचे काय चालते काय?
शंकर म्हटले तथास्तु !
आणि इकडे या पोराला डोळे आले. पोरग क्षणभर बावरल. इकड तिकड बघितले. कपडे काढले अन दाणकन ठोकली कि ओ उडी.
मिनिट दोन मिनिट पोरग शांत पोहोल आणि मग ......
दावला कि ओ रंग . याच्या अंगावर उडी टाक. त्याच्या अंगावर पाणी उडव..
अस करत करत या पोराने धर पोरग कि बुडव पाण्यात...धर पोरग की बुड्व पाण्यात असा एककलमी कार्यक्रम सुरु केला.
ते दावून मंग शंकर पार्वतीला म्हणले बग मी सांगत होतो ना ते पोरग आंधळच ठीक होत म्हणून.
हे मोदी सरकारच बी असच झालय बगा. सत्ता नव्हती तवर ठीक होत. गरिबावाणी काठावर बसून तत्वज्ञान सांगत व्हते.
आता सत्ता मिळाली की चालू झाला यांचा एककलमी कार्यक्रम ' धर शेतकरी कि बुडव पाण्यात, धर शेतकरी कि बुड्व पाण्यात."
..

इकडे हसून हसून मंडळीची मुरकुंडी वळली होती.
शिरप्या लोळत होता. दत्तूच मुंडास पडल खाली. तीमान्या पोटावर हात दाबत खदखदत होता.
दगडूने हि मनसोक्त हसत डोळ्याच्या कोपऱ्यात साचलेल पाणी पंच्यान अलगद पुसलं.