About

Friday 22 May 2015

रंगुची गल्लीवारी, इज्जत आणि बरकत

रंगु पायात पायताने सरकवत दारातूनच म्हणाली " मी जरा सखुकड़े जाऊन येते हो !"

मोरीकडे भांडी घेऊन जाणारा तिचा नवरा दगडू थबकला.

"अग आज मला भांडी धुवायला धूणी धुवायला स्वयंपाक आणि केर सारायला बी मदत करती म्हणली होतीस. उद्या म्हणजे तुमचा "अच्छे दिन"    ची सुरवात असल म्हणली होतीस. का समद 'जुमल ' होत ते ?"

त्याच बोलण संपेस्तो रंगुने लांब रान कातरले होते.
..

सखुच्या घरी चहापाणी झाल्यावर मनकी बात ला सुरुवात झाली.
सासुचा आणि नव-याचा आवडता विषय येताच रंगु रंगू लागली.

" अग माझ्या आधी यांच्या घरात सगळी बजबजपूरी करून टाकली होती या ' माँ बेटे के कारभार ने ' !! सासु सगळ चांगल चुंगल तुंप बिंप चोरून मारून ओरपायची. सासु सुटली होती अन बाकीची झाली होती पाप्याची पितर ..अन आमचे हे म्हणजे त निव्वळ ध्यान ..मौनीबाबा ..(खुसुर पुसुर खुसुर पुसुर बराच वेळ ) "

"येते ग जरा यश्वदे कड़े जाऊन .." म्हणून रंगु ने सखुचा निरोप घेतला.

..
यश्वदेशी तर रंगुचा ' पुराना नाता '
मग 'मन की बात ' ला काय तोटा ?
रंगु यश्वदेच्या गळ्यात पडून हमसुन हमसुन सांगू लागली..

" फार फार ग दुस्वास करतात माझा घरची माणस. सगळे ऐतखाऊ माजलेले बैल आहेत नुसते. मी एकटी कामाचे डोंगर उपसत असते . पण मेल्यांना जरा सुद्धा कदर नाही ग ..उलट मी काम करते म्हणून जळतात माझ्यावर मूडदे.. .(खुसुर पुसुर खुसुर पुसुर बराच वेळ ) "

" येते ग यमुना कड जाऊन " म्हणत रंगुने यश्वदेचा निरोप घेतला.

..
यमुना तर रंगुची बालमैत्रीण. तिच्याकड़े तर 'बचपन से आना जाना '
चहासंगे किरकोळ गपशप झाल्यावर खरी मन की बात सुरु झाली.
रंगु जरा जास्तच जोमात होती.

" अग तुला म्हणून सांगते यमुने माझ लगीन झाल तव्हा आमच्या फेकाडे घरान्यात काही मंता काही राम नव्हता. समद्याना लाज वाटायची आपण या फेकाडे घराण्यात जन्म घेतला म्हणून..घराला घरपण म्हणून नव्हतं बग कसल. पण मी हिथल माप वलंडल आन यांच घरच आबादान झाल बग. ह्यांची कीरत वाढली गल्लीतल्या न्हान थोर बाप्प्यांची लाइन लागू लागली आमच्या घरी माझ्यामूळ...(खुसुर पुसुर खुसुर पुसुर बराच वेळ ) "

"दिवस कलला ग पार येते मी आता " म्हणत रंगूने यमुनाचा निरोप घेतला..

" तुझ्याच घरी जातिया नव्ह " ह्या यमुनेच्या कुत्सित प्रश्नाकडे दुर्लक्ष करत तिने रान कातरले.

..
"आले व मी..जरा चहा त टाका वाइच दोन कप " पायतान काढत रंगु ने आड्डर सोडली.
दारातच पायपुसन झटकत उभा असलेला दगडू तिच्याकड कावून बघू लागला.

" रंगे का मून दिवसभर कामधंदा सोडून गावभर उंडारतीच ग ?"

रंगु ने रागाने दगडूकड़े एक तुच्छ कटाक्ष टाकला. आणि ठसक्यात म्हणाली,

" हे पाव दगडोबा , तुमासनी अक्कल मून काय ती न्हायच. आवो मी जर बाहेर फिरली नाय तर गल्लीत तुमची इज्जत कशानी वाढील. अन माणसात मी उठली बसली न्हाई त तुमच्या पीठाच्या गिरणीच्या धंद्याला बरकत कशी येईल ?"

रंगीच्या उंडारण्यामुळे आपली इज्जत कशी वाढेल आणि बरकत कशी येईल याचा हातात पायपुसन घेऊन विचार करत स्तंभित झालेल्या दगडुला तसाच सोडून रंगु कुर्र्यात आत निघुन गेली.

-@सुहास भूसे.

Saturday 16 May 2015

अघोर साधू आणि अघोरी साधना.

 "सैतानालाही लाजवेल असे अघोरी कृत्य"
असा वाकप्रचार नेहमी वापरला जातो. म्हणजे नृशंस किंवा पाशवी कृत्यासाठी आपण ' अघोरी ' या शब्दाची योजना करतो. ती कितपत बरोबर आहे , योग्य आहे हे हा लेख वाचल्यानंतर आपणच ठरवा.
अघोरी साधूंविषयी आणि त्यांच्या पंथाविषयी दुर्दैवाने फारच कमी माहिती उपलब्ध आहे. जी माहिती उपलब्ध आहे त्यात अघोरींविषयीच्या गैरसमजांचाच भरणा अधिक आहे. एक भयचकित करणारे वलय पुरातन काळापासून अघोर पंथाभोवती राहिले आहे. अघोरी साधूंच्या अलौकिक शक्ती, त्यांची अमानवी साधना याविषयीचे गूढ कायम आहे. साधारणत: सर्वसामान्यांना अघोरी साधूंविषयी जी माहिती असते ती अशी -
1. अघोर साधू स्मशानात साधना करतात.
2. मानवी मृतदेहाची राख ते अंगाला फासतात.
3. अघोर साधू मानवी कवठ्यांची माळ गळ्यात घालतात.
4. अघोर साधू मानवी कवठी भोजनपात्रासारखी वापरून त्यात भोजन करतात.
5. अघोर साधू नरमांस भक्षण करतात.
6. हठयोगात ते प्रवीण असतात.
7. अघोर साधूंच्या अंगात अलौकिक शक्ती असतात.
ही किंवा यापैकी काही माहिती सर्वसामान्यांना असते. यातील ब-याच किंवा सर्वच गोष्टी ख-या आहेत. आणि चार भिंतीत विश्व सामावलेल्या माणसांना अंगावर भयाने काटा आनण्यासाठी या गोष्टी पुरेश्या आहेत. त्यामुळ अघोर साधू म्हटल की सर्वांची तंतरते. खर तर अघोर साधूंना भिण्याचे काहिएक कारण नाही. ही भीति निव्वळ अज्ञान व गैरसमजापोटी आलेली आहे.


ड्रेक ब्रॉकमन नांवाच्या इंडियन मेडिकल ऑफिसरनें मिळविलेली एका अघोर्‍याची जन्मकथा एच. बालफर या इंग्लिश लेखकाने लिहून ठेवली आहे. तो सांगतो..
' हा मनुष्य जातीनें लोहार असून पंजाबांतील पतियाळा संस्थानांत राहात असे. तो प्रथम भीक मागत असे, पण पुढें एका अघोर्‍यानें त्याला आपला शिष्य केला. तो बदरीनारायण करून नंतर नेपाळांत गेला; तेथून जगन्नाथाला जाऊन शेवटीं मथुरा व भरतपुर येथें आला. भरतपुरला त्याची चौकशी झाली. त्यानें अशी जबानी दिली कीं,'' मी सध्यां कोणत्याहि जातीकडून अन्नग्रहण करितों, व जातीचा विधिनिषेध मी मानीत नाहीं. मी कोणाच्याहि हातचें खातों. मी स्वत: नरमांस खात नाहीं पण माझ्या पंथांतील कांही जणांना तें खाऊन मृतांना पुन्हां सजीव करण्याची ताकद आहे. कांहींजवळ मंत्रसामर्थ्य असतें व तें मनुष्यांचे मांस खातात; पण माझ्यांत हें सामर्थ्य नसल्यानें मला तशी ताकद नाहीं. मी फक्त मनुष्याच्या डोक्याच्या कवटींतून अन्न खातों व पाणी वगैरे पितों. याशिवाय मी घोड्याव्यतिरिक्त सर्व मृत जनावरांचें मांस भक्षण करितों. घोडा निषिद्ध मानला आहे म्हणून खात नाहीं. माझे सर्व जातबांधवहि माझ्याप्रमाणेंच घोड्याच्या मांसाशिवाय सर्व मांस खातात.''

अश्या या गूढवलयांकित आणि विस्मित करून सोडणा-या अघोर पंथाविषयी आणि त्यांच्या तत्वज्ञानाविषयी अधिक जाणून घेवुया.


...............

अघोर संप्रदाय हा हिंदूस्थानातील सर्वात जूना संप्रदाय. याचा निश्चित कालावधी सांगता येत नसला तरी तो कापालिक पंथाच्या समकालीन असावा असे मानले जाते. हिंदुस्थानातील प्राचीन शैव धर्माच्या दिव्य परंपरेचा वारसा बाळगनारा हा पंथ आहे. याचा सर्वाधिक जूना उल्लेख सापड़तो तो युवान श्वांग या चीनी प्रवाश्याच्या प्रवासवर्णनात...अंगाला राख फांसून, कवट्यांच्या माळा धारण करणारे (कपालधारी), नागवे साधू त्याने हिंदुस्थानांत पाहिले असल्याचे लिहून ठेवले आहे.

अघोर तत्वज्ञान :-

अघोर या शब्दाचा अर्थ ' अ + घोर ' जो घोर नाही असा...जो भीतिदायक नाही असा..ज्याच्या ठाई कोणताही भेदभाव नाही असा.. सरळ ..स्थितप्रज्ञ .
 'स्थितप्रज्ञ ' ही अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीची मानसशास्त्रीय संज्ञा आहे. नुसत सुख आणि दुःख यामध्ये जो स्थिर असतो तो स्थितप्रज्ञ नव्हे. तर जगातील सर्व चराचर गोष्टींकड़े जो समदृष्टीने पाहतो ज्याला कशाचाही मोह नाही आणि जो कशाचीही घृणा करत नाही तो स्थितप्रज्ञ ..तो अघोर!

याच तत्वज्ञानात अघोरींच्या गूढ , विक्षिप्त आणि भयावह जीवनशैलीचा उगम आहे.

मृत मानवी शरीराचे मांस माणूस त्याज्य मानतो. त्याची घृणा येते म्हणून अघोरी ते मांस खातात. या मागे घृणेवर विजय मिळवणे हा एकमेव उद्देश आहे. मानवी समाज ज्या ज्या गोष्टींची घृणा करतो त्या गोष्टी अघोरी अंगीकारतात. लोक स्मशान, मृत मानवी शरीराचे मांस, मृतदेहाची राख यांची घृणा करतात. म्हणून अघोरी त्याना स्वीकारतात. तुम्ही विचार करा ..जो मृतदेहाचे मांस खातो ..त्याची राख अंगाला फासतो..स्मशानात साधना करतो..राहतो त्याला या जगात दूसरे काय घृणास्पद वाटेल ? अघोर विद्या आणि तत्वज्ञान माणसाला इतक्या टोकाचा स्थितप्रज्ञ बनवते की त्याच्या ठाईचा आप-पर भाव पूर्ण नाहीसा होऊन सकल विश्वाकडे तो एका विशाल समदृष्टीने पाहू लागतो. खरा अघोरी हा समाजापासून पूर्ण अलिप्त असतो आणि आपल्या साधनेमध्येच मग्न असतो. आपल्या विद्येचा उपयोग तो फक्त जनकल्याणासाठीच करतो.

अघोरींच सोंग घेऊन काही भामटे आपल्याला ठकवु शकतात. मागील वर्षी एका भामट्या अघोर बाबाने अथनी जि. बेळगाव इथ कल्लोळ उडवून दिला होता. वृत्तपत्रात ही घटना खुप गाजली होती. ही त्या बातमीची लिंक -

http://www.tarunbharat.com/?p=42252

पण जे खरे अघोर साधू असतात ते असली हीन कृत्ये कधीच करत नाहीत. निसंग निर्लेप जीवनशैलीचा त्यांनी अंगीकार केलेला असतो. त्यांना ओळखण्याची महत्वाची खुण म्हणजे ते तुम्हाला कधीच काही मागणार नाहीत. पैसा अन्न कपड़ालत्ता अगदी धनाची रास त्यांच्यापुढे ओतली तर ते ढुंकूनही पाहनार नाहीत.

अश्या या गूढरम्य अघोर साधूंची साधना, त्यांची दैवते आणि आणखी रोचक माहिती जाणून घेऊ पुढील लेखात...
(क्रमश:)

सुहास भूसे
(दि. 16 -5-2015)


पुरंदरे, कुणबीनी आणि औचित्य

पुरंदरे प्रकरणावरुन जे वादळ सुरु झालय ते थांबण्याच नाव घेत नाहिये. या निमित्ताने महाराष्ट्रातील जातीय वातावरण ढवळून निघाले आहे. दोन्ही बाजूंचे समर्थक एकमेकांवर गलिच्छ शब्दात जातीय टिप्पण्या करत आहेत. अनेक नवइतिहास संशोधकांमध्ये पुरंदरे कसे बरोबर आहेत हे सिद्ध करण्याची अहमहिका लागली आहे.
यात सर्वात जास्त वादंग सुरु आहे ते ' कुनबीनी ' या शब्दावरुन.
पुरंदरे यांनी एका ठिकाणी ' शिवपूर्व काळात 25 होनात जातिवंत कुनबीनी विकत मिळत असत ' अस विधान केल.
संजय सोनावनी सरांनी हा शब्दप्रयोग कसा योग्य आहे हे सादर करणारे ऐतिहासिक पुरावे आपल्या ब्लॉगवर सादर केले.
त्यानंतर अनेकांनी अनेक संदर्भ तोंडावर फेकण्याचा सपाटा सुरु केला.
सरांच्या अभ्यास आणि व्यासंगाबद्दल आम्हाला आदर आहे. ठीक आहे.
सदरहु पुरावे आम्ही खोटे ठरवत नाही.
किंवा ते अस्सल कागदपत्रांतील असतील तर ठरवताही येणार नाहीत.
..
पण सर्वानी दुर्लक्ष केलेल्या एका महत्वाच्या गोष्टीकडे सर्व विचारवंताच लक्ष वळवण्यासाठी हा लेखनप्रपंच !!

ती गोष्ट म्हणजे औचित्य.
काळ या परिमाणामध्ये शब्दांचे अर्थ लवचिक असतात हे कोणीही भाषाशास्त्रज्ञ सांगेल. एखादा शब्द प्राचीन काळात अमुक अर्थाने वापरला जात असेल तर कालौघात त्याचे संदर्भ पर्यायाने अर्थ बदलू शकतात. भाषाशास्त्र अभ्यासक अश्या अनेक शब्दांची आपणास यादी देऊ शकतील.
कधी कधी विशिष्ट परिस्थिती मुळे मूळ शब्दाचा अर्थ बदलतो आणि त्याच एखाद नव रूप प्रचारात येत.
..
उदा. Villain या शब्दाच मूळरूप Villes हा शब्द आहे.
Villes म्हणजे खेड्यात राहणारे लोक
तर Villain म्हणजे खेडगळ लोक असा या शब्दाचा मूळ अर्थ होता.
..
ख्रिश्चन धर्माच्या प्रारंभ काळात या खेड्यात राहणा-या निसर्गपूजक पॅगन लोकांची चर्चला इतकी भीती वाटत असे की त्यांना दुष्ट खलनायक ठरवल गेल.
आणि Villain या शब्दाचा अर्थ बदलून खलनायक असा अर्थ रूढ़ झाला.
..
आता औचित्य ...
पुरंदरेनी ज्या काळात हे पुस्तक लिहिल त्या काळात कुणबी ही एक मान्यताप्राप्त जाति होती. कुणबी-कुणबीनी हे एका महाराष्ट्रात बहुल असणा-या जातीचे प्रतिनिधित्व करणारे शब्द होते. ' जातिवंत कुणबीनी ' या आता वेश्या किंवा भोगदास्या नव्हत्या तर कुलीन मराठ्यांच्या घरशोभा होत्या.
भलेही शिवकाळात हा शब्द कोणत्या का अर्थाने वापरला जात असेल. पण आज हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो याच भान पुरंदरे यांना निश्चितच राखता आल असत. आणि तो शब्द न वापरण्याच..वगळण्याच..बदलण्याच औचित्य राखता आल असत पण त्यांनी ते केल नाही.
त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेल्या विचारवंतांनाही हे औचित्य राखता आल असत. पण त्यांनीही ते राखल नाही.
..
आणि मग आपल्या माताबहिनीँचा असा उद्धार होत असलेला पाहुन चरफड़णा-या..तड़फडणा-या मराठ्यांची "तुम्ही लेको जातीयवादी ते जातीयवादी ..सुधारणार नाहीत ..या मुद्द्याकड़े जातीय दृष्टिकोणातुन बघू नका "
अशी संभावना होत आहे.
हे म्हणजे अस झाल की तुम्ही आमच्या मायभगिनीँचा विनयभंग करणार आणि वरुन आम्हालाच तत्वज्ञानाचे डोस पाजणार " भो बाबा....तुम्ही याच्याकड़े तुमच्या अब्रुवर घाला अश्या दृष्टीकोणातून बघू नका. तर तारुण्यसुलभ लैंगिक उर्मींचा विस्फोट किंवा मनुष्यात निसर्गत:च असणा-या लैंगिक आकर्षणाचा आविष्कार अश्या दृष्टीकोनातून बघा. काय लेको बुरसटलेले विचार तुमचे "
..
बघा ..वाचा ..विचार करा.

सत्य हे नेहमीच सापेक्ष असत.
शेवटी इतिहास इतिहास म्हणजे काय असतो.
जेते किंवा सत्ताधीश आपल्या सोईचा इतिहास लिहून घेतात.
' इतिहास हे स्वभावत: च एका बाजूला झुकलेल वृतांतकथन असत.'
किंवा
नेपोलियन म्हणतो त्याप्रमाणे ' इतिहास म्हणजे सर्वानुमते ठरवलेल्या दंतकथा.'
..
त्याला कितपत महत्व द्यायच आणि त्यावरून उठलेली जातीय वादळ शमवण्यासाठी प्रयत्न करायचा की चिथावनी द्यायची हे ज्याच त्यानं ठरवाव.

- सुहास भूसे.
 (9 मे 2015)