About

Friday 25 March 2016

तुकारामगाथेचे साहित्यिक पैलू

      संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आध्यात्मिक पैलूबद्दल पुष्कळ चर्चा होते. विद्रोही पैलू ही बऱ्यापैकी समोर आणण्यात यश आले आहे. तुकाराम गाथा आणि त्यातील अभंग यातून तुकाराम आजही समाजातील दंभावर आसुड ओढत असतात. लोकांना व्यवहार ज्ञान देत असतात. भक्तिरसाचे अमृत पाजत असतात. तुकारामांची गाथा ही या सर्व दृष्टीने तर महत्वाची आहेच.. पण ही गाथा  साहित्यिक दृष्टया देखील अनमोल आहे. 

      या गाथेत आध्यात्मिक आणि गृहस्थजीवनाविषयी व्यावहारिक उपदेश करणारे अभंग आहेत तसेच काही छोट्या लघुकथा आहेत. या मराठी भाषेतील पहिल्या लघुकथा असाव्यात. काही विनोदी अभंग तर असे आहेत की आपण हसून हसून लोटपोट व्हावे. मानवी भाव भावना आणि तत्कालीन समाजजीवन यांचे यथार्थ चित्रण त्यांच्या अभंगातून घडते. तुलनात्मक दृष्टया पाहिले तर इतर संतांच्या वांड्मयात इतके वैविध्यपूर्ण जीवनदर्शन येत नाही. ' नवरसी वर्षेन मी ' अशी प्रतिज्ञा करून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली असली तरी 'शृंगाराच्या माथा पाय ' ठेवणारा शांत रस हाच तिचा गाभा आहे.

     तुकारामांचे जीवन आणि चरित्र लक्षात घेतले तर त्यांच्या अभंगातील वैविध्याचा सुगावा लागतो. त्यांच्या अभंगात येणारे हुतुतु, हमामा, वीटी दांडू, चेंडू, पोहणे,सुर पारंबा, आट्यापाट्या अश्या अनेकविध खेळांचे संदर्भ तुकारामांचे बालपण अनुभवदृष्टया संपन्न असल्याचे सूचित करतात. पुढे  गृहस्थाश्रमात तुकाराम महाराज आपली पत्नी, मुले यांच्यावर प्रेम करणारा, त्यांची काळजी वाहणारा आणि प्रपंच करत परमार्थ करणारा कुटुंबप्रमुख आहेत. स्वत: गृहस्थाश्रमापासून पलायन करून लोकांना ' आधी प्रपंच करावा नेटका ' असा सल्ला त्यांनी दिलेला नाही. त्यांच्या शब्दा शब्दाला जीवनातील टोकदार अनुभवांची धार आहे.

     ' वृक्षवल्ली आम्हा सोयरे ' हा अभंग तुकारामांची गाढी जीवननिष्ठा आणि रसिक दृष्टी अधोरेखित करतो. ' ब्रह्म सत्य: जगत् मिथ्य: ' किंवा ' संसार हा भवसागर दुस्तर' असे वास्तव जीवनाकडे पाठ फिरवणारे सदारडु तत्वज्ञान त्यांनी कधीही मांडले नाही. उलट सगळी संत मंडळी मोक्ष, जीवन मृत्युच्या चक्रातुन मुक्ती हेच जीवनाचे अंतिम ध्येय मानत असताना तुकाराम मात्र ' तुका म्हणे गर्भवासी, सूखे घालावे आम्हासी ' अस मागणे मागत हा मनुष्यजन्म पुन्हा पुन्हा मागतात.  याच जीवनावरील प्रेमामुळे त्यांच्या गाथेत फक्त भक्तीरस नाही तर नवरसांचा खराखुरा वास्तवदर्शी वर्षाव आहे.

     'ढाल तलवारे गुंतले हे कर। म्हणे तो झुंजार झुंजु मी कैसा ।।' हा अभंग दर्जेदार विनोदाचे अप्रतिम उदाहरण आहे. दुसऱ्या एका अभंगात एक धनगर एका पुराणिक बुवांचे कीर्तन  ऐकायला जातो. त्याचा बोकड हरवला आहे.

देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी॥
प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥

लोकांना वाटते हा पुराणिक बुवांवरच्या श्रद्धेमुळे रडतो आहे. वास्तविक त्याला पुराणिक बुवाची दाढी पाहुन त्याच्या बोकडाची दाढी आठवत असते.

आवरितां नावरे । खुर आठवी नेवरे ॥
बोलों नयें मुखावाटां । म्हणे होतां ब्यांचा तोटा ॥

बोकडाच्या दाढी सोबतच त्याला त्याचे खुर आठवत असतात. हा त्याचा बियाण्याचा बोकड होता. त्याचे गुण आठवून त्याला हमसु हमसु कढ येत आहेत.

दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥
मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥

पुराणिकांनी माया आणि ब्रम्ह अशी दोन बोटे वर केली की धनगराला बोकडाची दोन शिंगे आठवतात, पुराणिक बुवा चार बोटे वर करतात आणि सांगतात वेद चार होते, धनगराला बोकडाचे  चार पाय आठवतात 'होय,होय'.. अशी मान हलवत तो पुन्हा हमसु हमसु रडु लागतो. लोक हे सर्व म्हणजे त्याची श्रद्धा आणि विद्वत्ता समजून चकित होतात.

होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥
तुका म्हणे कुडें । कळों येतें तें रोकडें ॥

शेवटी मात्र त्याचे बिंग फूटते आणि त्याच्या अंतरीचा भाव बाहेर येतो. लोकांना समजते तो का रडतोय.. अश्या आशयाचा दृष्टांत किस्सा सांगून तुकाराम महाराज शेवटी म्हणतात संसारी माणसाच्या पोटात काही लपत नाही. सगळे भाव बाहेर कळू येतात.

     आता तुकारामांनी आपल्या गाथेत लिहिलेली एक अप्रतिम अभंगरूपी लघुकथा पाहुया. लघुकथा हा तसा आधुनिक वाङ्मय प्रकार आहे. पण संत तुकारामांनी आपल्या गाथेत हा प्रकार साडेतीनशे वर्षांपूर्वी कमालीच्या यशस्वीपणे हाताळला आहे. ही मराठीतील पहिली लघुकथाच नाही नुसती तर इतक्या कमी शब्दात इतका भावभावनांचा कल्लोळ, प्रचंड नाट्य साकार करणे येरा गबाळयाचे काम नाही. त्यासाठी शब्दांवर मजबूत पकड आणि हुकूमत असणारा तुकारामांसारखा शब्दप्रभुच हवा.

सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे । प्रेम मिठी पडे वदनासी ॥

या पहिल्या ओळीत आपल्या आराध्याची आळवणी करतात तुकाराम आपल्या कथेला सुरवात करतात.

व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी । आला दुराचारी पारधी तो ॥

अल्पाक्षरित्व आणि वेगवान कथानक हा या कथेचा महत्वाचा विशेष आहे. हे दोन पक्षी आपल्या कथेचे नायक आणि नायिका आहेत.  तुकारामांनी 'व्याले' हा कमालीचा सूचक शब्द इथे वापरला आहे. या शब्दातुन काय कळत नाही ? त्या पक्षी द्वयांचे प्रेम, त्यांचा शृंगार, त्यांचे सहजीवन, त्यांचा तो इटुकला संसार हे सारे फक्त 'व्याले ' या एकाच शब्दातुन आपल्या डोळ्यापुढे सरकते. आणि हा दुराचारी पारधी आपल्या कथेचा खलनायक आहे. या सुखी चित्रात आता त्याचे आगमन झाले आहे.

वृक्षाचिया माथा सोडिला ससाना । धनुष्यासी बाणा लावियेले ॥

आणि या पारध्याने आता एक भयंकर जाळे विणले आहे. या पक्ष्यांची शिकार होण्यापासून आता देव ही वाचवणे कठीण आहे. पक्षी जर वर उडाले तर त्यांच्यावर झडप घालण्यासाठी त्याने आपला बहिरी ससाना वृक्षाच्या माथ्याकडे सोडला आहे. आणि जर पक्षी ससाण्याच्या भीतीने जागेवरच बसून राहिले तर त्यांच्यावर सोडण्यासाठी त्याचा बाण प्रत्यंचा ताणून तयार आहे. आता या भयंकर दुहेरी पेचातुन या पक्षयांची सुटका कशी होणार ? पाहता पाहता या कथेत एक थरारक नाट्य येऊन उभे ठाकले आहे.

तये काळी तुज पक्षी आठविती । धावे गा श्रीपती मायबापा ॥

कोणीही अश्या भीषण संकटात आपल्या आराध्य देवतेचे स्मरण करेल. सगळे मार्ग कुंठित झालेले पाहुन त्या भ्यालेल्या पक्ष्यांनीही सर्वशक्तिमान परमेश्वराचा, मायबाप श्रीपतीचा धावा केला आहे.

उडोनिया जाता ससाना मारील । बैसता विंधील पारधी तो ॥

आता परमेश्वर जरी सर्वशक्तिमान असला तरी पृथ्वीवर त्याच्या शक्तीला मर्यादा आहेत. या मर्त्य जगात इथले नियम पाळूनच काहीतरी तोडगा निघायला हवा. पण काय तोडगा असणार ? कसलाही चमत्कार न करता श्रीपतीला हे कार्य पार पाडायचे आहे. ससाणा आणि बाण असा हा दुहेरी पेचप्रसंग आहे.  हा कथेतील नाट्याचा सर्वोच्च बिंदु आहे.

ऐकोनिया धावा तया पक्षियांचा । धरिला सर्पाचा वेश वेगी ॥

पण श्रीपती ने या भयंकर पेचप्रसंगातुन एक बेमालूम मार्ग काढला आहे. आधी विचार केल्यास लक्षात येणार नाही पण हा अकल्पनीय शेवट वाचून वाटते की हेच... हेच घडायला हवे होते. याहुन दूसरा मार्ग असुच शकत नाही. पण तरी या ओळीत फक्त आशा पालवली आहे. पेचप्रसंग अजुन कायमच आहे. श्रीपतीने पक्ष्यांचा धावा ऐकून करकराल अश्या मृत्युदुताचा सर्पाचा वेश घेतला आहे. पण पुढे काय ? सर्पाचा वेश घेऊन काय करणार श्रीपती ?

डंखोनि पारधी भुमीसी पाडिला । बाण तो लागला ससान्यासी ॥

आणि कथेत शेवटी येतो हा अल्कपनिय ट्विस्ट, सगळ्या पेचाला जबरदस्त वळण मिळते. एका क्षणात सगळा जमुन आलेला डाव उधळला जातो. आपल्या कथांचा अकल्पनीय आणि धक्कादायक शेवट करण्यासाठी ओ हेंरी प्रसिद्ध आहे. पण त्याच्या शेकडो वर्षे आधीच्या काळातील तुकारामांच्या या लघुकथेचा हा विस्मयजनक आणि धक्कादायक शेवट वाचून ओ हेंरी ने आपली पाची बोटे तोंडात घातली असती थक्क होऊन !

ऐसा तू कृपाळु आपुलिया दासा । होसील कोंवसा संकटींचा ॥
तुका म्हणे तुझी कीर्ति त्रिभुवना । वेदाचिये वाणी वर्णवेना ॥

आणि शेवटच्या ओळित या कथेत पाहुणा कलाकार म्हणून येणाऱ्या पण कथेचा सगळा नूरच पालटून टाकणाऱ्या मॅन ऑफ द मॅच श्रीपतीची तुकाराम स्तुती करतात.

ही लघुकथा साहित्यिक मूल्य, अल्पाक्षरित्व, आशयघनता, नाट्य, थरारकता, रोमांच आदी विविधतेने नटलेली आहे. लघुकथेचा सर्वात जूना आणि सर्वात पहिला त्याच सोबत सर्वात दर्जेदार नमूना आहे.
तुकारामांच्या गाथेत साहित्यिक मुल्याने नटलेले असे अनेक अभंग सापडतील. यावरून लक्षात यावे की तुकाराम हे फक्त एक श्रेष्ठ संतच नव्हते, एक विद्रोही समाज सुधारक नव्हते तर विलक्षण प्रतिभा असणारे श्रेष्ठ दर्जाचे साहित्यिक देखील होते.

©सुहास भुसे.

या लेखाची मी मराठी या वृत्तपत्रातील लिंक - epaper.mimarathilive.com/story.aspx?id=2567&boxid=165837848&ed_date=2016-03-30&ed_code=820009&ed_page=8





4 comments:

  1. खूप छान...लेख संपूच नये असं वाटलं..������

    ReplyDelete
  2. राम कृष्ण हरी

    ReplyDelete
  3. Khup chan arth aahe srvch abhananche arth taka

    ReplyDelete
  4. तुकारामांचा अभंगाचे छान स्पष्टीकरण

    ReplyDelete