About

Sunday 29 November 2015

सत्तेचे डोळे आणि शेतकरी

आटपाट नगर होत. त्या नगराच्या बाहेर हिरवीगार बहरलेली शेते होती. शेतांमध्ये एक मोठी विहीर होती. त्या विहिरीत आजूबाजूच्या शेतकऱ्यांची गरिबांची मुले पोहोत होती. तिथे एक खाकी हाफचड्डी घातलेला मुलगा हातात कमळाचे फुल घेऊन उदास होऊन बसला होता. तो मुलगा आंधळा होता. त्याला मुलांचा कोलाहल ऐकू येत होता. त्यांचे खुशीत हसणे बोलणे ऐकू येत होते तसतसा तो अधिकच बापूडवाणा होत होता.

     वरून शंकर पार्वतीचे विमान चालले होते. पार्वतीने त्या मुलाकडे पाहिले. तिला खूप दया आली त्याची. तिने शंकराला विचारले
“अहो तो कमळ घेऊन बसलेला मुलगा इतका का उदास होऊन बसला आहे?”
शंकर म्हणाले,
“अग तो आंधळा आहे. त्याला बाकीच्या मुलांसारखे पोहता येत नाही म्हणून तो उदास बसला आहे.”
“मग तुम्ही त्याला डोळे द्या ना गडे.”
पार्वतीने शंकराकडे लाडिक हट्ट केला.
शंकर म्हणाले,
“अग बाई त्याला डोळे नाहीत तेच बरे आहे. जस ठेवलेय तस राहू दे.”
“ते काही नाही. त्याला डोळे द्या म्हणजे द्याच.”
शंकराने पार्वतीला परोपरीने सांगून पाहिले. पण ...बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्रीहट्ट. या तीन हट्टापुढे आजवर कोणाचे काय चालले आहे? अगदी देव झाला तरी नवराच तो. दिले शंकराने. त्या आंधळ्या पोराला डोळे दिले.

     काठावर उदास होऊन बसलेल्या त्या आंधळ्या मुलाला अचानक डोळे आले. तो पटकन उठला. इकडे तिकडे बघितले. आणि धाडकन विहिरीत उडी ठोकली. एक दोन मिनिटे नीट पोहोला. मग त्याने सुरु केले. याच्या अंगावर उडी ठोक. त्याच्या तोंडावर पाणी उडव. विहिरीत लाटा कर. शेतकऱ्यांची पोरे बोंबलू लागली. तसा याला अधिकच चेव आला. मग याने निराळाच कार्यक्रम सुरु केला. धर पोराची मुंडी कि बुडव पाण्यात. धर पोराचा पाय कि ओढ पाण्यात. पोरांच्या नाकातोंडात पाणी जाऊन ती गुदमरू लागली. बोंबलू लागली. विहिरीत एकच कोलाहल माजला.

     वर आपल्या विमानातून शंकर पार्वती ते पाहत होते. शंकर म्हणाले, “ बघ प्रिये, मी तुला सांगितले होते की त्याला आंधळा म्हणूनच ठेवला आहे. तेच योग्य आहे त्याला डोळे नकोच. आता काय म्हणणे आहे राणीसरकारांचे?”

      पार्वती सगळा प्रकार पाहून खजील झाली होती. ती म्हणाली,” ठीक आहे घ्या त्याचे डोळे काढून.”
इकडे त्या मुलाचे डोळे अचानक गेले. त्याला काही समजेना काय झाले. मग सावकाश तो काठावर आला. आपली हाफचड्डी घालून कमळाचे फुल हातात घेऊन परत उदास होऊन मुलांचा दंगा ऐकत काठावर बसला.

     साठा उत्तरीची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

तात्पर्य:- सत्ता आली म्हणून धर शेतकरी कि बुडव पाण्यात, धर शेतकरी की बुडव पाण्यात असा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. सत्तेचे डोळे आले म्हणून उतू नये मातु नये. डोळे जसे येऊ शकतात तसेच जाऊही शकतात.
जय भोले शंकर !!!


डिजिटल इंडियाच्या कथा

प्रसंग -१
विठोबा नाक्यावर देवबा ची वाट पाहत बसला होता. एक टेम्पो भुर्रकन समोरून निघून गेला. त्यातल्या गुरांकडे ओझरती नजर टाकत विठोबाने पानाची चंची काढली. त्याचा विडा लावून होईस्तो ५-६ असे टेम्पो भर्रकन पास झाले. तितक्यात देवबा आलाच.
“ये मर्दा घे पान” म्हणत विठोबाने चंची पुढे केली.
“मायला लइच घुरदुळ दिसतुया उद्या. आपल कस निभल र देवा?”
“मंजी कस म्हन्तूस?” देवबाने सुपारी कातरत विचारले.
“आर पानाला चुना लावास्तवर पाचसा व्हान गेली गुरे भरून इथन..उद्या कार्तिकी बाजारात चुथडा व्हणार बघ गुरांचा.”
देवबा मन लावून विडा बनवत होता तर विठोबा इकडे विचारात बुडाला. विठोबाची पंधरा एकर शेती आहे. २ गायी २ म्हशी १ करडू असा नांदता गोठा आहे. पण यंदा दुष्काळात गुरांना घालायला काडी मिळत नसल्याने त्याच्या हत्तीसारख्या गायी म्हशी उंदरासारख्या झाल्या आहेत. वैरणीअभावी त्याने आपली प्राणप्रिय गुरे विकून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपुरला उद्याचा कार्तिकी वारीचा मोठा गुरांचा बाजार असतो.
“मंग कस म्हन्तुस विठोबा.” पान तोंडात ठेवत देवबा ने विचारले.
“आर मागच्या साली माझी करडी गाय १ लाख ४० हजार मोजून आपण दोघांनीच आणली नव्हती व्ह्य. आर आता बाजार बगून तिला ३० हजार तरी येत्यात कि न्हाय अस कोड पडलय बघ.”
“आर गेल सालच गेल गेल सालीच विठोबा. आता कुत्रा खाईना गुरांना. जो तो विकत सुटलाय. घेणार कोण? पांढरा दिस उगवतोय. माणसाना काय खायला घालाव पंचत अन गायीची कुठ मया दावतू मर्दा.”
“मंग न्याची तर हायच र. माजा तर कुठ इलाज हाय. पण दीड लाखाचा माल ३० हजारात फुकून याचा म्हणून वाईट वाटतया र. बर उद्या सकाळी वारी हाय फाटे उरक लौकर. म्या हाळी देतोय.”
अस म्हणत पटकुर झटकत विठोबा जड अंतकरणाने तिथून उठला आणि गाईला शेवटचा घास द्यायला गोठयाकडे वळला.
प्रसंग - २
“अहो अनयचा परवा वाढदिवस आहे लक्षात आहे ना?”
पेपराततून बाहेर तोंड काढून लेलेंनी मान डोलावली.
“अर्थात”
“त्याला बर्थ डे गिफ्ट म्हणून मर्सिडीज बेंझ हवीय.”
लेलेंनी पेपर गुंडाळून खाली ठेवला.
“त्याला काय त्याचा बाप संस्थानिक असल्यासारखा वाटतो का? सांगा लेकाला म्हणावे खर्डेघाशी करणाऱ्या सरकारी नोकराचा पोरगा आहे तो राजकुमार नव्हे. मागच्या वाढदिवसाला फोर्ड एन्डेव्होर घेऊन दिली होती तिला काय झाले?”
लेले काकूनी एक लाडीक मुरका मारला.
“इश्श्य. संस्थानिक आणि तुमच्या रुबाबात कितीसा फरक आहे हो. आणि आता सातवा वेतन आयोग लागू होतोय. एकतर मुलगा आहे आपल्याला. त्याला नाही तर कोणासाठी करायचे?”
लेले स्तुतीने थोडेसे पाघळले.
“ठीक आहे करा मनासारखे. उद्या ३० लाख त्याच्या अकौंट ला ट्रान्सफर करतो. दोघे जाऊन घेऊन या.”
“अहो ३० नको ४० लाख ट्रान्सफर करा. उद्या बाहेर जातेयच तर हातासरशी त्या कपूर बाईसारखा डायमंड सेट घेऊन टाकते एक. केव्हाचा मनात भरलाय माझ्या.”
लेले काकुनी एक मागणी पुरे झालेली पाहून दुसऱ्या मागणीचे घोडे पुढे रेटले.
“हम्म..” असा दीर्घ सुस्कारा सोडून लेले सातव्या वेतन आयोगानुसार होणारी पगारवाढ आणी कुटुंबाच्या नव्या मागण्या याचे गणित कॉफीचे फुरके मारता मारता मनातल्या मनात जुळवू लागले.
Declaimer - वरील दोन्ही प्रसंग एकाच राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी घडत आहेत.
#डिजिटल_इंडियाच्या_कथा  

शनीदेव आणि बदलता सांस्कृतिक प्रवाह

      शनिदेव ही आपल्या तेहत्तीस कोटी देवांमधली सर्वाधिक दरारा असणारी देवता आहे. शनीची साडेसाती म्हटल की भल्याभल्यांचा थरकाप उडतो. शनीची वक्रदृष्टी ज्याच्यावर पडली त्याची खैर नसते. माणसे ती माणसे पण अगदी देवांची देखील या साडेसातीपासून सुटका नाही. त्यामुळेच सर्व देवदेवता देखील शनीमहाराजांना टरकून असल्याचे दिसते. ही वक्रदृष्टी आपल्यावर पडू नये म्हणून सर्वचजण काळजी घेतात. साडेसातीमध्ये शनीदेवांना खुश ठेऊन साडेसाती कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. विविध व्रते पूजा गंडे दोरे ताईत खडे अंगठ्या रत्ने तेल यांचा धंदा शनीदेवांमुळे तेजीत असतो. किंबहुना असे म्हणता येईल की धर्माचा ७५% धंदा याच शनीची साडेसाती या कल्पनेवर आधारित आहे. पण शनीदेवही असे वस्ताद असतात की यापैकी कशालाच ते दाद देत नाहीत. साडेसातीवाल्याला साडेसात वर्षे दे माय आणि धरणी ठाय करून सोडतात म्हणे. या साडेसात वर्षात त्याला खूप दुखांचा तर सामना करावा लागतोच शिवाय त्याला जे करेल त्या कामात अपयश येते. काही पापी नास्तिक लोक म्हणतात की समजूत म्हणजे आपल्या अपयशाचे खापर शनीदेवाच्या माथ्यावर फोडण्याची सोय आहे. म्हणोत बापडे. त्यांना समजेल साडेसातीमध्ये शनीदेवांचा इंगा. शनिदेवाच्या पुराणकथा देखील या भीतीला बळकटी मिळावी अश्याच शनीदेवांच्या क्रूरतेचे दर्शन घडवणाऱ्या आहेत. विशेषतः साडेसातीमध्ये या कथा वाचतांना तर भाविक भक्त अधिकच घाबरून जातात. व्रत नको पण कथा आवर अशी अवस्था होत असावी त्यांची.

शनीदेवाची मूर्ती देखील क्वचित कुठेतरी घडीव मानवी आकारातली असेल. नाहीतर सर्वत्र एक उंच दगड किंवा शिळा असते. ती शिळा देखील कोणत्यातरी कोपऱ्यात , रस्त्याच्या  कडेला किंवा नाक्यावर छोटेसे मंदिर असते त्यात. शनी शिंगणापूरसारखा विस्तृत चबुतरा एखाद्याच शनीशिळेच्या नशिबी. त्यांना न पूरण पोळीचा नैवेद्य असतो न कोंबडी बकऱ्याचा तिखट प्रसाद. शेंदूर तेल आणि रुईची माळ बस. कदाचित शनिदेवांच्या मागे देखील हीच साडेसाती लागली असावी.
अस असल तरी शनी हि फार प्राचीन लोकदेवता आहे बर का. भारतीय शनीदेवांचे हे भयंकरीकरण नक्की केव्हा झाले हे ज्ञात नसले तरी शनीदेव हे सर्वच काळ दुख आणि दैन्याची देवता नव्हती. जगातील विविध प्राचीन संस्कृतीत देखील शनीदेवांच्या पूजनाची परंपरा आहे. प्राचीन ग्रीक संस्कृतीत शनीदेव क्रोनस (Cronus) या नावाने ज्ञात आहेत. युरेनस (Uranus ) आणि गेया(Gaea ) यांचा मुलगा असलेला हा क्रोनस अर्थात शनिदेव पुढे देवांचा राजा बनतो. देवाधिदेव झ्यूस हा या क्रोनसचाच पुत्र. एकेकाळी ग्रीक संस्कृतीत पूजनीय असलेले शनिदेव व झ्यूस आदी देव आता मात्र ख्रिश्चन धर्माच्या प्रभावामुळे बाजूला पडले आहेत. प्रवाही लोकजीवनाचा प्राण असलेले देव देवता सध्या पुराणऐतिहासिक अभ्यासाचा विषय बनून राहिले आहेत.

ग्रीक देवता क्रोनस

हीच शनीदेवतेची कल्पना रोमनांमध्ये देखील प्रचलित होती. हा रोमन शनिदेव (Saturn) शेतीचा देव. त्याने मानवाला शेती शिकवली अस रोमन मानत. त्याची हातात खुरपे घेतलेली मूर्ती भव्य अश्या सुवर्णमंदिरात रोमन फोरमच्या मधोमघ विराजमान होती. शनिदेव हे समृद्धीचे, मुक्तीचे, साम्राज्याचे प्रतिक मानले जाई. तसेच तो काळाचा देखील स्वामी मानला जाई. रोमन साम्राज्यातील सर्व सोने नाणे आणि खजिना या मंदिराच्या तळघरात ठेवत असत. दर वर्षी डिसेंबर महिन्यात या शनीदेवाची मोठी यात्रा भरत असे. हा उत्सव सहा दिवस चालत असे. रोमनांचा हा सर्वात मोठा उत्सव होता. घरोघर जेवणावळी असत. सहा दिवस सर्वांना सुट्टी असे. सर्वजण एकमेकांना भेटवस्तू देत. एकंदरीत सगळी चैन असे. आता ते मंदीर भग्नावस्थेत आहे. त्याचे फक्त स्तंभ शिल्लक आहेत. आणि ही जत्रा आता ख्रिसमस म्हणून साजरी होते.

रोमन देवता Saturn

या शिवाय बाबिलोनिअन, सुमेरियन, मेसोपिटीयन व अनेक आदीवासी समुदाय-संस्कृतीमध्ये देखील सूर्यपुत्र शनीदेवता आढळते. अश्या प्रकारे आपल्या परंपरांचे धागे अनेक जागतिक संस्कृतीमध्ये अनेक संदर्भात गुंफलेले आढळतात. कालौघात संस्कृती बदलतात. धर्म बदलतात. भूपुष्ठरचना बदलते तत्द्वता देव आणि त्यांचे गुणअवगुण देखील बदलतात. कदाचित विधात्याचा अशाश्वततेचा नियम खुद्द देवांना देखील लागू असावा. बदल हा काळाचा आत्मा आहे या सुत्रातून देवतांची देखील सुटका नसावी.

      शनिवारी शनी शिंगणापूर येथे एका युवतीने शनीच्या चौथाऱ्यावर चढून शनीदेवाचे दर्शन घेऊन तेलही अर्पण केले. या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेचा निषेध म्हणून गावकऱ्यानी गावबंद आंदोलन पुकारले आहे. मंदिर व्यवस्थापनाने सहा सुरक्षा रक्षकांना निलंबित केले आहे. हा सर्व गरादोळ आजच्या प्रगत विज्ञान युगात व स्त्री पुरुष समानतेच्या युगात अतर्क्य व निषेधार्ह्य आहे. या शनीच्या सर्व निस्सीम पुरुषप्रधान संस्कृतीरक्षक भक्तांनी विज्ञानयुगातील स्त्री पुरुष समानता नजरेआड केली तरी जागतिक संस्कृतीच्या प्रवाहातील खुद्द शनीदेवांचे बदलते स्थान बदलते गुण अवगुण यांची पार्श्वभूमी ध्यानात घेऊन बदल हा जीवनाचा आत्मा असतो हे सूत्र मान्य करावे. आणि काळाबरोबर आपल्या अनिष्ट धार्मिक प्रथांना मुरड घालून प्राचीन हिंदू धर्माचे २१ व्या शतकात यशस्वी पदार्पण होण्यास हातभार लावावा. शनीदेव सर्वांना सद्बुद्धी देवो ही शनीचरणी प्रार्थना.

शनीच्या वैभवशाली सुवर्णमंदिराचे अवशेष: रोम 


Thursday 19 November 2015

रहे ना रहे हम : प्रियदर्शिनी इंदिरा

     आधुनिक भारताच्या इतिहासातील सर्वात वादळी व्यक्तिमत्व म्हणजे इंदिरा गांधी. अनेक भल्या बुऱ्या गोष्टींसाठी त्यांची कारकीर्द नेहमी वादळी म्हणून चर्चेत राहिली. भारतात सद्यस्थिती मध्ये अनेक प्रश्न समस्या आहेत. प्रत्येक राज्यकर्त्यापुढे त्या असतातच. देशहिताच्या निर्णयाआड येणारे अनेक दबावगट असतात. हा सर्व दबाव झुगारून देऊन प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचे दर्शन घडवत योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा राज्यकर्ता त्याचे आणि त्याच्या देशाचे नाव इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवतो. नेमक्या याच प्रकारच्या नेतृत्वाची इंदिरा गांधीनंतर भारतात सदैव उणीव भासली आहे. अनेक समस्यांवर बोलताना इंदिराजींचे विरोधक देखील खाजगीत का होईना म्हणतात कि आज इंदिराजी हव्या होत्या. यातच इंदिराजींच्या महत्तेची, एकमेवाद्वितीयतेची बीजे आहेत.

     इंदिराजींनी अनेक कठोर आणि कणखर निर्णय त्यांच्या कारकिर्दीत घेतले ज्यांची गोड फळे आज आपण चाखतो आहोत. यातला सर्वात मोठा प्रसंग बांगलादेशमुक्ती संग्राम अर्थात पाकिस्तानच्या विभाजनाचा. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने कुरापत काढत भारतावर हल्ला केला. पाकच्या हवाईदलाने आपल्या ११ हवाई तळांवर व रडार केंद्रांवर हल्ले चढवले. मग भारताने युद्ध घोषित करत १३ दिवसात मोठ मोठ्या वल्गना करणाऱ्या पाकिस्तानला बिनशर्त शरणागती पत्करण्यास भाग पाडून पाकचे विभाजन करत बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले. यावेळी प्रचंड आंतरराष्ट्रीय दबावाला झुगारून देत मोठ्या मुत्सद्देगिरीने इंदिराजींनी राजकीय आघाडीवरही बाजी मारली. अमेरिकेने इंदिराजीवर दबाव आणण्यासाठी सातवे आरमार बंगालच्या उपसागरात तैनात केले होते. पण त्यांना अखेर हात चोळत माघारी जावे लागले. एक सर के बदले हम दस सर लाएंगे वाल्यांसाठी हा प्रसंग दीपस्तंभ ठरू शकेल.

     अणुस्फोट परीक्षणाचा असाच महत्वाचा निर्णय. “आणि बुद्ध हसला” या सांकेतिक शब्दांनी प्रसिद्ध असलेला हे अणुस्फोट परीक्षण इंदिराजींच्या काळात करण्यात आले. बँकाच्या राष्ट्रीयीकरणाचा असाच एक कणखर निर्णय इंदिरांनी घेतला. ४० वर्षापूर्वी सर्व बँका या व्यापारी बँका होत्या. आजच्या प्रमाणे सामान्य माणसाला तेव्हा बँकेत प्रवेश नव्हता. बँकेत खाते उघडता येत नसे, पैसे ठेवता येत नसत अगर कर्ज मागता येत नसे. भांडवलशाही व्यवस्थेत गरीबाला केंद्रस्थानी आणत इंदिराजींनी १९६९ साली १४ व्यापारी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले. आज भारतीय राजकारणावर बड्या उद्योगपती व पैसेवाल्या धेंडांची असलेली मजबूत पकड पाहता हा निर्णय घेताना इंदिराजींना किती प्रचंड दबावाचा सामना करावा लागला असेल याची कल्पना येते.

     हरितक्रांतीच्या जननी देखील इंदिराजीच. तत्पूर्वी परदेशातून धान्याची आयात झाल्यावरच रेशनवर गरिबांना धान्य मिळत असे. पण पाणी, संकरित बियाणे, रासायनिक खते आणि हमी भावाने धान्य खरेदी या चतुसूत्री हरितक्रांतीची इंदिराजींनी घोषणा केली जणू जादूची कांडी फिरली. पंजाब हरियाना मध्ये गव्हाची विक्रमी उत्पादने निघाली. भारतातील धान्याची कोठारे ओसंडून वाहू लागली आणि सन १९७४ नंतर भारताने अन्नधान्याची आयात पूर्णपणे बंद केली ते आजतागायत. आज धान्य निर्यात करणाऱ्या २० प्रमुख देशातला भारत एक देश आहे.

     आणि एक कठोर निर्णय जो त्यांच्या प्राणाचे बलिदान घेऊन गेला. तो म्हणजे भिंद्रानवाले या खलीस्तानवादी अतिरेक्याला सुवर्णमंदिरात कंठस्नान घालण्यासाठी केलेले ऑपरेशन ब्लू स्टार. विमान अपहरण प्रसंगी अतिरेक्यांपुढे गुढघे टेकत, त्यांच्या मागण्या मान्य करत आपल्या राज्यकर्त्यांनी घातकी अतिरेक्यांना कसे सोडले ते जगाने पाहिले. अश्या पार्श्वभूमीवर इंदिराजींच्या निर्णयाचे वेगळेपण ध्यानात यावे. पाकिस्तानच्या मदतीने स्वतंत्र खलिस्तान या राष्ट्राची घोषणा करत मोठ्या शस्त्रसाठ्यासह भिंद्रानवाले सुवर्णमंदिरात लपून बसला होता. सुवर्णमंदिरातच या राष्ट्राचा ध्वज फडकवून उदघोषणा करण्याचा त्याचा बेत समजताच इंदिराजींनी लष्करी कारवाईचा निर्णय घेतला जो त्यांच्या प्राणावर बेतला. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी या कारवाईचा बदला म्हणून इंदिराजींच्या शीख अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळ्यांचा पाऊस पाडला आणि या तेजस्वी पर्वाची अखेर झाली.

     आज १९ नोव्हेंबर. या भारतमातेच्या कणखर, थोर सुपुत्रीची जयंती. या तेजस्वी विद्द्युल्लतेला विन्रम अभिवादन _/\_ .

©सुहास भुसे.


Wednesday 18 November 2015

माझे पुस्तक जीवन

     एका छोट्या गावात बालपण गेल्याने पुस्तकांच्या बाबतीत उपासमार व्हायची. म्हणजे तस बरचस मिळायचं वाचायला. पण माझी भूकच अफाट असायची. पाहुण्यारावळ्याकडे गेलो कि पहिले पुस्तके धुंडाळायचो. दिसल पुस्तक कि घाल झडप कि पाड फडशा असा एककलमी कार्यक्रम असायचा. वडील, आजोबा, काकामंडळी देखील वाचनप्रिय होती. त्यांच्या खोल्या, कपाटे धुंडाळून जुनी अडगळीत पडलेली पुस्तके शोधून वाचत बसणे चालायचे. चांदोबा, चंपक आणि कॉमिक्सचा खूप मोठा संग्रह, खूप लहान असताना असल्याचे आठवते. चांदोबातली सुंदर चित्रे बघत फैंटसी कल्पनात तासन तास रमून जाणे हा आवडता छंद होता.

     अकरावीला कॉलेजला सोलापूरला गेल्यानंतर पहिल्यांदा युद्धपातळीवर वाचनालये धुंडाळली. नेहरू होस्टेलपासून जवळच हिरांचद नेमचंद जिल्हा मध्यवर्ती वाचनालयाचा माग लागला. रूमवर गेल्यावर तिसऱ्याच दिवशी तिथे नाव नोंदवले. तीनमजली भव्य वाचनालयातली मोठाल्या हॉलमध्ये हारीने लावून ठेवलेल्या कपाटातील ओसंडून वाहणारा पुस्तकांचा खजिना पाहून अलिबाबाची गुहा सापडल्याचा आनंद झाला. चारआठ दिवसांचा उपाशी माणूस समोर पंचपक्वान्नांच ताट शिगोशीग भरून ठेवल्यावर काय करेल ?

     तर तिथे सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ६ ते ८ ही पुस्तके बदलण्याची वेळ असायची. आणि कॉलेज ७.३० ला असायचं. मी दोन तीन आठवडे पहिला तास बंक मारायचो. पुस्तक घेऊन ८.१५ पर्यंत कॉलेजवर जायचो. मग अधाश्यासारखा त्या पुस्तकाचा फन्ना उडवायचो. तेही संध्याकाळी ७ च्या आत. मग ७ वाजता ते पुस्तक बदलून दुसरे पुस्तक आणायचो. तास सुरु असताना मागे बसून वाचन साधना सुरु असायची. डबा खाताना देखील वाचायचो. जे जे काम करताना पुस्तक वाचणे शक्य असेल ते काम पुस्तक वाचतच करायचो. मला आठवते हिराचंद नेमचंद वाचनालयात एक चष्मीश ग्रंथपाल बाई होती. तिने सकाळी एक आणि संध्याकाळी एक पुस्तक नेणाऱ्या या एलियनकडे चार पाच दिवस दुर्लक्ष केले. पण एके दिवशी सकाळी आदल्या सायंकाळी नेलेली स्वामी कादंबरी मी परत करताना पाहून मात्र तिचा धीर सुटला. “ अरे सुहास, तू पुस्तकांचे नेमके करतोस काय? मी रोज बघतेय तू सकाळी एक संध्याकाळी एक पुस्तक नेतोस. आणि आज तर कहर केलास. स्वामी संपूर्ण वाचलीस एका रात्रीत अस मात्र सांगू नकोस आता” मी त्यांना भीत भीत खरेच सांगितले पण त्यांचा काही विश्वास बसला नाही. मग मात्र थोडेसे लाजून मी फक्त सकाळी आणि एक दोन आठवड्याने एक दिवस गॅप मारून पुस्तके आणायला सुरु केले.



     रद्दीच्या दुकानातून पुस्तके शोधणे हा एक असाच आवडता छंद होता. पुस्तकांचे तर भयंकर वेड. पण किंमती आवाक्याबाहेरच्या. मिळणाऱ्या पॉकेटमनीचा निम्मा धूर विकेंड पार्टीत आणि उरलेला धूर कल्पना टॉकिजवरच व्हायचा. हुतात्मा स्मृती मंदिराच्या गाळ्यात एक आणि मॅकेनिक चौकात एक या दोन रद्दीच्या दुकानातून आणि सोलापूरच्या धी वर्ल्ड फेमस मंगळवार जुन्या बाजारातून मी खूप पुस्तके मिळवली. पुस्तके मासिके आणि दिवाळी अंक. रद्दीवाला पुस्तकाच्या वजनावरुन किंमत करायचा. मी सुहास शिरवळकरांचे लटकंती ५ रुपयात, ना स इनामदारांचे शहेनशहा १० रुपयात तर रणजीत देसाईंचे माझा गाव ७ रुपयात  विकत घेतल्याचे आठवते. अनेक दुर्मिळ पुस्तके मला या शोधातून गवसली तेव्हा. आज मी हवी ती पुस्तके घेऊ शकतो, घेतो पण तेव्हा या रद्दीच्या कोळश्यातुन अचानक हातात एखादा पुस्तकरूपी हिरा यायचा तेव्हा होणारा निर्भेळ आनंद आज नाही.

     आज इतक्या वर्षांनी देखील हे पुस्तकवेड तसूभर देखील कमी झालेले नाही. अजून माझी पुस्तक वाचनाची बैठक तशीच मजबूत आहे. मी आठ आठ तास सलग जागेवरून न उठता आजही पुस्तक वाचू शकतो. आणि आता अजून एक जंगल इंटरनेट नावाच माझ्या या शोधासाठी खुले झाले आहे. माझ्या भ्रमणध्वनीमध्ये सर्वाधिक जागा फक्त पुस्तकांनी अडवली आहे.
©सुहास भुसे.


Sunday 15 November 2015

सत्याचे प्रयोग

आज पुन्हा एकदा महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग वाचायला घेतले आहे. तस अगदी पहिल्यांदा वाचून खुप दिवस झाले. अधुन मधून नेहमी वाचत असतोच ...आणि एका वाचनात समजणेही कठीण आहे. दरवेळी वाचत जाऊ तस नव काही गवसत राहत.
     तस या पुस्तकात अंलकारीक भाषा, प्रसंग खुलवुन सांगणे आदी कोणतीही साहित्यिक मूल्ये नसूनही पुस्तक खिळवुन ठेवते. एकमेव कारण म्हणजे शब्दा शब्दा मागील प्रामाणिकपणा जो थेट ह्र्दयाला जाऊन भिडतो...माझ आयुष्य म्हणजे उघड पुस्तक अस म्हणायला ठीक आहे फक्त ...पण इतक्या प्रामाणिकपणे ते सार्वजनिकरित्या खुले करण्यासाठी परकोटिचे धैर्य पाहिजे.
     गांधीजी मित्रांच्या संगतीने तीनवेळा वेश्यागमन करण्यासाठी गेले ...तिथे काय झाले ते सांगणे 'दोन्ही परिस्थितीत' कठिण आहे. असे अनेक कठीण प्रसंग बिनदिक्कत आणि कमालीच्या प्रामाणिकपणे गांधीजी पानापानातुन उलगडत राहतात. अगदी पहिल्याच पानावर ते आपल्या वडिलांचे वर्णन पुढीलप्रकारे करतात..
  "वडील कुटूंबप्रेमी, सत्यप्रिय, धीट, उदार पण रागीट असे होते. काहीअंशी विषयासक्तही असावेत. त्यांचा शेवटचा विवाह चाळिसाव्या वर्षानंतर झाला होता."
     मला विशेष आवडतो तो गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील आंदोलनाचा भाग ..सुपिक मशागत केलेल्या जमिनीत कोणीही पिक काढेल ...पण खडकाळ ..पडिक ..नापिक जमीन कसुन त्यात पिक काढायला हाडाचा शेतकरीच हवा. ज्या लोकांना आपल्यावर अन्याय होतोय याची जाणीव नव्हती ..दोघे चौघे एकत्र येवून काही सार्वजनिक काम करायचे असते याची जाणीव नव्हती त्यांना एकजुट आणि जागृत करुन मोठी चळवळ उभी करणे किती कठिण काम असेल ?
     नवीन पिढीचा गांधींवर टीका करणे हा आपण हिंदुत्ववादी, क्रांतिकारी वगैरे असल्याचे भासवण्याचा इंडिकेटर बनला आहे. पैकी क्वचितच कोणी गांधीजींएवढा सर्व धर्मांचा अभ्यास केला असेल. ही गांधीविरोधी मते एका अपरिपक्व वयात विशिष्ट प्रचारकी साहित्यामुळे बनतात. आणि जस जस आपण गांधी वाचत जातो आणि परिपक्व होत जातो (कदाचित दोन्ही एकच ) तस तस गांधीद्वेषी लोकांचा ढोंगीपणा, खोटेपणा समजत जातो.
     कदाचित बहुसंख्य लोकांच्या जीवनात हे संक्रमण येत असावे. मी ही एकेकाळी या विचारांच्या प्रभावाखाली होतो. आणि सांगायला खेद वाटतो की गांधीजींना शिव्या घालायचो अगदी.
     जो सत्याचे प्रयोग अथवा इतर गांधी वाचेल आणि जो स्वत:शी प्रामाणिक आहे तो गांधीवादी झाल्याशिवाय राहणार नाही. किमान तो गांधीविरोधी तरी खचितच राहणार नाही हे मात्र निर्विवाद सत्य आहे.
©सुहास भुसे


Thursday 12 November 2015

बळीचे राज्य येवो

शेतकऱ्याचा बलवान, शीलवान आणि लोककल्याणकारी राजा बळी आणि भिक्षुक बटू वामन यांची मिथककथा ही मिथककथा नसून मिथ्या, संदर्भहीन, अतार्किक व प्रक्षेपित कथा असली तरी आधुनिक काळात मात्र ती चपलख लागू होते.

     शेतकऱ्याला बळीराजा म्हणून संबोधले जाते तेव्हा त्या प्राचीन, महान राजाच्या तेजस्वी परंपरेशी त्याचे नाते जोडले जाते. ‘बळीराजा’ ही त्याची आदर, सन्मान आणि अभिमानाची बिरुदावली आहे. पण आज मात्र या बळीराजाची आधुनिक वामन अवहेलना करत आहेत. त्याची कुचेष्टा, अपमान करण्याचा वामनांचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे.

     शेती आणि शेतकऱ्याकडे पाहण्याचा हा बदललेला दृष्टीकोन सर्वाधिक चिंतेची बाब आहे. शेतीसाठी इतर उद्योगांप्रमाणे सुविधा भांडवल व संरक्षण न पुरवणे, दूरगामी उपाययोजनांची बोंब,  मार्केटिंग मध्ये होणारी त्याची लुट या गोष्टींमुळे संपन्न आणि समृद्ध बळीराजा नागवला जात आहे. याची चिंता तर करायला हवीच पण जे वामन त्याच्या टाळूवरचे लोणी लुटून ओरबाडून खातात तेच त्याला भिकारी समजत आहेत. या आधुनिक वामनांचे प्रबोधन करण्याचे काम ज्याला शेतीतले किमान ज्ञान आहे किंवा ज्याच्या किमान मागच्या पिढीने शेती केली आहे अश्या प्रत्येकाने आवर्जून आणि प्राधान्याने हाती घ्यायला हवे.

-बळीराजाला एक सत्ताधारी आधुनिक वामन भिकारी, फुकटे म्हणतो.
-एक वामन त्याचा आक्रोश म्हणजे बळीराजाची बोगस बोंब आहे म्हणतो.
-एक वामन बळीराजा लफडेबाज रंडीबाज असतो म्हणतो.
-एक वामन बळीराजा भेकड, नपुंसक असतो म्हणून आत्महत्या करतो म्हणतो.
-एक वामन बळीराजा कर्जबाजारीपणामुळे नव्हे तर प्रेमप्रकरनांमुळे आत्महत्या करतो म्हणतो.

     रोज बरोज अशी विधाने ओकून या वामनांच्या झुंडीने बळीराजाच्या जगण्याचा तर जगण्याचा पण त्याच्या मरण्याचा देखील विनोद बनवून ठेवला आहे. या वामनांचे प्रबोधन व्हायला हवे. शेती काय चीज आहे हे त्यांना AC मधून बाहेर खेचून रानात उन्हांतान्हात नांगर चालवायला लावून समजून द्यायला हवे. किती अपार कष्टांच्या मोबदल्यात ही काळी आई बळीराजाच्या पदरात मोत्याचे दान टाकते आणि ते मोती हे वामन कसे फुकापासरी लुबाडतात याची जाणीव करून द्यायला हवी. या देशात श्रमप्रतिष्ठेची बूज राखली गेली नाही तर हे आधुनिक वामन या बळीराजाला खरोखर पाताळात गाडल्याशिवाय राहणार नाहीत.

     आजच्या बळीप्रतिपदेच्या दिवशी या विश्वनियंत्याच्या चरणी हजारो वर्षापासून मागितले जाणारे मागणे मागण्याची इतकी गरज आहे जितकी या आधी कधीही नव्हती.

“इडा पीडा टळो...बळीचे राज्य येवो.”

©सुहास भुसे.


Monday 9 November 2015

भक्तांचे संवर्धन आणि संगोपन

     पृथ्वीवर एकेकाळी डायनोसॉरच राज्य होत. पण आज त्याचं नामोनिशाण मिटल आहे. त्याप्रमाणेच इकडे फेसबुकावर एकेकाळी यत्र तत्र सर्वत्र भक्तांचा सूळसुळाट होता. हिवाळ्यात कोकणातील घरात ढेकुण माजतात तसे सोशल साईट्स वर भक्त माजले होते. आणि आता बघा भक्त असे गायब झालेत जसे मोतीचूर के लड्डू से मोती. डायनासॉर प्रमाणे भक्तही लुप्त होऊ नयेत म्हणून सर्वांनी भक्तांचे फायदे व त्यांच्या संवर्धनाचे उपाय याकडे विशेष लक्ष पुरवावे.

     *भक्त प्रजातीचे फायदे.

1. भक्त विविध कलात्मक फोटोशॉप फोटो खरेच म्हणून टाकून आपले मन रिझवतात.
2. वेगवेगळ्या समस्यांवर ते भक्त लॉजिक म्हणून प्रसिद्ध असलेले अचाट तार्किक स्प्ष्टीकरण देतात.
3. विविध खोट्या आकडेवाऱ्या टाकून त्या खोट्या असल्याचे सिद्ध करण्यासाठी आपल्या बुद्धीला चालना देतात.
4. कोणत्याही गोष्टीचा कुठेही बादरायण सबंध जोडून ते आपल्याला मनमुराद हसवतात.
5. मोदी विकास का करत नाहीयेत याची ते हजारो कारणे देतात जी राजकारणी लोकांच्या पुढील हजार पिढ्यांना मार्गदर्शक ठरू शकतात.
6. ते पक्षाचे पेड कार्यकर्ते असल्यासारखे २४ तास कार्यरत राहून फेसबुक सतत हलत ठेवतात.
7. इतिहासाची मोडतोड करून ते इतिहास संशोधकांना सतत काम पुरवतात.

     अश्या प्रकारे फेसबुकवर आपले हमखास मनोरंजन करून आपल्या नेटपॅक चे पैसे वसूल करून देण्यास भक्त बांधील असतात. अश्या बहुगुणी, बहुउपयोगी भक्तांचे संवर्धन व संगोपन विशेष काळजीने व्हायला हवे. लक्षात ठेवा भक्त हे फेसबुकची रौनत आहेत. फेसबुकची जान आहेत.

     *भक्तांचे संवर्धन व संगोपन.

1. तुमच्या पोस्टवर भक्त आला कि लगेच 'युरेका युरेका' म्हणत त्याच्यावर तुटून पडू नये. संयम ठेवून त्याचे म्हणणे ऐकून घ्यावे.
2. सर्वांनी भक्तांच्या कमेंटला व पोस्टला सक्तीने व आठवणीने लाईक करावे.
3. अधून मधून चर्चेतील एक दोघांनी हर हर मोदी ..जय गोमाता अश्या घोषणा द्याव्यात. याने भक्त संतुष्ट होतील.
4. एक भक्त एक विरोधक अशी चर्चा व्हावी.(धर्मयुद्ध-नियम क्र. १४७) एकेका भक्तावर ५० -५० जणांनी चढू नये.
5. भक्तांची टर उडवणाऱ्या दर १० कमेंट नंतर एक मोदींचा फोटो टाकावा. ज्याकडे पाहून भक्तांना आपले इमोशनल अत्याचार सहन करण्याचे बळ मिळत राहील.
6. आठवड्यातून एक दिवस सर्वांनी भक्त उपवास धरावा. सर्वानुमते एक वार निवडावा. या दिवशी कोणीही भक्तांची टवाळी करू नये. त्यांच्या हो त हो मिसळावी.
7. सर्वात महत्वाची आणि परिणामकारक सूचना म्हणजे फेसबुक हे भक्तांचे अभयारण्य घोषित करण्यासाठी सर्वांनी झुक्याला मेल पाठवून दबाव आणावा. त्यासाठी हव तर मिसकाल मोहीम उघडावी. व भक्तांच्या निर्घृण शिकारीवर बंदी आणावी.

     तर लक्षात ठेवा. इथून पुढे जसजसे भाजपाचे पराभव होत जातील तस तसे भित्र्या सशासारखे जीव मुठीत धरून भक्त फेसबुकवर येत राहतील. आपण त्यांची वेदना समजून घेऊन त्यांना धीर देणे गरजेचे आहे. आहेत ते भक्त अजून चार वर्षे पुरवून वापरायचे आहेत याचे भान ठेवा.

     भक्तांच्या बाबतीत "पुरवून खा" हे आपले ब्रीद बनवा.

हर हर मोदी !! जय गौमाता !! हेल मिशाळु काका !! हेल स्पॉट नाना !!


Saturday 7 November 2015

सापनीती कथा

    एक घनदाट जंगल होत. जंगलात एक मांजर आणि एक लांडगा राहायचा. दोघांची खुप दोस्ती होती. जंगलातल्या इलेक्शन मध्ये दोघांनी आपल्या दोस्तीची ग्वाही देऊन इलेक्शन जिंकल. पण सत्ता येताच दोघेही सत्तोपभोगात मश्गुल झाले.

     मांजर जंगलात सतत फिरत असायच. आपल्या तीक्ष्ण नाकाच्या जोरावर जंगलात कोणत्या प्राण्याने कुठे शिकार केली आहे हे ते अचूक ओळखून काढायच. मग लांडग्याला घेऊन ते तिथे पोहोचायच. आणि मग आपल्या सत्तेचा धाक घालून ते त्या शिकारीतले आपले ' टक्के ' मजबूत वसूल करत. त्यांच्या या टक्केखोरीला सगळे प्राणी वैतागले होते.

     होता होता जंगलात पुन्हा इलेक्शन लागल. रिंगणात एक बैल आणि हत्तीही होता. नाराज प्राणी बैल आणि हत्तीच्या गोटात घुसु नयेत म्हणून मांजर आणि लांडग्याने आपला थिंक टैंक बगळ्याला एक सर्वे करायला लावला. जंगलात कोल्ह्यांची संख्या खुप मोठी होती. हा वर्ग या जोडीवर नाराज होता. पैकी काहीँचे मत होते की लांडगा उगीच मांजराच्या नादी लागलाय तर काहींच मत होत की मांजर लाचार होऊन लांडग्याच्या मागे फिरतय.

    बगळ्याने ही बातमी देताच मांजर आणि लांडग्याने खोटे खोटे वैर करायचे ठरवले.

     झाले मग प्लॅनबरहुकुम दोघांची एका शिकारीतल्या टक्केवारीवरुन घमासान भांडणे झाली. मग दोघांनी एकमेकांच्या उखाळया पाखाळया काढल्या. दुगाण्या झाडल्या...गुरगुरले ..बोचकारले. मांजराने लांडग्याची लबाडी काढली तर लांडग्याने मांजराचे दात मोजले. एवढे धूर्त कोल्हे पण त्यांच्या डावाला फसले. पुन्हा दोघांना भरपूर जागा मिळाल्या...

     निकालाच्या संध्याकाळीच एका कोल्ह्याने एक ससा मारला. 5 मिनिटांत मांजर आणि लांडगा आपले टक्के वसूल करण्यासाठी तिथे गळ्यात गळे घालून हजर झाल्याचे बघुन जंगल चाट पडले..बूचकळयात पडले. दुःखात बुडाले ..इकडे मांजर आणि लांडगा 50 % सश्याचा चट्टामट्टा करत मिशीवर ताव मारत बसले..
©सुहास भुसे


Monday 2 November 2015

किस्से ग्रामपंचायत निवडणुकीचे

 
     आज अनेक कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी खूप दिवसांनी शाकाहारी जेवण घेतले. अनेकजणांना जेवण बेचव लागल्याने तापातून उठल्यासारखा फील येत होता असे समजते. १५ -२० दिवसांपासून गावोगाव मटनावळी सुरु होत्या. त्यामुळे आबू गबू कार्यकर्त्यांची चंगळ होती. एका उमेदवाराचे बोकड खाऊन ढेकर दुसऱ्या उमेदवाराच्या गोटात जाऊन देणारेही अनेक महाभाग होते. हरेक गावात रोज चार चार ठिकाणी बोकडे पडत होती. कोंबड्यांची तर बेसुमार कत्तल झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोंबड्या व बोकड यांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने जागतिक पर्यावरण विभागाने चिंता व्यक्त केली आहे असे समजते. आज मात्र फुकटची ढोसायला न मिळाल्याने तोंडे लटकववून पण पूर्ण शुद्धीत आपापल्या घरी बसून असलेल्या नवऱ्याची सुवासिनींनी पंचारती घेऊन पूजा केल्याच्या बातम्या आहेत.

     अनेक ढाबेवाले देखील आज गल्ल्यावर न बसता घरीच विश्रांती घेत आहेत. घरातील सर्वांना एकत्र बसवून मागील अनेक दिवसात वेळ न मिळाल्याने मोजायचा गल्ला पोत्याने मध्ये ओतून घरातील सर्वजण बाजूला बसून नोटा जुळवत होते. अनेकांनी या कामासाठी तात्पुरते अकाउंटंट नेमल्याचे समजते. तसेच विविध गुंतवणूक योजना घेऊन  विमा एजंट, पतसंस्था प्रतिनिधी व बँक प्रतिनिधी यांचा ढाबेवाल्यांच्या घरी राबता दिसून आला.

     अनेक कार्यकर्त्यांच्या बुडाला वडाप व एस टी बस शिवाय दुसऱ्या सीट चा स्पर्श झालेला नसताना मागील अनेक दिवसात मात्र आलिशान एसी तवेरा मधून फिरण्याची सवय लागल्याने आज पुन्हा आपल्या सायकली व मोटारसायकलींच्या सीटावर टेकताना अनेकांची बुडे कुरकुरत होती. अनेकांच्या बुडाला आगी लागल्याचे वृत्त आहे.

     मागील काही दिवसांत रोज मटन चिकन दाबून हानल्याने अनेकांना आज मळमळ वांत्या व जुलाब त्यांच्या तक्रारी सुरु झाल्या. मदिरेच्या भयंकर माऱ्यामुळे अनेकांना मुत्रपिंडाच्या किरकोळ तक्रारी उद्भवल्या. डॉक्टर वर्गात मात्र पेशंटच्या रांगा पाहून समाधानाचे वातावरण आहे.

     इतके दिवस पोरगा गावात मोकाट चकाट्या पिटत फिरतो म्हणून बोंबा मारणाऱ्या मातापित्यांनी आज मात्र आपापल्या दिवट्याची आलाबला घेऊन दृष्ट काढल्याचे समजते. कारण कधी नव्हे ते पोरग रोज घरात नोटांची बंडले आणून फेकत होत. अनेकांनी नवीन फक्कड बुलेटच्या ऑर्डरी बुकिंग केल्याचे कळते. अनेक गावात मताला ५ हजार असा रेट पडला होता. त्यामुळे अनेक उमेदवारांनी ज्यांच्या घरात ६ - ७ मते आहेत त्यांना स्वत: च कोऱ्या करकरीत मोटारसायकली घेऊन दिल्या. त्यामुळे मतदार राजांची दिवाळी यंदा आनंदात जाणार आहे.

     यमनाबाईचे खाऊन गंगुबाईचे गाऊन शांताबाईसंगे जाणारे अनेक कुटनीतीज्ञ काल मतदानादिवशी उघडे पडले. अश्या लोकांना आज उमेदवार शोधत होते. पण या चाणाक्ष लोकांनी यशस्वी दडी मारून ८-१० दिवस गाव वर्ज्य केल्याचे समजते.

 ©सुहास भुसे