About

Saturday 29 September 2012

कर्मकांडाचा अतिरेक - १


हिंदू धर्माचा उगम हा अज्ञात आहे . मुळात ही एक सांस्कृतिक विचारधारा असल्याने त्याची अधिकृत अशी स्थापना कधी झालेलीच नाही.( संदर्भ- हिंदू धर्म एक सांस्कृतिक विचारधारा ) म्हणूनच त्याचा उगम अज्ञात आहे . त्याचा कोणी कर्ता नाही. तसेच हिंदू धर्मावर प्राचीन काळापासून अनेक आक्रमणे होत राहिली आहेत. त्या सर्व संकटांना तोंड देत हिंदू धर्म आजही खंबीरपणे उभा आहे. या दृष्टीने पाहीले असता हिंदू धर्माचे अनादी अनंत स्वरूप आपल्या लक्षात येते.

अतिप्राचीन काळात या धर्माचे स्वरूप अतिशय तरल आणि पारदर्शी असल्याचे आपल्या अनेक संदर्भांवरून लक्षात येते. सर्व विचारधारांना सामावून घेत आणि सामान्य माणसाचा विचार करून हा धर्म आपला मार्ग अनुसरत होता. त्यामुळे कोणासही तो सहज अनुसरता येत होता. वर्ण व्यवस्था देखील लवचिक होती. कालांतराने कर्मठ लोकांनी हाती असलेल्या सत्तेचा दुरुपयोग करत या विशुद्ध धर्माचे स्वरूप पार बदलून टाकले . उत्तर वैदिक काळात वर्णश्रेष्ठत्व ,यज्ञयाग ,कर्मकांडे यांचे प्रचंड स्तोम माजवले गेले. हिंदू धर्मातील अनेक मूळ कल्पना आणि संकेत स्वत:च्या स्वार्थासाठी समाजातील उच्च म्हणवल्या जाणा-या (अर्थातच स्वयंघोषित ) वर्गाने पार बदलून टाकले. अनेक गोष्टी स्वत:ला हव्या तशा वळत्या करून घेण्यात आल्या.


उदाहरण म्हणून एक प्रातिनिधिक गोष्ट सांगेन या संदर्भातील. यज्ञ या शब्दाची फोड ' यत् + ज्ञ ' अशी आहे . याचा अर्थ ' ज्यातून ज्ञान येते तो यज्ञ ' . प्राचीन काळात आपली संस्कृती अतिशय प्रगत असल्याचे अनेक पुरावे जगापुढे येत आहेत . त्याविषयी विस्तारपूर्वक पुन्हा केव्हातरी नक्की लिहीन. सर्वच शास्त्रात अनेक हिंदू विद्वान मंडळी पारंगत होती . खगोल ,तर्क ,तत्वज्ञान ,अध्यात्म ,वास्तुशास्त्र , तंत्रज्ञान अश्या सर्वच क्षेत्रात ही संस्कृती अतिशय प्रगत असल्याचे ढीगभर पुरावे आता जगासमोर येत आहेत . आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत आपण जर प्रयोग या शब्दाची व्याख्या केली तर ज्यातून ज्ञान येते किंवा ज्ञान मिळवण्यासाठी जो केला जातो तो प्रयोग ही व्याख्या आपल्या यज्ञ या शब्दाच्या अर्थाशी चपलख जुळते. यज्ञ म्हणजे प्राचीन काळातील शास्त्रज्ञांनी केलेले प्रयोग होत असे अनेक तत्ज्ञांचे मत आहे . परंतु उत्तर वैदिक काळात या शब्दाला निराळाच अर्थ चिकटवला गेला . आणि प्रयोग म्हणून केला जाणारा यज्ञ फक्त एक निरर्थक होम बनून राहिला.यज्ञाच्या नावाखाली उत्तरकाळात चालू झालेल्या प्रकाराला यज्ञ कोणत्या अर्थाने म्हटले जात होते ?त्या निव्वळ कर्मकांडाला दुसरा एखादा अर्थपूर्ण आणि सुसंगत शब्द न सुचण्याइतपत तात्कालिक भाषापंडितांचे शब्ददारिद्र्य होते हा मुद्दा पटत नाही. कालांतराने यज्ञात पशुहत्या आदी प्रकारांची भर पडत त्याचे पूर्ण विकृतीकरण झाले .अशाच प्रकारे इतर अनेक गोष्टींचे विकृतीकरण करून मूळ विशुद्ध हिंदू धर्माचे स्वरूप बदलून टाकण्यात आले.





हिंदू धर्माचे मूळ तत्वज्ञान हे बरेचसे अद्वैती स्वरूपाचे होते .निसर्ग आणि इतर जीवनदायीनी गोष्टींची पूजा हाच लोकांचा खरा धर्म होता. ही इथल्या लोकांमध्ये खोलवर आणि घट्ट रुजलेली संस्कृती होती . तिचे पाळेमुळे समूळ उखाडणे या स्वयंघोषित धर्ममार्तडांना शक्य झाले नाही. आपल्या अनेक परंपरा सणवारांमध्ये तिची पाळेमुळे आपणास जाणवतात. विशेषत: ग्रामीण भागात ही निसर्गपूजक संस्कृती मोठ्या प्रमाणावर जोपासली गेल्याचे आपल्याला अनेक प्रतिकांतून जाणवते. मात्र हळू हळू हिंदू धर्माचा कल स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कष्ट न करता आयते जगण्याची साधने उपलब्ध करण्यासाठी जाणीवपूर्वक वळवण्यात आला. अमूर्त देवतांची पूजा करणारा हा धर्म मूर्तिपूजक बनला. अद्वैती तत्वज्ञान मागे पडून द्वैत तत्वज्ञानाचे महत्व वाढले. पारलौकीकाचे ज्ञान करून घेण्यास आसुसलेले अध्यात्म लौकिक गोष्टींच्या दावणीला बांधण्यात आले. योग साधना ,ध्यान धारणा  अश्या गोष्टींना फाटा देऊन कर्मकांड म्हणजेच धर्माचरण बनवण्यात आले. उत्तर वैदिक काळात अनेक नवनव्या देवांचा उदय झाला . देवालये आली . मग भक्त आणि देव यांच्या मध्ये दलालांची एक साखळी उभी राहिली. आता या नव्या दैवतांच ( बदललेल्या स्वरूपातील अमूर्त -->मूर्त ) सर्व सामान्य भक्ताला निव्वळ दर्शन ही या दलालांच्या कृपेने मिळू लागले. अगदी प्रसादासाठी फोडलेल्या नारळातदेखील या दलालांचा वाटा निर्माण झाला.


आणि अश्या प्रकारच्या धर्माच्या विकृतीकरणाने धर्माचे मुळचे विशुद्ध रूप मागे पडले.आता आपल्या धर्माचा खरा अर्थ समजण्यासाठी भक्ताला या दलालांना शरण जाणे आवश्यक होते . नव्हे ते हेतुपुरस्पर आवश्यक करण्यात आले. कारण आता वेद हे मनुष्यनिर्मित न राहता स्वर्गलोकांतून फ्याक्स ने अवतरलेले साहित्य बनले होते. शिवाय ज्या भाषेत हे धर्मज्ञान होते तिला देवबोली म्हणून जाहीर करण्यात आले. देवाच्या तथाकथित दलालांशिवाय ती शिकण्याचा,वाचण्याचा सर्वसामान्यांना अधिकार उरला नाही. मग काय ‘ बाबा वाक्य प्रमाणमं !’ हे धर्माचे दलाल सांगतील तोच अर्थ मान्य करण्याशिवाय लोकांना पर्यायच उरला नाही. या सर्व खटाटोपामध्ये अतिशय शक्तिशाली असणारी समृद्ध अशी संस्कृत भाषा फक्त धर्माची आणि त्यातही परत कर्मकांडाची भाषा बनून राहिली. अश्या प्रकारे संस्कृत चा गळा घोटण्याचे कार्य तिच्या महान सुपुत्रांनीच केले.


हिंदू धर्म अध्यात्मिक तत्वज्ञानाच्या दृष्टीने परिपूर्ण होता आणि आहे. अनेक विद्वान हिंदू धर्माच्या पुत्रांनी सतत वाद-चर्चा-संवाद यांच्या माध्यमातून सतत लखलखीत ठेवलेले हे तत्वज्ञान काळाच्या उदरात पुढे २१ व्या शतकात समाज शिक्षित आणि शोषणमुक्त होण्याची वाट पाहत पडून राहीले. ‘ सत्याचे ज्ञान म्हणजे धर्म ’ ही धर्माची व्याख्या उत्तर वैदिक काळात पूर्णपणे बदलली.


यतोभ्युदयनि:श्रेयससिद्धी: स धर्म:
अर्थात ज्याच्यापासून विषयसुख व मोक्ष सुख मिळते तो धर्म
(संदर्भ – वैशेषिक दर्शन)



आता वाद-चर्चा-संवादांचे स्वरूप बदलले होते. पूजा करताना घंटा उजव्या हातात असावी की डाव्या? पूजा विधी करताना कलश मांडणी नेमकी कशी केली पाहिजे ? ताम्हन हे शास्त्रशुद्ध की पळी पंचपात्र योग्य ? अश्या चर्चांमध्ये हिंदू धर्ममार्तंड गुंतून पडले. इ स ६ वे शतक उजाडेपर्यंत या मंडळींनी हिंदू धर्माचे पार डबके करून टाकले होते.


                         ( क्रमश:)




                               
   

Monday 24 September 2012

हिंदू धर्म : एक सांस्कृतिक विचारधारा

प्रास्ताविक :-


हिंदू धर्म, धर्मावर केली जाणारी टीका, आपल्या प्राचीन परंपरांचे केले जाणारे विकृतीकरण किंवा विडंबन , वर्षानुवर्षे बोकाळलेला जातीयवाद, अंधश्रद्धा  अश्या अनेक गोष्टींमुळे अनेक सर्वसामान्य हिंदू संभ्रमित असलेले दिसतात.  खरच आपले मूळ काय आहे, कोण आहे मी ? हा सनातन प्रश्न आजही अनेकांना भेडसावत असलेला पाहायला मिळतो. या विषयावर अनेकांचे लिखाण वाचण्याचा योग आला. " मी हिंदू नाहीच कारण असा कोणता धर्मच अस्तित्वात नाही" अश्या शीर्षकांचे काही लेख हि वाचनात आले. अशा लोकांनी हिंदू धर्माच्या मुळावरच घाव घालण्याचे उद्योग सुरु केले आहेत. साधारणतः अश्या लोकांचा राग हा हिंदू धर्मावर नसून हिंदू धर्मातील वर्चस्ववाद्यांवर ज्यांनी या प्राचीन धर्माचे अपहरण केले आहे त्यांच्यावर आहे हे उघड आहे. अश्या लोकांनी हिंदू धर्माचे सत्य, तरल, सुंदर व शुद्ध रूप जाणून घेणे गरजेचे आहे.


धर्म म्हणजे काय ?


धर्म म्हणजे काय ? या मुलभूत प्रश्नापासून सुरवात करू. अनेक तत्वज्ञानी धर्माच्या अनेक व्याख्या केल्या आहेत.माझ्या मते हिंदू विचारधारेनुसार धर्म म्हणजे एका चिरंतन अशा सत्याचे ज्ञान आणि धर्माचरण म्हणजे या सत्याचा घेतलेला शोध.


अपाणणिपादोहम्चिन्त्यशक्ति:पश्चाम्य्चक्षु: स श्रॄणोम्यकर्णः
अहं विजानामि विविक्तरुपोन चास्ति वेत्ता मम चचित्सदाहम २१

अर्थात

मला हात आणी पाय नाहीत। मी डोळे नसतानाही पाहतो आणि कान नसतानाही ऐकतो. मलाच सर्व ज्ञान आहे पण माझे अस्तित्व (ज्ञान) कोणालाही नाही कारण मी च ते पवित्र ज्ञान वा अंतिम सत्य आहे.

" याच अंतिम सत्याचे ज्ञान म्हणजेच धर्म "



हीच व्याख्या प्रमाणभूत मानून मी हिंदू धर्माविषयी मुक्त चिंतन रूप विचार मांडणार आहे.



हिंदू धर्म एक सांस्कृतिक विचारधारा 


हिंदू हा एक धर्म कमी आणि एक सांस्कृतिक विचारधारा जास्त आहे अस मला वाटत. आपल्या देशाला खूप पुरातन आणि समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आहे. जेव्हा इतर देशातील लोक जंगलात कंदमुळे खात रानटी संस्कृतीत जगत होते तेव्हा आपल्या देशात समृद्ध अशा नागरी संस्कृती नांदत होत्या. सुमारे ५००० वर्षांपूर्वी जर्मनीतील कोकेशियस पर्वतातून आर्य भारतात आले असे काही तज्ञांचे मत आहे. तर काही तज्ञांचे मत आहे कि आर्य मुळचे इथलेच. सत्य काय आहे हा आता एक संशोधनाचा आणि इतिहासातील नोंदींचा भाग बनला आहे. तथापि आपण आपल्या संस्कृतीचे सुक्ष्म निरीक्षण केले असता इथ अनेक वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाफ झाल्याचे दिसून येईल. दक्षिण भारत, मध्य भारत, पूर्व आणि पश्चिम भारत, उत्तर भारत या भागात अनेक प्रथा परस्परांपेक्षा भिन्न असलेल्या दिसून येतात. आणि अनेक प्रथा आणि परंपरामध्ये समानतेचा धागा देखील दिसून येतो. या सर्व वरवर भिन्न वाटणा-या प्रथा, परंपरा, लोकजीवन आणि त्यातून वाहणारी एकच जीवनसरिता हीच पुढे इथली जीवनपद्धती बनली तिच इथल्या लोकांची विचारधारा बनली आणि तोच या लोकांचा धर्म बनला. माझा प्रिय हिंदू धर्म .....!! हेच कारण असाव कि अनेक विद्वानांना हिंदू या शब्दाचा उगम अर्वाचीन आहे असे वाटते.

       इथ जाता जाता एक गोष्ट नमूद करण्याचा मोह आवरत नाही. इतर धर्म आणि हिंदू धर्म यात एक फार मोठा फरक आहे. इतर बहुतेक धर्मांचा कोणीतरी प्रेषित आहे. त्याने सांगितलेले त्या त्या धर्माचे अंतिम तत्वज्ञान आहे. त्यावर कोणताही प्रतिवाद होऊ शकत नाही. हिंदू धर्माचा असा कोणताही उदगाता नाही. हिंदू धर्म अशी कोणतीही चौकट मानत नाही.बहुतेक धर्म एकेश्वर वादी आहेत. एकच देव, एकच धर्मग्रंथ, एकच उपासना पद्धती, एकच विचारसरणी . पण हिंदू धर्म मात्र सर्वथैव भिन्न आहे . इथ कोणी एकच देव नाही, एकच धर्मग्रंथ नाही, एकच उपासना पद्धती नाही, एकच विचारधारा नाही. हिंदू धर्म हे त्याच्या पाईकांसाठी एक प्रकारचे मुक्त प्रांगण आहे. इथे कोणतीही विचारधारा निषिद्ध मानली गेलेली नाही. कि अमुकच एका देवाच्या भक्तीचा आग्रह नाही उपासना पद्धतीचे मुक्त स्वतंत्र इथे आहे. कोणतेही कर्मकांड इथे सक्तीचे नाही. ज्याला जे हव, जे पटत, ते त्याने कराव, आचराव.   हिंदू धर्मात जितके पंथ आहेत तितके अन्य कोणत्याही धर्मात नाहीत.  देव मानणाऱ्या अन्य पंथांच तर सोडाच पण दार्शनिकांच्या मीमांसा, न्याय, सांख्य, लोकायत  अशा वेद प्रामाण्य नाकारणा-या, देवाचे अस्तित्वच अमान्य करणा-या विचारधारांनादेखील या विशाल अंत:करणाच्या धर्माने आपल्यात सामावून घेतल आहे. यातील निवडक दार्शनिक विचारधारांविषयी या लेखमालेत लिहिणारच आहे. तूर्त आटोपते घेतो.  







Friday 14 September 2012

युवा मनातील ‘ असीम ’ शक्तीचा धगधगता अविष्कार

असीम त्रिवेदी.......साधारण ८-१० दिवसांपूर्वी फारस कोणाला माहितही नसलेलं नाव. पण गेल्या काही दिवसांतील घटनाक्रमाने असीम या देशातील युवकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. सिस्टीम वर वैतागलेल्या युवा पिढीचा आयडॉल बनला आहे. त्याची कार्टून्स, त्याची अटक आणि सुटका यावर विविध राजनीतिज्ञ आपली मतमतांतरे मांडण्यात गर्क आहेत. मांडोत बापडे, पण माझ्यासारख्या सर्व सामान्य आणि राजकारणाच्या गटाराला वैतागलेल्या युवकाला मात्र तो हिरो वाटत आहे.




या युवकात एक आग आहे. एक जोश आहे . तत्वासाठी झोकून देण्याची वृत्ती आहे. स्वत:च्या विचारांवर त्याची श्रद्धा आहे. त्यासाठी सर्वस्व पणाला लावायची त्याची तयारी आहे. आणि अशी ध्येयवेडी माणस अख्ख्या दुनियेला आपल्यापुढे झुकायला पाडतात हे त्याने परत एकदा सिद्ध केले आहे. फक्त २४ वर्षाच्या या युवकाच्या राजकीय जाणीवा मात्र अत्यंत प्रगल्भ आहेत. खूप दिवसांपासून तो व्यंगचित्रे काढत आहे. इंटरनेटच्या सेंसरशिप विरुद्धचे आंदोलन असो वा अण्णांचा लोकपाल विधेयकासाठीचा लढा असो प्रत्येक ठिकाणी या युवकाने झोकून देऊन काम केले आहे. गेल्या मार्च महिन्यात १  एप्रिलला ‘ फूल्स डे ’ म्हणून घोषित करून नेटीझन्स चे आवडते नेते कपिलबाबा सिब्बल यांना हा दिवस समर्पित करण्याची मोहीम असीम ने आपल्या मित्रमंडळींसोबत छेडली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो फार मोठा पुरस्कर्ता असल्याचे त्याच्या या कारकिर्दीवरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल.





आधीच मनमोहनजींच्या सरकारची स्थिती आभाळच फाटल आहे त्यात ठिगळ तरी कुठ कुठ लावणार अशी आहे. असीमच्या खटल्याने एकंदर सरकारची सर्वच आघाड्यांवर नाचक्की केली आहे. मुळात जे देशद्रोहाचे कलम असीम ला लावले होते त्याची थोडी माहिती पाहू




    

        


काय आहे नेमका हा देशद्रोह कायदा ?


सैडीशन लॉ म्हणजे देशद्रोह कायदा हा एक उपनिवेषीय कायदा आहे. हा कायदा ब्रिटिशांनी १२५ वर्षांपूर्वी बनवला होता. भारतीय संविधानाने तो न बदलता जसाचा तसा स्वीकारला. भारतीय दंडसंहिता कलम १२४ अ नुसार जी देशद्रोहाची व्याख्या दिली आहे ती अशी आहे . कोणताही व्यक्ती जो सरकारविरोधी लिखाण करतो किंवा बोलतो किंवा अशा लिखाणाचे वा वक्तव्याचे समर्थन करतो त्याला आजीवन कारावास किंवा तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते. अर्थात हा कायदा ब्रिटीश घटनेने आता रद्द केला आहे पण भारतीय संविधानात तो अजूनही आहे.
या कायद्याचा उपयोग ब्रिटीश काळात अनेक स्वातंत्र्य योद्ध्याविरुद्ध केला गेला आहे. तर स्वातंत्रोत्तर काळात या कायद्याचा तडाखा अरुंधती रॉय, विनायक सेन यांना बसला आहे. भारतीय संविधानाने नागरिकांना एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे तर दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारा हा विवाद्य कायदा आहे.



असे जुलमी कलम आपल्याला लावले, ते रद्द करावे म्हणून असीम ने प्रथम जामीन घ्यायला नकार देऊन सरकारची चांगलीच गोची केली. त्याचा हा निर्णय त्याच्या कार्याला एक वेगळीच झळाळी देऊन आणि त्याला चर्चेचा केंद्रबिंदू बनवून गेला. तथापि नंतर न्यायव्यवस्था आणि गृहमंत्र्यांच्या आश्वासनाचा मान ठेवण्यासाठी त्याने जामीन स्वीकारला. सरकारला एका अर्थाने त्याने गुडघे टेकायला भाग पाडले. काय आहे या असीम जवळ ?? फक्त एक या भ्रष्ट सिस्टीमविरुद्ध काळजात भडकणारी आग आणि तत्वांवरची अविचल निष्ठा. एवढ्याच भांडवलावर त्याने आज देशातील अनेक तरुणांना प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे.
असीम त्रिवेदीची कार्टून भलेही काहीजणांना वादग्रस्त वाटतात. आम्हाला मात्र ती फक्त सामान्य माणसाचा प्रशासनावरचा संताप व्यक्त करणारी, भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार याविषयी चीड व्यक्त करणारी प्रातीनिधीके वाटतात. उसका तरीका गलत हो सकता है लेकिन इरादा नेक था ....असीम आगे बढो .....हम आपके साथ है .....!!      


-----------------------------------------------------------------------------------------     





  असीम ची काही व्यंगचित्रे





























Monday 10 September 2012

एका जातीयवादी तथाकथित ब्राह्मणाचा पर्दाफाश

नुकताच एक महाभयंकर, जातीयवादी ब्लॉग वाचनात आला. या ब्लॉग वरील लेखन कोणत्याही सुसंस्कृत माणसाला चीड आणेल असेच होते. माझे तर डोकेच सरकले ते सर्व वाचून. इथ कोहम महोक नावाचा (फेक नाव ) एक विकृत इसम जातीयवादी गरळ ओकत असतो. संभाजी ब्रिगेड हि एक ब्राम्हण द्वेष करणारी संघटना आहे हे सर्वश्रुत आहे. कोणत्याही सुसंस्कृत मराठा व्यक्तीला असला उग्र जातीयवाद मान्य होणार नाही. माझ्या फेसबुक आणि जातीयवाद या लेखात मी या संघटनेवर खरमरीत टीकाच केली आहे.




 मराठा ही महाराष्ट्रात बहुल असणारी जाती आहे. मुठभर मराठे बिग्रेड संघटनेत असतील. उलट इतर जातीय लोकच या संघटनेत अधिक आहेत. प्रश्न तो नाही. पण हा कोहम महोक नामक विकृत इसम ब्रीगेडींना प्रत्युत्तर देण्याच्या मिषाने या ब्लॉग वर संपूर्ण मराठा जातीवर शेरेबाजी करत असतो. आणि ब्राम्हण ही एक सुसंस्कृत जाती आहे बाकी सर्व जाती असंस्कृत आहेत अशी प्रौढी मिरवत असतो. ब्राम्हण सुसंस्कृत आहेत, ठीक आहे , यावर आम्ही भाष्य करण्याचे कारणच नाही पण मराठे असंस्कृत आहेत असे जर हा विकृत इसम म्हणत असेल तर यातूनच त्याची संस्कृती आणि संस्कार कळून येतात.

याने अनिता पाटीलचे कोहम ला प्रेमपत्र नावाचा एक विकृत लेख लिहिला आहे. अनिता पाटील या संभाजी ब्रिगेड च्या एक कार्यकर्त्या आहेत. आता खेडेकर वगैरे मंडळी ब्राम्हण स्त्रियांवर ज्या पातळीवर जाऊन टीका करतात ते पाहता त्याचे येथे काहीसे खालच्या पातळीवर जाणें देखील समजून घेता येईल की ती फक्त एक प्रतिक्रिया होती म्हणून पण याच लेखात त्याने समस्त मराठा जातीबद्दल जे आपले अकलेचे तारे तोडले आहेत ते चीड आणणारे आहेत. तुम्ही जी एकमेकांवर चिखलफेक करायची ती करा ना. यात सबंध जातीला मध्ये आणून तुम्ही नवे जातीयवादी बनवण्याचे काम करत आहात याचे ही जरा भान ठेवा.

मी केवळ नमुन्यादाखल ह्या विकृत महाभागाची विकृत वाणी त्याच्याच शब्दात पुढे देत आहे. त्यावरून या इसमाबद्दलचे आपले मत आपणच बनवा.



मला तडफदार पुरुष फारच आवडतात. त्यात विद्वत्ता आणि तडफ एकत्र आली की पुरुष काय सुंदर दिसतो, अगदी हवाहवासा वाटतो. त्यात परत विद्वत्ता आम्हा मराठ्यांत कमीच आणि तडफ  तर फक्त तोंडात.
आमच्या मराठा समाजात तोंडात फार बळ, स्वतःला लढवैय्ये, धडाडीचे, शूर वीर आणि काय काय म्हणतात, सारखा सारखा धोशा लावतात. पण इतिहास बघता मराठ्यांनी लढायचे साधारण १८५७ सालापासूनच सोडले. ब्राम्हण कसे पूर्वीपासून ते आत्तापर्यंत बहुतेक सर्व क्षेत्रात पुढे, एकही असे क्षेत्र सापडणार नाही जिथे ब्राम्हण तज्ञ सापडणार नाही.  
सांगायचा मुद्दा असा की, आमच्या मराठा जातीतच इतके उपप्रकार आहेत की सांगायची बात नको. आता ब्राम्हणांनी हे उपप्रकार तयार केले असे म्हणणे हा मूर्खपणा आहे हे मला समजते. आणि उच्च निचीची कल्पना मराठ्यांत अतिशय रुजलेली. जर का ९६ कुळी देशमुख असेल तर त्याला साधा ९६ कुळी पाटील चालत नाही, आमच्यासारखे साधे मराठा तर सोडाच. पंचकुळी तर स्वतःला देवच समजतात. तर सांगायचा मुद्दा असा की जातीयवादात ब्राम्हण नाही तर मराठे पुढे आहेत, ते साळ्या-माळ्यावर रोब दाखवतात आणि महार मांग बौद्ध लोकांची यथेच्छ नालस्ती करतात. ह्याउलट ब्राम्हण लोक अतिशय मोकळ्या मनाचे असतात आणि तडफदार असतात. हुशार असतात, उंच दिमाखदार रुंद छातीचे असतात, नाहीतर आमचे मराठा पुरुष, बिनडोक किरकोळ काटक्या नुसत्या. तुम्ही ब्राम्हण पुरुष निर्व्यसनी असता तर आमचे पुरुष नुसते पेताड, फुकट मिळेल तिथे दारू प्यायची आणि मिळेल त्या गटारात पडायचे. नाहीतर घरी येऊन बायकोला मारहाण करून रोब दाखवायचा. त्यामुळे मला मराठा पुरुषाशी लग्न करायचेच नव्हते. मराठा पुरुषाच्या तोंडाला दारूचा नाहीतर गाय छापचा घाणेरडा गलिच्छ वास, तर ब्राम्हण पुरुष कायम स्वच्छ. मराठा पुरुष उगाच कर्जे काढून, उधार उसनवार करून निर्वाह करतील तर ब्राम्हण अतिशय नीतीने काटकसरीने राहून पैसा गाठीला बांधून ठेवतील आणि मग बायकोला महाबळेश्वरला फिरायला नेतील. उगाच खोटा आव नाही की खोटी तरफदारी नाही. किंबहुना ब्राम्हण जातीत एकूणच खोटेपणा कमी दिसतो.
आणि हेही माहित आहे की मराठ्यांचे आरक्षणाची भीक मागणे ही लबाडी आहे.


आता हे तारे या इसमाने केवळ एकाच लेखात तोडले आहेत. सबंध ब्लॉगवर त्याने असे किती तारे तोडले असतील ते वाचण्याची इच्छाशक्ती आमच्यात तर नव्हती.
आणि एक विशेष या लेखात मराठा जातीवर टीका केल्याने खवळलेल्या मराठा ब्लॉगरनी खाली कमेंटमध्ये या इसमाची अतिशय बेइज्जत केली. याच्या आईबहिणींवर अतिशय खालच्या पातळीवरून कमेंट केल्या. असल्या कमेंट देखील याने डिलीट केल्या नाहीत. कारण काय तर इतर जातींची असंस्कृतता आणि ब्राम्हण जातीची सुसंस्कृतता इतरांनी पहावी म्हणून. स्वत: ची सुसंस्कृतता सिद्ध करणे कोणते मोल देऊन ? स्वत:च्या  आई बहिणींवर केलेली हीन टीका इतरांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देऊन ?? त्यांच्या अब्रुचे मोल देऊन ?? आम्ही जुने नेटिझन असल्याने आणि इथ सर्व सोशल साईटवर नेमके काय चालते याची कल्पना असल्याने आम्हाला ब्राम्हण जातीबद्दल चीड आली नाही . कारण हा एक नालायक इसम म्हणजे समस्त ब्राम्हण जाती नव्हे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. अर्थात मला या सडक्या बुद्धीच्या कोहम महोक चा अतिशय राग आला आणि लेख वाचून आलेली शंका की हा इसम विकृत आहे, कमेंट वाचून खात्रीत बदलली. माझा माझ्या ब्राम्हण मित्रांना देखील आग्रह आहे त्यांनी समस्त ब्राम्हण वर्गाबद्दल चीड उत्पन्न करणारे लेखन करणा-या आणि समाजात जातीयवादी तेढ वाढवणा-या या इसमाला रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावेत. आणि सर्वांनी मिळून हिंदू धर्माच्या ऐक्याला हातभार लावावा.

जय भवानी .......!! जय शिवाजी ....!! जय महाराष्ट्र .......!!

Saturday 8 September 2012

अ. भा. म.साहित्य संमेलन आणि जातीपातीचे राजकारण

अखिल भारतीय साहित्य संमेलनात होणारे वाद काही नवे नाहीत. तथापि या वेळी होऊ घातलेल्या साहित्य संमेलनात उपस्थित झालेला वाद हा अखिल मराठी सारस्वताला काळीमा फासणारा आहे. ह मो मराठे यांनी एक वादग्रस्त पत्रक प्रसिद्ध करून या वादास सुरवात केली आहे. निवडणूक प्रचारात उसळून वर येणारा जात हा मुद्दा राजकारणात नवा नाही. तथापि निवडणूक आचारसंहितेने त्यावर काही बंधने घातली आहेत. पण अशा जातीय राजकारणावर ही स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणारी साहित्यिक मंडळी नेहमी टीकेची झोड उठवत असतात. आता खुद्द साहित्य संमेलनात असा प्रचार खुद्द या साहित्यिकांनीच करावा हि दुर्दैवाची गोष्ट आहे.

   
ह मो मराठेंच हे निवडणूक पत्रक अतिशय किळसवाणे गलिच्छ मुद्दे आणि जातीयवादी विखाराने भरलेले आहे. लोक अनेक गोष्टींचा स्वत:च्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतात. ह मो नी इथ जातीला आपले हत्यार बनवले आहे. एकूण मतदारांमध्ये ४०% लोक ब्राम्हण आहेत असे ह मो सांगत असले तरी साधारण ५५ ते ६० टक्के मतदार ब्राम्हण आहेत असा अनेक जाणकारांचा अंदाज आहे. आता या बहुसंख्य वर्गाला जातीच्या कारणावरून आणि ते हि लपून व छुपे नाही अगदी उघड आणि उजळ माथ्याने ह मो नी मत मागितले आहे. समस्त ब्राम्हण समाजाचे आपणच एकटे तारणहार आहोत, संभाजी ब्रिगेड आणि तत्सम संघटनांकडून होणा-या विखारी प्रचारापासून आपणच ब्राम्हण समाजाचे रक्षण करू शकतो अशी स्वत:ची भ्रामक छबी या पत्रकाद्वारे त्यांनी उभी केली आहे.

आणि सगळ्यात किळसवाणा मुद्दा म्हणजे जेम्स लेन चे त्यांनी केलेल निर्लज्ज समर्थन. केवळ समर्थनच करून ह मो थांबले नाहीत तर आपल्या पत्रकात जेम्स लेनचे ते वादग्रस्त उतारे जसेच्या तसे उधृक्त करून त्यांनी निर्लज्जपणाची परमावधी गाठली आहे. या कळीच्या मुद्द्याला तोंड फोडून आपण ब्राम्हण समाजाची मते खेचू असे त्यांना वाटत असेल तर सध्याच्या समाजातला जातीयवाद कोणत्या थराला गेला आहे ते कळून येण्यासारखे आहे. ह मो यांना समाजातील अनेक थरातून विरोध होत आहे. संभाजी ब्रिगेड ने तर त्यांच्याविरुद्ध रान उठवले आहे. ह मो ही या विरोधाला न जुमानता ही निवडणूक लढवतील कि नाही, लढवली तर ते त्यात विजयी होतील कि नाही हा पुढचा भाग आहे. पण त्यांच्या या पत्रकाने खूप नवे प्रश्न उभे केले आहेत.

मुळात ह मो ना असे का वाटावे कि जेम्स लेन च्या मुद्द्यावरून आपण ब्राम्हण समाजाची मते खेचू ? जेम्स लेन च्या मुद्द्याचे जे समर्थन करतात ते या छत्रपतींच्या पुण्य पावन महाराष्ट्रात राहण्यास लायक तरी आहेत का ? राजमाता, माहेरी सासरी कुलवंत घराण्यातल्या जिजाऊवर, साक्षात महाराष्ट्राची माता असणा-या, समस्त शिवभक्तांना आदिशक्ती जगदंबेच्या ठिकाणी असणा-या जिजाऊ च्या चारित्र्यावर संशय घेणा-या जेम्स लेनच निर्लज्ज समर्थन करणारांना स्वत:च्या सख्ख्या मातेच्या चारित्र्याची तर किमान खात्री आहे ना ? स्वत:च्या मुठभर स्वार्थासाठी आपण किती लोकांच्या श्रद्धा पायदळी तुडवत आहोत याची या तथाकथित सुसंस्कृत समजल्या जाणा-या हरामखोरांना जाणीव आहे का ?
 
पुरोगामी म्हणवल्या जाणा-या महाराष्ट्रात चालवलेले हे जातीयवादाच थैमान आपण स्वस्थ बसून पहायचं का इतकाच रोखठोक सवाल आमच्या वाचकांना करून या प्रसंगी पुर करतो.

जय भवानी...!! जय जिजाऊ ..!! जय शिवाजी ...!!    

    







ह  मो मराठे यांच्या लेखातील आम्हाला खटकलेले मुद्दे .

१) ह मो यांनी ब्राम्हण मतदार डोळ्यापुढे ठेऊन उघड उघड जातीच्या आधारावर मागितलेली मते. मी ब्राम्हण आहे ब्राम्हणांनी मलाच मत दिले पाहिजे अशी थोडक्यात हमोंची भूमिका आहे. अशी जातीयवादी भूमिका लोकशाहीविरोधी आहे.

२) ह मो यांनी लेम्स लेन चे आक्षेपार्ह्य विधान जसेच्या तसे उधृक्त करून या आधी अनेकांनी केलेल्या चुकीची पुनरावृत्ती 

३)जेम्स लेन आणि ब्राम्हण यांचा बादरायण संबंध जोडण्याचा केलेला प्रयत्न  (इथे आम्ही मुद्दाम असे म्हणत आहोत कारण हमोना आपल्या निवडणूक पत्रकात जेम्स लेनचा उल्लेख करण्याची निकड भासली आहे ब्राम्हण मते खेचण्यासाठी)

४) जेम्स लेन ला कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे असे सांगून त्याचे निर्दोषत्व ठासून सांगण्याचा केलेला निंदनीय प्रयत्न .

    भलेही कोर्ट किंवा हमोंना  जेम्स लेन निर्दोष वाटत असेल. इथले कोटी कोटी शिवभक्त जेम्स लेनला कधीही माफ करणार नाहीत. त्यांच्या भावनांना निष्कारण स्वत:च्या स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी कोणी हात घालत असेल तर त्याला आमचा मराठी बाणा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही.

Thursday 6 September 2012

फेसबुक आणि जातीयवाद

     फेसबुकवर अनेक समूह आहेत. यापैकी बहुतांश समूहातून चक्कर मारल्यास एक धक्कादायक चित्र समोर येते. बहुतांश समूहात जातीभेद अगदी पराकोटीला पोहचलेला दिसून येतो. एकमेकांच्या जातीपातीवर टीका करूनच हि मंडळी थांबत नाहीत. आपण एका सोशल कम्युनिटी साईट वर आहोत याचे कोणतेही भान न ठेवता अर्वाच्च शिवीगाळ केली जाते. एखाद्याने एका विशिष्ट जातीवर टिपण्णी केली कि त्या जातीचे इतर सदस्य भावनाप्रधान होऊन त्या वादात ओढले जातात आणि तेही आपल्या जातभाईची सारासार विचार न करता बाजू घेऊन समोरच्या व्यक्तीला शिवीगाळ करू लागतात. खूप दिवसांपासून अनेक समूहांत हे चित्र वारंवार पाहत आहे. अशा गोष्टी पहिल्या कि खूप निराश वाटायला लागत. समाज कुठे भरकटत आहे ? अर्थात फेसबुक म्हणजे काही समाज नव्हे. किंवा ते समाजाचे एक प्रातिनिधिक रूपही म्हणता येणार नाही. फेसबुक वापरणारे बहुधा कॉलेज ला जाणारे युवक- युवती आणि ज्यांना सोशल सर्फिंग ची आवड आहे असे लोक असतात. आता यातील अनेक जन उच्च शिक्षित असतात. अडाणी किंवा अशिक्षित माणसाने फेसबुक वापरण्याचा प्रश्नच येत नाही. या दृष्टीने पाहीले तर फेसबुक हा आजच्या युवा पिढीचा आणि बुद्धीजीवी समाजाचा आरसा म्हटल तर फारस वावग ठरणार नाही.

        
          आता अशा बुद्धीजीवी लोकांमध्ये इतक्या हिडीस प्रकारे हे जातीयवादाचे बीज या समूहांच्या माध्यमातून रोवले जात आहे हे चिंताजनक आहे. अशा समूहामध्ये वावरणारा जातीभेद विरोधी व्यक्तीही अशा वातावरणात राहून काही काळाने जातीयवादी होण्याची शक्यता दाट ......किंबहुना अनेक जन असे जातीयवादी बनत आहेत या समूहांच्या माध्यमातून. बहुतांश ब्राम्हण आणि दलित हे दोन वर्ग यात टार्गेट होत आहेत. विशेषत: यात ठळकपणे उठून दिसते ते एका संघटनेचे नाव ...संभाजी ब्रिगेड. अनेक खरे खोटे आयडी वापरणारे ब्रिगेडी कार्यकर्ते फेसबुकवर कार्यरत आहेत. किंबहुना यातील अनेकांना खास पगार देऊन या कामासाठी नेमले आहे कि काय अशी शंका यावी इतक्या सातत्यपूर्ण रीतीने हे लोक इथे जातीवाद पसरवना-या पोस्ट करत असतात. यांचे ठरलेले एकच काम. इतिहासाची पुरावाहीन मोडतोड आणि ब्राम्हणद्वेष. इतिहासकालीन ब्राम्हणांची पापे आता सुशिक्षित समाजापासून लपून राहिलेली नाहीत. तथापि काही धर्ममार्तंडांच्या पापांसाठी सर्वच ब्राम्हणांना दोषी धरणे कितपत सयुक्तिक आहे. आणि या मध्ययुगीन घटनांचे खापर सध्याच्या ब्राम्हण समाजावर फोडणे तर अतिशय निंदनीय आहे. सतत होणा-या या बोच-या प्रचारामुळे काही ब्राम्हण कृष्णाजी भास्कर सारख्या दुष्मनाचे समर्थन करताना दिसले तर यात दोष कोणाला द्यायचा ?
        
           या भीषण प्रचाराचे टार्गेट सावरकरांसारख्या पराकोटीच्या देशभक्त नेत्याला केले जाते तेव्हा विषाद वाटतो. टीका करावी पण ती कोणत्या हीन पातळीपर्यंत ? सावरकरांच्या सागरातील त्या सुप्रसिद्ध उडीमुळे त्यांचे नाव क्रांतिकारकांच्या इतिहासात अजरामर झाले ती उडी त्यांनी संडासाच्या खिडकीतून मारली होती म्हणून सावरकरांचे वर्णन संडासवीर केशरी पुठ्ठा असे केले जाते हि कुठली संस्कृती आहे ? हि कसली देशभक्ती आहे ? ही कसली इतिहासाची पुनरर्चना आहे ?
        

           या जातीभेदाने हिंदू धर्माचे प्राचीन काळापासून अपरिमित नुकसान केले आहे. सध्याच्या समाजात ज्या काही समस्या आहेत त्या सर्वांची मुळे या जातीभेदात आहेत असे माझे मत आहे. या परस्पर विद्वेषाने हिंदू समुदायात कधी म्हणावी अशी एकजूट होऊ शकली नाही. याचा फायदा परकीय आक्रमकांनी घेतला. सध्याची परिस्थिती पाहता या इतिहासाची पुनुरावृत्ती होऊ नये इतकीच हिंदू धर्माचा एक सच्चा पाईक म्हणून माफक अपेक्षा !!