About

Saturday 19 December 2015

तुक्या अन वाश्याचे सिग्रेटायन

     रात्रीचे साडे दहा वाजले असतील. किर्र अंधार होता. वारा शांत होता. रातकिड्यांची किरकिर सोडली तर सगळ्या वातावरणात निरव शांतता दाटून राहिली होती. त्या गुडुप्प अंधारात ती दहा बारा पोरे शाळेच्या मागे असलेल्या बागेत, झाडांच्या आडोश्याला भिताडाला पाठ लावून तुक्या आणि वाश्याची वाट बघत बसली होती. सित्या, जगन्या, वामन्या, पोपट्या एकूणच दहावीच्या वर्गातले सगळे एकेक नग. सगळ्यांच काळीज डबल धडधड करत होत. डबल अश्यासाठी की त्यांनी आज मोठा धाडसी बेत योजला होता. तो कसा पार पडेल याची चिंता प्रत्येकाला सतावत होती. थोडी हुरहूर आणि उत्सुकता पण होती. आणि धडधडीचे दुसरे कारण म्हणजे या मोहिमेचा म्होरक्या तुक्या होता. तुक्या म्हणजे दहावीच्या वर्गातला सगळ्यात आडदांड पोरगा. खालच्या वर्गात दोन दोन मुक्काम ठोकत शेवटी मास्तरांनीच लाजून वरच्या वर्गात ढकललेला गडी. तो कधी काय करेल याचा काही नेम नसे. त्याची लहर फिरली की बोंबलल सगळ. त्यात त्यांनी आज १ -१ रुपया वर्गणी काढून त्याच्या हातात दिली होती. अचानक त्याची लहर फिरून तो खालच्या चौकात जाऊन त्या पैशाचे गाड्यावर अंडा आम्लेट खाऊन येण्याची देखील दाट शक्यता होती. आणि वर त्या हुंबदांडग्याला जाब कोण विचारणार? पण सोबत वाश्या असल्याने त्यांची आशा जिवंत होती. वाश्या हा तसा वर्गातला हुश्शार पोरगा. पण या तुकयाच्या नादी लागून बिघडत चालला होता. पण या बाबतीत त्याने अत्यंत वेगाने प्रगती केली होती. त्यांचे मित्र ते दोघे नसताना म्हणत सुद्धा की काही दिवसांनी तुक्याने वाश्याला बिघडवल की वाश्याने तुकयाला हेच कळणार नाही. आताची ही आयडिया पण वाश्याचीच होती. आणि तुक्यापेक्षा अद्याप तो जास्त विश्वासार्ह्य होता.

वाश्याने आज नाईट स्टडी सुरु होतानाच आपल्या गँगची मिटिंग घेऊन आजच्या मोहीमेचा आराखडा सर्वांसमोर मांडला होता. मोहीम होती ऑपरेशन भं भं भोले अर्थात सिगारेट ओढण्याची. निम्म्या जणांना तो अतिशय धाडसी बेत वाटला. निम्म्यांना तो फार धोकादायक वाटला. पण आपल्या भेदरट पणाचा तमाशा नको म्हणून त्या निम्म्यातले निम्मे गप्प बसले आणि उरलेले निम्मे जे बोलण्याच्या बेतात होते त्यांनी, तुक्या सगळ्यांकडे करड्या नजरेने सर्वांकडे बघत असल्याने गप्प बसनेच पसंत केले. वाश्याचा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर झाला. लगेच तुक्याने पुढे सरसावत सगळ्याकडून १-१ रुपया वर्गणी वसूल केली. १० ला स्टडी संपते. मग सगळ्यांनी आवरून मास्तर झोपायला हापिसात गेले की शाळेच्या मागे गुपचूप दबा धरून बसायचे आणि तुक्या आणि वाश्याने खालच्या चौकात जाऊन तिथल्या टपरीतन सिगरेटी आणायच्या असा बेत ठरला. आणि आता त्याप्रमाणे सगळे वाश्याची व तुक्याची वाट बघत बसले होते.

      पावलांचा हलकाच आवाज झाला आणि अंधारातून भस्सकन तुक्या आणि वाश्या टपकले. काळाकभिन्न, धिप्पाड तुक्या तसा अचानक दैत्यासारखा समोर आल्याने मन लावून एकाग्र चित्ताने वाट बघत बसलेला जगन्या दचकून किंचाळण्याच्या बेतात होता. पण त्याचा सासूद लागून सित्याने हलकेच त्याच्या तोंडावर हात दाबला. तुक्या व वाश्या हळूच त्यांच्या कडेला येऊन बसले. सित्याने विचारले,

“मिळाल का मटरेल?”
“थांबा की आईघाल्यानो, वाईच दम तर खाव द्या.”
म्हणत तुक्याने एक दीर्घ उसासा टाकला. हलकेच शर्टाच्या बाहीने कपाळावरचा घाम पुसत पुन्हा एक दीर्घ उसासा टाकला. या मोहिमेत किती धोका होता आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा टप्पा आपण आत्ताच कसा पार पाडला आहे याची त्याला सर्वांना जाणीव करून द्यायची होती. त्याच्या हावभाव व एकंदर हालचाली वरून सगळ्यांची तशी खात्री पटल्याची खात्री होताच त्याने सांगितले.

“आर उमशाचा बा दुकानातून जाता जाईना. उमशा कवाधरण बोंबलत होता की अन्ना जावा जेवाला, आय हाका माराली कवाधरन. पण मला आंन वाश्याला दुकानाच्या कट्ट्यावर बसलेला बघून अन्न्याला संशोय आला व्हता. तो हालचना दुकानातन. शेवटी  उमशाची आय आली तवा आन्ना गेला मग घेतल उमशाकडन हळूच मटरेल.”

अस म्हणून तुक्याने चारमिनारची दोन पाकिटे आणि काड्याची डबी काढून समोर ठिवली.

“चला मंडळी मग लागू कामाला, कोण वढणार आधी?”
म्हणत वाश्याने जवळ बसलेल्या जगन्याकडे प्रेमाने बघितले. तसा लक्ककन जगन्याच्या काळजाचा ठोका चुकला.

“थांबा मी मुतून आलो.”
म्हणत वाश्याच्या डोळ्याला डोळा न भिडवता तो हळूच उठला. आणि जरा लांब जाऊन उरकून परत बसताना मात्र वाश्यापासून लांब ओळीच्या शेवटी बसला.
“हेच्या आईच भेदरट बेन.”
म्हणून जगन्याकडे तुच्छतेने बघत वाश्याने आपली प्रेमळ नजर सित्याकडे वळवली. सित्या पण जरा बेरकी होता.
“ आर मी करतो की सुरु पण कुणाच्या बा ला माहित हाय इथ कशी वढायची ते तुक्या सोडून? आधी तुक्या तू दाव समद्यास्नी परयोग करून. मग आमी करतो बराबर.”
“आर त्यात काय इद्या बोलायची हाय. लई सोप असत. थांबा मी दावतो आधी समद्यांना. सगळे जवळ या आन नीट बघा. एकदाच दावणार हाय. पुन्यांदा इचारायचं नाही.”

सगळयांनी जवळ सरकत तुक्याच्या कडेने कोंडाळे केले. एकदाच दावणार म्हटल्यावर जगन्या काळजीने मगा मागे बसलेला सगळ्यांच्या पुढे येऊन बसला आणि अंधारात डोळे फाडून लक्षपूर्वक तुक्याकडे बघू लागला.

     तुक्याने पाकीट फोडून एक चारमिनार काढली आणि स्टाईल मध्ये तोंडात ठेवली. मग एक काडी ओढून ती पेटवली. एक जोरदार झुरका मारून धूर आत घेतला. ब्रम्हानंदी टाळी लागल्यासारखे हळूच डोळे मिटले आणि प्रसन्न चेहरा करत नाकातून हळूवार धूर बाहेर सोडला. सगळी पोरे कमालीच्या आदराने त्याच्याकडे बघू लागली. दोन चार जोरदार झुरके मारून तुक्याने डोळे उघडले. त्याचे डोळे सित्याला जीवनाचा आनंद उपभोगल्यासारखे तृप्त वाटले. मग वाश्याने सगळ्यांना एकेक सिगारेट दिली आणि ओळीने पेटवायला सुरुवात केली. जगन्या सिगारेट तोंडात न धरताच पेटवू लागला तेव्हा तुक्याने त्याच्या आई माईचा उध्दार करत त्याला सिगारेट पेटवून दिली. सुरवातीला एक दोघांना जोरदार ठसका लागला. पण हळू हळू सर्वांना जमल. भका भका सगळेजण धूर सोडू लागले. धुराचा लोट तयार होऊ लागला. जवळच ऑफिस ची खिडकी होती. आणि ऑफिसमध्ये देशपांडे मास्तर झोपले होते. ठसक्याच्या आवाजाने त्यांची झोप आधीच थोडी चाळवली गेली होती. त्यात धुराचा जळका वास त्यांच्या नाकात शिरला. मागे एकदा त्यांच्या गुराच्या गोठ्याला आग लागली होती. आणि पाडा सोडायला ते आत घुसले ते आतच अडकले.. बोंबलून घसा बसल्यावर आणि एक चतुर्थांश धोतर जळाल्यावर शेजाऱ्यांनी त्यांना कसे बसे बाहेर काढले होते. तेव्हापासून ते आगीला जाम भिऊन असत. आताही धुराचा वास नाकात शिरताच ते दचकून उठले आणि आग आग अस किंचाळत उठले. आणि इकडे तिकडे धावू लागले. थोडे शांत झाल्यावर धूर मागच्या खिडकीतून येतोय हे हेरून ते धावत शाळेच्या मागे आले. त्यांना कुठेही आग दिसली नाही. बॅटरीच्या उजेडात तिथे त्यांना काडेपेटी आणि डझनभर अर्धवट जळालेली, जळत असलेली थोटके दिसली. मग मात्र ही कसली भुताटकी असावी त्याचा त्यांना सासूद आला. आणि ते पोरे झोपलेल्या वर्गाकडे वळले. वर्गात सगळी सामसूम होती. बॅटरी फिरवून त्यांनी तुक्या आणि वाश्या आहेत का पाहिले. निरागस चेहरा करून गाढ झोपी गेले होते दोघे. मग जासूस करमचंद सारखी स्वत:शीच मान हलवत मास्तरांनी डोळे मिचमिचे करून जगन्या कुठे झोपलाय त्याचा वेध घेतला. त्यांच्या भेदक नजरेने जगन्याच्या कपाळावरचा घाम अचूक टिपला. हम्म असा सुस्कारा सोडत सकाळी याची खबरबात कशी घ्यायची त्याचा बेत ठरवत त्यांनी ऑफिसकडे प्रस्थान ठेवले. दरवाजा वाजल्याचा आवाज येताच भुतांनी डोळे उघडत एकमेकांकडे पाहिले आणि त्यांच्यात हलकीच खसखस पिकली.

     दुसऱ्या दिवशी शाळेत नेहमी  तिसरा तास असणारे देशपांडे मास्तर पहिल्याच तासाला आलेले पाहून या दहाबारा भुतांच्या काळजाचा ठोका चुकला. सगळयांनी उभे राहून मास्तरांना नमस्ते केले. मास्तरांनी कोणालाच बसायला सांगितले नाही. धोतराचा सोगा वर सावरून धरत त्यांनी टेबलावर बसकण मारली. आणि सगळ्यांकडे रोखून बघू लागले. वर्गात स्मशानशांतता पसरली. तब्बल पाच मिनिटे आपली भेदक नजर वाश्या आणि तुक्याकडे रोखून धरत मास्तरांनी निरीक्षण केले. पण त्यांच्या बेरडासारख्या मख्ख चेहऱ्यावरची रेषही न हललेली पाहून त्यांनी त्या आघाडीवरून तात्पुरती माघार घेतली.

“थांबा बेट्यानो, तुम्हाला चांगलाच हिसका दाखवतो” अस मनात म्हणत त्यांनी आपल्या पहाडी आवाजात

“जगन्या रांडेच्या ये पुढे असा इकडे”

असा पुकारा केला. जगन्याचे काळीज पुन्हा लक्ककन हलले. बळी द्यायला निघाल्यासारख हळू हळू पाय खोडत तो थरथर कापत देशपांडे मास्तर पुढे येऊन उभा राहिला. देशपांडे मास्तर एकही शब्द न बोलता नुसते त्याच्याकडे भेदक नजरेने रोखून बघू लागले. जगन्या अस्वस्थ होत थर थर कापत होता आधीच, तो आता लटालटा उडू लागला. मास्तरांनी खाडकन त्याच्या मुस्कटात भडकवली. तस जगन्याने धीर सोडला आणि भोकाड पसरले.

“मास्तर म्या काय बी केल नाय, त्येंना मी नकू मनत हुतु उं उं”
करत जगन्या हुंकारे टाकत स्फुंदू लागला.

 “त्यांना म्हणजे कोणाला रांडीच्या?”

म्हणत मास्तरांनी त्याच्या पाठीत एक जोराचा बकमा घातला. तसा जगन्या होलपाटला आणि ओरडत सगळ्यांची नावे सांगू लागला. मास्तरांनी त्या बारा जणांना बाजूला काढले. मग त्यांना धु धु धुतले. हान हान हाणले. तुडव तुडव तुडवले. शिव्यांची यथेच्छ लाखोली वाहत त्यांच्या सात पिढ्यांचा उद्धार केला. सगळ्या वर्गात धप धप असे आवाज, ओरडणे, मुसमुसणे, नाक ओढणे आणि रडणे यांचा ह्ल्लकल्लोळ माजला. वाश्याचे गोरे गाल लालभडक होऊन ते सुजले. आणि तो मारुतीरायासारखा दिसू लागला. सित्याच्या एक डोळा काळा निळा झाला. जगन्याने तर पैंट ओली केली. शेवटी मास्तर धापा टाकत शेवटी राखून ठेवलेल्या तुक्याकडे वळले. तुक्या स्थितप्रज्ञ नजरेने आपण जणू त्या गावचेच नसल्यासारखा हा सगळा प्रकार पाहत हेडमास्तर असल्यासारखा ऐटीत उभा होता. चिडून मास्तरांनी त्याच्या तोंडात एक जोरात भडकावली. अचानक झालेल्या आघाताने तुकया दचकला. तो सावरायच्या आत मास्तरांनी दोन जोरदार मुटके त्याच्या पाठीत घातले. मग मात्र तुक्या चिडला. असला मार त्याला किरकोळ होता. त्याच्या बापाच्या मारापुढे हा मार मंजे सुंदरीचे मुके. पण मारापेक्षा वर्गात आपल्या इज्जतीचा भाजीपाला होत आहे याचा त्याला जास्त राग आला. चिडून तुंबलेल्या रेड्यासारखा मास्तरकडे पाहत तुक्या गुरगुरला.

“मास्तर आपल्या अंगाला हात लावायचं काम नाही सांगून ठेवतो. माझा बा आला मंजी तुमच धोतर जाग्यावर ठेवायचा नाही.”

मास्तर आणखीनच चिडले. पण त्यांच्या डोळ्यापुढे तुक्याचा बाप सावळा मांग उभा राहिला. त्या दैत्यासारख्या काळ्याकभिन्न माणसाची आठवण होऊन त्यांनी हात आखडला आणि तोंडाचा पट्टा सुरु केला.

“सुक्काळीच्या मला दम देतो काय? भडव्या आन तुझ्या बा ला बोलावून बघतोच एकदा.”

म्हणत मास्तरांनी तुक्याचे बखोटे धरून त्याला वर्गाच्या बाहेर काढले.

थोड्या वेळाने तुक्या आणि त्याचा बा वर्गात दाखल झाले.
“कोणच्या मास्तराने मारल र माझ्या गरीब वासराला” अशी गर्जना करत तो पहाड मास्तरांच्या पुढे ठाकला आणि इतक्या वेळ मनात जुळवा जुळव करून ठेवलेले त्याला बोलायचे शब्द मास्तरांच्या घशातच अडकले.

“अहो सावळाराम तुमचा तुकाराम तसा गरीब आहे. अत्यंत सालस मुलगा. पण हल्ली बिघडत चाललाय हो.”
“का काय केले त्यान?”
“अहो तो सिगरेटी ओढतो”
“साळत?”
“अहो शाळेत नव्हे पण ......”
“साळत न्हाय मंजी इशय संपला. फूड बोला.”
“अहो पण कुठे जरी झाल तरी सिगारेट ओढन चांगल का?”
“मास्तर त्यान चुरी करून शिग्रेटी आणल्या का?”
“अहो चोरी नाही केली पण .....”
“हे बघा मास्तर, तुमास्नी एकडावच सांगून ठिवतो. आश्या फालतू गोष्टीपाय तुमी मला पुन्यांदा साळत बलावू नगासा. आज आर्दी मजरी बुडली माजी. पुन्यांदा जर माज्या कामाची खोटी किली तर म्या हाजरी तुमच्याकडन वसूल करन.”
“चल र तुक्या”

म्हणत सावळा तुक्याला घेऊन बाहेर पडला. मास्तर थक्क आणि हतबुद्ध होऊन ते गेले त्या दिशेने पाहत राहिले.
टपरीपाशी आल्यावर सावळाने प्रेमाने तुक्याला जवळ घेतले.
“तुक्या आर शिग्रेट वडायला तू काय मामलेदाराची औलाद लागून गेलास व्ह्य भाड्या. लका तुला वडायची तर माज्यावानी बिडी वडत जा की मर्दा.”

अस म्हणून चंची सोडत त्यातन रुपया काढून त्याने तुकयाच्या हातावर ठेवला आणि बापाची चप्पल पोराच्या पायात आल्यावर बाप जसा प्रेमाने पोराकडे बघतो तसा त्याच्याकडे बघत म्हणाला.

“जा आपल्या दोगानाबी एक मुनसी बिडीचा कट्टा घिवून ये घराकड. आज मरू दी तकड साळा. लय किरसुन्या वळाच्या पडल्याती आज.”
©सुहास भुसे