About

Friday 14 August 2015

कुंतीचे रहस्य

     कुंतीला पुत्र कसे झाले याची मोठी रोचक मिथककथा सांगितली जाते. या मिथककथेनुसार दुर्वास ऋषीच्या यज्ञात एक वर्षभर रात्रंदिवस कुंतीने दुर्वासाची सेवा केली. त्याचा यज्ञ संपन्न झाला तेव्हा दुर्वासाने प्रसन्न होऊन कुंतीला देवाहुती मंत्राची दीक्षा दिली. या मंत्रानुसार कोणत्याही देवाचे स्मरण करून या मंत्राचे उच्चारण केले तर तो देव तिच्या पोटात त्याचा गर्भ उत्पन्न करून जाणार अशी त्यात शक्ती होती.
   
     तर दुर्वास गेल्यावर लगेच कुंतीला या मंत्राचा प्रयोग करून बघण्याची इच्छा झाली व तिने सूर्याचे स्मरण केले. यातून तिला कुमारी असताना अर्थात विवाह झाला नसताना कर्ण हा पुत्र झाला. पण बदनामीच्या भीतीने कुंतीने त्याला अश्वनदीत सोडून दिले. त्याचा त्याग केला.

     त्यानंतर तिचा विवाह पांडू सोबत झाला. हा पांडू एकदा मृगया करण्यासाठी वनात गेला असताना तिथे किंदम नावाचा ऋषी हरणाच्या रुपात आपल्या प्रेयसी बरोबर संभोग करत होता. पांडूने त्याला बाण मारला. अर्थात त्याला ते हरीण म्हणजे किंदम ऋषी आहे हे माहित असण्याचे कारण नाही. तर यावर क्रोधीत होऊन मरता मरता किंदम ऋषीने “ तू संभोग लालसेने जेव्हा तुझ्या स्त्रीला जवळ घेशील तेव्हा तूला माझ्यासारखाच तडफडून मृत्यू येईल “ असा शाप दिला.

     या शापामुळे पांडूला विरक्ती आली व तो कुंती आणि माद्री या आपल्या दोन नवविवाहित पत्नी घेऊन वनात निघून गेला. काही काळ गेल्यावर त्याला पुत्रलालसा निर्माण झाली. परंतु तो स्वत: तर संभोग करू शकत नव्हता. तेव्हा कुंतीने देवाहुती मंत्राच्या सहाय्याने यम वायू व इंद्र यांच्यापासून अनुक्रमे युधिष्ठर भीम व अर्जुन हे पुत्र उत्पन्न केले. पुढे माद्रीलाही असेच नकुल सहदेव हे पुत्र झाले.

     आता थोडस या मिथक कथेकडे डोळसपणे पाहू. अस वर दिल्यावर किंवा प्रसाद म्हणून आंबा वगैरे खाल्यावर मुल होत नाही त्यासाठी स्त्री व पुरुष यांच्यात संभोग झाला पाहिजे इतके प्राथमिक वैज्ञानिक ज्ञान आपल्याला आले आहे. विषयात शिरण्याच्या आधी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की महाभारताचा काळ हा हजारो वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हाच्या वैदिक धर्मातील समजुती व समाजमान्यता या निराळ्या होत्या. द्रौपदीच्या उदाहरणावरून असे दिसते की त्याकाळात बहुपतित्व हे वैदिक धर्मसंमत व समाजमान्य होते.  जर अपत्य होत नसेल तर धर्मसंमत असे काही उपाय होते. त्यातलाच एक उपाय म्हणजे नियोग पद्धती. या पद्धतीत जर एखाद्या स्त्रीला नवऱ्यापासून अपत्य होत नसेल किंवा तिचा नवरा अपत्य देण्यास अक्षम असेल तर परिवारातीलच कोणाकडून उदा. दीर वगैरे तरी किंवा तशी उपलब्धता नसेल तर रक्ताच्या कोणाकडून तरी त्या स्त्री ला अपत्य प्राप्ती करता येत असे.

     याचे एक उदाहरण भीष्माची आई व कौरव पांडवांची पणजी सत्यवती. तिला नियोग पद्धतीने पराशर ऋषी पासून व्यास हा पुत्र झाला होता. पुढे सत्यवतीचा पुत्र विचित्रवीर्य अकाली मृत्यू पावला. त्याच्या दोन बायका अंबिका व अंबालिका या निपुत्रिक होत्या. तेव्हा आपला कुरु वंश बुडू नये म्हणून सत्यवतीने नियोग विधीने नातू उत्पन्न करण्याचा निर्णय घेतला. तिने आपला पुत्र भीष्माला आधी विचारले पण त्याने ब्रम्हचर्यपालनाची भीष्मप्रतिज्ञा केली असल्याने या गोष्टीला नकार दिला. मग तिने अंबिका व अंबालिका यांचा दीर, विचित्रविर्याचा भाऊ व आपला मुलगा व्यास याला आपल्या सुनांसोबत व त्याच्या वहिन्यांसोबत संभोग करून अपत्यप्राप्ती करण्याची आज्ञा केली. मग व्यासाने आधी अंबिकेसोबत संभोग केला. त्यावेळी अंबिकेने व्यासाचे दाढी भस्म असे उग्र रूप बघून डोळे ,मिटून घेतले. यावर रसभंग होऊन व्यासाने तिला तुला अंध पुत्र होईल असा शाप दिला. त्यानंतर अंबालिकेची बारी आली. ती व्यासासोबत संभोग करताना भीतीने पांढरी पडली त्यामुळे तिला तुला पंडू पांढूरका पुत्र होईल असा शाप दिला.( कमाल आहे कि नाही या व्यासांची ) तर हे दोन पुत्र म्हणजे धृतराष्ट्र व पांडू. यातला शापाचा प्रसंग मिथक असला तरी नियोगाला असलेली वैदिक धर्माची राजमान्यता ही दोन उदाहरणे अधोरेखीत करतात.

व्यासाचे उग्र रूप पाहुन अंबिका भयभीत झाली


     वैदिक धर्माचे हे तात्कालिक स्वरूप लक्षात घेतले असता कुंतीला पुत्र कसे झाले असावेत याचा तर्क करता  येतो. पांडूचा शाप म्हणजे पांडूचा षंढपणा लपवण्यासाठी केलेली मिथककथा आहे. मग कुंतीला आपल्या सासूने व आजेसासूने जो नियोग विधीचा मार्ग अवलंबला त्या मार्गावरून जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि हे त्याकाळी वैदिक धर्मसंमत व समाजमान्य होते हे ही ध्यानात घ्यावे. वनात असताना त्याकाळी हिमालयात वास्तव्य असणाऱ्या उंच, धिप्पाड, गौर, पितकेशी व शूर असणाऱ्या जमातीतील काही पुरुषांपासून तिला हे वीरपुत्र झाले. या निरोग विधियुक्त संभोगात इतर पुरुषांचा वापर झाला. अर्थात कुरु घराण्यातील व्यक्तीचा नाही.  नियोग पद्धती वैदिक धर्माला मान्य असली तरी पांडव हे आपल्या रक्ताचे नाहीत म्हणजे कुरु नाहीत म्हणून दुर्योधन त्यांना विरोध करत असे हा ही संदर्भ महत्वाचा.

     नंतरच्या काळात धर्मकल्पना विवाह पद्धती बदलल्यानंतर ही कुंतीची कथा काही लोकांना व्यभिचार कथा वाटू लागली व हे टाळण्यासाठी या कथेला देवाहुती मंत्राचे व दैवी वरदानाचे अभेद्य कवच देण्यात आले.

     आता राहिला कर्णाचा विषय. सुमारे एक वर्ष दुर्वासाची रात्रंदिवस सेवा केल्यावर दुर्वास गेल्यावर लगेच कुंतीचे गर्भवती होणे व पुढे कुमारी असताना कर्णाला जन्म देणे हे कर्ण हा कुंतीला दुर्वासापासून झालेला पुत्र होता हे कळण्यासाठी फार खोलात जाण्याची गरज पडत नाही.

( संस्कृतीरक्षकांसाठी विशेष टीप – सदर लेख फक्त सत्य व कुंतीच्या वरदानाच्या मिथकाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी आहे. यात कुंतीची बदनामी करण्याचा हेतू नाही. )

-सुहास भूसे


No comments:

Post a Comment