About

Friday 25 October 2019

शरद पवार नावाचा झंझावात

या निवडणुकीचे सर्वात ठळक वैशिष्ट्य राहिले ते म्हणजे 79 वर्षांच्या शरद पवार साहेबांनी भाजपच्या सर्वंकष शक्तीशी दिलेली एकाकी, चिवट झुंज...

भाजपची केंद्रात सत्ता आहे, देशातील बहुतांश राज्यातही भाजपच सत्तेवर आहे. जवळपास सर्व स्वायत्त संस्थांवर देखील प्रत्यक्ष,अप्रत्यक्षरित्या भाजपचेच नियंत्रण आहे. भाजपच्या मागे धनशक्ती एकवटली आहे. EVM देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे.

अशा परिस्थितीत भाजप पराभुत होऊच शकत नाही. भाजपने उभे केलेले दगडदेखील बिनदिक्कतपणे निवडून येतातच अशी सर्व जनतेची धारणा बनली होती. जो विरोध करेल त्याला प्रसंगी ED ची भीती घालुन, प्रसंगी पक्षात यायला भाग पाडून, पैसा, पद, तिकीट यांची लालूच दाखवुन, साम दाम दंड भेद नीती वापरून भाजप गप्प करते असा अनुभव जनता रोज घेत होती.

विजयनगरच्या विध्वंसानंतर ऐत्तदेशीयांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत होता. परकीय मुस्लीम शासक = विजय असं समीकरणच बनलं होत. यांचा पराभवच होऊ शकत नाही, हे लोक अजिंक्य आहेत ही लोकांची पराभूत मानसिकता बनली होती.

पण पौगंडावस्थेतील छत्रपतींच्या इटुकल्या सैन्याने पुरंदरच्या लढाईत आपली चुणूक दाखवली. आणि शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच बादशहाचे सैन्य जीव खाऊन पुढे पळतेय आणि ऐत्तदेशीय सैन्य त्यांचा पाठलाग करतय असं उलट चित्र लोकांनी बघितलं. त्या एका छोट्याश्या विजयाने लोकांना हुरूप आला. बादशाही सैन्याची शेकडो-हजारो वर्षांची दहशत लुळी पांगळी पडली.

त्याच महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला शरद पवार नावाचा तेल लावलेला पैलवान वयाच्या 79 व्या वर्षी भाजपच्या अनिर्बंध सत्तेविरोधात शड्डू ठोकून उभा ठाकला आणि पाहता पाहता राज्यातले चित्र बदलले. पवार साहेबांच्या राज्यव्यापी झंझावाती दौऱ्याना तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. साहेब नुसते भाषणाला उभे राहिले तरी लोकं टाळ्या व शिट्ट्यांचा कडकडाट करत होती. सर्व सभा प्रचंड गर्दी खेचत होत्या.

भाजपच्या सत्तेविरोधात लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
पण कोण आहे असा जो झुकणार नाही?
जो विकला जाणार नाही ?
जो घाबरणार नाही ?
कोणाच्या मागे आपण एकवटावे ?
कोण तारेल आपल्याला या परिस्थितीतून ?
जनतेच्या या प्रश्नांना उत्तर मिळाले. "शरद पवार"
आणि पाहता पाहता साहेबांच्या मागे जनतेची सद्भावना एकवटू लागली. एरवी पवार साहेबाना विरोध करणारे विचारवंत, पत्रकार देखील पवार साहेबांच्या धडाडीचे चाहते झाले व त्यांनीही आपल्या सद्भावना साहेबांच्या मागे एकवटल्या.

जवळपास सर्व शिलेदार ऐन वेळी दगा देऊन पक्ष सोडून गेलेले असताना देखील पवार साहेबांनी एकाकी लढा देऊन आघाडीला शतकाच्या जवळ नेऊन ठेवले. हा एक परिपूर्ण विजय नसला तरी ही एक फार मोठी अचिव्हमेंट आहे. यामुळे भाजप विरोधात असलेल्या जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे की सारं काही संपलेलं नाही. बदल होऊ शकतो. भाजप पराभुत होऊ शकतो.

पवार साहेबांनी लोकांना दिलेला हा विश्वास हे या निवडणुकीचे सर्वात मोठे फलित आहे. तसेच ऐन वेळी पक्ष सोडून गेलेल्या गद्दार उमेदवारांचा पराभव करून जनतेने देखील दाखवून दिले आहे की तत्वनिष्ठ व वैचारिक राजकारण अजूनही जिवंत आहे. आणि जनतेला तेच आवडते, जनता त्यालाच साथ देईल.
©सुहास भुसे