About

Thursday 11 October 2012

कर्मकांडाचा अतिरेक- २


कर्मकांड आणि वंशश्रेष्ठत्वाचा सिद्धांत हे हिंदू धर्मावरील सर्वात मोठे कलंक आहेत. तथापि यात धर्माच्या शिकवणुकीचा काही सबंध नाही हे ही तितकेच खरे. ही तात्कालिक शोषणाधारित समाजव्यवस्थेची देणगी आहे . कर्मकांडांचा पायाच मुळी शोषण हा आहे. समाजातील पुरोहितवर्गाची पिढ्यान पिढ्या कष्ट न करता पोटाची खळगी भरण्याची त्यांच्या लबाड आणि धूर्त पूर्वजांनी करून ठेवलेली ती सोय आहे. मात्र या स्वघोषित धर्ममार्तंडानी केलेल्या हरामखोरीचा ठपका मात्र हिंदू धर्मावर ठेवला जातो. सर्व ब्राह्मण आणि बहुजन समाजातील सच्च्या हिंदू धर्म प्रेमींनी आपला धर्म म्हणजे नेमक काय आहे ?आपल्या धर्माचे तत्वज्ञान काय आहे ?धर्माचरण याचा हिंदू धर्माच्या भूमिकेतून अर्थ काय ?ही सर्व पूर्वपीठिका नव्याने समजून घेण्याची गरज आहे.

    




कर्मकांडाचे स्तोम शोषणाधारीत समाज व्यवस्थेतून माजवण्यात आले आहे. लोकांच्या मनावर देव धर्म आणि कर्मकांड या त्रिसूत्रीचा असा जबरदस्त पगडा बसवण्यात आला आहे कि लोक आजही त्यातून बाहेर यायला तयार नाहीत. शतके लोटली ,अनेक विचारधारा आल्या आणि गेल्या ,पण त्यांनाही हा कर्मकांडाचा पगडा लोकांच्या मनावरून पूर्ण पणे पुसून टाकता आला नाही .या कर्मकांडाला विरोध करणारे पहिले बंडखोर विचारवंत तत्वज्ञ बहुधा चार्वाक असावेत. तथापि त्यांची विचारधारा काही धर्मधुरिणांना मानवली नाही. चार्वाकांना त्यांनी नास्तिक आणि धर्मद्रोही ठरवले आणि धर्मराज(?) युधिष्टराच्या समोरच त्यांचा खून करण्यात आला. चार्वाक मुनीच्या लोकायत दर्शनासंदर्भात मी सविस्तर लिहिणारच आहे पुढील लेखात. विचार दाबणे आणि वेगळे विचार मांडून शोषण कर्त्या पुरोहित वर्गाचे पितळ उघडे पाडणा-यांची मुस्कटदाबी करण्याची परंपरा एकंदरीत खुपच जुनी असल्याचे यावरून लक्षात आलेच असेल ...चार्वाकांपासून ते तुकारामांपर्यंत.

    

या सर्व गोष्टींचा हिंदू धर्मावर खुपच विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. आणि पर्यायाने देश ,काळ ,इतिहास यावरही. सध्याच्या भारतीय समाजामध्ये जी एक षंढ वा पराभूत मानसिकता आढळते तिचे बीजे या कर्मकांडप्रधान व्यवस्थेत आहेत. माणूस जन्मल्यापासून जी त्याच्या मागे कर्मकांडे लागतात ती तो मेला तरी त्याचा पिच्छा सोडत नाहीत. होम-हवन,पूजाअर्चा,वेगवेगळ्या नाना देवतांना संतुष्ट करण्यासाठी करावे लागणारे नाना शास्त्रोक्त(?) विधी अशा गोष्टी त्याला आयुष्यभर सश्रद्ध भावनेने करत राहाव्या लागतात. आणि तो मेला तरी त्याची सुटका नाही या कर्मकांडाच्या फे-यातून. परत दशक्रिया विधी आहेत,श्राद्ध आहे. धर्ममार्तंड महाब्राह्मणांच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी सर्वसामान्य माणसाने आयुष्यभर राबत राहावे अशीच एकंदरीत या कर्मकांड प्रधान व्यवस्थेची रचना करण्यात आलेली आहे. ही सर्व हिंदू धर्माची अनौरस अपत्ये आहेत. मूळ विशुद्ध हिंदू धर्माच्या विचारधारेचा आणि या संकल्पनांचा काडीमात्रही सबंध नाही. नाना पुराणे आणि त्यातील कर्मकांडाचा उदो उदो करणा-या भाकडकथा या पुरोहितब्राह्मण वर्गाच्या पाताळयंत्री, लबाड पूर्वजांनी आपल्या वंशजांची कष्ट न करता लोकांचे शोषण करून जगण्याची करून ठेवलेली सोय आहे. या परता दुसरा कोणताही सिद्धांत असल्या बुळ्या कल्पनांच्या समर्थनार्थ मदतीला धावणार नाही. आणि वरून याला विरोध करणा-यांचे काय होईल याच्यासाठी धमक्या आणि अनेक शिक्षा या भाकडकथा सांगणा-या पुराणांतून लिहून ठेवलेल्याच आहेत. सत्यनारायणाची कथा याचे उत्तम उदाहरण म्हणून पाहता येईल. कर्मकांडाकडे दुर्लक्ष वा त्याची अवहेलना करणा-यांची काय गत होते आणि अशा कथित चुका दुरुस्त करून कर्मकांड पार पडल्यानंतर त्याचे तत्काळ फळ कसे मिळते याची ही कथा म्हणजे या सर्व कर्मकांड प्रधान व्यवस्थेची प्रातिनिधिक कथा म्हणूनही पाहता येईल. इतकी प्रचंड हास्यास्पद कथा दुसरी नसावी बहुधा.


प्रयत्नवादाला कर्मकांडी विचारधारेत स्थान नाही. प्रत्येक गोष्ट विधिलिखित आहे. पूर्वजन्मीच्या सुकृतानुसार दैव आपणास या जन्मात फरफटवत असते. विविध कार्यांच्या सिद्धीसाठी मुहूर्त ,वास्तुशांती ,सत्यनारायण ,विविध देवतांची तुष्टी अशा गोष्टी महत्वाच्या असतात. चिकाटी ,ध्येयनिष्ठा ,बुद्धिमत्ता ,कर्तव्यतत्परता अशा गुणांना मग कवडीमोल स्थान उरते. कितीही प्रयत्न केला आणि तुमच्या प्रयत्नाला जर कर्मकांडाचे अधिष्ठान नसेल तर कार्यसिद्धी होणे दुरापास्त !अनेक परकीय आक्रमकांनी हिंदुस्थानवर हजारो वर्षे अधिराज्य गाजवले ते या कर्मकांडाने खिळखिळ्या केलेल्या ऐत्तदेशियांच्या दुर्बल मानसिकतेचा फायदा घेऊनच. आणि लोकांना कर्मकांडाच्या जाळ्यात गुरफटवून त्यांचे शोषण करणारे हे पुरोहित भाट 


"दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान पुरयितुं समर्थ:" 



अशी आक्रमक मुस्लीम सम्राटांची लाचार स्तुती करत त्यांचे तळवे चाटत बसले. आणि हिंदुस्थान ला गुलामगिरीच्या खाईत लोटण्याचे प्रमुख कारण बनले.











यासंदर्भात चार्वाकाच्या लोकायत दर्शनातील एक श्लोक इथे उद्धृक्त करण्याचा मोह आवरत नाही. कर्मकांडे आणि त्याच्या कर्त्यांवर अतिशय भेदक पण यथार्थ टीका त्यात केली आहे.

‘अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम्‌ ।
बुद्धिपौरुषहीनानां जीविका धातृर्मिता ॥२॥’

अर्थात – ‘अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदंड (साधूंची क्रिया), शरिराला राख फासणे - बुद्धी आणि पौरुष नसलेल्यांच्या उपजीविकेसाठी विधात्याने (या सर्व गोष्टी) निर्माण केल्या आहेत.’



दान करणे हा पुण्य कमवण्याचा सर्वात सोपा राजमार्ग. या असत्य आणि भ्रामक कल्पनेने पुराणकाळापासून अनेकांना नागवल्याचे आपणास ज्ञात असेलच. सामान्यांच्या खिशाला तर आयुष्यभराचे छिद्र या कल्पनेने पडून ठेवलेलेच आहे पण अनेक राजे-राजवाड्यांचे खजिने देखील रिते केल्याचे अनेक दाखले देता येतील. एखाद्या दरोडेखोराला अनेक सायास करून मिळणार नाही इतकी संपत्ती या लबाड पुरोहितांनी या षडयंत्री कल्पनेचा वापर करून मिळवल्याचे दिसते. दान दक्षिणा असल्या फालतू कल्पना म्हणजे सामान्यांचा बुद्धिभेद करून त्यांच्या घामाच्या पैशावर घातलेला धडधाकट दरोडाच नाही तर दुसर काय आहे ?सत्पात्री दान करावे (म्हणजे ब्राह्मणाला) आणि ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ट या दोन्ही परस्परविरोधी कल्पना वंशश्रेष्ठत्व दानधर्म या दोन्ही गोष्टींसंदर्भात विचारवंतांना चीड आणणा-याच आहेत .



हिंदू धर्म म्हणजे एक सांस्कृतिक विचारधारा आहे ही कल्पना ज्यावेळी आपण स्वीकारतो तेव्हा या समाजात अव्यवस्था अनीती माजवणा-या असल्या संकल्पना नाकारणे आणि त्यांचे समूळ उच्चाटन करणे ओघानेच आले. आणि कर्मकांडाला विरोध करताना ज्यांच्या हितसंबधांना यातून बाधा येणार आहे ते वर्षानुवर्षे लोकांचे शोषण करून त्यांचे रक्त पिवून माजलेले डास याला कडवा विरोध करणार यात शंकाच नाही. कर्मकांड वगळून हिंदू धर्माचे तर्काधीष्टीत तत्वज्ञान सांगणारे ,यांसदर्भात मार्गदर्शक ठरू शकेल अश्या चार्वाक दर्शनासबंधी पुढील लेखात लिहीन. तूर्त विराम घेऊ ...


 - सुहास भुसे 

( रोखठोक साठी )


         

14 comments:

  1. या लेखाच्या फेसबुक वरील लिंक वर आलेल्या माझ्या मित्रांच्या काही जबरदस्त कमेंट इथे पोस्ट करत आहे ...
    ..
    माझा एक कवी मित्र लबाड बोका ..
    ..
    ठाऊक आहे चांगलंच मला
    काय द्यायचं पितरांना
    मला आगाऊ सल्ला द्यायची
    गरज नाही इतरांना

    पितर होते पूर्वज माझे
    मी आहे वंशज त्यांचा
    करतात नसती उठाठेव साले
    खाण्याशीच संबंध ज्यांचा

    नाही घालणार गावजेवण
    नाही करणार वायफळ खर्च
    मीच मरतोय उपाशी इथे
    नाही काढणार आता कर्ज

    नको मिळू दे मुक्ती त्यांना
    पडू दे तशीच त्यांनाही भ्रांत
    मी ही मरून जाईन तिकडेच
    सगळ्यांचाच जीव होईल शांत

    --- लबाड बोका

    ReplyDelete
  2. विजय खाडिलकर लिहितात ..
    ..
    पितर आणि इतर यात अंतर सारखेच असते!
    दोघही जवळ नसतात! एक वरून, दुसरा दुरून बघत असतात!
    धर्म तत्वावर तर समाज वर्म तत्वावर चालतात!
    धर्माचे मर्म समजून वर्म जाणले की सगळे गणित सुटते!
    ७०० वर्षांपूर्वी संन्याशाच्या पोराने विसर्जित केली जात-पात,
    तो धर्म पाळतो त्याची हेटाळणी आपणच करतो!
    कारण धर्म-मर्म-वर्म यात आपण गल्लत करतो!

    ReplyDelete
  3. आणि एक अभ्यासू मित्र शशांक पेंडसे लिहितात ..
    ..
    • हेमाडपंत या बामनाने कर्मकांडाचे मार्ग दर्शन करण्यासाठी आपल्या " चातुरवर्णचिंतामणी " या ग्रंथाचा " व्रतखंड " हा भाग रचला. त्यान वर्षाला तीन हजार व्रते करण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत. दिवसाच्या कुठल्या प्रहराला कोणत्या देवाचे व्रत करावे. ,त्यासाठी कोणते ब्राम्हण बोलवावेत ,त्यांची संख्या किती असावी ? देवाला नैवद्यासाठी कोणते पक्क्वान्न करावेत, याची सर्व माहिती या ग्रंथात आहे. दिवसाचे प्रहर आठ असतात. पण या ग्रंथात किमान सहा वेळा व जास्तीत जास्त दहा वेळा देवता विषयक कर्मकांडे करावीत असे सांगितले आहे. प्रत्येक कर्मकांडाचा देव वेगळा ! त्याचे ब्राम्हण वेगळे. ! त्यांच्या नैवद्य|ची प्क्क्वान्ने वेगळी आणि दक्षिनेचे प्रकार वेगळे. ! श्रीमंत गृह्स्ताकडे दिवसातून दहा बारा कर्मकांड होत असत.
    • अशा प्रकारे पूजाविधी केले तर देव संतुष्ट होतो व यजमानाला सुख देतो. असा युक्तिवाद क
    • रण्यात येई. या शिवाय विशिष्ट इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून करावयाची व्रते होती. धन प्राप्ती, पुत्रप्राप्ती, रोग मुक्ती, दारिद्र्य निवारण, वास्तू शांती, त्या अगोदरचे भूमी पूजन, विहीर खणायची असो कि घरासाठी पाया खणायचा असो त्यासाठी पूजा सांगणारा ब्राम्हण बोलाविला पाहिजे. विवाहापूर्वी ज्या त्या जातीचे पुरोहित असत. ब्राम्हण यांनी त्यांचा अधिकार आपणाकडे घेतला. गर्भधरणा झाल्यापासून मरेपर्यंत अनेक कर्मकांडे या ग्रंथाने सांगितली. मेल्यावर सुद्धा या कर्मकांदातून सुटका नसे. प्रेत घराबाहेर काढताना एक विधी, प्रेत स्मशानाच्या अर्ध्यावाटेवर गेले कि दुसरा विधी, प्रेत जळताना तिसरा विधी, त्या नंतर दर दिवसाचे पिंडदान दहा बारा दिवस. मग वर्षश्राद्ध .हि श्राध्ये मृताचा पुत्र मरेपर्यंत दरवर्षी करावयाची. मग हा मृतपुत्र मेला कि त्याच्या नावाने या मृताच्या पुत्राने करावयाची. या नंतर शुभ शकून - अपशकून, यासाठी करावयाची कर्मकांडे ,पालीचे चुकचुकणे , कावळ्याचे ओरडणे, डोळ्यांचे स्फुरण पावणे, शिंक कुठल्या दिशेने ऐकू आली, या सारखे प्रकार ,शकून-अपशकून|च्या वर्गात मोडत. शुभ शकून असला तरी कर्मकांड करावे लागे. कारण काय तर त्या शकुनाच्या योगे जे शुभ मिळायचे त्यात कसला व्यत्यय येवू नये म्हणून देवाने ल्क्ष पुरवावे व जर अशुभ फळ मिळणार असेल तर ते खुद्द देवानेच निवारण करावे म्हणून.!
    • या सगळ्या कर्मकांड|मागे उद्देश असा कि अन्य समाजाची संपत्ती ब्राम्हण यांच्या घरी आणणे. यांत लोकांच्या हिताची भाषा हि फसवणुकीची होती / आहे.
    वाचक मित्रानो आपण जरा विचार करा आणि हे ढोंगी पाखंड फेकून द्या, आणि स्वतंत्र व्हा ... आझाद व्हा...

    ReplyDelete
    Replies
    1. असे लेख वर्तमानपत्रात दिल पाहिजे

      Delete
    2. आपण खूप छान विचार मांडले...
      चांगल्या विचार प्रसाराला गती फार कमी असते...

      खूप छान..
      खूप छान..

      Delete
  4. खरच छान लेख आहे हे समाजापर्यंत पोहचणे अत्यंत गरजेचे आहे.

    ReplyDelete
  5. धन्यवाद शिवशाही ..
    हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा मि प्रयत्न करत आहे .
    त्याचाच एक भाग म्हणजे हा ब्लॉग आहे .
    कर्मकांड , जातीभेद रहित जीवनाभिमुख विज्ञानाभिमुख एकजीव हिंदू समाज हे माझ स्वप्न आहे .

    ReplyDelete
  6. उत्कृष्ट पणे आपण हा विषय मांडला आहे सुहास साहेब, काही दिवसांपूर्वी असेच विचार मी पण फेसबुकवर मांडले रोखठोक , १००% ब्राम्हण समाजाने कडा विरोध केला, ह्यांच्या भामटेगिरी ला विरोध केला कि बोंब ठोकतात कि धर्मा मध्ये फुट पाडतो , मग काही आपले हि अर्धवट धर्माभिमानी बाम्नांच्या काव्याला भुलतात आणि मग बामणांची पाठराखण करणे चालू करतात . खरं तर ह्या कर्मकांडा मुळेच देश धर्म समाज एवढच नाही आपले देव पण विभाजित झाले आहेत .
    मला उत्कंठा आहे आपल्या हिंदू धर्मासाठी कि १ देव, १ धर्म आणि १ देश .

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद बाबू घाग जी
      अगदी नक्कीच असे झाले असेल ...
      या पुरोगामी विचारांना होणारा प्रतीगाम्यांचा विरोध
      या विचारांच्या इतकाच प्राचीन आहे .

      Delete
  7. जगदीश नाईक13 December 2012 at 20:43

    श्रीमान सुहास भूसेजी, नमस्कार
    आपला संपूर्ण ब्लॉग वाचून काढला. तुमचे विचार फार सुस्पष्ट आहेत. ही विचारांची शुद्धता आताशा दुर्मिळ झाली आहे. स्वत:च्या संकुचित विचारसरणीत
    गुरफटलेल्या समाजबांधवांना अत्यंत संयत मन:स्थिती राखुन विचारपूर्वक राष्ट्रीय विचारधारेशी जोडण्याचे बहुकष्टदायक कार्य चिकाटीने आपण आरंभले आहे.
    याबद्दल आपण निश्चितच प्रशंसेला पात्र आहात. यापुढे नित्यनेमाने भेटत राहूच. धन्यवाद
    जगदीश नाईक

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद जगदीश जी ....................!!!
      आपल्या वानाखानीने लिखाणास नवे बळ मिळेल .
      परस्पर सौहार्द्य आणि निरोगी द्वेषमुक्त वातावरण असणारा
      जुने आणि नवे यांचा सुरेख मिलाफ असणारा आणि जीवनाभिमुख विज्ञान निष्ठ तत्वज्ञान अनुसरणारा
      हिंदू समाज या भारतवर्षात तयार होणे हि काळाची गरज आहे
      आणि या कार्यात हा खारीचा न पेक्षा मुंगीचा वाटा पेलण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न .
      पुनश्च धन्यवाद ..........!!

      Delete
  8. राघवेंद्र देशपांडे10 June 2013 at 21:00

    अतिशय उत्तम लेख. मी स्वतः एक ब्राह्मण आहे. अतिशय सनातनी वातावरणात वाढलो.लहानपणी,जोपर्यंत कळत नव्हत तोपर्यंत हे सर्व कर्मकांड करायचो. मी स्वतः लोकांच्या घरी सत्यनारायण करायला जायचो(शाळेत असताना). ती पोथी बडबडत राहायचो. पण नंतर स्वतःच डोकं लावून विचार करायला लागलो आणि तेव्हा या सगळ्या फालतु गोष्टीवरून विश्वास उडाला. आता तर मी पुर्णपणे नास्तिक झालो आहे. मागच्या काही वर्षात तर मी मंदिरातही गेलो नाही. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. हिंदु समाजाला कर्मकांड मुक्त होवुन एक झाल्याशिवाय आपले अस्तित्व टिकवता येणार नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद राघवेंद्रजी ..
      या कर्मकांडी संस्कृतीनेच हिंदुस्थानला गुलामगिरीत ढकलले आहे असे माझे स्पष्ट मत आहे ...
      इतिहासातील चुकांपासून किमान आतातरी आपण बोध घेऊन २१ व्या शतकाशी या विज्ञान युगाशी जुळवून घ्यायला शिकल पाहिजे ...
      आपण या ब्लॉग वरची चार्वाक दर्शन ही लेखमाला वाचावी ही विनंती ....

      Delete
  9. अंत्यंत मार्मिकपणे मांडणी केलि आहे ,खर वारस शोभता तुम्ही सुधारकांचे , तुम्ही जपलाय वारसा चावर्काचा , महात्मा फ़ुलेंचा , सावरकरांवा , आगरकरांचा सुहास जी .

    ReplyDelete