About

Saturday 19 December 2015

तुक्या अन वाश्याचे सिग्रेटायन

     रात्रीचे साडे दहा वाजले असतील. किर्र अंधार होता. वारा शांत होता. रातकिड्यांची किरकिर सोडली तर सगळ्या वातावरणात निरव शांतता दाटून राहिली होती. त्या गुडुप्प अंधारात ती दहा बारा पोरे शाळेच्या मागे असलेल्या बागेत, झाडांच्या आडोश्याला भिताडाला पाठ लावून तुक्या आणि वाश्याची वाट बघत बसली होती. सित्या, जगन्या, वामन्या, पोपट्या एकूणच दहावीच्या वर्गातले सगळे एकेक नग. सगळ्यांच काळीज डबल धडधड करत होत. डबल अश्यासाठी की त्यांनी आज मोठा धाडसी बेत योजला होता. तो कसा पार पडेल याची चिंता प्रत्येकाला सतावत होती. थोडी हुरहूर आणि उत्सुकता पण होती. आणि धडधडीचे दुसरे कारण म्हणजे या मोहिमेचा म्होरक्या तुक्या होता. तुक्या म्हणजे दहावीच्या वर्गातला सगळ्यात आडदांड पोरगा. खालच्या वर्गात दोन दोन मुक्काम ठोकत शेवटी मास्तरांनीच लाजून वरच्या वर्गात ढकललेला गडी. तो कधी काय करेल याचा काही नेम नसे. त्याची लहर फिरली की बोंबलल सगळ. त्यात त्यांनी आज १ -१ रुपया वर्गणी काढून त्याच्या हातात दिली होती. अचानक त्याची लहर फिरून तो खालच्या चौकात जाऊन त्या पैशाचे गाड्यावर अंडा आम्लेट खाऊन येण्याची देखील दाट शक्यता होती. आणि वर त्या हुंबदांडग्याला जाब कोण विचारणार? पण सोबत वाश्या असल्याने त्यांची आशा जिवंत होती. वाश्या हा तसा वर्गातला हुश्शार पोरगा. पण या तुकयाच्या नादी लागून बिघडत चालला होता. पण या बाबतीत त्याने अत्यंत वेगाने प्रगती केली होती. त्यांचे मित्र ते दोघे नसताना म्हणत सुद्धा की काही दिवसांनी तुक्याने वाश्याला बिघडवल की वाश्याने तुकयाला हेच कळणार नाही. आताची ही आयडिया पण वाश्याचीच होती. आणि तुक्यापेक्षा अद्याप तो जास्त विश्वासार्ह्य होता.

वाश्याने आज नाईट स्टडी सुरु होतानाच आपल्या गँगची मिटिंग घेऊन आजच्या मोहीमेचा आराखडा सर्वांसमोर मांडला होता. मोहीम होती ऑपरेशन भं भं भोले अर्थात सिगारेट ओढण्याची. निम्म्या जणांना तो अतिशय धाडसी बेत वाटला. निम्म्यांना तो फार धोकादायक वाटला. पण आपल्या भेदरट पणाचा तमाशा नको म्हणून त्या निम्म्यातले निम्मे गप्प बसले आणि उरलेले निम्मे जे बोलण्याच्या बेतात होते त्यांनी, तुक्या सगळ्यांकडे करड्या नजरेने सर्वांकडे बघत असल्याने गप्प बसनेच पसंत केले. वाश्याचा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर झाला. लगेच तुक्याने पुढे सरसावत सगळ्याकडून १-१ रुपया वर्गणी वसूल केली. १० ला स्टडी संपते. मग सगळ्यांनी आवरून मास्तर झोपायला हापिसात गेले की शाळेच्या मागे गुपचूप दबा धरून बसायचे आणि तुक्या आणि वाश्याने खालच्या चौकात जाऊन तिथल्या टपरीतन सिगरेटी आणायच्या असा बेत ठरला. आणि आता त्याप्रमाणे सगळे वाश्याची व तुक्याची वाट बघत बसले होते.

      पावलांचा हलकाच आवाज झाला आणि अंधारातून भस्सकन तुक्या आणि वाश्या टपकले. काळाकभिन्न, धिप्पाड तुक्या तसा अचानक दैत्यासारखा समोर आल्याने मन लावून एकाग्र चित्ताने वाट बघत बसलेला जगन्या दचकून किंचाळण्याच्या बेतात होता. पण त्याचा सासूद लागून सित्याने हलकेच त्याच्या तोंडावर हात दाबला. तुक्या व वाश्या हळूच त्यांच्या कडेला येऊन बसले. सित्याने विचारले,

“मिळाल का मटरेल?”
“थांबा की आईघाल्यानो, वाईच दम तर खाव द्या.”
म्हणत तुक्याने एक दीर्घ उसासा टाकला. हलकेच शर्टाच्या बाहीने कपाळावरचा घाम पुसत पुन्हा एक दीर्घ उसासा टाकला. या मोहिमेत किती धोका होता आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा टप्पा आपण आत्ताच कसा पार पाडला आहे याची त्याला सर्वांना जाणीव करून द्यायची होती. त्याच्या हावभाव व एकंदर हालचाली वरून सगळ्यांची तशी खात्री पटल्याची खात्री होताच त्याने सांगितले.

“आर उमशाचा बा दुकानातून जाता जाईना. उमशा कवाधरण बोंबलत होता की अन्ना जावा जेवाला, आय हाका माराली कवाधरन. पण मला आंन वाश्याला दुकानाच्या कट्ट्यावर बसलेला बघून अन्न्याला संशोय आला व्हता. तो हालचना दुकानातन. शेवटी  उमशाची आय आली तवा आन्ना गेला मग घेतल उमशाकडन हळूच मटरेल.”

अस म्हणून तुक्याने चारमिनारची दोन पाकिटे आणि काड्याची डबी काढून समोर ठिवली.

“चला मंडळी मग लागू कामाला, कोण वढणार आधी?”
म्हणत वाश्याने जवळ बसलेल्या जगन्याकडे प्रेमाने बघितले. तसा लक्ककन जगन्याच्या काळजाचा ठोका चुकला.

“थांबा मी मुतून आलो.”
म्हणत वाश्याच्या डोळ्याला डोळा न भिडवता तो हळूच उठला. आणि जरा लांब जाऊन उरकून परत बसताना मात्र वाश्यापासून लांब ओळीच्या शेवटी बसला.
“हेच्या आईच भेदरट बेन.”
म्हणून जगन्याकडे तुच्छतेने बघत वाश्याने आपली प्रेमळ नजर सित्याकडे वळवली. सित्या पण जरा बेरकी होता.
“ आर मी करतो की सुरु पण कुणाच्या बा ला माहित हाय इथ कशी वढायची ते तुक्या सोडून? आधी तुक्या तू दाव समद्यास्नी परयोग करून. मग आमी करतो बराबर.”
“आर त्यात काय इद्या बोलायची हाय. लई सोप असत. थांबा मी दावतो आधी समद्यांना. सगळे जवळ या आन नीट बघा. एकदाच दावणार हाय. पुन्यांदा इचारायचं नाही.”

सगळयांनी जवळ सरकत तुक्याच्या कडेने कोंडाळे केले. एकदाच दावणार म्हटल्यावर जगन्या काळजीने मगा मागे बसलेला सगळ्यांच्या पुढे येऊन बसला आणि अंधारात डोळे फाडून लक्षपूर्वक तुक्याकडे बघू लागला.

     तुक्याने पाकीट फोडून एक चारमिनार काढली आणि स्टाईल मध्ये तोंडात ठेवली. मग एक काडी ओढून ती पेटवली. एक जोरदार झुरका मारून धूर आत घेतला. ब्रम्हानंदी टाळी लागल्यासारखे हळूच डोळे मिटले आणि प्रसन्न चेहरा करत नाकातून हळूवार धूर बाहेर सोडला. सगळी पोरे कमालीच्या आदराने त्याच्याकडे बघू लागली. दोन चार जोरदार झुरके मारून तुक्याने डोळे उघडले. त्याचे डोळे सित्याला जीवनाचा आनंद उपभोगल्यासारखे तृप्त वाटले. मग वाश्याने सगळ्यांना एकेक सिगारेट दिली आणि ओळीने पेटवायला सुरुवात केली. जगन्या सिगारेट तोंडात न धरताच पेटवू लागला तेव्हा तुक्याने त्याच्या आई माईचा उध्दार करत त्याला सिगारेट पेटवून दिली. सुरवातीला एक दोघांना जोरदार ठसका लागला. पण हळू हळू सर्वांना जमल. भका भका सगळेजण धूर सोडू लागले. धुराचा लोट तयार होऊ लागला. जवळच ऑफिस ची खिडकी होती. आणि ऑफिसमध्ये देशपांडे मास्तर झोपले होते. ठसक्याच्या आवाजाने त्यांची झोप आधीच थोडी चाळवली गेली होती. त्यात धुराचा जळका वास त्यांच्या नाकात शिरला. मागे एकदा त्यांच्या गुराच्या गोठ्याला आग लागली होती. आणि पाडा सोडायला ते आत घुसले ते आतच अडकले.. बोंबलून घसा बसल्यावर आणि एक चतुर्थांश धोतर जळाल्यावर शेजाऱ्यांनी त्यांना कसे बसे बाहेर काढले होते. तेव्हापासून ते आगीला जाम भिऊन असत. आताही धुराचा वास नाकात शिरताच ते दचकून उठले आणि आग आग अस किंचाळत उठले. आणि इकडे तिकडे धावू लागले. थोडे शांत झाल्यावर धूर मागच्या खिडकीतून येतोय हे हेरून ते धावत शाळेच्या मागे आले. त्यांना कुठेही आग दिसली नाही. बॅटरीच्या उजेडात तिथे त्यांना काडेपेटी आणि डझनभर अर्धवट जळालेली, जळत असलेली थोटके दिसली. मग मात्र ही कसली भुताटकी असावी त्याचा त्यांना सासूद आला. आणि ते पोरे झोपलेल्या वर्गाकडे वळले. वर्गात सगळी सामसूम होती. बॅटरी फिरवून त्यांनी तुक्या आणि वाश्या आहेत का पाहिले. निरागस चेहरा करून गाढ झोपी गेले होते दोघे. मग जासूस करमचंद सारखी स्वत:शीच मान हलवत मास्तरांनी डोळे मिचमिचे करून जगन्या कुठे झोपलाय त्याचा वेध घेतला. त्यांच्या भेदक नजरेने जगन्याच्या कपाळावरचा घाम अचूक टिपला. हम्म असा सुस्कारा सोडत सकाळी याची खबरबात कशी घ्यायची त्याचा बेत ठरवत त्यांनी ऑफिसकडे प्रस्थान ठेवले. दरवाजा वाजल्याचा आवाज येताच भुतांनी डोळे उघडत एकमेकांकडे पाहिले आणि त्यांच्यात हलकीच खसखस पिकली.

     दुसऱ्या दिवशी शाळेत नेहमी  तिसरा तास असणारे देशपांडे मास्तर पहिल्याच तासाला आलेले पाहून या दहाबारा भुतांच्या काळजाचा ठोका चुकला. सगळयांनी उभे राहून मास्तरांना नमस्ते केले. मास्तरांनी कोणालाच बसायला सांगितले नाही. धोतराचा सोगा वर सावरून धरत त्यांनी टेबलावर बसकण मारली. आणि सगळ्यांकडे रोखून बघू लागले. वर्गात स्मशानशांतता पसरली. तब्बल पाच मिनिटे आपली भेदक नजर वाश्या आणि तुक्याकडे रोखून धरत मास्तरांनी निरीक्षण केले. पण त्यांच्या बेरडासारख्या मख्ख चेहऱ्यावरची रेषही न हललेली पाहून त्यांनी त्या आघाडीवरून तात्पुरती माघार घेतली.

“थांबा बेट्यानो, तुम्हाला चांगलाच हिसका दाखवतो” अस मनात म्हणत त्यांनी आपल्या पहाडी आवाजात

“जगन्या रांडेच्या ये पुढे असा इकडे”

असा पुकारा केला. जगन्याचे काळीज पुन्हा लक्ककन हलले. बळी द्यायला निघाल्यासारख हळू हळू पाय खोडत तो थरथर कापत देशपांडे मास्तर पुढे येऊन उभा राहिला. देशपांडे मास्तर एकही शब्द न बोलता नुसते त्याच्याकडे भेदक नजरेने रोखून बघू लागले. जगन्या अस्वस्थ होत थर थर कापत होता आधीच, तो आता लटालटा उडू लागला. मास्तरांनी खाडकन त्याच्या मुस्कटात भडकवली. तस जगन्याने धीर सोडला आणि भोकाड पसरले.

“मास्तर म्या काय बी केल नाय, त्येंना मी नकू मनत हुतु उं उं”
करत जगन्या हुंकारे टाकत स्फुंदू लागला.

 “त्यांना म्हणजे कोणाला रांडीच्या?”

म्हणत मास्तरांनी त्याच्या पाठीत एक जोराचा बकमा घातला. तसा जगन्या होलपाटला आणि ओरडत सगळ्यांची नावे सांगू लागला. मास्तरांनी त्या बारा जणांना बाजूला काढले. मग त्यांना धु धु धुतले. हान हान हाणले. तुडव तुडव तुडवले. शिव्यांची यथेच्छ लाखोली वाहत त्यांच्या सात पिढ्यांचा उद्धार केला. सगळ्या वर्गात धप धप असे आवाज, ओरडणे, मुसमुसणे, नाक ओढणे आणि रडणे यांचा ह्ल्लकल्लोळ माजला. वाश्याचे गोरे गाल लालभडक होऊन ते सुजले. आणि तो मारुतीरायासारखा दिसू लागला. सित्याच्या एक डोळा काळा निळा झाला. जगन्याने तर पैंट ओली केली. शेवटी मास्तर धापा टाकत शेवटी राखून ठेवलेल्या तुक्याकडे वळले. तुक्या स्थितप्रज्ञ नजरेने आपण जणू त्या गावचेच नसल्यासारखा हा सगळा प्रकार पाहत हेडमास्तर असल्यासारखा ऐटीत उभा होता. चिडून मास्तरांनी त्याच्या तोंडात एक जोरात भडकावली. अचानक झालेल्या आघाताने तुकया दचकला. तो सावरायच्या आत मास्तरांनी दोन जोरदार मुटके त्याच्या पाठीत घातले. मग मात्र तुक्या चिडला. असला मार त्याला किरकोळ होता. त्याच्या बापाच्या मारापुढे हा मार मंजे सुंदरीचे मुके. पण मारापेक्षा वर्गात आपल्या इज्जतीचा भाजीपाला होत आहे याचा त्याला जास्त राग आला. चिडून तुंबलेल्या रेड्यासारखा मास्तरकडे पाहत तुक्या गुरगुरला.

“मास्तर आपल्या अंगाला हात लावायचं काम नाही सांगून ठेवतो. माझा बा आला मंजी तुमच धोतर जाग्यावर ठेवायचा नाही.”

मास्तर आणखीनच चिडले. पण त्यांच्या डोळ्यापुढे तुक्याचा बाप सावळा मांग उभा राहिला. त्या दैत्यासारख्या काळ्याकभिन्न माणसाची आठवण होऊन त्यांनी हात आखडला आणि तोंडाचा पट्टा सुरु केला.

“सुक्काळीच्या मला दम देतो काय? भडव्या आन तुझ्या बा ला बोलावून बघतोच एकदा.”

म्हणत मास्तरांनी तुक्याचे बखोटे धरून त्याला वर्गाच्या बाहेर काढले.

थोड्या वेळाने तुक्या आणि त्याचा बा वर्गात दाखल झाले.
“कोणच्या मास्तराने मारल र माझ्या गरीब वासराला” अशी गर्जना करत तो पहाड मास्तरांच्या पुढे ठाकला आणि इतक्या वेळ मनात जुळवा जुळव करून ठेवलेले त्याला बोलायचे शब्द मास्तरांच्या घशातच अडकले.

“अहो सावळाराम तुमचा तुकाराम तसा गरीब आहे. अत्यंत सालस मुलगा. पण हल्ली बिघडत चाललाय हो.”
“का काय केले त्यान?”
“अहो तो सिगरेटी ओढतो”
“साळत?”
“अहो शाळेत नव्हे पण ......”
“साळत न्हाय मंजी इशय संपला. फूड बोला.”
“अहो पण कुठे जरी झाल तरी सिगारेट ओढन चांगल का?”
“मास्तर त्यान चुरी करून शिग्रेटी आणल्या का?”
“अहो चोरी नाही केली पण .....”
“हे बघा मास्तर, तुमास्नी एकडावच सांगून ठिवतो. आश्या फालतू गोष्टीपाय तुमी मला पुन्यांदा साळत बलावू नगासा. आज आर्दी मजरी बुडली माजी. पुन्यांदा जर माज्या कामाची खोटी किली तर म्या हाजरी तुमच्याकडन वसूल करन.”
“चल र तुक्या”

म्हणत सावळा तुक्याला घेऊन बाहेर पडला. मास्तर थक्क आणि हतबुद्ध होऊन ते गेले त्या दिशेने पाहत राहिले.
टपरीपाशी आल्यावर सावळाने प्रेमाने तुक्याला जवळ घेतले.
“तुक्या आर शिग्रेट वडायला तू काय मामलेदाराची औलाद लागून गेलास व्ह्य भाड्या. लका तुला वडायची तर माज्यावानी बिडी वडत जा की मर्दा.”

अस म्हणून चंची सोडत त्यातन रुपया काढून त्याने तुकयाच्या हातावर ठेवला आणि बापाची चप्पल पोराच्या पायात आल्यावर बाप जसा प्रेमाने पोराकडे बघतो तसा त्याच्याकडे बघत म्हणाला.

“जा आपल्या दोगानाबी एक मुनसी बिडीचा कट्टा घिवून ये घराकड. आज मरू दी तकड साळा. लय किरसुन्या वळाच्या पडल्याती आज.”
©सुहास भुसे




Sunday 29 November 2015

सत्तेचे डोळे आणि शेतकरी

आटपाट नगर होत. त्या नगराच्या बाहेर हिरवीगार बहरलेली शेते होती. शेतांमध्ये एक मोठी विहीर होती. त्या विहिरीत आजूबाजूच्या शेतकऱ्यांची गरिबांची मुले पोहोत होती. तिथे एक खाकी हाफचड्डी घातलेला मुलगा हातात कमळाचे फुल घेऊन उदास होऊन बसला होता. तो मुलगा आंधळा होता. त्याला मुलांचा कोलाहल ऐकू येत होता. त्यांचे खुशीत हसणे बोलणे ऐकू येत होते तसतसा तो अधिकच बापूडवाणा होत होता.

     वरून शंकर पार्वतीचे विमान चालले होते. पार्वतीने त्या मुलाकडे पाहिले. तिला खूप दया आली त्याची. तिने शंकराला विचारले
“अहो तो कमळ घेऊन बसलेला मुलगा इतका का उदास होऊन बसला आहे?”
शंकर म्हणाले,
“अग तो आंधळा आहे. त्याला बाकीच्या मुलांसारखे पोहता येत नाही म्हणून तो उदास बसला आहे.”
“मग तुम्ही त्याला डोळे द्या ना गडे.”
पार्वतीने शंकराकडे लाडिक हट्ट केला.
शंकर म्हणाले,
“अग बाई त्याला डोळे नाहीत तेच बरे आहे. जस ठेवलेय तस राहू दे.”
“ते काही नाही. त्याला डोळे द्या म्हणजे द्याच.”
शंकराने पार्वतीला परोपरीने सांगून पाहिले. पण ...बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्रीहट्ट. या तीन हट्टापुढे आजवर कोणाचे काय चालले आहे? अगदी देव झाला तरी नवराच तो. दिले शंकराने. त्या आंधळ्या पोराला डोळे दिले.

     काठावर उदास होऊन बसलेल्या त्या आंधळ्या मुलाला अचानक डोळे आले. तो पटकन उठला. इकडे तिकडे बघितले. आणि धाडकन विहिरीत उडी ठोकली. एक दोन मिनिटे नीट पोहोला. मग त्याने सुरु केले. याच्या अंगावर उडी ठोक. त्याच्या तोंडावर पाणी उडव. विहिरीत लाटा कर. शेतकऱ्यांची पोरे बोंबलू लागली. तसा याला अधिकच चेव आला. मग याने निराळाच कार्यक्रम सुरु केला. धर पोराची मुंडी कि बुडव पाण्यात. धर पोराचा पाय कि ओढ पाण्यात. पोरांच्या नाकातोंडात पाणी जाऊन ती गुदमरू लागली. बोंबलू लागली. विहिरीत एकच कोलाहल माजला.

     वर आपल्या विमानातून शंकर पार्वती ते पाहत होते. शंकर म्हणाले, “ बघ प्रिये, मी तुला सांगितले होते की त्याला आंधळा म्हणूनच ठेवला आहे. तेच योग्य आहे त्याला डोळे नकोच. आता काय म्हणणे आहे राणीसरकारांचे?”

      पार्वती सगळा प्रकार पाहून खजील झाली होती. ती म्हणाली,” ठीक आहे घ्या त्याचे डोळे काढून.”
इकडे त्या मुलाचे डोळे अचानक गेले. त्याला काही समजेना काय झाले. मग सावकाश तो काठावर आला. आपली हाफचड्डी घालून कमळाचे फुल हातात घेऊन परत उदास होऊन मुलांचा दंगा ऐकत काठावर बसला.

     साठा उत्तरीची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

तात्पर्य:- सत्ता आली म्हणून धर शेतकरी कि बुडव पाण्यात, धर शेतकरी की बुडव पाण्यात असा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. सत्तेचे डोळे आले म्हणून उतू नये मातु नये. डोळे जसे येऊ शकतात तसेच जाऊही शकतात.
जय भोले शंकर !!!


डिजिटल इंडियाच्या कथा

प्रसंग -१
विठोबा नाक्यावर देवबा ची वाट पाहत बसला होता. एक टेम्पो भुर्रकन समोरून निघून गेला. त्यातल्या गुरांकडे ओझरती नजर टाकत विठोबाने पानाची चंची काढली. त्याचा विडा लावून होईस्तो ५-६ असे टेम्पो भर्रकन पास झाले. तितक्यात देवबा आलाच.
“ये मर्दा घे पान” म्हणत विठोबाने चंची पुढे केली.
“मायला लइच घुरदुळ दिसतुया उद्या. आपल कस निभल र देवा?”
“मंजी कस म्हन्तूस?” देवबाने सुपारी कातरत विचारले.
“आर पानाला चुना लावास्तवर पाचसा व्हान गेली गुरे भरून इथन..उद्या कार्तिकी बाजारात चुथडा व्हणार बघ गुरांचा.”
देवबा मन लावून विडा बनवत होता तर विठोबा इकडे विचारात बुडाला. विठोबाची पंधरा एकर शेती आहे. २ गायी २ म्हशी १ करडू असा नांदता गोठा आहे. पण यंदा दुष्काळात गुरांना घालायला काडी मिळत नसल्याने त्याच्या हत्तीसारख्या गायी म्हशी उंदरासारख्या झाल्या आहेत. वैरणीअभावी त्याने आपली प्राणप्रिय गुरे विकून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपुरला उद्याचा कार्तिकी वारीचा मोठा गुरांचा बाजार असतो.
“मंग कस म्हन्तुस विठोबा.” पान तोंडात ठेवत देवबा ने विचारले.
“आर मागच्या साली माझी करडी गाय १ लाख ४० हजार मोजून आपण दोघांनीच आणली नव्हती व्ह्य. आर आता बाजार बगून तिला ३० हजार तरी येत्यात कि न्हाय अस कोड पडलय बघ.”
“आर गेल सालच गेल गेल सालीच विठोबा. आता कुत्रा खाईना गुरांना. जो तो विकत सुटलाय. घेणार कोण? पांढरा दिस उगवतोय. माणसाना काय खायला घालाव पंचत अन गायीची कुठ मया दावतू मर्दा.”
“मंग न्याची तर हायच र. माजा तर कुठ इलाज हाय. पण दीड लाखाचा माल ३० हजारात फुकून याचा म्हणून वाईट वाटतया र. बर उद्या सकाळी वारी हाय फाटे उरक लौकर. म्या हाळी देतोय.”
अस म्हणत पटकुर झटकत विठोबा जड अंतकरणाने तिथून उठला आणि गाईला शेवटचा घास द्यायला गोठयाकडे वळला.
प्रसंग - २
“अहो अनयचा परवा वाढदिवस आहे लक्षात आहे ना?”
पेपराततून बाहेर तोंड काढून लेलेंनी मान डोलावली.
“अर्थात”
“त्याला बर्थ डे गिफ्ट म्हणून मर्सिडीज बेंझ हवीय.”
लेलेंनी पेपर गुंडाळून खाली ठेवला.
“त्याला काय त्याचा बाप संस्थानिक असल्यासारखा वाटतो का? सांगा लेकाला म्हणावे खर्डेघाशी करणाऱ्या सरकारी नोकराचा पोरगा आहे तो राजकुमार नव्हे. मागच्या वाढदिवसाला फोर्ड एन्डेव्होर घेऊन दिली होती तिला काय झाले?”
लेले काकूनी एक लाडीक मुरका मारला.
“इश्श्य. संस्थानिक आणि तुमच्या रुबाबात कितीसा फरक आहे हो. आणि आता सातवा वेतन आयोग लागू होतोय. एकतर मुलगा आहे आपल्याला. त्याला नाही तर कोणासाठी करायचे?”
लेले स्तुतीने थोडेसे पाघळले.
“ठीक आहे करा मनासारखे. उद्या ३० लाख त्याच्या अकौंट ला ट्रान्सफर करतो. दोघे जाऊन घेऊन या.”
“अहो ३० नको ४० लाख ट्रान्सफर करा. उद्या बाहेर जातेयच तर हातासरशी त्या कपूर बाईसारखा डायमंड सेट घेऊन टाकते एक. केव्हाचा मनात भरलाय माझ्या.”
लेले काकुनी एक मागणी पुरे झालेली पाहून दुसऱ्या मागणीचे घोडे पुढे रेटले.
“हम्म..” असा दीर्घ सुस्कारा सोडून लेले सातव्या वेतन आयोगानुसार होणारी पगारवाढ आणी कुटुंबाच्या नव्या मागण्या याचे गणित कॉफीचे फुरके मारता मारता मनातल्या मनात जुळवू लागले.
Declaimer - वरील दोन्ही प्रसंग एकाच राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी घडत आहेत.
#डिजिटल_इंडियाच्या_कथा  

शनीदेव आणि बदलता सांस्कृतिक प्रवाह

      शनिदेव ही आपल्या तेहत्तीस कोटी देवांमधली सर्वाधिक दरारा असणारी देवता आहे. शनीची साडेसाती म्हटल की भल्याभल्यांचा थरकाप उडतो. शनीची वक्रदृष्टी ज्याच्यावर पडली त्याची खैर नसते. माणसे ती माणसे पण अगदी देवांची देखील या साडेसातीपासून सुटका नाही. त्यामुळेच सर्व देवदेवता देखील शनीमहाराजांना टरकून असल्याचे दिसते. ही वक्रदृष्टी आपल्यावर पडू नये म्हणून सर्वचजण काळजी घेतात. साडेसातीमध्ये शनीदेवांना खुश ठेऊन साडेसाती कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. विविध व्रते पूजा गंडे दोरे ताईत खडे अंगठ्या रत्ने तेल यांचा धंदा शनीदेवांमुळे तेजीत असतो. किंबहुना असे म्हणता येईल की धर्माचा ७५% धंदा याच शनीची साडेसाती या कल्पनेवर आधारित आहे. पण शनीदेवही असे वस्ताद असतात की यापैकी कशालाच ते दाद देत नाहीत. साडेसातीवाल्याला साडेसात वर्षे दे माय आणि धरणी ठाय करून सोडतात म्हणे. या साडेसात वर्षात त्याला खूप दुखांचा तर सामना करावा लागतोच शिवाय त्याला जे करेल त्या कामात अपयश येते. काही पापी नास्तिक लोक म्हणतात की समजूत म्हणजे आपल्या अपयशाचे खापर शनीदेवाच्या माथ्यावर फोडण्याची सोय आहे. म्हणोत बापडे. त्यांना समजेल साडेसातीमध्ये शनीदेवांचा इंगा. शनिदेवाच्या पुराणकथा देखील या भीतीला बळकटी मिळावी अश्याच शनीदेवांच्या क्रूरतेचे दर्शन घडवणाऱ्या आहेत. विशेषतः साडेसातीमध्ये या कथा वाचतांना तर भाविक भक्त अधिकच घाबरून जातात. व्रत नको पण कथा आवर अशी अवस्था होत असावी त्यांची.

शनीदेवाची मूर्ती देखील क्वचित कुठेतरी घडीव मानवी आकारातली असेल. नाहीतर सर्वत्र एक उंच दगड किंवा शिळा असते. ती शिळा देखील कोणत्यातरी कोपऱ्यात , रस्त्याच्या  कडेला किंवा नाक्यावर छोटेसे मंदिर असते त्यात. शनी शिंगणापूरसारखा विस्तृत चबुतरा एखाद्याच शनीशिळेच्या नशिबी. त्यांना न पूरण पोळीचा नैवेद्य असतो न कोंबडी बकऱ्याचा तिखट प्रसाद. शेंदूर तेल आणि रुईची माळ बस. कदाचित शनिदेवांच्या मागे देखील हीच साडेसाती लागली असावी.
अस असल तरी शनी हि फार प्राचीन लोकदेवता आहे बर का. भारतीय शनीदेवांचे हे भयंकरीकरण नक्की केव्हा झाले हे ज्ञात नसले तरी शनीदेव हे सर्वच काळ दुख आणि दैन्याची देवता नव्हती. जगातील विविध प्राचीन संस्कृतीत देखील शनीदेवांच्या पूजनाची परंपरा आहे. प्राचीन ग्रीक संस्कृतीत शनीदेव क्रोनस (Cronus) या नावाने ज्ञात आहेत. युरेनस (Uranus ) आणि गेया(Gaea ) यांचा मुलगा असलेला हा क्रोनस अर्थात शनिदेव पुढे देवांचा राजा बनतो. देवाधिदेव झ्यूस हा या क्रोनसचाच पुत्र. एकेकाळी ग्रीक संस्कृतीत पूजनीय असलेले शनिदेव व झ्यूस आदी देव आता मात्र ख्रिश्चन धर्माच्या प्रभावामुळे बाजूला पडले आहेत. प्रवाही लोकजीवनाचा प्राण असलेले देव देवता सध्या पुराणऐतिहासिक अभ्यासाचा विषय बनून राहिले आहेत.

ग्रीक देवता क्रोनस

हीच शनीदेवतेची कल्पना रोमनांमध्ये देखील प्रचलित होती. हा रोमन शनिदेव (Saturn) शेतीचा देव. त्याने मानवाला शेती शिकवली अस रोमन मानत. त्याची हातात खुरपे घेतलेली मूर्ती भव्य अश्या सुवर्णमंदिरात रोमन फोरमच्या मधोमघ विराजमान होती. शनिदेव हे समृद्धीचे, मुक्तीचे, साम्राज्याचे प्रतिक मानले जाई. तसेच तो काळाचा देखील स्वामी मानला जाई. रोमन साम्राज्यातील सर्व सोने नाणे आणि खजिना या मंदिराच्या तळघरात ठेवत असत. दर वर्षी डिसेंबर महिन्यात या शनीदेवाची मोठी यात्रा भरत असे. हा उत्सव सहा दिवस चालत असे. रोमनांचा हा सर्वात मोठा उत्सव होता. घरोघर जेवणावळी असत. सहा दिवस सर्वांना सुट्टी असे. सर्वजण एकमेकांना भेटवस्तू देत. एकंदरीत सगळी चैन असे. आता ते मंदीर भग्नावस्थेत आहे. त्याचे फक्त स्तंभ शिल्लक आहेत. आणि ही जत्रा आता ख्रिसमस म्हणून साजरी होते.

रोमन देवता Saturn

या शिवाय बाबिलोनिअन, सुमेरियन, मेसोपिटीयन व अनेक आदीवासी समुदाय-संस्कृतीमध्ये देखील सूर्यपुत्र शनीदेवता आढळते. अश्या प्रकारे आपल्या परंपरांचे धागे अनेक जागतिक संस्कृतीमध्ये अनेक संदर्भात गुंफलेले आढळतात. कालौघात संस्कृती बदलतात. धर्म बदलतात. भूपुष्ठरचना बदलते तत्द्वता देव आणि त्यांचे गुणअवगुण देखील बदलतात. कदाचित विधात्याचा अशाश्वततेचा नियम खुद्द देवांना देखील लागू असावा. बदल हा काळाचा आत्मा आहे या सुत्रातून देवतांची देखील सुटका नसावी.

      शनिवारी शनी शिंगणापूर येथे एका युवतीने शनीच्या चौथाऱ्यावर चढून शनीदेवाचे दर्शन घेऊन तेलही अर्पण केले. या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेचा निषेध म्हणून गावकऱ्यानी गावबंद आंदोलन पुकारले आहे. मंदिर व्यवस्थापनाने सहा सुरक्षा रक्षकांना निलंबित केले आहे. हा सर्व गरादोळ आजच्या प्रगत विज्ञान युगात व स्त्री पुरुष समानतेच्या युगात अतर्क्य व निषेधार्ह्य आहे. या शनीच्या सर्व निस्सीम पुरुषप्रधान संस्कृतीरक्षक भक्तांनी विज्ञानयुगातील स्त्री पुरुष समानता नजरेआड केली तरी जागतिक संस्कृतीच्या प्रवाहातील खुद्द शनीदेवांचे बदलते स्थान बदलते गुण अवगुण यांची पार्श्वभूमी ध्यानात घेऊन बदल हा जीवनाचा आत्मा असतो हे सूत्र मान्य करावे. आणि काळाबरोबर आपल्या अनिष्ट धार्मिक प्रथांना मुरड घालून प्राचीन हिंदू धर्माचे २१ व्या शतकात यशस्वी पदार्पण होण्यास हातभार लावावा. शनीदेव सर्वांना सद्बुद्धी देवो ही शनीचरणी प्रार्थना.

शनीच्या वैभवशाली सुवर्णमंदिराचे अवशेष: रोम 


Thursday 19 November 2015

रहे ना रहे हम : प्रियदर्शिनी इंदिरा

     आधुनिक भारताच्या इतिहासातील सर्वात वादळी व्यक्तिमत्व म्हणजे इंदिरा गांधी. अनेक भल्या बुऱ्या गोष्टींसाठी त्यांची कारकीर्द नेहमी वादळी म्हणून चर्चेत राहिली. भारतात सद्यस्थिती मध्ये अनेक प्रश्न समस्या आहेत. प्रत्येक राज्यकर्त्यापुढे त्या असतातच. देशहिताच्या निर्णयाआड येणारे अनेक दबावगट असतात. हा सर्व दबाव झुगारून देऊन प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचे दर्शन घडवत योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा राज्यकर्ता त्याचे आणि त्याच्या देशाचे नाव इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवतो. नेमक्या याच प्रकारच्या नेतृत्वाची इंदिरा गांधीनंतर भारतात सदैव उणीव भासली आहे. अनेक समस्यांवर बोलताना इंदिराजींचे विरोधक देखील खाजगीत का होईना म्हणतात कि आज इंदिराजी हव्या होत्या. यातच इंदिराजींच्या महत्तेची, एकमेवाद्वितीयतेची बीजे आहेत.

     इंदिराजींनी अनेक कठोर आणि कणखर निर्णय त्यांच्या कारकिर्दीत घेतले ज्यांची गोड फळे आज आपण चाखतो आहोत. यातला सर्वात मोठा प्रसंग बांगलादेशमुक्ती संग्राम अर्थात पाकिस्तानच्या विभाजनाचा. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने कुरापत काढत भारतावर हल्ला केला. पाकच्या हवाईदलाने आपल्या ११ हवाई तळांवर व रडार केंद्रांवर हल्ले चढवले. मग भारताने युद्ध घोषित करत १३ दिवसात मोठ मोठ्या वल्गना करणाऱ्या पाकिस्तानला बिनशर्त शरणागती पत्करण्यास भाग पाडून पाकचे विभाजन करत बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले. यावेळी प्रचंड आंतरराष्ट्रीय दबावाला झुगारून देत मोठ्या मुत्सद्देगिरीने इंदिराजींनी राजकीय आघाडीवरही बाजी मारली. अमेरिकेने इंदिराजीवर दबाव आणण्यासाठी सातवे आरमार बंगालच्या उपसागरात तैनात केले होते. पण त्यांना अखेर हात चोळत माघारी जावे लागले. एक सर के बदले हम दस सर लाएंगे वाल्यांसाठी हा प्रसंग दीपस्तंभ ठरू शकेल.

     अणुस्फोट परीक्षणाचा असाच महत्वाचा निर्णय. “आणि बुद्ध हसला” या सांकेतिक शब्दांनी प्रसिद्ध असलेला हे अणुस्फोट परीक्षण इंदिराजींच्या काळात करण्यात आले. बँकाच्या राष्ट्रीयीकरणाचा असाच एक कणखर निर्णय इंदिरांनी घेतला. ४० वर्षापूर्वी सर्व बँका या व्यापारी बँका होत्या. आजच्या प्रमाणे सामान्य माणसाला तेव्हा बँकेत प्रवेश नव्हता. बँकेत खाते उघडता येत नसे, पैसे ठेवता येत नसत अगर कर्ज मागता येत नसे. भांडवलशाही व्यवस्थेत गरीबाला केंद्रस्थानी आणत इंदिराजींनी १९६९ साली १४ व्यापारी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले. आज भारतीय राजकारणावर बड्या उद्योगपती व पैसेवाल्या धेंडांची असलेली मजबूत पकड पाहता हा निर्णय घेताना इंदिराजींना किती प्रचंड दबावाचा सामना करावा लागला असेल याची कल्पना येते.

     हरितक्रांतीच्या जननी देखील इंदिराजीच. तत्पूर्वी परदेशातून धान्याची आयात झाल्यावरच रेशनवर गरिबांना धान्य मिळत असे. पण पाणी, संकरित बियाणे, रासायनिक खते आणि हमी भावाने धान्य खरेदी या चतुसूत्री हरितक्रांतीची इंदिराजींनी घोषणा केली जणू जादूची कांडी फिरली. पंजाब हरियाना मध्ये गव्हाची विक्रमी उत्पादने निघाली. भारतातील धान्याची कोठारे ओसंडून वाहू लागली आणि सन १९७४ नंतर भारताने अन्नधान्याची आयात पूर्णपणे बंद केली ते आजतागायत. आज धान्य निर्यात करणाऱ्या २० प्रमुख देशातला भारत एक देश आहे.

     आणि एक कठोर निर्णय जो त्यांच्या प्राणाचे बलिदान घेऊन गेला. तो म्हणजे भिंद्रानवाले या खलीस्तानवादी अतिरेक्याला सुवर्णमंदिरात कंठस्नान घालण्यासाठी केलेले ऑपरेशन ब्लू स्टार. विमान अपहरण प्रसंगी अतिरेक्यांपुढे गुढघे टेकत, त्यांच्या मागण्या मान्य करत आपल्या राज्यकर्त्यांनी घातकी अतिरेक्यांना कसे सोडले ते जगाने पाहिले. अश्या पार्श्वभूमीवर इंदिराजींच्या निर्णयाचे वेगळेपण ध्यानात यावे. पाकिस्तानच्या मदतीने स्वतंत्र खलिस्तान या राष्ट्राची घोषणा करत मोठ्या शस्त्रसाठ्यासह भिंद्रानवाले सुवर्णमंदिरात लपून बसला होता. सुवर्णमंदिरातच या राष्ट्राचा ध्वज फडकवून उदघोषणा करण्याचा त्याचा बेत समजताच इंदिराजींनी लष्करी कारवाईचा निर्णय घेतला जो त्यांच्या प्राणावर बेतला. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी या कारवाईचा बदला म्हणून इंदिराजींच्या शीख अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळ्यांचा पाऊस पाडला आणि या तेजस्वी पर्वाची अखेर झाली.

     आज १९ नोव्हेंबर. या भारतमातेच्या कणखर, थोर सुपुत्रीची जयंती. या तेजस्वी विद्द्युल्लतेला विन्रम अभिवादन _/\_ .

©सुहास भुसे.


Wednesday 18 November 2015

माझे पुस्तक जीवन

     एका छोट्या गावात बालपण गेल्याने पुस्तकांच्या बाबतीत उपासमार व्हायची. म्हणजे तस बरचस मिळायचं वाचायला. पण माझी भूकच अफाट असायची. पाहुण्यारावळ्याकडे गेलो कि पहिले पुस्तके धुंडाळायचो. दिसल पुस्तक कि घाल झडप कि पाड फडशा असा एककलमी कार्यक्रम असायचा. वडील, आजोबा, काकामंडळी देखील वाचनप्रिय होती. त्यांच्या खोल्या, कपाटे धुंडाळून जुनी अडगळीत पडलेली पुस्तके शोधून वाचत बसणे चालायचे. चांदोबा, चंपक आणि कॉमिक्सचा खूप मोठा संग्रह, खूप लहान असताना असल्याचे आठवते. चांदोबातली सुंदर चित्रे बघत फैंटसी कल्पनात तासन तास रमून जाणे हा आवडता छंद होता.

     अकरावीला कॉलेजला सोलापूरला गेल्यानंतर पहिल्यांदा युद्धपातळीवर वाचनालये धुंडाळली. नेहरू होस्टेलपासून जवळच हिरांचद नेमचंद जिल्हा मध्यवर्ती वाचनालयाचा माग लागला. रूमवर गेल्यावर तिसऱ्याच दिवशी तिथे नाव नोंदवले. तीनमजली भव्य वाचनालयातली मोठाल्या हॉलमध्ये हारीने लावून ठेवलेल्या कपाटातील ओसंडून वाहणारा पुस्तकांचा खजिना पाहून अलिबाबाची गुहा सापडल्याचा आनंद झाला. चारआठ दिवसांचा उपाशी माणूस समोर पंचपक्वान्नांच ताट शिगोशीग भरून ठेवल्यावर काय करेल ?

     तर तिथे सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ६ ते ८ ही पुस्तके बदलण्याची वेळ असायची. आणि कॉलेज ७.३० ला असायचं. मी दोन तीन आठवडे पहिला तास बंक मारायचो. पुस्तक घेऊन ८.१५ पर्यंत कॉलेजवर जायचो. मग अधाश्यासारखा त्या पुस्तकाचा फन्ना उडवायचो. तेही संध्याकाळी ७ च्या आत. मग ७ वाजता ते पुस्तक बदलून दुसरे पुस्तक आणायचो. तास सुरु असताना मागे बसून वाचन साधना सुरु असायची. डबा खाताना देखील वाचायचो. जे जे काम करताना पुस्तक वाचणे शक्य असेल ते काम पुस्तक वाचतच करायचो. मला आठवते हिराचंद नेमचंद वाचनालयात एक चष्मीश ग्रंथपाल बाई होती. तिने सकाळी एक आणि संध्याकाळी एक पुस्तक नेणाऱ्या या एलियनकडे चार पाच दिवस दुर्लक्ष केले. पण एके दिवशी सकाळी आदल्या सायंकाळी नेलेली स्वामी कादंबरी मी परत करताना पाहून मात्र तिचा धीर सुटला. “ अरे सुहास, तू पुस्तकांचे नेमके करतोस काय? मी रोज बघतेय तू सकाळी एक संध्याकाळी एक पुस्तक नेतोस. आणि आज तर कहर केलास. स्वामी संपूर्ण वाचलीस एका रात्रीत अस मात्र सांगू नकोस आता” मी त्यांना भीत भीत खरेच सांगितले पण त्यांचा काही विश्वास बसला नाही. मग मात्र थोडेसे लाजून मी फक्त सकाळी आणि एक दोन आठवड्याने एक दिवस गॅप मारून पुस्तके आणायला सुरु केले.



     रद्दीच्या दुकानातून पुस्तके शोधणे हा एक असाच आवडता छंद होता. पुस्तकांचे तर भयंकर वेड. पण किंमती आवाक्याबाहेरच्या. मिळणाऱ्या पॉकेटमनीचा निम्मा धूर विकेंड पार्टीत आणि उरलेला धूर कल्पना टॉकिजवरच व्हायचा. हुतात्मा स्मृती मंदिराच्या गाळ्यात एक आणि मॅकेनिक चौकात एक या दोन रद्दीच्या दुकानातून आणि सोलापूरच्या धी वर्ल्ड फेमस मंगळवार जुन्या बाजारातून मी खूप पुस्तके मिळवली. पुस्तके मासिके आणि दिवाळी अंक. रद्दीवाला पुस्तकाच्या वजनावरुन किंमत करायचा. मी सुहास शिरवळकरांचे लटकंती ५ रुपयात, ना स इनामदारांचे शहेनशहा १० रुपयात तर रणजीत देसाईंचे माझा गाव ७ रुपयात  विकत घेतल्याचे आठवते. अनेक दुर्मिळ पुस्तके मला या शोधातून गवसली तेव्हा. आज मी हवी ती पुस्तके घेऊ शकतो, घेतो पण तेव्हा या रद्दीच्या कोळश्यातुन अचानक हातात एखादा पुस्तकरूपी हिरा यायचा तेव्हा होणारा निर्भेळ आनंद आज नाही.

     आज इतक्या वर्षांनी देखील हे पुस्तकवेड तसूभर देखील कमी झालेले नाही. अजून माझी पुस्तक वाचनाची बैठक तशीच मजबूत आहे. मी आठ आठ तास सलग जागेवरून न उठता आजही पुस्तक वाचू शकतो. आणि आता अजून एक जंगल इंटरनेट नावाच माझ्या या शोधासाठी खुले झाले आहे. माझ्या भ्रमणध्वनीमध्ये सर्वाधिक जागा फक्त पुस्तकांनी अडवली आहे.
©सुहास भुसे.


Sunday 15 November 2015

सत्याचे प्रयोग

आज पुन्हा एकदा महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग वाचायला घेतले आहे. तस अगदी पहिल्यांदा वाचून खुप दिवस झाले. अधुन मधून नेहमी वाचत असतोच ...आणि एका वाचनात समजणेही कठीण आहे. दरवेळी वाचत जाऊ तस नव काही गवसत राहत.
     तस या पुस्तकात अंलकारीक भाषा, प्रसंग खुलवुन सांगणे आदी कोणतीही साहित्यिक मूल्ये नसूनही पुस्तक खिळवुन ठेवते. एकमेव कारण म्हणजे शब्दा शब्दा मागील प्रामाणिकपणा जो थेट ह्र्दयाला जाऊन भिडतो...माझ आयुष्य म्हणजे उघड पुस्तक अस म्हणायला ठीक आहे फक्त ...पण इतक्या प्रामाणिकपणे ते सार्वजनिकरित्या खुले करण्यासाठी परकोटिचे धैर्य पाहिजे.
     गांधीजी मित्रांच्या संगतीने तीनवेळा वेश्यागमन करण्यासाठी गेले ...तिथे काय झाले ते सांगणे 'दोन्ही परिस्थितीत' कठिण आहे. असे अनेक कठीण प्रसंग बिनदिक्कत आणि कमालीच्या प्रामाणिकपणे गांधीजी पानापानातुन उलगडत राहतात. अगदी पहिल्याच पानावर ते आपल्या वडिलांचे वर्णन पुढीलप्रकारे करतात..
  "वडील कुटूंबप्रेमी, सत्यप्रिय, धीट, उदार पण रागीट असे होते. काहीअंशी विषयासक्तही असावेत. त्यांचा शेवटचा विवाह चाळिसाव्या वर्षानंतर झाला होता."
     मला विशेष आवडतो तो गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील आंदोलनाचा भाग ..सुपिक मशागत केलेल्या जमिनीत कोणीही पिक काढेल ...पण खडकाळ ..पडिक ..नापिक जमीन कसुन त्यात पिक काढायला हाडाचा शेतकरीच हवा. ज्या लोकांना आपल्यावर अन्याय होतोय याची जाणीव नव्हती ..दोघे चौघे एकत्र येवून काही सार्वजनिक काम करायचे असते याची जाणीव नव्हती त्यांना एकजुट आणि जागृत करुन मोठी चळवळ उभी करणे किती कठिण काम असेल ?
     नवीन पिढीचा गांधींवर टीका करणे हा आपण हिंदुत्ववादी, क्रांतिकारी वगैरे असल्याचे भासवण्याचा इंडिकेटर बनला आहे. पैकी क्वचितच कोणी गांधीजींएवढा सर्व धर्मांचा अभ्यास केला असेल. ही गांधीविरोधी मते एका अपरिपक्व वयात विशिष्ट प्रचारकी साहित्यामुळे बनतात. आणि जस जस आपण गांधी वाचत जातो आणि परिपक्व होत जातो (कदाचित दोन्ही एकच ) तस तस गांधीद्वेषी लोकांचा ढोंगीपणा, खोटेपणा समजत जातो.
     कदाचित बहुसंख्य लोकांच्या जीवनात हे संक्रमण येत असावे. मी ही एकेकाळी या विचारांच्या प्रभावाखाली होतो. आणि सांगायला खेद वाटतो की गांधीजींना शिव्या घालायचो अगदी.
     जो सत्याचे प्रयोग अथवा इतर गांधी वाचेल आणि जो स्वत:शी प्रामाणिक आहे तो गांधीवादी झाल्याशिवाय राहणार नाही. किमान तो गांधीविरोधी तरी खचितच राहणार नाही हे मात्र निर्विवाद सत्य आहे.
©सुहास भुसे


Thursday 12 November 2015

बळीचे राज्य येवो

शेतकऱ्याचा बलवान, शीलवान आणि लोककल्याणकारी राजा बळी आणि भिक्षुक बटू वामन यांची मिथककथा ही मिथककथा नसून मिथ्या, संदर्भहीन, अतार्किक व प्रक्षेपित कथा असली तरी आधुनिक काळात मात्र ती चपलख लागू होते.

     शेतकऱ्याला बळीराजा म्हणून संबोधले जाते तेव्हा त्या प्राचीन, महान राजाच्या तेजस्वी परंपरेशी त्याचे नाते जोडले जाते. ‘बळीराजा’ ही त्याची आदर, सन्मान आणि अभिमानाची बिरुदावली आहे. पण आज मात्र या बळीराजाची आधुनिक वामन अवहेलना करत आहेत. त्याची कुचेष्टा, अपमान करण्याचा वामनांचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे.

     शेती आणि शेतकऱ्याकडे पाहण्याचा हा बदललेला दृष्टीकोन सर्वाधिक चिंतेची बाब आहे. शेतीसाठी इतर उद्योगांप्रमाणे सुविधा भांडवल व संरक्षण न पुरवणे, दूरगामी उपाययोजनांची बोंब,  मार्केटिंग मध्ये होणारी त्याची लुट या गोष्टींमुळे संपन्न आणि समृद्ध बळीराजा नागवला जात आहे. याची चिंता तर करायला हवीच पण जे वामन त्याच्या टाळूवरचे लोणी लुटून ओरबाडून खातात तेच त्याला भिकारी समजत आहेत. या आधुनिक वामनांचे प्रबोधन करण्याचे काम ज्याला शेतीतले किमान ज्ञान आहे किंवा ज्याच्या किमान मागच्या पिढीने शेती केली आहे अश्या प्रत्येकाने आवर्जून आणि प्राधान्याने हाती घ्यायला हवे.

-बळीराजाला एक सत्ताधारी आधुनिक वामन भिकारी, फुकटे म्हणतो.
-एक वामन त्याचा आक्रोश म्हणजे बळीराजाची बोगस बोंब आहे म्हणतो.
-एक वामन बळीराजा लफडेबाज रंडीबाज असतो म्हणतो.
-एक वामन बळीराजा भेकड, नपुंसक असतो म्हणून आत्महत्या करतो म्हणतो.
-एक वामन बळीराजा कर्जबाजारीपणामुळे नव्हे तर प्रेमप्रकरनांमुळे आत्महत्या करतो म्हणतो.

     रोज बरोज अशी विधाने ओकून या वामनांच्या झुंडीने बळीराजाच्या जगण्याचा तर जगण्याचा पण त्याच्या मरण्याचा देखील विनोद बनवून ठेवला आहे. या वामनांचे प्रबोधन व्हायला हवे. शेती काय चीज आहे हे त्यांना AC मधून बाहेर खेचून रानात उन्हांतान्हात नांगर चालवायला लावून समजून द्यायला हवे. किती अपार कष्टांच्या मोबदल्यात ही काळी आई बळीराजाच्या पदरात मोत्याचे दान टाकते आणि ते मोती हे वामन कसे फुकापासरी लुबाडतात याची जाणीव करून द्यायला हवी. या देशात श्रमप्रतिष्ठेची बूज राखली गेली नाही तर हे आधुनिक वामन या बळीराजाला खरोखर पाताळात गाडल्याशिवाय राहणार नाहीत.

     आजच्या बळीप्रतिपदेच्या दिवशी या विश्वनियंत्याच्या चरणी हजारो वर्षापासून मागितले जाणारे मागणे मागण्याची इतकी गरज आहे जितकी या आधी कधीही नव्हती.

“इडा पीडा टळो...बळीचे राज्य येवो.”

©सुहास भुसे.


Monday 9 November 2015

भक्तांचे संवर्धन आणि संगोपन

     पृथ्वीवर एकेकाळी डायनोसॉरच राज्य होत. पण आज त्याचं नामोनिशाण मिटल आहे. त्याप्रमाणेच इकडे फेसबुकावर एकेकाळी यत्र तत्र सर्वत्र भक्तांचा सूळसुळाट होता. हिवाळ्यात कोकणातील घरात ढेकुण माजतात तसे सोशल साईट्स वर भक्त माजले होते. आणि आता बघा भक्त असे गायब झालेत जसे मोतीचूर के लड्डू से मोती. डायनासॉर प्रमाणे भक्तही लुप्त होऊ नयेत म्हणून सर्वांनी भक्तांचे फायदे व त्यांच्या संवर्धनाचे उपाय याकडे विशेष लक्ष पुरवावे.

     *भक्त प्रजातीचे फायदे.

1. भक्त विविध कलात्मक फोटोशॉप फोटो खरेच म्हणून टाकून आपले मन रिझवतात.
2. वेगवेगळ्या समस्यांवर ते भक्त लॉजिक म्हणून प्रसिद्ध असलेले अचाट तार्किक स्प्ष्टीकरण देतात.
3. विविध खोट्या आकडेवाऱ्या टाकून त्या खोट्या असल्याचे सिद्ध करण्यासाठी आपल्या बुद्धीला चालना देतात.
4. कोणत्याही गोष्टीचा कुठेही बादरायण सबंध जोडून ते आपल्याला मनमुराद हसवतात.
5. मोदी विकास का करत नाहीयेत याची ते हजारो कारणे देतात जी राजकारणी लोकांच्या पुढील हजार पिढ्यांना मार्गदर्शक ठरू शकतात.
6. ते पक्षाचे पेड कार्यकर्ते असल्यासारखे २४ तास कार्यरत राहून फेसबुक सतत हलत ठेवतात.
7. इतिहासाची मोडतोड करून ते इतिहास संशोधकांना सतत काम पुरवतात.

     अश्या प्रकारे फेसबुकवर आपले हमखास मनोरंजन करून आपल्या नेटपॅक चे पैसे वसूल करून देण्यास भक्त बांधील असतात. अश्या बहुगुणी, बहुउपयोगी भक्तांचे संवर्धन व संगोपन विशेष काळजीने व्हायला हवे. लक्षात ठेवा भक्त हे फेसबुकची रौनत आहेत. फेसबुकची जान आहेत.

     *भक्तांचे संवर्धन व संगोपन.

1. तुमच्या पोस्टवर भक्त आला कि लगेच 'युरेका युरेका' म्हणत त्याच्यावर तुटून पडू नये. संयम ठेवून त्याचे म्हणणे ऐकून घ्यावे.
2. सर्वांनी भक्तांच्या कमेंटला व पोस्टला सक्तीने व आठवणीने लाईक करावे.
3. अधून मधून चर्चेतील एक दोघांनी हर हर मोदी ..जय गोमाता अश्या घोषणा द्याव्यात. याने भक्त संतुष्ट होतील.
4. एक भक्त एक विरोधक अशी चर्चा व्हावी.(धर्मयुद्ध-नियम क्र. १४७) एकेका भक्तावर ५० -५० जणांनी चढू नये.
5. भक्तांची टर उडवणाऱ्या दर १० कमेंट नंतर एक मोदींचा फोटो टाकावा. ज्याकडे पाहून भक्तांना आपले इमोशनल अत्याचार सहन करण्याचे बळ मिळत राहील.
6. आठवड्यातून एक दिवस सर्वांनी भक्त उपवास धरावा. सर्वानुमते एक वार निवडावा. या दिवशी कोणीही भक्तांची टवाळी करू नये. त्यांच्या हो त हो मिसळावी.
7. सर्वात महत्वाची आणि परिणामकारक सूचना म्हणजे फेसबुक हे भक्तांचे अभयारण्य घोषित करण्यासाठी सर्वांनी झुक्याला मेल पाठवून दबाव आणावा. त्यासाठी हव तर मिसकाल मोहीम उघडावी. व भक्तांच्या निर्घृण शिकारीवर बंदी आणावी.

     तर लक्षात ठेवा. इथून पुढे जसजसे भाजपाचे पराभव होत जातील तस तसे भित्र्या सशासारखे जीव मुठीत धरून भक्त फेसबुकवर येत राहतील. आपण त्यांची वेदना समजून घेऊन त्यांना धीर देणे गरजेचे आहे. आहेत ते भक्त अजून चार वर्षे पुरवून वापरायचे आहेत याचे भान ठेवा.

     भक्तांच्या बाबतीत "पुरवून खा" हे आपले ब्रीद बनवा.

हर हर मोदी !! जय गौमाता !! हेल मिशाळु काका !! हेल स्पॉट नाना !!


Saturday 7 November 2015

सापनीती कथा

    एक घनदाट जंगल होत. जंगलात एक मांजर आणि एक लांडगा राहायचा. दोघांची खुप दोस्ती होती. जंगलातल्या इलेक्शन मध्ये दोघांनी आपल्या दोस्तीची ग्वाही देऊन इलेक्शन जिंकल. पण सत्ता येताच दोघेही सत्तोपभोगात मश्गुल झाले.

     मांजर जंगलात सतत फिरत असायच. आपल्या तीक्ष्ण नाकाच्या जोरावर जंगलात कोणत्या प्राण्याने कुठे शिकार केली आहे हे ते अचूक ओळखून काढायच. मग लांडग्याला घेऊन ते तिथे पोहोचायच. आणि मग आपल्या सत्तेचा धाक घालून ते त्या शिकारीतले आपले ' टक्के ' मजबूत वसूल करत. त्यांच्या या टक्केखोरीला सगळे प्राणी वैतागले होते.

     होता होता जंगलात पुन्हा इलेक्शन लागल. रिंगणात एक बैल आणि हत्तीही होता. नाराज प्राणी बैल आणि हत्तीच्या गोटात घुसु नयेत म्हणून मांजर आणि लांडग्याने आपला थिंक टैंक बगळ्याला एक सर्वे करायला लावला. जंगलात कोल्ह्यांची संख्या खुप मोठी होती. हा वर्ग या जोडीवर नाराज होता. पैकी काहीँचे मत होते की लांडगा उगीच मांजराच्या नादी लागलाय तर काहींच मत होत की मांजर लाचार होऊन लांडग्याच्या मागे फिरतय.

    बगळ्याने ही बातमी देताच मांजर आणि लांडग्याने खोटे खोटे वैर करायचे ठरवले.

     झाले मग प्लॅनबरहुकुम दोघांची एका शिकारीतल्या टक्केवारीवरुन घमासान भांडणे झाली. मग दोघांनी एकमेकांच्या उखाळया पाखाळया काढल्या. दुगाण्या झाडल्या...गुरगुरले ..बोचकारले. मांजराने लांडग्याची लबाडी काढली तर लांडग्याने मांजराचे दात मोजले. एवढे धूर्त कोल्हे पण त्यांच्या डावाला फसले. पुन्हा दोघांना भरपूर जागा मिळाल्या...

     निकालाच्या संध्याकाळीच एका कोल्ह्याने एक ससा मारला. 5 मिनिटांत मांजर आणि लांडगा आपले टक्के वसूल करण्यासाठी तिथे गळ्यात गळे घालून हजर झाल्याचे बघुन जंगल चाट पडले..बूचकळयात पडले. दुःखात बुडाले ..इकडे मांजर आणि लांडगा 50 % सश्याचा चट्टामट्टा करत मिशीवर ताव मारत बसले..
©सुहास भुसे


Monday 2 November 2015

किस्से ग्रामपंचायत निवडणुकीचे

 
     आज अनेक कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी खूप दिवसांनी शाकाहारी जेवण घेतले. अनेकजणांना जेवण बेचव लागल्याने तापातून उठल्यासारखा फील येत होता असे समजते. १५ -२० दिवसांपासून गावोगाव मटनावळी सुरु होत्या. त्यामुळे आबू गबू कार्यकर्त्यांची चंगळ होती. एका उमेदवाराचे बोकड खाऊन ढेकर दुसऱ्या उमेदवाराच्या गोटात जाऊन देणारेही अनेक महाभाग होते. हरेक गावात रोज चार चार ठिकाणी बोकडे पडत होती. कोंबड्यांची तर बेसुमार कत्तल झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोंबड्या व बोकड यांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने जागतिक पर्यावरण विभागाने चिंता व्यक्त केली आहे असे समजते. आज मात्र फुकटची ढोसायला न मिळाल्याने तोंडे लटकववून पण पूर्ण शुद्धीत आपापल्या घरी बसून असलेल्या नवऱ्याची सुवासिनींनी पंचारती घेऊन पूजा केल्याच्या बातम्या आहेत.

     अनेक ढाबेवाले देखील आज गल्ल्यावर न बसता घरीच विश्रांती घेत आहेत. घरातील सर्वांना एकत्र बसवून मागील अनेक दिवसात वेळ न मिळाल्याने मोजायचा गल्ला पोत्याने मध्ये ओतून घरातील सर्वजण बाजूला बसून नोटा जुळवत होते. अनेकांनी या कामासाठी तात्पुरते अकाउंटंट नेमल्याचे समजते. तसेच विविध गुंतवणूक योजना घेऊन  विमा एजंट, पतसंस्था प्रतिनिधी व बँक प्रतिनिधी यांचा ढाबेवाल्यांच्या घरी राबता दिसून आला.

     अनेक कार्यकर्त्यांच्या बुडाला वडाप व एस टी बस शिवाय दुसऱ्या सीट चा स्पर्श झालेला नसताना मागील अनेक दिवसात मात्र आलिशान एसी तवेरा मधून फिरण्याची सवय लागल्याने आज पुन्हा आपल्या सायकली व मोटारसायकलींच्या सीटावर टेकताना अनेकांची बुडे कुरकुरत होती. अनेकांच्या बुडाला आगी लागल्याचे वृत्त आहे.

     मागील काही दिवसांत रोज मटन चिकन दाबून हानल्याने अनेकांना आज मळमळ वांत्या व जुलाब त्यांच्या तक्रारी सुरु झाल्या. मदिरेच्या भयंकर माऱ्यामुळे अनेकांना मुत्रपिंडाच्या किरकोळ तक्रारी उद्भवल्या. डॉक्टर वर्गात मात्र पेशंटच्या रांगा पाहून समाधानाचे वातावरण आहे.

     इतके दिवस पोरगा गावात मोकाट चकाट्या पिटत फिरतो म्हणून बोंबा मारणाऱ्या मातापित्यांनी आज मात्र आपापल्या दिवट्याची आलाबला घेऊन दृष्ट काढल्याचे समजते. कारण कधी नव्हे ते पोरग रोज घरात नोटांची बंडले आणून फेकत होत. अनेकांनी नवीन फक्कड बुलेटच्या ऑर्डरी बुकिंग केल्याचे कळते. अनेक गावात मताला ५ हजार असा रेट पडला होता. त्यामुळे अनेक उमेदवारांनी ज्यांच्या घरात ६ - ७ मते आहेत त्यांना स्वत: च कोऱ्या करकरीत मोटारसायकली घेऊन दिल्या. त्यामुळे मतदार राजांची दिवाळी यंदा आनंदात जाणार आहे.

     यमनाबाईचे खाऊन गंगुबाईचे गाऊन शांताबाईसंगे जाणारे अनेक कुटनीतीज्ञ काल मतदानादिवशी उघडे पडले. अश्या लोकांना आज उमेदवार शोधत होते. पण या चाणाक्ष लोकांनी यशस्वी दडी मारून ८-१० दिवस गाव वर्ज्य केल्याचे समजते.

 ©सुहास भुसे


Thursday 1 October 2015

डिजिटल इंडियाच्या कथा

डिजिटल इंडिया प्रसंग-१
     त्याने फेसबुक उघडले. आज सगळे तिरंगी डीपी बघून तो हरखला. झुक्याने भारतातील मंदिरात नवस बोलल्यामुळे फेसबुक फार्मात आले हे वाचून तर त्याचा कंठ दाटून आला. डोक्यावरचे पीठ झाडत भान हरवून तो ओरडला. डिजिटल इंडिया..नमो नमो ..गिऱ्हाईक तर नव्हतच ..पण दारात घुटमळनार एक कुत्र मात्र याच्या आवाजाने दचकल, व केकाटत पळाल. वीज बिल दुप्पट आणि पिठाच्या चक्कीची कमाई निमपट होत असल्याने चक्की बंद करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करून झुक्या कोणत्या मंदिरात गेला होता ते सर्च मारण्यास सुरवात त्याने केली. तत्पूर्वी आपला डीपी तिरंगी करण्यास तो विसरला नाही.

डिजिटल इंडिया प्रसंग -2
     बायकोने दिलेली किराण्याची यादी तो पहात होता. तूर डाळ ५ किलो मुग डाळ ५ किलो हे वाचून त्याला दरदरून घाम आला. त्याने पटकन त्यावर खाट मारली. रुमालाने घाम पुसताना त्याची नजर स्वयंपाकगृहाकडे गेल्यावर त्याच्या छातीत धडधडले. खूप विचार करून त्याने पुन्हा यादी समोर ओढली. आणि दुरुस्ती केली. तूर डाळ ५० ग्रॅम, मुग डाळ १०० ग्रॅम...आवश्यक दुरुस्त्या करून हुश्श्य करत त्याने यादी घडी घालून खिशात ठेवली. व फेसबुक उघडले. सकाळपासून डीपी तिरंगी करायला वेळच मिळत नव्हता. पटकन त्याने लिंक ओपन केली व डिजिटल इंडिया ला हातभार लावत पुटपुटला ..कुछ पाने के लिये बहोत कुछ खोना पडता है..नमो नमो.

डिजिटल इंडिया प्रसंग 3
     त्याने म्हशी व्यवस्थित बांधाला लावल्या आणि निश्चिंत होऊन रामकाठी बाभळीवर सरसर वर चढून आपल्या नेहमीच्या जागी बसला. खाली रेज येत नसल्याने त्याला रोज ही कसरत करावी लागे. त्याने फेसबुक उघडून ५-१० हिरोईनीच्या पेजवर लाईक हाणल्या. काल त्याने रिया सेन च्या फुटूवर “हल्लो रिया” अशी कमेंट हाणली होती. तिला तिने लाईक केल्याचे बघून त्याची छाती फुगली. डिजिटल इंडिया ...नमो नमो ..पुटपुटत त्याने डीपी तिरंगी केला. “आर ये झंप्या तुझ्या आईला *** म्हशी ऊसात शिरल्या की र ..कुठे मेला ****च्या” ...हा खालचा हल्लकल्लोळ ऐकून त्याने दचकून मोबाईल खिशात टाकत खाली उतरायला बाभळीची फांदी पकडली.
©सुहास भुसे




धर्मभोळ्या मानसिकतेचा गैरफायदा

     मोदींचे मार्क झुबेरबर्ग ची भेट घ्यायला जाणे, त्याचवेळी मार्क एकेकाळी कसा भारतातल्या कोणत्या मंदिरात वगैरे गेला होता, त्यामुळे त्याचे फेसबुक जे तो बंद करणार होता ते कसे प्रगतीपथावर आले वगैरे किस्से प्रसूत होणे / करणे, ते भारतीय जनतेने प्रचंड डोक्यावर घेणे. एकीकडे हे सर्व सुरु तर दुसरीकडे डिजिटल इंडिया ला सपोर्टच्या नावाखाली डीपी तिरंगी करणाऱ्या लिंक खाली खुबीने दडवलेला internet .org चा कोड. ज्यावर क्लिक केले की आपोआप नेट न्युट्रलिटीच्या बाजूने मतदान होत होते. हा सर्व प्रकार पाहून खूप वैषम्य वाटले. कोणीही यावे आणि भारतीयांची नेमकी नस ओळखून असे गनिमी कावे करावेत आणि भारतीयांनी त्याला उत्साहाने बळी पडावे हा प्रकार कधी थांबेल ? कोणीही फसवावे इतके आपण मूर्ख आहोत काय?

     भारतीय लोकांची मानसिकता ओळखून त्यांना परदेशी लोकांनी फसवण्याचे प्रकार अर्थातच नवे नाहीत. एक फार उद्वेगजनक फसवणुकीचा ऐतिहासिक किस्सा सांगावासा वाटतो.

     इस १८४२ साली प्रसिद्ध अफगाण युद्ध झाले होते. इंग्रजांनी हिंदू सैनिकांच्या सहाय्याने ते जिंकले. जनरल नॉट हा त्या युद्धाचा हिरो होता. युद्ध खर्चाने जवळ जवळ दिवाळे निघाल्याने इंग्रजांना हिंदू सैनिकांचा थकलेला पगार देणे शक्य नव्हते. तेव्हा जनरल नॉट ने व गव्हर्नर जनरल एलनबरो ने भारतीय लोकांची धर्मभोळी मानसिकता ओळखून एक नामी शक्कल लढवली.

     त्यानुसार एक षड्यंत्र रचून एलनबरो ने भारतीय सैनिकांना पगारीऐवजी एक धार्मिक भेट द्यायचे कबूल केले. महंमदाने सोमनाथवर स्वारी करून देवळाचे चंदनी दरवाजे उखडून अफगाणिस्तान ला नेले होते ते परत आणून सोमनाथाच्या मंदिराला बसवू असे एलनबरोने जाहीर केल्यावर हिंदू सैनिकांत खुशीची लाट उसळली. मग एक फार्स रचण्यात आला. महंमदाच्या कबरीचे दरवाजे उखडून भारतात वाजत गाजत आणण्यात आले. मोठा समारंभ करून ते सोमनाथाच्या देवळाला बसवण्यात आले.हिंदू सैनिक आणि समस्त जनता देखील गव्हर्नर जनरल एलनबरोवर खूप खुश झाली.
काही कालानंतर मात्र या चंदनी दरवाज्याचे बिंग फुटले. तपासांती ते दरवाजे चंदनाचे नसून पाईनचे असल्याचे सिद्ध झाले. तसेच त्यावर कोरलेल्या अरबी लेखाने तर पुरता रहस्यभेद झाला. ते दरवाजे सोमनाथाच्या देवळाचे नव्हतेच हे पूर्णपणे सिद्ध झाले.

     धर्मभोळया मानसिकतेचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक व क्रूर थट्टा करण्याचा हा प्रकार डोळ्यात अंजन घालणारा आहे.

     मार्क झुबेरगर्ग मंदिरात गेल्यामुळे त्याची बुडणारी फेसबुक कंपनी वाचली ही न्यूज असेच धर्मभोळे भारतीय अभिमानाने शेयर करत होते तेव्हा मार्कचा हा तुफान यशस्वी मार्केटिंग फंडा पाहून त्याने हा जनरल नॉट चा ऐतिहासिक किस्सा नक्कीच वाचला असावा असे राहून राहून वाटत होते.
©सुहास भुसे.



Friday 25 September 2015

सर्वेपि सुखिन: संतु । सर्वे संतु निरामया ।

सर्वेपि सुखिन: संतु । सर्वे संतु निरामया ।

     इंडिया असाच शायनिंग करत राहो. सोबतच भारताचेही थोडेफार धडभले होत राहो.

     त्यांच्या ४० मजली घरांचे ग्रिनीज बुकात रेकॉर्ड नोंद होवो ..
     पण आमच्या पांडबारावांचे घर खूप गळते. यंदा पावसाळ्यात तणसाने घर शाकारून घेण्याइतकी त्यांची ऐपत होवो.

     त्यांच्या पॉर्श, फेरारी ला भारतात आणण्याचे परवाने मिळोत ..
     पण आमच्या आनंदारावांचा एक बैल खूप थकलाय. यंदा सिझन ला जोडीला दुसरा बैल घेण्याची ताकद त्यांच्यात येवो.

     त्यांचे नऊ नऊ लाखांचे सूट अजून चमकत राहोत...
     पण आमच्या गण्याची गणवेशाची चड्डी दोन वर्षे वापरून बुडावर पार विगरून गेली आहे. पुढील वर्षी तरी त्याला नवीन गणवेश घेऊन देण्याची आर्थिक कुवत त्याच्या आईबापात येवो.

     त्यांच्या परदेश दौऱ्यासाठी, सहली, चिंतन सुट्ट्या, वर्ल्ड टूर साठी शुभेच्छा...
     पण आमचे मनोहरराव तिकिटाचे पैसे वाचवण्यासाठी २५ किमीवर राहण्याऱ्या आपल्या लेकीकडे चालत जातात. त्यांच्या पायातले बळ अक्षय राहो.

     त्यांच्या सर्दीवर परदेशात उत्तम उपचार होवोत...
     पण आमच्या कर्जबाजारी सदोबाची म्हाताऱ्याला लाखभर रु ऑपरेशन खर्च भरण्याची ऐपत नाही म्हणून सदोबाने त्यांना दवाखान्यातून घरी परत आणले आहे. त्यांचा शेवटचा प्रवास वेदनामुक्त व समाधानी होवो.

     त्यांच्या स्विमिंग तैंक मधले निळेशार पाणी पूर्ण विषाणूमुक्त राहो...
     पण आमच्या यमनाबाई, सखूबाई, गिरजाबाई तीन मैलावरील आटत चाललेल्या विहिरीतून पाणी आणतात. त्यांची घागर बुडण्याइतके पाणी त्या विहिराला अखंड राहो.

     एखादा तास वीज गेल्याने त्यांचा एसी बंद पडून त्यांच्या जीवाची तगमग न होवो...
     पण आमच्या गोविंदरावांचा वीजपंप दिवसातून दोन तास तरी सुरळीत चालावा एवढी सलग वीज त्यांना मिळत राहो. बाकी १८ तास लोडशेडींगमध्ये उकाड्यात झोपायला त्यांच्या मुलाबाळांना त्यांच अंगण तुझ्या दयेने प्रशस्त आहे.

     त्यांचे पोटातले पाणी न हालावे असे रस्ते, केबल्स, इंटरनेट,विज, पाणी आदी सुविधायुक्त इंफ्रास्ट्रक्चर पूर्ण बहराने पूर्ण होवो...
     पण आमचा हानमा गुडघ्याएवढ्या चिखलातून, काट्याकुट्यातून, 2 ओढे पार करून किराणा आणायला गावात जातो. त्याच्या वस्तीपर्यंत एक साधासा मुरुमाचा रस्ता तेवढा होवो.

     त्यांच्या स्मार्ट सिट्या शांघाय, बीजिंगच्या तोंडात मारतील अश्या उभ्या राहोत...
     सोबतच आमचे औंढी गांवही हागणदारी मुक्त होवो.

     त्यांच्या नवनव्या फॅक्टऱ्या उभ्या करण्यासाठी आय सी सी आय डी बी आय आदी बॅकांची फौज इंडस्ट्रियल कर्जाची पॅकेजेस घेऊन त्यांच्या दारात खेटे घालत राहो...
     पण यंदा पावसाने दगा दिल्याने आमच्या उमाजीरावाने बायकोचे मंगळसूत्र मोडून ही दुबार पेरणी व खतासाठी २० हजार उभे झाले नाहीत. त्यांची नड भागून त्यांच्यावर गळफास लावून घेण्याची वेळ न येवो.

     इंडिया त्यांच्या पैश्याच्या महापुरात पोहत असाच झगमगत राहो...
पण आमचा भारत फक्त नीटनेटक धडुत लेऊन, बऱ्यापैकी छपराखाली, पोटभर दोन घास खाऊन सुखी असो.

सर्वेपि सुखिन: संतु ।
सर्वे संतु निरामया ।।
सर्वे भद्राणि पश्यंतु ।
मा कश्चित दु:खभाद् भवेत ।।

©सुहास भुसे.

Sunday 20 September 2015

हिंदुत्ववादी की मनुवादी ?

हिंदू धर्माचे सांस्कृतिक स्वरूप जर आपण ध्यानात घेतले तर हिंदुत्ववाद या सध्या बऱ्यापैकी फोफावलेल्या संकल्पनेमधील फोलपणा आपल्या ध्यानात येतो. हिंदुत्ववाद ही विचारधारा मानून जे लोक फेसबुकवर आणि समाजात सध्या वावरत आहेत त्यांचे निरीक्षण केले असता आपणास त्यांची खालील काही वैशिष्ट्ये ध्यानात येतात.

-हे मुद्द्यांवर कधीही चर्चा करत नाहीत.
-विरोध केला की आक्रमक असंबद्ध टीका करतात किंवा शिव्या देतात.
-अनिष्ट गोष्टींवर टीका केली की धर्मद्रोही ठरवतात.
-त्यांच्या दृष्टीने धर्मद्रोही लोकांना सुंता करा, पाकिस्तानात चालते व्हा असे आदेश देतात.
-सतत आमचा धर्म आमचा देव असे ठेकेदारी उल्लेख हिंदूंशी बोलतानाही करत राहतात.
-सावरकर टिळक परशुराम यांची चिकित्सा केली की हे भयंकर चिडतात.
-हिंदू धर्माचा काडीमात्र अभ्यास यांना नसतो.
-हिटलरला हे आदर्श मानतात. अजूनही अखंड हिंदूराष्ट्र या भासमान कल्पनेची स्वप्ने बघत असतात.
-आपण जन्मजात देशप्रेमी असून देशप्रेमाचे आपण घावूक गुत्तेदार आहोत अशी यांची अंधश्रद्धा असते.
-हे स्वत: भयंकर अंधश्रद्धाळू असतात. आणि सर्व पुरोगामी नास्तिक असतात अशी यांची अजून एक अंधश्रद्धा असते.
-चातुर्वन्य व्यवस्थेचे हे पुरस्कर्ते असतात.

    अजून बरीचशी सांगता येतील पण सहसा ही समान वैशिष्टे प्रत्येक स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यात आढळतात.
हे लोक स्वत: ला हिंदुत्ववादी किंवा काहीही म्हणवून घेत असले तरी इतरांनी देखील त्यांना या नावाने संबोधने चुकीचे आहे. हिंदू धर्माच्या मूळ गाभ्याच्या पूर्ण विरोधी अशी ही विचारसरणी आहे.

     हिंदू धर्मावर भयंकर टीका करणारे चार्वाक हिंदू धर्माच्या षडदर्शनात मानाने विराजमान आहेत. धर्मसुधारणेची एक फार मोठी परंपरा या धर्माला आहे. अर्थात दुसऱ्या बाजूला सनातनी कट्टर जातीयवादाची काळी बाजू देखील आहे. पण हा सनातनी वंशश्रेष्ठत्ववाद किंवा जातीयवाद हे हिंदू धर्मावरचे बांडगुळ आहे मूळ तत्वज्ञान नव्हे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. हिंदुत्ववादी विचारसरणी हिंदू धर्माशी सुसंगत नाही. Hinduism is basically wrong word. Hindu is not ism it’s a way of life.   हिंदू हा धर्म नसून एक समृद्ध जीवन जगण्याची पद्धती आहे.. ही जीवनपद्धती जगताना प्रत्येक हिंदूने मांडलेले, अंगीकारलेले प्रत्येक तत्वज्ञान हे हिंदू तत्वज्ञान आहे.
मग या स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांना कोणते नाव किंवा दर्जा द्यावा ?

     वर उल्लेख केल्याप्रमाणे हिंदू धर्म बापाचा माल असल्याप्रमाणे किंवा हिंदू धर्म आणि त्यातले सगळे धर्मग्रंथ आणि देवदेवता यांची ठेकेदारी आपल्याकडे दिल्याच्या अविर्भावात हे लोक वावरत असतात. व उठता बसता नवेनवे फतवे काढत असतात. अर्थात हे अत्यंत चूक व हिंदू तत्वज्ञानाच्या विरोधी आहे. त्यामुळे याला कोणी फारशी भिक घालू नये. यांना फार फार तर हिंदू धर्मातील एक वाट चुकलेला छोटासा कट्टरपंथ हा दर्जा देता येईल.
तसेच या हिंसक वृत्तीच्या लोकांना हिंदुत्ववादी या विशेषणाने संबोधणे म्हणजे हिंदू धर्माचा अपमान आहे असे मला वाटते. एकंदर यांची विचारसरणी पाहता यांना हिंदुत्ववादी न म्हणता मनुवादी असे म्हणावे असे सर्व समविचारी लोकांना माझे आवाहन आणि हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या लोकांना ही आवाहन आहे. मनुवादी हे नाव घेऊन वावरल्याने त्यांच्या विचारसरणीला न्याय मिळेल तसेच त्यांच्या विचारसरणीची पूर्ण कल्पना इतर लोकांना केवळ नावावरून लगेच येऊन जाईल.

     आणि हजारो वर्षात असे अनेक लुंगे सुंगे पंथ आले आणि गेले. हिंदू धर्म सहिष्णू होता आणि राहील. आमच्या धर्मात काही बांडगुळे धर्माचे विडंबन करत आहेत. देव देवतांच्या नावे लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवून त्यांचे आर्थिक, राजकीय, सामाजिक, जातीय, मानसिक सर्वप्रकारचे शोषण करत आहेत. आम्ही त्याविरुद्ध कोरडे ओढणार. आमच्या देवावर, आमच्या धर्मावर आम्ही टीका करणार. प्रबोधन करणार. लिहिणार..बोलणार. कोणाला काय उखडायची असतील ती त्यांनी उखडावी !!

जय चार्वाक !! जय कपिल !! जय शिवशंकर !!

©सुहास भुसे.


सनातनचा बिमोड आवश्यक

सनातन संस्थेवर नुसती बंदी घाला अशी मागणी पुढे येतेय. अर्थात तिलाही अनुल्लेखाने मारले जात आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या आणि तिचे धागेदोरे हा विषय अत्यंत गंभीर तर आहेच पण अजून एका महत्वाच्या गोष्टीकडे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे. त्यावर फारसे कोणी लिहिलेले माझ्या वाचनात तरी आले नाही. सनातन संस्थेचे सातत्यपूर्ण प्रक्षोभक लिखाण, ते समाजात पसरवत असलेल्या अंधश्रद्धा, अनेक कोवळ्या तरुणांना नादी लावून त्यांची उध्वस्त केलेली भविष्ये आणि या सर्वातून समाजाचे केलेले सर्व प्रकारचे शोषण.

     दाभोळकरांच्या खुनाआधी केलेले प्रक्षोभक लेखन त्यांच्या मृत्युनंतर लिहिलेले दांभिक कुत्सित अग्रलेख हे सर्व लपून छपून केले जात नाहीये तर उघडपणे प्रिंट मिडिया, इलेक्ट्रोनिक मिडिया यांच्या माध्यमातून उघड उघड पणे केले जात आहे. आणि तरी देखील पुरोगामी समाज व सरकार यावर गप्प आहेत. “जे आपल्या विचारांना विरोध करतात त्यांना नष्ट केले पाहिजे” असल्या तालिबानी भाषेत वृत्तपत्रीय लेखन करून तरुणांची माथी भडकावली जातात. समाजात प्रबोधन करणाऱ्या विचारवंताना टार्गेट करून सातत्याने त्यांच्याविरुद्ध गरळ ओकून एक वातावरण निर्मिती केली जाते. नुकताच पानसरेंच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केलेला समीर गायकवाड वयाच्या १५ व्या वर्षापासून सनातनचा साधक आहे. अश्या कोवळ्या, संस्कारक्षम वयात अश्या दहशतवादी विचारांचा मारा करून तरुणांचा ब्रेन वाश केल्यावर ते तरूण खून बॉंबस्फोट किंवा तत्सम हिंसक कारवाया करण्यास प्रवृत्त झाले तर यात दोष कोणाचा? याला आठवले आणि सनातन संस्था जितकी जबाबदार आहे तितकीच हे सर्व उघडपणे सुरु असताना डोळ्यावर कातडे ओढून मूकपणे पाहणारी शासनव्यवस्था ही याला तितकीच जबाबदार आहे. आज तर सनातन संस्थेने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना कठोर साधनेची शिक्षा दिली जाईल असे जाहीर करून सर्व शासन व कायदा सुव्यवस्थेला उघड आव्हान दिले आहे.

     यांचे आश्रम, त्यात घरदार, कामधंदा सोडून पडून असलेले साधक, आश्रमात सेवेसाठी सोडलेल्या साधिका हा काय प्रकार आहे ? विज्ञान तंत्रज्ञान युगात जग कोठे चालले आहे आणि हे धर्माच्या नावाखाली लोकांना कोठे घेऊन जात आहेत? साधकांची तपासली जाणारी अध्यात्मिक पातळी तीही टक्क्यात. टक्केवारी वाढली की दर्जा वाढला. विशिष्ट अध्यात्मिक पातळी गाठली की संतपद. स्थूल रूप काय, सूक्ष्म रूप काय अरे काय चालले आहे काय हे? हा पप्पू आठवले चक्क स्वत: ला विष्णूचा अवतार घोषित करून लोकांचे शोषण करत आहे. हे सर्व जितके हास्यास्पद आहे तितकेच चीड आणणारे आहे.

     नुसती सनातन संस्थेवर बंदी घालून हा प्रश्न सुटणार नाही. नवीन नाव घेऊन नवीन संस्था काढून हे लोक पुन्हा कार्यरत होणार. यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. बंदी तर आणलीच पाहिजे शिवाय यांच्या सर्व तथाकथित आश्रमांना टाळे ठोकून सर्व साहित्य जप्त करून आजवर केलेले सर्व लेखन तपासून त्याची संगती लावून आजवर कोणकोणते गुन्हे यांनी केले आहेत याचा वेध घ्यायला हवा. सनातन संस्थेच्या सर्व पदाधिकारी व प्रवक्त्यांसाठी एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन करून यांची घरे देखील तपासून यांना आत घ्यायला हवे. जादू टोणा विरोधी कायद्याच्या तरतुदी खाली समाजात अंधश्रद्धा पसरवल्याच्या आरोपाखाली सर्वप्रथम पप्पू आठवले ला उचलला पाहिजे. पप्पू आठवले हा खरच विष्णू चा अवतार आहे का याची त्याला चौदावे रत्न दाखवून, थर्ड डिग्री लावून तपासणी व्हायला हवी. सनातन संस्थेची संपूर्ण पाळेमुळे खणून काढून या विषवल्लीचा पूर्ण बिमोड केल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत.

     राज्याचे गृहमंत्रीपद भूषवणारे आपले कर्तुत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर  कठोर भूमिका घेतात की सनातन ला पाठीशी घालतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

©सुहास भुसे




Saturday 5 September 2015

चिकित्सेला विरोध का ?

     आज सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व त्यानिमित्त साजरा होणारा शिक्षक दिन. आज शिक्षक दिन साजरा करू नये राधाकृष्णन यांचे कार्य विवाद्य आहे तर त्यांच्यापेक्षाही काहीजणांचे उदा. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे असे मानणारा व तसे ठासून मांडणारा एक मोठा विचारप्रवाह आज दिसून आला.  तर अश्या प्रकारच्या पोस्ट किंवा विचार मुद्दाम ब्राह्मण समाजाला टारगेट करून केल्या जातात किंवा मुद्दाम चिखलफेक केली जाते अश्या स्वरूपाचे दुसऱ्या बाजूने प्रत्युत्तर दिसून आले. या वादात थेट मत देण्यापेक्षा मी एका वेगळ्या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेऊ इच्छितो.

     एक महत्वाचा प्रश्न असा की सर्वच ब्राह्मण व्यक्तींवर टीका केली जाते का ? राजकीय क्षेत्रात आगरकरांवर, एसेम जोशींवर कधी अशी टीका दिसली नाही किंवा इतिहासात खंडोबल्लाळ, पंताजी गोपीनाथ, राहुजी सोमनाथ, थोरला बाजीराव पेशवा यांच्यावर कधी टीका दिसली नाही. इतिहास लेखन क्षेत्रात वा सी बेंद्रे, कमल गोखले, नर फाटक, सेतू माधव पगडी यांच्यावर कधी टीका दिसली नाही. मग सर्वच ब्राह्मण व्यक्तींना मुद्दाम टारगेट केले जाते म्हणण्यात कितपत तथ्य आहे ? रामदास, दादोजी, टिळक, सावरकर, राधाकृष्णन, पुरंदरे, राजवाडे यांच्यावर टीका होत असेल तर ती का होत आहे हे ही समजून घेतले पाहिजे. ब्राह्मण आहेत म्हणून टीका होते म्हणणे म्हणजे पळवाट झाली. जेव्हा एखादा आदर्श समाजापुढे ठेवला जातो तेव्हा तो समाजातील सर्वच स्तरांना आदर्श वाटायला हवा. आदर्श हा सर्वमान्य होण्यासाठी तो सार्वत्रिक हवा. तो जर एखाद्या जातीपुरता किंवा समाजगटापुरता मर्यादित असेल तर काही स्तरांतून विरोध होणे साहजिक आहे. नको इतके अनावश्यक उदात्तीकरण काळाच्या कसोटीवर तर टिकत नाहीच शिवाय एकासाठी उदात्त असणारी व्यक्ती दुसऱ्यासाठी तिरस्कृत ठरते. चिकित्सेचा आग्रह धरणे चूक कसे ? उलट मी तर ही एक संधी मानेन. होत असणारे आरोप कसे चूक आहेत हे शांतपणे पुरावे देऊन खोडून काढण्याची संधी. या व्यक्तींचा अपमान न करता, शिवीगाळ न करता पुरावे देऊन सत्य तेच मांडून कोणी चिकित्सा करत असेल तर त्याला विरोध का व्हावा ?

     याला उत्तर म्हणून फुले शाहू आंबेडकर यांच्यावर टीका केली तर चालेल का असा प्रश्न विचारला जातो किंवा थेट केलीही जाते. अवश्य केली जावी. जे संयत भाषेत सत्य गोष्टी पुराव्यादखल मांडून चिकित्सा होत असेल तर ती व्यक्ती कोणीही असेल विरोध करण्याचे कारण नाही. उलट चिकित्सा केली म्हणून आकांडतांडव केल्याने होत असलेल्या आरोपांना उत्तर नसल्याचा भास निर्माण होतो. किंवा मांडलेल्या गोष्टी निर्विवाद कबूल आणि सत्य असल्याचा संदेश समोरच्या बाजूला मिळतो.

     समाजापुढे एकेकाळी आदर्श म्हणून मांडलेल्या व्यक्तीची चिकित्सा व्हावी व त्यातून तिची महानता अधिक ठळकपणे समोर यावी. जे आदर्श या कसोटीत टिकणार नाहीत ते काळाच्या ओघात आपोआप बाजूला पडतील. या सर्व चिकित्सा, मंथन प्रक्रियेतून समाजापुढे सार्वत्रिक सर्वसंमत आदर्श ठेवले जावेत. ज्यायोगे विविध जातीपाती, धर्म, समाजगटातील दरी कमी होऊन एकजिनसीपणा येण्यास मदत व्हावी या उदात्त सकारात्मक हेतूसाठी सर्व चिकित्साप्रक्रियेचे स्वागत करायला हवे.

     ©सुहास भुसे    


एक होती लोकशाही

     भारतीय लोकशाहीने पाहता पाहता पासष्टी गाठली आहे. पण जितकी जुनी होते आहे तितकी ती परिपक्व होते आहे का ? की उत्तरोत्तर तिची अपरिपक्वताच वाढत चालली आहे ? खरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. देशात धार्मिक उन्माद वाढत चालला आहे. जातीपाती वगैरे समस्या जैसे थे आहेत. नव्हे उलट जातीय अस्मिता आधी कधी नव्हत्या इतकी मान वर काढत चालल्या आहेत. राजकारण म्हणजे तर सामान्य लोकांसाठी फक्त टीकेचा आणि कलंकित विषय बनला आहे. सर्व समाजाने ज्यांच्याकडे आशेने पाहावे अशी आदराची स्थाने कमी होत चालली आहेत. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी अश्या विचारवंतांचे राजरोस खून पाडले जात आहेत. ही वाटचाल फारशी आशादायक नाही.

     धर्म, जात यात आपल्या जाणीवा संकुचित करून टाकण्याच्या काळात लोकशाही मूल्यांबाबत प्रबोधन ही गरजेची बाब होऊन बसली आहे. शालेय अभ्यासक्रमातला २० गुणांचा नागरिकशास्त्र विषय १०० गुणांचा करण्याची हीच वेळ आहे. संपूर्ण जगाने सार्वभौम लोकशाहीची कल्पना ज्या ग्रीस कडून उचलली त्या ग्रीसचे हजारो वर्षापूर्वीचे समृद्ध लोकशाहीचे तत्वज्ञान आजही आपल्याला ललामभूत ठरावे. “ मी अथीनियन नव्हे, मी ग्रीक नव्हे, मी जगाचा नागरिक आहे.” हे महान ग्रीक तत्वज्ञ सोक्रेटीसचे उद्गार आहेत.
सॉक्रेटीस

     एक मजेशीर पण उद्बोधक किस्सा.

     अथेन्स मधला लोकशाहीचा प्रारंभ काळ. कारभार चालवण्यासाठी दरवर्षी चिठ्ठ्या टाकून लकी ड्रो पद्धतीने ५०० लोकांचे एक मंडळ निवडण्यात येई. एका सभासदाला दोनदा काम करण्याची संधी मिळे. या पद्धतीने प्रत्येक नागरिक कधी ना कधी या प्रक्रियेचा घटक बनतच असे. हे ५०० लोक दर दहा दिवसांनी एक सभा घेऊन त्यात विविध समस्यांवर चर्चा करून निर्णय घेत असत. या लोकांना जर या ५०० जनात कोणी अयोग्य वाटत असेल किंवा जनहितविरोधी कारवाया करत असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी एक पद्धती होती. त्यानुसार अश्या अयोग्य सभासदांसाठी नकारात्मक मतदान घेतले जाई. खापराच्या तुकड्यावर नाव कोरून मत दिले जाई त्याला ऑस्राकॉन म्हणत. यात ज्या सभासदाला सर्वात जास्त मते मिळत त्याला दहा वर्षे अथेन्स सोडून जावे लागत असे.

     अरिस्टेडेस ( aristedes bc 530 to bc 468 ) नावाचा एक सांसद तेव्हा न्यायी, न्यायी म्हणून खूप गाजला होता. पण या कीर्तीचा त्याला थोडा गर्व झाला. तो त्याच्या वर्तनातून जाणवू लागला. तेव्हा सभासदांनी त्याची ही ‘ग’ ची बाधा उतरवायची ठरवली. या सभेसाठी जात असताना अरिस्टेडेस एका शेजारून चाललेल्या सभासदाशी बोलत होता. तो सभासद अरिस्टेडेसला ओळखत नसल्याने अरिस्टेडेसच्या तोंडावरच त्याने त्याची निंदा सुरु केली. व शेवटी म्हणाला या अरिस्टेडेसचा माज आज मी उतरवणार. त्याच्या विरोधी मतदान करणार. अस म्हणून त्याने स्वत:ला लिहिता वाचता येत नसल्याने मतदान करण्यासाठी नाव लिहून द्यायला खापराचा तुकडा अरिस्टेडेस पुढे धरला. क्षणभर हसून न्यायी अरिस्टेडेस ने आपल्या कीर्तीला जागत त्या तुकड्यावर त्याला आपले नाव लिहून दिले व त्यादिवशी झालेल्या मतदानात अरिस्टेडेस बहिष्कृत झाला. आणि तो फक्त एका मताने ! जे त्याने स्वत: च्या हाताने लिहून दिले होते.

     ही खरी समृद्ध लोकशाही आणि परिपक्व नेते व जनता ! ज्यांनी आपल्याला निवडून दिले आहे त्यांनी आपल्याला विचारलेला जाब केलेली टीका ज्या राजकारण्यांना सहन होत नाही त्यांनी खूप काही घेण्यासारखे आहे ना अरिस्टेडेस कडून. भारतीय लोकशाही देखील ही उंची लवकरच गाठो ही अंती शुभेच्छा !

     ©सुहास भुसे  

अरिस्टेडेस

Friday 28 August 2015

हिंदु हा धर्म नाही ?

     ‘ हिंदू नावाचा कोणता धर्मच नाही ’. सध्याचे लोकप्रिय घोषवाक्य आहे. असा विचार मांडणाऱ्या विद्वानांच्या मुलभूत दृष्टीकोनातच मुळात फार मोठी चूक ही आहे की ते हिंदू धर्माकडे इतर तुलनेने अर्वाचीन धर्माच्या अनुषंगाने पाहतात. अर्वाचीन धर्म अर्थात ज्यू ख्रिश्चन मुस्लीम बौद्ध इ. या धर्मात एक व्यवस्थित मुलभूत मांडणी आहे. बहुतेक धर्म एकेश्वरवादी आहेत.  त्यांचा कोणीतरी प्रेषित आहे. तो त्यांच्या धर्माचे तत्वज्ञान सांगणारा उद्गाता आहे. त्यांचे धर्मतत्वज्ञान सांगणारे निश्चित असे धर्मग्रंथ आहेत. जगण्याचे काही नियम सांगितले आहेत. काही धार्मिक कर्तव्ये-बंधने आहेत. उपासना पद्धती एकमेव आहे. हा ठराविक साचा बहुतेक धर्मांचा आहे. याच साच्यात हिंदू धर्माला बसवण्याचा अयशस्वी प्रयत्न करून हिंदू नावाचा कोणता धर्मच नाही असे जाहीर केले जाते.

हिंदू शब्दाच्या व्युत्पत्ती

     हिंदू या शब्दाच्या अनेक व्युत्पत्ती सांगितल्या जातात. पैकी पहिली साधारण हिंदू म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे लोक. इराणी भाषांमध्ये स चा उच्चार ह असा होतो. म्हणून सिंधू चे हिंदू झाले. ही फारशी पटण्यासारखी व्युत्पत्ती नाही. कारण इराण ला तुलनेने जवळ असलेले पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहणाऱ्या लोकांना आजही सिंधीच म्हणतात.

     दुसरी व्युत्पत्ती अशी की साधारण युवान श्वांग भारतात आला त्या कालखंडात हिंदू शब्द प्रचलित झाला. हिंदू पंचांग चांद्र पंचांग आहे. चंद्राचे एक नाव इंदू . त्यावरून चीनी लोक इंदू किंवा हिंदू म्हणू लागले. ही व्युत्पत्ती फारशी पटत नाही. चीनी जे म्हणतात ते नाव भारतीय लोकांनी स्वीकारायचे काय कारण ?

     इतर अनेक व्युत्पत्तीही अशाच म्हटल तर पटतात.. म्हटल तर त्या खोडून काढता येतात. एकंदर या हजारो वर्षातल्या धामधुमीच्या काळात हिंदू धर्माला हिंदू हे नाव का मिळाले याचे दुवे निखळले आहेत. पण हिंदू धर्माचे तरल आणि सूक्ष्म तितकेच व्यापक स्वरूप लक्षात घेतले तर या धर्माला तुम्ही काय नाव देता हे अजिबात महत्वाचे नाही. हिंदू म्हणा सिंधू म्हणा इंदू म्हणा भारतीय म्हणा. हा मुद्दा आपण हिंदू धर्माचे स्वरूप ध्यानात घेतले तर लक्षात येतो.



हिंदू धर्माचे उदात्त तत्वज्ञान

सध्या जो बोकाळला आहे व ज्याच्या नावाखाली सनातन्यांचा उन्माद सुरु आहे त्या हिंदुत्ववादाला माझा तीव्र विरोध आहे. ही विचारसरणी हिंदू धर्माशी सुसंगत नाही. Hinduism is basically wrong word. Hindu is not ism it’s a way of life.   हिंदू हा धर्म नसून एक समृद्ध जीवन जगण्याची पद्धती आहे. हिंदू धर्माचे तत्वज्ञान ग्रंथ म्हणून वेद वेदांत स्मृती पुराणे याकडे बोट दाखवले जात असले तरी ते पूर्ण सत्य नाही. हिंदू ही एक जीवनपद्धती हे विधान जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा हे ग्रंथ दुय्यम स्थानावर ढकलेले जातात. ही जीवनपद्धती जगताना प्रत्येक हिंदूने मांडलेले, अंगीकारलेले प्रत्येक तत्वज्ञान हे हिंदू तत्वज्ञान आहे. सर्वसाधारण हिंदू जीवनपद्धती तीन मुद्द्यांभोवती केंदित आहे.

     १.कर्मसिद्धांत – आपल्या सोबत जे काही होत आहे. आपल्या जीवनात जे काही घडत आहे ते सर्व पूर्वजन्मातील सुकृत अथवा पापांचे फळ आहे. आपण जर पूर्वजन्मात पुण्यकर्म केले असेल तर आपल्या सध्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील. याउलट परिस्थितीत वाईट.

     २ .पुनर्जन्म – या जन्मात आपण जी पुण्यकर्मे करणार आहोत त्याचे चांगले फळ आपल्याला पुढच्या जन्मात मिळणार आहे. जर वाईट कर्मे केली तर निश्चितच त्याची वाईट फळे आपणास पुढील जन्मात मिळणार आहेत.

     ३.अंतिम सत्य – अंतिम सत्य अर्थात कोहम या प्रश्नाचे उत्तर. ईश्वराचा साक्षात्कार . त्याच्या सानिध्यात अढळ स्थान. नैनं छिंदन्ति शस्त्रानी नैनं छिंदन्ति अस्त्रानी न चैन क्लेदयांत्यापो नैनं दहति पावकः अश्या अजर अमर आत्म्याचे चिरंतन विश्रांतीचे स्थल. या जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्ती अर्थात मोक्ष.
 
     चार वेद, चार पुरुषार्थ, चार आश्रम, चार वर्ण या सर्व गोष्टींची गुंफण या मूळ मुद्द्यांभोवती केली आहे. सर्वांभूती एकच तत्व वास करत. हे तत्व सर्व चराचरात सामावले आहे. ही भवसागर सृष्टी ही त्या तत्वाने रचली आहे. हे गुह्य आचार विचारात बिंबवून जगलेले जीवन मोक्ष मिळवून देते जे अंतिम सत्य आहे. अंतिम ध्येय आहे. हे वेदांचे सार आहे. अर्थ व काम यांचा नियंत्रित व सुयोग्य मार्गाने उपयोग हा मोक्ष मिळवून देतो. हा हिंदू धर्माचे अंतिम सत्य असलेला मोक्ष मिळवण्याचा मार्ग किती साधा आहे पहा.

     यासाठी वेद वाचण्याची गरज नाही. कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नाही. कोणतीही कर्मकांडे पूजा उपास तापास करण्याची गरज नाही. सत्यनारायण, वास्तुशांती, नागनारायणबली, कोकीळव्रत, लक्ष्मीव्रत ..हेमाद्रीने सांगितलेली उठल्यापासून झोपेपर्यंत करावयाची कोणतीही व्रते करण्याची गरज नाही. ज्याला रूढार्थाने धार्मिक म्हणू अशी कोणतीही गोष्ट न करता हिंदू  धर्मातील अंतिम सत्याची प्राप्ती होऊ शकते. फक्त कोणाला कसला त्रास न देता शक्य होईल तितकी इतरांना मदत करत, भूतदया ह्रदयी वागवत, एक आदर्श समृद्ध जीवन जगणे यासाठी पुरेसे आहे. आणि

     सर्वात महत्वाची गोष्ट अशी की हिंदू म्हणवून घेण्यासाठी तुम्हाला यापैकी कोणतीही गोष्ट करण्याची गरज नाही. यापैकी काही केले नाही अगदी देवळाच्या पायरीवर उभे राहून तुम्ही देवाशी भांडलात तरी तुमच्या हिंदू असण्यात कोणती बाधा येत नाही.

     आणि मला वाटते की या विश्वातील कोणत्याही सामाजिक सलोखा राखून जीवन जगू पाहणाऱ्या समूहास ही विचारसरणी सार्वकालिक आदर्शवत आहे.

      कालांतराने हिंदू धर्मात स्वत:च्या फायद्यासाठी धर्मसत्ता काही उच्च समुदायांनी हस्तगत केली. त्यात नाना कर्मकांडे घुसवली. जातीभेद वाढला. हिंदू धर्माची निश्चित अशी कठोर बांधणी कधीच नसल्यामुळे हे करणे त्यांना कठीण गेले नाही. व हळू हळू या उदात्त तत्वज्ञानाचे विडंबन होऊन ही कर्मकांडे व मंदिरातला देव हाच धर्म समजला जाऊ लागला.

समारोप

     हिंदू धर्म हा माझ्या मते एक भौगोलिक धर्म आहे. भारताचे विशिष्ट भौगोलिक स्थान हिंदू धर्माच्या वाढीस व विकासास कारणीभूत आहे. ही एक लोकसंस्कृती आहे. किंबहुना विविधतेत एकता असलेल्या विभिन्न भौगोलिक भागातील विविध लोकसंस्कृतीचा एक समुच्चय आहे. राहिला प्रश्न फक्त हिंदू या संज्ञेचा . हिंदू धर्माचा समकालीन असा एकही धर्म आज या भूतलावर अस्तित्वात नाही. तत्कालीन काळात पृथ्वीवरील विविध खंडांत जेथे संस्कृत्या नांदल्या त्यांच्या धर्मालाही विशिष्ट्य नावे नाहीत. इजिप्तचा प्राचीन धर्म, ग्रीक चा प्राचीन धर्म, रोमनांचा प्राचीन धर्म यांना कोणत्याही विशिष्ट संज्ञेत बद्ध केलेले नाही. पृथ्वीवरील आदीम काळातील प्राथमिक अवस्थेतील स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे उत्तरोत्तर विकसित व समृद्ध होत गेलेले हे धर्म आहेत. आणि यापैकी फक्त हिंदू धर्म आज घडीला टिकून आहे.

     धर्म सुधारणेचे हिंदू धर्म नेहमीच स्वागत करेल. टीका निंदा सर्वकाही स्वागतार्ह. हिंदू धर्म चार्वाकांपासून हे पचवत आलेला आहे. नव्हे बाहू पसरून स्वागत करत आलेला आहे. फक्त इथे काही विशिष्ट लोक आणि ते सांगतात तो हिंदू धर्म नाही. किंवा त्यांच्या कृती या हिंदू धर्माच्या कृती नाहीत याची थोडी नोंद घ्यावी. हे धर्म-मक्तेदार सांगतात तो आपला धर्म नसून हिंदू धर्माचे हे तरल व लवचिक रूप सर्व धर्म सुधारणा करू इच्छिनारांनी जाणून घ्यावे. तुकाराम महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या काळात हे त्यांना कठीण गेले असले तरी आज हे तितकेसे कठीण राहिलेले नाही.
-सुहास भुसे    


Friday 21 August 2015

महाराष्ट्र भूषण वादावर खरेच पडदा पडलाय का ?

     पुरंदरे यांना कडेकोट बंदोबस्तात व मोजक्या २५० लोकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण दिला गेला. हुश्श्य ! चला एक अध्याय संपला, म्हणून काहीजनांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल. तथापि या पुरस्काराच्या नितीत्ताने महाराष्ट्रात निर्माण झालेले वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक वादळ खरेच शमले आहे का ?


पुरंदरे त्यांनी लिहिलेला भला बुरा इतिहास यावर भरपूर चर्चा करून झाली आहे. तथापि एकूणच या पुरस्कारासंदर्भात सामान्य माणूस व विविध विचारवंत यांच्या प्रतिक्रिया तटस्थ वृत्तीने बघितल्यानंतर काय दिसते ? दोन्ही बाजूंनी उन्माद व्यक्त झाला, वगैरे वरवरच्या प्रतिक्रिया चर्चा म्हणून ठीक आहेत पण ते परिस्थितीचे अचूक विश्लेषण नव्हे. या निमित्ताने समाजाच्या वैचारिकतेचा पाया म्हणवल्या गेलेल्या विचारवंतांनी, सरकारने, व खुद्द पुरस्कार मूर्तींनी अनेक चुकीचे पायंडे पाडले आहेत. त्याचा दूरगामी परिणाम आगामी काळात दिसून येणार आहे.

या निमित्ताने कधी नव्हे ते महाराष्ट्रात दोन उभे तट दिसून आले. अनेकजण पुरंदरेचे समर्थन करत होते तर अनेकजण विरोध. विरोध करणारा किंवा समर्थन करणारा समुदाय जितका व्यापक व मोठा असेल तितके त्यातील लोकांच्या ती बाजू घेण्याच्या कारणांचे वैविध्य वाढत जाते. एखाद्या देवाची यात्रा असेल तर तिथे जमलेले सर्वचजण भक्तीभावाने देवदर्शनाला आलेले असतात असे म्हणणे फारच भोळेपणा ठरेल. काहीजण तिथे प्रसाद व विविध वस्तू विकायला आलेले असतात. काहीजण पर्यटन म्हणून, काहीजण गर्दीत खिसे कापायला..व्यक्तिगणिक कारणे वाढत जातात. असे जरी असले तरी या इतर कारणांसाठी जमा झालेल्या लोकांची संख्या कधीच भक्तांच्या संख्येइतकी असू शकत नाही. तद्वताच पुरंदरे यांना विरोध करणारे सर्वच एकाच समान कारणासाठी विरोध करत होते असे म्हणणे फसवणूक ठरेल. यात निश्चित काहीजण राजकीय हेतूने प्रेरित होते. काहीजण पुरंदरे ब्राह्मण आहेत म्हणून ब्राह्मणद्वेषापोटीही विरोध करत असतील. तथापि अश्या लोकांची संख्या ही पुरंदरे यांची बाजू चूक आहे म्हणून विरोध करणाऱ्या सर्वसामान्य शिवप्रेमी लोकांच्या तुलनेत नगण्यच होती हे या कडे थोडे तटस्थ वृत्तीने पाहून विविध स्तरातून व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांचा अंदाज घेतला तर सहज लक्षात येऊ शकते.

     पुरंदरे यांचे समर्थक या सर्व वादादरम्यान संभाजी ब्रिगेड या संघटनेला व जितेंद्र आव्हाड यांनाच लक्ष करत राहिले. पण या विरोधी प्रतिक्रिया किती मोठ्या स्तरातून येत आहेत इकडे त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केले. व हा सर्व विरोध जातीय ठरवण्यात धन्यता मानली. असे करणे त्यांच्या समर्थनाच्या रणनीतीच्या दृष्टीने फायदेशीर असले तरी सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हानिकारक ठरले आहे. त्यांच्या या भूमिकेतून समाजात जातीय धृवीकरण झाल्याचे चित्र निर्माण झाले. बहुतांश ब्राह्मण समुदाय पुरंदरे यांच्या समर्थनार्थ एकवटला. या दरम्यान ब्राह्मण पुरोगामी विचारवंतांची कचखाऊ वृत्तीही समोर आली. मोक्याच्या क्षणी पुरोगामित्व सोडून ते प्रतिगाम्यांच्या कळपात शिरतात हे निर्माण झालेले चित्र त्यांच्या विश्वासाहार्यतेसाठी आगामी काळात प्रश्नचिन्हांकित राहणार आहे. काही ब्राह्मण किंवा मराठा नसलेल्या विचारवंतानी तटस्थ राहत किंवा संदिग्ध प्रतिक्रिया देत हा वाद मराठा व ब्राह्मण जातीत आहे आपल्याला काय घेणे देणे असा कपाळकरंटेपणा ही दाखवला. अस करताना आपण लिहित असतो ते तत्वज्ञान  व वागतोय तो व्यवहार यात पडलेली तफावत लक्षात येणारी आहे याची तमा बाळगली नाही.  

ब मो पुरंदरे हा पुरस्कार स्वीकारल्यावर आपल्या भाषणाच्या सुरवातीसच म्हणाले की " इतिहासकाराने आपल्या लिखाणावर येणाऱ्या प्रतिक्रियांविषयी जागरूक असले पाहिजे. नवे पुरावे समोर आले तर बदलास तयार राहिले पाहिजे."  त्यांच्या भाषणात मला हे सर्वात महत्वाचे विधान वाटले. आता प्रश्न असा आहे की या आपल्या विधानाप्रमाणे पुरंदरे स्वत: का वागले नाहीत. बोलणे आणि कृती यात इतकी प्रचंड तफावत त्यांनी स्वत: दाखवून देऊन ही लोकांना समजणार नाही इतकी खुळी जनता आता राहिली आहे का ? पुरंदरे यांनी चुकीचा इतिहास लिहिला. त्यांच्या लेखनातला काही भाग विकृत म्हणून समोर आला. हे कदाचित त्यांनी मुद्दाम केले नसेल. त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधनांवरून त्यांनी तस लिहिले असेल. पण जेव्हा नवी संशोधित साधने समोर आली. रामदास व शिवाजी महाराज यांची भेटच झाली नव्हती हे सिद्ध झाले. दादोजी कोंडदेव कुलकर्णी हा शिवाजी महाराजांचा गुरु नव्हता हे समोर आले तेव्हा आपल्याच विधानाप्रमाणे आपल्या लेखनात बदल करण्यास पुरंदरे का पुढे आले नाहीत ? जेम्स लेन बद्दल त्यांच्या भूमिकेवर सतत संशय व्यक्त होत राहिला व ते १३ वर्षे यावर मौन बाळगून राहिले. पुरंदरे यांचे समर्थक ते फार मोठे शिवभक्त असल्याची द्वाही देत असतात. मग इतक्या मोठ्या बदनामीवर पुरंदरे यांनी का कधीही जाहीर प्रतिक्रिया दिली नाही ? ते म्हणतात तसे अश्या मोठ्या शिवभक्ताची अश्या संवेदनशील प्रकरणात फक्त ऑक्सफर्ड प्रेस ला एक पत्र पाठवून जबाबदारी संपते का ? जर त्यांच्या लेखनातील काही भागावर ते विकृत आहे असा आक्षेप घेतला जात असेल तर ते जनभावनेचा आदर करून व आपल्या शिवप्रेमाला स्मरून सदर लिखाण त्यांनी वगळले का नाही ? हे सर्व बदल करून देखील त्यांची ‘राजा शिवछत्रपती’ तितकीच वाचनीय राहिली असती. नव्हे तिची झळाळी अधिकच वाढली असती. मग का केल नाही अस त्यांनी ?

या संपूर्ण प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची व त्यांच्या सरकारची भूमिका संशयास्पद राहिली. इतका वाद होत असताना ही सर्व गोष्टींकडे ते तटस्थपणे पाहत राहिले. त्यामुळे हा वाद असाच पेटता राहावा अशीच त्यांची सुप्त इच्छा आहे असा जनतेचा समज होण्यास मदत झाली. तसेच महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळ्यात माननीय फडणवीस महोदयांनी एक अत्यंत आक्षेपार्ह्य विधान केले. आपल्या भाषणात म्हणाले की  “आज जर महाराज असते तर पुरंदरे यांना विरोध करणारांचा त्यांनी कडेलोट केला असता.”  हे विधान करताना मुख्यमंत्री आपण एका समाजाचे, एका जातीचे, एका विचारसरणीशी बांधील मुख्यमंत्री नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत, इथल्या सर्व विचारांच्या जनतेशी आपली बांधिलकी आहे, सर्व जातिधर्म आपणास समान आहेत ही आपण पद स्वीकारताना घेतलेली शपथ ते विसरले. एका संपूर्ण लोकशाही मार्गाने चाललेल्या जनआंदोलनाचा व त्यात सहभागी लक्ष लक्ष सर्वसामान्य जनतेचा त्यांनी अपमान केला. का कडेलोट केला असता महाराजांनी पुरंदरेंच्या प्रक्षेपित इतिहासाला लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्यांचा ? त्यांनी कुठे बॉम्बस्फोट केलेत की कोणा बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंतांना गोळ्या घातल्यात ? की फडणवीसांना विरोध केला की सरळ कडेलोट लगेच ? फडणवीस यांचे विधान अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या विधानामुळे फडणवीस यांचे सरकार ब्राह्मणांचे लांगुलचालन करणारे सरकार आहे, संघी, फॅसिस्ट विचारांचे सरकार आहे हा जनतेत हळूहळू दृढ होत असलेला समज अधिकच दृढ झाला आहे.

    अश्या प्रकारे या वादाचे सर्व अंगाने विश्लेषण केले असता महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाच्या चिंधड्या उडाल्या आहेत व जातीय सामाजिक सलोख्याची दीर्घकाळ भरून न येणारी हानी या वादाला चुकीच्या पद्धतीने हाताळले गेल्याने झाली आहे असेच म्हणावे लागते.
                            -सुहास भुसे


 

Tuesday 18 August 2015

ससा आणि कासवाची गोष्ट : बाबा इश्टाइल

छोटासा बाल फावडे नेहमीप्रमाणे बाबांकडे गोष्ट सांगा म्हणून हट्ट धरून बसला होता. बाबा त्याला समजावत होते.

“ हे बघ बाळ फावडू ..असा हट्ट नाय करायचा. आता काही आधीसारखा वेडा नाही तू.. थोडा मोठा झाला आहेस..”

बाल फावडू काही ऐकत नव्हता.

“ नाय मंजे नाय बाबा. मला गोष्ट नाय सांगितली तर मी तुमची दाढी ओढणार.”

अस म्हणून बाल फावडू ने बाबांच्या लांबलचक दाढीलाच हात घातला. मग मात्र बाबांचा नाईलाज झाला.

“ अरे शोड शोड शोन्या ..दाढी शोड आधी ..सांगतो मी गोष्ट. “

अस म्हणत बाबांनी ते नेहमी बाल फावडूला सांगत ती गोष्ट सांगायला सुरवात केली.

“फार फार वर्षापूर्वी या महान भूमीत घनदाट जंगल होत बर का फावडू. आणि तिथे एक ससा आणि कासव राहायचं. एकदा त्या सश्याने कासवाला शर्यतीचे आव्हान दिले. आणि आपले कासव चिंतातूर झाले.

ससा कसला भला मोठा दैत्यच तो. काय त्याचे ते अक्राळ विक्राळ रूप. काय त्याचे ते भयंकर सुळे. काय त्याचे ते लालबुंद डोळे. चार दातांचा बोकडच जणू.  कासव फारच काळजीत पडले. मग ते आपल्याला बालपणापासून पळण्याचे धडे देणाऱ्या आपल्या गुरूकडे अर्थात ऑलिम्पिक विजेत्या लंगड्या लांगोजी कडे गेले."

इथे बाल फावडू ला एक शंका आली.

“ बाबा तो लंगडा तर लांडगा होता ना ?”

त्यावर बाबा म्हणाले,

“ होय रे बाळ फावडू पण आपण ते उघड नाही सांगायचं. आपण ते दडपून ठेवायचं. आपली उत्क्रांती त्याच लांडग्यापासून झाली आहे.”

त्यावर बाल फावडूचे थोडे समाधान झाले.

“पण बाबा त्याचा पाय कशाने तुटला होता हो ?”
बाल फावडूला लांगोजीचा पाय तुटलेली कहाणी ऐकायला आवडायचं. म्हणून तो मुद्दाम हे दरवेळी विचारायचा. पण त्याची ही खोड माहित असल्याने बाबा थोडक्यात सांगत म्हणाले.

“ बाल फावडू ..अरे एकदा जंगलात झालेल्या घनघोर युद्धात त्याचा पाय तुटला होता.”

“ काहीही हं बाबा ( फावडू श्री जान्हवीचा पण फॅन ) तुम्ही तर मागे मला सांगितलेले की लांगोजी ने सिंह महाराजांची शिकार चोरली म्हणून महाराजांनी त्याचा पाय कलम केला.”
बाबा थोडेसे चिडले.

“ फावड्या तुला कितीवेळा सांगितले आहे की अस खर खर सगळ सांगायचं नसत म्हणून. पुढे सांगू गोष्ट की राहू दे ? “

त्यावर बाल फावडू ने माघार घेतली.

“ ठीक आहे सांगा पुढे बाबा.”

बाबांनी पुढे सांगायला सुरवात केली.

“ तर लांगोजी ने आपले सर्व कारभारी मंडळ बोलावले. त्यात तरस, गिधाड, साळिंद्र, रानडुक्कर, गांडूळ असे सर्व दिग्गज, विद्वान आणि जातिवंत हुशार प्राणी होते. या सर्व विद्वान कारभाऱ्यानी एक परिपूर्ण योजना तयार केली. ती कासवाला व्यवस्थित समजावून दिली. मग अशी जय्यत तयारी झाल्यावर कासव भल्या पहाटे उठून जवळच्याच तळ्यात राहणाऱ्या आपल्या अध्यात्मिक प्रेरक अश्या गुरूंच्या ह.भ.प. बकस्वामींच्या दर्शनाला निघाले.”

इथे आपल्या बाल फावडूला दुसरी शंका आली.

“ पण बाबा ते बकस्वामी तर तिकडे लांब दुसऱ्या जंगलातल्या तळ्यात राहायचे ना ? तिकडे इतक्या लांब तर कासव कधी गेलेच नव्हते.”

बाबा पुन्हा भडकले.

“ फावड्या तुला पुन्हा त्या मोठ्या मोठ्या गोळ्या सुरु करू काय ?  अरे बाळ फावडू तुला किती वेळा सांगितले की अस सगळ खर खर सांगायचं नसत. अरे ही गोष्ट आहे. ललित आहे. इतिहास नाही. यात खपून जात असल काही बाही. “

बाल फावडू बाबा पुन्हा गोष्ट थांबवतील या भीतीने गप्प बसला व बाबा पुढे सांगू लागले.

“ तर मग काय ते बकस्वामींचे ध्यान !! अहाहा !! एक डोळा मिटलेला. एक डोळा पाण्यात माश्यावर रोखलेला. एक पाय पाण्यात, एक अर्धा उचललेला. धन्य धन्य ते स्वामी. तर कासवाने त्यांना मनोभावे नमस्कार केला. त्यावर चुकून बकस्वामीनी आपला पाण्यात असलेला एकमेव पाय आशीर्वादासाठी उचलला आणि धप्पकन ते पाण्यात पडले. कासवाला त्यांची ती मनोज्ञ समाधीवस्था पाहून खूप आनंद झाला. नाकातोंडात पाणी गेल्याने ठसकत बकस्वामी मोठ्याने ओरडले, “ स्थापन कराव्या बकमंडळया..सहस्र बकभोजने सुरु करा. तुमचे मनोरथ पूर्ण होतील.”

ऐकुंन धन्य झालेलं कासव शर्यतीच्या मैदानात आले. होता होता शर्यत सुरु झाली. ससा धावू लागला. आपल्या गुरुच्या ऑलिम्पिक विजेत्या लंगड्या लांगोजीच्या ट्रेनिंग आणि कारभारीमंडळीच्या व्युहाप्रमाणे कासवही जोरात धावू लागले. ससा जोरात ..कासव आणखी जोरात ..ससा तावात ...कासव जोशात ...ससा घामेघूम झाला. त्याला कळून चुकले ही लांगोजी च्या ट्रेनिंग ची आणि बकस्वामींच्या आशीर्वादाची किमया. आपण हरणार. तो हताश होऊन तिथेच बसला. इकडे मोठ्या जोशात कासवाने पी टी उषा ला लाजवेल अशी दौड मारून शर्यत जिंकली.”

छोटा बाल फावडू नेहमी प्रमाणे खुश होऊन टाळ्या वाजवू लागला . बाबा खुश झाले. त्यांनी प्रेमाने बाल फावडू च्या डोक्यावरून हात फिरवला. त्यावर लाडात येऊन बाल फावडू म्हणाला ..

“ बाबा पण तुम्ही ना अश्शे लब्बाड आहेत ना ...मला माहित आहे अश्शे काहीच झाले नव्हते. तो ससा किणी झोपला. मग कासव चिकाटीने आणि दृढनिश्चयाने चालत राहिले. आपल्या अटळ ध्येयनिष्ठेमुळे आणि आपल्या अंगच्या गुणांमुळे ते शर्यत जिंकले."

बाबांनी हताश होऊन बालफावडू कडे पाहिले आणि मोबाईल घेऊन दुख्खद अंतकरणाने मेंटल हॉस्पिटल ला फोन लावला.

                                                          -सुहास भुसे.

Disclaimer – हे एक निव्वळ विनोदी प्रहसन आहे. याचा जर कोणत्या जीवित व मृत व्यक्तीशी सबंध आढळल्यास तो योगायोग न समजता तसा सबंध आहेच अस बिनदिक्कत समजावे.