About

Saturday 5 September 2015

चिकित्सेला विरोध का ?

     आज सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व त्यानिमित्त साजरा होणारा शिक्षक दिन. आज शिक्षक दिन साजरा करू नये राधाकृष्णन यांचे कार्य विवाद्य आहे तर त्यांच्यापेक्षाही काहीजणांचे उदा. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे असे मानणारा व तसे ठासून मांडणारा एक मोठा विचारप्रवाह आज दिसून आला.  तर अश्या प्रकारच्या पोस्ट किंवा विचार मुद्दाम ब्राह्मण समाजाला टारगेट करून केल्या जातात किंवा मुद्दाम चिखलफेक केली जाते अश्या स्वरूपाचे दुसऱ्या बाजूने प्रत्युत्तर दिसून आले. या वादात थेट मत देण्यापेक्षा मी एका वेगळ्या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेऊ इच्छितो.

     एक महत्वाचा प्रश्न असा की सर्वच ब्राह्मण व्यक्तींवर टीका केली जाते का ? राजकीय क्षेत्रात आगरकरांवर, एसेम जोशींवर कधी अशी टीका दिसली नाही किंवा इतिहासात खंडोबल्लाळ, पंताजी गोपीनाथ, राहुजी सोमनाथ, थोरला बाजीराव पेशवा यांच्यावर कधी टीका दिसली नाही. इतिहास लेखन क्षेत्रात वा सी बेंद्रे, कमल गोखले, नर फाटक, सेतू माधव पगडी यांच्यावर कधी टीका दिसली नाही. मग सर्वच ब्राह्मण व्यक्तींना मुद्दाम टारगेट केले जाते म्हणण्यात कितपत तथ्य आहे ? रामदास, दादोजी, टिळक, सावरकर, राधाकृष्णन, पुरंदरे, राजवाडे यांच्यावर टीका होत असेल तर ती का होत आहे हे ही समजून घेतले पाहिजे. ब्राह्मण आहेत म्हणून टीका होते म्हणणे म्हणजे पळवाट झाली. जेव्हा एखादा आदर्श समाजापुढे ठेवला जातो तेव्हा तो समाजातील सर्वच स्तरांना आदर्श वाटायला हवा. आदर्श हा सर्वमान्य होण्यासाठी तो सार्वत्रिक हवा. तो जर एखाद्या जातीपुरता किंवा समाजगटापुरता मर्यादित असेल तर काही स्तरांतून विरोध होणे साहजिक आहे. नको इतके अनावश्यक उदात्तीकरण काळाच्या कसोटीवर तर टिकत नाहीच शिवाय एकासाठी उदात्त असणारी व्यक्ती दुसऱ्यासाठी तिरस्कृत ठरते. चिकित्सेचा आग्रह धरणे चूक कसे ? उलट मी तर ही एक संधी मानेन. होत असणारे आरोप कसे चूक आहेत हे शांतपणे पुरावे देऊन खोडून काढण्याची संधी. या व्यक्तींचा अपमान न करता, शिवीगाळ न करता पुरावे देऊन सत्य तेच मांडून कोणी चिकित्सा करत असेल तर त्याला विरोध का व्हावा ?

     याला उत्तर म्हणून फुले शाहू आंबेडकर यांच्यावर टीका केली तर चालेल का असा प्रश्न विचारला जातो किंवा थेट केलीही जाते. अवश्य केली जावी. जे संयत भाषेत सत्य गोष्टी पुराव्यादखल मांडून चिकित्सा होत असेल तर ती व्यक्ती कोणीही असेल विरोध करण्याचे कारण नाही. उलट चिकित्सा केली म्हणून आकांडतांडव केल्याने होत असलेल्या आरोपांना उत्तर नसल्याचा भास निर्माण होतो. किंवा मांडलेल्या गोष्टी निर्विवाद कबूल आणि सत्य असल्याचा संदेश समोरच्या बाजूला मिळतो.

     समाजापुढे एकेकाळी आदर्श म्हणून मांडलेल्या व्यक्तीची चिकित्सा व्हावी व त्यातून तिची महानता अधिक ठळकपणे समोर यावी. जे आदर्श या कसोटीत टिकणार नाहीत ते काळाच्या ओघात आपोआप बाजूला पडतील. या सर्व चिकित्सा, मंथन प्रक्रियेतून समाजापुढे सार्वत्रिक सर्वसंमत आदर्श ठेवले जावेत. ज्यायोगे विविध जातीपाती, धर्म, समाजगटातील दरी कमी होऊन एकजिनसीपणा येण्यास मदत व्हावी या उदात्त सकारात्मक हेतूसाठी सर्व चिकित्साप्रक्रियेचे स्वागत करायला हवे.

     ©सुहास भुसे    


No comments:

Post a Comment