About

Friday 28 August 2015

हिंदु हा धर्म नाही ?

     ‘ हिंदू नावाचा कोणता धर्मच नाही ’. सध्याचे लोकप्रिय घोषवाक्य आहे. असा विचार मांडणाऱ्या विद्वानांच्या मुलभूत दृष्टीकोनातच मुळात फार मोठी चूक ही आहे की ते हिंदू धर्माकडे इतर तुलनेने अर्वाचीन धर्माच्या अनुषंगाने पाहतात. अर्वाचीन धर्म अर्थात ज्यू ख्रिश्चन मुस्लीम बौद्ध इ. या धर्मात एक व्यवस्थित मुलभूत मांडणी आहे. बहुतेक धर्म एकेश्वरवादी आहेत.  त्यांचा कोणीतरी प्रेषित आहे. तो त्यांच्या धर्माचे तत्वज्ञान सांगणारा उद्गाता आहे. त्यांचे धर्मतत्वज्ञान सांगणारे निश्चित असे धर्मग्रंथ आहेत. जगण्याचे काही नियम सांगितले आहेत. काही धार्मिक कर्तव्ये-बंधने आहेत. उपासना पद्धती एकमेव आहे. हा ठराविक साचा बहुतेक धर्मांचा आहे. याच साच्यात हिंदू धर्माला बसवण्याचा अयशस्वी प्रयत्न करून हिंदू नावाचा कोणता धर्मच नाही असे जाहीर केले जाते.

हिंदू शब्दाच्या व्युत्पत्ती

     हिंदू या शब्दाच्या अनेक व्युत्पत्ती सांगितल्या जातात. पैकी पहिली साधारण हिंदू म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे लोक. इराणी भाषांमध्ये स चा उच्चार ह असा होतो. म्हणून सिंधू चे हिंदू झाले. ही फारशी पटण्यासारखी व्युत्पत्ती नाही. कारण इराण ला तुलनेने जवळ असलेले पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहणाऱ्या लोकांना आजही सिंधीच म्हणतात.

     दुसरी व्युत्पत्ती अशी की साधारण युवान श्वांग भारतात आला त्या कालखंडात हिंदू शब्द प्रचलित झाला. हिंदू पंचांग चांद्र पंचांग आहे. चंद्राचे एक नाव इंदू . त्यावरून चीनी लोक इंदू किंवा हिंदू म्हणू लागले. ही व्युत्पत्ती फारशी पटत नाही. चीनी जे म्हणतात ते नाव भारतीय लोकांनी स्वीकारायचे काय कारण ?

     इतर अनेक व्युत्पत्तीही अशाच म्हटल तर पटतात.. म्हटल तर त्या खोडून काढता येतात. एकंदर या हजारो वर्षातल्या धामधुमीच्या काळात हिंदू धर्माला हिंदू हे नाव का मिळाले याचे दुवे निखळले आहेत. पण हिंदू धर्माचे तरल आणि सूक्ष्म तितकेच व्यापक स्वरूप लक्षात घेतले तर या धर्माला तुम्ही काय नाव देता हे अजिबात महत्वाचे नाही. हिंदू म्हणा सिंधू म्हणा इंदू म्हणा भारतीय म्हणा. हा मुद्दा आपण हिंदू धर्माचे स्वरूप ध्यानात घेतले तर लक्षात येतो.



हिंदू धर्माचे उदात्त तत्वज्ञान

सध्या जो बोकाळला आहे व ज्याच्या नावाखाली सनातन्यांचा उन्माद सुरु आहे त्या हिंदुत्ववादाला माझा तीव्र विरोध आहे. ही विचारसरणी हिंदू धर्माशी सुसंगत नाही. Hinduism is basically wrong word. Hindu is not ism it’s a way of life.   हिंदू हा धर्म नसून एक समृद्ध जीवन जगण्याची पद्धती आहे. हिंदू धर्माचे तत्वज्ञान ग्रंथ म्हणून वेद वेदांत स्मृती पुराणे याकडे बोट दाखवले जात असले तरी ते पूर्ण सत्य नाही. हिंदू ही एक जीवनपद्धती हे विधान जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा हे ग्रंथ दुय्यम स्थानावर ढकलेले जातात. ही जीवनपद्धती जगताना प्रत्येक हिंदूने मांडलेले, अंगीकारलेले प्रत्येक तत्वज्ञान हे हिंदू तत्वज्ञान आहे. सर्वसाधारण हिंदू जीवनपद्धती तीन मुद्द्यांभोवती केंदित आहे.

     १.कर्मसिद्धांत – आपल्या सोबत जे काही होत आहे. आपल्या जीवनात जे काही घडत आहे ते सर्व पूर्वजन्मातील सुकृत अथवा पापांचे फळ आहे. आपण जर पूर्वजन्मात पुण्यकर्म केले असेल तर आपल्या सध्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील. याउलट परिस्थितीत वाईट.

     २ .पुनर्जन्म – या जन्मात आपण जी पुण्यकर्मे करणार आहोत त्याचे चांगले फळ आपल्याला पुढच्या जन्मात मिळणार आहे. जर वाईट कर्मे केली तर निश्चितच त्याची वाईट फळे आपणास पुढील जन्मात मिळणार आहेत.

     ३.अंतिम सत्य – अंतिम सत्य अर्थात कोहम या प्रश्नाचे उत्तर. ईश्वराचा साक्षात्कार . त्याच्या सानिध्यात अढळ स्थान. नैनं छिंदन्ति शस्त्रानी नैनं छिंदन्ति अस्त्रानी न चैन क्लेदयांत्यापो नैनं दहति पावकः अश्या अजर अमर आत्म्याचे चिरंतन विश्रांतीचे स्थल. या जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्ती अर्थात मोक्ष.
 
     चार वेद, चार पुरुषार्थ, चार आश्रम, चार वर्ण या सर्व गोष्टींची गुंफण या मूळ मुद्द्यांभोवती केली आहे. सर्वांभूती एकच तत्व वास करत. हे तत्व सर्व चराचरात सामावले आहे. ही भवसागर सृष्टी ही त्या तत्वाने रचली आहे. हे गुह्य आचार विचारात बिंबवून जगलेले जीवन मोक्ष मिळवून देते जे अंतिम सत्य आहे. अंतिम ध्येय आहे. हे वेदांचे सार आहे. अर्थ व काम यांचा नियंत्रित व सुयोग्य मार्गाने उपयोग हा मोक्ष मिळवून देतो. हा हिंदू धर्माचे अंतिम सत्य असलेला मोक्ष मिळवण्याचा मार्ग किती साधा आहे पहा.

     यासाठी वेद वाचण्याची गरज नाही. कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नाही. कोणतीही कर्मकांडे पूजा उपास तापास करण्याची गरज नाही. सत्यनारायण, वास्तुशांती, नागनारायणबली, कोकीळव्रत, लक्ष्मीव्रत ..हेमाद्रीने सांगितलेली उठल्यापासून झोपेपर्यंत करावयाची कोणतीही व्रते करण्याची गरज नाही. ज्याला रूढार्थाने धार्मिक म्हणू अशी कोणतीही गोष्ट न करता हिंदू  धर्मातील अंतिम सत्याची प्राप्ती होऊ शकते. फक्त कोणाला कसला त्रास न देता शक्य होईल तितकी इतरांना मदत करत, भूतदया ह्रदयी वागवत, एक आदर्श समृद्ध जीवन जगणे यासाठी पुरेसे आहे. आणि

     सर्वात महत्वाची गोष्ट अशी की हिंदू म्हणवून घेण्यासाठी तुम्हाला यापैकी कोणतीही गोष्ट करण्याची गरज नाही. यापैकी काही केले नाही अगदी देवळाच्या पायरीवर उभे राहून तुम्ही देवाशी भांडलात तरी तुमच्या हिंदू असण्यात कोणती बाधा येत नाही.

     आणि मला वाटते की या विश्वातील कोणत्याही सामाजिक सलोखा राखून जीवन जगू पाहणाऱ्या समूहास ही विचारसरणी सार्वकालिक आदर्शवत आहे.

      कालांतराने हिंदू धर्मात स्वत:च्या फायद्यासाठी धर्मसत्ता काही उच्च समुदायांनी हस्तगत केली. त्यात नाना कर्मकांडे घुसवली. जातीभेद वाढला. हिंदू धर्माची निश्चित अशी कठोर बांधणी कधीच नसल्यामुळे हे करणे त्यांना कठीण गेले नाही. व हळू हळू या उदात्त तत्वज्ञानाचे विडंबन होऊन ही कर्मकांडे व मंदिरातला देव हाच धर्म समजला जाऊ लागला.

समारोप

     हिंदू धर्म हा माझ्या मते एक भौगोलिक धर्म आहे. भारताचे विशिष्ट भौगोलिक स्थान हिंदू धर्माच्या वाढीस व विकासास कारणीभूत आहे. ही एक लोकसंस्कृती आहे. किंबहुना विविधतेत एकता असलेल्या विभिन्न भौगोलिक भागातील विविध लोकसंस्कृतीचा एक समुच्चय आहे. राहिला प्रश्न फक्त हिंदू या संज्ञेचा . हिंदू धर्माचा समकालीन असा एकही धर्म आज या भूतलावर अस्तित्वात नाही. तत्कालीन काळात पृथ्वीवरील विविध खंडांत जेथे संस्कृत्या नांदल्या त्यांच्या धर्मालाही विशिष्ट्य नावे नाहीत. इजिप्तचा प्राचीन धर्म, ग्रीक चा प्राचीन धर्म, रोमनांचा प्राचीन धर्म यांना कोणत्याही विशिष्ट संज्ञेत बद्ध केलेले नाही. पृथ्वीवरील आदीम काळातील प्राथमिक अवस्थेतील स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे उत्तरोत्तर विकसित व समृद्ध होत गेलेले हे धर्म आहेत. आणि यापैकी फक्त हिंदू धर्म आज घडीला टिकून आहे.

     धर्म सुधारणेचे हिंदू धर्म नेहमीच स्वागत करेल. टीका निंदा सर्वकाही स्वागतार्ह. हिंदू धर्म चार्वाकांपासून हे पचवत आलेला आहे. नव्हे बाहू पसरून स्वागत करत आलेला आहे. फक्त इथे काही विशिष्ट लोक आणि ते सांगतात तो हिंदू धर्म नाही. किंवा त्यांच्या कृती या हिंदू धर्माच्या कृती नाहीत याची थोडी नोंद घ्यावी. हे धर्म-मक्तेदार सांगतात तो आपला धर्म नसून हिंदू धर्माचे हे तरल व लवचिक रूप सर्व धर्म सुधारणा करू इच्छिनारांनी जाणून घ्यावे. तुकाराम महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या काळात हे त्यांना कठीण गेले असले तरी आज हे तितकेसे कठीण राहिलेले नाही.
-सुहास भुसे    


No comments:

Post a Comment