About

Thursday 22 August 2013

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या खऱ्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार की नाही ?



     हिंदू धर्म हा महान आहे असे सर्व जगाने मान्य केले आहे . याचे मूळ हिंदू धर्माच्या तात्विक बैठकीत आहे. हिंदू धर्म हिंसा कधीच आणि कोणत्याही कारणास्तव मान्य करत नाही . आहिंसक वैचारिक लढ्यांची एक फार मोठी परंपरा हिंदू धर्माला लाभली आहे. इथे सर्व प्रकारच्या विचारधारांना मुक्त स्वातंत्र्य राहिले आहे. हा धर्म एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त कधीच नव्हता आणि कधीच नसेल . अध्यात्मिक प्रचितीच्या मागे आपले आयुष्य वेचणारे साधू-संत  आणि विविध  शास्त्रीय प्रयोग आणि अत्यंत मूलगामी तर्कशास्त्राच्या आधारे देवाचे अस्तित्वच नाकारणारे ....दोघांनाही सारख्याच ममत्वाने या धर्माने आपलेसे केले आहे. वेदांचे कर्ते याच भूमीतले आणि चार्वाक, कपिल देखील याच भूमीतले. नास्तिक विचारधारांना देखील आपल्या सर्वोच्च तत्वज्ञानाच्या षड्दर्शनात स्थान देण्याची उदार धर्मपरंपरा हिंदू धर्माची .

     मुळात हिंदू धर्माचा एकच असा कोणी कर्ता नाही, एकच असा कोणता धर्मग्रंथ नाही, एकच असे कोणते तत्वज्ञान नाही, एकच असा कोणता देव नाही. कोणीच असे छातीठोकपणे सांगू शकत नाही कि अमुक प्रकारचे धर्माचरण करणारा हिंदू आणि अमुक हिंदू नाही. सर्व विचारधारा, पंथ. संप्रदाय यांना सामावून घेत वाटचाल करण्याची हजारो वर्षाची परंपरा या धर्माला आहे.

     अर्थात ही केवळ एकच बाजू झाली. चार्वाक संप्रदायाच्या लोकांना दिसेल तिथे हाणामार करणारे आणि एका चार्वाकाचा एका चक्रवर्ती राजासमोर राजरोस खून पाडणारे देखील याच धर्माचे पाईक आहेत. चार्वाकांची सर्व ग्रंथपरंपरा नष्ट करून टाकणारे देखील याच मातीत उपजले. जगद्गुरू संत तुकारामांच्या तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढणाऱ्या, त्यांच्या पोथ्या इंद्रायणीच्या डोहात बुडवणाऱ्या, आणि शेवटी त्यांना सदेह वैकुंठाला पाठवणाऱ्या औलादी देखील इथल्याच. हिंदू धर्मावर बांडगुळाप्रमाणे माजलेल्या अनिष्ट रुढी दूर करण्यासाठी, अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या महात्मा फुल्यांवर शेण टाकण्यासाठी आपले हात शेणात बुचकाळणारे शेणकिडे देखील इथेच निपजले.

     दाभोळकरांची हत्या कोणी केली व का केली याचा विचार करण्याआधी ही सर्व पार्श्वभूमी अभ्यासणे देखील गरजेचे आहे. मुळात त्यांच्यावर असा खुनी हल्ला व्हावा अश्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून विद्वेषाची पेरणी कोण करत होते हे देखील उघड गुपित आहे. एका महन्ताने भर सभेत काढलेले दाभोळकराचा दुसरा गांधी करून टाकू हे उद्गार आता देखील यु ट्यूब वर एका क्लिप च्या रुपाने गरळ ओकत आहेत. दाभोळकरांच्या छायाचित्रावर जणू eliminated अश्या फुल्या कोणी व का केल्या आहेत(. गुगल इमेजेस ) हे देखील उजेडात आणणे गरजेचे आहे.

     आम्ही म्हणतो तेच खरे बाकी सर्व धर्मद्रोही आणि जे जुमानत नाहीत त्यांना संपवा ...ही मुलतत्ववादी विचारसरणी मग ती कोणत्याही धर्मियांची असो लोकशाही साठी अत्यंत घातक आहे.  तिची पाळेमुळे खणून काढणे गरजेचे आहे. आणि यांच्या गोळ्या जणू दाभोळकरांसाठीच राखून ठेवल्या होत्या. तिच्यात टुन्डा, एम के शेख, ओवेसी यांच्यापर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य नाही. दाभोळकरांसारख्या ऋजू स्वभावाच्या असंरक्षित समाजसेवकाची हत्या कसली करता ? हिंमत असेल तर या लोकांपर्यंत पोहोचून दाखवा.

      वरून जे प्रारब्धात असेल तेच होते ...अंथरुणाला खिळून आलेल्या मृत्यूपेक्षा असा मृत्यू केव्हाही चांगला अश्या प्रकारचे निर्लज्ज मृत्युलेख छापून आणले जातात. नेमक्या कसल्या हिंदुत्वाच्या गोष्टी करतात ही असंवेदनशील मुर्दाड लोकं ?? यांचे हिंदुत्वाचा मुखवटा देखील ढोंगी आहे. हे फक्त वर्चस्ववादाचे समर्थक आहेत . हजारो वर्षापासून चालत आलेली शोषणाधारित समाजव्यवस्थाच यांना पुढे चालू ठेवायची आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या निमित्ताने यांचा हिंदुत्वाचा भ्रामक मुखवटा टराटरा फाटला आहे. ही असली मुलतत्ववादी विचारसरणीची असंवेदनशील लोक हिंदुत्ववादी असूच शकत नाहीत. यांना हिंदुत्ववादी म्हणन म्हणजे माझ्या या प्राचीन आणि महान धर्माचा अपमान आहे.




 









     बाकी कोणत्याही विचारवंतांच्या हत्येने त्याचे विचार दबत नाहीत उलट ते अधिकच उसळी मारून वर येतात याला इतिहास साक्षी आहे. दाभोळकरांच्या हत्येने देखील त्यांचे विचार दबणार नाहीत तर त्यांच्या अनुयायांची संख्या वाढणारच आहे. मुळात विज्ञाननिष्ठ आणि तर्कशुद्ध विचारसरणी संपवणे मुलतत्ववाद्यांना कधीच शक्य होणार नाही. हजारो वर्षांपासून ती चालत आलेली आहे आणि चालतच राहील.



डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन ..!!!   






Wednesday 12 June 2013

देवलचा पराभव



प्राचीन काळापासून हिंदुस्थान अनेक परकीय आक्रमकांच्या गुलामगिरीत खितपत पडलेला दिसून येतो. इतिहासाच्या पानापानावर लाजिरवाण्या पराभवांचे शिंतोडे आहेत. महमद कासिम पासून घोरीपर्यंत आणि बाबरापासून अब्दालीपर्यंत अनेकांनी हिंदुस्थानावर स्वारी केली. शक, हून, अरब, अफगाणी, इंग्रज, फ्रेंच, डच अनेक अनेक आक्रमक शतकानुशतके हिंदुस्थानाची लुट करत राहिले, हिंदुस्थानचे लचके तोडत राहिले. हिंदुस्थानाची अस्मिता, अभिमान यांच्यावर घाले घालत राहिले. काय कारण असावे बरे या शतकानुशतकांच्या पराभवांचे, गुलामगिरीचे ?

हिंदुस्थानी लोकांपेक्षा हे परकीय शूर होते ? पराक्रमी होते ? रणकुशल होते ? बुद्धिमान होते ? हिंदुस्तानच्या इतिहासाचा अगदी प्राथमिक अभ्यास केलेली व्यक्तीदेखील यापैकी एकाही प्रश्नाचे होय असे उत्तर देण्यास धजणार नाही. शौर्य आणि पराक्रम या हिंदुस्थानाच्या मातीमधून उगवत होता. बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता या हिंदुस्थानाच्या दावणीला बांधली गेली होती. हिंदुस्थानातील रणधुरंधरांच्या रण कुशलतेने साक्षात रणचंडीने अनेकदा आश्चर्याने तोंडात बोटे घातली असतील. पण तरीही पराभव आणि गुलामगिरी हिंदुस्थानच्या वाट्याला का बरे आली असेल ?

इतिहासतज्ञ याची अनेक कारणे सांगतील. हिंदुस्थान हा अनेक छोट्या छोट्या राज्यात विभागला गेला होता. इथ प्रबळ अश्या केंद्रीय सत्तेचा अभाव होता वगैरे वगैरे. तात्कालिक कारणे अनेक आहेत व ती खरीही आहेत. तथापि या सर्वांपेक्षा देखील इथल्या लोकांची फुटीर वृत्ती आणि धर्मभोळेपणा आणि नितीअनितीच्या भ्रामक कल्पना ही कारणे सार्वकालिक आणि प्राधान्याने विचार करावी अशी आहेत. इथला समाज हा एकसंध कधीच नव्हता. राज्याराज्यात असो वा जातीपातीत असो तो सदैव विभागला गेलेलाच होता. देवधर्म, जपजाप्य, व्रतवैकल्ये, स्नानसंध्या यात बुडून गेलेला होता. या सर्व गोष्टींनी हिंदुस्थानाचे अपरिमित नुकसान केले आहे . या सर्व गोष्टींमुळेच इथल्या लोकांमध्ये प्रबळ अशी राष्ट्रभावनाच कधी निर्माण होऊ शकली नाही हे हिंदुस्थानच्या गुलामगिरीचे आणि पराभवांचे सर्वात प्रमुख कारण आहे.

हिंदुस्थानातील लोकांच्या या देव-धर्म भोळेपणाच्या आणि नितीअनितीच्या फोल कल्पना, फालतू व्रताचार आणि कर्मकांडात गुंतून सर्वनाश ओढवून घेतलेल्या राज्यकर्त्यांच्या गाथा इतिहासात ढिगाने सापडतील. शरण आलेल्याला मरण नाही म्हणून घोरीला १६ वेळा पराभूत करून २ वेळा जीवदान देणारा पृथ्वीराज चौहान, अल्लाउद्दीन खिलजीने स्वारी केली तेव्हा ससैन्य तीर्थयात्रेला गेलेला यादवांचा सेनानी आणि युवराज शंकरदेव आणि चातुवर्यचिंतामणी ग्रंथ लिहीत बसलेला यादवांचा प्रधान हेमाद्री ही काही ठळक उदाहरणे. स्नानसंध्या आणि जपजाप्य यात गुंग होऊन राज्य कारभाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या थोरल्या माधवराव पेशव्यांची रामशास्त्री प्रभून्यांनी कानउघडणी करून त्यांचे लक्ष परत राज्यकारभाराकडे वळवल्याचा किस्सा तर सर्वश्रुत आहेच.

इ.स.च्या सातव्या शतकात प्रजेचा धर्म भोळेपणा आणि देवावरील आंधळी श्रद्धा याने एका पराक्रमी राजाचा कसा घात केला याचा एक डोळ्यात अंजन घालणारा  प्रसंग आढळतो. त्या काळात सिंध प्रांतात चच नावाच्या एका पराक्रमी राजाचा दाहर नावाचा तितकाच पराक्रमी पुत्र राज्य करत होता. त्याची राजधानी होती देवल. या देवल शहरात हिंदूंचे एक प्रसिद्ध मंदिर होते. या मंदिराच्या गगनचुंबी कळसावर एक भलामोठा भगवा ध्वज मोठ्या डौलात सदैव फडकत असे. इथल्या देवावर प्रजेची अतोनात श्रद्धा होती तसेच या मंदिराविषयी आणि या ध्वजाविषयी एक अंधश्रद्धाळू आख्यायिका लोकांमध्ये प्रचलित होती कि जोवर हा ध्वज उभा आहे तोवर आपल्या राज्यावर कोणतेही संकट येऊ शकत नाही. जोवर हा ध्वज उभा तोवरच आपले राज्य उभे. देवल च्या प्रजेची ही देवभोळी कल्पना आणि जोवर रोम उभे तोवर जग उभे ज्यादिवशी रोम पडेल त्यादिवशी जगबुडी होईल ही रोमवासियांची फोल कल्पना यात किती साम्य आहे पहा ना..

इ स ७१२ मध्ये अरबी आक्रमक महंमद कासिम याने सिंध वर स्वारी केली. त्याला त्याच्या गुप्तचरांकडून ही ध्वजाची आख्यायिका समजली. त्याने प्रजेच्या या वेडगळ अंधश्रद्धेचा फायदा उठवून हे राज्य स्वस्तात जिंकायचे ठरवले. त्याने आपल्या तोफा सर्वप्रथम या मंदिरावर डागून हे शिखर आणि त्यावरील ध्वज प्रथम उध्वस्त केला. आपला शकुनी ध्वज पडलेला पाहताच सैनिक आणि प्रजेमध्ये हा:हा:कार माजला. आपला पराभव आता निश्चित आहे. ध्वजाच्या पतनानंतर आपला टिकाव लागणे अशक्य आहे या कल्पनेच्या आहारी जाऊन देवल च्या सैन्याने न लढताच शस्त्रे खाली ठेवली आणि एक प्रबळ राज्य विनासायास कासीमने घशात घातले.    

                              सुहास भुसे 
                        (रोखठोकसाठी दि. १२-६-१३)                

 
                            
       

Tuesday 23 April 2013

सुशीलकुमारांचा मुर्दाडपणा आणि तिहार जेल मधील कैद्यांची संवेदनशीलता


दिल्लीत फक्त पाच वर्षाच्या चिमुरडीवर झालेला बलात्काराचा प्रकार नृशंस आहेच तथापि त्याहून अधिक भयंकर प्रकार विविध असंवेदनशील घटक करत आहेत ...हे सर्व वाचून, पाहून, ऐकून संवेदनशील माणसाचा मानवतेवरील विश्वासच उडावा असेच एकंदर वातावरण आहे.


      ज्या चिमुरडीला पाहून हातावर चॉकलेट टेकवावे, तिचा पापा घ्यावा अशी इच्छा व्हावी तिथ अश्या निरागस बाल्याला पाहून तिच्यावर बलात्कार करण्याची एखाद्या नरराक्षसाला इच्छा व्हावी यातच मानवतेचा पराभव आहे . मनोज कुमारच्या या कृत्याला राक्षसी , सैतानी म्हणन म्हणजे राक्षस आणि सैतानाचा अपमान आहे . आणि त्याला कोणती कठोर शिक्षा देणार इथली गंजलेली दुबळी न्यायव्यवस्था ? मानवी आवाक्यातील सर्व शिक्षा या अघोरी प्रकारासाठी थिट्या आहेत .

तथापि या पार्श्वभूमीवर समाजातील विविध घटकांनी दाखवलेली असंवेदनशीलता चीड आणणारी आणि एकूणच या व्यवस्थेबद्दल घृणा निर्माण करणारी आहे. हा प्रकार घडताच पोलिसांनी तत्परता दाखवून गुन्हेगाराला अटक करण्याऐवजी हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रकार केला. ही पाशवी घटना वृत्तपत्रांतून नुसती वाचून सर्वसामान्य माणसांच्या अंगावर शहारा आला. मन या सैतानी कृत्याने क्रोधाने भरून गेले तिथे घटनास्थळी हजर असणा-या पोलिसांसारख्या व्यक्तींच्या मनात हे प्रकरण दडपण्याची भावनाच कशी निर्माण होऊ शकते ?आपले  खाते आणि कर्तव्यावरची निष्ठा वगैरे सोडाच पण या कायद्याच्या रखवालदारांच्या माणूस असण्याबद्दल शंका निर्माण करणारी ही बाब आहे.

दुसरी गोष्ट आजतक सारख्या बेजबाबदार आणि टी आर पी ला भुकेलेल्या प्रसार माध्यमांची . या बालिकेच्या घरी जाऊन या वाहिनीचे रिपोर्टर तिच्या नातेवाईकांची यावरील प्रतिक्रिया विचारात होते. अशी धक्कादायक घटना ज्यांच्या कुटुंबाबाबत घडली त्यांची काय प्रतिक्रिया असेल हो ? मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारी ही जात आहे याची खात्री हे वृत्तांकन पाहताना पटली. घटनेचे गांभीर्य विचारात घ्यायचे नाही काही नाही . फक्त ताज्या बातम्या . मग त्या कोणत्याही असोत. कसल्याही असोत . ही खळबळ जनक बातम्यांसाठी वखवखलेली माध्यमे जितकी दोषी आहेत असल्या प्रकारात तितकेच असेल शोज आपल्या दिवाणखान्यात बसून पाहणारा असंवेदनशील समाज देखील दोषी आहे .


या सर्व प्रकारावर कळस चढवला तो गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या आजच्या वक्तव्याने . या व्यक्तीची कोणत्याही घटनेसंदर्भातली प्रतिक्रिया नेहमीच असंवेदनशील आणि वादग्रस्त असते. मग ती कोळसा घोटाळ्या संदर्भातील प्रतिक्रिया असो कि पुणे बॉम्बस्फोटाबाबतीतील प्रतिक्रिया असो अथवा दहशतवाद्यांना श्री संबोधणे असो. यांचे बोलणे ऐकले कि यांचे डोके ठिकाणावर आहे कि नाही याची शंका यावी. नेमके काय पाहून या व्यक्तीला गृहमंत्री बनवले असावे? आणि इतकी बेजाबदार विधाने करून देखील ही जडमती व्यक्ती कोणत्या पुण्याईवर पडला चिटकून आहे ?

आज संसदेत विरोधकांनी दिल्ली बलात्काराच्या घटनेवरून गरादोळ माजवला. सुशीलकुमारांवर हल्ला चढवत सुशीलकुमारांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर संतप्त होऊन सुशील कुमारांनी . ' बलात्काराच्या घटना देशात सगळीकडेच घडत असतात. दिल्लीतील बलात्काराचीच एवढी चर्चा का ? '  असा अजब सवाल केला. या गुह्स्थाच्या मुर्दाड मनाचे आणि गेंड्याची कातडीचे नवल वाटावे असेच हे विधान आहे. बलात्कार सर्वत्र होतातच, होतच राहणार असाच काहीसा त्यांचा नूर होता. देशाच्या गृहमंत्री पदी विराजमान व्यक्तीने असे बेजबाबदार विधान करावे ही घटना या संदर्भात उसळलेल्या आगीत तेल ओतणारी आहे. सुशीलकुमार शिंदे या गृहस्थाला तीन मुली आहेत हे खरे वाटू नये त्यांचे हे विधान पाहता .

सत्तेच्या कैफाने धुंद झालेल्या या मुर्दाड मनाच्या राजकारण्यांना घरी पाठवण्याची वेळ आता आलेली आहे असाच संदेश या वक्तव्याने जनतेला दिला आहे .

आणि दुसरीकडे एक घटना जनतेच्या राग काहीसा शांत करणारी त्यांच्या भडकलेल्या मनाला काहीसा थंडावा देणारी आहे. नराधम मनोज कुमारला तिहार जेलमधील कैद्यांनी रविवारी रात्री मरेपर्यंत मार दिला. मनोज कुमारला शनिवारी बिहारमधून अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या मनोजकुमारला रविवारी तिहार जेलमध्ये आणले गेले. तिथे त्याला बराक नंबर आठमध्ये ठेवण्यात आले होते. मनोजच्या क्रूर कृत्याची माहिती येथील कैद्यांना वर्तमानपत्रांतून आधीच मिळाली होती. तसेच ठिकठिकाणी छापून आलेले फोटोही कैद्यांनी पाहिले होते. त्यामुळे कैद्यांमध्ये त्याच्याबद्दल प्रचंड संताप होता.

     मनोजला तिहारमध्ये आणल्यानंतर कैद्यांनी दिवसभर कुठलीही गडबड केली नाही. मात्र, रात्री साडेअकराच्या सुमारास आठ नंबरच्या बराकीतील कैद्यांनी मजोजकुमारला घेरले आणि त्याला बेदम चोप दिला. पोलिसांनी धावाधाव करून मनोजला संतप्त कैद्यांच्या तावडीतून सोडवले. अन्यथा मनोजकुमारचा न्याय तिथे जागीच झाला असता. इथून पुढचे प्रत्येक क्षणाचे त्याचे आयुष्य हे मानवतेच्या नावावरचा धब्बा आहे.


मग आजचा रोखठोक सवाल आहे आमच्या वाचकांना कि सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्या या असंवेदनशील मोठमोठ्या गुन्हेगारांपेक्षा तिहार तुरुंगातील छोट्या मोठ्या गुन्हांसाठी शिक्षा भोगणारे तरीही मनातला माणुसकीचा झरा न आटू दिलेले हे कैदी जनतेला जवळचे वाटले तर त्यात नवल काय ?   

              सुहास  भुसे 
   (रोखठोक साठी २३-०४-१३ )