About

Friday 30 September 2016

कष्टेवीन फळ नाही ?

एक म्हातारा शेतकरी मृत्युशय्येवर असताना आपल्या चार मुलांना बोलावुन त्यांना आपण शेतात गुप्तधन पूरले आहे अस गुह्य सांगतो, आणि मुले मग सगळे शेत खणून काढतात. गुप्तधन तर सापडत नाही पण मशागत चांगली झाल्याने पीक जोमदार येते व ती मुले सुखी होतात.
तात्पर्य:- कष्टेवीन फळ नाही.

मूल्यशिक्षणाच्या पहिल्या तासाला शिक्षक ही गोष्ट सांगतात. पण विद्यार्थी सकाळी नाष्टा करताना गुजरातमध्ये संगीत रजनीच्या कार्यक्रमात धनदांडग्यांनी पाडलेला नोटांचा पाऊस आणि त्यात पखवाज, तबले अर्धेअधिक पूरले गेलेले न्यूजमध्ये बघुन आलेला असतो.
आदल्या रात्री होमवर्क आटोपुन त्याने अब्बास मस्तानचा रेस 2 सारखा मुव्ही बघितलेला असतो. त्यातील व्हाइट कॉलर गुन्हेगारांची आलिशान जीवनशैली पाहिलेली असते.

दुसरीकडे वृत्तपत्रात त्याने मराठा क्रांती मूक मोर्च्यांमागच्या खदखदीची विश्लेषणे वाचलेली असतात. शेती आणि त्यात राब राबणाऱ्या शेतकऱ्यांची दुरावस्था तो उघड्या डोळ्यांनी बघत असतो. विद्यार्थ्याचं सामान्य ज्ञान इतके तरी खचितच पक्के झालेले असते की शेतकऱ्यांच्या 200 पिढ्या कष्टच करत आल्या आहेत. पुढच्या दोनशे पिढ्या जरी कष्ट करत अश्याच त्या काळ्या मातीत मेल्या तरीही तो नोटांची तशी मोजोरडी उधळण करू शकणार नाही.

सर मोठे आलेत सांगणारे, म्हणे कष्टेवीन फळ नाही. कष्ट केल्यावर घंटा फळ मिळते !! फळ मिळण्यासाठी तर कष्ट सोडून दूसरेच काहीतरी करायला लागते.
पुस्तकात आहे म्हणून सरांना शिकवावे लागते. आपल्याला पेपर लिहायचा असतो म्हणुन शिकावे लागते एवढाच त्याचा माफक अर्थ !!

गोष्टीच्या तात्पर्यासबंधी अस विचारचक्र विद्यार्थ्याच्या मनात सुरु असेल तर त्यात त्याचा दोष कसा म्हणायचा ?
©सुहास भुसे


Monday 19 September 2016

मराठ्यांना शैक्षणिक सवलती हव्यात

मराठा समाजाचे मोर्चे हा व्यवस्थेने केलेल्या दीर्घकालीन गळचेपीचा परिपाक आहे. व्यवस्था ही सर्वजातीय घटकांनी बनलेली आहे. त्यात गडगंज मराठा घराणीही आलीच. पण काही मोर्चा विरोधकांनी फक्त याच गोष्टीचे भांडवल करायला सुरवात केली आहे. तथापि विरोधकांनी आकसापोटी मांडलेला एक मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा आहे.

मराठा समाजातील दिग्गजांच्या ताब्यात अनेक शिक्षण संस्था आहेत हे वास्तव आहे. आज मराठा समाजापुढील सर्वात गंभीर प्रश्नांपैकी एक शिक्षण आणि नोकरी हा आहे. मराठा आरक्षण कायदेशीर लढाईअंती मिळेलच.. पण मराठा समाजाच्या ताब्यातील शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजासाठी खास राखीव कोटा आणि फीमध्ये सवलत असण्यास काहीच हरकत नाही.

अल्पसंख्य कम्युनिटीच्या शिक्षण संस्थांमध्ये त्यांच्या कम्युनिटीसाठी खास राखीव कोटा व खास सवलती असतात. ही त्यांची समाजाप्रति असणारी बांधीलकी आहे. एकमेकांना धरून राहण्याच्या आणि समाजाभिमुख वृत्तीमुळे या अल्पसंख्य कम्युनिटी बहुसंख्याकांना मागे टाकून पुढे गेल्या आहेत.

सोलापूरमधील टॉपचे कॉलेज म्हणून वालचंद कॉलेजकडे पाहिले जाते. ही संस्था जैन समाजाची असून जैन समाजाच्या मुलांना संस्थेत 40 % राखीव प्रवेश कोटा आहे. अश्या बहुसंख्य संस्थांच्या घटनेतच तशी तरतूद करुन ठेवलेली आहे. हा प्रयोग सर्व मराठा शिक्षण संस्थांनी अंमलात आणायला हवा.  आज मराठा नेते आणि शिक्षण सम्राट जे काही आहेत त्यात मराठा समाजाचा सिंहाचा वाटा आहे. समाजाचे ऋण मान्य करुन त्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

पवार साहेबांचे विद्या प्रतिष्ठान आहे,  पतंगराव कदमांचे भारती विद्यापीठ आहे. वैरागचे बाळासाहेब कोरके यांच्या शे दोनशे शिक्षण संस्था आहेत. बार्शीची जगदाळे मामांची शिक्षण संस्था आहे. रयत शिक्षण संस्थेवर देखील मराठा समाजाचेच वर्चस्व आहे. डी वाय पाटील आहेत, विखे पाटील आहेत. अजुनही अनेक मराठा धुरीणांच्या अश्या खंडोगणती शिक्षण संस्था आहेत.

सोशल मिडियावरील सर्व सुशिक्षित मराठा तरुणांनी यापुढील मोर्च्यांत मराठा समाजाच्या शिक्षण संस्थांमध्ये मराठा मुलांना 40 % राखीव कोटा आणि फी मध्ये 50 % सवलत ही जोडमागणी लावून धरायला हवी. यात येऊ शकणाऱ्या  कायदेशीर अडचनींवर मार्ग काढण्यात यावा किंवा योग्य पर्यायी मार्गांचा विचार व्हावा.

©सुहास भुसे


सहकार:विकास केंद्रे की पिळवणूक केंद्रे

'साखर कारखाने, विविध कार्यकारी सोसायट्या, सहकारी बँका आणि एकूणच सहकारी चळवळ यांच्यामुळेच मराठा समाजाची पिळवणुक झाली आणि या सर्व किंवा बहुतेक संस्था मराठा नेत्यांच्याच ताब्यात आहेत.'

हे शहरी विश्लेषकांचे -जे उन्हाळी सुट्टीला चारेक दिवस हवापालट म्हणून ग्रामीण भागात जातात न जातात- मराठा मोर्च्यांमागील असंतोषाचे आवडते विश्लेषण आहे.

सहकारी साखर कारखाने कोणत्या संघर्षातून उभे राहिले , त्यासाठी किती मोठा लढा दिला विखे बाबा, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील अश्या दिगग्जांनी... याची कृपया या अभ्यासकांनी माहिती घ्यावी ..
त्या अत्यंत गरीबीच्या काळात फाटक्या-तुटक्या शेतकऱ्यांकडून वणवण करुन त्यांनी शेअर्सचे पैसे कसे जमवले याचा अभ्यास करावा.

कोरडवाहु क्षेत्रात भगीरथ प्रयत्नांनी हरित क्रांती कशी घडवली याचा अभ्यास करावा. संन्याश्याच्या लग्नाला शेंडीपासून तयारी या उक्तीप्रमाणे  सहकार धुरीणांनी हे सगळे शुन्यातुन कसे साकारले याची माहिती घ्यावी.

सहकारी संस्था ही पिळवणूक केंद्रे नसून कॉर्पोरेटस् च्या विळख्यातुन शेतकऱ्यांना अद्यापपर्यन्त लांब ठेवणारी विकासमंदिरे आहेत.

एका -एका साखर कारखान्यामुळे त्या सबंध परिसराचा कसा कायापालट झाला आहे ... याची तुलना
ज्या ग्रामीण भागात कारखाने नाहीत त्यांच्याशी करुन बघावी आणि मगच उपरोक्त विधान करावे ...

©सुहास भुसे


मराठा जागा होतोय.

आमचा सोलापूर जिल्हा राजकीय दृष्ट्या भयंकर उदासीन आहे. पंढरपुर मतदारसंघातून संदीपान थोरात सलग सहावेळा लोकसभेला निवडून गेले. कोणाला ठाऊक आहे का ही व्यक्ती ? अनेकांना थोरात फक्त ऐकून माहीत होते. न कसली कामे न जनसंपर्क. सुशिलकुमार शिंदेही सलग निवडून येत आलेले आहेत. विधानसभा मतदारसंघातही क्वचित् बदल झालेले आहेत. इकडचे सगळे मतदारसंघ सेफ समजले जातात. म्हणून तर पवार साहेबांनी सुद्धा माढा मतदारसंघाला पसंती दिली होती.

मोर्चे, आंदोलने वगैरे सोलापूरकरांच्या पचनी पडत नाहीत. ऊसदराच्या आंदोलनासाठी कोल्हापुर, सांगली पेटत असताना आमची लोक घरातून बाहेर निघत नसत. आंदोलने व्हावी, ऊस दर वाढून मिळावा पण ते दुसऱ्यांनी करावे अशी उदासीनता ..म्हणून तर शेजारच्या जिल्ह्यात ऊसाला 2400-2600 रूपये दर मिळत असताना सोलापूरकर मात्र 1800 ते 2000 दर घेऊन शांत बसत.
सोलापुर जिल्ह्यातील रस्त्यांइतकी दुरावस्था इतरत्र कोठे नसेल पण हे त्यावरुन गुपचुप गाड्या दामटतात.
महीनो न महीने लाइट नसली तरी हे कधी तक्रार करत नाहीत.
सोलापुर जिल्ह्याची वरदायिनी उजनीचे पाणी अनेकांनी पळवले पण सोलापूरकर कधी पेटून उठले नाहीत.

पण 21 तारखेला सोलापुरला मराठा क्रांती मोर्चा जाहीर झाल्यापासून गावोगावचे वारे बदलले आहेत. चार लोक जमले की फक्त एकच विषय असतो चर्चेचा 'मराठा क्रांती मोर्चा ' चार आया बाया एकत्र आल्या तरी मोर्च्यांशिवाय दूसरे बोलत नाहीत.
गावोगाव ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त नियोजन बैठका सुरु आहेत. लोक न बोलावता स्वत: हून या बैठकांना येत आहेत. कस जायचे, कधी निघायचे, कोण कोण येणार, फॅमिली कशी न्यायची यावर उत्स्फूर्त मते नोंदवत आराखडा ठरवत आहेत. माढा तालुक्यातुन काही गावांतुन आदल्या दिवशी चालत सोलापुर गाठून मोर्च्यात सामील होण्याची नियोजने होत आहेत. सगळी वाहने जवळ जवळ बुक होत आली आहेत. एकूणच मोर्च्यांला जाण्याचा उत्स्फूर्त उत्साह प्रचंड ओसंडून वाहत आहे.

मराठा मोर्च्यांच्या मागण्या तर मान्य होतीलच पण या निमित्ताने महाराष्ट्रात बहुसंख्य असणारा मराठा समाज राजकीय दृष्ट्या सजग होतोय, उदासीनता झटकुन जागृत होतोय, घरे सोडून रस्त्यावर उतरतोय हा फार मोठा सकारात्मक बदल या मोर्च्यांच्या निमित्ताने घडून येत आहे. 32 ℅ समाज राजकीय दृष्ट्या जागृत होणे ही काही साधी घटना नव्हे. याचे विधायक राजकीय परिणाम येत्या काळात दिसून आल्याशिवाय राहणार नाहीत.
©सुहास भुसे


Saturday 10 September 2016

गुंठे पाटील नव्हे भूमीपुत्र

शेतकरी जमिनीवर आई सारखी माया करतो. आज ज्यांच्याकडे जमीनी आहेत त्यांच्या वाडवडिलांनी अनंत हालअपेष्टा सोसल्या पण जमीन विकली नाही. दुष्काळात नाही पिकले तर मोठ्या शेतकऱ्यांच्यात सालं घातली, कोंडयाचा मांडा करुन पोरेबाळे जगवली. पण जमिनीला हात घातला नाही. पिको न पिको अनासक्त कर्मयोगाच्या भावनेने आमचे पूर्वज निष्ठेने या काळ्या आईची सेवा करत राहिले, मुठ पसा पेरत तिची ओटी भरत राहिले.

या गरीबीत देखील शेतकऱ्याचे मन मात्र कधी कोते झाले नाही. त्याच्या बांधाला लोकांनी शेळ्या गुरे चारावीत, पिकाच्या कडेच्या दोन काकऱ्या त्यांच्यासाठीच ठेवलेल्या असत. शेतात जो येईल त्याने दोन्ही हातांनी भरभरुन माळवे, भाज्या न्याव्यात. ज्यांना जमीनी नव्हत्या अश्या बलुत्यांनाही कधी काही विकत आणावे लागले नाही. शेतकऱ्यांच्या खळ्यावरुन माल घरी जायच्या आधी बलुत्यांना वाटप होई. मग पोत्यांची लड गाडीत रचली जाई. आमचे पूर्वज जी मिळेल त्यातली अर्धीकोर गावगाड्याबरोबर वाटून घेऊन गाडा हाकत राहिले.

अहो जो हाडाचा शेतकरी असतो तो पाखरं राखताना ढेकुळ शेजाऱ्याच्या रानात जाईल म्हणून त्यांना कधी ढेकुळ फेकून हाणत नाही. दार धरताना पायाला लागलेला चिखल धुतल्या, पुसल्याशिवाय बांधाबाहेर पाय ठेवत नाही. काय होणार त्या ईवल्याश्या मातीने असे .... पण त्याची आपली वेडी माया असते...

आजही हा शेतकरी राजा असाच भावुक आहे. काळ्या आईवर त्याची अशीच अपार श्रद्धा आहे. शहरीकरणाच्या रेट्यात शहराजवळच्या मुठभर लोकांनी आपल्या जमीनी विकल्या असतील ... पण म्हणून आमच्या पूर्वजांनी ज्यांच्या पिढ्या जगवल्या त्यांची चार दोन बुकं शिकलेली, अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली पोरे ' गुंठे पाटील ' ' गूंठा मंत्री ' म्हणून समस्त मराठा शेतकरी वर्गाचा उपहास करत आहेत.

त्यांची चीड येत नाही तर कीव येते .. विकृतीत परिवर्तित झालेल्या त्यांच्या तथाकथित, फुसक्या विद्रोहाची दया येते.. ज्यांच्या पिढ्यान पिढ्यांना कधी काळ्या आईची हिरवी माया मिळालीच नाही तर तिचे मोल त्यांना कसे समजणार ??

©सुहास भुसे


Friday 9 September 2016

सनातनी बनवण्याची रेसेपी

*सनातनी बनवण्याची रेसेपी*

सर्व प्रथम एक फ्रेश अजिबात वापर न झालेला मेंदू निवडावा.
मग त्याला कढईत घालून खालून प्रखर असा शिवसूर्यजाळ लावावा.
त्यात एक वाटी नथुराम आणि दोन वाट्या सावरकर टाकावेत.
हे मिश्रण चांगले रटरटू द्यावे.

तोवर इतिहासाची भाजी निवडायला घ्यावी.
गांधी नेहरू खुडून बाजूला काढून फेकून द्यावेत.
सरदार पटेल, नेताजी, भगतसिंग वेचून निवडून घ्यावेत.

मग कढईत अखंड हिंदूराष्ट्राच्या तेलाची धार सोडावी.
कढीपत्त्याच्या जागी राममंदिराची योजना करुन चरचरित फोडणी द्यावी.
त्यात एक मोठी वाटी मुस्लीम द्वेष टाकावा.
एक चमचा हेगडेवार एक चमचा गोळवलकर टाकावेत.
चिमुटभर भिडे गुरुजी, चिमुटभर आफळे गुरुजी, चिमुटभर पपु आठवले टाकावेत.
चवीपुरता भगवा आतंकवाद टाकावा.

हे सर्व मिश्रण चांगले हलवून घ्यावे.

शिवसूर्यजाळावर सतत फुंकर घालत राहावी.
मिश्रण चांगले रटरटून गडद केशरी रंगांचा तवंग आला की अस्सल रुचकर चवदार सनातनी तयार झाला म्हणून समजावे.
©सुहास भुसे.


पावसाचे वेड

बाहेर असताना पाऊस आला आणि लोकं आडोसा जवळ करू लागली की मला मिस्किल हसु फूटते. मोबाइल वगैरे सेफ करुन मी घाई घाईने आडोसा असला तर सोडतो..
काय हा वेडेपणा अश्या नजरेने कोणी बघितले तर अर्जेन्ट काम असल्याची थाप ठोकतो..

मुसळधार पावसाचा मारा अंगावर झेलत मोटरसाइकलवरुन फिरण्याची मजा काही औरच असते.
सपसप टाचण्या टोचल्यासारखा पाऊस चेहऱ्याला टोचत असतो.
हाताचा वायपर करुन भिवयावरील पाणी निपटत आजूबाजूची दृश्ये बघत सावकाश गाडी चालवायची..
शेतातून बांध फोडून वेगवेगळ्या रंगाचे गढुळ पाणी ओसंडत असते..
झाडे वाऱ्याने वाकत पाऊस झेलत असतात.
त्यांची नितळती झळाळी आणि तकाकी पड़त्या पावसातच पाहावी..
या दृश्यांमधली जिवंत मजा पाऊस थांबल्यावर नाही..

रस्त्यावरुन महामुर पाणी वाहत असते.
त्यातून बाइक वेगात घालून ते पाणी उडवण्याचा आनंद मनमुराद लुटावा..
आणि मुसळधार पावसात तुमचा हा वेडेपणा पाहायला कोणी नसते..
कोणी असले तर पावसामुळे दिसत नाही..
मी तर मोठ्यांदा गाणी सुद्धा म्हणतो 😉
पावसाच्या आवाजात कोणी ऐकत नाही ..
..
पाऊस माणसाला थेट शैशवात नेऊन सोडतो...
©सुहास भुसे


मृण्मयीचे भविष्य

मी लहान होतो बराच.. दूसरी तिसरीला असेन.
दारात आलेल्या एका कुडमुड्या जोतिष्याने माझ्याबद्दल आईला सांगितले की पोरगा देवगुणी आहे. याच्या पाठीत शंकर आहे.

बस !! सगळ्या जुलुमातुन आणि मारहाणीतुन मला मुक्ती मिळाली. आईने हात उगारला की मी ॐ नमो शिवाय म्हणायचो. हा मंत्र तात्काळ फलदायी व्हायचा. फारच भयंकर राग आला असेल तर आई पाठीऐवजी गालावर जाळ काढी. पण अगदी क्वचित् ..
मला मारण्याचे प्रमाण भोलेनाथांच्या आमच्या पाठीत वास करण्यामुळे 99 % कमी झाले होते.
तेव्हा पासून आज तागायत कुडमुडे, पिंगळेवाले, डवरी वगैरे लोकांबद्दल मला भयंकर आपुलकी वाटते.

मृण्मयी .. माझी मुलगी खुप आगावू आहे अस तिच्या आईचे मत आहे. भयंकर खोड्या करते आणि अजिबात ऐकत नाही म्हणजेच थोडक्यात ती बापावर गेली आहे अस तर तिच्या आईला ठामपणे वाटते.

तर परवा असेच एक साधू बाबा दारात आले आणि त्यांनी मृण्मयीबद्दल सांगितले.
"ही तुमची पूर्वज आहे. हिच्याशी अहो जाहो बोला. तरच हिची कडकड व आगावुपणा कमी होईल."

मृण्मयीची पण आईच्या जुलुमातुन मुक्ति होण्याचा हा सुवर्णक्षण ठरायला हरकत नाही. पण साधू बाबांच्या सांगण्यात एक छोटी मख्खी होती.
मृण्मयी पूर्वज आहे म्हणजे माझी आजी आहे. थोडक्यात मृण्मयीच्या आईच्या सासुची सासु.

त्यामुळे मला थोडीशी शंका आहे. उलटा परिणाम होऊ नये.

©सुहास भुसे


छत्रपती कोणाचे?

ब्राह्मण बहुजन समाजाचे शत्रु आहेत, ब्राह्मण इतिहासाची मोडतोड करतात हे समाजावर इतक्या प्रमाणात बिंबल आहे की या काही नव्या बांडगुळांकडे दुर्लक्ष होत आहे. छत्रपतींच्या हातातली विष्णुची मूर्ती कशी तथ्यहीन आहे याची मांडणी करत असताना त्यांच्या हातातले कुराण दुर्लक्षित होत आहे.
अर्थात ही तुर्त तरी बांडगुळेच आहेत.
त्यांचे उपद्रवमूल्य त्यांच्या उघड आणि धांदात खोटेपणामुळे जवळ जवळ नगण्य आहे.
पण हा अपप्रचार कितीही तथ्यहीन आणि विनोदी असला तरी सुसूत्र पद्धतीने आणि निश्चित उद्दिष्ट ठेवून केला जात आहे हे नाकारता येणार नाही.

"1950 नंतर आम्ही कोणाला राजा मानत नाही. " अशी विधाने काही विशिष्ट उद्देश् डोळ्यांपुढे ठेवून केली जातात.
मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या जातीसाठी काय केले ?
आम्ही शिवाजी आणि संभाजी यांना फक्त याचसाठी मानतो की या परंपरेने आम्हाला राजर्षी शाहूसारखा राजा दिला. असा प्रचार सुरु होतो. छत्रपतीना साडेतीन जिल्ह्याचा स्वामी ठरवण्याचे अनाव्रती अश्लाघ्य प्रयत्न होतात.

एका पातळीवर छत्रपतींचे अलौकिक कार्य नाकारुन त्यांची महत्ता कमी करण्याचे प्रयत्न होत असतानाच राजमाता जिजाऊ पर्यायाने छत्रपती हे बौद्ध आहेत असा प्रचार दुसऱ्या पातळीवरुन सुरु ठेवला जातो.

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी नव्हते किंवा मुस्लिमविरोधी नव्हते हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या हातात कुरआन दाखवण्यापर्यन्त जाऊन पोहोचतो.

कोण आहेत हे लोक ? काय हेतु आहे त्यांचा इतिहासाच्या या विकृतीकरणामागे ?

सध्या समाजात पूर्वी कधीही नव्हत्या इतक्या प्रमाणात जातीय अस्मिता टोकदार झाल्या आहेत. हे काही आपोआप झालेले नाही. जातीय ध्रुवीकरण करुन त्यातून आपापले हेतु साध्य करणाऱ्या मंडळींकडून हे जाणीवपूर्वक घडवून आणले जात आहे.

एक उद्देश असा की छत्रपती शिवाजी महाराजांसारखे तेजस्वी प्रतिक आपल्याकडे असावे या भावनेतुन ही किळसवाणी खोटेपणाचा कळस असलेली खेचाखेच सुरु आहे.

दूसरा उद्देश जो समाज छत्रपतींना मानतो त्या समाजाचा तेजोभंग करणे.

आणि तिसरा उद्देश बहुजन समाज जो एकमुखाने छत्रपतीना मानतो त्यांच्यात दुफळी माजवून सर्व सामाजिक चळवळी कमजोर करणे.

छत्रपती हे सर्व जाती धर्माना एकत्र आणणारे, आणु शकणारे एक शक्तिशाली ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे. जातींच्या पलीकडची आणि सर्वमान्य असणारी अशी खुप कमी प्रतिके आहेत जी जातीपातींना एकत्र बांधून ठेवत त्यांना एक समाज बनवत असतात.

अश्या खोटेपणाला त्या त्या ठिकाणी ऐतिहासिक तथ्ये व पुराव्यांच्या सहाय्याने चोख प्रत्त्युत्तर देत हे बांडगुळी प्रयत्न शिवप्रेमींनी हाणून पाडले पाहिजेत.
आणि छत्रपतींचा तेजस्वी आणि खरा इतिहास ज्याला ज्या माध्यमातून जमेल त्या माध्यमातून आपापल्या कुवतीप्रमाणे मांडत राहिले पाहिजे.
©सुहास भुसे


भुत रिलोडेड

गावाकडची भूते आणि सिनेमातली भूते यात फार फरक असतो.

आमच्या गावात एक पैलवान मनुक्ष होता. मी लहान असताना पाहिले तेव्हा त्याची पांढरी दीड वित दाढ़ी .. आणि एकेकाळी ताठ असलेले आणि आता खंगलेले शरीर.. पण आता खंडहर असलेली ही इमारत एकेकाळी बुलंद होती हे जाणवायच. पावणे सात फुटाच्या आसपास उंची आता वाकल्याने जरा कमी वाटे. आमच्या वाड्याच्या आसपासच घर होते.

लोक सांगत की तो दातांनी ज्वारीच पोत उचलायचा. पोत्यांनी भरलेली बैलगाडी हातांनी ओढायचा. दाढीने पाण्याची मोठी घागर उचलायचा. भयंकर ताकदवान मनुक्ष.
याच्या भुताशी असलेल्या जवळीकीच्या गोष्टी ऐकून आम्ही याला जाम टरकुन असायचो. गल्लीत आला की पोरे सोरे सुंबाल्या व्हायची.

तो दर अमावस्येला भूताशी कुस्ती खेळायला जायचा.
ते भुत याला गोळसायच, हा त्या भुताला गोळसायचा. भुत याला उचलून आदळायच. हा भुताला परूस करुन वरुन फेकून द्यायचा. तूफान धूमश्चक्री व्हायची.
तर अस दर अमावस्येला कुस्ती खेळून खेळून याची आणि त्या भुताची झाली दोस्ती.
मग एके दिवशी ते भुत या पैलवानाला वेताळाच्या जत्रेला घेऊन गेले.

अमावस्येला कुठेतरी लांब माळावर ही वेताळाची जत्रा भरते. तिला झाड़ून सगळी भूते उपस्थित असतात. भूते मशाली नाचवतात. वेताळाची पालखी इकडून तिकडे फिरवतात.
तर यांची जत्रा बित्रा झाली सगळी.
मग भूते जेवायला बसली. हे सगळी अंगत पंगत. भूतांच्या पंगतीचा एकमेव नियम असा की वाढताना नको म्हणायचे नाही आणि ताटात शिल्लक काही ठेवायच नाही. नियम मोडला की खैर नसे.

आपला पैलवान भूतांच्या मांडीला मांडी लावून बसला आणि पंगत सुरु झाली. जेवण काय तर हिरव्यागद्द भाकरी, पातळढंग आमटी. भूते फूल स्पीड मध्ये तुटून पडली जेवणावर. वाढनारांची धांदल उडाली. पैलवान पण भूतांच्या बरोबरी ताट रिकामे करू लागला. कसा तर त्याने एक 'युगत' केली होती. डोक्यावरचा फेटा सोडून त्याची झोळी केली आणि ती खांद्याला अडकवली. येतील त्या भाकरी तो त्यात टाकायचा. आणि ताटाला त्याने एक छोट भोक पाडल. येईल ती आमटी खाली ओघळून जायची.

होतास्ता ती रंगलेली पंगत संपली एकदाची. भूतांच्या बरोबरीने एवढा अवाढव्य खाना घेतला म्हणून त्याच्या दोस्त भुताने पैलवानाच्या पाठीत शाब्बासकीदखल एक जोराचा धपाटा घातला. आणि त्याला जेव्हा हव तेव्हा वेताळाच्या जत्रेला यायची परवानगी देऊन टाकली.
..
या गोष्टी अतार्किक असत. त्यात फार कल्पना चमत्कृती नसे. त्यामुळेच कदाचित त्या दंतकथा आहेत अस  जाणवत नसे. ते सगळ खरच वाटे. ते कथानायक गावातले असत. अजुन जिवंत असत.   त्या वयात गावातील एखाद्या पारावर एखाद्या म्हाताऱ्या गुइंदा आबाने किंवा आण्णु गुरवाने आपल्या खास खुमासदार शैलीत रंगवुन सांगितल्या की खुप रंगतदार वाटायच्या. लोक गुंगुन जायची. टीव्ही किंवा मोबाईल नसणाऱ्या काळातील ते जिवंत आणि रसरशीत मनोरंजन होते.
©सुहास भुसे


भुतपटातली भुते

Exorcist पासून conjuring-2 पर्यन्त तमाम हॉलीवुडचे हॉररपट आणि पुरानी हवेली पासून राज- 4 पर्यन्त तमाम बॉलीवुडचे भय पट पाहुन काही निरीक्षणे नोंदवत आहे.

हॉलीवुडच्या भूतांची आपल्याला फारशी भीती वाटत नाही. पांढरेफेक झाँबी टाइप विद्रूप चेहरे, कीडे खाणारी, उलट्या काढणारी गलिच्छ भूते असतात हॉलीवुडची. मला तर विनोदीच वाटतात ती.

भुत म्हणजे कस हवे ?
हिरवी साडी, हातात हिरवा चुडा, मोकळे केस.. भरलेला मळवट असल्या हडळीने ते टिपिकल अमानवी हास्य केले की अंगावर काटा येतो. किंवा साधा पेहराव, साधा मेकअप आणि वेडसर गूढ़ हास्य .. रात मधली रेवती आठवते का?
कदाचित हॉलीवुडवाल्यांना आपली भूते विनोदी वाटत असतील. थोडक्यात भूते ही आपापल्या भागातलीच... मुळनिवाशी हवीत.

दूसरे निरीक्षण असे की पुरुषांची भूते स्त्रियांच्या तुलनेत नगण्य असतात. एखादे दूसरे असले तरी ते फार भीतिदायक वाटत नाही. जास्तीत जास्त पिक्चरमध्ये स्त्री भुतालाच प्राधान्य असते.

कदाचित स्त्रियांची पुरुषांच्या मनात असलेली बाय डिफॉल्ट दहशत ध्यानात घेऊन दिग्दर्शक विचार करत असेल की यांना भीती दाखवण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही.

अजुन एक निरीक्षण असे की ख्रिश्चन माणसाचे भुत घालवायला क्रूस, बायबल, होली वॉटर वापरावे लागते. आणि येशु मसी ची प्रार्थना करायला लागते. Exorcism करायला पादरी लागतो. तर हिंदू माणसाचे भुत रुद्राक्ष, देवाची मूर्ती, अंगारा अश्या वस्तुना भिते. बाबा बुवा मंत्र तंत्र गंडे दोरे ताइत आदी गोष्टी उपयुक्त.

ख्रिश्चन भुत हिंदू देवाला भिते किंवा हिंदू भुत ख्रिश्चन देवाला भिते असा आंतरधर्मीय पुरोगामी विचार अद्याप कोणी दिग्दर्शकाने केलेला दिसत नाही. ब्याकवर्ड, सनातनी लोक्स कुठले !!

यावरून धर्म आणि देव धर्माची दहशत माणूस मेल्यावरही त्याचा पिच्छा सोडत नाही अस दिसते.

मुस्लिम भूते कधी सिनेमात जास्त करुन दिसली नाहीत. कदाचित मुस्लिम भुत होत नसावेत. अस असेल तर बरच आहे अर्थात ... लादेन, अबू कुरैशी, अल बगदादी सारखी माणसे भूते झाली तर काय घ्या ?

©सुहास भुसे


शिक्षकी पेशाचे अवमूल्यन

जगातील सर्वात भेकड आणि स्वाभिमान शून्य जमात कोणती असेल तर ती शिक्षक असे मला वाटते ...
किती भयंकर अन्याय सहन करतात ही लोक .. पण मुंडी वर करत नाहीत ...
द्रोपदीला पाच नवरे होते पण हे शंभर नवऱ्यांशी संसार करतात ..
जो येईल तो नवरा
गटशिक्षणाधिकाऱ्याने यावे भोसडून जावे..
उपशिक्षणाधिकाऱ्याने यावे भोसडून जावे..
शिक्षणाधिकारी तर मोठे मालक ..
संस्थापक नवरा ..
त्याची बायको, त्याचा भाऊ, बाप, आई, पूतणे, पोरे सगळे नवरेच नवरे ..
पालक येतात चढून जातात ..
जो यांची घेणार नाही तो आळशी ..
बी एड ला यांचे ट्रेनर शिक्षक सांगतात, आम्ही जर म्हटल हाल्या दूध देतो तर तुम्ही घट्ट आणि सकस  असते म्हणायचे .. नो ऑफेंस ओनली आज्ञापालन ..
या हरामखोरांच्या हातात प्रॅक्टिकलची मार्क आणि ग्रेड असतात त्यामुळे भावी शिक्षक यांच्या नावाचे गंठन गळ्यात बांधून घेतात आणि मान खाली घालून वर्षभर संसार करतात.
आमच्या बी एड बॅचच्या वेळी असेच काही माजोरडे ट्रेनर शिक्षक होते.
एकजण वर्गात भयंकर अश्लील बोलायचा..
प्रश्न विचारायचा आणि ज्यांना येते त्यांनी हात वर करा ..
ज्यांना येत नाही त्यांनी (इथे मुलींकडे बघत ) पाय वर करा ..
भयंकर मनुक्ष ..
पण काही नाही सगळे निमुट खाली मान घालून ऐकायचे..
आणि टाचणे काढत बसायचे..

तर असल्या कॉलेजमध्ये हे घडतात ..
पुढे जॉब च्या वेळी यांना 5 -10 -15 वर्षे अक्षरश: फुकट राबवून घेतात..
नशीब असेल तर पेमेंट मिळते ..
नाहीतर हार मानून जॉब सोडतात व भजी पावचा गाडा टाकतात.
बर इतकी वर्षे फुकट राबुन वरतुन हे लोक संस्थापक नावाच्या यांचे रक्त पिवुन माजलेल्या ढेकणांना 15-15 लाख, 20-20 लाख डोनेशन देतात ..
वर या ढेकनांचा वाढदिवस आला .. एक पगार कपात..
ढेकणांची पोरे परदेशात निघाली ... एक पगार कपात..
ढेकुण डस्टर घेतोय .. एक पगार कपात ...
ढेकुण इलेक्शनला उभा राहिला ... दोन पगारी कपात..
जॉब ची ऑर्डर एप्रुव्हल काढताना हे शिक्षण खात्यातील शिपायापासून हायेस्ट ऑथोरिटी पर्यंत सगळ्यांचे पाय धरतात, लाखो रूपये त्यांच्या घशात घालतात.
यांची लाचारी लिहावी तेवढी कमी आहे ..
हे कधीही फना काढत नाहीत ..
कितीही चेचा .. कितीही रगडा ..
आणि हेच लोक आपला उद्याचा भावी समाज घडवतात ..
(या सर्व गोष्टींना काही सन्माननिय अपवाद आहेत पण ते फक्त नियम सिद्ध करण्यापूरते )
©सुहास भुसे


शरद पवार, ऍट्रॉसिटी आणि आत्यंतिक प्रतिक्रियावाद

माकडाच्या हाती कोलीत अशी एक म्हण आहे मराठीत. त्याचा अर्थ ज्या गोष्टीचा वापर करण्याची अक्कल नाही अशी गोष्ट अडाण्याच्या हातात विघातक ठरू शकते.
भारतीय राजकारण व समाजकारणात याच प्रत्यंतर वारंवार येत आहे.

शैक्षणिक आणि सामाजिक परिपक्वता नसताना आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, लोकशाही मिळाली आणि त्या लोकशाहीच्या आज आपण कश्या चिंधड्या केल्या आहेत हे सर्वश्रुत आहे.

तीच गोष्ट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मिडियाची.
सामाजिक जाणिवा अपरिपक्व असलेल्या आणि भारतीय राजकारण समाजकारणाचे मर्म अजिबात ज्ञात नसलेल्या झुंडी इथे कार्यरत आहेत.
यांचे विशिष्ट अजेंडे ठरलेले असतात.
इथे वावरणाऱ्या कोऱ्या पाट्यांवर विकृत रेघा ओढण्याचे काम करत लोकांचे मत विशिष्ट दिशेला झुकवण्यासाठी हे फक्त संधीच्या शोधात असतात.
आणि सामान्य वकुबाचे लोक यांच्यासोबत वाहवले जातात.

ताजे उदाहरण शरद पवार यांचे अट्रोसिटीबाबतचे वक्तव्य.
शरद पवार हे एक पुरोगामी नेतृत्व आहे. ते आणि त्यांचा पक्ष सर्व जाती समाज घटकांना बरोबर घेऊन चालतात. समाजातील एक मोठा समुदाय जर विशिष्ट गोष्टीची मागणी करत असेल तर त्याची दखल घेऊन त्यावर विचार मंथन व्हावे अस शरद पवारांनी सुचवले तर यात काय चूक आहे ?

पण पवार फोबिया झालेले अनेक जण पवार कधी काय बोलतात यावर टपून बसलेले असतात. पवार काही बोलले की लगेच त्याची सोइस्कर मांडणी करुन या लोकांचे गरळ ओकणे सुरु होते.

शरद पवारांना आज जातीयवादी लेबल लावणाऱ्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा इतिहास विसरु नये. पवार साहेबांच्या त्यावेळच्या निर्णयामुळे त्या भागातला मराठा समाज जो पवारांपासून दुरावला तो आजतागायत रिकव्हर करणे पवार साहेबांना पूर्णतया शक्य झालेले नाही.

एट्रोसिटी कायदा राज्यात कुप्रसिद्ध आहे. दुरुपयोगासाठी बदनाम आहे. कायदा सर्वांना समान हे घटनेचे मुलभुत तत्व असताना विशिष्ट समाजासाठी वेगळे कायदे करुन आपण आपल्या प्रचलित कायदा सुव्यवस्थेचे अपयशच जाहीररित्या कबूल करत आहोत. समानतेचे तत्व पायदळी तुडवत आहोत. अर्थात यावर वेगवेगळी मतमतांतरे असू शकतात. कदाचित काही प्रकरणी हा कायदा आवश्यकही असू शकतो. पण त्यावर कोणी बोलुच नये, त्यविरुद्ध ब्र काढाल तर जातीयवादी ठरवले जाल ही तुघलकी मानसिकता लोकशाहीसाठी घातक आहे.

शरद पवार आणि त्यांचा पक्ष मराठ्यांचा अनुनय करतात अस काही लोकांचे मत आहे. यात प्रामुख्याने तेच लोक आहेत जे बहुजनांच्या खांद्यावर भगवा झेंडा देऊन सत्ता प्राप्त करतात आणि एकदा का सत्ता मिळाली की महत्वाची पदे आणि कोअर कमिट्या अघोषित आरक्षण असावे जणु अश्या पद्धतीने विशिष्ट समाजाला प्रतिनिधित्व देऊन भरतात. दादोजी कोंडदेव कुलकर्णीच्या पुतळ्याची उचलबांगड़ी केल्याने या मंडळींच्या मनात पवार घराणे व त्यांचा पक्ष याबद्दल प्रचंड असंतोष खदखदत असतो. आणि अनेक बहुजन देखील हजारो वर्षांच्या सवयीने त्यांच्या काव्याला बळी पडतात.

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा जर मराठ्यांचा अनुनय करणारा पक्ष असता तर खालील यादीवर नजर टाकावी.. या नेत्यांना मोठमोठी पदे, मानसन्मान, आणि पक्षात महत्वाचे स्थान मिळाले असते का ?

राष्ट्रवादीचे प्रमुख नेतृत्व आणि विरोधी पक्ष नेते  धनंजय मुंडे  वंजारी समाजाचे आहेत. पुरोगामी मुलुखमैदानी तोफ म्हणून सध्या गाजत असलेले जितेंद्र आव्हाड वंजारी आहेत. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे दलित आहेत. माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आदिवासी (एस टी) आहेत. तर आजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे गवळी आहेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे तेली आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हे पटेल समाजाचे आहेत. सुधाकरराव नाईक यांचे पुत्र लमाण, बंजारा. माजी उप मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ माळी आहेत. प्रवक्ते नबाब मलिक हे मुस्लिम आहेत.

विचार करा. राष्ट्रवादी हा जातीयवादी किंवा मराठ्यांचा अनुनय करणारा पक्ष असता तर या सर्व लोकांना एवढी मोठमोठी पदे आणि सत्तेत वाटा मिळाला असता काय ?

लक्षात ठेवा. सनातनी आणि प्रतिगामी लोकांना जरब असणारे शरद पवार हे आजघडीचे एकमेव पुरोगामी नेतृत्व आहे. कोणाच्याही कसल्याही अपप्रचाराला बळी पडू नका. अश्या जातीयवादी विखारी मानसिकतेच्या लोकांना जागेवरच चोख प्रत्त्युतर द्या.

©सुहास भुसे




पंढरीची वारी आणि फेसबुकी उपटसुंभ

पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या मर्मबंधातली ठेव आहे. महाराष्ट्रातील अध्यात्मिक, सामाजिक चळवळीची प्राचीन आणि अभिमानास्पद परंपरा आहे. सोशल मिडियावर गेल्या काही दिवसांपासून वारीवर काही विजारवंत टीका करत असलेली वाचण्यात आले. अर्थात त्यांना त्यांचे मत मांडायचा पूर्ण अधिकार आहे. सोशल मिडियाचे व्यासपीठ त्यासाठीच आहे. पण त्यांचे लेखन वाचल्यानंतर लक्षात आले की या माणसांनी दिंडी ही फक्त टीवीवर आणि पेपरात पाहिली आहे. किंवा पाचव्या मजल्यावरील आपल्या घराच्या काचेच्या खिडकीतून ओझरती बघितली आहे. अथवा दिंडीमुळे जाम झालेल्या ट्राफिक मध्ये अडकून तिला शिव्या देत कडेकडेने बघितली आहे. वारीबद्दल जी मते सोशल मिडियावर वाचण्यात आली त्यातील काही मुद्दे असे.

१ वारकरी हे अल्पशिक्षित किंवा अशिक्षित बहुजन असतात.
२ वारकरी हा एक जातीयवादी संप्रदाय आहे. ज्या त्या जातीच्या संतांच्या पालख्यात ज्या त्या जातीचे लोक जातात.
३ वारकरी संप्रदायाचा अंधश्रद्धा निर्मुलन किंवा साक्षरता वगैरे प्रबोधनात्मक चळवळीशी काहीही सबंध नाही.
४ भेदाभेद भ्रम अमंगळ वगैरे निव्वळ दांभिकपणा आहे. वारी संपल्यावर त्याचा कोणताही परिणाम जनमाणसावर राहत नाही.
५ वारीमध्ये अन्नदान कोणीही करेल पण हिंम्मत असेल तर त्यांना आपल्या घरी मुक्कामाला नेऊन दाखवा.

या बालिश आणि धादांत असत्य मुद्द्यांवर एक नजर टाकली तर लगेच सदरहू विजारवंतांचा एकांगी आणि पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन लक्षात येतो.

वारीला जाणारे हे फक्त अशिक्षित लोक असतात हा अजब तर्क त्यांनी कोणत्या संशोधनाअंती काढला हे समजायला वाव नाही. दिंडीची परंपरा इतकी सर्वव्यापक आहे की समाजाचा कोणताही स्तर त्यापासून अस्पर्श राहिलेला नाही. शिक्षणामुळे माणूस नास्तिक होतो हा गैरसमज तितकाच सत्य आहे जितका शिक्षणामुळे माणूस सुजाण होतो हा समज. दिंडीत अपवादाने नव्हे तर फार मोठ्या संख्येने उच्चशिक्षित वर्ग असतो. माझ्या घराचे उदाहरण देतो. माझे आजोबा डॉक्टर होते. वडील बी कॉम, क्लास वन पोस्ट वरून नुकतेच रिटायर झाले आहेत. (आताही आळंदीहुन येणाऱ्या माऊलींच्या दिंडीसोबत पायी येत आहेत)  इतरही काका वगैरे सगळे उच्चशिक्षित आहेत. आमच्या घरात अनेक पिढ्यांपासुन वारीची अव्याहत परंपरा आहे. कमीत कमी शंभर वर्षांपासून महिन्याची वारी न चुकता पोहोचवली जाते. आर्थिक परिस्थिती किंवा शिक्षण यांचा श्रद्धेशी काही सबंध नसतो. उलट श्रीमंत आणि उच्चशिक्षित वर्गातील लोक तुलनेने जास्त श्रद्धाळू असतात. सत्य साई बाबा ते राधेमापर्यंतच्या हुच्च अध्यात्मिक गुरूंच्या शिष्यपरिवाराच्या ‘क्लास’ चा अभ्यास केला तर सगळे समजून येईल.

२,३,४ हे मुद्दे वारकरी संप्रदायात जे थोर संत होऊन गेले त्यांच्या कार्याचा अपमान आहे. ज्या त्या संतांच्या नावे ज्या त्या गावातून दिंडी जाते. त्या त्या परिसरातून मोठ्या संख्येने सर्व जातीचे लोक जात विसरून त्यात सहभागी होतात. शेकडो मैल तुडवत विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीला येतात. त्यांच्या मनाला संतांच्या जातीचा विषय चुकूनही शिवत नाही. संतांच्या चळवळीच्या परिणामस्वरूप पुढे वाढलेल्या, व्यापक झालेल्या चळवळीच्या एका अध्यायस्वरूप सामाजिक बदलाची फळे चाखणाऱ्या, जातीअंतासाठी लढण्याचे ढोंग करणाऱ्या मास क्लास मधून नुकतेच इलीएट क्लास मध्ये गेलेल्या लोकांच्या मनातच ही जात मोठ्या प्रमाणावर असते. ज्ञानेश्वरांच्या दिंडीत सगळे ब्राह्मण, तुकारामांच्या दिंडीत सगळे मराठा, सावता माळ्याच्या दिंडीत सगळे माळी, गोरोबांच्या दिंडीत सगळे कुंभारच असतात अस या विद्वानांचे मत असेल तर एवढ्या बालिश आणि मूर्खपणाच्या विधानावर भाष्य करणेदेखील कठीण आहे.

वारी ही महाराष्ट्राची थोर लोकपरंपरा आहे. सर्व संतांच्या प्रबोधनाच्या कामाची चौथीतील मुलादेखील चांगली जाण असते. ‘परंपरा’ या शब्दाचा अर्थच ‘एखादी गोष्ट न थांबता अथकपणे साखळी रुपात पुढे चालू ठेवणे’ असा आहे. वारीत आजही संत वांग्मयच केंद्रस्थानी असते. एकतर संतानी कोणतेही प्रबोधन केले नाही अस म्हणता येईल किंवा वारीमुळे तीच प्रबोधनाची चळवळ पुढे सुरु आहे म्हणता येईल. संत, त्यांचे कार्य आणि वारीची परंपरा यावर वेगवेगळे भाष्य करणे तोंडावर पाडू शकते इतक्या या दोन्ही गोष्टी एकरूप आहेत.

४ थ्या मुद्द्याबद्दल... सामाजिक बदल हे आपल्या गतीने होत असतात. कालानुरूप होणाऱ्या आर्थिक आणि राजकीय स्थित्यंतरातून सामाजिक बदलांची गरज निर्माण होते. हे बदल शृंखला पद्धतीने सावकाश सुरु असतात. एका रात्रीत हे बदल घडून येत नाहीत. संतांनी कालानुरूप त्या साखळीत आपली भूमिका बजावली, तशीच पुढील काळात फुले शाहू आंबेडकरांनी बजावली. पुढेही अनेक येतील. बदल आपल्या गतीने सुरु राहतील. यातल्या कोणाचेही योगदान नाकारता येणार नाही. वारकरी संप्रदायाने महाराष्टातील जातीयतेवर पहिला प्रहार केला आहे. शाळेत मुलांना शिकवताना प्रेरकाच्या माध्यमातून सांगितलेली गोष्ट त्यांना चांगली समजते. आपल्या समाजासाठी अध्यात्म हे उत्तम प्रेरक आहे. वारकरी संप्रदाय आपली अध्यात्मातून प्रबोधनाची परंपरा अबाधितपणे पुढे चालवत आहे. आणि त्याचे समाजमनावर खोलवर परिणाम झालेले आहेत आणि होत राहतील.

५ वा मुद्दा. या मुद्द्यातही वारीबद्दलचे आणि तिच्या नियोजन व व्यवस्थापनाबद्दलचे अज्ञान दिसून येते. वारीत फक्त श्रीमंत लोक अन्नदान करत नाहीत तर ज्यांच्यात दानत असते ते सर्व गोरगरीब लोक अन्नदान करतात. आमच्या गावाची जेजुरीला माउलींच्या पालखीला पंगत असते. त्यात सगळे लोक आपापल्या परीने सहभाग नोंदवतात. कोणी गहू देतो, कोणी इतर किराणा सामान देतो, कोणी पैसे देतो. अश्याच पंगती जागोजाग उठत असतात. तसेच वारीत मुक्कामाची सोय कशी केले जाते याचीही थोडी माहिती घेणे गरजेचे आहे.

मुक्कामाच्या ठिकाणाजवळच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या घरात ही सोय प्रामुख्याने केली जाते. आम्ही ती सोय करतो, तुला मला अशी भांडणे लागतात लोकांची. भक्तिभावाने लोक वारकऱ्याना घरी घेऊन जातात. त्यांची स्वत:च्या आई वडलांसारखी बडदास्त ठेवतात. बायकांना आग्रहाने साड्या नेसवतात. घरातील सन्माननिय पाहुण्याची जशी सोय केली जाते तशीच वारकऱ्यांचीही सोय केली जाते. आपण तर वारीला गेलो नाही, पण या वारकऱ्यांच्या रूपाने प्रत्यक्ष माऊलींचे पाय आपल्या घराला लागले अशी त्यांची श्रद्धा असते. आणि हो,  यात वारकरी सकाळी त्यांच्या घरातील टॉयलेटही वापरतात हे ओघाने आलेच.

वारीने शेकडो वर्षांपासून महाराष्टातील समाजमनावर गारुड केले आहे. आणि ही जादू वाढतेच आहे. देश विदेशातून वारीला प्रतिवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. कोण आधुनिक मंबाजी काय टीका करतात याने वारी परंपरेला केसभर ही फरक पडत नसला तरी इतक्या प्रचंड लोकांची ज्या गोष्टीबद्दल आस्था आहे त्यावर बोलताना थोडीशी माहिती आणि किमान थोडासाच अभ्यास करून बोलावे अशी तमाम विजारवंताना माझी आग्रहाची विनंती आहे.

©सुहास भुसे




गौरी आणि बालपण

लहान असताना मी खुप प्लॅन करायचो की गौरी किंवा लक्ष्म्या नेमक्या कश्या येतात ते बघायचेच. पण सगळी सजावट रात्री अकरा बारा नंतर सुरु व्हायची. तोवर मला काही झोप आवरायची नाही. आणि मी भल्या सकाळी डोळे चोळत त्या रूममध्ये धावत जाऊन बघायचो तेव्हा गौरी आलेल्या असत. मस्तपैकी भल्या मोठ्या मखरात विराजमान झालेल्या असत. पुढे पायऱ्या पायऱ्यांवर सगळी आरास, खेळणी, फराळाची ताटे, देखावे, लाइटिंग सगळा थाट उडालेला असे. मला हा थोर चमत्कार वाटे. सगळच अद्भुत. तासन तास मी ते सगळ बघत राही. मी आईला खोदुन खोदुन विचारत असे पण आईने कितीही सांगितले तरी मला तिनेच ते सगळे उभे केलेय हे पटत नसे. पुढे थोडा मोठा झाल्यावर मी जागून आईला सगळी मदत करू लागलो गौरीची आरास करण्यात पण त्यामुळे गौरी कश्या येतात यातले रहस्य नाहीसे होऊन ती मजा संपली ती संपलीच.

ते दोन दिवस मग गावातील सगळ्या घरांतील गौरीची सजावट घरोघरी फिरून बघण्यात घालवायचे. जेवण्याची देखील शुद्ध नसे. गावातल्या एकाच्या घरी एक मोठा हॉल भरून गौरीची आरास केलेली असे. तिथून तर आमच्या बाळगोपाळ गँगला अत्यंत प्रेमाने सक्तीने निरोप दिल्याशिवाय आम्ही हलत नसु. तेव्हा पैसे फेकून बाजारातून सगळे तयार मिळत नसे. संपूर्ण कुटुंबाने रात्रंदिवस खपुन सगळी आरास स्वत: तयार केलेली असे. छोटे डोंगर, त्यावर रस्ते, बोगदे, छोटी वाहने, गव्हाचे जंगल, त्यात छोटी गुरे, गुराखी, पक्षी, वाघ, प्राणी, मधूनच बंदूकधारी सैनिक, मावळे, पायथ्याला छोटे सरोवर, त्यात बदके, आगबोटी अगदी काय वाट्टेल ते तिथे असे. प्रतिसृष्टीच जणु. ते सगळ मला तासन् तास फैंटसीमध्ये गुंग होऊन जायला भाग पाडत असे. एखादी छोटी मोटार, दोऱ्या, पट्टे, गोनपाट आणि चिखल, गहु अस घरघुती सामान वापरून मोठ्या कल्पकतेने गौरीपुढचे देखावे उभारले जात. सगळे कुटुंब त्याची महिना महिना आधीपासून तयारी करत असे.

आता ते वय ही गेले आणि हॅंडमेड सजावटीचा तो काळही गेला. हल्लीच्या गौरी तेव्हाच्या तुलनेत आजुबाजूच्या अंगावर येणाऱ्या रेडीमेड भडक सजावटीत अंग चोरुन उभ्या असल्यासारख्या दिसतात.

©सुहास भुसे