About

Friday 9 September 2016

पंढरीची वारी आणि फेसबुकी उपटसुंभ

पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या मर्मबंधातली ठेव आहे. महाराष्ट्रातील अध्यात्मिक, सामाजिक चळवळीची प्राचीन आणि अभिमानास्पद परंपरा आहे. सोशल मिडियावर गेल्या काही दिवसांपासून वारीवर काही विजारवंत टीका करत असलेली वाचण्यात आले. अर्थात त्यांना त्यांचे मत मांडायचा पूर्ण अधिकार आहे. सोशल मिडियाचे व्यासपीठ त्यासाठीच आहे. पण त्यांचे लेखन वाचल्यानंतर लक्षात आले की या माणसांनी दिंडी ही फक्त टीवीवर आणि पेपरात पाहिली आहे. किंवा पाचव्या मजल्यावरील आपल्या घराच्या काचेच्या खिडकीतून ओझरती बघितली आहे. अथवा दिंडीमुळे जाम झालेल्या ट्राफिक मध्ये अडकून तिला शिव्या देत कडेकडेने बघितली आहे. वारीबद्दल जी मते सोशल मिडियावर वाचण्यात आली त्यातील काही मुद्दे असे.

१ वारकरी हे अल्पशिक्षित किंवा अशिक्षित बहुजन असतात.
२ वारकरी हा एक जातीयवादी संप्रदाय आहे. ज्या त्या जातीच्या संतांच्या पालख्यात ज्या त्या जातीचे लोक जातात.
३ वारकरी संप्रदायाचा अंधश्रद्धा निर्मुलन किंवा साक्षरता वगैरे प्रबोधनात्मक चळवळीशी काहीही सबंध नाही.
४ भेदाभेद भ्रम अमंगळ वगैरे निव्वळ दांभिकपणा आहे. वारी संपल्यावर त्याचा कोणताही परिणाम जनमाणसावर राहत नाही.
५ वारीमध्ये अन्नदान कोणीही करेल पण हिंम्मत असेल तर त्यांना आपल्या घरी मुक्कामाला नेऊन दाखवा.

या बालिश आणि धादांत असत्य मुद्द्यांवर एक नजर टाकली तर लगेच सदरहू विजारवंतांचा एकांगी आणि पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन लक्षात येतो.

वारीला जाणारे हे फक्त अशिक्षित लोक असतात हा अजब तर्क त्यांनी कोणत्या संशोधनाअंती काढला हे समजायला वाव नाही. दिंडीची परंपरा इतकी सर्वव्यापक आहे की समाजाचा कोणताही स्तर त्यापासून अस्पर्श राहिलेला नाही. शिक्षणामुळे माणूस नास्तिक होतो हा गैरसमज तितकाच सत्य आहे जितका शिक्षणामुळे माणूस सुजाण होतो हा समज. दिंडीत अपवादाने नव्हे तर फार मोठ्या संख्येने उच्चशिक्षित वर्ग असतो. माझ्या घराचे उदाहरण देतो. माझे आजोबा डॉक्टर होते. वडील बी कॉम, क्लास वन पोस्ट वरून नुकतेच रिटायर झाले आहेत. (आताही आळंदीहुन येणाऱ्या माऊलींच्या दिंडीसोबत पायी येत आहेत)  इतरही काका वगैरे सगळे उच्चशिक्षित आहेत. आमच्या घरात अनेक पिढ्यांपासुन वारीची अव्याहत परंपरा आहे. कमीत कमी शंभर वर्षांपासून महिन्याची वारी न चुकता पोहोचवली जाते. आर्थिक परिस्थिती किंवा शिक्षण यांचा श्रद्धेशी काही सबंध नसतो. उलट श्रीमंत आणि उच्चशिक्षित वर्गातील लोक तुलनेने जास्त श्रद्धाळू असतात. सत्य साई बाबा ते राधेमापर्यंतच्या हुच्च अध्यात्मिक गुरूंच्या शिष्यपरिवाराच्या ‘क्लास’ चा अभ्यास केला तर सगळे समजून येईल.

२,३,४ हे मुद्दे वारकरी संप्रदायात जे थोर संत होऊन गेले त्यांच्या कार्याचा अपमान आहे. ज्या त्या संतांच्या नावे ज्या त्या गावातून दिंडी जाते. त्या त्या परिसरातून मोठ्या संख्येने सर्व जातीचे लोक जात विसरून त्यात सहभागी होतात. शेकडो मैल तुडवत विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीला येतात. त्यांच्या मनाला संतांच्या जातीचा विषय चुकूनही शिवत नाही. संतांच्या चळवळीच्या परिणामस्वरूप पुढे वाढलेल्या, व्यापक झालेल्या चळवळीच्या एका अध्यायस्वरूप सामाजिक बदलाची फळे चाखणाऱ्या, जातीअंतासाठी लढण्याचे ढोंग करणाऱ्या मास क्लास मधून नुकतेच इलीएट क्लास मध्ये गेलेल्या लोकांच्या मनातच ही जात मोठ्या प्रमाणावर असते. ज्ञानेश्वरांच्या दिंडीत सगळे ब्राह्मण, तुकारामांच्या दिंडीत सगळे मराठा, सावता माळ्याच्या दिंडीत सगळे माळी, गोरोबांच्या दिंडीत सगळे कुंभारच असतात अस या विद्वानांचे मत असेल तर एवढ्या बालिश आणि मूर्खपणाच्या विधानावर भाष्य करणेदेखील कठीण आहे.

वारी ही महाराष्ट्राची थोर लोकपरंपरा आहे. सर्व संतांच्या प्रबोधनाच्या कामाची चौथीतील मुलादेखील चांगली जाण असते. ‘परंपरा’ या शब्दाचा अर्थच ‘एखादी गोष्ट न थांबता अथकपणे साखळी रुपात पुढे चालू ठेवणे’ असा आहे. वारीत आजही संत वांग्मयच केंद्रस्थानी असते. एकतर संतानी कोणतेही प्रबोधन केले नाही अस म्हणता येईल किंवा वारीमुळे तीच प्रबोधनाची चळवळ पुढे सुरु आहे म्हणता येईल. संत, त्यांचे कार्य आणि वारीची परंपरा यावर वेगवेगळे भाष्य करणे तोंडावर पाडू शकते इतक्या या दोन्ही गोष्टी एकरूप आहेत.

४ थ्या मुद्द्याबद्दल... सामाजिक बदल हे आपल्या गतीने होत असतात. कालानुरूप होणाऱ्या आर्थिक आणि राजकीय स्थित्यंतरातून सामाजिक बदलांची गरज निर्माण होते. हे बदल शृंखला पद्धतीने सावकाश सुरु असतात. एका रात्रीत हे बदल घडून येत नाहीत. संतांनी कालानुरूप त्या साखळीत आपली भूमिका बजावली, तशीच पुढील काळात फुले शाहू आंबेडकरांनी बजावली. पुढेही अनेक येतील. बदल आपल्या गतीने सुरु राहतील. यातल्या कोणाचेही योगदान नाकारता येणार नाही. वारकरी संप्रदायाने महाराष्टातील जातीयतेवर पहिला प्रहार केला आहे. शाळेत मुलांना शिकवताना प्रेरकाच्या माध्यमातून सांगितलेली गोष्ट त्यांना चांगली समजते. आपल्या समाजासाठी अध्यात्म हे उत्तम प्रेरक आहे. वारकरी संप्रदाय आपली अध्यात्मातून प्रबोधनाची परंपरा अबाधितपणे पुढे चालवत आहे. आणि त्याचे समाजमनावर खोलवर परिणाम झालेले आहेत आणि होत राहतील.

५ वा मुद्दा. या मुद्द्यातही वारीबद्दलचे आणि तिच्या नियोजन व व्यवस्थापनाबद्दलचे अज्ञान दिसून येते. वारीत फक्त श्रीमंत लोक अन्नदान करत नाहीत तर ज्यांच्यात दानत असते ते सर्व गोरगरीब लोक अन्नदान करतात. आमच्या गावाची जेजुरीला माउलींच्या पालखीला पंगत असते. त्यात सगळे लोक आपापल्या परीने सहभाग नोंदवतात. कोणी गहू देतो, कोणी इतर किराणा सामान देतो, कोणी पैसे देतो. अश्याच पंगती जागोजाग उठत असतात. तसेच वारीत मुक्कामाची सोय कशी केले जाते याचीही थोडी माहिती घेणे गरजेचे आहे.

मुक्कामाच्या ठिकाणाजवळच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या घरात ही सोय प्रामुख्याने केली जाते. आम्ही ती सोय करतो, तुला मला अशी भांडणे लागतात लोकांची. भक्तिभावाने लोक वारकऱ्याना घरी घेऊन जातात. त्यांची स्वत:च्या आई वडलांसारखी बडदास्त ठेवतात. बायकांना आग्रहाने साड्या नेसवतात. घरातील सन्माननिय पाहुण्याची जशी सोय केली जाते तशीच वारकऱ्यांचीही सोय केली जाते. आपण तर वारीला गेलो नाही, पण या वारकऱ्यांच्या रूपाने प्रत्यक्ष माऊलींचे पाय आपल्या घराला लागले अशी त्यांची श्रद्धा असते. आणि हो,  यात वारकरी सकाळी त्यांच्या घरातील टॉयलेटही वापरतात हे ओघाने आलेच.

वारीने शेकडो वर्षांपासून महाराष्टातील समाजमनावर गारुड केले आहे. आणि ही जादू वाढतेच आहे. देश विदेशातून वारीला प्रतिवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. कोण आधुनिक मंबाजी काय टीका करतात याने वारी परंपरेला केसभर ही फरक पडत नसला तरी इतक्या प्रचंड लोकांची ज्या गोष्टीबद्दल आस्था आहे त्यावर बोलताना थोडीशी माहिती आणि किमान थोडासाच अभ्यास करून बोलावे अशी तमाम विजारवंताना माझी आग्रहाची विनंती आहे.

©सुहास भुसे




No comments:

Post a Comment