About

Friday 9 September 2016

गौरी आणि बालपण

लहान असताना मी खुप प्लॅन करायचो की गौरी किंवा लक्ष्म्या नेमक्या कश्या येतात ते बघायचेच. पण सगळी सजावट रात्री अकरा बारा नंतर सुरु व्हायची. तोवर मला काही झोप आवरायची नाही. आणि मी भल्या सकाळी डोळे चोळत त्या रूममध्ये धावत जाऊन बघायचो तेव्हा गौरी आलेल्या असत. मस्तपैकी भल्या मोठ्या मखरात विराजमान झालेल्या असत. पुढे पायऱ्या पायऱ्यांवर सगळी आरास, खेळणी, फराळाची ताटे, देखावे, लाइटिंग सगळा थाट उडालेला असे. मला हा थोर चमत्कार वाटे. सगळच अद्भुत. तासन तास मी ते सगळ बघत राही. मी आईला खोदुन खोदुन विचारत असे पण आईने कितीही सांगितले तरी मला तिनेच ते सगळे उभे केलेय हे पटत नसे. पुढे थोडा मोठा झाल्यावर मी जागून आईला सगळी मदत करू लागलो गौरीची आरास करण्यात पण त्यामुळे गौरी कश्या येतात यातले रहस्य नाहीसे होऊन ती मजा संपली ती संपलीच.

ते दोन दिवस मग गावातील सगळ्या घरांतील गौरीची सजावट घरोघरी फिरून बघण्यात घालवायचे. जेवण्याची देखील शुद्ध नसे. गावातल्या एकाच्या घरी एक मोठा हॉल भरून गौरीची आरास केलेली असे. तिथून तर आमच्या बाळगोपाळ गँगला अत्यंत प्रेमाने सक्तीने निरोप दिल्याशिवाय आम्ही हलत नसु. तेव्हा पैसे फेकून बाजारातून सगळे तयार मिळत नसे. संपूर्ण कुटुंबाने रात्रंदिवस खपुन सगळी आरास स्वत: तयार केलेली असे. छोटे डोंगर, त्यावर रस्ते, बोगदे, छोटी वाहने, गव्हाचे जंगल, त्यात छोटी गुरे, गुराखी, पक्षी, वाघ, प्राणी, मधूनच बंदूकधारी सैनिक, मावळे, पायथ्याला छोटे सरोवर, त्यात बदके, आगबोटी अगदी काय वाट्टेल ते तिथे असे. प्रतिसृष्टीच जणु. ते सगळ मला तासन् तास फैंटसीमध्ये गुंग होऊन जायला भाग पाडत असे. एखादी छोटी मोटार, दोऱ्या, पट्टे, गोनपाट आणि चिखल, गहु अस घरघुती सामान वापरून मोठ्या कल्पकतेने गौरीपुढचे देखावे उभारले जात. सगळे कुटुंब त्याची महिना महिना आधीपासून तयारी करत असे.

आता ते वय ही गेले आणि हॅंडमेड सजावटीचा तो काळही गेला. हल्लीच्या गौरी तेव्हाच्या तुलनेत आजुबाजूच्या अंगावर येणाऱ्या रेडीमेड भडक सजावटीत अंग चोरुन उभ्या असल्यासारख्या दिसतात.

©सुहास भुसे


No comments:

Post a Comment