About

Thursday 18 February 2016

मी व आमचे स्नेही

माझे एक स्नेही आहेत. वयाने माझ्यापेक्षा खुप जेष्ठ पण आमचे बऱ्यापैकी जमते. तस माझ पाणी रे पाणी तेरा रंग कैसा ..सारख असल्याने कोणाशीही पटकन जमत..

तर नेहमी पँट वापरणारे एकदा विजार घालून आले. 'काय मग आज काय विशेष?'
म्हणून विचारले तर म्हणाले
'असच सहज ..ही माझी 17 वर्षापूर्वीची विजार..'
विजार देखील 17 वर्षापुर्वीची असू शकते हे ऐकून माझा कंठ दाटुन आला.

या स्नेह्याचे घर एखाद्या पुराणवस्तु संग्रहालयापेक्षा कमी नाही.

त्यांच्या घरातील प्रत्येक वस्तु प्राचीन आणि ऐतिहासिक आहे. औत्सुक्याने विचारले की मेड, किंमत, कोठुन घेतली वगैरे साद्यंत माहिती सांगतात. त्यांचा टीवी 18 वर्षापुर्वीचा, सोनी कंपनीचा , 5 हजार रूपयांना , जपान मेड चा , मुंबई येथील एका मिलिट्री कैंटीन मधून घेतलेला आहे. (हुश्श् )
त्यांचा वीसीआर देखील 18 वर्षापूर्वीचा. अजुनही भली मोठी वीडियो कैसेट टाकून ते त्यावर जुने मूवी बघतात.
त्यांच घड्याळ 22 वर्षांपूर्वीचे आहे.
त्यांची सायकल 20 वर्षांपूर्वीची आहे.
 त्यांनी 12 वीचा पेपर लिहिलेला पेन 28 वर्षापुर्वीचा आहे.
 सगळ्या वस्तु फर्नीचर असच सम्राट अशोकाने कलिंग युद्ध जिंकले त्याच्या आसपासच्या काळात घेतलेल्या आहेत.
आणि वापर असा की ....त्यांचा मोबाईल 14 वर्षापूर्वीचा नोकिया 1100 आहे. कंडम कव्हर मधून काढला की कालच आणला आहे असा दिसतो..
घासुन पुसून लख्ख सगळ जागच्या जागी ठेवलेले असते.
..
अस काही दिसले की आपण नकळत त्याची आपल्याशी तुलना करू लागतो.
मला रोज सकाळी घड्याळ, पेन, रुमाल आणि बाइक ची चावी शोधायला सुमारे दोन तास लागतात.
माझ्या पेनची रिफिल बालपणापासून आजवर एकदाही संपलेली नाही.
घड्याळाची काच अजुन दोन वेळा फुटली की लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सर्वाधिक वेळा काच फुटण्याचा विक्रम माझ्या नावावर होणार आहे.
बाइक दोन चार वर्षाला बदलून ही ती अशी दिसते की हीरो कंपनी चा होंडाशी करार झाल्यानंतर बाहेर पडलेली पहिली ऐतिहासिक बाइक ती हीच.
गॉगल साधारण एक महीना हरवला नाही की 2 तारखेला मित्र कौतुकाने विचारतात 'अरे व्वा ..विस्मरणावर औषध योजना सुरु केली वाटते ? '
घरातील ज्या वस्तु दनकट, पोलादी आहेत त्याच काहीश्या जुन्या आहेत.
आणि ज्या अवजड आहेत, हलवता येत नाहीत त्याच वेळच्या वेळी सापडतात.

तर असो...
चालायचेच..
जग हे असच विविधतेने नटलेले आहे. माणसे अशी वेगवेगळी नसती तर काही मौज उरली नसती ......किनई ? 😉

©सुहास भुसे.



Sunday 14 February 2016

पृथ्वीराज संयोगीतेची तेजस्वी प्रेमकहाणी

     पृथ्वीराज आणि संयोगिता यांची प्रेमकहाणी भारताच्या इतिहासात अजरामर आहे. कोण म्हणते आम्हाला प्रेम करायला पाश्चात्यांनी शिकवले किंवा प्रेमाच्या बाबतीत पाश्चात्य आमच्यापेक्षा पुढारलेले आहेत? कृष्ण रुक्मिणी, नल दमयंती, पृथ्वीराज संयोगिता अश्या आमच्या अनेक चित्तथरारक प्रेमकहाण्या रोमियो जुलीयेट ला लाजवतील अश्या आहेत. ओसंडते, आवेगी आणि सर्वस्व उधळून देणारे, स्वत्व पणाला लावणारे कसदार प्रेम कसे करावे हे जगाने आमच्याकडून शिकावे. पण इतर सगळ्या जडजव्याळ ऐतिहासिक, पौराणिक वाद विवादात या अमर प्रेमगाथा काहीश्या झाकोळल्या गेल्या आहेत. आज Valentine’s day च्या निमित्ताने पृथ्वीराज संयोगीतेच्या या रोमहर्षक प्रेमगाथेचे हे खास स्मरण....

     पृथ्वीराज चौहान हा दिल्लीचा ख्यातकीर्त सम्राट होता. तरुण, राजबिंडा, देखणा, उमदा, शूर, पराक्रमी, कर्णार्जुनांसारखा लक्ष्यवेधी बाणफेकीत निपुण असणारा. आपल्या अंगच्या गुणांनी आणि दिल्लीच्या उत्तम कारभाराने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झालेला हा सम्राट.

     त्याच्या या लोकप्रियतेचा आणि गुणांचा सुंगंध वाऱ्यावर तरंगत कनोजला जाऊन पोहोचला. कनोजचा राजा जयचंद हा पृथ्वीराजचा कट्टर विरोधक होता. त्याच्या कीर्तीवर आणि लोकप्रियतेवर तो जळत असे.  आणि संयोगिता ही रुपगर्विता कनोजची राजकुमारी. पृथ्वीराजच्या पराक्रमासारखेच संयोगीतेचे सौंदर्य ही अद्भुत स्वर्गीय होते. तिच्या कानावर पृथ्वीराजची दिगंत कीर्ती पोहोचली. ती मनोमन त्याच्यावर अनुरक्त झाली. त्याला न बघताच त्याच्या प्रेमात पडली. अर्थात तिच्या भावनांची खबर अद्याप पृथ्वीराजला नव्हतीच.

     एकदा दिल्लीहून पन्नाराय नावाचा चित्रकार कनोजमध्ये आपले नशीब आजमावयला आला. तो निष्णात चित्रकार होता. लवकरच कनोजमध्ये त्याचा बोलबाला झाला. पन्नारायजवळ त्याने दिल्लीत चितारलेली पृथ्वीराजची काही चित्रे संग्रही होती. आपल्या सख्यांकडून ही बातमी संयोगीतेला कळली. आणि इतके दिवस ती ज्याचे गुणगान ऐकत त्याच्यावर आषक झाली होती तो दिसतो तरी कसा हे जाणून घेण्यास ती उत्सुक झाली. तिने आपल्या सख्यांकरवी पन्नारायला आपले चित्र काढण्यासाठी म्हणून आमंत्रित केले. राजकुमारीचे चित्र बनवता बनवता पन्नालाल ने पृथ्वीराज बद्दल सगळी माहिती तिला सांगितली. त्याची चित्रे दाखवली. पृथ्वीराजचे राजबिंडे रूप पाहून आधीच त्याच्या प्रेमात पडलेल्या संयोगीतेने हाच आपला वाग्दत्त वर हा मनोमन निर्धारच करून टाकला. पन्नाराय जवळ तिने हे ह्र्दयगुज बोलून दाखवले.

     पुढे पन्नाराय जेव्हा परत दिल्लीला गेला तेव्हा त्याने पृथ्वीराजला संयोगीतेच्या मनातल्या त्याच्याबद्दलच्या अलोट प्रेमाबद्दल त्याला सांगितले. तिचे चित्र दाखवले. संयोगीतेचे अनुपम सौंदर्य पाहून पृथ्वीराज ही तिच्यावर मोहित झाला.

     या गुपचूप चाललेल्या प्रेमकहाणी ची वार्ता राजा जयचंदाच्या कानावर गेली आणि त्याने संयोगीतेला नजरकैदेत ठेवले. व लवकरच तिचे स्वयंवर करण्याचा घाट घातला. या स्वयंवरात त्याने राजपुतान्यातील सर्व राजांना आमंत्रित केले. फक्त पृथ्वीराजला निमंत्रण दिले नाही. पृथ्वीराज यामुळे अपमानित झाला. याचा वचपा काढण्यासाठी आणि आपल्या प्रेमासाठी त्याने संयोगीतेचे स्वयंवरातूनच हरण करण्याचा धाडसी बेत आखला. राजा जयचंद हा ही काही मामुली राजा नव्हता. त्याच्या पदरी ३ लाख घोडदळ, एक लाख हत्ती आणि १० लाख पायदळ अशी प्रचंड चतुरंग सेना होती. पण प्रेम करणारे असल्या गोष्टींना काय भिक घालणार. आणि त्यातही प्रेमवीर पृथ्वीराज सारखा महान पराक्रमी सम्राट असेल तर.. अर्थात पृथ्वीराजच्या मंत्र्यांनी त्याला असे न करण्याबद्दल परोपरीने सांगितले. पण पृथ्वीराज आपल्या निर्णयावर ठाम राहिला.

     स्वयंवराच्या दिवशी जयचंदाने मुद्दाम पृथ्वीराजचा अपमान करण्यासाठी त्याचा पुतळा बनवून तो दरवाज्यावर ठेवला. संयोगिता स्वयंवर दालनात आली. पृथ्वीराजला शोधत एका मागोमाग एक राजे ओलांडत ती पुढे जाऊ लागली. सरतेशेवटी ती दरवाज्यातील पृथ्वीराजच्या पुतळ्याजवळ पोहोचली. आणि त्यालाच वरमाला घातली.
हे पाहून दालनात हाहाकार उडाला. अनेकांनी तलवारी उपसल्या. खुद्द राजा जयचंद आपली तलवार उपसून संयोगीतेचे मस्तक धडावेगळे करण्यासाठी धावला. इतक्यात पुतळ्याच्या ठिकाणी आधीच येऊन उभा राहिलेला पृथ्वीराज पुढे झाला. आणि संयोगीतेला उचलून त्याने जवळच उभ्या असलेल्या घोड्यावर मांड ठोकली. आणि संयोगीतेला सर्वांच्या देखत घेऊन निघून गेला. त्याच्या पाठलागावर आलेल्या जयचंदाच्या सैन्याचे सीमेवर योजनेप्रमाणे उभे असलेल्या पृथ्वीराजच्या सैन्याबरोबर तुंबळ युद्ध झाले. पण संयोगीतेचे यशस्वी हरण करण्यात आणि आपल्या प्रेमाला न्याय देण्यात पृथ्वीराज यशस्वी झाला.

     राजा जयचंद मात्र आपल्या हिंदी सिनेमात असतात तश्या खडूस बापांप्रमाणे हा अपमान विसरला नाही. व त्याने महंमद घोरीच्या सतराव्या स्वारीच्या वेळेस त्याला सैन्य आणि माहिती देऊन फितुरीचा रंग दाखवला. आणि पृथ्वीराज ला पकडून देण्यास मदत केली. पृथ्वीराज कडून दोन वेळा जीवदान मिळालेल्या घोरीने मात्र पृथ्वीराजला सोडले नाही. त्याची नृशंस हत्या केली.

     आणि या तेजस्वी प्रेमगाथेचा एक करूण ह्र्दयद्रावक शेवट झाला.

     प्रत्येक प्रेमकहाणी ही वेगळी असते. आपापल्या परीने श्रेष्ठ असते. मला मात्र कोणत्याही देशी परदेशी प्रेमकहाणी पेक्षा ही पृथ्वीराज संयोगीतेची तेजस्वी प्रेमकहाणी नेहमीच श्रेष्ठ वाटत आलेली आहे. आवडत आलेली आहे. खूप वर्षांपासून मनात घर करून राहिलेली आहे.

     पृथ्वीराज आणि संयोगिता या ऐतिहासिक प्रेमवीरांना मनोमन वंदन करून या पोस्टचा शेवट करतो.

     सर्वांना आजच्या Valentine’s  day च्या मनपूर्वक शुभेच्छा !!

( टीप - पृथ्वीराजने संयोगीतेचे हरण कसे केले याविषयी राजस्थानच्या इतिहासात वेगवेगळे संदर्भ आढळतात. त्यापैकी ही सर्वाधिक लोकप्रिय व लोकमानसात रुजलेली कथा आहे. )

©सुहास भुसे.    

   

Wednesday 10 February 2016

उधळून दे तूफान

प्रेम ही मानवी जीवनातली सर्वात सुंदर आणि सर्वात तरल अनुभूती आहे. ज्याने कधीही कोणावर झोकून देऊन, तुटून प्रेम केले नाही त्याचे जीवनच व्यर्थ आहे. एक अपूर्ण व्यक्तीमत्व असणारी स्त्री आणि एक अपूर्ण व्यक्तीमत्व असणारा पुरुष असे दोन द्वैत प्रेमात पडून अद्वैत बनतात. प्रेम हा एक प्रवास आहे अपूर्णत्वाकडून पुर्णत्वाकडे.

प्रेमात अभिव्यक्तीचे एक वेगळे महत्व आहे. अभिव्यक्ती मग ती पहिल्यांदा प्रपोज करतानाची असू देत की नाते दृढ झाल्यानंतरची असू देत. प्रेम एकदा जुने झाले की जोडप्यांना प्रेम व्यक्त करण्यात फारसा रस उरत नाही. इतर नात्यांत तर ही अभिव्यक्ती खूपच तुरळक. आपल्या आई बाबांवर सर्वच जण प्रेम करतात. मुलांवर करतात. भावाबहिणीवर करतात. सर्व नात्यांवर करतात. पण किती जण किती वेळा हे प्रेम व्यक्त करतात?

प्रेम पोटात असावे ओठात नको असाच सर्वसाधारण कल असतो. पण प्रेमाच्या अभिव्यक्तीने नात्यांचे सौंदर्य वाढते. ती अधिक हेल्दी बनतात. कोणाला तरी आय लव्ह यु म्हणणे आणि कोणाकडून तरी ते ऐकणे ही अनुभूती वर्णनातीतच असते.  या बाबतीत आपण पाश्चात्यांचे अनुकरण करायला काय हरकत आहे? चांगल्या गोष्टींचे अनुकरण का करू नये?

सध्या प्रेमाचा जणू मोसम चालू आहे. कालचा रोज डे ..आज प्रपोज डे ..आणि येऊ घातलेला वॅलेंटाइन डे. प्रेमवीरांसाठी तर जणू संधीवर संधी ... वेगवेगळे तर्क मांडून वाद करत बसणारे वाद करत बसतील. जीवनातील एका सुंदर आनंदाला मुकतील. प्रेम करणारे अभिव्यक्त करतील. आणि जीवन भरभरून उपभोगतील.

सर्वाना वॅलेंटाइन डे च्या आगावू मध्ये शुभेच्छा .. समरसून प्रेम करा ..भरभरून जगा ...आणि मुख्य म्हणजे व्यक्त व्हा .. नाते जुने असो की नवे ..प्रेम मनात ठेऊ नका ..

“उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं...”

©सुहास भुसे.


शेतकऱ्याला काय समजता ?

     आपले शेतकऱ्यांबद्दल अनेक  गैरसमज असतात. जस की शेतकरी अशिक्षित अडाणी असतो. तो पारंपारिक असतो. त्याला बाजारपेठेचे ज्ञान नसते. या सर्व समज अपसमजांमधून एक केवीलवाने चित्र समोर उभे राहिलेले असते.

     त्यातून शेतकऱ्यांबद्दल साधारण दोन प्रतिक्रिया उमटतात. एक म्हणजे दयाभाव ..कणव.
     आणि दूसरी तिरस्कार ..

     दूसरीमुळे शेतकरी भेकड भ्याड आहे फुकट्या आहे पॅकेजेस वर जगणारा भिकारी आहे लफडेबाज आहे कांगावाखोर आहे अशी मते बनतात व व्यक्त होतात.
ती मते गिरीश कुबेरांपासून खडसे गडकरी ते केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन यांच्यापर्यन्त सर्वांनी प्रतिनिधिक म्हणून वेळोवेळी व्यक्तही केली आहेत.

     पहिल्या कणवेतुन मानभावी सल्ले मिळतात. आधुनिकतेची कास धरा, बाजारपेठेचा अभ्यास करा, उत्पादन वाढवा किंवा सदभावना म्हणून भिक स्वरूप सामाजिक मदतीचे तुकडे (खटकेल पण वास्तव आहे) असे प्रकार होतात. नामचा प्रयोग त्यातलाच. किंवा 10 हजारानी 25 कोटिची मदत त्यातलीच.

     शेतीविषयक वास्तव समजून घेतले तर या विधानामागचे कारण लक्षात येईल.

शेतकरी आता जुन्या ग्रामीण कादंबऱ्यात असतो तसा राहलेला नाही. तो अत्याधुनिक बी बियाणे वापरतो. आधुनिक पद्धतीने सिंचन करतो. ड्रीप तुषार सिंचन आणि त्यातलेही लेटेस्ट प्रयोग. खते आणि औषधे यांचे अचूक परीक्षण करून त्यातले लेटेस्ट आणि परिणामकारक ते तो वापरतो. इतकी आधुनिकता.

उत्पादन वाढीची कमाल मर्यादा त्याने गाठलेली आहे केव्हाच. अन्नधान्याबाबतची स्वयंपूर्णता याचेच द्योतक आहे. पिकांचे वेगवेगळे प्रयोग तो करतो. सर्व प्रकारची पिके आणि यांचे प्रयोग सुरु असतात.

तो सकाळी ७ ला शेतात चक्कर मारतो. रोगराई किडीचे निरीक्षण करून सकाळी ८ योग्य औषधाचे नियोजन करून त्याची फवारणी सुरु असते. इतकी तत्परता.

बाजारपेठेचा मागच्या अनेक वर्षांचा ठोकताळा अंदाज त्याच्या कडे असतो. शेतकरी आता सुशिक्षित असतात. ते नेट वापरतात. विविध app वापरतात. पण हे सगळे अंदाज चुकत नसतात तर मुद्दाम चुकवले जातात.

     आणि अजून नेहमीचा फंडा असतो कि अमुक एकाने बघा जरबेरा लावून अस उत्प्पन्न घेतले. तमक्याने शेवगा लावून फलाना केले. बिस्तान्याने गुलाब लावून लाखो कमवले.
लाखातील एखाद्या दुर्मिळ उदाहरणाचे जनरलायझेशन होऊ शकत नाही.
पेट्रोल पंपावर काम करणारा प्रत्येकजण धीरुभाई बनू शकत नाही.
प्रत्येक वर्कशॉपवाला जमशेदजी बनू शकत नाही.
प्रत्येक गवंडी अडाणी अंबानी बनू शकत नाही.
प्रत्येक व्यंगचित्रकार डिस्ने बनू शकत नाही.

     आम्ही माळे फुलवली...हत्तीच्या पाठीचे दगड फोडून त्यांची माती केली.. निबिड काटेरी वांझ भूमी पिकवली तिची कूस भरली ..निसर्ग ..पांढरपेशे शेतीअवलंबी घटक ...अडते दलाल..सरकार अश्या सर्व अस्मानी सुलतानी शत्रूंना टक्कर देत आम्ही संघर्षमय जीवन जगतो. शेतकरी भ्याड नसतो तर आल्या दिवशी या सर्वांशी झुंजणारा तो एक योद्धा असतो.
आम्ही ताऱ्यांचे गुज ऐकले, नक्षत्रांचे देणे घेणे समजून घेतले, पशु पक्षी आमच्या कानात बोलतात, माती आमच्याशी हितगुज करते..हजारो वर्षे अश्या ठोकताळ्यातून आम्ही शेती पिकवतो. आता तर आम्ही आधुनिकतेची कास धरली आहे. प्रत्येक शेतकरी हा एक सृजनशील शास्त्रज्ञ असतो. तो किमयागार आहे. शेती कशी करावी हे त्याला शिकवण्याची गरज नाही.

     शेतकरी हा शोषित आहे. व्यवस्था सर्व अंगाने त्याचे शोषण करत आहे. तो आधुनिक भांडवलशाही व्यवस्थेतील शुद्र आहे.

      त्याला पोकळ आणि दांभिक मदतीची नाही तर समान धोरणाची गरज आहे. लांब पल्ल्याच्या उपाययोजनांची गरज आहे. जो त्याच्या न्याय्य हक्क आहे जो न्याय, सवलती आणि सरंक्षण उद्योग क्षेत्राला मिळते तो न्याय शेतीला लागू झाला पाहिजे. शेतीच्या क्षेत्रात ग्रामीण भागात आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहिले पाहिजे. रस्ते, फोनलाईन्स, विजेचे जाळे, ब्रॉडबंड व सर्व प्रकारच्या सुविधा.  त्याला उद्योगक्षेत्राप्रमाणेच मोठमोठी कर्जे मिळाली पाहिजेत. त्याला संपूर्ण संरंक्षण मिळाले पाहिजे. अडते दलाल यांची या क्षेत्रातून कठोरपणे हकालपट्टी करून एक पूर्णपणे नवीन विक्री व्यवस्था उभी राहिली पाहिजे. हे सगळे सहज शक्य आहे. गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची आणि दांभिक नव्हे तर खऱ्याखुऱ्या सदभावनेची.

आणि हे करायची इच्छा नसेल तर ....

      सर्व अंमली पदार्थांच्या उत्पादनावरील बंदी उठवावी.
त्याची बाजारपेठ मुक्त करावी. शेतकरी अफिम, गांजा, चरस, कोकेन पिकवतील. विकतील. सर्व साखर कारखान्यांना 100 % मद्यार्क बनवायची परवानगी द्यावी.

     शेतकऱ्याने स्वत: च्या पोटाला लागते तेवढेच अन्नधान्य पिकवावे. इतर अतिरिक्त अन्नधान्य उत्पादन पूर्ण बंद करावे. बाकी उत्पादन या अंमली पदार्थांचे घ्यावे. आपण काही समाज दत्तक घेतलेला नाही की लोकांना फुकट पोसायचा ठेका घेतलेला नाही.

हे मोफत अन्नछत्र आता बंद झालेच पाहिजे.

©सुहास भुसे.


देहूची लोकसमजूत आणि इतिहास

युरोपीय देशांत थोर ऐतिहासिक व्यक्तींचा इतिहास जपून ठेवला जातो. हजारो वर्षापूर्वीच्या लोकांची हस्ताक्षरे, त्यांचा जीवनपट, राहती घरे, कपडे, वस्तू वगैरे. त्यामुळे कदाचित ऐतिहासिक तथ्यांवरून वाद होत नसावेत.

आपल्याकडे विशुद्ध आणि  निर्विवाद अस काही अस्तित्वात नाही. जे आहे ते सगळे प्रक्षेपित आणि हेतूपुरस्पर सोयीस्कररित्या वळवलेले किंवा भेसळ केलेले.

अश्या वेळी अनेक ऐतिहासिक तथ्यांची उकल करण्यास लोकसंस्कृती, रूढी, परंपरा आणि लोकसमजुती खूप उपकारक ठरतात.

एकदा असेच चर्चा सुरु असताना एका मित्राने त्याच्या वडिलांची एक आठवण सांगितली.

सुमारे ४० वर्षांपूर्वी त्याचे वडील देहू ला गेले होते. तिथे इंद्रायणीच्या डोहात मोठ मोठे मासे पाहून त्यांनी एका स्थानिकाला विचारले.

 “अरे तुम्ही या डोहात मासेमारी करत नाहीत का ? हे इतके मोठे मोठे मासे कसे काय इथे?”

त्यावर त्या स्थानिक व्यक्तीने तिथली एक लोकसमजूत, रूढी सांगितली. जी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारी ठरावी.

“या डोहातील ज्या माश्यांनी तुकाराम महाराजांचे मांस खाल्ले होते त्या माश्यांचे  वंशज म्हणजे हे आजचे इथले मासे . आम्ही यांना खाल्ले तर ते तुकारामांचे मांस खाल्ल्यासारखे होईल. म्हणून देहूच्या डोहात मासेमारी केली जात नाही.”

अश्या समजुती, परंपरा विनाकारण निर्माण होत नाहीत. त्यांना काहीही न काही पार्श्वभूमी असते. ज्यांच्या हातात लेखन वाचनाच्या चाव्या नव्हत्या अश्या समाजाने अनेक स्फोटक सत्ये आणि तथ्ये आपल्या अश्या छोट्या छोट्या स्थानिक रूढी, लोकपरंपरातून जपलेली असतात. इतिहास संशोधकांनी अश्या गोष्टींचा वेध घेऊन त्यांची तर्कशुद्ध मांडणी करणे अनेक ऐतिहासिक पापांना वाचा फोडणारे व अनेक वादग्रस्त घटनांची उकल करणारे ठरू शकेल.

©सुहास भुसे


लोकसंस्कृती आणि वाकप्रचार

काही वाक्प्रचार भाषेत ऐतिहासिक गोष्टीवरून रूढ होतात.
उदा. ‘पानिपत होणे’- दारूण पराभव होणे.
खरे तर पानिपतच्या युद्धाचा नकारात्मक अर्थ घेऊन दारुण पराभवासाठी हा वाकप्रचार रूढ झाला.

‘बाजीरावी करणे’- न शोभेलशी ऐट, दिमाख करणे (लायकी नसताना)
हा वाकप्रचार दुसऱ्या बाजीरावाच्या विलासी गुलछबू रंग ढंगामुळे रूढ झाला.

कुंभाड रचणे- खोटा आळ घेणे, षड्यंत्र रचणे.

या वाकप्रचाराबद्दल सविस्तर माहिती घेऊ. कुंभाड हे मुळात एक व्यक्तीनाम आहे. पुराणात कुंभाड नावाची एक व्यक्ती होऊन गेली. त्याच्या नावावरून आणि तात्कालिक घटनांवरून हा वाकप्रचार रूढ झाला.

तर कुंभाड हा महाराजा बळी चा पुत्र असुरराज बाण याचा सचिव होता. पुराणात कृष्ण किंवा विष्णूने बाणाचा पराभव केला अशी एक कथा आहे. त्यापूर्वी हा कुंभाड आपल्या लोककल्याणकारी पराक्रमी राजाला आणि आपला पूर्वज दिवंगत बळी राजा यांना दुषणे देतो त्यांची निंदा करतो बाण हा दोषी आहे, दुष्ट बुद्धीचा आहे, प्रमाद करणारा आहे अशी विशेषणे वापरतो. वगैरे.

ज्या वैदिकांनी या पुराणऐतिहासिक कथा लिहिल्या त्यांच्या एका प्राचीन आणि आवडत्या सांस्कृतिक रणनीतीचा हा एक डावपेच आहे. महापराक्रमी आणि लोककल्याणकारी रावणाची निंदा त्याचा सख्खा भाऊ बिभीषण करतो. हिरण्यकश्यपुच्या समोर त्याच्या शत्रूची स्तुती खुद्द त्याचा मुलगा प्रल्हाद करतो. व हिरण्यकश्यपुला दुषणे देतो. अशी अनेकानेक उदाहरणे सापडतात.

तर याचा हेतू उघड आहे. या महान बळी बाण रावण आदी राजांना खलनायक दाखवायचे आहे. वस्तुत: हे आदर्श राजे आहेत. तेव्हा वैदिकांनी अर्थात त्यांच्या शत्रुंनी त्यांची निंदा आणि खोटे आरोप करण्यापेक्षा जर त्यांचे स्वकीय वैदिकांना सामील आहेत. आणि तेच खुद्द या नायकांची निंदा करत आहेत अस दाखवल कि ते जास्त विश्वासार्ह ठरते.

कुंभाड या बाणाच्या सचिवाच्या बाबतीत केलेला हा प्रयोग जनमाणसांना रुचला नसावा, त्याच्या खोटेपणाचे परिमाण म्हणून हा वाकप्रचार लोकमाणसात रुजला असावा.

अगदी अलीकडे संघाच्या शिवसंगम मध्ये महात्मा फुल्यांचे डुप्लिकेट वंशज आणून उभे करणे हाही या प्राचीन रणनीतीचाच एक भाग होता हे समजण्यासाठी फार बुद्धिकौशल्य वापरण्याची गरज नाही.  

लोकसंस्कृती, ग्रामदेवता, त्यांच्या यात्रा, कृषी आणि कृषीशी निगडीत परंपरा हाच आपला मुळ सिंधू खोऱ्यातील लोकांचा हिंदू धर्म आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि लोकसमजुती किंवा भाषिक वाकप्रचार म्हणी यातून बहुजनांनी आपले या इतिहासाशी असलेले हे प्राचीन नाते जपले आहे.

©सुहास भुसे

विष्णु व बाण यांचे यूद्ध

जोशीबाईंच्या खानावळीत गावरान पाहुणे

शाळेतले माझे पहिले वर्ष होते आणि एक दोन महिन्यातच पुण्यात माध्यमिक शिक्षण मंडळाचे काम निघाले. पुण्याची फारशी माहिती नव्हती. माझे २-३ भाऊ पुण्यात शिक्षण घेत होते. जाऊया, काम उरकूया आणि त्यांच्याकडे मुक्काम करूया अश्या हिशोबाने शाळेचा क्लर्क रावण व मी पुण्याला आलो.

काम झटपट उरकले. मग माझ्या आत्याच्या मुलाकडे योगेशकडे आकुर्डीला मुक्काम केला. रात्री जेवायला त्यांच्या मेस कम हॉटेलात गेलो. तर तिथे जेवायला आलू के पराठे वगैरे. एकदम छोटे छोटे. ते कितीही खाल्ले तरी माझे व रावणचे पोट काही भरेना. शेवटी लाजून आम्ही थांबलो..पण पोट काही भरले नाही. रूमवर जुन्या बालपणीच्या आठवणी, अनेक विषयांवर गप्पा करत त्यांच्या कॉलेजमधील दिलखुलास मित्रांसोबत रात्री जागरण करून मैफिल रंगली.

दुसऱ्या दिवशी जेवणाचा पुन्हा तसाच बेत. तीच चित्तरकथा. दुपारी मग मस्त लोणावळा ट्रीप झाली. भुशी डॅम भरून वाहत होते. तरुणाईचा जल्लोष सुरु होता. धमाल सुरु होती सगळी. आम्हीही त्यात सामील झालो. मनमुराद भटकलो. मजा केली. मी, योगेश, रावण आणि विनायक भाई हा माझा मोठा भाऊ.

संध्याकाळी परत आलो. आज चिंचवडला विनायक भाईच्या रूमवर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी गावाकडे निघायचे असा बेत होता. रात्री विनायक भाईच्या मेस मध्ये जेवणाचा बेत होता. जोशीबाईंची मेस म्हणून घरगुती खानावळ होती. म्हटले आज तरी जेवणाचा मनसोक्त बेत होईल. कालपासून कचरते जेवण सुरु होते. त्यात आज डोंगरावर मनसोक्त भटकलो होतो. जाम भूक लागली होती.

जोशीबाईंच्या मेस कम घरी आम्ही भारतीय बैठकीत आलकट पलकट मारले. जेवण आले. चपाती, कोबीची मोकळी भाजी, ओल्या वाटाण्याची आमटी, वरण, भात, लोणचे वगैरे. सुगंध तर छान येत होता. पण एकेकाची चव घेईल तशी निराशा होऊ लागली. वरण तर गोडच ..कोबी गोडसर ..आमटी देखील गोडसरच. तिखट खायला जीभ नुसती बंड करून उठली होती. आम्ही शेंगदाण्याची भरपूर चटणी घेऊन वरणात मिक्स केली. कोबी, आमटी सोबत चटणी तोंडी लावण्याचा प्रयोग करून बघितला. पण शेवटी जोशीबाईंची चटणी ...कितीशी तिखट असणार. तीही पुणेरीच निघाली. एव्हाना जोशी बाई या गावरान पाहुण्यांकडे त्रासीक नजरेने बघायला लागल्या होत्या. शेवटी मुळचे गोडच असणारे जेवण  गोड मानून आम्ही कोपऱ्यावरून शेज लावली. छोट्या छोट्या पातळ कागदी पोळ्या आणि दोन भुकेलेले गावरान रांगडे गडी.  रावणचे आणि माझे साधारण दोन ते तीन घासात एक चपाती आणि गणित बसले. जोशीबाई चपाती देऊन त्यांची पाठ वळते न वळते तो आमचे ताट रिकामे असे. जोशी बाई वाढून वाढून दमल्या असाव्यात. शेवटी जोशी बाईनी थोड्या त्राग्याने त्यांचा पोळ्यांचा छोटा डबाच आमच्यापुढे आणून आदळला. त्यांच्या दृष्टीने तो पोळ्यांचा केवढालाsssss  डबा असला तरी आमच्यासाठी तो एवढासाच. बघता बघता तो अर्धा अधिक संपला. जोशीबाईंची नजर व एकंदर वातावरण बघून मी व रावणने आता थांबूच अश्या अर्थाची आपापसात नेत्रपल्लवी केली. एव्हाना बराचसा आधारही झाला होता पोटाला. मग मात्र आम्ही आवरते घेतले.

तेव्हापासून पुण्याला कधीही पुण्याला गेलो तरी कोणा मित्राच्या मेस मध्ये न जेवण्याचे पथ्य आजतागायत पाळत आलो आहे.  शिवाय घरी आल्या आल्या आम्ही झणझणीत जेवणाचा दणदणीत बेत करून डोळ्यांतून पाणी आणि अंगातून घाम काढून घेतला हे काय वेगळे सांगायचे ?

©सुहास भुसे