About

Wednesday 10 February 2016

जोशीबाईंच्या खानावळीत गावरान पाहुणे

शाळेतले माझे पहिले वर्ष होते आणि एक दोन महिन्यातच पुण्यात माध्यमिक शिक्षण मंडळाचे काम निघाले. पुण्याची फारशी माहिती नव्हती. माझे २-३ भाऊ पुण्यात शिक्षण घेत होते. जाऊया, काम उरकूया आणि त्यांच्याकडे मुक्काम करूया अश्या हिशोबाने शाळेचा क्लर्क रावण व मी पुण्याला आलो.

काम झटपट उरकले. मग माझ्या आत्याच्या मुलाकडे योगेशकडे आकुर्डीला मुक्काम केला. रात्री जेवायला त्यांच्या मेस कम हॉटेलात गेलो. तर तिथे जेवायला आलू के पराठे वगैरे. एकदम छोटे छोटे. ते कितीही खाल्ले तरी माझे व रावणचे पोट काही भरेना. शेवटी लाजून आम्ही थांबलो..पण पोट काही भरले नाही. रूमवर जुन्या बालपणीच्या आठवणी, अनेक विषयांवर गप्पा करत त्यांच्या कॉलेजमधील दिलखुलास मित्रांसोबत रात्री जागरण करून मैफिल रंगली.

दुसऱ्या दिवशी जेवणाचा पुन्हा तसाच बेत. तीच चित्तरकथा. दुपारी मग मस्त लोणावळा ट्रीप झाली. भुशी डॅम भरून वाहत होते. तरुणाईचा जल्लोष सुरु होता. धमाल सुरु होती सगळी. आम्हीही त्यात सामील झालो. मनमुराद भटकलो. मजा केली. मी, योगेश, रावण आणि विनायक भाई हा माझा मोठा भाऊ.

संध्याकाळी परत आलो. आज चिंचवडला विनायक भाईच्या रूमवर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी गावाकडे निघायचे असा बेत होता. रात्री विनायक भाईच्या मेस मध्ये जेवणाचा बेत होता. जोशीबाईंची मेस म्हणून घरगुती खानावळ होती. म्हटले आज तरी जेवणाचा मनसोक्त बेत होईल. कालपासून कचरते जेवण सुरु होते. त्यात आज डोंगरावर मनसोक्त भटकलो होतो. जाम भूक लागली होती.

जोशीबाईंच्या मेस कम घरी आम्ही भारतीय बैठकीत आलकट पलकट मारले. जेवण आले. चपाती, कोबीची मोकळी भाजी, ओल्या वाटाण्याची आमटी, वरण, भात, लोणचे वगैरे. सुगंध तर छान येत होता. पण एकेकाची चव घेईल तशी निराशा होऊ लागली. वरण तर गोडच ..कोबी गोडसर ..आमटी देखील गोडसरच. तिखट खायला जीभ नुसती बंड करून उठली होती. आम्ही शेंगदाण्याची भरपूर चटणी घेऊन वरणात मिक्स केली. कोबी, आमटी सोबत चटणी तोंडी लावण्याचा प्रयोग करून बघितला. पण शेवटी जोशीबाईंची चटणी ...कितीशी तिखट असणार. तीही पुणेरीच निघाली. एव्हाना जोशी बाई या गावरान पाहुण्यांकडे त्रासीक नजरेने बघायला लागल्या होत्या. शेवटी मुळचे गोडच असणारे जेवण  गोड मानून आम्ही कोपऱ्यावरून शेज लावली. छोट्या छोट्या पातळ कागदी पोळ्या आणि दोन भुकेलेले गावरान रांगडे गडी.  रावणचे आणि माझे साधारण दोन ते तीन घासात एक चपाती आणि गणित बसले. जोशीबाई चपाती देऊन त्यांची पाठ वळते न वळते तो आमचे ताट रिकामे असे. जोशी बाई वाढून वाढून दमल्या असाव्यात. शेवटी जोशी बाईनी थोड्या त्राग्याने त्यांचा पोळ्यांचा छोटा डबाच आमच्यापुढे आणून आदळला. त्यांच्या दृष्टीने तो पोळ्यांचा केवढालाsssss  डबा असला तरी आमच्यासाठी तो एवढासाच. बघता बघता तो अर्धा अधिक संपला. जोशीबाईंची नजर व एकंदर वातावरण बघून मी व रावणने आता थांबूच अश्या अर्थाची आपापसात नेत्रपल्लवी केली. एव्हाना बराचसा आधारही झाला होता पोटाला. मग मात्र आम्ही आवरते घेतले.

तेव्हापासून पुण्याला कधीही पुण्याला गेलो तरी कोणा मित्राच्या मेस मध्ये न जेवण्याचे पथ्य आजतागायत पाळत आलो आहे.  शिवाय घरी आल्या आल्या आम्ही झणझणीत जेवणाचा दणदणीत बेत करून डोळ्यांतून पाणी आणि अंगातून घाम काढून घेतला हे काय वेगळे सांगायचे ?

©सुहास भुसे


No comments:

Post a Comment