About

Sunday 14 February 2016

पृथ्वीराज संयोगीतेची तेजस्वी प्रेमकहाणी

     पृथ्वीराज आणि संयोगिता यांची प्रेमकहाणी भारताच्या इतिहासात अजरामर आहे. कोण म्हणते आम्हाला प्रेम करायला पाश्चात्यांनी शिकवले किंवा प्रेमाच्या बाबतीत पाश्चात्य आमच्यापेक्षा पुढारलेले आहेत? कृष्ण रुक्मिणी, नल दमयंती, पृथ्वीराज संयोगिता अश्या आमच्या अनेक चित्तथरारक प्रेमकहाण्या रोमियो जुलीयेट ला लाजवतील अश्या आहेत. ओसंडते, आवेगी आणि सर्वस्व उधळून देणारे, स्वत्व पणाला लावणारे कसदार प्रेम कसे करावे हे जगाने आमच्याकडून शिकावे. पण इतर सगळ्या जडजव्याळ ऐतिहासिक, पौराणिक वाद विवादात या अमर प्रेमगाथा काहीश्या झाकोळल्या गेल्या आहेत. आज Valentine’s day च्या निमित्ताने पृथ्वीराज संयोगीतेच्या या रोमहर्षक प्रेमगाथेचे हे खास स्मरण....

     पृथ्वीराज चौहान हा दिल्लीचा ख्यातकीर्त सम्राट होता. तरुण, राजबिंडा, देखणा, उमदा, शूर, पराक्रमी, कर्णार्जुनांसारखा लक्ष्यवेधी बाणफेकीत निपुण असणारा. आपल्या अंगच्या गुणांनी आणि दिल्लीच्या उत्तम कारभाराने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झालेला हा सम्राट.

     त्याच्या या लोकप्रियतेचा आणि गुणांचा सुंगंध वाऱ्यावर तरंगत कनोजला जाऊन पोहोचला. कनोजचा राजा जयचंद हा पृथ्वीराजचा कट्टर विरोधक होता. त्याच्या कीर्तीवर आणि लोकप्रियतेवर तो जळत असे.  आणि संयोगिता ही रुपगर्विता कनोजची राजकुमारी. पृथ्वीराजच्या पराक्रमासारखेच संयोगीतेचे सौंदर्य ही अद्भुत स्वर्गीय होते. तिच्या कानावर पृथ्वीराजची दिगंत कीर्ती पोहोचली. ती मनोमन त्याच्यावर अनुरक्त झाली. त्याला न बघताच त्याच्या प्रेमात पडली. अर्थात तिच्या भावनांची खबर अद्याप पृथ्वीराजला नव्हतीच.

     एकदा दिल्लीहून पन्नाराय नावाचा चित्रकार कनोजमध्ये आपले नशीब आजमावयला आला. तो निष्णात चित्रकार होता. लवकरच कनोजमध्ये त्याचा बोलबाला झाला. पन्नारायजवळ त्याने दिल्लीत चितारलेली पृथ्वीराजची काही चित्रे संग्रही होती. आपल्या सख्यांकडून ही बातमी संयोगीतेला कळली. आणि इतके दिवस ती ज्याचे गुणगान ऐकत त्याच्यावर आषक झाली होती तो दिसतो तरी कसा हे जाणून घेण्यास ती उत्सुक झाली. तिने आपल्या सख्यांकरवी पन्नारायला आपले चित्र काढण्यासाठी म्हणून आमंत्रित केले. राजकुमारीचे चित्र बनवता बनवता पन्नालाल ने पृथ्वीराज बद्दल सगळी माहिती तिला सांगितली. त्याची चित्रे दाखवली. पृथ्वीराजचे राजबिंडे रूप पाहून आधीच त्याच्या प्रेमात पडलेल्या संयोगीतेने हाच आपला वाग्दत्त वर हा मनोमन निर्धारच करून टाकला. पन्नाराय जवळ तिने हे ह्र्दयगुज बोलून दाखवले.

     पुढे पन्नाराय जेव्हा परत दिल्लीला गेला तेव्हा त्याने पृथ्वीराजला संयोगीतेच्या मनातल्या त्याच्याबद्दलच्या अलोट प्रेमाबद्दल त्याला सांगितले. तिचे चित्र दाखवले. संयोगीतेचे अनुपम सौंदर्य पाहून पृथ्वीराज ही तिच्यावर मोहित झाला.

     या गुपचूप चाललेल्या प्रेमकहाणी ची वार्ता राजा जयचंदाच्या कानावर गेली आणि त्याने संयोगीतेला नजरकैदेत ठेवले. व लवकरच तिचे स्वयंवर करण्याचा घाट घातला. या स्वयंवरात त्याने राजपुतान्यातील सर्व राजांना आमंत्रित केले. फक्त पृथ्वीराजला निमंत्रण दिले नाही. पृथ्वीराज यामुळे अपमानित झाला. याचा वचपा काढण्यासाठी आणि आपल्या प्रेमासाठी त्याने संयोगीतेचे स्वयंवरातूनच हरण करण्याचा धाडसी बेत आखला. राजा जयचंद हा ही काही मामुली राजा नव्हता. त्याच्या पदरी ३ लाख घोडदळ, एक लाख हत्ती आणि १० लाख पायदळ अशी प्रचंड चतुरंग सेना होती. पण प्रेम करणारे असल्या गोष्टींना काय भिक घालणार. आणि त्यातही प्रेमवीर पृथ्वीराज सारखा महान पराक्रमी सम्राट असेल तर.. अर्थात पृथ्वीराजच्या मंत्र्यांनी त्याला असे न करण्याबद्दल परोपरीने सांगितले. पण पृथ्वीराज आपल्या निर्णयावर ठाम राहिला.

     स्वयंवराच्या दिवशी जयचंदाने मुद्दाम पृथ्वीराजचा अपमान करण्यासाठी त्याचा पुतळा बनवून तो दरवाज्यावर ठेवला. संयोगिता स्वयंवर दालनात आली. पृथ्वीराजला शोधत एका मागोमाग एक राजे ओलांडत ती पुढे जाऊ लागली. सरतेशेवटी ती दरवाज्यातील पृथ्वीराजच्या पुतळ्याजवळ पोहोचली. आणि त्यालाच वरमाला घातली.
हे पाहून दालनात हाहाकार उडाला. अनेकांनी तलवारी उपसल्या. खुद्द राजा जयचंद आपली तलवार उपसून संयोगीतेचे मस्तक धडावेगळे करण्यासाठी धावला. इतक्यात पुतळ्याच्या ठिकाणी आधीच येऊन उभा राहिलेला पृथ्वीराज पुढे झाला. आणि संयोगीतेला उचलून त्याने जवळच उभ्या असलेल्या घोड्यावर मांड ठोकली. आणि संयोगीतेला सर्वांच्या देखत घेऊन निघून गेला. त्याच्या पाठलागावर आलेल्या जयचंदाच्या सैन्याचे सीमेवर योजनेप्रमाणे उभे असलेल्या पृथ्वीराजच्या सैन्याबरोबर तुंबळ युद्ध झाले. पण संयोगीतेचे यशस्वी हरण करण्यात आणि आपल्या प्रेमाला न्याय देण्यात पृथ्वीराज यशस्वी झाला.

     राजा जयचंद मात्र आपल्या हिंदी सिनेमात असतात तश्या खडूस बापांप्रमाणे हा अपमान विसरला नाही. व त्याने महंमद घोरीच्या सतराव्या स्वारीच्या वेळेस त्याला सैन्य आणि माहिती देऊन फितुरीचा रंग दाखवला. आणि पृथ्वीराज ला पकडून देण्यास मदत केली. पृथ्वीराज कडून दोन वेळा जीवदान मिळालेल्या घोरीने मात्र पृथ्वीराजला सोडले नाही. त्याची नृशंस हत्या केली.

     आणि या तेजस्वी प्रेमगाथेचा एक करूण ह्र्दयद्रावक शेवट झाला.

     प्रत्येक प्रेमकहाणी ही वेगळी असते. आपापल्या परीने श्रेष्ठ असते. मला मात्र कोणत्याही देशी परदेशी प्रेमकहाणी पेक्षा ही पृथ्वीराज संयोगीतेची तेजस्वी प्रेमकहाणी नेहमीच श्रेष्ठ वाटत आलेली आहे. आवडत आलेली आहे. खूप वर्षांपासून मनात घर करून राहिलेली आहे.

     पृथ्वीराज आणि संयोगिता या ऐतिहासिक प्रेमवीरांना मनोमन वंदन करून या पोस्टचा शेवट करतो.

     सर्वांना आजच्या Valentine’s  day च्या मनपूर्वक शुभेच्छा !!

( टीप - पृथ्वीराजने संयोगीतेचे हरण कसे केले याविषयी राजस्थानच्या इतिहासात वेगवेगळे संदर्भ आढळतात. त्यापैकी ही सर्वाधिक लोकप्रिय व लोकमानसात रुजलेली कथा आहे. )

©सुहास भुसे.    

   

No comments:

Post a Comment