About

Saturday 17 November 2012

तेव्हा शेपूट घालून कुठे बसला होतात ???



इडा पीडा टळू दे बळी चे राज्य येऊ दे अशी दर दिवाळीला बलीप्रतिपदे दिवशी प्रार्थना केली जाते. पण या दिवाळीला मात्र महाराष्ट्र शासनाने शेतक-यांना गोळ्या घालून त्यांच्या रक्ताने रक्तरंजित दिवाळी साजरी केली. शेतकरी वर्षभर राब राब राबतो. त्याच्या अपरंपार कष्टांच्या जीवावर आपण दिवाळीला इतर सणांना गोड धोड करून सण साजरे करतो त्याच शेतक-यांना ऐन दिवाळीत गोळ्या घालायला शासन कचरले नाही. हा अतिशय गंभीर प्रश्न अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळला गेला. या प्रश्नी अनेक चर्चा महाचर्चा सुरु आहेत. या सर्व प्रकारात न खटकणारी अशी कोणतीच गोष्ट नाही. तरीही त्यातल्या त्यात हे आंदोलन दडपून टाकताना शासनाने जे राक्षसी कौर्य दाखवले आहे ते मला सर्वात जास्त खटकले. या निमित्ताने अनेक नेत्यांनी वेगवेगळी विधाने केली. या सर्व विधानांतून त्यांचा दिसून येणारा मुजोरपणा आणि बेमुर्वतपणा स्तंभित करणारा आहे. खरच आपण एका लोकांच्या लोकांसाठी लोकांनी चालवलेल्या लोकशाही शासन पद्धतीत राहत आहोत का अशी मनात शंका निर्माण करणारे आहे.


  















 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार -मा. राजू शेट्टी






स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष -सदाभाऊ  खोत




शेतकरी संघटनेचे नेते - रघुनाथ दादा पाटील


पोलिसांचे अमानुष क्रौर्य - तेव्हा कुठे शेपूट घातली होतीत ??





विविध चानेल्स वर या संदर्भातील घडामोडी पाहत असताना आणि या विषयीच्या चर्चा, लेख आणि बातम्या यातून जी माहिती हाती लागत आहे ती हादरवून सोडणारी आहे. ज्या क्रूरपणे आंदोलकांवर लाठीचार्ज केला जात आहे त्यावरून हे आंदोलक शेतकरी आहेत की देशविघातक कारवाया करणारे अतिरेकी अशी शंका यावी. अर्थात अतिरेक्यांचे जे चोचले आपले शासन पुरवते आहे ते पाहता ही शंका निराधार आहे. कदाचित हे शेतकरी जर राष्ट्रद्रोही असते दंगलखोर असते तर पोलीसांची हिम्मत झाली नसती त्यांच्यावर लाठ्या बंदुका उगारण्याची. परवा आझाद मैदानावर रझा अकादमी ने घडवून आणलेल्या सुनियोजित दंगलींच्या वेळी हेच शूर पोलीस दंगलखोरांचा मार खाऊन गप्प होते. मुस्लीम दंगलखोरांनी पोलिसांना बदड बदड बदडले. पार रक्तबंबाळ होईस्तो. पोलीस भगिनींची त्यांनी अब्रू लुटली, त्यांच्यावर पाशवी सामुहिक बलात्कार केले, इतके भयंकर अत्याचार केले की काही भगिनी त्या मानसिक धक्क्यातून आजही सावरलेल्या नाहीत तरी या षंढ पोलिसांनी तिथे साधा अश्रुधूर वा लाठीचार्ज करण्याचा देखील पराक्रम दाखवला नाही . या आधीही पोलिसांना अगदी जिवंत जाळून मारण्याचे देखील प्रकार घडले आहेत तथापि आपले शूर पोलीस आणि तडफदार सरकार तिथे शेपूट घालून गप्प राहिलेले आहे. मात्र जिथे शेतकरी आंदोलनाचा प्रश्न येतो तिथे हे शूरवीर पोलीस प्रशासन अत्यंत कठोर भूमिका घेते. येनकेन प्रकारे ते आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करते हे काय गौडबंगाल आहे बुवा ?



शेतकरी मग ते मावळचे असोत वा ऊसदर आंदोलनातील सांगली-कोल्हापूरचे  असोत पोलीस तिथे बिनधास्त गोळीबार करतात. अमानुष लाठीचार्ज करतात . का हो ? अस का ? आपल्या नाय्य मागण्यांसाठी, सरकार न्याय देत नसल्याने रस्त्यावर उतरलेल्या शेतकरी बांधवांवर असा गोळीबार आणि लाठीचार्ज करण्याचे कारण काय ? घटनात्मक मार्गाने आंदोलन केल्यास साधी दखल देखील सरकार घेत नाही आणि उग्र आंदोलन केल्यास गोळ्या घातल्या जातात. या बिचा-या शेतक-यांनी करावे तरी काय ?





आंदोलन हिंसक होण्याला जबाबदार कोण ?


ऐन दिवाळीत एस टी वाहतूक बंद झाल्याने या आंदोलनाची झळ नक्कीच सर्व सामान्य जनतेला लागली. रास्ता रोको मध्ये वाहने पेटवण्याचे प्रकार घडले. अनेक एस ट्या जाळण्यात आल्या. पोलीस गोळीबार झाला. पूर्ण माहिती न घेता या प्रकारात शेतकरी संघटनेला दोषी ठरवण्याचे पाप काहीजण करत आहेत. पण खरच या आंदोलनाला हिंसक वळण मिळण्यासाठी शेतकरी संघटना वा तिचे नेते जबाबदार आहेत का ?


१.सर्वप्रथम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी , प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत , रघुनाथ दादा पाटील, शरद जोशी  यांनी ऊस हंगाम सुरु होण्यापूर्वी वारंवार ऊस दराचा प्रश्न सामोपचाराने सोडवण्याचे प्रयत्न केले आहेत. तथापि त्यांच्याशी साधी चर्चा करण्याचे देखील सौजन्य मा. मुख्यमंत्री वा इतर मंत्र्यांनी दाखवले नाही. राजू शेट्टी वा सदाभाऊ यांचे साधे फोन देखील या शेतक-यांचे नेते म्हणवणा-या लोकांनी उचलू नयेत म्हणजे काय ?

२.त्यानंतर पंढरपूर, जयसिंगपूर  अश्या ठिकाणी ऊस परिषदा, शेतकरी मेळावे घेऊन त्यामधून हा प्रश्न सोडवण्यासबंधी सरकारला इशारे देण्यात आले. तथापि त्यांची देखील दखल सरकारने घेतली नाही.

३.त्यानंतर सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापुरातील कारखान्यासमोर राजू शेट्टी आणि सहका-यांनी ठिय्या आंदोलन केले. तथापि तिथे देखील चर्चा करणे तर दूरच राहो साधी विचारपूस करण्याचे सौजन्य सहकारमंत्र्यांनी दाखवले नाही. किंवा या आंदोलनाकडे ढुंकूनही बघितले नाही.

४. इंदापूर बंद पुकारण्यात आला. पण काही बेजबाबदार आणि चिथावणीखोर वक्तव्ये करण्यापलीकडे इथेही प्रशासनाने काही केले नाही.

५ सोमवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदभाऊ खोत यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर खरा आंदोलनाचा भडका उडाला.


या सर्व घटनाक्रमादरम्यानच्या २ महिन्याच्या काळात हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सामोपचाराने सोडवण्याचे शासनाने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. एकही मंत्री चर्चेसाठी पुढे आला नाही. ज्या शेतक-यांच्या मतावर आपण सत्ता भोगत आहोत आणि ज्यांच्या कष्टावर आपण रोजची भाकरी खात आहोत त्या शेतकरी राजाला आणि त्यांच्या नेत्यांना कस्पटासमान लेखन्याचीच या मंत्र्यांमध्ये अहमहिका लागली होती. आता सुज्ञ लोकांनी विचार करावा याला जबाबदार कोण ते?





पोलिसांच्या अमानुष गोळीबाराची शिकार- चंद्रकांत नलावडे (वय ३० वर्षे)






शोकाकुल परिवार- चंद्रकांत नलावडे यांच्या निधनाचा धक्का बसलेल्या त्यांच्या पत्नी सारिका नलावडे


जबाबदार नेत्यांची बेजबाबदार विधाने



१.      हा राजू शेट्टींचा टी आर पी वाढवण्याचा उद्योग -राष्ट्रवादी माजी खासदार निवेदिता माने  

निवेदिता माने यांची एकंदर कारकीर्द आणि अपरिपक्वता लक्षात घेता या त्यांच्या टीकेकडे फारसे कोणी ढुंकून पाहिले नाही. तथापि असे विधान मा. निवेदिता मानेंनी आपला स्वत:चा टीआरपी वाढवण्यासाठी केलेले आहे हे लक्षात येण्याइतका शेतकरी सुजाण आहे. खासदार राजू शेट्टी यांनी इचलकरंजी मतदारसंघात त्यांचा पराभव करून त्यांना जे अस्मान दाखवले आहे त्याचा हा विखार आहे हे आम्ही खूब समजून आहोत.


२.    “ आम्हीही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत.” – अर्थमंत्री जयंत पाटील.



वा ! वा !! याला म्हणतात मर्दुमकी ! अहो जयंतराव रझा अकादमीने मुंबईत दंगल घडवली, पोलिसांना कुत्र्यासारखे मारले तेव्हा काय हातात हिरवे चुडे भरले होते काय ? हीच मर्दुमकी तिथे दाखवली असतीत तर आम्ही नक्कीच तुमचे अभिनंदन केले असते. तुमचे फोटो चौका चौकात लावले असते. पण गरीब असंघटीत बळीराजाला तुम्ही मर्दुमकी दाखवत आहात. अहो पाटील हे वागण बर नव्ह ...!!

३.    "मी ऊस आंदोलन करणाऱ्या नेत्यांचा खूप अभ्यास केलाय. आता जर मागणीचा दर कमी झाला तर कारखानदार आणि आंदोलक यांच्यात तडजोड झाली आहे, हे सर्वांनी ओळखावे ''-अर्थमंत्री जयंत पाटील

एरवी शांत व मुरब्बी नेते म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांच्या तोंडी ही आंदोलनाला संभ्रमित करण्यासाठीची डावपेचाची भाषा शोभत नाही. खासदार राजू शेट्टी यांच्यावर केलेला हा गंभीर आरोप आहे. मुळावरच घाव घालून आंदोलन उखडून टाकण्याचा हा निंदनीय किळसवाना प्रयत्न आहे. आंदोलन म्हटलं की एक पाउल पुढे तर प्रसंगी एक पाउल मागे करावेच लागते. याला तडजोड म्हणतात. चर्चेची परिणीती म्हणतात. पण जयंत पाटील यांनी हाच शब्द वेगळ्या अर्थाने वापरला आहे. ३००० रुपयेच द्या १ पैसाही कमी नको अशी अडेलतट्टू भूमिका घेऊन आंदोलन यशस्वी होत नाही . खुद्द शिरोळात जाऊन शेट्टींच्या होम ग्राउंडवर त्यांनी “शेट्टींनी तीन हजाराची पहिली उचल घेऊन दाखवावीच ! असे उघड आव्हान दिले आहे ते देखील शासन या प्रश्नांकडे कसे पाहते याचेच द्योतक आहे. साम ,दाम , दंड , भेद हर नीती वापरून सरकार हे आंदोलन चिरडू पाहत आहे याचाच हा पुरावा आहे .

४.    “हा प्रश्न शेतकरी व कारखानदार यांनी आपसांत बसून सोडवावा” – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.


लोकशाही राज्यातल्या प्रशासन प्रमुखाने, प्रत्यक्ष मुख्यमंत्र्याने असे विधान करावे या परता या सरकारच्या बेजबाबदार पणाचा दुसरा पुरावा कोणता ? याला सदाभाउंनी दिलेले उत्तर पुरेसे बोलके आहे. उद्या आमच्या घरावर दरोडा पडला तर तो प्रश्न दरोडेखोर व आम्ही यांनी आपसांत बसून सोडवावा असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे काय ? मग शासन असते कशासाठी ? नुसते घोटाळे करून स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी ? ज्यांच्या जीवावर आपण सत्ता भोगत आहोत त्या शेतक-याच्या जीवनमरणाच्या प्रश्नासाठी शासन मध्यस्ती देखील करायला तयार नाही याला काय म्हणावे ? टाटा, बिर्ला, अंबानी असल्या धन दांडग्यांच्या समस्यांमध्ये सरकार मध्यस्ती करते पण गरीब बिचा-या बळीराजासाठी मात्र ते मध्यस्ती करणार नाही. यातून योग्य तो बोध जनता जनार्दन घेईलच.


५.   “अजूनही आम्ही जसा आदेश येईल तशी कारवाई करू” – दिलीप सावंत पोलीस अधीक्षक , सांगली.

पोलीस या प्रश्नी अत्यंत क्रौर्य दाखवत आहेत. एका शेतक-याचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. आता यापुढे पोलिसांची भूमिका काय असेल ? या पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला दिलीप सावंत यांनी दिलेले हे उत्तर आहे . शासनाने हे आंदोलन पोलिसी बळाचा वापर करून चिरडून टाकण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत हे समजण्यासाठी कोणा राजकीय पंडिताची गरज नाही.


६.     “ शेतकरी हा सहकारी साखर कारखान्यांचा मालक आहे. त्याने निवडून दिलेल्या संचालक मंडळाकडून त्याने हवा तो दर घ्यावा , त्याच्याशी शासनाचे देणे घेणे नाही ” – अजित पवार

शेतकरी हा कारखान्यांचा मालक आहे हे विधान तितकेच हास्यास्पद आहे जितके की लोकशाहीत सर्वोच्च सत्ता लोकांच्या हातात असते हे विधान . अजित पवार यांनी शेतक-यांची आणि एकूणच सामान्य जनतेचा इथे उपहास केला आहे त्यांची क्रूर खिल्ली उडवली आहे असेच दिसते. शासनाचे जर कशाशीच देणे घेणे नाही तर महामहीम करू द्या ना त्यांना आंदोलन ...बघून घेतील ते आणि संचालक मंडळ . हा पोलिसी बळाचा वापर कशासाठी ? कशासाठी करता लाठीचार्ज ? कशासाठी घेतलात चंद्रकांत नलावडेंचा बळी ?


७.   “ राजू शेट्टी कोणत्या समाजाचा आहे   तो  कोणते कारखाने बंद पाडत आहे हे आधी लक्षात घ्या ” –  केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार.

या सर्व चीड आणणा-या वक्तव्यांच्या शृंखलेवर कळस चढवला तो पवारांच्या या गरळ ओकणा-या विषारी वक्तव्याने. याच्या इतके घाणेरडे वक्तव्य शेतकरी संघटनेच्या आंदोलनांच्या इतिहासात दुसरे झाले नाही. मुळात हे खोटे विधान आहे हा भाग वेगळा. राजू शेट्टींच्या मतदारसंघातील चार कारखान्यांपैकी तीन बंद आहेत आणि चौथा वारणा कारखाना चालू आहे . पण विनय कोरे हे लिंगायत आहेत तर राजू शेट्टी हे जैन. शिवाय वारणा हा नेहमी सर्वोच्च दर देणारा कारखाना आहे त्यामुळे तिथे तुलनेने असंतोष कमी आहे. तथापि शेतकरी हा शेतकरी असतो त्याला कोणतीही जात नसते. या सर्व आंदोलनाला जातीय वळण देण्याचा प्रयत्न करून पवार यांनी स्वत:च्या पायावर धोंडा हाणून घेतला आहे .


या सर्व धुरंदर नेत्यांच्या विधानांचा परामर्श घेतला असता एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे सरकारला हे आंदोलन येन केन प्रकारे चिरडून टाकायचे आहे . आम्हीच शेतक-यांचे तारणहार आहोत ही साखरसम्राट नेत्यांची आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाची जी प्रतिमा होती तिला राजू शेट्टींनी हादरा दिला आहे. मागील वर्षी खुद्द बारामतीत राजू शेट्टींनी यशस्वी आंदोलनाचे संयोजन करून शरद पवारांना उघड उघड आव्हान दिले होते . साखरसम्राटांची चराऊ कुरणे असलेले हे साखर कारखाने वेठीस धरून कोण एक ऐरा गैरा राजू शेट्टी उठतो आणि शेतक-यांच्या हक्कासाठी भांडतो . आणि आमच्या मलिदा खाण्यावर बंधने आणू पाहतो. हा खरा राग आहे .

जाता जाता फक्त एकच प्रश्न जर हे आंदोलन अनाठायी असेल तर मागील वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे साखर कारखान्यांनी जाहीर केलेला पहिला हप्ता १४५० रुपयांवरून १८५० रुपयांपर्यंत (सोलापूर जिल्हा ) वाढवावा लागला. तो देणे ९५ % साखर कारखान्यांना शक्य झाले . मग जर हे आंदोलन झाले नसते तर प्रतिटन ४०० रुपये एवढ्या अवाढव्य रकमेचे काय झाले असते ?  


                     - सुहास भुसे 
              
               (रोखठोक साठी - १४ -११-१२ )
   

Thursday 15 November 2012

चार्वाक दर्शन -४ : चार्वाक दर्शन नाकारण्याचे दुष्परिणाम


चार्वाक हे काळाच्या खूप पुढे असणारे महान वैज्ञानिक विचारवंत होते. आज २१ व्या शतकात , विज्ञान युगात या ब्लॉग वर आपण चार्वाक तत्वज्ञानावर चर्चा करत आहोत. तथापि परिस्थिती अशी आहे की आज देखील बहुसंख्य लोकांना चार्वाकांचे विचार पचवणे अवघड जात आहे .या विचारांमुळे धक्का बसलेल्या धर्मश्रद्ध लोकांच्या अनेक प्रतिक्रिया अनुभवण्यास मिळाल्या. चार्वाकांचे रोखठोक विचार त्यांच्या धर्म कल्पनांच्या मुळावरच घाव घालणारे असल्याने हे अपेक्षित आणि साहजिक देखील होते . तथापि येथे विचार करण्याची बाब म्हणजे आज २१ व्या शतकात हे विचार पचवण्यास कठीण वाटत असतील तर ज्या काळात चार्वाकांनी हे विचार मांडले त्या पुरातन काळात इतके प्रखर विचार मांडणे किती धाडसाचे असेल. इ.स. ९ व्या शतकापासून ते आजपर्यंत च्या जातीयवाद, वर्णद्वेष, वर्णवर्चस्व, अंधश्रद्धा आणि या सर्वांना पोषक धर्म तत्वज्ञान समाजात रुजवणारे स्वघोषित धर्ममार्तंड यांनी थैमान घातलेल्या काळात चार्वाक दर्शनाला किती प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला असेल. प्रत्येक भल्या बु-या मार्गाचा हे तत्वज्ञान लोकांमध्ये रुजू नये, दडपले जावे यासाठी वापर करण्यात आला असेल. त्याची परिणीती म्हणजे आज चार्वाक दर्शनाचा एकही प्रमाणित ग्रंथ उपलब्ध नाही. चार्वाक विचार विकृत स्वरुपात लोकांपुढे आणून त्यांच्यावर भोगवादाचा शिक्का कसा मारण्यात आला ते त्यांच्या एका श्लोकाच्या उदाहरणासहित आपण मागील या लेखात पाहिलेच आहे. त्यांच्या अनुयायांवर हिंसक हल्ले करण्याचे प्रकार देखील बरेच घडले असावेत. चार्वाकांचा सम्राट युधिष्टरासमोर खुन करण्यात आला. असा संदर्भ ब-याच ठिकाणी वाचनात येतो. याविषयी अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला असता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती मिळते . काही ठिकाणी महाभारतातील युधिष्ठराच्या समोर एका चार्वाकाचा खुन करण्यात आला पण तो या तत्वज्ञानाचा प्रणेता चार्वाक नसून या परंपरेतील हे तत्वज्ञान अनुसरणारा दुसरा एक चार्वाक होता अशी नोंद आढळते तर काही ठिकाणी चार्वाकांचा खुन युधिष्ठरासमोर करण्यात आला पण हा महाभारतातला युधिष्ठर नव्हे तर याच नावाचा त्याच्याहून पुरातन काळातला एक दुसरा सम्राट होता अशी नोंद आढळते. या नोंदी वेगवेगळ्या असल्या तरी देखील अनेक ठिकाणी अशी चर्चा असणे म्हणजे असा काहीतरी प्रकार निश्चितच झाला असावा असे मानण्यास जागा आहे .


चार्वाक दर्शन हा एकमेव नास्तिक संप्रदाय नाही  

   

देवाचे अस्तित्व नाकारणारा चार्वाक हा एकमेव नास्तिक संप्रदाय आहे असा जो समज करून देण्यात आला आहे तोदेखील असाच पूर्णपणे चुकीचा आहे. महर्षी कपिल यांचे सांख्य दर्शन , महर्षी गौतम यांचे न्याय दर्शन , महर्षी कणाद यांचे  वैशेषिक , महर्षी जैमिनी यांचे (पूर्व) मीमांसा दर्शन हे देखील निरीश्वरवादीच होते तथापि त्यांनी वेदांची निंदा न केल्याने त्यांना आस्तिक-नास्तिक या श्रेणीमध्ये समाविष्ट केलेल आहे. नास्तिक या शब्दाचा अर्थ सहसा आपण जो देवाचे अस्तित्व मानत नाही असा घेतो. पण येथे सुज्ञ वाचकांच्या लक्षात आलेच असेल की नास्तिक या शब्दाचा खरा अर्थ देव न मानणारा नसून वेदप्रामाण्य न मानणारा असा आहे. बौध्द आणि जैन यांची मुल तत्वज्ञाने देखील निरीश्वरवादी-जडवादीच होती. चार्वाकांसारखेच त्यांनी देखील वेदप्रामाण्य नाकारल्याने त्यांचा देखील समावेश नास्तिक या श्रेणीत करण्यात आला आहे. जैन आणि बौद्ध स्वत:ला स्वतंत्र धर्म मानत असले तरी स्वत:ला भारतीय परंपरांचे उत्तराधिकारी मानणारे मात्र त्यांना हिंदू धर्मातील एक तात्विक विचारधारा मानतात. असो...चार्वाक तत्वज्ञान हे वेदप्रामाण्य मानणे हा ज्यांच्या अस्तित्वाचा आधार आहे त्यांनी किती व कसे  बदनाम केले आहे आणि हेतुपुरस्पर त्याला दडपून त्याला जनाधारापासून कसे वंचित ठेवले आहे याची पुरेपूर कल्पना वाचकांना या समग्र लेखमालेत केलेल्या विस्तृत विवेचनावरून आणि परिस्थितीजन्य पुराव्यांवरून लक्षात आलेच असेल.


चार्वाक तत्वज्ञानाची अशी गळचेपी करण्याचे भीषण दुष्परिणाम पुढील काळात घडले. भारतीय समाजाची उत्कर्षाकडून अधोगतीकडे वाटचाल सुरु होण्याचे प्रमुख कारण चार्वाक किंवा लोकायत दर्शनाची ही धर्माच्या दलालांनी केलेली दडपणूक हे आहे. यासंबंधी या लेखात सविस्तर चर्चा करू .



चार्वाक दर्शनाच्या गळचेपीचे दुष्परिणाम


भारतीय प्राचीन प्रगत विज्ञानाची महती सर्व जगाने मान्य केली आहे. अगदी आज वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत अश्या पाश्चात्य जगाने देखील भारतीय प्राचीन वैज्ञानिक परंपरांचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे. आपल्या प्राचीन ग्रंथात आढळणा-या आपल्या वैज्ञानिक प्रगत तंत्रज्ञानासाबंधी आगामी काही दिवसांत एक सविस्तर लेख लिहिणारच आहे. . वैशेषिक दर्शनाचे प्रणेते महर्षी कणाद,  चरक, ब्रह्मगुप्त,  आर्यभट्ट, भास्कराचार्य अशी अनेक वैज्ञानिक-गणितज्ञ-खगोलतज्ञ व वैज्ञानिक विचारांच्या दार्शनिकांची मोठी परंपरा या संस्कृती मध्ये रुजू पाहत होती. तथापि चार्वाक दर्शनाच्या दडपणूकीमुळे या सर्व परंपरा खंडीत झाल्या. जडवाद किंवा इह वाद या वैज्ञानिक विचारसरणीचा पाया आहे. मनुष्याचे ऐहिक जीवन सुखी आणि समृद्ध करणे हे विज्ञान वा तंत्रज्ञानाचे प्रमुख ध्येय असते. तथापि उत्तर काळातील वैदिक धर्म

ब्रह्म सत्य I जगत् मिथ्या II 

या प्रमुख तत्वावर आधारलेला आहे. या धर्माने ऐहिक जीवनाकडे पाठ फिरवली. जीवन हे क्षणभंगुर आहे अशाश्वत आहे त्यामुळे मोक्ष, स्वर्ग हेच मानवाचे अंतिम जीवन ध्येय असले पाहिजे असले भाकड तत्वज्ञान लोकांमध्ये रुजवण्यात आले. लोकांना वास्तव जीवनाकडे पाठ फिरवण्यास व मरणोत्तर जीवनास अधिक महत्व देण्यास शिकवणे हा धर्माचा एक प्रधान हेतू बनवण्यात आला. समाजामध्ये कष्ट करणारे, सृजनात्मक कर्म करून समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे (हे जडवादी होत हे ओघानेच आले ) आणि कोणतेही कष्ट न करता त्यांच्या श्रमावर गुजराण करणारे धर्ममार्तंड ( आणि हे अध्यात्मवादी ) असे दोन वर्ग तयार झाले. श्रम करणा-या या वर्गाला विचार करण्याचा अधिकार नव्हता, विचार मांडण्याचा अधिकार नव्हता हे स्पष्ट आहे . पूर्वजन्मीच्या पापाचे फळ म्हणून कष्ट साध्य जीवन जगावे लागत आहे आणि जे धनिक आहेत त्यांचे सुख हे त्यांच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईचे फळ आहे असे समाज मनावर बिंबवले गेल्याने या व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची मानसिकताच हळू हळू नाहीशी झाली . भारतीयांमध्ये उत्तर काळात दिसून येत असलेल्या आणि आज तागायत टिकून राहिलेल्या पराभूत मानसिकतेची बीजे याच काळात रोवली गेली नव्हे हे बीजारोपण या धर्माच्या दलालांनी स्वत:चे श्रेष्ठत्व जपण्यासाठी जाणीवपूर्वक केले.














पृथ्वी गोल आहे असे सांगणा-या कोपर्निकस किंवा ग्यालिलिओसारखे बायबल मधील कल्पनांना धक्का देणारे वैज्ञानिक यांचा चर्च ने केलेला छळ सर्वश्रुत आहे तथापि तुलनेने प्राचीन भारतीय परंपरांचे श्रेष्ठ्व सांगण्यासाठी इथे एक उदाहरण द्यावेसे वाटते. आर्य भट्टाने वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी ई स ४९९ साली आर्यभट्टीय ग्रंथ नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात आर्य भट्टाने कोपर्निकस च्या कितीतरी आधी पृथ्वी गोल आहे व तिचा परीघ अंदाजे २४८३५ मैल आहे असे सांगितले होते. तसेच चंद्र आणि सूर्य यांच्या मध्ये पृथ्वी आल्याने चंद्र ग्रहण होते हे ही त्याने सांगितले होते . हे सिद्धांत पुराणातील पृथ्वी सपाट असून शेषनागाच्या फण्यावर तोलली गेली आहे, राहू केतू नावाचे राक्षस चंद्र आणि सूर्य यांना गिळंकृत करतात त्यामुळे ग्रहणे होतात अश्या भाकड कथांना छेद देणारे होते. तथापि त्या भारतीय संस्कृतीच्या सुवर्ण काळात त्यांचा धर्मद्रोही म्हणून छळ वगैरे झाला नाही. उलट त्यांच्या या कार्यावर खुश होऊन तात्कालिक गुप्त घराण्यातील बुद्ध गुप्त नावाच्या सम्राटाने त्यांचा सन्मान करत त्यांना नालंदा विश्वविद्यालयाचे प्रमुख बनवले.  तथापि उत्तर वैदिक धर्माचा इतिहास इतका उदार दिसत नाही याचे प्रमुख कारण ई.स. ९ व्या शतकात शंकराचार्यांकडून वैदिक धर्माची जी पुर्नरचना करण्यात आली त्यात धर्माचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकण्यात आले. पूर्व काळातील धर्माचे मुक्त विचारांचे व्यासपीठ अनुपलब्ध करण्यात आले. हिंदू धर्म पूर्णपणे बंदिस्त करण्यात आला. जडवादाची पाळेमुळेच पूर्ण पणे उखडून टाकण्यात आली. धर्म मोक्ष, निर्वाण, स्वर्ग असल्या कल्पनाच्या दावणीला बांधण्यात आला. वास्तव जीवनाकडे पाठ फिरवून मरणोत्तर जीवनाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. याचा परिणाम विकासावर झाला. पराजय, गुलामगिरी आणि राष्ट्रीय भावनेचा संकोच हे सर्व अरिष्ट त्यामुळेच हळूहळू हिंदुस्थानावर कोसळत गेले. याचे परिणाम आपण आजदेखील भोगत आहोत.






ज्याची जपणूक करावी ज्याचे रक्षण करावे ज्याचा विकास करावा असे काहीही नाही अशी एकदा समाजाची मानसिकता तयार झाली की कृती करण्याचे काही कारणच उरत नाही.

आणि समाजाची ही मानसिकता आजही गेलेली नाही. आज सर्वत्र माजलेला अनाचार, भ्रष्टाचार, नेत्यांचा निर्लज्ज कोडगेपणा आणि जनतेची लाचार असहाय्यता याची मुळे चार्वाक तत्वज्ञान पर्यायाने जडवाद नाकारण्यात आहेत.

चार्वाकांचा जडवाद जर टिकला आणि वाढला असता तर समाजाची जीवनासक्ती वाढली असती. जीवन सुंदर आहे, ते आणखी सुंदर बनवूया ही वृत्ती वाढली असती. जीवन हे एकमेव आहे आणि ते मुल्यवान आहे, ते मिथ्या नाही ते सत्य आहे. मृत्यू म्हणजे जीवनाचा शेवट. त्यानंतर काही नाही. न पुर्नजन्म आहे न स्वर्ग-नरक. त्या शेवटच्या क्षणापर्यंत या जीवनातील क्षण न क्षण आनंदात वेचुया. जीवन परस्पर साहचर्याने सुखनैव व्यतीत करुया. ते अधिकाधिक आनंदी आणि सुंदर बनवण्यासाठी प्रयत्नशील राहूया. हे लोकायत जीवनाभिमुख तत्वज्ञान वाढीला लागले असते. आणि पर्यायाने जीवन अधिकाधिक सुखकर करणे हा प्रमुख उद्देश असणा-या ज्ञान आणि विज्ञानाच्या परंपरादेखील निर्माण झाल्या असत्या, रुजल्या असत्या, वाढल्या असत्या.   


जडवाद नाकारल्याने गुलामगिरी, पराजय


भारतात लोकायत मताचा पूर्व काळात होत होता तसाच सन्मान उत्तर काळात देखील होत राहिला असता तर आपली ती प्राचीन वैभवशाली संस्कृती लयाला न जाता सर्व जगाला आपल्या वैभवाने दिपवून टाकत आजही टिकून राहिली असती . माणसांची जीवनासक्ती कमी झाल्याने पर्यायाने सर्वच गोष्टींबद्दल नकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला. आत्माभिमानाचा –हास झाला, राष्ट्रप्रेमाला ओहोटी लागली. या पराभूत मानसिकतेनेच आपणास मुस्लीमांपुढे गुढगे टेकावे लागले, शतकानुशतके गुलामगिरीची जोखडे वाहावी लागली.   

जडवाद नाकारल्याने भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा विकास खुंटला . पाश्चात्य देशात मात्र –हेनेसान्स काळात प्राचीन कलांच्या उन्नयनातून जडवादाचे पुनरज्जीवन झाल्याने विकासाची द्वारे खुली झाली. मायकेल एंजोलो. कार्वाज्जीवो , बेर्निनी, लिओनार्दो द व्हीन्सी अश्या अनेक महान कलावंतांच्या कलाकृतीतून जीवनाभिमुख तत्वज्ञानाची पर्यायाने जडवादाची जोपासना व विकास झाला. परिणामत: पाश्चात्य देशांनी विज्ञान तंत्रज्ञानात पुढची मजल मारली. भारतीयांचे मागासलेपण आणि पराभूत मानसिकता शिवाय आत्माभिमान, राष्ट्राभिमान यांचा अभाव  यामुळे सबंध भारत गुलामगिरीच्या खाईत लोटणे त्यांना फारसे कठीण गेले नाही.


शतकानुशतके अन्याय करण्यात आलेल्या लोकायत तत्वज्ञानाची वाचकांना एक ओझरती ओळख करून द्यावी. त्याची महती आणि ते नाकारले गेल्याने झालेले  दुष्परिणाम यांची चर्चा करावी हा या लेखमालेचा प्रमुख हेतू होता. हिंदुस्तानातील अनादी अनंत सांकृतिक विचारधारा  असलेल्या हिंदू धर्माचे महान सुपुत्र असणा-या या लोकायत किंवा चार्वाक तत्वज्ञानाचे प्रणेते महर्षी चार्वाक यांना या लेखमालेच्या रुपात ही छोटीशी आदरांजली ....!!!


              -सुहास भुसे

          (रोखठोकसाठी -१०-११-२०१२)  

या लेखमालेतील इतर लेख 









Tuesday 23 October 2012

चार्वाक दर्शन ३ : शोषणाधारित धर्म व्यवस्थेविरुद्धचा आदिम लढा


चार्वाक दर्शनावरून मागील काही दिवसांत रोखठोक ब्लॉगवर भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. त्यातील अनेकांसाठी चार्वाकांचे विचार धक्कादायक ठरल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे. तर अनेकांचे कुतूहल चार्वाकांविषयी चाळवले गेले आहे. अनेकांना चार्वाक विचार आवडल्याचेही दिसत आहे. चार्वाकांचे विचार हे श्रद्धाळू लोकांना पचवायला तसे जडच आहेत. हरकत नाही. यानिमित्ताने चार्वाक दर्शनावर जितके वाद विवाद झडतील तेवढे स्वागतार्ह्यच आहेत. कारण यातूनच आपल्या धर्म विषयक आणि एकूणच जीवनविषयक पायाभूत संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल.

    मुळात जडवादी आणि चैतन्यवादी यांच्यातील हा वाद सनातन आहे तितकाच तो विश्वव्यापक ही आहे. जे जडातून चैतन्य निर्माण झाल अस मानतात ते जडवादी आणि जे चैतन्यातून जड निर्माण झाल अस मानतात ते चैतन्यवादी किंवा ईश्वरवादी. मोक्ष, आत्मा आणि देव यांना मानणारे श्रद्धाळू ईश्वरवादी आणि यांचे अस्तित्व नाकारणारे जडवादी असे दोन स्पष्ट तट जगभरातील धार्मिक परंपरांमध्ये दिसतात. तुलनेने जडवादी परंपरा अधिक जुनी आहे. प्राथमिक अवस्थेतील मानव हा या विश्वाकडे जडवादी दृष्टीनेच पाहत होता. पुढे निसर्गातील देवतांना त्याने देव मानायला सुरवात केली असली तरी तिथे प्रार्थना करण्याशिवाय कर्मकांडाचे प्राबल्य अजून नव्हते. या परंपरांमध्ये कर्मकांडाचा शिरकाव पुढील काळात हळूहळू होत गेला. या दृष्टीने विचार केला तर जडवादाचे तुलनेने असलेले प्राचीनत्व प्रत्ययास येते.


चार्वाक आणि देवाचे अस्तित्व




चार्वाक तत्वज्ञान हे सार्वकालिक आहे. कोणत्याही काळातील विचारवंतांना आकृष्ट करून घेण्याचे सामर्थ्य त्यात आहे. चार्वाकांच्या पायाभूत संकल्पना या अतिशय स्पष्ट आहेत. त्यात कोणतीही चलाखी व भ्रामकता नाही. चार्वाक दर्शना इतके सुस्पष्ट प्रामाणिक आणि परखड तत्वज्ञान धर्माच्या इतिहासात अन्य कोणतेही नाही. विश्व ज्या त्या वस्तूच्या ( वस्तू – द्रव्य, material )  स्वभावधर्मानुसार विकसित झाले. इथे देवाने विश्व वगैरे निर्माण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.


" ईश्वर अभावात् , स्वभावेन इव "


देवाचे अस्तित्व, आत्म्याचे अस्तित्व, मृत्यूनंतरचे पारलौकिक जीवन, पुनर्जन्म, कर्मकांड या सर्व कल्पनांना चार्वकांनी एकाच वेळी नाकारले आहे. असे करण्याचे कारण त्यांचे काही मुलभूत प्रश्न. ज्यांची तर्कशुद्ध व विज्ञाननिष्ठ उत्तरे देणे आजही ईश्वरवादी लोकांच्या आवाक्याच्या बाहेरचे आहे. जमल्यास वाचकांनी कमेंट मध्ये प्रयत्न करून पाहावा.


१.     ईश्वरानं विश्व निर्माण केलं तर त्याला कोणी निर्माण केलं ?
२.    जर ईश्वर स्वयंभू असेल तर विश्व का स्वयंभू नसावं ?  
३.    ईश्वर जर निर्गुण-निर्विकार तर त्याला विश्व निर्माण करण्याची इच्छा मुळात का झाली ?
४.   इच्छा आली की आसक्ती आली, आसक्ती आली की बंधन येतं, मग ईश्वर अमर्याद स्वतंत्र कसा असेल
५.   आणि जर तो अमर्याद स्वतंत्र नसेल तर तो ईश्वर कसला ?





या तीक्ष्ण आणि भेदक प्रश्नांपुढे चैतन्यवाद्यांची मती कुंठीत होणे साहजिक आहे. मुळात जगातील सर्वच धर्म कल्पितांवर आधारलेले असतात. सामान्यांच्या गळी मोठ्या प्रमाणावर धर्मकल्पना उतरवण्यासाठी ते आवश्यकही असाव कदाचित. तुमचा येशू कुमारी मातेच्या पोटी जन्मला हे कसे शक्य आहे ? मेडिकल सायन्स च्या नियमाविरुद्ध आहे हे, किंवा मृत्यूनंतर देखील तो परत आला हे असंभव आहे, तो पाण्यावरून चालला हे भौतिकशास्त्राच्या विरुद्ध आहे असा वाद आपण ख्रिश्चन धर्मीयांशी घातला तर ते चिडणे आणि अश्या प्रश्नांची तर्क दृष्ट्या समाधानकारक उत्तरे त्यांच्यापाशी नसणे हेही स्वाभाविक आहे . न्युटन, ग्यालिलिओ, लिओनार्दो अश्या ख्रिश्चन धर्मपरंपरांना धक्का देणा-या पाश्चात्य जडवादी शास्त्रज्ञांना चर्चने दिलेला त्रास सर्वश्रुत आहे. किंवा इस्लाम धर्मियांना महंमद हा मोरासारख्या दिसणा-या स्त्रीचेहरा असणा-या प्राण्यावर बसून अल्लाह च्या भेटीला जाणे अशक्य आहे. ही एक भ्रामक कथा आहे असे सांगितल्यास त्यांच्या धार्मिक उन्मादाचा सामना करावा लागेल.

तथापि चार्वकांनी अश्या कोणत्याही विरोधाची तमा बाळगलेली दिसत नाही. ईश्वरवादावर त्यांनी चढवलेला हल्ला हा कोणत्याही एका धर्माच्या विरोधात नाही. चार्वाकांना वैदिक धर्म विरोधी समजण्याचे कारण नाही. त्याकाळात हिंदुस्थानात एकमेव असणारा धर्म म्हणून त्यांचे विचार वैदिक धर्म परंपरांच्या अनुषंगाने आहेत इतकच. तात्कालिक दृष्टीने विचार न करता एक विशुद्ध जडवादी तत्वज्ञान म्हणून चार्वाक दर्शनाकडे पाहीले असता हा सर्वच धर्मातील ईश्वर वाद्यांवर सार्वत्रिक आणि सार्वकालिक स्वरूपाचा प्रखर हल्ला आहे हे ध्यानात येत.


भूतात्मकं जगत्। स्वभावं जगतः कारणं आहुः।
न परमेश्वरः अपि कश्चित्।
न पुनर्जन्मः न मोक्षः। मरणं एव मोक्षः।
न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकीक:।
नैव वर्णाश्रमादीनां क्रीयाश्च फलदायिका :।।


चार्वाकांनी एकूणच सर्व धर्मकल्पनांच्या मुळावरच घाव घातला आहे. ईश्वरच नसेल तर धर्माचे अस्तित्व ते काय उरले ? देवाचे अस्तित्व अमान्य करण्याचे कारण धर्म आणि देव यांच्या नावावर समाजात धर्ममार्तडांनी चालवलेले सामान्यांचे शोषण आणि समाजात वर्ण व्यवस्थेच्या नावावर माजवलेली असहिष्णू अवव्यवस्था हेच आहे हे वाचकांनी ध्यानात घ्यावे. शिवाय पारलौकीकाच्या मागे लागून लौकिक जीवनाकडे धर्माने फिरवलेली पाठ हे देखील महत्वाचे कारण आहे.


चार्वाक आणि ज्ञान संपादनाची प्रमाणे

    
 चार्वाकांना फक्त दोनच ज्ञान साधने मान्य आहेत. प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षनिष्ठ अनुमान. जे इंद्रियांना प्रत्ययास येते तेच प्रमाण बाकी सर्व खोटे आहे यावर चार्वाक ठाम आहेत. अनुमान प्रामाण्याच्या बाबतीत चार्वाक जास्त कठोर आहेत. कारण त्याला मर्यादा आहेत. प्रत्यक्षानिष्ठ अनुमान म्हणजे एखादी गोष्ट आता जरी प्रत्यक्ष दिसत नसली तरी नंतर का होईना तिचा पडताळा घेता आला पाहिजे. अनुमान हे अंतिम प्रमाण मानण्यास चार्वाकांचा नकार आहे कारण अनुमान आले कि काही प्रमाणात संदेह आला. कशाच्या तरी अनुभवाच्या शिदोरीवर कोणीतरी काही अनुमान करतो. उदा. जिथे अग्नी असते तिथे धूर असतो. हा आपला नित्याचा अनुभव आहे. यावरून जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे असा अंदाज बांधण्याकडे कल होतो. डोंगरावर धूर आहे म्हणजे तेथे अग्नी आहे असे अनुमान काढता येईल. आणि असे अनुमान फसन्याचीही शक्यता असते. किंवा लोखंड तप्त असते तेव्हा त्यात अग्नी विद्यमान असतो परंतु त्यातून धूर निघत नाही. अनुमान प्रामाण्य अश्या प्रकारे चार्वकांनी अंशत: बाद ठरवले आहे .


खेरीज चार्वाक संभवनीयतेचा देखील विचार करतात. प्रत्यक्ष व्यवहारात प्रत्येक ठिकाणी जे प्रत्यक्ष प्रमाण मागणे कदाचित व्यवहार्य ठरणार नाही. काही ठिकाणी आपणास अनुभवावर आधारित गृहीतके विचारात घ्यावी लागतात. अनुमान म्हणजे जास्तीत जास्त संभवनीय असलेले सत्याच्या जवळ असलेले प्रमाण आहे. इथे आपल्याला चार्वाकांचा वैज्ञानिक दृष्टीकोन प्रत्ययास येतो. विज्ञानामध्ये आज प्रस्थापित झालेला सिद्धांत उद्या नवीन संशोधनाच्या आधारे कोणीतरी खोटा पाडू शकत. आज जी गोष्ट विज्ञानाधारे सत्य म्हणवते ती उद्या बदलू शकते. शेवटी सत्य म्हणजे तरी काय असते ?


सत्य म्हणजे एका अर्थाने टोकाची संभवनीयताच असते.

         


शब्द प्रामाण्य तर चार्वाक सपशेल नाकारतात. शब्द हे मुळात निरर्थक असतात. त्याचे रूढ अर्थ हे परंपरेने त्यांना चिकटलेले असतात. उदा. एका कालखंडात विशिष्ट अर्थाने वापरला जाणारा शब्द नंतरच्या काळात वेगळ्याच अर्थाने वापरला जातो अशी हजारो शब्दांची उदाहरणे आपणास भाषाशास्त्रज्ञ देऊ शकतील. शिवाय दुसरे कारण म्हणजे शब्द हे कोणीतरी उच्चारलेले असतात. नंतर कोणीतरी त्यांचे संकलन करते. (कोणीतरी त्यात भेसळ देखील करते.) इथ शब्द उच्चारणा-याची पात्रता काय ? संकलन करणा-याची पात्रता आणि हेतू काय ? हे वादग्रस्त प्रश्न आहेत. अपौरुषेय वेदांतील शब्द प्रमाण मानायचे झाले तर वेदात जर्भरी, तुर्भरी असे शब्द येतात. त्यांचा अर्थ कसा लावायचा व असे निरर्थक शब्द कसे प्रमाण मानावयाचे ? शिवाय यम आणि यमीच्या कथेचा (अभ्यासू वाचकांना ही कथा माहित असावी )  उल्लेख करून चार्वाक म्हणतात हे असले शब्दप्रामाण्य काय कामाचे ?
        

।। प्रत्यक्षं एव प्रमाणः  न कश्चित् आगमः ।।



चार्वाक आणि कर्मकांड



चार्वाकांच्या नास्तिक भासणा-या विचारधारेचे मूळ तात्कालिक समाजात देव आणि धर्म यांच्या नावाखाली लोकांची चाललेली पिळवणूक आणि शोषण हे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष देवाचे अस्तित्व नाकारणारे चार्वाक कर्मकांडावर किती कठोर टीका करत असतील याची कल्पना करता येते. चार्वकांचे उपलब्ध साहित्य कर्मकांडावर इतका करडा प्रहार करते तर त्यांचे जे साहित्य उपलब्ध नाही किंवा हेतुपुरस्पर अनुपलब्ध करण्यात आलेले आहे त्यात त्यांनी कर्मकांडाची कशी भंभेरी उडवली असेल याची देखील कल्पना येऊ शकते. चार्वाकांचा विशेष राग तत्कालिक यज्ञ पद्धतीवर व त्यात देण्यात येणा-या पशुबळीच्या प्रथेवर आहे. इथे त्यांचा एक प्रातिनिधिक श्लोक देतो जो संपूर्ण यज्ञविधीच्या फलव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उभे करतो.


पशुश्वेन्नीहत: स्वर्ग ज्योतिष्टोमे गमिष्यति ।
स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते ।।

अर्थात जोतिष्टोम यज्ञात मारलेले पशु जर स्वर्गात जातात तर यजमान स्वत:च्या पित्याला का यज्ञ वेदीवर बळी देत नाहीत.


मृतानामपि जन्तुनां श्राद्धं चेतृप्तीकारणम्
निर्वाणस्य प्रदिपस्य स्नेह: प्रज्वलयेच्छीखाम्

अर्थात जर मेलेल्या जीवांची तृप्ती श्राद्धाद्वारे होऊ शकत असेल तर तुपाने विझलेल्या दिव्याची ज्योतही मोठी होईल.




स्वर्गस्थिता यदा तुप्तीम् गच्छेयुस्तत्र दानत:
प्रासादस्योपरीस्थानामत्र कस्मान्न दीयते

अर्थात भूलोकात केल्या दानामुळे जर स्वर्गात असलेल्या पितरांची तिथल्या तिथे तुप्ती होत असेल तर इमारतीत वरच्या मजल्यावर राहणा-या लोकांना अन्न येथे खालच्या मजल्यावर का देत नाहीत ?



ततश्च जीवनोपायो ब्राह्म ब्राह्मनैविहीस्त्विह
मृतांनां प्रेतकार्याणि न त्वन्यद्विद्यते क्वचित्

अर्थात ब्राह्मणांनी स्वत:च्या उपजीविकेसाठी योजलेले हे सर्व उपाय आहेत अन्यथा इथे मेलेल्यांसाठी प्रेतकार्ये कदापी अस्तित्वात नसती.

उपरोक्त श्लोकांवरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल की चार्वाक म्हटले की धर्ममार्तंड का इतके हादरतात , चार्वाक दर्शन खोटे , दांभिक आणि भोगवादी आहे असे ठरवण्याची त्यांची का इतकी धडपड असते , का बहुतांश पुराणे आणि धर्मग्रंथात चार्वाकांची इतकी निंदा केली गेली आहे ? चार्वाकानी ज्या कल्पितांवर धर्माचा पाया रचला गेला आहे  त्या सगळ्या  कल्पितांनाच समूळ हादरा दिला आहे. धर्माचे स्वयंघोषित ठेकेदार आणि धर्म आणि धर्म कल्पना यात हितसंबंध गुंतलेले प्रस्थापित शोषणकर्ते यांच्या मुळावरच चार्वकांनी आपल्या तत्त्वज्ञानातून घाव घातला आहे.

चार्वाक मत जनसामान्यांमध्ये का रुजू शकल नाही ? चार्वाक मत दडपून टाकण्याचे देश काळ आणि समाज यांच्यावर कोणते दुष्परिणाम झाले याचा वेध घेऊ पुढील लेखात ...

                 सुहास भुसे.
               ( रोखठोक साठी )  


 या लेखमालेतील इतर लेख –