About

Thursday 15 November 2012

चार्वाक दर्शन -४ : चार्वाक दर्शन नाकारण्याचे दुष्परिणाम


चार्वाक हे काळाच्या खूप पुढे असणारे महान वैज्ञानिक विचारवंत होते. आज २१ व्या शतकात , विज्ञान युगात या ब्लॉग वर आपण चार्वाक तत्वज्ञानावर चर्चा करत आहोत. तथापि परिस्थिती अशी आहे की आज देखील बहुसंख्य लोकांना चार्वाकांचे विचार पचवणे अवघड जात आहे .या विचारांमुळे धक्का बसलेल्या धर्मश्रद्ध लोकांच्या अनेक प्रतिक्रिया अनुभवण्यास मिळाल्या. चार्वाकांचे रोखठोक विचार त्यांच्या धर्म कल्पनांच्या मुळावरच घाव घालणारे असल्याने हे अपेक्षित आणि साहजिक देखील होते . तथापि येथे विचार करण्याची बाब म्हणजे आज २१ व्या शतकात हे विचार पचवण्यास कठीण वाटत असतील तर ज्या काळात चार्वाकांनी हे विचार मांडले त्या पुरातन काळात इतके प्रखर विचार मांडणे किती धाडसाचे असेल. इ.स. ९ व्या शतकापासून ते आजपर्यंत च्या जातीयवाद, वर्णद्वेष, वर्णवर्चस्व, अंधश्रद्धा आणि या सर्वांना पोषक धर्म तत्वज्ञान समाजात रुजवणारे स्वघोषित धर्ममार्तंड यांनी थैमान घातलेल्या काळात चार्वाक दर्शनाला किती प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला असेल. प्रत्येक भल्या बु-या मार्गाचा हे तत्वज्ञान लोकांमध्ये रुजू नये, दडपले जावे यासाठी वापर करण्यात आला असेल. त्याची परिणीती म्हणजे आज चार्वाक दर्शनाचा एकही प्रमाणित ग्रंथ उपलब्ध नाही. चार्वाक विचार विकृत स्वरुपात लोकांपुढे आणून त्यांच्यावर भोगवादाचा शिक्का कसा मारण्यात आला ते त्यांच्या एका श्लोकाच्या उदाहरणासहित आपण मागील या लेखात पाहिलेच आहे. त्यांच्या अनुयायांवर हिंसक हल्ले करण्याचे प्रकार देखील बरेच घडले असावेत. चार्वाकांचा सम्राट युधिष्टरासमोर खुन करण्यात आला. असा संदर्भ ब-याच ठिकाणी वाचनात येतो. याविषयी अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला असता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती मिळते . काही ठिकाणी महाभारतातील युधिष्ठराच्या समोर एका चार्वाकाचा खुन करण्यात आला पण तो या तत्वज्ञानाचा प्रणेता चार्वाक नसून या परंपरेतील हे तत्वज्ञान अनुसरणारा दुसरा एक चार्वाक होता अशी नोंद आढळते तर काही ठिकाणी चार्वाकांचा खुन युधिष्ठरासमोर करण्यात आला पण हा महाभारतातला युधिष्ठर नव्हे तर याच नावाचा त्याच्याहून पुरातन काळातला एक दुसरा सम्राट होता अशी नोंद आढळते. या नोंदी वेगवेगळ्या असल्या तरी देखील अनेक ठिकाणी अशी चर्चा असणे म्हणजे असा काहीतरी प्रकार निश्चितच झाला असावा असे मानण्यास जागा आहे .


चार्वाक दर्शन हा एकमेव नास्तिक संप्रदाय नाही  

   

देवाचे अस्तित्व नाकारणारा चार्वाक हा एकमेव नास्तिक संप्रदाय आहे असा जो समज करून देण्यात आला आहे तोदेखील असाच पूर्णपणे चुकीचा आहे. महर्षी कपिल यांचे सांख्य दर्शन , महर्षी गौतम यांचे न्याय दर्शन , महर्षी कणाद यांचे  वैशेषिक , महर्षी जैमिनी यांचे (पूर्व) मीमांसा दर्शन हे देखील निरीश्वरवादीच होते तथापि त्यांनी वेदांची निंदा न केल्याने त्यांना आस्तिक-नास्तिक या श्रेणीमध्ये समाविष्ट केलेल आहे. नास्तिक या शब्दाचा अर्थ सहसा आपण जो देवाचे अस्तित्व मानत नाही असा घेतो. पण येथे सुज्ञ वाचकांच्या लक्षात आलेच असेल की नास्तिक या शब्दाचा खरा अर्थ देव न मानणारा नसून वेदप्रामाण्य न मानणारा असा आहे. बौध्द आणि जैन यांची मुल तत्वज्ञाने देखील निरीश्वरवादी-जडवादीच होती. चार्वाकांसारखेच त्यांनी देखील वेदप्रामाण्य नाकारल्याने त्यांचा देखील समावेश नास्तिक या श्रेणीत करण्यात आला आहे. जैन आणि बौद्ध स्वत:ला स्वतंत्र धर्म मानत असले तरी स्वत:ला भारतीय परंपरांचे उत्तराधिकारी मानणारे मात्र त्यांना हिंदू धर्मातील एक तात्विक विचारधारा मानतात. असो...चार्वाक तत्वज्ञान हे वेदप्रामाण्य मानणे हा ज्यांच्या अस्तित्वाचा आधार आहे त्यांनी किती व कसे  बदनाम केले आहे आणि हेतुपुरस्पर त्याला दडपून त्याला जनाधारापासून कसे वंचित ठेवले आहे याची पुरेपूर कल्पना वाचकांना या समग्र लेखमालेत केलेल्या विस्तृत विवेचनावरून आणि परिस्थितीजन्य पुराव्यांवरून लक्षात आलेच असेल.


चार्वाक तत्वज्ञानाची अशी गळचेपी करण्याचे भीषण दुष्परिणाम पुढील काळात घडले. भारतीय समाजाची उत्कर्षाकडून अधोगतीकडे वाटचाल सुरु होण्याचे प्रमुख कारण चार्वाक किंवा लोकायत दर्शनाची ही धर्माच्या दलालांनी केलेली दडपणूक हे आहे. यासंबंधी या लेखात सविस्तर चर्चा करू .



चार्वाक दर्शनाच्या गळचेपीचे दुष्परिणाम


भारतीय प्राचीन प्रगत विज्ञानाची महती सर्व जगाने मान्य केली आहे. अगदी आज वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत अश्या पाश्चात्य जगाने देखील भारतीय प्राचीन वैज्ञानिक परंपरांचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे. आपल्या प्राचीन ग्रंथात आढळणा-या आपल्या वैज्ञानिक प्रगत तंत्रज्ञानासाबंधी आगामी काही दिवसांत एक सविस्तर लेख लिहिणारच आहे. . वैशेषिक दर्शनाचे प्रणेते महर्षी कणाद,  चरक, ब्रह्मगुप्त,  आर्यभट्ट, भास्कराचार्य अशी अनेक वैज्ञानिक-गणितज्ञ-खगोलतज्ञ व वैज्ञानिक विचारांच्या दार्शनिकांची मोठी परंपरा या संस्कृती मध्ये रुजू पाहत होती. तथापि चार्वाक दर्शनाच्या दडपणूकीमुळे या सर्व परंपरा खंडीत झाल्या. जडवाद किंवा इह वाद या वैज्ञानिक विचारसरणीचा पाया आहे. मनुष्याचे ऐहिक जीवन सुखी आणि समृद्ध करणे हे विज्ञान वा तंत्रज्ञानाचे प्रमुख ध्येय असते. तथापि उत्तर काळातील वैदिक धर्म

ब्रह्म सत्य I जगत् मिथ्या II 

या प्रमुख तत्वावर आधारलेला आहे. या धर्माने ऐहिक जीवनाकडे पाठ फिरवली. जीवन हे क्षणभंगुर आहे अशाश्वत आहे त्यामुळे मोक्ष, स्वर्ग हेच मानवाचे अंतिम जीवन ध्येय असले पाहिजे असले भाकड तत्वज्ञान लोकांमध्ये रुजवण्यात आले. लोकांना वास्तव जीवनाकडे पाठ फिरवण्यास व मरणोत्तर जीवनास अधिक महत्व देण्यास शिकवणे हा धर्माचा एक प्रधान हेतू बनवण्यात आला. समाजामध्ये कष्ट करणारे, सृजनात्मक कर्म करून समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे (हे जडवादी होत हे ओघानेच आले ) आणि कोणतेही कष्ट न करता त्यांच्या श्रमावर गुजराण करणारे धर्ममार्तंड ( आणि हे अध्यात्मवादी ) असे दोन वर्ग तयार झाले. श्रम करणा-या या वर्गाला विचार करण्याचा अधिकार नव्हता, विचार मांडण्याचा अधिकार नव्हता हे स्पष्ट आहे . पूर्वजन्मीच्या पापाचे फळ म्हणून कष्ट साध्य जीवन जगावे लागत आहे आणि जे धनिक आहेत त्यांचे सुख हे त्यांच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईचे फळ आहे असे समाज मनावर बिंबवले गेल्याने या व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची मानसिकताच हळू हळू नाहीशी झाली . भारतीयांमध्ये उत्तर काळात दिसून येत असलेल्या आणि आज तागायत टिकून राहिलेल्या पराभूत मानसिकतेची बीजे याच काळात रोवली गेली नव्हे हे बीजारोपण या धर्माच्या दलालांनी स्वत:चे श्रेष्ठत्व जपण्यासाठी जाणीवपूर्वक केले.














पृथ्वी गोल आहे असे सांगणा-या कोपर्निकस किंवा ग्यालिलिओसारखे बायबल मधील कल्पनांना धक्का देणारे वैज्ञानिक यांचा चर्च ने केलेला छळ सर्वश्रुत आहे तथापि तुलनेने प्राचीन भारतीय परंपरांचे श्रेष्ठ्व सांगण्यासाठी इथे एक उदाहरण द्यावेसे वाटते. आर्य भट्टाने वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी ई स ४९९ साली आर्यभट्टीय ग्रंथ नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात आर्य भट्टाने कोपर्निकस च्या कितीतरी आधी पृथ्वी गोल आहे व तिचा परीघ अंदाजे २४८३५ मैल आहे असे सांगितले होते. तसेच चंद्र आणि सूर्य यांच्या मध्ये पृथ्वी आल्याने चंद्र ग्रहण होते हे ही त्याने सांगितले होते . हे सिद्धांत पुराणातील पृथ्वी सपाट असून शेषनागाच्या फण्यावर तोलली गेली आहे, राहू केतू नावाचे राक्षस चंद्र आणि सूर्य यांना गिळंकृत करतात त्यामुळे ग्रहणे होतात अश्या भाकड कथांना छेद देणारे होते. तथापि त्या भारतीय संस्कृतीच्या सुवर्ण काळात त्यांचा धर्मद्रोही म्हणून छळ वगैरे झाला नाही. उलट त्यांच्या या कार्यावर खुश होऊन तात्कालिक गुप्त घराण्यातील बुद्ध गुप्त नावाच्या सम्राटाने त्यांचा सन्मान करत त्यांना नालंदा विश्वविद्यालयाचे प्रमुख बनवले.  तथापि उत्तर वैदिक धर्माचा इतिहास इतका उदार दिसत नाही याचे प्रमुख कारण ई.स. ९ व्या शतकात शंकराचार्यांकडून वैदिक धर्माची जी पुर्नरचना करण्यात आली त्यात धर्माचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकण्यात आले. पूर्व काळातील धर्माचे मुक्त विचारांचे व्यासपीठ अनुपलब्ध करण्यात आले. हिंदू धर्म पूर्णपणे बंदिस्त करण्यात आला. जडवादाची पाळेमुळेच पूर्ण पणे उखडून टाकण्यात आली. धर्म मोक्ष, निर्वाण, स्वर्ग असल्या कल्पनाच्या दावणीला बांधण्यात आला. वास्तव जीवनाकडे पाठ फिरवून मरणोत्तर जीवनाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. याचा परिणाम विकासावर झाला. पराजय, गुलामगिरी आणि राष्ट्रीय भावनेचा संकोच हे सर्व अरिष्ट त्यामुळेच हळूहळू हिंदुस्थानावर कोसळत गेले. याचे परिणाम आपण आजदेखील भोगत आहोत.






ज्याची जपणूक करावी ज्याचे रक्षण करावे ज्याचा विकास करावा असे काहीही नाही अशी एकदा समाजाची मानसिकता तयार झाली की कृती करण्याचे काही कारणच उरत नाही.

आणि समाजाची ही मानसिकता आजही गेलेली नाही. आज सर्वत्र माजलेला अनाचार, भ्रष्टाचार, नेत्यांचा निर्लज्ज कोडगेपणा आणि जनतेची लाचार असहाय्यता याची मुळे चार्वाक तत्वज्ञान पर्यायाने जडवाद नाकारण्यात आहेत.

चार्वाकांचा जडवाद जर टिकला आणि वाढला असता तर समाजाची जीवनासक्ती वाढली असती. जीवन सुंदर आहे, ते आणखी सुंदर बनवूया ही वृत्ती वाढली असती. जीवन हे एकमेव आहे आणि ते मुल्यवान आहे, ते मिथ्या नाही ते सत्य आहे. मृत्यू म्हणजे जीवनाचा शेवट. त्यानंतर काही नाही. न पुर्नजन्म आहे न स्वर्ग-नरक. त्या शेवटच्या क्षणापर्यंत या जीवनातील क्षण न क्षण आनंदात वेचुया. जीवन परस्पर साहचर्याने सुखनैव व्यतीत करुया. ते अधिकाधिक आनंदी आणि सुंदर बनवण्यासाठी प्रयत्नशील राहूया. हे लोकायत जीवनाभिमुख तत्वज्ञान वाढीला लागले असते. आणि पर्यायाने जीवन अधिकाधिक सुखकर करणे हा प्रमुख उद्देश असणा-या ज्ञान आणि विज्ञानाच्या परंपरादेखील निर्माण झाल्या असत्या, रुजल्या असत्या, वाढल्या असत्या.   


जडवाद नाकारल्याने गुलामगिरी, पराजय


भारतात लोकायत मताचा पूर्व काळात होत होता तसाच सन्मान उत्तर काळात देखील होत राहिला असता तर आपली ती प्राचीन वैभवशाली संस्कृती लयाला न जाता सर्व जगाला आपल्या वैभवाने दिपवून टाकत आजही टिकून राहिली असती . माणसांची जीवनासक्ती कमी झाल्याने पर्यायाने सर्वच गोष्टींबद्दल नकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला. आत्माभिमानाचा –हास झाला, राष्ट्रप्रेमाला ओहोटी लागली. या पराभूत मानसिकतेनेच आपणास मुस्लीमांपुढे गुढगे टेकावे लागले, शतकानुशतके गुलामगिरीची जोखडे वाहावी लागली.   

जडवाद नाकारल्याने भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा विकास खुंटला . पाश्चात्य देशात मात्र –हेनेसान्स काळात प्राचीन कलांच्या उन्नयनातून जडवादाचे पुनरज्जीवन झाल्याने विकासाची द्वारे खुली झाली. मायकेल एंजोलो. कार्वाज्जीवो , बेर्निनी, लिओनार्दो द व्हीन्सी अश्या अनेक महान कलावंतांच्या कलाकृतीतून जीवनाभिमुख तत्वज्ञानाची पर्यायाने जडवादाची जोपासना व विकास झाला. परिणामत: पाश्चात्य देशांनी विज्ञान तंत्रज्ञानात पुढची मजल मारली. भारतीयांचे मागासलेपण आणि पराभूत मानसिकता शिवाय आत्माभिमान, राष्ट्राभिमान यांचा अभाव  यामुळे सबंध भारत गुलामगिरीच्या खाईत लोटणे त्यांना फारसे कठीण गेले नाही.


शतकानुशतके अन्याय करण्यात आलेल्या लोकायत तत्वज्ञानाची वाचकांना एक ओझरती ओळख करून द्यावी. त्याची महती आणि ते नाकारले गेल्याने झालेले  दुष्परिणाम यांची चर्चा करावी हा या लेखमालेचा प्रमुख हेतू होता. हिंदुस्तानातील अनादी अनंत सांकृतिक विचारधारा  असलेल्या हिंदू धर्माचे महान सुपुत्र असणा-या या लोकायत किंवा चार्वाक तत्वज्ञानाचे प्रणेते महर्षी चार्वाक यांना या लेखमालेच्या रुपात ही छोटीशी आदरांजली ....!!!


              -सुहास भुसे

          (रोखठोकसाठी -१०-११-२०१२)  

या लेखमालेतील इतर लेख 









3 comments:

  1. एकदम मस्त लेख मास्तर . चर्वाक दर्शन घडवून तुम्ही पाळमुळं हलवून टाकली . नवीन माहिती मिळाली धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद बाबू घाग जी
      चार्वाक दर्शन हा या दांभिक लोकांवरचा सणसणीत हल्ला आहे
      चार्वाक दर्शन हे ख-या अर्थाने जीवन दर्शन आहे .

      Delete
  2. फारच छान लेख साहेब .... अजून येऊ द्या ......आपली मते १००% जुळतात असे मला वाटु लागले आहे... पुण्याला येणे झाले तर अवश्य भेटा

    ReplyDelete