About

Friday 7 August 2015

वादग्रस्त इतिहासकार पुरंदरे : अनुत्तरित प्रश्न व आक्षेप भाग 1

     ब मो पुरंदरे यांना जो विरोध होता व होत आहे तो जेम्स लेन प्रकरणापासून अधिक तीव्र झाला आहे. तो आजचा नाही तर मागील अनेक वर्षांपासून होत आहे. महाराष्ट्राच्या समतेच्या सामाजिक चळवळीत अग्रणी असणाऱ्या जवळ जवळ सर्व विचारवंतानी ब मो पुरंदरे यांच्यावर टीका केली आहे. अनेक इतिहासकरांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. अश्या काही निवडक लोकांची यादी त्यांची वक्तव्ये संदर्भांसहित पाहू . म्हणजे हा विरोध मंबाजी ब्रिगेडवाले आवई उठवत आहेत त्याप्रमाणे फक्त काही मुठभर लोक आणि जितेंद आव्हाड करत आहेत की सर्वच स्तरातून त्यांना सर्वंकष विरोध आहे हे ध्यानात येईल.

बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांच्याबद्दल विविध मान्यवरांचे  मत

1) त्र्यं. श. शेजवलकर यांनी 'ब मो पुरंदरेचे राष्ट्रीय स्वयंसेवकी विचार ' हा लेख लिहून पुरंदरेच्या मानसिकतेवर प्रकाश टाकून त्यांच्या हेतू बद्दल शंका व्यक्त केली आहे.(सं.- शेजवलकर त्र्यं. श.पूर्वोक्त पान ५०३)

2) "शिवाजी महाराजांसोबत नुर बेग ,दौलतखान, सिद्दी हीलाल, मदारी मेहतर, इब्राहीम खान ही मंडळी होती. मात्र बाबासाहेब पुरंदरेच्या तोंडात यांचे कधी नाव आलेच नाही. पैसे मिळतील म्हणून जसा मुद्रांक छापायचा प्रकार जसा त्याला संरक्षण देणाऱ्याच्या अंगावर उलटला इतिहास लेखनात झालेले प्रकारही असेच उलटतील शिवाजी महाराजांचा केवळ हिंदुत्ववादी म्हणून प्रचार केला गेल्याने इतिहासकारांनी तिरप्या पद्धतीने बांधलेली हि चुकीची भिंत आता त्यांच्यावरच कोसळत आहे, अशा गोष्टी दूर केल्याशिवाय आता आपल्याला महासत्ता होता येणार नाही. "
- ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त भालचंद्र नेमाडे( सं.- ‘चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यावर भिंत कोसळत आहे 'लेख दैनिक लोकसत्ता ,दिनांक १ जाने 2004)

3) "आता मला लोक विचारतात, काय हो पुरंदरेच्या शिवचरित्र बद्दल तुमचे काय मत आहे ? त्याला मी एकच उत्तर देतो. पुरंदरे स्वतः म्हणतात कि 'हे शिवचरित्र म्हणजे इतिहास न्हवे. ऐतिहासिक साधनावर आधारलेली बखर आहे, आणि मी शाहीर आहे .' असे असून सुद्धा आपण त्यांच्या मागे लागतो इतिहाससंशोधक काय म्हणतात म्हणून . हा त्यांच्यावर अन्याय आहे " अश्या शब्दात सेतू माधवराव पुरंदरेंचा उपहास करतात.
-सेतू माधवराव पगडी (सं.- पगडी सेतू माधवराव पूर्वोक्त पान 11)

4) "एका बाजूला शिवाजी महाराजांना डोक्यावर घेवून भाबड्या शुद्रातीशुद्राना नादाला लावायचे आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांना बदनाम करायचे. यात सर्वात वाकबगार शिवशाहीर पुरंदरे आहेत "
-प्राच्यविद्यातज्ञ कॉ. शरद पाटील (सं. -शिवाजीचे पितृत्व व अब्राम्हनी विमोचन संघर्ष शोधनिबंध पान ५)

5) पुरंदरेचे शिवचरित्र हे भटी शिवचरित्र आहे.
-प्रबोधनकार ठाकरे
शिवाय बाळासाहेब ठाकरे यांचा देखील पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देण्यास विरोध होता. त्यांनी पुरंदरेंची खिल्ली उडवलेले वीडियो यु ट्यूब वर उपलब्ध आहेत.

6) जिजाऊचे चारित्र्यहनन करणाऱ्या जेम्स लेन ने आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाबासाहेब पुरंदरे यांचे आभार मानले आहेत मात्र तरीही पुरंदरे यांनी त्यावर आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देण्यात येऊ नये.
-डॉ जयसिंगराव पवार (सं.- म टा वृत्त १४ जून १५ )

 7) पुरंदरे यांना पुरस्कार देणे म्हणजे पुरंदरेलिखित विकृत इतिहासाला अधिकृत करण्याचा प्रकार आहे. यासारखा दुसरा राष्ट्रीय गुन्हा नाही.
-जेष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव(सं.- म टा वृत्त १४ जून १५ )

8)शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा इतिहासकारांनी बाजार मांडला असून त्यांनी इतिहासाचेच विकृतीकरण केले आहे.बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाचा गळा घोटला आहे.
-रघुनाथराजे निंबाळकर

 (पैकी काही माहिती संकलन साभार प्रकाश पोळ यांच्या ब्लॉगवरून )

     या सर्व मान्यवरांच्या प्रतिक्रिया शांतपणे वाचल्या तर पुरंदरे यांचा वकूब व वृत्ती कळून येईल. आणि हा लढा एकट्या जितेंद्र आव्हाड यांचा नाही हे ही पटेल.

बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांच्यावरचे आक्षेप 

     पुरंदरे यांच्यावर अनेकांनी अनेक आक्षेप घेऊन त्यांच्या विकृतीबद्दल निषेध नोंदवला आहे. माझ्यामते त्यातले निवडक व महत्वाचे आक्षेप पुढील प्रमाणे आहेत.

१ . शिवरायांच्या जन्मतारखेबाबत मुद्दाम हेतूपुरस्पर घोळ घालणे.
२ . शिवरायांना नसलेली गोब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली चीटकवणे
३ . जेम्स लेन ला मदत करणे कौतुक करणे .
४ . राजमाता जिजाऊची बदनामी करणे
५ . रामदासाला स्वराज्यप्रेरक व गुरु दाखवणे.
६ . दादोजी सारख्या सामान्य आदिलशाही चाकराला प्रचंड वलय प्राप्त करून देऊन त्यांनाही शिवरायांचे गुरुपद चिटकवने
७ . मराठा सरदारांचे चुकीचे एकांगी चित्र रंगवून त्यांच्यावर विकृत टीका करणे.
८ . शहाजीराजांच्या स्वराज्यप्रेरक या भुमिकेकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करणे.

     यातल्या एकेका मुद्द्याची इथे सविस्तर चर्चा करू .

१ . शिवरायांच्या जन्मतारखेबाबत मुद्दाम हेतूपुरस्पर घोळ घालणे

     महाराष्ट्राच्या  इतिहासात ज्यांच्या जन्मतारखेविषयी वाद आहेत असे किती महापुरुष दाखवता येतील ?
छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर एकही नाही. ठीक आहे . काही कारणाने हा वाद निर्माण झाला. पण महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या एका प्रथितयश इतिहासकारांच्या समितिने निर्विवादपणे साधार एक तारीख जाहिर केल्यावर तर हा वाद मिटायला काही हरकत नव्हती. पण पुरंदरे बेडेकर मेहेंदळे यांनी मुद्दाम हा वाद मिटू दिला नाही..आणि शिवप्रेमी मावळ्यांमध्ये फुट पाडण्याचा जघन्य अपराध केला.
अनेक दिवस सुरु असलेला हा वाद एकदाचा संपवुन टाकावा म्हणून महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ साली वा. सी. बेंद्रे, न. र. फाटक, ग. ह.खरे, द. वा. पोतदार, डॉ. अप्पासाहेब पवार, ब.मो.पुरंदरे यांची एक समीती स्थापन केली. शिवजयंतीची तारीख निश्चीत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली. या समितिने या कामाला किती वेळ घ्यावा..अंदाज करा...तब्बल 33 वर्षे. 33 वर्षानी  शेवटी त्यांनी १९ फेब्रुवारी १६३० ही तारिख शासनाला सादर केली. १९ फेब्रुवारी ही तारिख जाहीर झाली रे झाली की लगेच कालनिर्णयवाले जयंत साळगांवकर यांनी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करावी असे आवाहन केले.त्यासाठी वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या.त्यांनी तिथीचा आग्रह धरताच पुरंदरे, बेडेकर, मेहेंदळे यांनी तिथी समर्थनार्थ साळगांवकरांना पत्रे दिली.

ब मो पुरंदरे यांचा माफीनामा

पंढरपुर येथे अमरजीत पाटील यांच्या आंदोलनानंतर हा गुन्हा आपण केला आहे व तारीख आणि तिथी यात शिवभक्तांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे अशी कबूली देऊन स्व हस्ताक्षरात पुरंदरे यांनी माफीनामा लिहून दिला. पण वाद पेटला तो पेटलाच..आज ही हा वाद सुरूच आहे.

२ शिवरायांना नसलेली गोब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली चिटकवणे 

     छत्रपती शिवाजी महाराज म्हटल की सामान्य माणसाच्या तोंडात पहिली आपसूक गोब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली येते. इतका ग्लोबेल्सप्रचार या गोब्राह्मण प्रतिपालकचा झाला आहे. वस्तुतः एकाही ऐतिहासिक कागदपत्रात शिवाजी महाराज स्वत:ला गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेतात असा पुरावा नाही. या बिरुदावलीसाठी पुरंदरे जो पुरावा देतात ( कागदपत्रे ५३४ व ५३७ ) त्यापैकी ५३७ मध्ये तर गोब्राह्मण प्रतिपालक हा उल्लेखच नाही. याचा अर्थ असा की याचा खोटा संदर्भ उगीच ढापून दिला आहे. आणि कागदपत्र ५३४ मध्ये जो उल्लेख आहे त्यात शिवाजी महाराज अस स्वत:ला म्हणवून घेत नाहीत तर त्यांच्याकडे दक्षिणा मागायला गेलेला एक ब्राह्मण त्यांना गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणत आहे. इतरांनी म्हणणे आणि महाराजांनी स्वत:ला तसे म्हणवून घेणे यात फरक आहे. पुरंदरे शाहीर नसताना स्वत:ला शिवशाहिर म्हणवुन घेतात.  सर्वच जण अस करतात अस नाही :)

३ . जेम्स लेन ला मदत करणे कौतुक करणे .

     यावर खुप लिहिल गेल आहे. पण यात चार महत्वाच्या गोष्टी आहेत.

* पुरंदरे यांना लेन पुस्तकासंदर्भात माहिती घेण्यासाठी भेटला होता.
* पुस्तकाच्या शेवटी लेन ने पुरंदरेंचे आभार मानले आहेत.
* पुरंदरे यांनी 2003 साली सोलापूर जनता बँक व्याख्यानमालेत जेम्स लेनच कौतुक केल होत.
* आजवर एकाही व्यासपीठावरून इतके वाद होत असताना पुरंदरे यांनी लेन चा जाहिर निषेध केलेला नाही.


     पुरंदरे भक्त यावर दोन डिफेन्स देतात. एकतर त्यांनी लेन च पुस्तक प्रसिद्ध करु नये म्हणून ऑक्सफर्ड प्रेस ला लिहिलेल पत्र ..पण त्यात फारसा दम नाही. लेनच ज्या अर्थी ते कौतुक करतात त्याअर्थी हे पत्र म्हणजे प्रकरण अंगावर शेकल्यावर किंवा शेकु नये म्हणून घेतलेला सावध पवित्रा आहे हे लगेच कळुन येते.

     दूसरा डिफेंस असा की म्हणे ब्रिगेडनेच याची जास्त प्रसिद्धि करून बदनामी केली. हा हास्यास्पद युक्तिवाद आहे. ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर कधी न कधी त्यातील प्रक्षोभक मजकूर बाहेर येनारच होता. हे म्हणजे असे झाले एकजण खून करणार ..दूसरा त्याला हत्यार पुरवणार आणि तिसऱ्याने बोंब ठोकली म्हणून त्या तिसऱ्यालाच तुम्ही फासावर लटकवणार...

      क्रमश:
    -सुहास भुसे. 

बाळासाहेब ठाकरे
डॉ जयसिंगराव पवार
रघुनाथराजे निंबाळकर

3 comments:

  1. खूप काही माहिती मिळाली धन्यवाद

    ReplyDelete
  2. अतिशय छान माहिती

    ReplyDelete