About

Wednesday 12 June 2013

देवलचा पराभव



प्राचीन काळापासून हिंदुस्थान अनेक परकीय आक्रमकांच्या गुलामगिरीत खितपत पडलेला दिसून येतो. इतिहासाच्या पानापानावर लाजिरवाण्या पराभवांचे शिंतोडे आहेत. महमद कासिम पासून घोरीपर्यंत आणि बाबरापासून अब्दालीपर्यंत अनेकांनी हिंदुस्थानावर स्वारी केली. शक, हून, अरब, अफगाणी, इंग्रज, फ्रेंच, डच अनेक अनेक आक्रमक शतकानुशतके हिंदुस्थानाची लुट करत राहिले, हिंदुस्थानचे लचके तोडत राहिले. हिंदुस्थानाची अस्मिता, अभिमान यांच्यावर घाले घालत राहिले. काय कारण असावे बरे या शतकानुशतकांच्या पराभवांचे, गुलामगिरीचे ?

हिंदुस्थानी लोकांपेक्षा हे परकीय शूर होते ? पराक्रमी होते ? रणकुशल होते ? बुद्धिमान होते ? हिंदुस्तानच्या इतिहासाचा अगदी प्राथमिक अभ्यास केलेली व्यक्तीदेखील यापैकी एकाही प्रश्नाचे होय असे उत्तर देण्यास धजणार नाही. शौर्य आणि पराक्रम या हिंदुस्थानाच्या मातीमधून उगवत होता. बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता या हिंदुस्थानाच्या दावणीला बांधली गेली होती. हिंदुस्थानातील रणधुरंधरांच्या रण कुशलतेने साक्षात रणचंडीने अनेकदा आश्चर्याने तोंडात बोटे घातली असतील. पण तरीही पराभव आणि गुलामगिरी हिंदुस्थानच्या वाट्याला का बरे आली असेल ?

इतिहासतज्ञ याची अनेक कारणे सांगतील. हिंदुस्थान हा अनेक छोट्या छोट्या राज्यात विभागला गेला होता. इथ प्रबळ अश्या केंद्रीय सत्तेचा अभाव होता वगैरे वगैरे. तात्कालिक कारणे अनेक आहेत व ती खरीही आहेत. तथापि या सर्वांपेक्षा देखील इथल्या लोकांची फुटीर वृत्ती आणि धर्मभोळेपणा आणि नितीअनितीच्या भ्रामक कल्पना ही कारणे सार्वकालिक आणि प्राधान्याने विचार करावी अशी आहेत. इथला समाज हा एकसंध कधीच नव्हता. राज्याराज्यात असो वा जातीपातीत असो तो सदैव विभागला गेलेलाच होता. देवधर्म, जपजाप्य, व्रतवैकल्ये, स्नानसंध्या यात बुडून गेलेला होता. या सर्व गोष्टींनी हिंदुस्थानाचे अपरिमित नुकसान केले आहे . या सर्व गोष्टींमुळेच इथल्या लोकांमध्ये प्रबळ अशी राष्ट्रभावनाच कधी निर्माण होऊ शकली नाही हे हिंदुस्थानच्या गुलामगिरीचे आणि पराभवांचे सर्वात प्रमुख कारण आहे.

हिंदुस्थानातील लोकांच्या या देव-धर्म भोळेपणाच्या आणि नितीअनितीच्या फोल कल्पना, फालतू व्रताचार आणि कर्मकांडात गुंतून सर्वनाश ओढवून घेतलेल्या राज्यकर्त्यांच्या गाथा इतिहासात ढिगाने सापडतील. शरण आलेल्याला मरण नाही म्हणून घोरीला १६ वेळा पराभूत करून २ वेळा जीवदान देणारा पृथ्वीराज चौहान, अल्लाउद्दीन खिलजीने स्वारी केली तेव्हा ससैन्य तीर्थयात्रेला गेलेला यादवांचा सेनानी आणि युवराज शंकरदेव आणि चातुवर्यचिंतामणी ग्रंथ लिहीत बसलेला यादवांचा प्रधान हेमाद्री ही काही ठळक उदाहरणे. स्नानसंध्या आणि जपजाप्य यात गुंग होऊन राज्य कारभाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या थोरल्या माधवराव पेशव्यांची रामशास्त्री प्रभून्यांनी कानउघडणी करून त्यांचे लक्ष परत राज्यकारभाराकडे वळवल्याचा किस्सा तर सर्वश्रुत आहेच.

इ.स.च्या सातव्या शतकात प्रजेचा धर्म भोळेपणा आणि देवावरील आंधळी श्रद्धा याने एका पराक्रमी राजाचा कसा घात केला याचा एक डोळ्यात अंजन घालणारा  प्रसंग आढळतो. त्या काळात सिंध प्रांतात चच नावाच्या एका पराक्रमी राजाचा दाहर नावाचा तितकाच पराक्रमी पुत्र राज्य करत होता. त्याची राजधानी होती देवल. या देवल शहरात हिंदूंचे एक प्रसिद्ध मंदिर होते. या मंदिराच्या गगनचुंबी कळसावर एक भलामोठा भगवा ध्वज मोठ्या डौलात सदैव फडकत असे. इथल्या देवावर प्रजेची अतोनात श्रद्धा होती तसेच या मंदिराविषयी आणि या ध्वजाविषयी एक अंधश्रद्धाळू आख्यायिका लोकांमध्ये प्रचलित होती कि जोवर हा ध्वज उभा आहे तोवर आपल्या राज्यावर कोणतेही संकट येऊ शकत नाही. जोवर हा ध्वज उभा तोवरच आपले राज्य उभे. देवल च्या प्रजेची ही देवभोळी कल्पना आणि जोवर रोम उभे तोवर जग उभे ज्यादिवशी रोम पडेल त्यादिवशी जगबुडी होईल ही रोमवासियांची फोल कल्पना यात किती साम्य आहे पहा ना..

इ स ७१२ मध्ये अरबी आक्रमक महंमद कासिम याने सिंध वर स्वारी केली. त्याला त्याच्या गुप्तचरांकडून ही ध्वजाची आख्यायिका समजली. त्याने प्रजेच्या या वेडगळ अंधश्रद्धेचा फायदा उठवून हे राज्य स्वस्तात जिंकायचे ठरवले. त्याने आपल्या तोफा सर्वप्रथम या मंदिरावर डागून हे शिखर आणि त्यावरील ध्वज प्रथम उध्वस्त केला. आपला शकुनी ध्वज पडलेला पाहताच सैनिक आणि प्रजेमध्ये हा:हा:कार माजला. आपला पराभव आता निश्चित आहे. ध्वजाच्या पतनानंतर आपला टिकाव लागणे अशक्य आहे या कल्पनेच्या आहारी जाऊन देवल च्या सैन्याने न लढताच शस्त्रे खाली ठेवली आणि एक प्रबळ राज्य विनासायास कासीमने घशात घातले.    

                              सुहास भुसे 
                        (रोखठोकसाठी दि. १२-६-१३)