About

Tuesday 23 October 2012

चार्वाक दर्शन ३ : शोषणाधारित धर्म व्यवस्थेविरुद्धचा आदिम लढा


चार्वाक दर्शनावरून मागील काही दिवसांत रोखठोक ब्लॉगवर भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. त्यातील अनेकांसाठी चार्वाकांचे विचार धक्कादायक ठरल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे. तर अनेकांचे कुतूहल चार्वाकांविषयी चाळवले गेले आहे. अनेकांना चार्वाक विचार आवडल्याचेही दिसत आहे. चार्वाकांचे विचार हे श्रद्धाळू लोकांना पचवायला तसे जडच आहेत. हरकत नाही. यानिमित्ताने चार्वाक दर्शनावर जितके वाद विवाद झडतील तेवढे स्वागतार्ह्यच आहेत. कारण यातूनच आपल्या धर्म विषयक आणि एकूणच जीवनविषयक पायाभूत संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल.

    मुळात जडवादी आणि चैतन्यवादी यांच्यातील हा वाद सनातन आहे तितकाच तो विश्वव्यापक ही आहे. जे जडातून चैतन्य निर्माण झाल अस मानतात ते जडवादी आणि जे चैतन्यातून जड निर्माण झाल अस मानतात ते चैतन्यवादी किंवा ईश्वरवादी. मोक्ष, आत्मा आणि देव यांना मानणारे श्रद्धाळू ईश्वरवादी आणि यांचे अस्तित्व नाकारणारे जडवादी असे दोन स्पष्ट तट जगभरातील धार्मिक परंपरांमध्ये दिसतात. तुलनेने जडवादी परंपरा अधिक जुनी आहे. प्राथमिक अवस्थेतील मानव हा या विश्वाकडे जडवादी दृष्टीनेच पाहत होता. पुढे निसर्गातील देवतांना त्याने देव मानायला सुरवात केली असली तरी तिथे प्रार्थना करण्याशिवाय कर्मकांडाचे प्राबल्य अजून नव्हते. या परंपरांमध्ये कर्मकांडाचा शिरकाव पुढील काळात हळूहळू होत गेला. या दृष्टीने विचार केला तर जडवादाचे तुलनेने असलेले प्राचीनत्व प्रत्ययास येते.


चार्वाक आणि देवाचे अस्तित्व




चार्वाक तत्वज्ञान हे सार्वकालिक आहे. कोणत्याही काळातील विचारवंतांना आकृष्ट करून घेण्याचे सामर्थ्य त्यात आहे. चार्वाकांच्या पायाभूत संकल्पना या अतिशय स्पष्ट आहेत. त्यात कोणतीही चलाखी व भ्रामकता नाही. चार्वाक दर्शना इतके सुस्पष्ट प्रामाणिक आणि परखड तत्वज्ञान धर्माच्या इतिहासात अन्य कोणतेही नाही. विश्व ज्या त्या वस्तूच्या ( वस्तू – द्रव्य, material )  स्वभावधर्मानुसार विकसित झाले. इथे देवाने विश्व वगैरे निर्माण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.


" ईश्वर अभावात् , स्वभावेन इव "


देवाचे अस्तित्व, आत्म्याचे अस्तित्व, मृत्यूनंतरचे पारलौकिक जीवन, पुनर्जन्म, कर्मकांड या सर्व कल्पनांना चार्वकांनी एकाच वेळी नाकारले आहे. असे करण्याचे कारण त्यांचे काही मुलभूत प्रश्न. ज्यांची तर्कशुद्ध व विज्ञाननिष्ठ उत्तरे देणे आजही ईश्वरवादी लोकांच्या आवाक्याच्या बाहेरचे आहे. जमल्यास वाचकांनी कमेंट मध्ये प्रयत्न करून पाहावा.


१.     ईश्वरानं विश्व निर्माण केलं तर त्याला कोणी निर्माण केलं ?
२.    जर ईश्वर स्वयंभू असेल तर विश्व का स्वयंभू नसावं ?  
३.    ईश्वर जर निर्गुण-निर्विकार तर त्याला विश्व निर्माण करण्याची इच्छा मुळात का झाली ?
४.   इच्छा आली की आसक्ती आली, आसक्ती आली की बंधन येतं, मग ईश्वर अमर्याद स्वतंत्र कसा असेल
५.   आणि जर तो अमर्याद स्वतंत्र नसेल तर तो ईश्वर कसला ?





या तीक्ष्ण आणि भेदक प्रश्नांपुढे चैतन्यवाद्यांची मती कुंठीत होणे साहजिक आहे. मुळात जगातील सर्वच धर्म कल्पितांवर आधारलेले असतात. सामान्यांच्या गळी मोठ्या प्रमाणावर धर्मकल्पना उतरवण्यासाठी ते आवश्यकही असाव कदाचित. तुमचा येशू कुमारी मातेच्या पोटी जन्मला हे कसे शक्य आहे ? मेडिकल सायन्स च्या नियमाविरुद्ध आहे हे, किंवा मृत्यूनंतर देखील तो परत आला हे असंभव आहे, तो पाण्यावरून चालला हे भौतिकशास्त्राच्या विरुद्ध आहे असा वाद आपण ख्रिश्चन धर्मीयांशी घातला तर ते चिडणे आणि अश्या प्रश्नांची तर्क दृष्ट्या समाधानकारक उत्तरे त्यांच्यापाशी नसणे हेही स्वाभाविक आहे . न्युटन, ग्यालिलिओ, लिओनार्दो अश्या ख्रिश्चन धर्मपरंपरांना धक्का देणा-या पाश्चात्य जडवादी शास्त्रज्ञांना चर्चने दिलेला त्रास सर्वश्रुत आहे. किंवा इस्लाम धर्मियांना महंमद हा मोरासारख्या दिसणा-या स्त्रीचेहरा असणा-या प्राण्यावर बसून अल्लाह च्या भेटीला जाणे अशक्य आहे. ही एक भ्रामक कथा आहे असे सांगितल्यास त्यांच्या धार्मिक उन्मादाचा सामना करावा लागेल.

तथापि चार्वकांनी अश्या कोणत्याही विरोधाची तमा बाळगलेली दिसत नाही. ईश्वरवादावर त्यांनी चढवलेला हल्ला हा कोणत्याही एका धर्माच्या विरोधात नाही. चार्वाकांना वैदिक धर्म विरोधी समजण्याचे कारण नाही. त्याकाळात हिंदुस्थानात एकमेव असणारा धर्म म्हणून त्यांचे विचार वैदिक धर्म परंपरांच्या अनुषंगाने आहेत इतकच. तात्कालिक दृष्टीने विचार न करता एक विशुद्ध जडवादी तत्वज्ञान म्हणून चार्वाक दर्शनाकडे पाहीले असता हा सर्वच धर्मातील ईश्वर वाद्यांवर सार्वत्रिक आणि सार्वकालिक स्वरूपाचा प्रखर हल्ला आहे हे ध्यानात येत.


भूतात्मकं जगत्। स्वभावं जगतः कारणं आहुः।
न परमेश्वरः अपि कश्चित्।
न पुनर्जन्मः न मोक्षः। मरणं एव मोक्षः।
न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकीक:।
नैव वर्णाश्रमादीनां क्रीयाश्च फलदायिका :।।


चार्वाकांनी एकूणच सर्व धर्मकल्पनांच्या मुळावरच घाव घातला आहे. ईश्वरच नसेल तर धर्माचे अस्तित्व ते काय उरले ? देवाचे अस्तित्व अमान्य करण्याचे कारण धर्म आणि देव यांच्या नावावर समाजात धर्ममार्तडांनी चालवलेले सामान्यांचे शोषण आणि समाजात वर्ण व्यवस्थेच्या नावावर माजवलेली असहिष्णू अवव्यवस्था हेच आहे हे वाचकांनी ध्यानात घ्यावे. शिवाय पारलौकीकाच्या मागे लागून लौकिक जीवनाकडे धर्माने फिरवलेली पाठ हे देखील महत्वाचे कारण आहे.


चार्वाक आणि ज्ञान संपादनाची प्रमाणे

    
 चार्वाकांना फक्त दोनच ज्ञान साधने मान्य आहेत. प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षनिष्ठ अनुमान. जे इंद्रियांना प्रत्ययास येते तेच प्रमाण बाकी सर्व खोटे आहे यावर चार्वाक ठाम आहेत. अनुमान प्रामाण्याच्या बाबतीत चार्वाक जास्त कठोर आहेत. कारण त्याला मर्यादा आहेत. प्रत्यक्षानिष्ठ अनुमान म्हणजे एखादी गोष्ट आता जरी प्रत्यक्ष दिसत नसली तरी नंतर का होईना तिचा पडताळा घेता आला पाहिजे. अनुमान हे अंतिम प्रमाण मानण्यास चार्वाकांचा नकार आहे कारण अनुमान आले कि काही प्रमाणात संदेह आला. कशाच्या तरी अनुभवाच्या शिदोरीवर कोणीतरी काही अनुमान करतो. उदा. जिथे अग्नी असते तिथे धूर असतो. हा आपला नित्याचा अनुभव आहे. यावरून जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे असा अंदाज बांधण्याकडे कल होतो. डोंगरावर धूर आहे म्हणजे तेथे अग्नी आहे असे अनुमान काढता येईल. आणि असे अनुमान फसन्याचीही शक्यता असते. किंवा लोखंड तप्त असते तेव्हा त्यात अग्नी विद्यमान असतो परंतु त्यातून धूर निघत नाही. अनुमान प्रामाण्य अश्या प्रकारे चार्वकांनी अंशत: बाद ठरवले आहे .


खेरीज चार्वाक संभवनीयतेचा देखील विचार करतात. प्रत्यक्ष व्यवहारात प्रत्येक ठिकाणी जे प्रत्यक्ष प्रमाण मागणे कदाचित व्यवहार्य ठरणार नाही. काही ठिकाणी आपणास अनुभवावर आधारित गृहीतके विचारात घ्यावी लागतात. अनुमान म्हणजे जास्तीत जास्त संभवनीय असलेले सत्याच्या जवळ असलेले प्रमाण आहे. इथे आपल्याला चार्वाकांचा वैज्ञानिक दृष्टीकोन प्रत्ययास येतो. विज्ञानामध्ये आज प्रस्थापित झालेला सिद्धांत उद्या नवीन संशोधनाच्या आधारे कोणीतरी खोटा पाडू शकत. आज जी गोष्ट विज्ञानाधारे सत्य म्हणवते ती उद्या बदलू शकते. शेवटी सत्य म्हणजे तरी काय असते ?


सत्य म्हणजे एका अर्थाने टोकाची संभवनीयताच असते.

         


शब्द प्रामाण्य तर चार्वाक सपशेल नाकारतात. शब्द हे मुळात निरर्थक असतात. त्याचे रूढ अर्थ हे परंपरेने त्यांना चिकटलेले असतात. उदा. एका कालखंडात विशिष्ट अर्थाने वापरला जाणारा शब्द नंतरच्या काळात वेगळ्याच अर्थाने वापरला जातो अशी हजारो शब्दांची उदाहरणे आपणास भाषाशास्त्रज्ञ देऊ शकतील. शिवाय दुसरे कारण म्हणजे शब्द हे कोणीतरी उच्चारलेले असतात. नंतर कोणीतरी त्यांचे संकलन करते. (कोणीतरी त्यात भेसळ देखील करते.) इथ शब्द उच्चारणा-याची पात्रता काय ? संकलन करणा-याची पात्रता आणि हेतू काय ? हे वादग्रस्त प्रश्न आहेत. अपौरुषेय वेदांतील शब्द प्रमाण मानायचे झाले तर वेदात जर्भरी, तुर्भरी असे शब्द येतात. त्यांचा अर्थ कसा लावायचा व असे निरर्थक शब्द कसे प्रमाण मानावयाचे ? शिवाय यम आणि यमीच्या कथेचा (अभ्यासू वाचकांना ही कथा माहित असावी )  उल्लेख करून चार्वाक म्हणतात हे असले शब्दप्रामाण्य काय कामाचे ?
        

।। प्रत्यक्षं एव प्रमाणः  न कश्चित् आगमः ।।



चार्वाक आणि कर्मकांड



चार्वाकांच्या नास्तिक भासणा-या विचारधारेचे मूळ तात्कालिक समाजात देव आणि धर्म यांच्या नावाखाली लोकांची चाललेली पिळवणूक आणि शोषण हे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष देवाचे अस्तित्व नाकारणारे चार्वाक कर्मकांडावर किती कठोर टीका करत असतील याची कल्पना करता येते. चार्वकांचे उपलब्ध साहित्य कर्मकांडावर इतका करडा प्रहार करते तर त्यांचे जे साहित्य उपलब्ध नाही किंवा हेतुपुरस्पर अनुपलब्ध करण्यात आलेले आहे त्यात त्यांनी कर्मकांडाची कशी भंभेरी उडवली असेल याची देखील कल्पना येऊ शकते. चार्वाकांचा विशेष राग तत्कालिक यज्ञ पद्धतीवर व त्यात देण्यात येणा-या पशुबळीच्या प्रथेवर आहे. इथे त्यांचा एक प्रातिनिधिक श्लोक देतो जो संपूर्ण यज्ञविधीच्या फलव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उभे करतो.


पशुश्वेन्नीहत: स्वर्ग ज्योतिष्टोमे गमिष्यति ।
स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते ।।

अर्थात जोतिष्टोम यज्ञात मारलेले पशु जर स्वर्गात जातात तर यजमान स्वत:च्या पित्याला का यज्ञ वेदीवर बळी देत नाहीत.


मृतानामपि जन्तुनां श्राद्धं चेतृप्तीकारणम्
निर्वाणस्य प्रदिपस्य स्नेह: प्रज्वलयेच्छीखाम्

अर्थात जर मेलेल्या जीवांची तृप्ती श्राद्धाद्वारे होऊ शकत असेल तर तुपाने विझलेल्या दिव्याची ज्योतही मोठी होईल.




स्वर्गस्थिता यदा तुप्तीम् गच्छेयुस्तत्र दानत:
प्रासादस्योपरीस्थानामत्र कस्मान्न दीयते

अर्थात भूलोकात केल्या दानामुळे जर स्वर्गात असलेल्या पितरांची तिथल्या तिथे तुप्ती होत असेल तर इमारतीत वरच्या मजल्यावर राहणा-या लोकांना अन्न येथे खालच्या मजल्यावर का देत नाहीत ?



ततश्च जीवनोपायो ब्राह्म ब्राह्मनैविहीस्त्विह
मृतांनां प्रेतकार्याणि न त्वन्यद्विद्यते क्वचित्

अर्थात ब्राह्मणांनी स्वत:च्या उपजीविकेसाठी योजलेले हे सर्व उपाय आहेत अन्यथा इथे मेलेल्यांसाठी प्रेतकार्ये कदापी अस्तित्वात नसती.

उपरोक्त श्लोकांवरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल की चार्वाक म्हटले की धर्ममार्तंड का इतके हादरतात , चार्वाक दर्शन खोटे , दांभिक आणि भोगवादी आहे असे ठरवण्याची त्यांची का इतकी धडपड असते , का बहुतांश पुराणे आणि धर्मग्रंथात चार्वाकांची इतकी निंदा केली गेली आहे ? चार्वाकानी ज्या कल्पितांवर धर्माचा पाया रचला गेला आहे  त्या सगळ्या  कल्पितांनाच समूळ हादरा दिला आहे. धर्माचे स्वयंघोषित ठेकेदार आणि धर्म आणि धर्म कल्पना यात हितसंबंध गुंतलेले प्रस्थापित शोषणकर्ते यांच्या मुळावरच चार्वकांनी आपल्या तत्त्वज्ञानातून घाव घातला आहे.

चार्वाक मत जनसामान्यांमध्ये का रुजू शकल नाही ? चार्वाक मत दडपून टाकण्याचे देश काळ आणि समाज यांच्यावर कोणते दुष्परिणाम झाले याचा वेध घेऊ पुढील लेखात ...

                 सुहास भुसे.
               ( रोखठोक साठी )  


 या लेखमालेतील इतर लेख –



 

    

Saturday 20 October 2012

चार्वाक दर्शन २ : प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी तत्वज्ञ -चार्वाक



चार्वाक हे कोणी एक व्यक्ती होते कि ती एक उपाधी होती कि जडवादी परंपरेतील सर्वच अनुयायांना चार्वाक म्हणत असत याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. पण हे चार्वाक दर्शन हिंदू परंपरेत सर्वात जास्त महत्वाचे गणले गेले आहे आणि इतर कोणत्याही तत्वज्ञानाची झाली नाही इतकी चार्वाक तत्वज्ञानाची चर्चा हिंदू धर्मशास्त्रात झाली आहे. चार्वाकांचे तत्वज्ञान हे देव आणि धर्म यांच्या नावावर लोकांचे शोषण करणा-यांसाठी इतके धोकादायक होते कि नंतरच्या काळातील जवळ जवळ सर्व विचारधारांना चार्वाक मताचे खंडण करणे महत्वाचे वाटले आहे. उपनिषदे ,बादरायणाची ब्रह्मसूत्रे आदी अनेक ग्रंथात चार्वाक मताचे खंडन केले गेले आहे. साधारणत: इ.स. ६ व्या शतकापर्यंत चार्वाक मतावर खंडण-मंडनाची ही परंपरा सभ्य आणि सुसंस्कृत चाकोरीतून गेलेली दिसते. त्याचे खंडन करण्याचा प्रयत्न करणारांनी देखील चार्वाक विचारांचा सन्मानच केलेला दिसतो.

महाभारतातील वनपर्वात द्रौपदी एक जुनी आठवण सांगताना म्हणते कि माझ्या पित्याने मला चार्वाक दर्शनाचे शिक्षण देण्यासाठी ह्या तत्वज्ञानातील अधिकारी व्यक्तीची नियुक्ती केली होती. आता राजा द्रुपदासारखा एक तात्कालिक मान्यवर राजा आपल्या कन्येला शिक्षण देण्यासाठी चार्वाक संप्रदायाच्या गुरुची निवड करतो म्हणजे त्या काळात चार्वाक परंपरा निश्चितच प्रतिष्ठित आणि लोकमान्य राहिलेली असणार. पाणिनीने चार्वाक दर्शनाला अन्विक्षकी शास्त्रात स्थान दिले आहे. कृषी ,उत्पादन ,ऐहिक जीवन ,अर्थ अशी जीवनस्पर्शी शास्त्रे अन्विक्षकी शास्त्रात येतात. यावरूनही आपल्याला चार्वाक दर्शनाचे तात्कालिक महत्व लक्षात येते. आद्य शंकराचार्यांनीदेखील चार्वाक दर्शनाचा सन्मानच केला आहे. शंकराचार्य म्हणतात की चार्वाकमत हे  सर्वसामान्य जनतेचे मत आहे.  शंकराचार्यांचा समकालीन असलेला जैन विचारवंत हरिभद्र म्हणतो, इंद्रियांच्या प्रत्ययाला येणारे जगत् व पदार्थसमूह म्हणजे लोक. हा लोक ज्या तत्वज्ञानाचा आधार आहे ते म्हणजे लोकायत. कौटिल्याने त्याला आपल्या तर्कशास्त्रात स्थान दिले आहे.  या सर्व संदर्भांवरून असे लक्षात येते साधारण यापूर्वीच्या सर्व विचारवंतांना चार्वाकांचे विचार मान्य होते. मात्र इ.स ६ व्या शतकानंतर मात्र या विचारांची टवाळी सुरु होऊन हे विचार दाबण्याचा प्रयत्न झाला. 



Dropadi by Raja Ravivrma


चार्वाकांचे तत्वज्ञान


चार्वाक प्रत्यक्ष हेच प्रमाण मानतात. जी गोष्ट दिसत नाही वा जिचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही अशी कोणतीही गोष्ट मान्य करण्यास त्यांचा कडवा विरोध आहे. तात्कालिक धर्म परंपरा ही मोक्ष ,मुक्ती ,स्वर्ग अश्या कल्पनांच्या मागे धावत होती. उपवास ,व्रतवैकल्ये ,जपजाप आणि कडक कर्मकांड ... आणि एकूणच शरीराला कष्टवणारी धर्मसाधना म्हणजेच धर्माचरण असा लोकांचा समज करून देण्यात आला होता. अशी कडकडीत साधना करणे वा इंद्रियनिग्रह म्हणजे स्वर्गात आपली जागा राखून ठेवण्याचा राजमार्ग. चार्वाकांना मृत्यनंतरच्या तथाकथित सुखांसाठी जीवनाकडे पाठ फिरवणारी ही फोल विचारसरणी अमान्य होती. त्यांनी आत्म्याचे अस्तित्व अमान्य केले. स्वर्ग-नरक असल्या कल्पनांना केराची टोपली दाखवली. मृत्यू म्हणजेच मुक्ती हे तत्वज्ञान त्यांनी मांडले.

चैतन्य हा आत्म्याचा गुण आहे. तथापि आत्मा नावाची कोणती गोष्ट अस्तित्वात असल्याचे प्रमाणासहित सिद्ध करता येत नाही . त्यामुळे अंतत: हा शरीराच गुण होतो. शरीर संपले कि चैतन्य संपले. सारे काही संपले. याची सिद्धता त्यांनी तीन प्रकारे मांडली.

१)     तर्क
२)    अनुभव
३)    आयुर्वेद शास्त्र


तर्क – चार्वाक मानतात कि शरीर जोवर असते तोवरच त्यात चैतन्य खेळत असते. जेव्हा शरीर नष्ट होते तेव्हा हे चैतन्य कोठे दिसत नाही वा त्याचे मृत्यूपश्चातचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही. या अनुषंगाने पाहीले असता शरीर हाच आत्म्याचा एकमेव आधार आहे अर्थात आत्मा म्हणजेच शरीर.


अनुभव- मी स्थूल आहे, मी दुर्बल आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी निष्क्रीय आहे, मी ताकदवान आहे, असे अनुभव आपल्याला पावला-पावलाला येत असतात. स्थूलता-दुर्बलता इत्यादी शरीराचे धर्म आहेत आणि ‘मी’ देखील शरीराचाच धर्म आहे. पर्यायाने आत्मा म्हणजेच शरीर.


आयुर्वेद शास्त्र- ज्या प्रकारे गुळ आणि मोहरी यांच्या मिश्रणात कालांतराने विशिष्ट परीस्थितीमुळे मादक गुणधर्म तयार होतात, ज्याप्रमाणे दही, पिवळी माती आणि शेण यांच्या मिश्रणात कालांतराने विंचू उत्पन्न होतात, ज्याप्रमाणे कात, चुना, सुपारी, पान यांचे सुयोग्य मिश्रण मुखात लालीमा उत्पन्न करते त्याचप्रमाणे चार महाभूतांचे विशिष्ट मिश्रण विशिष्ट परिस्थितीमध्ये चैतन्याच्या निर्मितीस कारणीभूत होते. चार्वाक हे फक्त पृथ्वी, तेज, जल, वायू ही चार महाभूते मानतात. आकाश हे महाभूत आहे हे त्यांना मान्य नाही. इथे निर्दिष्ट करण्याची बाब म्हणजे चार्ल्स डार्विन ने सजीवांच्या उत्पत्तीचे हेच कारण आपल्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतांत मांडले आहे. विशिष्ट पोषक परिस्थितीत सजीवांची उत्पत्ती झाली हा त्याचा सिद्धांत चार्वकांनी फक्त काही हजार वर्षापूर्वी या भारतभूमीत मांडला होता. इथेच त्यांचे श्रेष्ठत्व आणि वैज्ञानिक दृष्टीकोन अधोरेखित होतो.
    
हे अंतर्गत घटकांचे प्रमाण बिघडले कि शरीरात निर्माण झालेले हे चैतन्य नाश पावते, देह-आकार नष्ट होतात हाच मृत्यू. आत्मा हा शरीराहून वेगळा आहे, तो या देहात येतो जातो असे मानणे वेडगळपणाचे आहे असे चार्वाकांचे स्पष्ट मत आहे.


आकारामुळे निराकाराचा भास होतो. वस्तुत: निराकार असे काही नाही. फक्त आकारच आहे. उदा अचानक उमटलेल्या ध्वनिमुळे आधी शांतता होती असा भास होतो. शांतता असे काही नसते.

चारी पुरुषार्थात मोक्ष हा पुरुषार्थ सर्व श्रेष्ठ मानला जातो. चार्वाकांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ मान्य नाहीत. ते फक्त अर्थ आणि काम हे दोनच पुरुषार्थ मानतात. धर्म आणि मोक्ष यांना चार्वकांनी बाद ठरवले आहे. पण धर्माला नाकारताना ते पारलौकिकाचे फळ देणारे साधन आहे म्हणून तो नाकारला आहे . चार्वाकी विचारसरणीला पारलौकिकाचे वावडे आहे.



यज्ञ म्हणजे वेळ आणि द्रव्य यांचा अपव्यय, एक व्यर्थ कर्मकांड असे चार्वाक मानतात. चातुर्वण्य व्यवस्थेला देखील चार्वकांनी कडवा विरोध केला. कथित ऐतिहासिक रित्या येणारी वंशशुद्धी आणि तिच्यामुळे येणारा अहंकार यावर चार्वकांनी कठोर टीका केली. वंश शुद्धी ही वस्तुस्थिती नसून एक आभास आहे. समाजातले आपले उच्च स्थान टिकवण्यासाठी केलेला अपप्रचार आहे असे चार्वाक मानतात.







चार्वाकांविषयी केल्या गेलेल्या अपप्रचारामुळे चार्वाक हे अयोग्य आणि अनीती पसरवणारे तत्वज्ञान सांगतात अशी अनेकांची समजूत झालेली दिसते. तथापि चार्वाक कोणतीही अयोग्य गोष्ट सुचवत नाहीत. उलट चोरी, मद्यप्राशन, पशुहत्या, हिंसा इत्यादी गोष्टींचा त्यांनी धिक्कार केला आहे.  धर्माच्या नावाखाली लोकांचे शोषण करणारे पुरोहित हे चार्वाकांचे खरे टीकाविषय आहेत. लोकांचे रक्त पिवून जगणा-या असल्या लोकांचा त्यांना प्रचंड तिटकारा आहे. माणसाने लबाडी करू नये, कोणाचे शोषण करू नये, आयत्या पिठावर रेघोट्या ओढू नयेत. कष्ट करावे, शेती करावी, प्रामाणिक पणे श्रम करून अर्थार्जन करावे आणि काव्य संगीत कला नृत्य यांचा आस्वाद घेत सुखनैव जीवन कंठावे असा रोकडा सल्ला ते सामान्यांना देतात. दंडनिती, राजकीय स्थैर्य यातून लोक नियंत्रण करीत शासकांनी स्वार्थ बुद्धी त्यजून लोकांचे आणि एकूणच समाजाचे हित साधावे असे ते सुचवतात.

       कृषीगोरक्ष वाणिज्यदंडनित्या दिभी: बुधै :
एतेरैव सदोपायैतुर्भोगाननुभवेदृवि


(क्रमश:)

-सुहास भुसे

Tuesday 16 October 2012

चार्वाक दर्शन : कर्मकांड आणि धार्मिक शोषणावर करडा प्रहार

साधारणत: इसवी सनाच्या सहाव्या शतकापर्यंत भारतीय धर्म परंपरा अतिशय उदार राहिलेली आहे. अनेक धार्मिक विचारधारा अतिशय प्राचीन काळापासून इथे उदयास आल्या, विकसित झाल्या . काही काही कालखंडात तर एकाच वेळी भिन्न भिन्न परंपरा आणि धर्म इथे एकाच वेळी नांदत असलेले दिसून येतात. या वैचारिक परंपरा एकमेकांच्या विचारांचे खंडणमंडन करीत असलेल्या दिसतात. यातील बहुधा सर्व वैचारिक आणि धार्मिक परंपरांचे अनेक ग्रंथ आणि वाङमय उपलब्ध आहे. वेदांहून वेगळा विचार करणारी अनेक दर्शन शास्त्रे आहेत. त्यांची विचारधारा स्पष्ट करणारे देखील अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. सामान्यत: आपली धार्मिक परंपरा उदार राहिलेली आहे. एका धर्माने दुस-या धर्माचे किंवा एका विचारपरंपरेने दुस-या विचारपरंपरेचे ग्रंथ वाङमय जाळून नष्ट केल्याचा रानटी प्रकार आपल्याकडे किमान इ स ६ व्या शतकापर्यंत तरी दिसून येत नाही.


याला अपवाद एकमात्र विचारधारेचा, लोकायत दर्शन किंवा चार्वाक दर्शन.

चार्वाक दर्शन जे लोकायत दर्शन म्हणूनही ओळखले जाते त्याचा एकही ग्रंथ आज उपलब्ध नाही. अभ्यासूंना चार्वाक दर्शन शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी उपनिषदादी ग्रंथात त्याच्यावर केलेल्या टीकेवर विसंबून त्याचा अभ्यास करावा लागतो. चार्वाक दर्शनाचा एकही ग्रंथ उपलब्ध नसण्याचे गौडबंगाल काय असावे बुवा? सर्वसमावेशक अश्या उदार भारतीय धार्मिक परंपरेला चार्वाक दर्शनाचे ग्रंथ नष्ट करण्याची काय गरज भासली असावी? हे कोणाचे कारस्थान असावे ? या प्रश्नांच्या संभाव्य उत्तरांचा आणि चार्वाक दर्शनाच्या विचारधारेचा वेध घेऊ या नव्या लेखमालेतून.



             



चार्वाक मुनी हे सामान्यत: नास्तिक आणि भोगवादी विचारधारेचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांची ही ओळख विकृत आहे आणि वैदिक धर्ममार्तंड महाब्राह्मणांनी  हेतुपुरस्पर निर्माण केलेली आहे. त्यांचे तत्वज्ञान त्याहून कितीतरी व्यापक आणि बहुधा वेदांहूनही प्राचीन आणि पुरातन आहे. तसे पाहू जाता इतर सर्व दर्शनशास्त्रांमध्ये जन्म-बंधन-मोक्ष यांचे महत्व तर आहे पण ईश्वर किंवा देव या संकल्पनेचे निर्णायक महत्व नाही. जसे आपणास मुस्लीम किंवा ख्रिश्चन धर्मात दिसते. सांख्य दर्शन तर देवाचे अस्तित्वच अमान्य करते तथापि त्यांना नास्तिक म्हटले गेलेले नाही. सांख्य ,न्याय ,वैशेषिक ,मीमांसा ,वेदांत ,शीख ,नाथपंथी ,या आणि भारतीय परंपरेतील एकूण एक विचारधारा या आस्तिक सदरात मोडतात. मग स्वत:ला भारतीय परंपरेचे उत्तराधिकारी म्हणवून घेणा-यांनी चार्वाक दर्शन शास्त्राला नास्तिक का म्हटले असावे? याचे एक प्रमुख कारण म्हणजे चार्वाकांनी केलेली वेदांची निंदा. इतर कोणत्याही विचारधारेने वेदांची निंदा केलेली नाही.

नास्तिको वेदनिन्दक:’ 

अर्थात जो वेदांची निंदा करतो तो नास्तिक. आणि चार्वकांनी तर वेदांना धूर्त आणि लबाड लोकांचे षडयंत्र म्हटले, राक्षसांची व्यर्थ बडबड देखील म्हटले. अब्राह्मण अब्राह्मण !! हे तर मोठेच महापाप झाले कि राव मग ! यामुळेच चार्वाकांना नास्तिक ठरवले गेले. वस्तुत: भारतीय तत्वज्ञानाचा कोणताच ग्रंथ निर्भेळ राहिला आहे यावर माझा विश्वास नाही. वेद म्हणजे ज्ञानाचा धबधबता प्रवाह. निसर्गातील विविध चमत्कारांना देवतास्वरूप मानून त्यांच्यावर रचलेल्या पवित्र ,उत्फुल्ल ऋचांचे संकलन आहे. वेद म्हणजे त्याकाळच्या वैदिक समाजाचा आरसा आहेत. तथापि वेदांचे निर्भेळ आणि शुद्ध स्वरूप कालौघात तसेच टिकून राहिले असेल याची अजिबात शाश्वती नाही. अनेक स्वार्थी आणि लबाड लोकांनी देव आणि धर्म यांच्या नावावर लोकांचे शोषण करण्यासाठी त्यात भेसळ केली आहे. आणि चार्वाक तर समाजातील धर्माच्या नावावर आपली पोळी भाजून घेणा-यांचे कट्टर दुश्मन. त्यांच्या तोंडी हे श्लोक धर्माच्या ठेकेदारांनी घुसडले असण्याची दाट शक्यता आहे. हे धर्म मार्तंड स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि समाजातील आपले उच्च स्थान अबाधित राहावे यासाठी नीच पातळीवर जाऊन इतिहास-पुराणांची मोडतोड कशी करत असत याचे अनेक दाखले आणि पुरावे आता हाती लागत आहेत. चार्वाकांच्या एका श्लोकाचे उदाहरण धर्माच्या दलालांच्या हरामखोरीचे उदाहरण म्हणून पुढे देत आहे.


चार्वाकांचा हा श्लोक अतिशय सुप्रसिद्ध आहे. किंवा कुप्रसिद्ध आहे म्हटले तरी चालेल. याच श्लोकाचा आधार घेऊन त्यांना भोगवादी ठरवण्यात आले. खर तर इतके तर्कशुद्ध आणि जीवनाचे यथार्थ नीतीमान तत्वज्ञान रचणारा विद्वान असे बेजबाबदार विधान करेल हेच मुळात शंकास्पद आणि हास्यास्पद आहे. पण कुटील ब्राह्मणांनी त्या श्लोकाची मोडतोड करून चार्वाकांना कसे बदनाम केले आहे पहा.

तो श्लोक ज्या रुपात प्रसिद्ध आहे तो असा-

यावज्जीवेत्  सुखंजीवेत् ऋणंकृत्वा घृतंपिवेत्।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुत:।

याचा अर्थ असा कि जोवर जीवन आहे तोवर सुखात जगा. खा ,प्या ,ऐश करा. ऋण काढून तूप प्या. ऋण परत फेडण्याची चिंता करू नका. मानवी शरीर नश्वर आहे. एकदा मेल्यानंतर पुन्हा इथे येणे कोठले?

याच श्लोकाच्या आधारे चार्वाकांचे जडवादी तत्वज्ञान भोगवादी आणि चंगळवादी ठरवण्यात आले. चार्वकांनी वस्तुत: नीतीमान समाजव्यवस्था कशी असावी याविषयी आपल्या तत्वज्ञानात खूप उहापोह केला आहे. असले समाजात अनीती पसरवणारे विधान असला महान तार्किक विचारवंत करू शकेल का? नवव्या शतकात होऊन गेलेल्या जयंत भट्ट या चार्वाक परंपरेतील महान चार्वाकाच्या ग्रंथात हा मूळ श्लोक पुढील प्रमाणे येतो.


यावत् जीवेत् सुखम् जीवेत्, नास्ति मृत्युः अगोचरः,
भस्मिभूतस्य देहस्य पुनरागमनम् कृतः 


यातील ‘नास्ति मृत्यू: अगोचर’ हा चरण गाळून तिथे ‘ऋणकुत्वा घृतपिवेत’ या ओळी घुसडून हा श्लोक आणि त्यामागचा विचार विकृत स्वरुपात लोकांपुढे आणण्यात आला. आणि याचा परिणाम म्हणजे आता चार्वाक म्हटल कि त्यांचा हा भेसळयुक्त श्लोक लोकांना लगेच आठवतो. अशी किती पौराणिक गोष्टींची मोडतोड करून हिंदू धर्माचे किती अपरिमित नुकसान हिंदू धर्माला स्वत:ची जहागीर समजणा-यांनी केले असेल याची आपणास उपरोक्त उदाहरणावरून कल्पना येऊ शकेल.


     हे वैदिक लोक चार्वाकांना इतके का घाबरत होते? अस काय तत्वज्ञान होत चार्वाकांच? 

     चार्वाक हे प्रत्यक्षाला प्रमाण मानणारे विचारवंत होते. प्रत्याक्षावरून काढले जाणारे अनुमान देखील त्यांनी प्रमाण मानले होते. त्यांनी महत्वाची मानलेली ही दोन प्रमाणे तर आजच्या प्रगत विज्ञानाची दोन महत्वाची प्रमाणे आहेत. प्रत्यक्ष आणि प्रमाण या दृष्टीने चार्वाक हे पहिले वैज्ञानिक विचारांचे तत्वज्ञ ठरतात. (तथापि नेहमी महापुरुषांची कुत्सित चेष्टा करण्याची पुरातन सवय असणा-यांनी चार्वाक समोर असेल तर त्याची बायको सधवा आणि तो डोळ्याआड झाला कि विधवा ,अशी बोचरी टीका त्याच्यावर केली.)


चार्वाकांची विचारसरणी संक्षेपात पुढील प्रमाणे –

१)     जे प्रत्यक्ष आहे तेच प्रमाण.
२)   आत्मा आणि देह वेगळे नाहीत अर्थात देह संपला कि आत्मा संपला. देहातील चैतन्य म्हणजेच आत्मा. ( A body with soul is consciousness)
३)   मृत्यू म्हणजेच मोक्ष. ( Death is a salvation )
४)   न स्वर्ग आहे, न नरक आहे ,न अंतिम मोक्ष ,न शरीपासून वेगळा आत्मा, न चार आश्रमी व्यवस्थेचे कोणते कर्म फळ मिळते.

त्यांच्या विज्ञाननिष्ठ विचारसरणी विषयी अधिक विस्तृत पणे जाणून घेऊया पुढील लेखात.

                             -सुहास भुसे
                             (रोखठोक साठी)