About

Sunday 28 August 2016

चिंच गुळाची फोडणी आणि पुरीभाजी

आज जरा घाई होती व पुढे कामे होती बरीच ..
त्यामुळे जेवणापेक्षा अल्पोपहारावर भागवावे आणि पुढे वेळ मिळाल्यावर जेवणाचे पाहावे असा विचार केला.
तसा मी या ब्राह्मणी हॉटेलमध्ये कधी मधी जेवलो असेन मागे ..
पण तूरळक . बाहेर जेवताना शुद्ध शाकाहारी आवर्जून कशाला जेवेल कोण?
तर मग जरा वेळ कमी असल्याने पटकन येईल म्हणून पूरी भाजी मागवली.
पटकन म्हणता तिने बराच वेळ घेतला तरी.
आणि आली तेव्हा वरणासारखी हळदीची फोडणी दिलेली पिवळी भाजी चक्क पूरी भाजी प्लेट मध्ये पाहुन धक्का बसला.
आणि आता पुढे ताटात काय वाढून ठेवलेय याचीही अंमळशी कल्पना आली.
तर भाजी बघुन वाटले होती तशीच गोडसर होती ...
चिंच गुळाची चरचरित फोडणी दिली असावी बहुतेक.
उसळ गोडसर, चटणी गोडसर, लोणचे गोडसर.
तोंडाची चव गेली पार .. ठीक आहे. असतात वेगवेगळ्या ट्रेडमार्क चवी लोकांच्या. पण हे काही पुणे नाही.
सोलापूर मध्ये, तेही चक्क मोहोळजवळ गोडसर पूरीभाजी ?
हन्त हन्त !!!
आणि पुरीचा आकार ... चार घासात चार पुऱ्या संपल्या. आणि एकंदर चवी चा स्ट्रीम बघुन अजुन काही मागवण्याची इच्छा होईना ..
पोट अगदी पूर्ववत रिकामेच वाटत होते.
आणि सगळ्यांचे चेहरे फोटो काढणेबल..
मग जरा पुढे जाऊन एक छान पैकी शिवनेरी की शिवशक्ती कायस हॉटेल निवडल..
काम को मारो गोली म्हटल ..
मालवणी सुक्क मटन हंडी आणि तेजतर्रार लालभडक, तेलाचा इंचभर कट असणारी तर्री .. खास सोलापुरी ..चापुन हानली.
तेव्हा कुठे डोक्यातल्या गोड गोड मुंग्या गेल्या.
©सुहास भुसे


अडतीत एक दिवस

कांदे घेऊन तो मोठ्या उत्साहाने मार्केटला गेला ..
एरवी बाप जात असे पण पोराला पण माहिती व्हावी त्याला जरा व्यवहारज्ञान मिळावे म्हणून बापानेही त्याला आवर्जून पाठवले होते ...

जाताना सोबत चार पाच शेतकरी होते ..
जरा वयाने मोठे दोघे जण ड्रायव्हर केबिन मध्ये बसले ..
ह्याने आणि अजुन दोघांनी आयशर मध्ये मागे कांद्याच्या थप्पीवर मस्तपैकी तानुन दिली ...
खालुन कांदे रुतत होते ..
टेंपो खड्डयातुन गेला की अंग दनादन उचलून आदळत होते ..
चार सहा तासांनी मार्केट आले .

मिट्ट काळोखात शहर झोपले असले तरी मार्केट मात्र टक्क जागे होते .
हमालांनी गोण्या खाली उतरवुन गोडाऊन मध्ये रचुन थप्पी लावली.
अंग आंबुन गेले होते. याने सोबत आलेल्या मुंडासेवाल्याला विचारले,
"आण्णा, झोपायच कुठ ?"
"कुट मंजी? हिथच अन कूट .."
घों घों करणारे डास एका हाताने हाकलत तो म्हणाला,
"इथेच ? या गोडावूनमध्ये ?"
"रात्री कांद्याच्या गोण्या चोरीला जात्यात, पहाट इथल्या बाया पोती फोडून कांद लंपास करत्यात, तवा हिथन हलायच नाही. झोपायच ते बी आळी पाळीन"
आण्णाने अनुभवाचे बोल ऐकवले.
नाइलाजाने त्याने आंबलेले अंग तिथेच गोण्यांच्या थप्पीवर आडवे केले.
डास फोडून काढत असताना, कानाकोपऱ्यात पडलेल्या सडलेल्या भाजीपाल्याच्या कुबट वासात त्याने रात्र कशी बशी काढली.

भल्या सकाळी हमाल आणि काटेवाले आले. त्यांनी विद्युत वेगाने गोण्या काट्यावर ठेवल्या कधी, वजन टिपलं कधी, आणि गोण्या परत रचल्या कधी हे त्याला समजलच नाही .
आण्णाला कोपराने ढोसुन तो विचारत राहिला 'आण्णा याच वजन किती भरल, त्याच वजन किती भरल'
"काळजी करू नक, हिथ नाही कळल तर पट्टीवर बराबर कळतय"
आण्णाने पुन्हा अनुभवाचे बोल ऐकवले.
मग ते चौघे पाचजण गाववाले तंबाखू च्या मिसरीने दात घासुन कोपऱ्यावर नळावर मुखमार्जन करुन आले. जवळच्याच टपरीवर चहा झाला.

10 ला लिलाव सुरु झाले. आणि अचानक पणे त्या सुस्तावलेल्या मार्केटमध्ये कोलाहल सुरु झाला. अडत्या, त्याच्या मागे दहा वीस व्यापारी, आणि मागे पाच पंचवीस हमाल असा जत्था एका एका वक्कलाचा निकाल लावत पुढे सरकत होता.

हळू हळू जत्था याच्या थप्पीजवळ आला. चार हमालांनी पुढे होऊन भसाभस हुके लावून गोण्या फोडायला चालू केले. कांदा गोण्या फोडून फरशीवर ओसंडु लागला. लालभडक असा की गुलाबाने लाजुन मान खाली घालावी. गोल असा की जणु कंपासने वर्तुळ आखुन बनवला असा. चमक अशी की डोळे ठरत नव्हते. त्याच्या अख्ख्या घराबाराच्या ढोर मेहनतीचे, काबाडकष्टाचे ते मधुर फळ होते.

अडत्याजवळ एक दोन व्यापारी पुढे सरसावले. अडत्याने आपला नेहरू शर्ट जरा वर उचलला. व्यापाऱ्याने त्याखाली हात सरसावत अडत्याच्या हातात हात दिला. दोघांनी आपसांत बोटांच्या सांकेतिक खुणा करत सौदा तोडला. हा आपला बघतच राहिला. मार्केटात पहिल्यांदाच आला असल्याने लिलावाची ही पद्धत त्याला नवीन होती. आपला कांदा कसा गेला याची उत्सुकता तर होती पण विचारावे कसे. अडत्या साडेसहा फूटी, भीमकाय देहाचा, कोरलेली दाढी, गळ्यात पचास तोला साखळी, हातात भली मोठी ब्रेसलेट, दाही बोटात अंगठ्या, शुभ्र परीटघड़ीची कपडे, त्याला काही विचारायचा त्याला धीरच झाला नाही. त्याने पुन्हा आण्णाला कोपराने ढोसले. " आण्णा, कसा गेला आपला कांदा ?"
"आर ते हिथ नाय कळत, दम काढ जरा. मागन पट्टीवर समद कळत. "
आण्णाचे अनुभवाचे बोल आले.

मग सगळ्यांचे लिलाव आटोपल्यावर सगळे गाववाले जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन नाष्टा करुन पोटाला जरा विसावा करुन आले. जरा वेळ इकडे तिकडे फिरून सर्वांनी अडत्याचे ऑफिस गाठले. पाच वाजेपर्यन्त लोळुन दिवस काढल्यावर कुठे यांच्या हातात पट्टी पडली.

याने उत्सुकतेने पट्टी हातात घेतली. कांदा पाच पैसे किलो दराने गेला होता. 100 क्विंटल कांद्याची पट्टी होती 500 रु. त्यातून अडत, हमाली, तोलाई, लेव्ही, फोनबील वगैरे कपात..
त्याच्या भक्क डोळ्यांपुढे पट्टीतली अक्षरे धूसर धूसर होत गेली ....
©सुहास भुसे