About

Thursday 6 April 2023

टोकाची निरिच्छता

 काही गोष्टी, काही माणसं, काही घटना प्रचंड मानसिक त्रास देऊ शकतात. अशा गोष्टी मागं टाकता यायला हव्यात. अशी माणसं डोक्यातुन काढून टाकता यायला हवीत. अशांसाठी एक क्लोजड सब्जेक्टसची फाईल बनवता यायला हवी. एकदा विषय बाजुला टाकला म्हणजे टाकलाच..


आमचे पणजोबा योग्य वयात आपल्या चार कर्त्या मुलांकडे प्रपंच सोपवुन निरिच्छ झाले. वानप्रस्थाश्रम स्वीकारला. सकाळी उठावं प्रातर्विधी उरकेपर्यंत सुनांनी गरम पाण्याचं घंगाळ तयार ठेवायचं. अंघोळ उरकुन कपडे करून तयार होईपर्यंत भाकरी, वरण व थोडासा भात.. सुनांनी ताट तयार करून ठेवावं. अन्नाप्रति निरिच्छता. उर्वरित आयुष्यात या साध्या आहाराव्यतिरिक्त कोणताही आहार घेतला नाही. कोणाशीही अपवाद वगळता एका शब्दाने संभाषण नाही. सगळे दैनंदिन शेड्यूल न बोलताच सुरू राहिलं.


निरिच्छता अशा टोकाची आणि एकदा स्वीकारलेली स्थितप्रज्ञता एवढी ठाम होती.. की एकदा एका प्रसंगात तिचा कस लागला. यथावकाश चार भावंडांमध्ये मतभेद सुरू झाले. ते टोकाला जात वाटण्यापर्यंत वेळ आली.


जुन्या काळात वाटण्यांचे मोठे प्रकरण असायचे. काही जमिनी कोरडवाहू, काही बागायत..काही हलक्या, काही भारी.. काही मळे गावालगत असतं. काही गावापासून लांब. कोणी काय घ्यायचं हे ठरवणं मोठं वादग्रस्त व्हायचं.


तर वाटण्यांच्या बैठकीत वाद सुरू झाला. पैपाहुण्यांच्या उपस्थितीत चारी भाऊ हमरीतुमरीवर आले. वाद विकोपाला जाऊ लागले. भाऊ भाऊ एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले. हाणामारी पेटली.


पोटची कर्तीसवरती मुलं डोळ्यासमोर एकमेकांचे गळे पकडत होती.. आणि पणजोबा लोडाला टेकुन एखादं सिनेमातले दृश्य असावं जणु असं एक ही शब्द न बोलता सगळं काही पाहत होते. संपुर्ण प्रसंगात एक ही शब्द त्यांनी तोंडातून काढला न चेहऱ्यावर काही भाव उमटले.


टोकाची निरिच्छता .. एकदा प्रपंचाचा विषय सोडला म्हणजे सोडलाच.

गोष्ट छोटी डोंगराएवढी

 बागेच्या फौंडेशन साठी दगडांची गाडी आली होती. गड्यानी अर्धी गाडी खाली केली व थोडा विसावा केला. जवळच ऊसाचा एक ट्रेलर सोडून ट्रॅक्टर दुसरा ट्रेलर आणायला गेला होता. दोघा तिघांनी ऊस काढून खायला सुरवात केली. अर्धेअधिक खाल्ले तोवर मुकादम म्हणाला चला उठुया.


एकाने उरलेला ऊस ट्रेलर मध्ये मोळीत खोवुन ठेवला व दुसऱ्यांनाही सांगितलं. बाबांनो शेतकऱ्याच्या चार कांड्यांची नासाडी करू नका. आधीच बिचाऱ्यांना काही राहत नाही. दुसऱ्या गड्यानी त्याला दुजोरा देत आपापल्या उरलेल्या कांड्या मोळीत नीट बसवुन दिल्या.


अगदी छोटीशी गोष्ट. पण त्या मागची भावना मनाला स्पर्श करून गेली. ज्याची शेतीशी असलेली नाळ तुटलेली नाहीय त्या प्रत्येकाची या कठीण काळात शेतकऱ्यांप्रति सद्भावनाच आहे.


हां .. आता परवडत नसेल तर करू नका शेती म्हणणारेही आहेत. पण कशी सोडावी शेती?


परवडेल किंवा न परवडेल. शेतकरी कर्जबाजारी होईल. पण शेती सोडणार नाही. भांडवलशाहीच्या युगात इतर व्यवसायांसारखा शेती हा ही एक व्यवसायच समजला जातो.  


पण शेती हा आमचा व्यवसाय नाही तर ती आमची संस्कृती आहे. आमची जीवनपद्धती आहे. आमचा धर्म आहे. आमचे सगळे कुलाचार, रीतीभाती, सण समारंभ शेतीच्या चक्रावरच उभे आहेत. आमच्या हजारो पिढ्या, वाडवडील जगले तसेच आम्हीही जगत राहू.. विकता न आलेली पिके मोत्यासारखी फुलवत राहु.


शेती सोडणं म्हणजे जगणंच सोडणं !!!!

काश्मीर फाईल्स परीक्षण

 काश्मीर फाईल्स पाहिला. ज्या जोरदारपणे चर्चा सुरू आहेत त्यामानाने प्रत्यक्ष सिनेमा मात्र अगदीच यथायथा आहे. सिनेमा एवढ्या चर्चेत का आहे हे जाणुन घेण्यासाठी अक्षरशः बळेबळे सिनेमा पाहिला जातो. घटनाप्रधानता वगळुन पटकथा चर्चात्मक स्वरूपाकडे झुकली आहे. सिनेमा पाहतोय की डॉक्युमेंटरी हेच समजेनासे होते. आणि प्रचारकी बाज तर अक्षरशः किळसवाणा आहे. 


उदा. सुरवातीलाच एका प्रसंगात काही दहशतवादी पंडित असणाऱ्या अनुपम खेर च्या घराचा दरवाजा ठोठावतात. त्याचा मुलगा वरच्या दडग्या मजल्यावरील धान्याच्या कणगीत लपतो व लेकुरवाळ्या बायकोला दरवाजा उघडायला पाठवतो. बाहेरचा दहशतवादी व त्या पंडित कुटुंबाचा शेजारी यांची नेत्रपल्लवी होते. त्यातून तो शेजारी(अर्थात मुसलमान असणारा) खुणावतो की तो वरच्या मजल्यावर कणगीत लपला आहे.


आता आपण होलोकास्ट अर्थात ज्यू हत्याकांडावर शिंडलर्स लिस्ट, लाईफ इज ब्युटीफुल ते इनग्लोरियस बास्टर्डपर्यंत अनेक मुव्हीज पाहीले आहेत. प्रत्येक मुवीत जर्मन लोकांत वंशवादी नाझी असतात तसे सुह्रदय, आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करणारे, मानवतावादी जर्मन देखील पाहायला मिळतात. प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून किंवा जीव देऊन ही अनेक जर्मनांनी आपल्या ज्यु स्नेह्यांचं रक्षण केलं हे आपण मुव्हीत पाहिलं व इतिहासातही वाचलं. ही माणसांची एक सहज प्रेरणा आहे. सिग्मंड फ्राईड पासुन युवाल नोआ हरारी पर्यंत अनेकांनी या मानवी सहज भावनेचं विश्लेषण केलं आहे.


हिंदू-मुस्लिम दंगलीत देखील असे हजारो प्रसंग घडल्याच्या नोंदी आहेत.


काश्मीर फाईल्स वाल्यांना मात्र मानवाची ही मुल प्रवृत्ती मंजुर नसावी असं दिसुन येतं.


काश्मीरी पंडितांवर निश्चितच अन्याय झालेला आहे. पण ही गोष्ट अनेकांना ठाऊक नव्हती व या सिनेमामुळे ती नव्यानेच कळली असं या सिनेमावरील एकंदर चर्चा वाचुन वाटतं राहतं.

शिवाय त्या अन्यायाचं प्रत्ययकारी दर्शन घडवण्यात देखील हा सिनेमा अगदीच कमी पडला आहे. संपुर्ण सिनेमाभर प्रमुख पात्रे चर्चा करत राहतात व त्या माध्यमातुन त्यांची घटनाविहिन राजकीय मते प्रेक्षकांच्या गळी उतरवु पाहतात.


असो.. बाकीचा सिनेमा ही अतिशय बोअरिंग आहे. अगदीच निराशाजनक. पार्श्वसंगीत तर अक्षरशः झोप आणते. सध्या देशात एवढा धार्मिक उन्माद नसता व विरोधकांनी इतका टोकाला जाऊन बिनबुडाचा विरोध केला नसता तर हा सिनेमा निश्चितच डब्यात गेला असता. 


ज्या होलोकास्टवरील सिनेमांशी याची बरोबरी केली जाऊ पाहतेय त्या होलोकास्ट वरील अगदी सुमार दर्जाच्या सिनेमाच्या देखील एक कलाकृती म्हणून जवळपासही हा सिनेमा पोहोचत नाही असे खेदाने म्हणावे लागते.

श्रीमंत होण्याचा एकमेव मार्ग

 नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ डॉ डग्लस नॉर्थ गरीब गरीबच का राहतो याची अचुक आणि नेमकी मांडणी करतात.


‘‘देशाच्या बाजारपेठा आणि अन्य महत्त्वाच्या आघाड्यांवरचा ‘प्रवेश’ कसा मर्यादित ठेवता येईल यावर भर देणारी धोरणे जगभरातल्या अर्थरचना स्वीकारतात. त्यामुळे सामान्य माणूस ‘संधी’पासून तर दुरावतोच पण त्याच्यासाठी पुरेशी ‘साधने’ही उपलब्ध नसतात.’’


*संधी आणि साधने ...

समजा एक गरीब शेतकरी कुटुंब आहे किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय कामगार कुटुंब आहे. त्याला श्रीमंत बनायचं आहे..

स्वतःची उन्नती साधायची आहे..

पहिली संधी मिळते शिक्षणाच्या रुपात ..

पण शिक्षणाचा दर्जा जसा जसा वाढत जातो तसं तसे ते महाग होत जाते आणि ज्याला दर्जेदार शिक्षण म्हणता येईल ते त्याच्या आवाक्याबाहेरचे असते.

आणि जे शिक्षण तो शासकीय संस्थामधुन घेऊ शकतो ते इतके निम्न दर्जाचे असते की त्याला कुठेही नेऊ शकत नाही.


दुसरा मार्ग असु शकतो स्वतःचा उद्योग सुरू करणे..

त्यासाठी भांडवल अर्थात साधनं उपलब्ध नसतात.

भांडवल उपलब्ध असेल तर सर्वसामान्य माणसाला सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाही.

त्याच्या मार्गात अनेक अडथळे उभे केले जातात.


याच प्रमाणे इतरही सर्व प्रकारच्या संधी आणि साधने सामान्य माणसाला नाकारली जातात.

परिणामी सत्ता आणि पैसा यांचे केंद्रीकरण होत जाते.

संधी आणि साधने समाजातील मूठभर वर्गाकडे एकवटत जातात.

गरीब पिढ्यानपिढ्या गरीबच राहतो.


थोडक्यात अशा स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेत श्रीमंत होण्याचा एकच मार्ग असतो..

श्रीमंत म्हणून जन्माला येणे!!