About

Tuesday 23 April 2013

सुशीलकुमारांचा मुर्दाडपणा आणि तिहार जेल मधील कैद्यांची संवेदनशीलता


दिल्लीत फक्त पाच वर्षाच्या चिमुरडीवर झालेला बलात्काराचा प्रकार नृशंस आहेच तथापि त्याहून अधिक भयंकर प्रकार विविध असंवेदनशील घटक करत आहेत ...हे सर्व वाचून, पाहून, ऐकून संवेदनशील माणसाचा मानवतेवरील विश्वासच उडावा असेच एकंदर वातावरण आहे.


      ज्या चिमुरडीला पाहून हातावर चॉकलेट टेकवावे, तिचा पापा घ्यावा अशी इच्छा व्हावी तिथ अश्या निरागस बाल्याला पाहून तिच्यावर बलात्कार करण्याची एखाद्या नरराक्षसाला इच्छा व्हावी यातच मानवतेचा पराभव आहे . मनोज कुमारच्या या कृत्याला राक्षसी , सैतानी म्हणन म्हणजे राक्षस आणि सैतानाचा अपमान आहे . आणि त्याला कोणती कठोर शिक्षा देणार इथली गंजलेली दुबळी न्यायव्यवस्था ? मानवी आवाक्यातील सर्व शिक्षा या अघोरी प्रकारासाठी थिट्या आहेत .

तथापि या पार्श्वभूमीवर समाजातील विविध घटकांनी दाखवलेली असंवेदनशीलता चीड आणणारी आणि एकूणच या व्यवस्थेबद्दल घृणा निर्माण करणारी आहे. हा प्रकार घडताच पोलिसांनी तत्परता दाखवून गुन्हेगाराला अटक करण्याऐवजी हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रकार केला. ही पाशवी घटना वृत्तपत्रांतून नुसती वाचून सर्वसामान्य माणसांच्या अंगावर शहारा आला. मन या सैतानी कृत्याने क्रोधाने भरून गेले तिथे घटनास्थळी हजर असणा-या पोलिसांसारख्या व्यक्तींच्या मनात हे प्रकरण दडपण्याची भावनाच कशी निर्माण होऊ शकते ?आपले  खाते आणि कर्तव्यावरची निष्ठा वगैरे सोडाच पण या कायद्याच्या रखवालदारांच्या माणूस असण्याबद्दल शंका निर्माण करणारी ही बाब आहे.

दुसरी गोष्ट आजतक सारख्या बेजबाबदार आणि टी आर पी ला भुकेलेल्या प्रसार माध्यमांची . या बालिकेच्या घरी जाऊन या वाहिनीचे रिपोर्टर तिच्या नातेवाईकांची यावरील प्रतिक्रिया विचारात होते. अशी धक्कादायक घटना ज्यांच्या कुटुंबाबाबत घडली त्यांची काय प्रतिक्रिया असेल हो ? मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारी ही जात आहे याची खात्री हे वृत्तांकन पाहताना पटली. घटनेचे गांभीर्य विचारात घ्यायचे नाही काही नाही . फक्त ताज्या बातम्या . मग त्या कोणत्याही असोत. कसल्याही असोत . ही खळबळ जनक बातम्यांसाठी वखवखलेली माध्यमे जितकी दोषी आहेत असल्या प्रकारात तितकेच असेल शोज आपल्या दिवाणखान्यात बसून पाहणारा असंवेदनशील समाज देखील दोषी आहे .


या सर्व प्रकारावर कळस चढवला तो गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या आजच्या वक्तव्याने . या व्यक्तीची कोणत्याही घटनेसंदर्भातली प्रतिक्रिया नेहमीच असंवेदनशील आणि वादग्रस्त असते. मग ती कोळसा घोटाळ्या संदर्भातील प्रतिक्रिया असो कि पुणे बॉम्बस्फोटाबाबतीतील प्रतिक्रिया असो अथवा दहशतवाद्यांना श्री संबोधणे असो. यांचे बोलणे ऐकले कि यांचे डोके ठिकाणावर आहे कि नाही याची शंका यावी. नेमके काय पाहून या व्यक्तीला गृहमंत्री बनवले असावे? आणि इतकी बेजाबदार विधाने करून देखील ही जडमती व्यक्ती कोणत्या पुण्याईवर पडला चिटकून आहे ?

आज संसदेत विरोधकांनी दिल्ली बलात्काराच्या घटनेवरून गरादोळ माजवला. सुशीलकुमारांवर हल्ला चढवत सुशीलकुमारांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर संतप्त होऊन सुशील कुमारांनी . ' बलात्काराच्या घटना देशात सगळीकडेच घडत असतात. दिल्लीतील बलात्काराचीच एवढी चर्चा का ? '  असा अजब सवाल केला. या गुह्स्थाच्या मुर्दाड मनाचे आणि गेंड्याची कातडीचे नवल वाटावे असेच हे विधान आहे. बलात्कार सर्वत्र होतातच, होतच राहणार असाच काहीसा त्यांचा नूर होता. देशाच्या गृहमंत्री पदी विराजमान व्यक्तीने असे बेजबाबदार विधान करावे ही घटना या संदर्भात उसळलेल्या आगीत तेल ओतणारी आहे. सुशीलकुमार शिंदे या गृहस्थाला तीन मुली आहेत हे खरे वाटू नये त्यांचे हे विधान पाहता .

सत्तेच्या कैफाने धुंद झालेल्या या मुर्दाड मनाच्या राजकारण्यांना घरी पाठवण्याची वेळ आता आलेली आहे असाच संदेश या वक्तव्याने जनतेला दिला आहे .

आणि दुसरीकडे एक घटना जनतेच्या राग काहीसा शांत करणारी त्यांच्या भडकलेल्या मनाला काहीसा थंडावा देणारी आहे. नराधम मनोज कुमारला तिहार जेलमधील कैद्यांनी रविवारी रात्री मरेपर्यंत मार दिला. मनोज कुमारला शनिवारी बिहारमधून अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या मनोजकुमारला रविवारी तिहार जेलमध्ये आणले गेले. तिथे त्याला बराक नंबर आठमध्ये ठेवण्यात आले होते. मनोजच्या क्रूर कृत्याची माहिती येथील कैद्यांना वर्तमानपत्रांतून आधीच मिळाली होती. तसेच ठिकठिकाणी छापून आलेले फोटोही कैद्यांनी पाहिले होते. त्यामुळे कैद्यांमध्ये त्याच्याबद्दल प्रचंड संताप होता.

     मनोजला तिहारमध्ये आणल्यानंतर कैद्यांनी दिवसभर कुठलीही गडबड केली नाही. मात्र, रात्री साडेअकराच्या सुमारास आठ नंबरच्या बराकीतील कैद्यांनी मजोजकुमारला घेरले आणि त्याला बेदम चोप दिला. पोलिसांनी धावाधाव करून मनोजला संतप्त कैद्यांच्या तावडीतून सोडवले. अन्यथा मनोजकुमारचा न्याय तिथे जागीच झाला असता. इथून पुढचे प्रत्येक क्षणाचे त्याचे आयुष्य हे मानवतेच्या नावावरचा धब्बा आहे.


मग आजचा रोखठोक सवाल आहे आमच्या वाचकांना कि सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्या या असंवेदनशील मोठमोठ्या गुन्हेगारांपेक्षा तिहार तुरुंगातील छोट्या मोठ्या गुन्हांसाठी शिक्षा भोगणारे तरीही मनातला माणुसकीचा झरा न आटू दिलेले हे कैदी जनतेला जवळचे वाटले तर त्यात नवल काय ?   

              सुहास  भुसे 
   (रोखठोक साठी २३-०४-१३ )