About

Sunday 25 December 2016

संस्कृतींची स्मारके

इंका लोकांनी श्वास घ्यायला कठीण अश्या उंच डोंगरावर बांधलेली प्रचंड दगडी बांधकामे ही इंका संस्कृतीची ओळख आहे. कोलासियम, फोरम, पैंथेऑन, प्रचंड आणि अद्भुत स्थापत्य पेश करणारी अनेकानेक स्मारके ही रोमची आणि रोमन लोकांची ओळख आहे. इजिप्तमधले पिरॅमिड ही इजिप्तीशियन लोकांची ओळख आहे. नाईल नदीच्या पात्राजवळ अबु सिंबेल येथे फॅरॉव रामासिसचे प्रचंड पुतळे अनेक वर्षे नाईलच्या पात्रातुन वाहतूक करणाऱ्या परदेशस्थांवर इजिप्शियन सत्तेचा, ऐश्वर्याचा, सामर्थ्याचा वचक ठेऊन होते. ग्रिकांचे एक्रोपोलीस, अथिनाचे भव्य पुतळे, पार्थेनॉन, क्रीटचा भूलभूलैया राजवाडा ही ग्रीकांची ओळख आहे.

काय प्रेरणा असतात भव्य दिव्य स्मारके बांधण्यामागे ?
मानवी संस्कृतीच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर मानवाने आपले सर्वस्व ओतुन अशी भव्य दिव्य स्मारके का उभी केली असावीत ?

दुसऱ्या कंगोऱ्यातुन विचार करू.
पाच शाह्यांच्या संयुक्त सैन्याने विजय नगरचा विध्वंस का केला ?
मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी जेथे जातील तिथल्या प्रार्थनास्थळांचा, स्मारकांचा विध्वंस का केला?
लादेनने बामियान मधील बुद्धाच्या मूर्त्या का फोडल्या ?
आक्रमकांनी अलेक्झांड्रीया, नालंदा अशी विद्यास्थाने का नष्ट केली ?
दूसरे महायुद्ध संपल्यावर दोस्त राष्ट्रानी, थर्ड राइशची जवळ जवळ सगळी भव्य बांधकामे,  हिटलर, मुसोलिनीच्या नामोनिशाण्या का नष्ट केल्या ?

या विध्वंसाचे कारण निव्वळ बदला किंवा धर्मवेड नसून त्याहुन अधिक काहीतरी आहे. एखादे भव्य स्मारक किंवा धार्मिक स्थान संबंधित समुदायाच्या अभिमानाचे भावनात्मक केंद्र असते. त्यांच्या पिढ्यानपिढ्यांचे संचित असते. ते त्यांना जगण्याचे बळ देत असते. तो त्यांचा प्रेरणास्त्रोत असतो. आणि त्यावर घाव घातला, एकदा ते नष्ट केले की मनोधैर्य ढासळलेल्या लोकांचा पराजय करणे, त्यांना गुलाम बनवणे अगदी सोपे असते.

भव्यतेची ओढ आणि दिव्यतेचे आकर्षण ही मानवाची आदिम प्रेरणा आहे. संस्कृत्या उदय पावत राहतील, नष्ट होत राहतील, आपल्या चिरंतन स्मारकांद्वारे त्यांनी काळावर उमटवलेले अमिट ठसे मात्र कायम राहतील. अनंत काळापर्यंत जगाला त्या संस्कृतिच्या, त्या राष्ट्राच्या महानतेची आठवण करून देत राहतील.
सुहास भुसे

Saturday 24 December 2016

स्मारक विरोधकांची वर्गवारी

सामान्य शिवप्रेमी जनतेला राजकीय डावपेच कळत नाहीत. त्यांची प्रामाणिक इच्छा आहे, आपल्या थोरल्या छत्रपतींचे त्यांच्या कार्याला साजेसे भव्य दिव्य स्मारक व्हावे. त्यांना हे स्मारक काँग्रेसच्या की भाजपाच्या कारकिर्दीत बनतेय याच्याशीही काही घेणे देणे नाही...
मात्र काही लोक शिवस्मारकाला विरोध करत आहेत. छत्रपतींच्या महाराष्ट्रात हे व्हावे ही खरे तर दुर्दैवी गोष्ट आहे. यात प्रामुख्याने तीन प्रकारचे लोक आहेत.

1. हे लोक छत्रपतींचा पूर्वापारपासून दुःस्वास करतात. छत्रपतींच्या इतिहासातील नगण्य पात्रांचे उदात्तीकरण करणारे हेच लोक ... छत्रपती शंभु राजांचे चरित्र विपर्यस्त करणारे हेच लोक.

2. या प्रकारचे लोक हे वरच्या पहिल्या प्रकारच्या लोकांनी बुद्धिभेद केलेले लोक असतात. पाहिल्या प्रकारातील लोकांनी सांगावे आणि यांनी माना डोलवाव्या हे ही पूर्वापारपासून चालत आलेले आहे.

3. तिसऱ्या प्रकारचे लोक हे सवंग प्रसिद्धीसाठी हपापलेले आणि स्वतःला बुद्धिवादी म्हणवुन घेणारे लोक असतात. यांना प्रवाहाच्या विरुद्ध मत मांडण्याची प्रचंड खाज असते. लाखो लोक स्मारक व्हावे म्हणत आहेत मग मीही तेच म्हणालो तर माझे वेगळेपण ते काय राहिले ?
अश्या विचाराने हे लाइककमेंट पिपासु लोक स्मारकाला विरोध करत राहतात. त्यासाठी ते दुर्गसंवर्धना पासून आदिवासी शिक्षणापर्यंत आणि उदबत्ती पासून हत्तीपर्यंत एकूण एक यच्चयावत विषय स्मारकाच्या विषयात घुसडतात. वरच्या दोन प्रकारच्या लोकांच्या तुलनेत हे लोक अधिक घातक आणि अस्तनीतले निखारे असतात.

शिवप्रेमींनी स्मारकाला विरोध करणारे लोक यापैकी कोणत्या प्रकारात येतात याची वर्गवारी करून त्यांच्यापासून सावध राहावे.

©सुहास भुसे





Tuesday 20 December 2016

दिघे साहेबांची गोची

दिघे वहिनीनी पाण्याची बाटली हातात देत देतच विचारले,
"अहो, आजचे उरलेले वीस रूपये द्या  परत.. खालून भाजी आणते पटकन.. "
दिघे साहेब जरा दचकलेच..
थोड्स दबकत दबकत त्यांनी दहाची नोट काढून समोर धरली.
" हे काय ? दहाच रूपये ? काय हो अजून दहा रूपये कुठे गेले ?"
दिघे वहिनी खास राखून ठेवलेल्या जरबयुक्त आवाजात विचारत्या झाल्या.

दिघे वहिनी रोज ऑफिसला जाताना दिघे साहेबांना 30 रूपये मोजुन देतात. 10 रु बसने जाणे 10 रु येणे आणि मधल्या सुट्टीत चहासाठी दहा रूपये.
आज सुट्टे नसल्याने 50 ची नोट दिली तर दिघे साहेबांनी मौका बघून 10 रूपयांचा भ्रष्टाचार केलेला दिसत होता.
दिघे वहिनींची नजर चुकवत दिघे साहेब चाचरत म्हणाले,
"अग आज बस उशिरा आली म्हणून तोवर जरा कोपऱ्यावरच्या ठेल्यावरुन मसाला पान घेऊन खाल्ले मी "
हे ऐकून दिघे वहिनी जाम भडकल्या.
"मसाला पान खाताहेत मसाला पान, पेशवाई थाट हवा साहेबांना सगळा "
अशी गडगडाटी नांदी करत त्यानी दिघे साहेबांच्या वेंधळया आणि खर्चिक स्वभावावर तोफ डागली.
त्या माऱ्याने अर्ध्या तासाने भोवंड येऊन दिघे साहेब त्यांना मध्येच थांबवत म्हणाले,
"अग मी हवे तर उद्या येताना चालत येईन दंड म्हणून, उद्या 20 च रूपये दे मला. "
यावर संतुष्ट होऊन दिघे वहिनी भाजी आणायला खाली निघुन गेल्या.

एक प्रदीर्घ मोकळा श्वास घेत जरा रिलीफसाठी म्हणून दिघे साहेबांनी फेसबुक ओपन केले. सगळ्या वॉलवर मोदींना शिव्या आणि नोटबंदी निर्णयाची खोबरेल लाऊन ठासणाऱ्या पोस्टस् चा खच पडला होता. ते सगळे वाचून दिघे साहेबांना कळेचना की या लोकांना नक्की कसली अडचण येतेय ?
बस आणि चहासाठी असे किती पैसे लागतात रोज ?
"द्वेष्टे पुरोगामी, आणि अडाणी खेडूत शेतकरी कुठले " अस पटुपुटत त्यांनी WTS APP उघडले, आणि तिकडून आठ दहा छान छान नोटबंदी समर्थनाचे मेसेज कॉपी करून त्या अडाणचोट लोकांना चांगलीच सणसणीत उत्तरे दिली.

कमेंटच्या रिप्लाई मध्ये बसणाऱ्या शेलक्या शिव्या वाचायला ते थांबलेच नाहीत. दिघे वहिनी परत यायच्या आत त्यांना सगळी भांडीही घासुन ठेवायची होती.
©सुहास भुसे.


Saturday 10 December 2016

भवानी

भल्या पहाटे पहिल्या कोंबड्याला काशिनाथ जागा झाला. कडाक्याच्या थंडीत पांघरुणात मुरसून पडायचा मोह टाळून त्याने शाल अंगाभोवती गुंडाळून डोक्याला मफलरची टाफर मारली. चुलीतल्या गोवरीची राख हातावर घेत मिसरी करत त्याने आनंदीला त्याच्या कारभारणीला हाक मारली. आनंदी त्याच्या आधीच उठली होती. त्याची हाक ऐकताच चहाचे आधण ठेऊन तिने गरम पाण्याचा तांब्या त्याच्या हातात ठेवला. थंडीत अंगाचे मुटकुळे करून गोधडीत अंग चोरून झोपलेल्या पोरांना शिरपती आणि सदाला उठवायचे तिच्या जीवावर आले होते. पण काशीनाथची दुसरी हाक ऐकताच तिने हाका मारून ,हलवून त्यांना जागे केले. सगळ्यांनी पटकन उरकून गरम गरम चहा घेतला आणि हातात ब्याटऱ्या घेऊन कारल्याच्या फडात शिरले.

काशिनाथने घरच्या घरी ढोरमेहनतीने कारल्याचा फड मोठा जोरात जोपला होता. बोरी-बांबूच्या मांडवावरून हिरवीगार. कोवळी कोवळी लांबसडक कारली लोंबत होती. सगळ्यांनी अंग झाडून कामाला सुरवात केली. दिवस फटफटेपर्यंत सगळ्यांनी जोर मारून दहा क्रेट माल हातावेगळा केला.

अजून तासाभरात चार सहा क्रेटचा पल्ला मारून सगळ्यांनी माल उचलून अंगणात आणला. आनंदी पोरांना घेऊन कारली निवडायला बसली आणि काशिनाथ गुरांच्या धारा काढायला गेला. काशिनाथच गुरांची झाडलोट, आंबवणी, धारा, वैरण वगैरे आटोपेपर्यंत आनंदीने पोरांना घेऊन सगळी कारली छाटली. क्रेटमध्ये खाली केळीची पाने घालून ती कोवळी कोवळी कारली अलगद भरली. वरून त्यांना उन लागू नये म्हणून गोणपाटाची पोती ओली करून टाकली. सगळी बेस्तवार व्यवस्था लावून ती न्याहरीकडे वळली. झटपट न्याहरी बनवून तिने मुलांचे आटोपून त्यांना शाळेला पिटाळले. काशिनाथनेही झटकन न्याहरी करून आनंदीच्या मदतीने सगळी क्रेट गाडीच्या दोन्ही बाजूनी बनवून घेतलेल्या कॅरियरला लावून घेतली.

बाजार अकरा वाजल्यापासून खरा रंगात येई. म्हणजे काशिनाथला दहापर्यंत तरी बाजारात जायला लागे. आज सगळे लवकर उरकले म्हणून काशिनाथ जरा खुश झाला. कारली विकून त्याला कीटकनाशकवाल्याची उधारी सारायची होती, खतवाल्याला पुढच्या बाजाराचा वायदा करायचा होता. धाकट्या सदाचा शर्ट पाठीवर फाटला होता. दोन महिने झाले पोरगे ठिगळ लावून शर्ट घालत होत. नवा शर्ट हवा म्हणून बोंब मारत होते. त्याला नवीन गणवेश घ्यायचा होता. किराणा सामान आणायचे होते. म्हशीला भुस्सा आणायचा होता. सगळ्या कामांच्या यादीची एकवार मनातल्या मनात उजळनी करून त्याने मोटारसायकलला किक मारली.

बाजारात पोहोचायला काशिनाथला सव्वादहा वाजले. एका बाजूला गाडी लावत तो गाडीवरून उतरून एक एक क्रेट काढून खाली रचून ठेऊ लागला. तो क्रेट काढतो न काढतो तोच आठ, दहा व्यापारी बायांनी आणि माळणींनी त्याला गराडा घातला.

सुगलाबाई म्हणाली, ‘मामा देयाची का कारली?’
‘द्यायला तर आणली की व बाई, मागा की’
’बाजार लय पडलाय मामा, कुत्र खाईना माळव्याला. पण सगळी कॅरेट घेतो तुझी.’
‘कशी घेता व बाई, मागा गुत्तीच.’
’१० रु देतो बग एका कॅरेटला.’
१० रु एका कॅरेटला हे ऐकून काशिनाथ हतबुद्धच झाला. पंधरा ते अठरा किलो कारली फक्त दहा रूपयांना ?

‘चेष्टा करता का मावशी गरीबाची, नीट मागा की बाय जरा,’
‘धा रुपयाच्या वर परवडत न्हाय मामा, पण माल चांगलाय म्हणून तुला दोन रुपये वर देतो, १२ रुपयला दे कॅरेट.’
‘मावशी, जा बाय तुझ्या वाटनं, आपल न्हाय जुळायचं.’

हे ऐकत उभारलेली रखमा सौदा तुटतोय अस पाहून पुढे झाली. वरचे पोते बाजूला करून कॅरेट मध्ये हात घालत कारली दाबून बघत म्हणाली,
‘मामा १३ ला देयाची का? एकच भाव..’
हळू हळू काशिनाथ भोवती त्या सगळ्याजणी गिल्ला करू लागल्या. १०रु १२ रु १४ रु १५ रु..

काशिनाथच्या मस्तकातली अळी हलली.. उरफोड मेहनत करून जोपलेली कोवळी लूसलुशीत कारली मातीमोल भावाने लुबाडू पाहणाऱ्या त्या बायांची त्याला भयंकर चीड आली.
कॅरेटमध्ये चापचून १५ रु कॅरेट भाव करणाऱ्या एका बाईला संताप अनावर होऊन तो म्हणाला,
‘ये भवाने, ठेव ती कारली खाली. लाज वाटत नाही का १५ रु ला १५ किलो कारली मागायला?’

बस झाल..काशिनाथ च्या तोंडून रागाच्या भरात एक शिवी काय निसटली, सगळ्या साळकाया माळकाया त्याच्यावर तुटून पडल्या. रखमाने त्याचा शर्ट पकडला,
‘का रे मुडद्या, बाया माणस बगून शिव्या देतोस व्हय रं ?’
अस म्हणत रखमाने थोडा जोर लावताच कुजून गेलेल्या त्या शर्टच्या दोन चीरफाळ्या झाल्या. संधी साधून सुगलाने काशिनाथच्या एक श्रीमुखात भडकावली. बाया कचाकचा शिव्या देत जमेल तशी धराधरी करत होत्या आणि
काशिनाथला भर बाजारात होणारी आपली विटंबना बघून धरणी दुभंगून पोटात घेईल तर बर अस झाल होत.

अखेर त्या महामाया दमून बाजूला झाल्या व याच्या कारल्याला आता कोणी हात सुद्धा लाऊ नका असा इतर बघ्या व्यापाऱ्यांना दम टाकत तिथून चालत्या झाल्या.

शेजारच्या हॉटेलमधल्या पोऱ्याने काशिनाथला पाणी आणून दिले. काशिनाथने लडखडत उठून सगळी कॅरेट परत गाडीच्या कॅरियर ला लावली. एक भकास नजर बाजारावर टाकत त्याने गाडीला किक मारली. बाजाराच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गाढवलोळीच्या उकीरड्याजवळ त्याने गाडी थांबवली. आणि एक एक कॅरेट काढून उकिरड्यावर पालथे केले. सगळी कॅरेट पालथी करून डोक्याला हात लाऊन तो खाली बसला. इतका वेळ आवरून धरलेला कढ आता अनावर झाला आणि झाडासारखा अचल काशिनाथ विकल होऊन ढसाढसा रडू लागला.
(सत्यघटनेवर आधारित)

©सुहास भुसे

Thursday 3 November 2016

ऊसाचे अर्थकारण

राजू शेट्टी यांची ऊसाला 3200 रूपये दर देण्याची मागणी आणि पवारांनी त्यांना दिलेले उत्तर हा विषय सध्या चर्चेत आहे. साखरेचा दर आणि ऊसाला देण्यात यावा किंवा दिला जाऊ शकेल असा रास्त दर याबद्दल बऱ्याच प्रमाणात संभ्रम दिसून येतो. उदा. समजा साखर सरासरी 30 किलो प्रमाणे विकली गेली. तर कारखान्याला ऊसा पासून प्रतिटन किती उत्पन्न मिळू शकेल ?

थोड़े गणित मांडू ...

साखर उतारा चोरण्यात आपले कारखानदार निष्णात आहेत. दाखवलेला साखर उतारा 11, 12 ते 13 इतका असतो, पण तो विश्वसनीय नाही. पूर्वी हडकी ऊस असायचा, पाडेगाव नावाचे सुधारित बेणे आले, मग को 7219 ,को 265 अशी सुधारित बेणी आली. दर वेळी जास्तीत जास्त साखर उतारा हे टारगेट ठेऊन उसाच्या प्रजातित सुधारणा करण्यात आल्या.
सध्या को 671, को 86032, को 94012 या अत्यंत सुधारित जातीच्या ऊसाची लागवड करण्यात येते. अगदी निरपेक्ष साखर उतारा तपासला गेलाच तर तो नक्कीच 15 च्या आस पास असू शकतो.

साखर उतारा अर्थात एक टन ऊसापासून किती क्विंटल साखर मिळते त्याचे प्रमाण.  जर आपण अंदाज केलेला 15 चा उतारा ग्राह्य धरला तर एक टन ऊसापासून 30 रु किलो च्या भावाने 4500 रु ची साखर मिळेल. जर कारखाने जाहीर करतात तो 11 ते 12 चा उतारा ग्राह्य धरला तर 3500 ते 3800 रु ची साखर मिळेल.

ऊसापासून मिळणारी साखर हा उत्पन्नाचा एक भाग झाला. ऊस हा नारळाप्रमाणे कल्पतरु आहे. त्याचा कोणताही भाग वाया जात नाही. कारखाने ऊसापासून साखरेव्यतिरिक्त मद्यार्क हे महत्वाचे उत्पादन घेतात. मद्यार्कापासून मद्य तयार होते. शिवाय मळी खत म्हणून विकली जाते, चोयांचा भुस्सा विकला जातो. अनेक कारखान्यांचे को जनरेशन प्रकल्प आहेत. त्यांमार्फत विज विकली जाते. काही कारखान्यांचे प्रायोगिक तत्वावर इथेनॉल प्रकल्प सुरु आहेत.

या सर्व सहउत्पादनांपासून कारखाना प्रतिटन अंदाजे 1000 ते 1500 रु सहज मिळवू शकतो.

आता साखरेचे 3800 किंवा 4500 आणि हे 1000 किंवा 1500 मिळून होतात 4800 किंवा 6000 रूपये.

प्रतिटन मेन्टेनेन्स खर्च किती होतो ?
काही छोटे कारखाने 1500 टनी काही 2500 टनी काही 3500 तर काही 5000 टनी आहेत. रोजी होणाऱ्या या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गाळपामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होते. मागे एकदा शरद जोशीनी मांडलेल्या आकडेवारी नुसार हा उत्पादन खर्च 600 रु ते 650 रु प्रतिटन इतका आहे. जोशिंच्या वेळेपासून आतापर्यन्त यात जास्तीत जास्त दुप्पट वाढ झाली अस ग्राह्य धरुन हा खर्च आपण 1200 रु प्रतिटन पर्यंत आणु.

आता आपण गणित मांडलेल्या अंदाजे कमीत कमी व जास्तीत जास्त उत्पन्नातुन हा खर्च वजा करू. 4500 दर घेतला तर उरतील 3300 रूपये आणि 6000 दर घेतला तर उरतील 4800 रूपये .

यानुसार कारखान्यानी ऊसाला प्रतिटन 3200 रूपये किमान भाव देण्यास काहीच हरकत नाही.

हे गणित सर्वसाधारण व ढोबळ आहे. यात चूका असू शकतील पण ऊसाच्या अर्थकारणाचा सर्वसाधारण अंदाज येण्यास हे पुरेसे आहे. राजू शेट्टी काय म्हणतात किंवा सध्या ते काय करतात हा राजकीय वादाचा मुद्दा आहे. किंवा सत्तेत त्यांची होत असलेली मुस्कटदाबी आणि त्यांची सत्तालोलुपता हा ही चर्चेचा विषय होऊ शकेल. पण ऊस उत्पादकांना ऊसाचे अर्थकारण व्यापक प्रमाणावर समजावून देणारी राजू शेट्टी ही पहिली व्यक्ती आहे. कारखानदार उसाला 800 रु 900 रु देऊन लोकांची लूट करत होते त्या काळात उसाला 1600 रु म्हणजे जवळ जवळ दुप्पट भाव मिळवून देण्याचे शेट्टी यांचे श्रेय नाकारता येणार नाही.

बाकी राजकारण बाजूला ठेऊन कधीतरी ऊस दराच्या मागनीचा शेतकरी केंद्रीभूत ठेऊन सहानभूतिपूर्वक विचार व्हायलाच हवा.
©सुहास भुसे.


Thursday 27 October 2016

भारतीय लोकशाहीची परिपक्वता

भारतीय लोकशाही आणि एकूणच समाजाच्या अपरिपक्वतेचे दर्शन सर्व प्रकारच्या माध्यमांतुन सुरु असलेल्या नॉन इश्शुज् वरील चर्चातुन घडते.
मागच्या महिन्यात कोणता विषय ऐरणीवर होता तर सर्जिकल स्ट्राइक, त्यानंतर तुझी जात माझी जात , मागचा पूर्ण आठवडा पेंग्विनने व्यापुन टाकला, काल आज काय तर सायरस मिस्त्री ...

प्रत्येक आला दिवस नवीन फोल विषय घेऊन येतो.
आणि मग सोशल मीडिया, वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल्सवर त्यावर मतामतांचा गलबला सुरु होतो.

रोजच्या दैनंदिन जीवनात आपण अनेक समस्यांना सामोरे जात असतो. ग्रामीण भागात पावलापावलावर नवीन समस्या आहेत. शेतीच तर रोज गावे तेवढे कमी अस रडगाणे आहे. रस्ते,वीज, पाणी यांचे कायमचे बारा वाजलेले आहेत. आधुनिक इंफ्रास्टक्चर चा दूरदूरवर गंध देखील नाही. कोणतीही सरकारी किंवा बिगर सरकारी व्यवस्था आपले काम प्रामाणिकपणे करत नाही.

शहरी भागातही सगळ ऑलवेल आहे अस नाही. जे काही थोडे फार बरे आहे ते फक्त ग्रामीण भागाच्या तुलनेत. खड्डामय रस्ते आहेत, गुंडगिरी आहे, भयंकर महागाई आहे, वाहतूक समस्या आहेत, प्रदूषण आहे, बेकारी आहे.
पण रोज हे सगळे फेस करत असूनही कोणी यावर बोलायला तयार नाही.

दिवसाला तीन शेतकरी मरतात इथे आणि कुठला फालतू पेंग्विन मेला त्यावर आपले गप्पांचे फड रंगतात.  कोण फवाद, कोण सलमान ? कोण तो सायरस मिस्त्री ? त्याला टाटांनी काढला किंवा बाटांनी घेतला, कोणाला फरक पडतो इथे ?
पण लोकांना गॉसिप्स आवडतात, मसालेदार विषय आवडतात.  आपले माध्यम कर्मी आणि राजकारणी देखील लोकांची हीच नस ओळखून लोकांना नॉन इश्शुज् मध्ये गुंगवून ठेवतात. खऱ्या समस्यांवर चर्चाच होऊ दिली जात नाही. लोकांच्या भावनांना हात घालून त्यांच्या पोटावर लाथ मारली जाते.

सर्व सार्वजनिक व्यासपीठांवरचे चर्चांचे विषय जोवर बदलत नाहीत आणि खरा महत्वाचा कोणता विषय आहे याबद्दलचा प्राधान्यक्रम जोवर समाजाच्या ध्यानी येत नाही तोवर भारतीय लोकशाही परिपक्वतेपासून शेकडो योजने दुरच राहील.
©सुहास भुसे


Wednesday 19 October 2016

प्रेस्टीज आणि ख्रिस्तोफर नोलन

काल सहज एका साइटवर प्रेस्टीज सापडला. खुप दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये असताना पाहिलेला. टीवीवरही सहसा लागत नाही. माझ्या तर जवळ जवळ विस्मृतित गेलेला. पण काल परत एकदा पाहिला.
मला ख्रिस्तोफर नोलन भयंकर आवडतो .  
कोणताही मूवी फक्त त्याच्या नावावर पहावा.
नोलनचे सिनेमे एक्शनपट, थरारपट वगैरे काहीही नसतात. ते फक्त नोलनपट असतात.
एखादा दिग्दर्शक चित्रपटावर आपला इतका अमिट ठसा उमटवण्यात फार अपवादाने यशस्वी होतो.
कुठलाही विषय नोलन अश्या उंचीवर नेऊन ठेवतो की आपण चकित होतो.
बॅटमॅन सारख्या फैंटसी एक्शनपटाला नोलनने जी एथिकल , फिलोसोफीकल आणि सोशलॉजीकल डूब दिली आहे त्याला खरेच तोड़ नाही.
कुठलीही कन्सेप्ट नोलन याच पद्धतीने हाताळतो. आणि साध्या सरळ लौकिक कहानीला अलौकिक बनवून सोडतो .

प्रेस्टीज ही दोन जादूगारांमधील व्यावसायिक स्पर्धेची कहाणी आहे. ह्यू जॅकमॅन आणि  क्रीस्टीअन बेल या दोन तुल्यबळ अभिनेत्यांची जुगलबंदी पाहणेबलच आहे. एकमेकांवर कुरघोडी करत, एकमेकांची सीक्रेट्स चोरत या दोघांची कारकीर्द सुरु असते. दरम्यान एका अपघातादरम्यान ह्यू जॅकमॅनची पत्नी क्रीस्टीअन बेलच्या चुकीमुळे मरते आणि या वैराला वेगळीच धार येते.

जादूगर जादू तीन भागात सादर  करतो, द प्ले, तो एखादी वस्तु दाखवतो. टर्न, मग ती वस्तु गायब करतो. आणि प्रेस्टीज, ती वस्तु अनपेक्षित ठिकाणी प्रकट करतो. या तिन्ही भागांचे अचंबित करणारे सादरीकरण करणारी एक ट्रांसपोर्टेड मॅन नावाची ट्रिक क्रीस्टीअन बेल शोधतो आणि ह्यू ती ट्रिक चोरण्याच्या मागे लागतो. दरम्यान फ्लॅशबॅक तंत्राचा वापर करत नोलन प्रेक्षकांना असे जोरदार धक्के देत राहतो की सुरवातीला खुर्चीला खिळलेला प्रेक्षक सिनेमा संपला तरी त्यातून बाहेर येत नाही.

अजुनही बघितला नसेल किंवा बरेच दिवसांपूर्वी पाहिला असेल तर परत एकदा, पुन्हा पुन्हा बघावा असा नोलनपट म्हणजे प्रेस्टीज ... हाच नव्हे तर बॅटमॅन ट्रिलजीसहित इंस्पेशन, इंटरसेलर असे नोलनपट शोधून शोधून पाहावेत, संग्रही ठेवावेत, पुन्हा पुन्हा पाहत पुनः प्रत्ययाचा आनंद घेत राहावा.
©सुहास भुसे


मोर्च्यांवर टीका का होतेय?

मागील साठेक वर्षांत अनेक जातींचे-धर्मांचे मोर्चे महाराष्ट्राने पाहिले ..
अनेक मोर्च्यांतुन बहकलेल्या मॉब मेंटालिटीमधून प्रक्षोभक भाषा वापरली गेली. बऱ्याचदा जाळपोळ तोडफोडी घडल्या. मोर्चे हिंसक बनले.
पण अस होऊनही मोर्च्यात सहभागी जातीव्यतिरिक्त इतर जातींनी त्या मोर्च्यांवर कधी सर्वंकष जात्यंध टिका केल्याचे उदाहरण नाही.

मराठा क्रांती मोर्च्यांच्या बाबतीत बरोबर याच्या उलट घडत आहे. मोर्च्यात सहभागी जातीसमाज अत्यंत शांततेत महाविराट मोर्चे आयोजित करत संपूर्ण जगात शिस्तीचे नवे मानदंड स्थापित करत आहे.
तर मराठेतर जातीतील सर्वस्तरीय विजारवंत या मोर्च्यांवर जात्यंध टिका करत सामाजिक वातावरण कलुषित करण्यात धन्यता मानत आहेत.

वृत्तपत्रातुन मराठेतर पत्रकार टिका करत आहेत, न्यूज चॅनेलवर वक्ते, प्रवक्ते खुसपटे काढत आहेत. समाजाशी केव्हाच फारकत झालेले लेखक आपली नसणारी प्रज्ञा पाजळत स्वजातीप्रेमाचे विकृत दर्शन घडवत आहेत. फेसबुकी विजारवंत तर बुडाला आग लागल्याप्रमाणे पोस्टवर पोस्ट करत आपल्या वांझोटया जात्यंध विरोधाचे किळसवाणे प्रदर्शन करत आहेत.

हे सर्व कमी की काय म्हणून प्रत्यक्ष सत्ताधारी आणि कॅबिनेट मंत्रीदेखील अवास्तव, मुजोर, जात्यंध विधाने करून या असंतोषाला खतपाणी घालत आहेत. सामाजिक न्यायमंत्र्यासारखा जबाबदार पदावरील व्यक्ती आजकाल कोणीही उठते आणि आरक्षण मागते अशी गरळ ओकत आहे.

सामजिक वातावरण धूमसत आहे, सलोखा धोक्यात येत आहे म्हणून अरण्यरुदन करत टाहो फोडणाऱ्या निजाती विजारवंतांनी आपली लेखनी या सर्व मराठाद्वेषी जात्यंध घटकांवर चालवायला हवी. तरच त्यांची सामाजिक सलोख्याची चिंता दांभिक नाही अस सिद्ध होईल आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल. सामाजिक सलोखा ही सर्व सामाजिक घटकांची जबाबदारी आहे. तो सर्वांना मिळूनच राखता येईल.
©सुहास भुसे


Friday 30 September 2016

कष्टेवीन फळ नाही ?

एक म्हातारा शेतकरी मृत्युशय्येवर असताना आपल्या चार मुलांना बोलावुन त्यांना आपण शेतात गुप्तधन पूरले आहे अस गुह्य सांगतो, आणि मुले मग सगळे शेत खणून काढतात. गुप्तधन तर सापडत नाही पण मशागत चांगली झाल्याने पीक जोमदार येते व ती मुले सुखी होतात.
तात्पर्य:- कष्टेवीन फळ नाही.

मूल्यशिक्षणाच्या पहिल्या तासाला शिक्षक ही गोष्ट सांगतात. पण विद्यार्थी सकाळी नाष्टा करताना गुजरातमध्ये संगीत रजनीच्या कार्यक्रमात धनदांडग्यांनी पाडलेला नोटांचा पाऊस आणि त्यात पखवाज, तबले अर्धेअधिक पूरले गेलेले न्यूजमध्ये बघुन आलेला असतो.
आदल्या रात्री होमवर्क आटोपुन त्याने अब्बास मस्तानचा रेस 2 सारखा मुव्ही बघितलेला असतो. त्यातील व्हाइट कॉलर गुन्हेगारांची आलिशान जीवनशैली पाहिलेली असते.

दुसरीकडे वृत्तपत्रात त्याने मराठा क्रांती मूक मोर्च्यांमागच्या खदखदीची विश्लेषणे वाचलेली असतात. शेती आणि त्यात राब राबणाऱ्या शेतकऱ्यांची दुरावस्था तो उघड्या डोळ्यांनी बघत असतो. विद्यार्थ्याचं सामान्य ज्ञान इतके तरी खचितच पक्के झालेले असते की शेतकऱ्यांच्या 200 पिढ्या कष्टच करत आल्या आहेत. पुढच्या दोनशे पिढ्या जरी कष्ट करत अश्याच त्या काळ्या मातीत मेल्या तरीही तो नोटांची तशी मोजोरडी उधळण करू शकणार नाही.

सर मोठे आलेत सांगणारे, म्हणे कष्टेवीन फळ नाही. कष्ट केल्यावर घंटा फळ मिळते !! फळ मिळण्यासाठी तर कष्ट सोडून दूसरेच काहीतरी करायला लागते.
पुस्तकात आहे म्हणून सरांना शिकवावे लागते. आपल्याला पेपर लिहायचा असतो म्हणुन शिकावे लागते एवढाच त्याचा माफक अर्थ !!

गोष्टीच्या तात्पर्यासबंधी अस विचारचक्र विद्यार्थ्याच्या मनात सुरु असेल तर त्यात त्याचा दोष कसा म्हणायचा ?
©सुहास भुसे


Monday 19 September 2016

मराठ्यांना शैक्षणिक सवलती हव्यात

मराठा समाजाचे मोर्चे हा व्यवस्थेने केलेल्या दीर्घकालीन गळचेपीचा परिपाक आहे. व्यवस्था ही सर्वजातीय घटकांनी बनलेली आहे. त्यात गडगंज मराठा घराणीही आलीच. पण काही मोर्चा विरोधकांनी फक्त याच गोष्टीचे भांडवल करायला सुरवात केली आहे. तथापि विरोधकांनी आकसापोटी मांडलेला एक मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा आहे.

मराठा समाजातील दिग्गजांच्या ताब्यात अनेक शिक्षण संस्था आहेत हे वास्तव आहे. आज मराठा समाजापुढील सर्वात गंभीर प्रश्नांपैकी एक शिक्षण आणि नोकरी हा आहे. मराठा आरक्षण कायदेशीर लढाईअंती मिळेलच.. पण मराठा समाजाच्या ताब्यातील शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजासाठी खास राखीव कोटा आणि फीमध्ये सवलत असण्यास काहीच हरकत नाही.

अल्पसंख्य कम्युनिटीच्या शिक्षण संस्थांमध्ये त्यांच्या कम्युनिटीसाठी खास राखीव कोटा व खास सवलती असतात. ही त्यांची समाजाप्रति असणारी बांधीलकी आहे. एकमेकांना धरून राहण्याच्या आणि समाजाभिमुख वृत्तीमुळे या अल्पसंख्य कम्युनिटी बहुसंख्याकांना मागे टाकून पुढे गेल्या आहेत.

सोलापूरमधील टॉपचे कॉलेज म्हणून वालचंद कॉलेजकडे पाहिले जाते. ही संस्था जैन समाजाची असून जैन समाजाच्या मुलांना संस्थेत 40 % राखीव प्रवेश कोटा आहे. अश्या बहुसंख्य संस्थांच्या घटनेतच तशी तरतूद करुन ठेवलेली आहे. हा प्रयोग सर्व मराठा शिक्षण संस्थांनी अंमलात आणायला हवा.  आज मराठा नेते आणि शिक्षण सम्राट जे काही आहेत त्यात मराठा समाजाचा सिंहाचा वाटा आहे. समाजाचे ऋण मान्य करुन त्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

पवार साहेबांचे विद्या प्रतिष्ठान आहे,  पतंगराव कदमांचे भारती विद्यापीठ आहे. वैरागचे बाळासाहेब कोरके यांच्या शे दोनशे शिक्षण संस्था आहेत. बार्शीची जगदाळे मामांची शिक्षण संस्था आहे. रयत शिक्षण संस्थेवर देखील मराठा समाजाचेच वर्चस्व आहे. डी वाय पाटील आहेत, विखे पाटील आहेत. अजुनही अनेक मराठा धुरीणांच्या अश्या खंडोगणती शिक्षण संस्था आहेत.

सोशल मिडियावरील सर्व सुशिक्षित मराठा तरुणांनी यापुढील मोर्च्यांत मराठा समाजाच्या शिक्षण संस्थांमध्ये मराठा मुलांना 40 % राखीव कोटा आणि फी मध्ये 50 % सवलत ही जोडमागणी लावून धरायला हवी. यात येऊ शकणाऱ्या  कायदेशीर अडचनींवर मार्ग काढण्यात यावा किंवा योग्य पर्यायी मार्गांचा विचार व्हावा.

©सुहास भुसे


सहकार:विकास केंद्रे की पिळवणूक केंद्रे

'साखर कारखाने, विविध कार्यकारी सोसायट्या, सहकारी बँका आणि एकूणच सहकारी चळवळ यांच्यामुळेच मराठा समाजाची पिळवणुक झाली आणि या सर्व किंवा बहुतेक संस्था मराठा नेत्यांच्याच ताब्यात आहेत.'

हे शहरी विश्लेषकांचे -जे उन्हाळी सुट्टीला चारेक दिवस हवापालट म्हणून ग्रामीण भागात जातात न जातात- मराठा मोर्च्यांमागील असंतोषाचे आवडते विश्लेषण आहे.

सहकारी साखर कारखाने कोणत्या संघर्षातून उभे राहिले , त्यासाठी किती मोठा लढा दिला विखे बाबा, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील अश्या दिगग्जांनी... याची कृपया या अभ्यासकांनी माहिती घ्यावी ..
त्या अत्यंत गरीबीच्या काळात फाटक्या-तुटक्या शेतकऱ्यांकडून वणवण करुन त्यांनी शेअर्सचे पैसे कसे जमवले याचा अभ्यास करावा.

कोरडवाहु क्षेत्रात भगीरथ प्रयत्नांनी हरित क्रांती कशी घडवली याचा अभ्यास करावा. संन्याश्याच्या लग्नाला शेंडीपासून तयारी या उक्तीप्रमाणे  सहकार धुरीणांनी हे सगळे शुन्यातुन कसे साकारले याची माहिती घ्यावी.

सहकारी संस्था ही पिळवणूक केंद्रे नसून कॉर्पोरेटस् च्या विळख्यातुन शेतकऱ्यांना अद्यापपर्यन्त लांब ठेवणारी विकासमंदिरे आहेत.

एका -एका साखर कारखान्यामुळे त्या सबंध परिसराचा कसा कायापालट झाला आहे ... याची तुलना
ज्या ग्रामीण भागात कारखाने नाहीत त्यांच्याशी करुन बघावी आणि मगच उपरोक्त विधान करावे ...

©सुहास भुसे


मराठा जागा होतोय.

आमचा सोलापूर जिल्हा राजकीय दृष्ट्या भयंकर उदासीन आहे. पंढरपुर मतदारसंघातून संदीपान थोरात सलग सहावेळा लोकसभेला निवडून गेले. कोणाला ठाऊक आहे का ही व्यक्ती ? अनेकांना थोरात फक्त ऐकून माहीत होते. न कसली कामे न जनसंपर्क. सुशिलकुमार शिंदेही सलग निवडून येत आलेले आहेत. विधानसभा मतदारसंघातही क्वचित् बदल झालेले आहेत. इकडचे सगळे मतदारसंघ सेफ समजले जातात. म्हणून तर पवार साहेबांनी सुद्धा माढा मतदारसंघाला पसंती दिली होती.

मोर्चे, आंदोलने वगैरे सोलापूरकरांच्या पचनी पडत नाहीत. ऊसदराच्या आंदोलनासाठी कोल्हापुर, सांगली पेटत असताना आमची लोक घरातून बाहेर निघत नसत. आंदोलने व्हावी, ऊस दर वाढून मिळावा पण ते दुसऱ्यांनी करावे अशी उदासीनता ..म्हणून तर शेजारच्या जिल्ह्यात ऊसाला 2400-2600 रूपये दर मिळत असताना सोलापूरकर मात्र 1800 ते 2000 दर घेऊन शांत बसत.
सोलापुर जिल्ह्यातील रस्त्यांइतकी दुरावस्था इतरत्र कोठे नसेल पण हे त्यावरुन गुपचुप गाड्या दामटतात.
महीनो न महीने लाइट नसली तरी हे कधी तक्रार करत नाहीत.
सोलापुर जिल्ह्याची वरदायिनी उजनीचे पाणी अनेकांनी पळवले पण सोलापूरकर कधी पेटून उठले नाहीत.

पण 21 तारखेला सोलापुरला मराठा क्रांती मोर्चा जाहीर झाल्यापासून गावोगावचे वारे बदलले आहेत. चार लोक जमले की फक्त एकच विषय असतो चर्चेचा 'मराठा क्रांती मोर्चा ' चार आया बाया एकत्र आल्या तरी मोर्च्यांशिवाय दूसरे बोलत नाहीत.
गावोगाव ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त नियोजन बैठका सुरु आहेत. लोक न बोलावता स्वत: हून या बैठकांना येत आहेत. कस जायचे, कधी निघायचे, कोण कोण येणार, फॅमिली कशी न्यायची यावर उत्स्फूर्त मते नोंदवत आराखडा ठरवत आहेत. माढा तालुक्यातुन काही गावांतुन आदल्या दिवशी चालत सोलापुर गाठून मोर्च्यात सामील होण्याची नियोजने होत आहेत. सगळी वाहने जवळ जवळ बुक होत आली आहेत. एकूणच मोर्च्यांला जाण्याचा उत्स्फूर्त उत्साह प्रचंड ओसंडून वाहत आहे.

मराठा मोर्च्यांच्या मागण्या तर मान्य होतीलच पण या निमित्ताने महाराष्ट्रात बहुसंख्य असणारा मराठा समाज राजकीय दृष्ट्या सजग होतोय, उदासीनता झटकुन जागृत होतोय, घरे सोडून रस्त्यावर उतरतोय हा फार मोठा सकारात्मक बदल या मोर्च्यांच्या निमित्ताने घडून येत आहे. 32 ℅ समाज राजकीय दृष्ट्या जागृत होणे ही काही साधी घटना नव्हे. याचे विधायक राजकीय परिणाम येत्या काळात दिसून आल्याशिवाय राहणार नाहीत.
©सुहास भुसे


Saturday 10 September 2016

गुंठे पाटील नव्हे भूमीपुत्र

शेतकरी जमिनीवर आई सारखी माया करतो. आज ज्यांच्याकडे जमीनी आहेत त्यांच्या वाडवडिलांनी अनंत हालअपेष्टा सोसल्या पण जमीन विकली नाही. दुष्काळात नाही पिकले तर मोठ्या शेतकऱ्यांच्यात सालं घातली, कोंडयाचा मांडा करुन पोरेबाळे जगवली. पण जमिनीला हात घातला नाही. पिको न पिको अनासक्त कर्मयोगाच्या भावनेने आमचे पूर्वज निष्ठेने या काळ्या आईची सेवा करत राहिले, मुठ पसा पेरत तिची ओटी भरत राहिले.

या गरीबीत देखील शेतकऱ्याचे मन मात्र कधी कोते झाले नाही. त्याच्या बांधाला लोकांनी शेळ्या गुरे चारावीत, पिकाच्या कडेच्या दोन काकऱ्या त्यांच्यासाठीच ठेवलेल्या असत. शेतात जो येईल त्याने दोन्ही हातांनी भरभरुन माळवे, भाज्या न्याव्यात. ज्यांना जमीनी नव्हत्या अश्या बलुत्यांनाही कधी काही विकत आणावे लागले नाही. शेतकऱ्यांच्या खळ्यावरुन माल घरी जायच्या आधी बलुत्यांना वाटप होई. मग पोत्यांची लड गाडीत रचली जाई. आमचे पूर्वज जी मिळेल त्यातली अर्धीकोर गावगाड्याबरोबर वाटून घेऊन गाडा हाकत राहिले.

अहो जो हाडाचा शेतकरी असतो तो पाखरं राखताना ढेकुळ शेजाऱ्याच्या रानात जाईल म्हणून त्यांना कधी ढेकुळ फेकून हाणत नाही. दार धरताना पायाला लागलेला चिखल धुतल्या, पुसल्याशिवाय बांधाबाहेर पाय ठेवत नाही. काय होणार त्या ईवल्याश्या मातीने असे .... पण त्याची आपली वेडी माया असते...

आजही हा शेतकरी राजा असाच भावुक आहे. काळ्या आईवर त्याची अशीच अपार श्रद्धा आहे. शहरीकरणाच्या रेट्यात शहराजवळच्या मुठभर लोकांनी आपल्या जमीनी विकल्या असतील ... पण म्हणून आमच्या पूर्वजांनी ज्यांच्या पिढ्या जगवल्या त्यांची चार दोन बुकं शिकलेली, अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली पोरे ' गुंठे पाटील ' ' गूंठा मंत्री ' म्हणून समस्त मराठा शेतकरी वर्गाचा उपहास करत आहेत.

त्यांची चीड येत नाही तर कीव येते .. विकृतीत परिवर्तित झालेल्या त्यांच्या तथाकथित, फुसक्या विद्रोहाची दया येते.. ज्यांच्या पिढ्यान पिढ्यांना कधी काळ्या आईची हिरवी माया मिळालीच नाही तर तिचे मोल त्यांना कसे समजणार ??

©सुहास भुसे


Friday 9 September 2016

सनातनी बनवण्याची रेसेपी

*सनातनी बनवण्याची रेसेपी*

सर्व प्रथम एक फ्रेश अजिबात वापर न झालेला मेंदू निवडावा.
मग त्याला कढईत घालून खालून प्रखर असा शिवसूर्यजाळ लावावा.
त्यात एक वाटी नथुराम आणि दोन वाट्या सावरकर टाकावेत.
हे मिश्रण चांगले रटरटू द्यावे.

तोवर इतिहासाची भाजी निवडायला घ्यावी.
गांधी नेहरू खुडून बाजूला काढून फेकून द्यावेत.
सरदार पटेल, नेताजी, भगतसिंग वेचून निवडून घ्यावेत.

मग कढईत अखंड हिंदूराष्ट्राच्या तेलाची धार सोडावी.
कढीपत्त्याच्या जागी राममंदिराची योजना करुन चरचरित फोडणी द्यावी.
त्यात एक मोठी वाटी मुस्लीम द्वेष टाकावा.
एक चमचा हेगडेवार एक चमचा गोळवलकर टाकावेत.
चिमुटभर भिडे गुरुजी, चिमुटभर आफळे गुरुजी, चिमुटभर पपु आठवले टाकावेत.
चवीपुरता भगवा आतंकवाद टाकावा.

हे सर्व मिश्रण चांगले हलवून घ्यावे.

शिवसूर्यजाळावर सतत फुंकर घालत राहावी.
मिश्रण चांगले रटरटून गडद केशरी रंगांचा तवंग आला की अस्सल रुचकर चवदार सनातनी तयार झाला म्हणून समजावे.
©सुहास भुसे.


पावसाचे वेड

बाहेर असताना पाऊस आला आणि लोकं आडोसा जवळ करू लागली की मला मिस्किल हसु फूटते. मोबाइल वगैरे सेफ करुन मी घाई घाईने आडोसा असला तर सोडतो..
काय हा वेडेपणा अश्या नजरेने कोणी बघितले तर अर्जेन्ट काम असल्याची थाप ठोकतो..

मुसळधार पावसाचा मारा अंगावर झेलत मोटरसाइकलवरुन फिरण्याची मजा काही औरच असते.
सपसप टाचण्या टोचल्यासारखा पाऊस चेहऱ्याला टोचत असतो.
हाताचा वायपर करुन भिवयावरील पाणी निपटत आजूबाजूची दृश्ये बघत सावकाश गाडी चालवायची..
शेतातून बांध फोडून वेगवेगळ्या रंगाचे गढुळ पाणी ओसंडत असते..
झाडे वाऱ्याने वाकत पाऊस झेलत असतात.
त्यांची नितळती झळाळी आणि तकाकी पड़त्या पावसातच पाहावी..
या दृश्यांमधली जिवंत मजा पाऊस थांबल्यावर नाही..

रस्त्यावरुन महामुर पाणी वाहत असते.
त्यातून बाइक वेगात घालून ते पाणी उडवण्याचा आनंद मनमुराद लुटावा..
आणि मुसळधार पावसात तुमचा हा वेडेपणा पाहायला कोणी नसते..
कोणी असले तर पावसामुळे दिसत नाही..
मी तर मोठ्यांदा गाणी सुद्धा म्हणतो 😉
पावसाच्या आवाजात कोणी ऐकत नाही ..
..
पाऊस माणसाला थेट शैशवात नेऊन सोडतो...
©सुहास भुसे


मृण्मयीचे भविष्य

मी लहान होतो बराच.. दूसरी तिसरीला असेन.
दारात आलेल्या एका कुडमुड्या जोतिष्याने माझ्याबद्दल आईला सांगितले की पोरगा देवगुणी आहे. याच्या पाठीत शंकर आहे.

बस !! सगळ्या जुलुमातुन आणि मारहाणीतुन मला मुक्ती मिळाली. आईने हात उगारला की मी ॐ नमो शिवाय म्हणायचो. हा मंत्र तात्काळ फलदायी व्हायचा. फारच भयंकर राग आला असेल तर आई पाठीऐवजी गालावर जाळ काढी. पण अगदी क्वचित् ..
मला मारण्याचे प्रमाण भोलेनाथांच्या आमच्या पाठीत वास करण्यामुळे 99 % कमी झाले होते.
तेव्हा पासून आज तागायत कुडमुडे, पिंगळेवाले, डवरी वगैरे लोकांबद्दल मला भयंकर आपुलकी वाटते.

मृण्मयी .. माझी मुलगी खुप आगावू आहे अस तिच्या आईचे मत आहे. भयंकर खोड्या करते आणि अजिबात ऐकत नाही म्हणजेच थोडक्यात ती बापावर गेली आहे अस तर तिच्या आईला ठामपणे वाटते.

तर परवा असेच एक साधू बाबा दारात आले आणि त्यांनी मृण्मयीबद्दल सांगितले.
"ही तुमची पूर्वज आहे. हिच्याशी अहो जाहो बोला. तरच हिची कडकड व आगावुपणा कमी होईल."

मृण्मयीची पण आईच्या जुलुमातुन मुक्ति होण्याचा हा सुवर्णक्षण ठरायला हरकत नाही. पण साधू बाबांच्या सांगण्यात एक छोटी मख्खी होती.
मृण्मयी पूर्वज आहे म्हणजे माझी आजी आहे. थोडक्यात मृण्मयीच्या आईच्या सासुची सासु.

त्यामुळे मला थोडीशी शंका आहे. उलटा परिणाम होऊ नये.

©सुहास भुसे


छत्रपती कोणाचे?

ब्राह्मण बहुजन समाजाचे शत्रु आहेत, ब्राह्मण इतिहासाची मोडतोड करतात हे समाजावर इतक्या प्रमाणात बिंबल आहे की या काही नव्या बांडगुळांकडे दुर्लक्ष होत आहे. छत्रपतींच्या हातातली विष्णुची मूर्ती कशी तथ्यहीन आहे याची मांडणी करत असताना त्यांच्या हातातले कुराण दुर्लक्षित होत आहे.
अर्थात ही तुर्त तरी बांडगुळेच आहेत.
त्यांचे उपद्रवमूल्य त्यांच्या उघड आणि धांदात खोटेपणामुळे जवळ जवळ नगण्य आहे.
पण हा अपप्रचार कितीही तथ्यहीन आणि विनोदी असला तरी सुसूत्र पद्धतीने आणि निश्चित उद्दिष्ट ठेवून केला जात आहे हे नाकारता येणार नाही.

"1950 नंतर आम्ही कोणाला राजा मानत नाही. " अशी विधाने काही विशिष्ट उद्देश् डोळ्यांपुढे ठेवून केली जातात.
मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या जातीसाठी काय केले ?
आम्ही शिवाजी आणि संभाजी यांना फक्त याचसाठी मानतो की या परंपरेने आम्हाला राजर्षी शाहूसारखा राजा दिला. असा प्रचार सुरु होतो. छत्रपतीना साडेतीन जिल्ह्याचा स्वामी ठरवण्याचे अनाव्रती अश्लाघ्य प्रयत्न होतात.

एका पातळीवर छत्रपतींचे अलौकिक कार्य नाकारुन त्यांची महत्ता कमी करण्याचे प्रयत्न होत असतानाच राजमाता जिजाऊ पर्यायाने छत्रपती हे बौद्ध आहेत असा प्रचार दुसऱ्या पातळीवरुन सुरु ठेवला जातो.

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी नव्हते किंवा मुस्लिमविरोधी नव्हते हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या हातात कुरआन दाखवण्यापर्यन्त जाऊन पोहोचतो.

कोण आहेत हे लोक ? काय हेतु आहे त्यांचा इतिहासाच्या या विकृतीकरणामागे ?

सध्या समाजात पूर्वी कधीही नव्हत्या इतक्या प्रमाणात जातीय अस्मिता टोकदार झाल्या आहेत. हे काही आपोआप झालेले नाही. जातीय ध्रुवीकरण करुन त्यातून आपापले हेतु साध्य करणाऱ्या मंडळींकडून हे जाणीवपूर्वक घडवून आणले जात आहे.

एक उद्देश असा की छत्रपती शिवाजी महाराजांसारखे तेजस्वी प्रतिक आपल्याकडे असावे या भावनेतुन ही किळसवाणी खोटेपणाचा कळस असलेली खेचाखेच सुरु आहे.

दूसरा उद्देश जो समाज छत्रपतींना मानतो त्या समाजाचा तेजोभंग करणे.

आणि तिसरा उद्देश बहुजन समाज जो एकमुखाने छत्रपतीना मानतो त्यांच्यात दुफळी माजवून सर्व सामाजिक चळवळी कमजोर करणे.

छत्रपती हे सर्व जाती धर्माना एकत्र आणणारे, आणु शकणारे एक शक्तिशाली ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे. जातींच्या पलीकडची आणि सर्वमान्य असणारी अशी खुप कमी प्रतिके आहेत जी जातीपातींना एकत्र बांधून ठेवत त्यांना एक समाज बनवत असतात.

अश्या खोटेपणाला त्या त्या ठिकाणी ऐतिहासिक तथ्ये व पुराव्यांच्या सहाय्याने चोख प्रत्त्युत्तर देत हे बांडगुळी प्रयत्न शिवप्रेमींनी हाणून पाडले पाहिजेत.
आणि छत्रपतींचा तेजस्वी आणि खरा इतिहास ज्याला ज्या माध्यमातून जमेल त्या माध्यमातून आपापल्या कुवतीप्रमाणे मांडत राहिले पाहिजे.
©सुहास भुसे


भुत रिलोडेड

गावाकडची भूते आणि सिनेमातली भूते यात फार फरक असतो.

आमच्या गावात एक पैलवान मनुक्ष होता. मी लहान असताना पाहिले तेव्हा त्याची पांढरी दीड वित दाढ़ी .. आणि एकेकाळी ताठ असलेले आणि आता खंगलेले शरीर.. पण आता खंडहर असलेली ही इमारत एकेकाळी बुलंद होती हे जाणवायच. पावणे सात फुटाच्या आसपास उंची आता वाकल्याने जरा कमी वाटे. आमच्या वाड्याच्या आसपासच घर होते.

लोक सांगत की तो दातांनी ज्वारीच पोत उचलायचा. पोत्यांनी भरलेली बैलगाडी हातांनी ओढायचा. दाढीने पाण्याची मोठी घागर उचलायचा. भयंकर ताकदवान मनुक्ष.
याच्या भुताशी असलेल्या जवळीकीच्या गोष्टी ऐकून आम्ही याला जाम टरकुन असायचो. गल्लीत आला की पोरे सोरे सुंबाल्या व्हायची.

तो दर अमावस्येला भूताशी कुस्ती खेळायला जायचा.
ते भुत याला गोळसायच, हा त्या भुताला गोळसायचा. भुत याला उचलून आदळायच. हा भुताला परूस करुन वरुन फेकून द्यायचा. तूफान धूमश्चक्री व्हायची.
तर अस दर अमावस्येला कुस्ती खेळून खेळून याची आणि त्या भुताची झाली दोस्ती.
मग एके दिवशी ते भुत या पैलवानाला वेताळाच्या जत्रेला घेऊन गेले.

अमावस्येला कुठेतरी लांब माळावर ही वेताळाची जत्रा भरते. तिला झाड़ून सगळी भूते उपस्थित असतात. भूते मशाली नाचवतात. वेताळाची पालखी इकडून तिकडे फिरवतात.
तर यांची जत्रा बित्रा झाली सगळी.
मग भूते जेवायला बसली. हे सगळी अंगत पंगत. भूतांच्या पंगतीचा एकमेव नियम असा की वाढताना नको म्हणायचे नाही आणि ताटात शिल्लक काही ठेवायच नाही. नियम मोडला की खैर नसे.

आपला पैलवान भूतांच्या मांडीला मांडी लावून बसला आणि पंगत सुरु झाली. जेवण काय तर हिरव्यागद्द भाकरी, पातळढंग आमटी. भूते फूल स्पीड मध्ये तुटून पडली जेवणावर. वाढनारांची धांदल उडाली. पैलवान पण भूतांच्या बरोबरी ताट रिकामे करू लागला. कसा तर त्याने एक 'युगत' केली होती. डोक्यावरचा फेटा सोडून त्याची झोळी केली आणि ती खांद्याला अडकवली. येतील त्या भाकरी तो त्यात टाकायचा. आणि ताटाला त्याने एक छोट भोक पाडल. येईल ती आमटी खाली ओघळून जायची.

होतास्ता ती रंगलेली पंगत संपली एकदाची. भूतांच्या बरोबरीने एवढा अवाढव्य खाना घेतला म्हणून त्याच्या दोस्त भुताने पैलवानाच्या पाठीत शाब्बासकीदखल एक जोराचा धपाटा घातला. आणि त्याला जेव्हा हव तेव्हा वेताळाच्या जत्रेला यायची परवानगी देऊन टाकली.
..
या गोष्टी अतार्किक असत. त्यात फार कल्पना चमत्कृती नसे. त्यामुळेच कदाचित त्या दंतकथा आहेत अस  जाणवत नसे. ते सगळ खरच वाटे. ते कथानायक गावातले असत. अजुन जिवंत असत.   त्या वयात गावातील एखाद्या पारावर एखाद्या म्हाताऱ्या गुइंदा आबाने किंवा आण्णु गुरवाने आपल्या खास खुमासदार शैलीत रंगवुन सांगितल्या की खुप रंगतदार वाटायच्या. लोक गुंगुन जायची. टीव्ही किंवा मोबाईल नसणाऱ्या काळातील ते जिवंत आणि रसरशीत मनोरंजन होते.
©सुहास भुसे


भुतपटातली भुते

Exorcist पासून conjuring-2 पर्यन्त तमाम हॉलीवुडचे हॉररपट आणि पुरानी हवेली पासून राज- 4 पर्यन्त तमाम बॉलीवुडचे भय पट पाहुन काही निरीक्षणे नोंदवत आहे.

हॉलीवुडच्या भूतांची आपल्याला फारशी भीती वाटत नाही. पांढरेफेक झाँबी टाइप विद्रूप चेहरे, कीडे खाणारी, उलट्या काढणारी गलिच्छ भूते असतात हॉलीवुडची. मला तर विनोदीच वाटतात ती.

भुत म्हणजे कस हवे ?
हिरवी साडी, हातात हिरवा चुडा, मोकळे केस.. भरलेला मळवट असल्या हडळीने ते टिपिकल अमानवी हास्य केले की अंगावर काटा येतो. किंवा साधा पेहराव, साधा मेकअप आणि वेडसर गूढ़ हास्य .. रात मधली रेवती आठवते का?
कदाचित हॉलीवुडवाल्यांना आपली भूते विनोदी वाटत असतील. थोडक्यात भूते ही आपापल्या भागातलीच... मुळनिवाशी हवीत.

दूसरे निरीक्षण असे की पुरुषांची भूते स्त्रियांच्या तुलनेत नगण्य असतात. एखादे दूसरे असले तरी ते फार भीतिदायक वाटत नाही. जास्तीत जास्त पिक्चरमध्ये स्त्री भुतालाच प्राधान्य असते.

कदाचित स्त्रियांची पुरुषांच्या मनात असलेली बाय डिफॉल्ट दहशत ध्यानात घेऊन दिग्दर्शक विचार करत असेल की यांना भीती दाखवण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही.

अजुन एक निरीक्षण असे की ख्रिश्चन माणसाचे भुत घालवायला क्रूस, बायबल, होली वॉटर वापरावे लागते. आणि येशु मसी ची प्रार्थना करायला लागते. Exorcism करायला पादरी लागतो. तर हिंदू माणसाचे भुत रुद्राक्ष, देवाची मूर्ती, अंगारा अश्या वस्तुना भिते. बाबा बुवा मंत्र तंत्र गंडे दोरे ताइत आदी गोष्टी उपयुक्त.

ख्रिश्चन भुत हिंदू देवाला भिते किंवा हिंदू भुत ख्रिश्चन देवाला भिते असा आंतरधर्मीय पुरोगामी विचार अद्याप कोणी दिग्दर्शकाने केलेला दिसत नाही. ब्याकवर्ड, सनातनी लोक्स कुठले !!

यावरून धर्म आणि देव धर्माची दहशत माणूस मेल्यावरही त्याचा पिच्छा सोडत नाही अस दिसते.

मुस्लिम भूते कधी सिनेमात जास्त करुन दिसली नाहीत. कदाचित मुस्लिम भुत होत नसावेत. अस असेल तर बरच आहे अर्थात ... लादेन, अबू कुरैशी, अल बगदादी सारखी माणसे भूते झाली तर काय घ्या ?

©सुहास भुसे


शिक्षकी पेशाचे अवमूल्यन

जगातील सर्वात भेकड आणि स्वाभिमान शून्य जमात कोणती असेल तर ती शिक्षक असे मला वाटते ...
किती भयंकर अन्याय सहन करतात ही लोक .. पण मुंडी वर करत नाहीत ...
द्रोपदीला पाच नवरे होते पण हे शंभर नवऱ्यांशी संसार करतात ..
जो येईल तो नवरा
गटशिक्षणाधिकाऱ्याने यावे भोसडून जावे..
उपशिक्षणाधिकाऱ्याने यावे भोसडून जावे..
शिक्षणाधिकारी तर मोठे मालक ..
संस्थापक नवरा ..
त्याची बायको, त्याचा भाऊ, बाप, आई, पूतणे, पोरे सगळे नवरेच नवरे ..
पालक येतात चढून जातात ..
जो यांची घेणार नाही तो आळशी ..
बी एड ला यांचे ट्रेनर शिक्षक सांगतात, आम्ही जर म्हटल हाल्या दूध देतो तर तुम्ही घट्ट आणि सकस  असते म्हणायचे .. नो ऑफेंस ओनली आज्ञापालन ..
या हरामखोरांच्या हातात प्रॅक्टिकलची मार्क आणि ग्रेड असतात त्यामुळे भावी शिक्षक यांच्या नावाचे गंठन गळ्यात बांधून घेतात आणि मान खाली घालून वर्षभर संसार करतात.
आमच्या बी एड बॅचच्या वेळी असेच काही माजोरडे ट्रेनर शिक्षक होते.
एकजण वर्गात भयंकर अश्लील बोलायचा..
प्रश्न विचारायचा आणि ज्यांना येते त्यांनी हात वर करा ..
ज्यांना येत नाही त्यांनी (इथे मुलींकडे बघत ) पाय वर करा ..
भयंकर मनुक्ष ..
पण काही नाही सगळे निमुट खाली मान घालून ऐकायचे..
आणि टाचणे काढत बसायचे..

तर असल्या कॉलेजमध्ये हे घडतात ..
पुढे जॉब च्या वेळी यांना 5 -10 -15 वर्षे अक्षरश: फुकट राबवून घेतात..
नशीब असेल तर पेमेंट मिळते ..
नाहीतर हार मानून जॉब सोडतात व भजी पावचा गाडा टाकतात.
बर इतकी वर्षे फुकट राबुन वरतुन हे लोक संस्थापक नावाच्या यांचे रक्त पिवुन माजलेल्या ढेकणांना 15-15 लाख, 20-20 लाख डोनेशन देतात ..
वर या ढेकनांचा वाढदिवस आला .. एक पगार कपात..
ढेकणांची पोरे परदेशात निघाली ... एक पगार कपात..
ढेकुण डस्टर घेतोय .. एक पगार कपात ...
ढेकुण इलेक्शनला उभा राहिला ... दोन पगारी कपात..
जॉब ची ऑर्डर एप्रुव्हल काढताना हे शिक्षण खात्यातील शिपायापासून हायेस्ट ऑथोरिटी पर्यंत सगळ्यांचे पाय धरतात, लाखो रूपये त्यांच्या घशात घालतात.
यांची लाचारी लिहावी तेवढी कमी आहे ..
हे कधीही फना काढत नाहीत ..
कितीही चेचा .. कितीही रगडा ..
आणि हेच लोक आपला उद्याचा भावी समाज घडवतात ..
(या सर्व गोष्टींना काही सन्माननिय अपवाद आहेत पण ते फक्त नियम सिद्ध करण्यापूरते )
©सुहास भुसे


शरद पवार, ऍट्रॉसिटी आणि आत्यंतिक प्रतिक्रियावाद

माकडाच्या हाती कोलीत अशी एक म्हण आहे मराठीत. त्याचा अर्थ ज्या गोष्टीचा वापर करण्याची अक्कल नाही अशी गोष्ट अडाण्याच्या हातात विघातक ठरू शकते.
भारतीय राजकारण व समाजकारणात याच प्रत्यंतर वारंवार येत आहे.

शैक्षणिक आणि सामाजिक परिपक्वता नसताना आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, लोकशाही मिळाली आणि त्या लोकशाहीच्या आज आपण कश्या चिंधड्या केल्या आहेत हे सर्वश्रुत आहे.

तीच गोष्ट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मिडियाची.
सामाजिक जाणिवा अपरिपक्व असलेल्या आणि भारतीय राजकारण समाजकारणाचे मर्म अजिबात ज्ञात नसलेल्या झुंडी इथे कार्यरत आहेत.
यांचे विशिष्ट अजेंडे ठरलेले असतात.
इथे वावरणाऱ्या कोऱ्या पाट्यांवर विकृत रेघा ओढण्याचे काम करत लोकांचे मत विशिष्ट दिशेला झुकवण्यासाठी हे फक्त संधीच्या शोधात असतात.
आणि सामान्य वकुबाचे लोक यांच्यासोबत वाहवले जातात.

ताजे उदाहरण शरद पवार यांचे अट्रोसिटीबाबतचे वक्तव्य.
शरद पवार हे एक पुरोगामी नेतृत्व आहे. ते आणि त्यांचा पक्ष सर्व जाती समाज घटकांना बरोबर घेऊन चालतात. समाजातील एक मोठा समुदाय जर विशिष्ट गोष्टीची मागणी करत असेल तर त्याची दखल घेऊन त्यावर विचार मंथन व्हावे अस शरद पवारांनी सुचवले तर यात काय चूक आहे ?

पण पवार फोबिया झालेले अनेक जण पवार कधी काय बोलतात यावर टपून बसलेले असतात. पवार काही बोलले की लगेच त्याची सोइस्कर मांडणी करुन या लोकांचे गरळ ओकणे सुरु होते.

शरद पवारांना आज जातीयवादी लेबल लावणाऱ्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा इतिहास विसरु नये. पवार साहेबांच्या त्यावेळच्या निर्णयामुळे त्या भागातला मराठा समाज जो पवारांपासून दुरावला तो आजतागायत रिकव्हर करणे पवार साहेबांना पूर्णतया शक्य झालेले नाही.

एट्रोसिटी कायदा राज्यात कुप्रसिद्ध आहे. दुरुपयोगासाठी बदनाम आहे. कायदा सर्वांना समान हे घटनेचे मुलभुत तत्व असताना विशिष्ट समाजासाठी वेगळे कायदे करुन आपण आपल्या प्रचलित कायदा सुव्यवस्थेचे अपयशच जाहीररित्या कबूल करत आहोत. समानतेचे तत्व पायदळी तुडवत आहोत. अर्थात यावर वेगवेगळी मतमतांतरे असू शकतात. कदाचित काही प्रकरणी हा कायदा आवश्यकही असू शकतो. पण त्यावर कोणी बोलुच नये, त्यविरुद्ध ब्र काढाल तर जातीयवादी ठरवले जाल ही तुघलकी मानसिकता लोकशाहीसाठी घातक आहे.

शरद पवार आणि त्यांचा पक्ष मराठ्यांचा अनुनय करतात अस काही लोकांचे मत आहे. यात प्रामुख्याने तेच लोक आहेत जे बहुजनांच्या खांद्यावर भगवा झेंडा देऊन सत्ता प्राप्त करतात आणि एकदा का सत्ता मिळाली की महत्वाची पदे आणि कोअर कमिट्या अघोषित आरक्षण असावे जणु अश्या पद्धतीने विशिष्ट समाजाला प्रतिनिधित्व देऊन भरतात. दादोजी कोंडदेव कुलकर्णीच्या पुतळ्याची उचलबांगड़ी केल्याने या मंडळींच्या मनात पवार घराणे व त्यांचा पक्ष याबद्दल प्रचंड असंतोष खदखदत असतो. आणि अनेक बहुजन देखील हजारो वर्षांच्या सवयीने त्यांच्या काव्याला बळी पडतात.

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा जर मराठ्यांचा अनुनय करणारा पक्ष असता तर खालील यादीवर नजर टाकावी.. या नेत्यांना मोठमोठी पदे, मानसन्मान, आणि पक्षात महत्वाचे स्थान मिळाले असते का ?

राष्ट्रवादीचे प्रमुख नेतृत्व आणि विरोधी पक्ष नेते  धनंजय मुंडे  वंजारी समाजाचे आहेत. पुरोगामी मुलुखमैदानी तोफ म्हणून सध्या गाजत असलेले जितेंद्र आव्हाड वंजारी आहेत. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे दलित आहेत. माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आदिवासी (एस टी) आहेत. तर आजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे गवळी आहेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे तेली आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हे पटेल समाजाचे आहेत. सुधाकरराव नाईक यांचे पुत्र लमाण, बंजारा. माजी उप मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ माळी आहेत. प्रवक्ते नबाब मलिक हे मुस्लिम आहेत.

विचार करा. राष्ट्रवादी हा जातीयवादी किंवा मराठ्यांचा अनुनय करणारा पक्ष असता तर या सर्व लोकांना एवढी मोठमोठी पदे आणि सत्तेत वाटा मिळाला असता काय ?

लक्षात ठेवा. सनातनी आणि प्रतिगामी लोकांना जरब असणारे शरद पवार हे आजघडीचे एकमेव पुरोगामी नेतृत्व आहे. कोणाच्याही कसल्याही अपप्रचाराला बळी पडू नका. अश्या जातीयवादी विखारी मानसिकतेच्या लोकांना जागेवरच चोख प्रत्त्युतर द्या.

©सुहास भुसे




पंढरीची वारी आणि फेसबुकी उपटसुंभ

पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या मर्मबंधातली ठेव आहे. महाराष्ट्रातील अध्यात्मिक, सामाजिक चळवळीची प्राचीन आणि अभिमानास्पद परंपरा आहे. सोशल मिडियावर गेल्या काही दिवसांपासून वारीवर काही विजारवंत टीका करत असलेली वाचण्यात आले. अर्थात त्यांना त्यांचे मत मांडायचा पूर्ण अधिकार आहे. सोशल मिडियाचे व्यासपीठ त्यासाठीच आहे. पण त्यांचे लेखन वाचल्यानंतर लक्षात आले की या माणसांनी दिंडी ही फक्त टीवीवर आणि पेपरात पाहिली आहे. किंवा पाचव्या मजल्यावरील आपल्या घराच्या काचेच्या खिडकीतून ओझरती बघितली आहे. अथवा दिंडीमुळे जाम झालेल्या ट्राफिक मध्ये अडकून तिला शिव्या देत कडेकडेने बघितली आहे. वारीबद्दल जी मते सोशल मिडियावर वाचण्यात आली त्यातील काही मुद्दे असे.

१ वारकरी हे अल्पशिक्षित किंवा अशिक्षित बहुजन असतात.
२ वारकरी हा एक जातीयवादी संप्रदाय आहे. ज्या त्या जातीच्या संतांच्या पालख्यात ज्या त्या जातीचे लोक जातात.
३ वारकरी संप्रदायाचा अंधश्रद्धा निर्मुलन किंवा साक्षरता वगैरे प्रबोधनात्मक चळवळीशी काहीही सबंध नाही.
४ भेदाभेद भ्रम अमंगळ वगैरे निव्वळ दांभिकपणा आहे. वारी संपल्यावर त्याचा कोणताही परिणाम जनमाणसावर राहत नाही.
५ वारीमध्ये अन्नदान कोणीही करेल पण हिंम्मत असेल तर त्यांना आपल्या घरी मुक्कामाला नेऊन दाखवा.

या बालिश आणि धादांत असत्य मुद्द्यांवर एक नजर टाकली तर लगेच सदरहू विजारवंतांचा एकांगी आणि पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन लक्षात येतो.

वारीला जाणारे हे फक्त अशिक्षित लोक असतात हा अजब तर्क त्यांनी कोणत्या संशोधनाअंती काढला हे समजायला वाव नाही. दिंडीची परंपरा इतकी सर्वव्यापक आहे की समाजाचा कोणताही स्तर त्यापासून अस्पर्श राहिलेला नाही. शिक्षणामुळे माणूस नास्तिक होतो हा गैरसमज तितकाच सत्य आहे जितका शिक्षणामुळे माणूस सुजाण होतो हा समज. दिंडीत अपवादाने नव्हे तर फार मोठ्या संख्येने उच्चशिक्षित वर्ग असतो. माझ्या घराचे उदाहरण देतो. माझे आजोबा डॉक्टर होते. वडील बी कॉम, क्लास वन पोस्ट वरून नुकतेच रिटायर झाले आहेत. (आताही आळंदीहुन येणाऱ्या माऊलींच्या दिंडीसोबत पायी येत आहेत)  इतरही काका वगैरे सगळे उच्चशिक्षित आहेत. आमच्या घरात अनेक पिढ्यांपासुन वारीची अव्याहत परंपरा आहे. कमीत कमी शंभर वर्षांपासून महिन्याची वारी न चुकता पोहोचवली जाते. आर्थिक परिस्थिती किंवा शिक्षण यांचा श्रद्धेशी काही सबंध नसतो. उलट श्रीमंत आणि उच्चशिक्षित वर्गातील लोक तुलनेने जास्त श्रद्धाळू असतात. सत्य साई बाबा ते राधेमापर्यंतच्या हुच्च अध्यात्मिक गुरूंच्या शिष्यपरिवाराच्या ‘क्लास’ चा अभ्यास केला तर सगळे समजून येईल.

२,३,४ हे मुद्दे वारकरी संप्रदायात जे थोर संत होऊन गेले त्यांच्या कार्याचा अपमान आहे. ज्या त्या संतांच्या नावे ज्या त्या गावातून दिंडी जाते. त्या त्या परिसरातून मोठ्या संख्येने सर्व जातीचे लोक जात विसरून त्यात सहभागी होतात. शेकडो मैल तुडवत विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीला येतात. त्यांच्या मनाला संतांच्या जातीचा विषय चुकूनही शिवत नाही. संतांच्या चळवळीच्या परिणामस्वरूप पुढे वाढलेल्या, व्यापक झालेल्या चळवळीच्या एका अध्यायस्वरूप सामाजिक बदलाची फळे चाखणाऱ्या, जातीअंतासाठी लढण्याचे ढोंग करणाऱ्या मास क्लास मधून नुकतेच इलीएट क्लास मध्ये गेलेल्या लोकांच्या मनातच ही जात मोठ्या प्रमाणावर असते. ज्ञानेश्वरांच्या दिंडीत सगळे ब्राह्मण, तुकारामांच्या दिंडीत सगळे मराठा, सावता माळ्याच्या दिंडीत सगळे माळी, गोरोबांच्या दिंडीत सगळे कुंभारच असतात अस या विद्वानांचे मत असेल तर एवढ्या बालिश आणि मूर्खपणाच्या विधानावर भाष्य करणेदेखील कठीण आहे.

वारी ही महाराष्ट्राची थोर लोकपरंपरा आहे. सर्व संतांच्या प्रबोधनाच्या कामाची चौथीतील मुलादेखील चांगली जाण असते. ‘परंपरा’ या शब्दाचा अर्थच ‘एखादी गोष्ट न थांबता अथकपणे साखळी रुपात पुढे चालू ठेवणे’ असा आहे. वारीत आजही संत वांग्मयच केंद्रस्थानी असते. एकतर संतानी कोणतेही प्रबोधन केले नाही अस म्हणता येईल किंवा वारीमुळे तीच प्रबोधनाची चळवळ पुढे सुरु आहे म्हणता येईल. संत, त्यांचे कार्य आणि वारीची परंपरा यावर वेगवेगळे भाष्य करणे तोंडावर पाडू शकते इतक्या या दोन्ही गोष्टी एकरूप आहेत.

४ थ्या मुद्द्याबद्दल... सामाजिक बदल हे आपल्या गतीने होत असतात. कालानुरूप होणाऱ्या आर्थिक आणि राजकीय स्थित्यंतरातून सामाजिक बदलांची गरज निर्माण होते. हे बदल शृंखला पद्धतीने सावकाश सुरु असतात. एका रात्रीत हे बदल घडून येत नाहीत. संतांनी कालानुरूप त्या साखळीत आपली भूमिका बजावली, तशीच पुढील काळात फुले शाहू आंबेडकरांनी बजावली. पुढेही अनेक येतील. बदल आपल्या गतीने सुरु राहतील. यातल्या कोणाचेही योगदान नाकारता येणार नाही. वारकरी संप्रदायाने महाराष्टातील जातीयतेवर पहिला प्रहार केला आहे. शाळेत मुलांना शिकवताना प्रेरकाच्या माध्यमातून सांगितलेली गोष्ट त्यांना चांगली समजते. आपल्या समाजासाठी अध्यात्म हे उत्तम प्रेरक आहे. वारकरी संप्रदाय आपली अध्यात्मातून प्रबोधनाची परंपरा अबाधितपणे पुढे चालवत आहे. आणि त्याचे समाजमनावर खोलवर परिणाम झालेले आहेत आणि होत राहतील.

५ वा मुद्दा. या मुद्द्यातही वारीबद्दलचे आणि तिच्या नियोजन व व्यवस्थापनाबद्दलचे अज्ञान दिसून येते. वारीत फक्त श्रीमंत लोक अन्नदान करत नाहीत तर ज्यांच्यात दानत असते ते सर्व गोरगरीब लोक अन्नदान करतात. आमच्या गावाची जेजुरीला माउलींच्या पालखीला पंगत असते. त्यात सगळे लोक आपापल्या परीने सहभाग नोंदवतात. कोणी गहू देतो, कोणी इतर किराणा सामान देतो, कोणी पैसे देतो. अश्याच पंगती जागोजाग उठत असतात. तसेच वारीत मुक्कामाची सोय कशी केले जाते याचीही थोडी माहिती घेणे गरजेचे आहे.

मुक्कामाच्या ठिकाणाजवळच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या घरात ही सोय प्रामुख्याने केली जाते. आम्ही ती सोय करतो, तुला मला अशी भांडणे लागतात लोकांची. भक्तिभावाने लोक वारकऱ्याना घरी घेऊन जातात. त्यांची स्वत:च्या आई वडलांसारखी बडदास्त ठेवतात. बायकांना आग्रहाने साड्या नेसवतात. घरातील सन्माननिय पाहुण्याची जशी सोय केली जाते तशीच वारकऱ्यांचीही सोय केली जाते. आपण तर वारीला गेलो नाही, पण या वारकऱ्यांच्या रूपाने प्रत्यक्ष माऊलींचे पाय आपल्या घराला लागले अशी त्यांची श्रद्धा असते. आणि हो,  यात वारकरी सकाळी त्यांच्या घरातील टॉयलेटही वापरतात हे ओघाने आलेच.

वारीने शेकडो वर्षांपासून महाराष्टातील समाजमनावर गारुड केले आहे. आणि ही जादू वाढतेच आहे. देश विदेशातून वारीला प्रतिवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. कोण आधुनिक मंबाजी काय टीका करतात याने वारी परंपरेला केसभर ही फरक पडत नसला तरी इतक्या प्रचंड लोकांची ज्या गोष्टीबद्दल आस्था आहे त्यावर बोलताना थोडीशी माहिती आणि किमान थोडासाच अभ्यास करून बोलावे अशी तमाम विजारवंताना माझी आग्रहाची विनंती आहे.

©सुहास भुसे




गौरी आणि बालपण

लहान असताना मी खुप प्लॅन करायचो की गौरी किंवा लक्ष्म्या नेमक्या कश्या येतात ते बघायचेच. पण सगळी सजावट रात्री अकरा बारा नंतर सुरु व्हायची. तोवर मला काही झोप आवरायची नाही. आणि मी भल्या सकाळी डोळे चोळत त्या रूममध्ये धावत जाऊन बघायचो तेव्हा गौरी आलेल्या असत. मस्तपैकी भल्या मोठ्या मखरात विराजमान झालेल्या असत. पुढे पायऱ्या पायऱ्यांवर सगळी आरास, खेळणी, फराळाची ताटे, देखावे, लाइटिंग सगळा थाट उडालेला असे. मला हा थोर चमत्कार वाटे. सगळच अद्भुत. तासन तास मी ते सगळ बघत राही. मी आईला खोदुन खोदुन विचारत असे पण आईने कितीही सांगितले तरी मला तिनेच ते सगळे उभे केलेय हे पटत नसे. पुढे थोडा मोठा झाल्यावर मी जागून आईला सगळी मदत करू लागलो गौरीची आरास करण्यात पण त्यामुळे गौरी कश्या येतात यातले रहस्य नाहीसे होऊन ती मजा संपली ती संपलीच.

ते दोन दिवस मग गावातील सगळ्या घरांतील गौरीची सजावट घरोघरी फिरून बघण्यात घालवायचे. जेवण्याची देखील शुद्ध नसे. गावातल्या एकाच्या घरी एक मोठा हॉल भरून गौरीची आरास केलेली असे. तिथून तर आमच्या बाळगोपाळ गँगला अत्यंत प्रेमाने सक्तीने निरोप दिल्याशिवाय आम्ही हलत नसु. तेव्हा पैसे फेकून बाजारातून सगळे तयार मिळत नसे. संपूर्ण कुटुंबाने रात्रंदिवस खपुन सगळी आरास स्वत: तयार केलेली असे. छोटे डोंगर, त्यावर रस्ते, बोगदे, छोटी वाहने, गव्हाचे जंगल, त्यात छोटी गुरे, गुराखी, पक्षी, वाघ, प्राणी, मधूनच बंदूकधारी सैनिक, मावळे, पायथ्याला छोटे सरोवर, त्यात बदके, आगबोटी अगदी काय वाट्टेल ते तिथे असे. प्रतिसृष्टीच जणु. ते सगळ मला तासन् तास फैंटसीमध्ये गुंग होऊन जायला भाग पाडत असे. एखादी छोटी मोटार, दोऱ्या, पट्टे, गोनपाट आणि चिखल, गहु अस घरघुती सामान वापरून मोठ्या कल्पकतेने गौरीपुढचे देखावे उभारले जात. सगळे कुटुंब त्याची महिना महिना आधीपासून तयारी करत असे.

आता ते वय ही गेले आणि हॅंडमेड सजावटीचा तो काळही गेला. हल्लीच्या गौरी तेव्हाच्या तुलनेत आजुबाजूच्या अंगावर येणाऱ्या रेडीमेड भडक सजावटीत अंग चोरुन उभ्या असल्यासारख्या दिसतात.

©सुहास भुसे


Sunday 28 August 2016

चिंच गुळाची फोडणी आणि पुरीभाजी

आज जरा घाई होती व पुढे कामे होती बरीच ..
त्यामुळे जेवणापेक्षा अल्पोपहारावर भागवावे आणि पुढे वेळ मिळाल्यावर जेवणाचे पाहावे असा विचार केला.
तसा मी या ब्राह्मणी हॉटेलमध्ये कधी मधी जेवलो असेन मागे ..
पण तूरळक . बाहेर जेवताना शुद्ध शाकाहारी आवर्जून कशाला जेवेल कोण?
तर मग जरा वेळ कमी असल्याने पटकन येईल म्हणून पूरी भाजी मागवली.
पटकन म्हणता तिने बराच वेळ घेतला तरी.
आणि आली तेव्हा वरणासारखी हळदीची फोडणी दिलेली पिवळी भाजी चक्क पूरी भाजी प्लेट मध्ये पाहुन धक्का बसला.
आणि आता पुढे ताटात काय वाढून ठेवलेय याचीही अंमळशी कल्पना आली.
तर भाजी बघुन वाटले होती तशीच गोडसर होती ...
चिंच गुळाची चरचरित फोडणी दिली असावी बहुतेक.
उसळ गोडसर, चटणी गोडसर, लोणचे गोडसर.
तोंडाची चव गेली पार .. ठीक आहे. असतात वेगवेगळ्या ट्रेडमार्क चवी लोकांच्या. पण हे काही पुणे नाही.
सोलापूर मध्ये, तेही चक्क मोहोळजवळ गोडसर पूरीभाजी ?
हन्त हन्त !!!
आणि पुरीचा आकार ... चार घासात चार पुऱ्या संपल्या. आणि एकंदर चवी चा स्ट्रीम बघुन अजुन काही मागवण्याची इच्छा होईना ..
पोट अगदी पूर्ववत रिकामेच वाटत होते.
आणि सगळ्यांचे चेहरे फोटो काढणेबल..
मग जरा पुढे जाऊन एक छान पैकी शिवनेरी की शिवशक्ती कायस हॉटेल निवडल..
काम को मारो गोली म्हटल ..
मालवणी सुक्क मटन हंडी आणि तेजतर्रार लालभडक, तेलाचा इंचभर कट असणारी तर्री .. खास सोलापुरी ..चापुन हानली.
तेव्हा कुठे डोक्यातल्या गोड गोड मुंग्या गेल्या.
©सुहास भुसे


अडतीत एक दिवस

कांदे घेऊन तो मोठ्या उत्साहाने मार्केटला गेला ..
एरवी बाप जात असे पण पोराला पण माहिती व्हावी त्याला जरा व्यवहारज्ञान मिळावे म्हणून बापानेही त्याला आवर्जून पाठवले होते ...

जाताना सोबत चार पाच शेतकरी होते ..
जरा वयाने मोठे दोघे जण ड्रायव्हर केबिन मध्ये बसले ..
ह्याने आणि अजुन दोघांनी आयशर मध्ये मागे कांद्याच्या थप्पीवर मस्तपैकी तानुन दिली ...
खालुन कांदे रुतत होते ..
टेंपो खड्डयातुन गेला की अंग दनादन उचलून आदळत होते ..
चार सहा तासांनी मार्केट आले .

मिट्ट काळोखात शहर झोपले असले तरी मार्केट मात्र टक्क जागे होते .
हमालांनी गोण्या खाली उतरवुन गोडाऊन मध्ये रचुन थप्पी लावली.
अंग आंबुन गेले होते. याने सोबत आलेल्या मुंडासेवाल्याला विचारले,
"आण्णा, झोपायच कुठ ?"
"कुट मंजी? हिथच अन कूट .."
घों घों करणारे डास एका हाताने हाकलत तो म्हणाला,
"इथेच ? या गोडावूनमध्ये ?"
"रात्री कांद्याच्या गोण्या चोरीला जात्यात, पहाट इथल्या बाया पोती फोडून कांद लंपास करत्यात, तवा हिथन हलायच नाही. झोपायच ते बी आळी पाळीन"
आण्णाने अनुभवाचे बोल ऐकवले.
नाइलाजाने त्याने आंबलेले अंग तिथेच गोण्यांच्या थप्पीवर आडवे केले.
डास फोडून काढत असताना, कानाकोपऱ्यात पडलेल्या सडलेल्या भाजीपाल्याच्या कुबट वासात त्याने रात्र कशी बशी काढली.

भल्या सकाळी हमाल आणि काटेवाले आले. त्यांनी विद्युत वेगाने गोण्या काट्यावर ठेवल्या कधी, वजन टिपलं कधी, आणि गोण्या परत रचल्या कधी हे त्याला समजलच नाही .
आण्णाला कोपराने ढोसुन तो विचारत राहिला 'आण्णा याच वजन किती भरल, त्याच वजन किती भरल'
"काळजी करू नक, हिथ नाही कळल तर पट्टीवर बराबर कळतय"
आण्णाने पुन्हा अनुभवाचे बोल ऐकवले.
मग ते चौघे पाचजण गाववाले तंबाखू च्या मिसरीने दात घासुन कोपऱ्यावर नळावर मुखमार्जन करुन आले. जवळच्याच टपरीवर चहा झाला.

10 ला लिलाव सुरु झाले. आणि अचानक पणे त्या सुस्तावलेल्या मार्केटमध्ये कोलाहल सुरु झाला. अडत्या, त्याच्या मागे दहा वीस व्यापारी, आणि मागे पाच पंचवीस हमाल असा जत्था एका एका वक्कलाचा निकाल लावत पुढे सरकत होता.

हळू हळू जत्था याच्या थप्पीजवळ आला. चार हमालांनी पुढे होऊन भसाभस हुके लावून गोण्या फोडायला चालू केले. कांदा गोण्या फोडून फरशीवर ओसंडु लागला. लालभडक असा की गुलाबाने लाजुन मान खाली घालावी. गोल असा की जणु कंपासने वर्तुळ आखुन बनवला असा. चमक अशी की डोळे ठरत नव्हते. त्याच्या अख्ख्या घराबाराच्या ढोर मेहनतीचे, काबाडकष्टाचे ते मधुर फळ होते.

अडत्याजवळ एक दोन व्यापारी पुढे सरसावले. अडत्याने आपला नेहरू शर्ट जरा वर उचलला. व्यापाऱ्याने त्याखाली हात सरसावत अडत्याच्या हातात हात दिला. दोघांनी आपसांत बोटांच्या सांकेतिक खुणा करत सौदा तोडला. हा आपला बघतच राहिला. मार्केटात पहिल्यांदाच आला असल्याने लिलावाची ही पद्धत त्याला नवीन होती. आपला कांदा कसा गेला याची उत्सुकता तर होती पण विचारावे कसे. अडत्या साडेसहा फूटी, भीमकाय देहाचा, कोरलेली दाढी, गळ्यात पचास तोला साखळी, हातात भली मोठी ब्रेसलेट, दाही बोटात अंगठ्या, शुभ्र परीटघड़ीची कपडे, त्याला काही विचारायचा त्याला धीरच झाला नाही. त्याने पुन्हा आण्णाला कोपराने ढोसले. " आण्णा, कसा गेला आपला कांदा ?"
"आर ते हिथ नाय कळत, दम काढ जरा. मागन पट्टीवर समद कळत. "
आण्णाचे अनुभवाचे बोल आले.

मग सगळ्यांचे लिलाव आटोपल्यावर सगळे गाववाले जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन नाष्टा करुन पोटाला जरा विसावा करुन आले. जरा वेळ इकडे तिकडे फिरून सर्वांनी अडत्याचे ऑफिस गाठले. पाच वाजेपर्यन्त लोळुन दिवस काढल्यावर कुठे यांच्या हातात पट्टी पडली.

याने उत्सुकतेने पट्टी हातात घेतली. कांदा पाच पैसे किलो दराने गेला होता. 100 क्विंटल कांद्याची पट्टी होती 500 रु. त्यातून अडत, हमाली, तोलाई, लेव्ही, फोनबील वगैरे कपात..
त्याच्या भक्क डोळ्यांपुढे पट्टीतली अक्षरे धूसर धूसर होत गेली ....
©सुहास भुसे


Saturday 28 May 2016

आणि माने सर सिझन्ड होतात- भाग 2

     माने सरांना काही केल्या ते दृश्य पाहवेना. कोणी गुपचूप चोरून काही कॉपी करतोय तर समजा कदाचित त्याच्याकडे दुर्लक्ष करता आले असते. पण आपल्या अस्तित्वाची दखल न घेता समोर सुरु असलेला प्रकार त्यांना अपमानजनक वाटला. त्यांनी भरभर विचार केला. काय होईल? बाहेरच्या त्या दमदाटी करणाऱ्या टग्याचा विचार त्यांच्या मनात आला. इथले गुंड प्रसंगी शिक्षकांना मारहाण देखील करू शकतात हे त्यांना ठाऊक होते. असे चार दोन किस्से ते ऐकून होते. दुसरी गोष्ट ही जर या परीक्षा केंद्राचीच पॉलिसी असेल तर आपल्याला उद्यापासून सुपरविजन दिले जाणार नाही. आणि आपले वरिष्ठ नाराज होतील तो भाग वेगळाच. पण हरकत नाही. काय व्हायचे ते सध्या चालू आहे त्या पेक्षा वाईट खचितच नसेल. त्यांनी मनाशी काही निर्धार केला.

“हे पहा मुलांनो, इकडे लक्ष द्या एक मिनिट. तुम्हाला शेजवाल सरांनी काय सांगितले किंवा तुमचे इतर पेपर कसे चालतात याच्याशी मला काही देणेघेणे नाही. मी हा प्रकार चालू देणार नाही. पटकन सर्वांनी आपल्या समोर जे काही आक्षेपार्ह आहे त्याची विल्हेवाट लावा. दोन मिनिट वेळ देतो. तरीही कोणी  कॉपी करताना दिसला तर त्याचा पेपर काढून घेण्यात येईल.”

 पण सरांच्या या धमकीवजा सूचनेचा वर्गावर ढिम्म परिणाम झाला. अनेकांनी मान वर करून देखील पाहिले नाही. कमालीच्या एकाग्रतेने सगळे पेपर लिहिण्यात दंग होते. मागच्या बेंच वरील एका जाड जुड मख्ख चेहऱ्याच्या मुलाने फक्त मान वर करून माने सरांकडे एक कटाक्ष टाकला. त्याच्या नजरेतील तुच्छतेच्या भावाने माने सरांच्या डोक्यात एक तिडीक आली. काहीतरी एक्शन घेतल्याशिवाय आपल्या सूचनेचा प्रभाव पडणार नाही. हे ओळखून ते भरभर चालत त्याच जाड्याच्या समोर येऊन उभे राहिले. त्याने पुन्हा एक तुच्छतापूर्ण कटाक्ष माने सरांकडे टाकून समोरच्या पुस्तकातील उत्तर भरभर पेपरात लिहायला सुरु ठेवले.

 माने सरांनी त्याचा पेपर ओढून घेतला.

“बाळ, मी समोरच्या भिंतीना बोलतोय का? हा प्रकार बंद करा. नाहीतर तुम्हाला कोणाला पेपर लिहिता येणार नाही.”

एक रागीट नजर सरांकडे टाकत तो जाड्या बोलला.

“सर, मला काही येत नाही लिहायला मनाने. तुम्ही द्या माझा पेपर. नायतर मी चव्हाण सरांकडे जाईन.”

“अरे जा ना. चल निघ बाहेर. कोणाकडे जायचे त्याच्याकडे जा.”

दानदान पाय आदळत तो मुलगा बाहेर गेला. या प्रकाराचा मात्र थोडा परिणाम झाला वर्गावर आणि सर्वांनी आपल्या समोरची पुस्तके चीठोऱ्या वगैरे बेंचच्या आत दडपले.

पाचच मिनिटात तो पोरगा आणि चव्हाण सर वर्गात हजर झाले. ज्या १२ शाळांची या केंदात परीक्षा होती त्यापैकी माने सरांच्या ज्ञानज्योती विद्यालयाचे चव्हाण सर मुख्याध्यापक होते. आणि या परीक्षेचे केंद्रप्रमुख अर्थात इथले सर्वोच्च नियंत्रक देखील होते. त्यांनी आल्या आल्या आपल्या पहाडी आवाजात मुलांना फैलावर घेतले.

”कोण हरामखोर सरांना उलट दुरुत्तरे करतोय रे. लाजा वाटत नाहीत का? दोन शब्द धड जुळवून लिहिता येत नाहीत आणि मिजास MPSC टॉपरची. लाथा घालीन एकेकाला. गाढवांनो एक तास मनाने खरडा की काहीतरी पेपरात. वर्षभर काय गोट्या खेळल्या काय?”

माने सर समाधानाने ऐकत होते. बरे झाले हा मुलगा चव्हाण सरांकडे गेला. चव्हाण सर पुढे म्हणाले,

“एक तर तुम्हाला कॉप्या करून लिहू द्या वरून तुमची मिजास सहन करा. मुर्खानो मुंगी होऊन साखर खावी. हत्ती झालात तर दांडकी बसतील. जे काही करायचे ते शेवटच्या एका तासात. तोवर खबरदार कोणाची तक्रार आली माझ्याकडे तर गय करणार नाही.”

त्या जाड्या मुलाकडे वळून सर म्हणाले.

“जा रे बंड्या. बस जागेवर. आणि परत उलट बोलला सरांना तर खैर नाही तुझी.”

बंड्या जागेवर जाऊन म्हणाला.

“सर माझ गाईड माने सरांनी घेतलेय.”

“माने सर देऊन टाका त्या मूर्खाचे गाईड आणि बाहेर या जरा.”

अस म्हणून चव्हाण सर बाहेर पडले. माने सरांना शेजवाल सरांसारखेच पाठीवर हात ठेवत समजुतीच्या सरात चव्हाण सर सांगू लागले.

“सर अस कडक करून चालत नाही. हीच मुले पास होऊन आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेतात. ही पासच झाली नाहीत तर महाविद्यालयातील प्रवेशांचे काय? शिवाय सरकारचा दट्ट्या असतोच वरून. अमुक तमुक टक्के निकाल लागलाच पाहिजे. नाहीतर अमुक होईल तमुक होईल. सबब ही अशी व्यवस्था इथे तयार झाली आहे. ही तुम्ही निर्माण केली नाही किंवा मी नाही. तेव्हा जे चाललय ते चालू द्या. तुम्हाला काही अडचण असेल एक अर्ज द्या. मी दुसरा सुपरवायजर पाठवतो वर्गावर.”

शेवटचे वाक्य म्हणताना चव्हाण सरांचा स्वर बदलला होता. माने सरांनी हताश होऊन मान डोलावली.

“नको सर. लक्षात आले माझ्या. मी ठीक आहे. करतो मी सुपर व्हिजन कंटिन्यू.”

“गुड , हेच छान होईल.”

अस म्हणून चव्हाण सरांनी तेथून प्रस्थान ठेवले.

आणि आता वर्गातली परीक्षा व्यवस्था जरा सुरळीतपणे सुरु झाली. मुलांनी पूर्ववत आपापले साहित्य बाहेर काढून आरामात पेपर लिहायला सुरवात केली. पक्या आणि शिर्क्या ने मोका बघून खिडक्या सताड उघडल्या. मघाच्या त्या गट्ट्यासारखे गट्टे आरामात प्रश्न बाहेर नेऊ लागले व उत्तरे आत आणून देऊ लागले. माने सर आता स्थितप्रज्ञपणे सगळा प्रकार पाहू लागले. त्यांनी थक्क व्हायचे आता सोडून दिले होते. पण जेव्हा शेजारच्या गावातील शाळेतील घोडके सर त्यांना त्या गट्टयाच्या मार्गाने खिडकीत चढलेले दिसले तेव्हा मात्र त्यांच्या थक्क होण्याची परिसीमा झाली.

 या परीक्षा केंद्राच्या मागच्या बाजूला लिंबोणीची मोठी बाग होती. त्या बागेत पर विद्यार्थी एखादा दुसरा मित्र किंवा भाऊ वगैरे कंपलसरी आलेले असतच. शाळांचे पूर्ण स्टाफ असत. ही सगळी यंत्रणा त्या बागेत आत लांबवर लिंबोणीच्या झाडांच्या आडोश्याने कार्यरत असे. शाळांची यंत्रणा इतर गट्टयांच्या मानाने सुसज्ज असे. शिपायांनी आपली पोरे ज्या खिडकीत असत त्या पोरांना आधी सूचना दिलेली असे त्याप्रमाणे त्यांनी तयार ठेवलेली प्रश्नांची नक्कल घेऊन यायची. दोन तीन शिक्षक नवनीत मार्गदर्शक, पुस्तके घेऊन तयार असत. शिपायांनी आणलेले प्रश्न घेऊन त्यांनी पटपट उत्तरे शोधायची. मग दुसरे  चार पाच शिक्षक एक दोन लिपिक कोरे कागद कार्बन पेपर लावून तयार असत. एकाने पटपट उत्तरे वाचायची. सगळ्यांनी ती धडाधड उतरून घ्यायची. १० मिनिटात ५० एक मार्कांची उत्तरे लिहिलेल्या पाच पन्नास कॉप्या तयार होत. शिपायांनी लगेच त्या आपापल्या विद्यार्थ्याना खिडकीतून पोहोच करायच्या. माने सरांना हे सगळे मागाहून तपशीलवार माहित होणार होते.

१२ वाजले. तासबेल पडली. तशी दोन तीन स्वयंसेवकांचे बिल्ले लावलेली पोरे आत शिरली. ही पोरे त्या केंद्र शाळेतीलच ९ वीच्या खालच्या वर्गातील मुले होती. त्यांना वर्गात पाणी पुरवण्याचे काम दिले होते. प्रत्येक विद्यार्थ्याजवळ जाऊन ती पाणी देत होती आणि विद्यार्थी आपली लिहून झालेली चिठोरी त्यांच्या खिश्यात कोंबत होते. सर्वांना पाणी देऊन झाल्यावर हे स्वयंसेवक सगळे रॉ मटेरियल घेऊन बाहेर गेले. या शाळेत सुट्टीच्या दिवशी नेहमी लग्ने होत. त्यासाठी मैदानात एका बाजूला एक मोठी भट्टी कायमस्वरूपी होती. परीक्षा काळात ती मंद आचेवर सतत पेटती ठेवलेली असे. हे स्वयंसेवक त्या सगळ्या वापरलेल्या चिठोऱ्याचे गठ्ठे त्यात नेऊन टाकत. माने सर या बेमालूम व्यवस्थेचे एक एक पैलू चकित होऊन हताश नजरेने आणि विमनस्क मनाने पाहत होते. कधी एकदा तीन तास होतात आणि आपली सुटका होते अस त्यांना झाले होते.

१ चा टोल पडला. दोन तास उलटले होते. आणि इंग्रजीचे कापसे सर दरवाज्यात उभे होते.

“सर चहा वगैरे घेऊन यायचा असेल तर या. मी आहे १० ,मिनिटे.”

माने सरांना चहाची इच्छा राहिली नव्हती.

“ठीक आहे.” म्हणत कापसे सर आत आले.

“मुलांनो पहिला प्रश्न fill in the blanks सोडवला का? नसेल तर पटपट रिकाम्या जागा लिहून घ्या. पहिली रिकामी जागा proportion.”

कापसे सर वर्गात फिरत रिकाम्या जागा सांगू लागले. बंड्याजवळ येताच त्याला प्रपोर्शन लिहिता येत नाहीये हे त्यांच्या लक्षात आले.

“बंड्या अरे नीट लिही. हं ..पी आर ओ .. अरे अरे मुर्खा ते क्यू झाले. पी पी ...”

एक खाडकन कानाखाली वाजवत कापसे सरांनी बंड्याच्या हातातला पेन घेतला. व स्वत:च त्याची रिकामी जागा लिहून दिली.

“ हं तर आता शेवटचा प्रश्न ट्रान्सलेशन. मी सांगतो लिहा भरभर.”

माने सरांना आज धक्क्यावर धक्के बसत होते. त्यांच्या मनातील आदर्श मूल्यांना आणि तत्वांना सुरुंग लागत होता. उघड्या डोळ्यांनी ते शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे पाहत होते.

 शेवटचा अर्धा तास उरला होता. माने सर वर्गात पाठीवर हात टाकून चकरा मारत होते. जाता जाता त्यांच्या ज्ञानज्योती विद्यालयातील एका विद्यार्थिनीच्या पेपरवर त्यांची नजर गेली. ही कुसुम त्यांच्या यंदाच्या बॅचचे आशास्थान होती. जिल्ह्यात किंवा गेला बाजार केंद्रात तरी ती नंबर आणणार अशी सर्वांची अपेक्षा होती. Do’s and don’ts  मधले एक विधान जे do’s मध्ये लिहायला हवे होते ते तिने don’t  मध्ये लिहिले होते. हिचा एक मार्क हमखास जाणार. माने सरांनी विचार केला. इतके सगळे गैरप्रकार इतक्या घाऊक प्रमाणावर इथे सुरु आहेत. त्यात आपणच शुद्ध सात्विक राहून काय बदल होणार आहे? सगळे आपल्या शाळेचे हित पाहत असताना आपण तरी का मागे रहा. आपण एकटे प्रामाणिक राहून काही भारत देश सुधारणार नाही. असा विचार करत ते कुसुम जवळ थांबले. कुसुम ने वर मान करून त्यांच्या कडे बघितले. त्यांनी हलक्या आवाजात तिच्या पेपरवर बोट ठेवत तिला तिची चूक दाखवली.

 थोड्या वेळाने त्यांना आपल्या कृत्याची शरम वाटली. आता या व्यवस्थेचा निषेध करण्याचा नैतिक अधिकार आपण जणू गमावून बसलो आहोत अशी भावना होऊन मघाची त्यांची ताठ मान काहीशी खाली झुकली. डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांची नजर दरवाज्याकडे गेली.

 दरवाज्यात शेजवाल सर उभे होते. हा सर्व प्रकार पाहून ते गालातल्या गालात हसत होते. ‘माने सर तुम्ही खूप लवकर सीझन्ड झालात’ असाच काहीसा भाव त्यांच्या नजरेतून व्यक्त होत होता. माने सरांची मान अधिकच झुकली.  

©सुहास भुसे.



आणि माने सर सिझन्ड होतात - भाग 1

    उत्तरपत्रिकांचा गठ्ठा आणि इतर साहित्य घेऊन वेळेच्या आधी अर्धा तास माने सरांनी पेपर हॉल मध्ये प्रवेश केला. अलीकडेच शिक्षक म्हणून  ज्ञानज्योती विद्यालयात रुजू झाल्यानंतर बोर्डाच्या परीक्षेत माने सरांचे आज पहिलेच सुपरव्हिजन होते. त्यामुळे सर चांगलेच उत्साहात होते. आल्या आल्या पोरांना जरा दमात घ्यावे म्हणून एक कठोर नजर या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यन्त फिरवली. त्या चिरपरिचित शिक्षकी नजरेने आपला पूर्ण लेखाजोखा घेतला गेला आहे याची मुलांना पूर्ण जाणीव झाल्यानंतर त्यांनी खास राखून ठेवलेल्या कठोर आवाजात सुचना केली.

"कोणाला एकमेकांना पेन, पेंसिल, रबर किंवा काही साहित्य द्यायचे घ्यायचे असेल किंवा कोणाशी महत्वाचे दोन शब्द बोलायचे असतील किंवा इकडे तिकडे बघुन मानेचे काही व्यायामप्रकार करुन घ्यायचे असतील तर पाच मिनिट वेळ देत आहे. तेवढ्यात काय ते उरकुन घ्या."

तो खास आवाज आणि सरांची एकंदर देहबोली बघुन बिलंदर पोरांच्या पोटात गोळा आला.

"आयला हे जरा कडक प्रकरण दिसते"

"आता कसे रे" अश्या आपसात नेत्रपल्लव्या करुन झाल्या.

या परीक्षा केंद्राची कीर्ति ठावुक असल्याने माने सरांनी दूसरी सुचना त्यापेक्षा वरच्या पट्टीतला आवाज लावून केली.

"सर्वांनी आपापल्या जवळच्या खिडक्या लावून बोल्ट सरकवुन घ्या. कोणाची खिडकी उघडली किंवा किलकिली झाली तर त्याचा पेपर तात्काळ काढून घेऊन त्याची सन्मानपूर्वक बोळवण करण्यात येईल."

घड्याळाकडे बघत बरोबर पाच मिनिटे झाल्यावर सरांनी उत्तरपत्रिका वाटल्या. बारकोड स्टिकर देऊन झाली.

11 च्या ठोक्याला प्रश्नपत्रिका वाटप झाले. काही मुले मान खाली घालून भरभर पेपर सोडवू लागली. निम्म्याच्या वर मुले मात्र अस्वस्थ चूळबुळ करत होती. कोणाची थोडी जरी हालचाल झाली तरी तिचा वेध घेत सरांची कठोर नजर तिथवर पोहोचत होती. पोरांना बांधल्यासारखे झाले होते.

     ही मुले काहीच लिहित नाहीत हे पाहून सर थक्क झाले होते. तीही एक दोन नव्हे तर अर्ध्याच्या वर वर्ग. १० वर्षे ज्ञानमंदिराच्या पायऱ्या झिजवून ३० मिनिटे पेपर लिहायचे ज्ञान यांना मिळाले नसावे हे यांना विस्मयजनक वाटले. असो, तूर्त ही समस्या उकलण्याची ही वेळ नव्हे म्हणून त्यांनी तो विचार झटकला.

 होतास्ता अर्धा तास उलटला. बिलंदर पोरांचा धीर सुटत चालला होता. मागच्या भिंतीच्या खिडकीजवळ बसलेल्या पक्याच्या खिडकीबाहेर खुसपूस झाली. सरांनी तिकडे कान दिला.

“पक्या आर दार उगडून प्रश्न टाक की लगा बाहेर. ५ मिन्टात कॉप्या आणून पोच करतो.”

पक्या सर ऐकत आहेत हे बघून थोडा बिचकला.

“गण्या तू जा लगा. थोड्या वेळानी ये. जरा कडक सर आलय.”

पक्याने जरी खुसपूसत सांगितले तरी वर्गातल्या शांततेमुळे सर्वांना हा संवाद ऐकू आला.

इतक्यात मागच्या खिडकीत बसलेल्या शिर्क्याच्या खिडकीवर टकटक झाली. सरांनी चिडून पुढे होत दार उघडले. तर एक मोठा पैलवान गट्ट्या खिडकीवर चढून गजाना धरून लोंबकाळत होता.

“काय रे काय पाहिजे तुला? चल निघ इकडून. लिहू दे पोरांना पेपर. परत आलास तर पोलिसांना बोलावेन.”

अस म्हणत सरांनी त्याला सज्जड दम दिला. म्हणजे सरांना तस वाटल मनातल्या मनात. पण तो गट्ट्या सरांकडे बघत धमकीवजा हसला.

“सर नवीन आल्यात दिसतय आज. पेपर सुटल्यावर भायेर यायच आहे ना? भायेर आमीच हौत.”

माने सरांच्या अंगाची लाही लाही झाली संतापाने. त्या मूर्खाच्या तोंडी लागण्यापेक्षा त्यांनी धाडकन दार लावत बोल्ट सरकवला. मग एक इरसाल शिवी...मग धप्पकन उडी मारल्याचा बाहेर आवाज आला. एक जळजळीत नजर शिर्क्यावर टाकत सरांनी पूर्ववत आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित केले.

 हा प्रकार होऊन पाच दहा मिनिटे उलटली तोच मुख्य दरवाज्यावर टिकटिक झाली. सरांनी बघितले तर बिल्डींग कंडक्टर शेजवाल सर दारात उभे होते.

“माने सर १० मिनिट रिलीव्ह करायला आलो आहे. स्टाफरूममध्ये चहापानाची सोय केलेली आहे. या आटोपून.”

स्मित करत सरांनी वर्ग त्यांच्यावर सोपवून बाहेर पाऊल टाकले तोच वर्गात हलका कोलाहल सुरु झाला. सर जसे जसे स्टाफरूम कडे पाऊले उचलत होते तसा तसा कोलाहल वाढतच गेला. सर चकित झाले. शेजवाल सर आपल्याला रिलीव्ह करायला आले कि वर्गाला.

चहापान आटोपून सर जरा घाईतच आपल्या वर्गाकडे झप झप पावले उचलत आले. शेजवाल सर वर्गाकडे पाठ करून दोन्ही हात दरवाज्याच्या चौकटीला लावून दारात उभे होते.

 शेजवालाना धन्यवाद देऊन सर वर्गात आले. टेबल समोर उभे राहून समोर पाहताच त्यांना चरकाच बसला. हाच का परीक्षा हॉल जो दहा मिनिटांपूर्वी आपण सोडून गेलो होतो?

 वर्गात काहीजण आपल्या जागा सोडून दुसऱ्यांच्या बेंचवर त्यांच्या शेजारी बसून त्यांची उत्तरे आपल्या उत्तरपत्रिकेत उतरवून घेत होते. काहीजण हातात पुस्तकातील फाडलेली चिठोरी घेऊन ती उत्तरे लिहिण्यात मग्न होते. तर काहीजण चक्क २१ अपेक्षित प्रश्नसंच किंवा नवनीत मार्गदर्शक समोर ठेऊन घरी होम वर्क करत असल्यासारखे उत्तरे पुस्तकात पाहून पेपरात खरडत होते. त्यांच्या आगमनाची साधी दखलही कोणी घेतली नाही. सर थक्क झाले. थक्कहून थक्क झाले. जितक थक्क होता येईल तितके थक्क होऊन झाल्यावर याच्यापेक्षा अधिक थक्क होणे शक्य नाही याची जाणीव होऊन ते शेजवाल सरांकडे वळले.

“शेजवाल सर हा काय प्रकार सुरु आहे?”

शेजवाल सर निघतच होते. त्यांनी खुणेनेच सरांना जवळ बोलावले. सर जवळ आल्यावर शेजवाल सर त्यांच्या कानात खुसपुसले.

“सर हळू बोला, पेपर लिहित आहेत मुले. डीस्टरबन्स होतो त्यांना. एकाग्रता भंग होईल त्यांची.”

सर त्यातल्या त्यात जमेल तेवढे अजून थोडेसे थक्क झाले.

“शेजवाल सर, विनोद करताय का? यांची कसली डोंबलाची एकाग्रता? अहो काय प्रकार आहे हा? परीक्षा आहे की टिंगल?”

शेजवाल सरांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना अजून थोडे बाजूला घेतले. आणि हळू आवाजात त्यांच्या कानात सांगितले.

“सर इथे अशीच असते परीक्षा. आपल्या बापाचे काय जाते? जस चालत आलेले आहे तसे चालू द्यायचे. तुम्ही नवीन आहात. सीझन्ड झालात की सवय होऊन जाईल. काही वाटणार नाही.”

“पण शेजवाल सर, हे अयोग्य आहे. नियमबाह्य आहे. अशी परीक्षा घेऊन आणि देऊन तरी काय उपयोग? ते काही नाही हं. बाकी काय असेल ते असेल. माझ्या वर्गात मी हे चालू देणार नाही.”

“अहो सर, टेन्शन नका घेऊ. तुम्हाला नसेल तुमच्या डोळ्यादेखत हे होऊ द्यायचे तर मघा मी जस दरवाज्यात वर्गाकडे पाठ करून उभा होतो तसे उभे रहा. आता तुमच्या पाठीमागे काय चालते याची जबाबदारी तुमची कशी?”

अस म्हणत शेजवाल सरांनी डोळे मिचकावले. अजून काही ‘सांगून गोष्टी युक्तीच्या चार’ शेजवाल सरांनी तिकडून प्रस्थान ठेवले.

क्रमशः

©सुहास भुसे


Thursday 31 March 2016

बच्चू कडुंचे काय चुकले ?

अचलपुरचे अपक्ष आमदार बच्चू कडु यांची एक लढवय्या आणि स्वच्छ प्रतिमेचा आमदार अशी ओळख आहे. मंत्रालयातील उपसचिव गावित यांना मारहाण केल्यामुळे बच्चू कडु पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

भारतात लोकशाहीचा वरुन देखावा असला तरी आतून नोकरशहांचेच राज्य आहे हे उघड गुपीत आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेली ही निष्क्रिय कामचुकार धेंडे सरकारच्या अनेक उत्तम योजनांचा कचरा करतात. लोकप्रतिनिधी हे टेंपररी असतात आम्ही पर्मनंट आहोत. आम्हाला कोणी हात लावू शकत नाही अशी शिरजोर मस्ती या मस्तवाल अधिकाऱ्यांच्या अंगात भिनलेली असते. सामान्य जनतेला तर हे मुजोर नोकरशहा फाट्यावर मारतातच पण लोकनिर्वाचित आमदार ख़ासदार, अगदी मंत्र्यानाही कोलतात. अनेक उर्मट अधिकारी आमदारांना अरेतुरे करतात. या बैलाकडून आपले काम करुन घेणे ही या लोकप्रतिनिधींसाठी मोठी कसरतच असते.

जनतेची कामे आपल्या हातून त्वरित व्हावीत, अपंग आणि दीन दलितांना तात्काळ शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा याची आंतरिक तळमळ असणारा बच्चू कडु सारखा लढवय्या आमदार आणि हे मस्तवाल नोकरशहा यांच्यात संघर्ष होणे ही तर अटळ वस्तुस्थिती ठरते. बच्चू कडु यांचा हा संघर्ष नवा नाही. अनेक वर्षांपासून या निष्क्रिय,उद्दाम, कामचुकार शासकीय कर्मचाऱ्याना धडा शिकवण्याच्या नवनव्या युक्त्या योजत आलेले आहेत. शासकीय कार्यालयातील लोकांच्या डोळ्यावरील झापड निघावी यासाठी त्यांनी अनेकदा कार्यालयात जिवंत साप सोडले आहेत. नोकरशहारूपी सापांनी त्या खऱ्याखुऱ्या सापानांही जुमानले नाही हा भाग अलहिदा..

"मला आंदोलने,उपोषणे असे वेळखाऊ रोड शो करायला वेळ नाही. माणसाचे आयुष्य लहान आहे. मला खुप काही करायचे आहे गांजलेल्या पिचलेल्या लोकांसाठी. ज्यांचे जे काम आहे ते त्यांनी करावे जर ते करत नसतील तर त्यांना हरप्रकारे ते करायला लावणे हे माझे काम आहे."
अस अनेकवेळा आपल्या कार्यशैलीचे स्पष्टीकरण बच्चू कडु यांनी दिले आहे.

गावीत यांना आपण मारहाण केली नाही अस बच्चू कडु यांचे म्हणणे आहे. कदाचित हा मस्तवाल नोकरशहांचा संघटित बनावही असू शकतो. कारण एरवी जनतेच्या कामासाठी ढिम्म न हलणाऱ्या या लोकांनी आपली सुटलेली पोटे कमालीच्या वेगाने हलवत मंत्रालयात ठिय्या आंदोलन करत दबाव आणून बच्चू कडु यांना अटक करवली आहे. सामान्य जनतेसाठी एक नया शब्दही कधी खर्ची न घालनाऱ्या मंत्रालय अधिकारी संघटना,   राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, कास्ट्राईब महासंघ वगैरे संघटना अगदी तातडीने युद्धपातळीवर मैदानात उतरल्या आहेत. विशेष म्हणजे गैरवापरासाठी बदनाम झालेले अट्रॅसिटी कलम बच्चू कडू यांना लावण्याची निर्लज्ज मागणी हा गावित नावाचा संभावित करत आहे.

बच्चू कडु म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी या अधिकाऱ्याला मारहाण केली नसेलही कदाचित. पण या लातोंके भूत असणाऱ्या मस्तवाल नोकरशहांची लाथा खाण्याचीच लायकी आहे हे जनता खूब ओळखुन आहे. बच्चू कडु यांना सामान्य जनतेची सहानुभूती, सदिच्छा आणि पाठिंबा मिळणार यात कसलाच संशय नाही.

©सुहास भुसे.


Friday 25 March 2016

तुकारामगाथेचे साहित्यिक पैलू

      संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आध्यात्मिक पैलूबद्दल पुष्कळ चर्चा होते. विद्रोही पैलू ही बऱ्यापैकी समोर आणण्यात यश आले आहे. तुकाराम गाथा आणि त्यातील अभंग यातून तुकाराम आजही समाजातील दंभावर आसुड ओढत असतात. लोकांना व्यवहार ज्ञान देत असतात. भक्तिरसाचे अमृत पाजत असतात. तुकारामांची गाथा ही या सर्व दृष्टीने तर महत्वाची आहेच.. पण ही गाथा  साहित्यिक दृष्टया देखील अनमोल आहे. 

      या गाथेत आध्यात्मिक आणि गृहस्थजीवनाविषयी व्यावहारिक उपदेश करणारे अभंग आहेत तसेच काही छोट्या लघुकथा आहेत. या मराठी भाषेतील पहिल्या लघुकथा असाव्यात. काही विनोदी अभंग तर असे आहेत की आपण हसून हसून लोटपोट व्हावे. मानवी भाव भावना आणि तत्कालीन समाजजीवन यांचे यथार्थ चित्रण त्यांच्या अभंगातून घडते. तुलनात्मक दृष्टया पाहिले तर इतर संतांच्या वांड्मयात इतके वैविध्यपूर्ण जीवनदर्शन येत नाही. ' नवरसी वर्षेन मी ' अशी प्रतिज्ञा करून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली असली तरी 'शृंगाराच्या माथा पाय ' ठेवणारा शांत रस हाच तिचा गाभा आहे.

     तुकारामांचे जीवन आणि चरित्र लक्षात घेतले तर त्यांच्या अभंगातील वैविध्याचा सुगावा लागतो. त्यांच्या अभंगात येणारे हुतुतु, हमामा, वीटी दांडू, चेंडू, पोहणे,सुर पारंबा, आट्यापाट्या अश्या अनेकविध खेळांचे संदर्भ तुकारामांचे बालपण अनुभवदृष्टया संपन्न असल्याचे सूचित करतात. पुढे  गृहस्थाश्रमात तुकाराम महाराज आपली पत्नी, मुले यांच्यावर प्रेम करणारा, त्यांची काळजी वाहणारा आणि प्रपंच करत परमार्थ करणारा कुटुंबप्रमुख आहेत. स्वत: गृहस्थाश्रमापासून पलायन करून लोकांना ' आधी प्रपंच करावा नेटका ' असा सल्ला त्यांनी दिलेला नाही. त्यांच्या शब्दा शब्दाला जीवनातील टोकदार अनुभवांची धार आहे.

     ' वृक्षवल्ली आम्हा सोयरे ' हा अभंग तुकारामांची गाढी जीवननिष्ठा आणि रसिक दृष्टी अधोरेखित करतो. ' ब्रह्म सत्य: जगत् मिथ्य: ' किंवा ' संसार हा भवसागर दुस्तर' असे वास्तव जीवनाकडे पाठ फिरवणारे सदारडु तत्वज्ञान त्यांनी कधीही मांडले नाही. उलट सगळी संत मंडळी मोक्ष, जीवन मृत्युच्या चक्रातुन मुक्ती हेच जीवनाचे अंतिम ध्येय मानत असताना तुकाराम मात्र ' तुका म्हणे गर्भवासी, सूखे घालावे आम्हासी ' अस मागणे मागत हा मनुष्यजन्म पुन्हा पुन्हा मागतात.  याच जीवनावरील प्रेमामुळे त्यांच्या गाथेत फक्त भक्तीरस नाही तर नवरसांचा खराखुरा वास्तवदर्शी वर्षाव आहे.

     'ढाल तलवारे गुंतले हे कर। म्हणे तो झुंजार झुंजु मी कैसा ।।' हा अभंग दर्जेदार विनोदाचे अप्रतिम उदाहरण आहे. दुसऱ्या एका अभंगात एक धनगर एका पुराणिक बुवांचे कीर्तन  ऐकायला जातो. त्याचा बोकड हरवला आहे.

देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी॥
प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥

लोकांना वाटते हा पुराणिक बुवांवरच्या श्रद्धेमुळे रडतो आहे. वास्तविक त्याला पुराणिक बुवाची दाढी पाहुन त्याच्या बोकडाची दाढी आठवत असते.

आवरितां नावरे । खुर आठवी नेवरे ॥
बोलों नयें मुखावाटां । म्हणे होतां ब्यांचा तोटा ॥

बोकडाच्या दाढी सोबतच त्याला त्याचे खुर आठवत असतात. हा त्याचा बियाण्याचा बोकड होता. त्याचे गुण आठवून त्याला हमसु हमसु कढ येत आहेत.

दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥
मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥

पुराणिकांनी माया आणि ब्रम्ह अशी दोन बोटे वर केली की धनगराला बोकडाची दोन शिंगे आठवतात, पुराणिक बुवा चार बोटे वर करतात आणि सांगतात वेद चार होते, धनगराला बोकडाचे  चार पाय आठवतात 'होय,होय'.. अशी मान हलवत तो पुन्हा हमसु हमसु रडु लागतो. लोक हे सर्व म्हणजे त्याची श्रद्धा आणि विद्वत्ता समजून चकित होतात.

होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥
तुका म्हणे कुडें । कळों येतें तें रोकडें ॥

शेवटी मात्र त्याचे बिंग फूटते आणि त्याच्या अंतरीचा भाव बाहेर येतो. लोकांना समजते तो का रडतोय.. अश्या आशयाचा दृष्टांत किस्सा सांगून तुकाराम महाराज शेवटी म्हणतात संसारी माणसाच्या पोटात काही लपत नाही. सगळे भाव बाहेर कळू येतात.

     आता तुकारामांनी आपल्या गाथेत लिहिलेली एक अप्रतिम अभंगरूपी लघुकथा पाहुया. लघुकथा हा तसा आधुनिक वाङ्मय प्रकार आहे. पण संत तुकारामांनी आपल्या गाथेत हा प्रकार साडेतीनशे वर्षांपूर्वी कमालीच्या यशस्वीपणे हाताळला आहे. ही मराठीतील पहिली लघुकथाच नाही नुसती तर इतक्या कमी शब्दात इतका भावभावनांचा कल्लोळ, प्रचंड नाट्य साकार करणे येरा गबाळयाचे काम नाही. त्यासाठी शब्दांवर मजबूत पकड आणि हुकूमत असणारा तुकारामांसारखा शब्दप्रभुच हवा.

सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे । प्रेम मिठी पडे वदनासी ॥

या पहिल्या ओळीत आपल्या आराध्याची आळवणी करतात तुकाराम आपल्या कथेला सुरवात करतात.

व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी । आला दुराचारी पारधी तो ॥

अल्पाक्षरित्व आणि वेगवान कथानक हा या कथेचा महत्वाचा विशेष आहे. हे दोन पक्षी आपल्या कथेचे नायक आणि नायिका आहेत.  तुकारामांनी 'व्याले' हा कमालीचा सूचक शब्द इथे वापरला आहे. या शब्दातुन काय कळत नाही ? त्या पक्षी द्वयांचे प्रेम, त्यांचा शृंगार, त्यांचे सहजीवन, त्यांचा तो इटुकला संसार हे सारे फक्त 'व्याले ' या एकाच शब्दातुन आपल्या डोळ्यापुढे सरकते. आणि हा दुराचारी पारधी आपल्या कथेचा खलनायक आहे. या सुखी चित्रात आता त्याचे आगमन झाले आहे.

वृक्षाचिया माथा सोडिला ससाना । धनुष्यासी बाणा लावियेले ॥

आणि या पारध्याने आता एक भयंकर जाळे विणले आहे. या पक्ष्यांची शिकार होण्यापासून आता देव ही वाचवणे कठीण आहे. पक्षी जर वर उडाले तर त्यांच्यावर झडप घालण्यासाठी त्याने आपला बहिरी ससाना वृक्षाच्या माथ्याकडे सोडला आहे. आणि जर पक्षी ससाण्याच्या भीतीने जागेवरच बसून राहिले तर त्यांच्यावर सोडण्यासाठी त्याचा बाण प्रत्यंचा ताणून तयार आहे. आता या भयंकर दुहेरी पेचातुन या पक्षयांची सुटका कशी होणार ? पाहता पाहता या कथेत एक थरारक नाट्य येऊन उभे ठाकले आहे.

तये काळी तुज पक्षी आठविती । धावे गा श्रीपती मायबापा ॥

कोणीही अश्या भीषण संकटात आपल्या आराध्य देवतेचे स्मरण करेल. सगळे मार्ग कुंठित झालेले पाहुन त्या भ्यालेल्या पक्ष्यांनीही सर्वशक्तिमान परमेश्वराचा, मायबाप श्रीपतीचा धावा केला आहे.

उडोनिया जाता ससाना मारील । बैसता विंधील पारधी तो ॥

आता परमेश्वर जरी सर्वशक्तिमान असला तरी पृथ्वीवर त्याच्या शक्तीला मर्यादा आहेत. या मर्त्य जगात इथले नियम पाळूनच काहीतरी तोडगा निघायला हवा. पण काय तोडगा असणार ? कसलाही चमत्कार न करता श्रीपतीला हे कार्य पार पाडायचे आहे. ससाणा आणि बाण असा हा दुहेरी पेचप्रसंग आहे.  हा कथेतील नाट्याचा सर्वोच्च बिंदु आहे.

ऐकोनिया धावा तया पक्षियांचा । धरिला सर्पाचा वेश वेगी ॥

पण श्रीपती ने या भयंकर पेचप्रसंगातुन एक बेमालूम मार्ग काढला आहे. आधी विचार केल्यास लक्षात येणार नाही पण हा अकल्पनीय शेवट वाचून वाटते की हेच... हेच घडायला हवे होते. याहुन दूसरा मार्ग असुच शकत नाही. पण तरी या ओळीत फक्त आशा पालवली आहे. पेचप्रसंग अजुन कायमच आहे. श्रीपतीने पक्ष्यांचा धावा ऐकून करकराल अश्या मृत्युदुताचा सर्पाचा वेश घेतला आहे. पण पुढे काय ? सर्पाचा वेश घेऊन काय करणार श्रीपती ?

डंखोनि पारधी भुमीसी पाडिला । बाण तो लागला ससान्यासी ॥

आणि कथेत शेवटी येतो हा अल्कपनिय ट्विस्ट, सगळ्या पेचाला जबरदस्त वळण मिळते. एका क्षणात सगळा जमुन आलेला डाव उधळला जातो. आपल्या कथांचा अकल्पनीय आणि धक्कादायक शेवट करण्यासाठी ओ हेंरी प्रसिद्ध आहे. पण त्याच्या शेकडो वर्षे आधीच्या काळातील तुकारामांच्या या लघुकथेचा हा विस्मयजनक आणि धक्कादायक शेवट वाचून ओ हेंरी ने आपली पाची बोटे तोंडात घातली असती थक्क होऊन !

ऐसा तू कृपाळु आपुलिया दासा । होसील कोंवसा संकटींचा ॥
तुका म्हणे तुझी कीर्ति त्रिभुवना । वेदाचिये वाणी वर्णवेना ॥

आणि शेवटच्या ओळित या कथेत पाहुणा कलाकार म्हणून येणाऱ्या पण कथेचा सगळा नूरच पालटून टाकणाऱ्या मॅन ऑफ द मॅच श्रीपतीची तुकाराम स्तुती करतात.

ही लघुकथा साहित्यिक मूल्य, अल्पाक्षरित्व, आशयघनता, नाट्य, थरारकता, रोमांच आदी विविधतेने नटलेली आहे. लघुकथेचा सर्वात जूना आणि सर्वात पहिला त्याच सोबत सर्वात दर्जेदार नमूना आहे.
तुकारामांच्या गाथेत साहित्यिक मुल्याने नटलेले असे अनेक अभंग सापडतील. यावरून लक्षात यावे की तुकाराम हे फक्त एक श्रेष्ठ संतच नव्हते, एक विद्रोही समाज सुधारक नव्हते तर विलक्षण प्रतिभा असणारे श्रेष्ठ दर्जाचे साहित्यिक देखील होते.

©सुहास भुसे.

या लेखाची मी मराठी या वृत्तपत्रातील लिंक - epaper.mimarathilive.com/story.aspx?id=2567&boxid=165837848&ed_date=2016-03-30&ed_code=820009&ed_page=8