About

Saturday 10 December 2016

भवानी

भल्या पहाटे पहिल्या कोंबड्याला काशिनाथ जागा झाला. कडाक्याच्या थंडीत पांघरुणात मुरसून पडायचा मोह टाळून त्याने शाल अंगाभोवती गुंडाळून डोक्याला मफलरची टाफर मारली. चुलीतल्या गोवरीची राख हातावर घेत मिसरी करत त्याने आनंदीला त्याच्या कारभारणीला हाक मारली. आनंदी त्याच्या आधीच उठली होती. त्याची हाक ऐकताच चहाचे आधण ठेऊन तिने गरम पाण्याचा तांब्या त्याच्या हातात ठेवला. थंडीत अंगाचे मुटकुळे करून गोधडीत अंग चोरून झोपलेल्या पोरांना शिरपती आणि सदाला उठवायचे तिच्या जीवावर आले होते. पण काशीनाथची दुसरी हाक ऐकताच तिने हाका मारून ,हलवून त्यांना जागे केले. सगळ्यांनी पटकन उरकून गरम गरम चहा घेतला आणि हातात ब्याटऱ्या घेऊन कारल्याच्या फडात शिरले.

काशिनाथने घरच्या घरी ढोरमेहनतीने कारल्याचा फड मोठा जोरात जोपला होता. बोरी-बांबूच्या मांडवावरून हिरवीगार. कोवळी कोवळी लांबसडक कारली लोंबत होती. सगळ्यांनी अंग झाडून कामाला सुरवात केली. दिवस फटफटेपर्यंत सगळ्यांनी जोर मारून दहा क्रेट माल हातावेगळा केला.

अजून तासाभरात चार सहा क्रेटचा पल्ला मारून सगळ्यांनी माल उचलून अंगणात आणला. आनंदी पोरांना घेऊन कारली निवडायला बसली आणि काशिनाथ गुरांच्या धारा काढायला गेला. काशिनाथच गुरांची झाडलोट, आंबवणी, धारा, वैरण वगैरे आटोपेपर्यंत आनंदीने पोरांना घेऊन सगळी कारली छाटली. क्रेटमध्ये खाली केळीची पाने घालून ती कोवळी कोवळी कारली अलगद भरली. वरून त्यांना उन लागू नये म्हणून गोणपाटाची पोती ओली करून टाकली. सगळी बेस्तवार व्यवस्था लावून ती न्याहरीकडे वळली. झटपट न्याहरी बनवून तिने मुलांचे आटोपून त्यांना शाळेला पिटाळले. काशिनाथनेही झटकन न्याहरी करून आनंदीच्या मदतीने सगळी क्रेट गाडीच्या दोन्ही बाजूनी बनवून घेतलेल्या कॅरियरला लावून घेतली.

बाजार अकरा वाजल्यापासून खरा रंगात येई. म्हणजे काशिनाथला दहापर्यंत तरी बाजारात जायला लागे. आज सगळे लवकर उरकले म्हणून काशिनाथ जरा खुश झाला. कारली विकून त्याला कीटकनाशकवाल्याची उधारी सारायची होती, खतवाल्याला पुढच्या बाजाराचा वायदा करायचा होता. धाकट्या सदाचा शर्ट पाठीवर फाटला होता. दोन महिने झाले पोरगे ठिगळ लावून शर्ट घालत होत. नवा शर्ट हवा म्हणून बोंब मारत होते. त्याला नवीन गणवेश घ्यायचा होता. किराणा सामान आणायचे होते. म्हशीला भुस्सा आणायचा होता. सगळ्या कामांच्या यादीची एकवार मनातल्या मनात उजळनी करून त्याने मोटारसायकलला किक मारली.

बाजारात पोहोचायला काशिनाथला सव्वादहा वाजले. एका बाजूला गाडी लावत तो गाडीवरून उतरून एक एक क्रेट काढून खाली रचून ठेऊ लागला. तो क्रेट काढतो न काढतो तोच आठ, दहा व्यापारी बायांनी आणि माळणींनी त्याला गराडा घातला.

सुगलाबाई म्हणाली, ‘मामा देयाची का कारली?’
‘द्यायला तर आणली की व बाई, मागा की’
’बाजार लय पडलाय मामा, कुत्र खाईना माळव्याला. पण सगळी कॅरेट घेतो तुझी.’
‘कशी घेता व बाई, मागा गुत्तीच.’
’१० रु देतो बग एका कॅरेटला.’
१० रु एका कॅरेटला हे ऐकून काशिनाथ हतबुद्धच झाला. पंधरा ते अठरा किलो कारली फक्त दहा रूपयांना ?

‘चेष्टा करता का मावशी गरीबाची, नीट मागा की बाय जरा,’
‘धा रुपयाच्या वर परवडत न्हाय मामा, पण माल चांगलाय म्हणून तुला दोन रुपये वर देतो, १२ रुपयला दे कॅरेट.’
‘मावशी, जा बाय तुझ्या वाटनं, आपल न्हाय जुळायचं.’

हे ऐकत उभारलेली रखमा सौदा तुटतोय अस पाहून पुढे झाली. वरचे पोते बाजूला करून कॅरेट मध्ये हात घालत कारली दाबून बघत म्हणाली,
‘मामा १३ ला देयाची का? एकच भाव..’
हळू हळू काशिनाथ भोवती त्या सगळ्याजणी गिल्ला करू लागल्या. १०रु १२ रु १४ रु १५ रु..

काशिनाथच्या मस्तकातली अळी हलली.. उरफोड मेहनत करून जोपलेली कोवळी लूसलुशीत कारली मातीमोल भावाने लुबाडू पाहणाऱ्या त्या बायांची त्याला भयंकर चीड आली.
कॅरेटमध्ये चापचून १५ रु कॅरेट भाव करणाऱ्या एका बाईला संताप अनावर होऊन तो म्हणाला,
‘ये भवाने, ठेव ती कारली खाली. लाज वाटत नाही का १५ रु ला १५ किलो कारली मागायला?’

बस झाल..काशिनाथ च्या तोंडून रागाच्या भरात एक शिवी काय निसटली, सगळ्या साळकाया माळकाया त्याच्यावर तुटून पडल्या. रखमाने त्याचा शर्ट पकडला,
‘का रे मुडद्या, बाया माणस बगून शिव्या देतोस व्हय रं ?’
अस म्हणत रखमाने थोडा जोर लावताच कुजून गेलेल्या त्या शर्टच्या दोन चीरफाळ्या झाल्या. संधी साधून सुगलाने काशिनाथच्या एक श्रीमुखात भडकावली. बाया कचाकचा शिव्या देत जमेल तशी धराधरी करत होत्या आणि
काशिनाथला भर बाजारात होणारी आपली विटंबना बघून धरणी दुभंगून पोटात घेईल तर बर अस झाल होत.

अखेर त्या महामाया दमून बाजूला झाल्या व याच्या कारल्याला आता कोणी हात सुद्धा लाऊ नका असा इतर बघ्या व्यापाऱ्यांना दम टाकत तिथून चालत्या झाल्या.

शेजारच्या हॉटेलमधल्या पोऱ्याने काशिनाथला पाणी आणून दिले. काशिनाथने लडखडत उठून सगळी कॅरेट परत गाडीच्या कॅरियर ला लावली. एक भकास नजर बाजारावर टाकत त्याने गाडीला किक मारली. बाजाराच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गाढवलोळीच्या उकीरड्याजवळ त्याने गाडी थांबवली. आणि एक एक कॅरेट काढून उकिरड्यावर पालथे केले. सगळी कॅरेट पालथी करून डोक्याला हात लाऊन तो खाली बसला. इतका वेळ आवरून धरलेला कढ आता अनावर झाला आणि झाडासारखा अचल काशिनाथ विकल होऊन ढसाढसा रडू लागला.
(सत्यघटनेवर आधारित)

©सुहास भुसे

No comments:

Post a Comment