About

Saturday 28 May 2016

आणि माने सर सिझन्ड होतात- भाग 2

     माने सरांना काही केल्या ते दृश्य पाहवेना. कोणी गुपचूप चोरून काही कॉपी करतोय तर समजा कदाचित त्याच्याकडे दुर्लक्ष करता आले असते. पण आपल्या अस्तित्वाची दखल न घेता समोर सुरु असलेला प्रकार त्यांना अपमानजनक वाटला. त्यांनी भरभर विचार केला. काय होईल? बाहेरच्या त्या दमदाटी करणाऱ्या टग्याचा विचार त्यांच्या मनात आला. इथले गुंड प्रसंगी शिक्षकांना मारहाण देखील करू शकतात हे त्यांना ठाऊक होते. असे चार दोन किस्से ते ऐकून होते. दुसरी गोष्ट ही जर या परीक्षा केंद्राचीच पॉलिसी असेल तर आपल्याला उद्यापासून सुपरविजन दिले जाणार नाही. आणि आपले वरिष्ठ नाराज होतील तो भाग वेगळाच. पण हरकत नाही. काय व्हायचे ते सध्या चालू आहे त्या पेक्षा वाईट खचितच नसेल. त्यांनी मनाशी काही निर्धार केला.

“हे पहा मुलांनो, इकडे लक्ष द्या एक मिनिट. तुम्हाला शेजवाल सरांनी काय सांगितले किंवा तुमचे इतर पेपर कसे चालतात याच्याशी मला काही देणेघेणे नाही. मी हा प्रकार चालू देणार नाही. पटकन सर्वांनी आपल्या समोर जे काही आक्षेपार्ह आहे त्याची विल्हेवाट लावा. दोन मिनिट वेळ देतो. तरीही कोणी  कॉपी करताना दिसला तर त्याचा पेपर काढून घेण्यात येईल.”

 पण सरांच्या या धमकीवजा सूचनेचा वर्गावर ढिम्म परिणाम झाला. अनेकांनी मान वर करून देखील पाहिले नाही. कमालीच्या एकाग्रतेने सगळे पेपर लिहिण्यात दंग होते. मागच्या बेंच वरील एका जाड जुड मख्ख चेहऱ्याच्या मुलाने फक्त मान वर करून माने सरांकडे एक कटाक्ष टाकला. त्याच्या नजरेतील तुच्छतेच्या भावाने माने सरांच्या डोक्यात एक तिडीक आली. काहीतरी एक्शन घेतल्याशिवाय आपल्या सूचनेचा प्रभाव पडणार नाही. हे ओळखून ते भरभर चालत त्याच जाड्याच्या समोर येऊन उभे राहिले. त्याने पुन्हा एक तुच्छतापूर्ण कटाक्ष माने सरांकडे टाकून समोरच्या पुस्तकातील उत्तर भरभर पेपरात लिहायला सुरु ठेवले.

 माने सरांनी त्याचा पेपर ओढून घेतला.

“बाळ, मी समोरच्या भिंतीना बोलतोय का? हा प्रकार बंद करा. नाहीतर तुम्हाला कोणाला पेपर लिहिता येणार नाही.”

एक रागीट नजर सरांकडे टाकत तो जाड्या बोलला.

“सर, मला काही येत नाही लिहायला मनाने. तुम्ही द्या माझा पेपर. नायतर मी चव्हाण सरांकडे जाईन.”

“अरे जा ना. चल निघ बाहेर. कोणाकडे जायचे त्याच्याकडे जा.”

दानदान पाय आदळत तो मुलगा बाहेर गेला. या प्रकाराचा मात्र थोडा परिणाम झाला वर्गावर आणि सर्वांनी आपल्या समोरची पुस्तके चीठोऱ्या वगैरे बेंचच्या आत दडपले.

पाचच मिनिटात तो पोरगा आणि चव्हाण सर वर्गात हजर झाले. ज्या १२ शाळांची या केंदात परीक्षा होती त्यापैकी माने सरांच्या ज्ञानज्योती विद्यालयाचे चव्हाण सर मुख्याध्यापक होते. आणि या परीक्षेचे केंद्रप्रमुख अर्थात इथले सर्वोच्च नियंत्रक देखील होते. त्यांनी आल्या आल्या आपल्या पहाडी आवाजात मुलांना फैलावर घेतले.

”कोण हरामखोर सरांना उलट दुरुत्तरे करतोय रे. लाजा वाटत नाहीत का? दोन शब्द धड जुळवून लिहिता येत नाहीत आणि मिजास MPSC टॉपरची. लाथा घालीन एकेकाला. गाढवांनो एक तास मनाने खरडा की काहीतरी पेपरात. वर्षभर काय गोट्या खेळल्या काय?”

माने सर समाधानाने ऐकत होते. बरे झाले हा मुलगा चव्हाण सरांकडे गेला. चव्हाण सर पुढे म्हणाले,

“एक तर तुम्हाला कॉप्या करून लिहू द्या वरून तुमची मिजास सहन करा. मुर्खानो मुंगी होऊन साखर खावी. हत्ती झालात तर दांडकी बसतील. जे काही करायचे ते शेवटच्या एका तासात. तोवर खबरदार कोणाची तक्रार आली माझ्याकडे तर गय करणार नाही.”

त्या जाड्या मुलाकडे वळून सर म्हणाले.

“जा रे बंड्या. बस जागेवर. आणि परत उलट बोलला सरांना तर खैर नाही तुझी.”

बंड्या जागेवर जाऊन म्हणाला.

“सर माझ गाईड माने सरांनी घेतलेय.”

“माने सर देऊन टाका त्या मूर्खाचे गाईड आणि बाहेर या जरा.”

अस म्हणून चव्हाण सर बाहेर पडले. माने सरांना शेजवाल सरांसारखेच पाठीवर हात ठेवत समजुतीच्या सरात चव्हाण सर सांगू लागले.

“सर अस कडक करून चालत नाही. हीच मुले पास होऊन आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेतात. ही पासच झाली नाहीत तर महाविद्यालयातील प्रवेशांचे काय? शिवाय सरकारचा दट्ट्या असतोच वरून. अमुक तमुक टक्के निकाल लागलाच पाहिजे. नाहीतर अमुक होईल तमुक होईल. सबब ही अशी व्यवस्था इथे तयार झाली आहे. ही तुम्ही निर्माण केली नाही किंवा मी नाही. तेव्हा जे चाललय ते चालू द्या. तुम्हाला काही अडचण असेल एक अर्ज द्या. मी दुसरा सुपरवायजर पाठवतो वर्गावर.”

शेवटचे वाक्य म्हणताना चव्हाण सरांचा स्वर बदलला होता. माने सरांनी हताश होऊन मान डोलावली.

“नको सर. लक्षात आले माझ्या. मी ठीक आहे. करतो मी सुपर व्हिजन कंटिन्यू.”

“गुड , हेच छान होईल.”

अस म्हणून चव्हाण सरांनी तेथून प्रस्थान ठेवले.

आणि आता वर्गातली परीक्षा व्यवस्था जरा सुरळीतपणे सुरु झाली. मुलांनी पूर्ववत आपापले साहित्य बाहेर काढून आरामात पेपर लिहायला सुरवात केली. पक्या आणि शिर्क्या ने मोका बघून खिडक्या सताड उघडल्या. मघाच्या त्या गट्ट्यासारखे गट्टे आरामात प्रश्न बाहेर नेऊ लागले व उत्तरे आत आणून देऊ लागले. माने सर आता स्थितप्रज्ञपणे सगळा प्रकार पाहू लागले. त्यांनी थक्क व्हायचे आता सोडून दिले होते. पण जेव्हा शेजारच्या गावातील शाळेतील घोडके सर त्यांना त्या गट्टयाच्या मार्गाने खिडकीत चढलेले दिसले तेव्हा मात्र त्यांच्या थक्क होण्याची परिसीमा झाली.

 या परीक्षा केंद्राच्या मागच्या बाजूला लिंबोणीची मोठी बाग होती. त्या बागेत पर विद्यार्थी एखादा दुसरा मित्र किंवा भाऊ वगैरे कंपलसरी आलेले असतच. शाळांचे पूर्ण स्टाफ असत. ही सगळी यंत्रणा त्या बागेत आत लांबवर लिंबोणीच्या झाडांच्या आडोश्याने कार्यरत असे. शाळांची यंत्रणा इतर गट्टयांच्या मानाने सुसज्ज असे. शिपायांनी आपली पोरे ज्या खिडकीत असत त्या पोरांना आधी सूचना दिलेली असे त्याप्रमाणे त्यांनी तयार ठेवलेली प्रश्नांची नक्कल घेऊन यायची. दोन तीन शिक्षक नवनीत मार्गदर्शक, पुस्तके घेऊन तयार असत. शिपायांनी आणलेले प्रश्न घेऊन त्यांनी पटपट उत्तरे शोधायची. मग दुसरे  चार पाच शिक्षक एक दोन लिपिक कोरे कागद कार्बन पेपर लावून तयार असत. एकाने पटपट उत्तरे वाचायची. सगळ्यांनी ती धडाधड उतरून घ्यायची. १० मिनिटात ५० एक मार्कांची उत्तरे लिहिलेल्या पाच पन्नास कॉप्या तयार होत. शिपायांनी लगेच त्या आपापल्या विद्यार्थ्याना खिडकीतून पोहोच करायच्या. माने सरांना हे सगळे मागाहून तपशीलवार माहित होणार होते.

१२ वाजले. तासबेल पडली. तशी दोन तीन स्वयंसेवकांचे बिल्ले लावलेली पोरे आत शिरली. ही पोरे त्या केंद्र शाळेतीलच ९ वीच्या खालच्या वर्गातील मुले होती. त्यांना वर्गात पाणी पुरवण्याचे काम दिले होते. प्रत्येक विद्यार्थ्याजवळ जाऊन ती पाणी देत होती आणि विद्यार्थी आपली लिहून झालेली चिठोरी त्यांच्या खिश्यात कोंबत होते. सर्वांना पाणी देऊन झाल्यावर हे स्वयंसेवक सगळे रॉ मटेरियल घेऊन बाहेर गेले. या शाळेत सुट्टीच्या दिवशी नेहमी लग्ने होत. त्यासाठी मैदानात एका बाजूला एक मोठी भट्टी कायमस्वरूपी होती. परीक्षा काळात ती मंद आचेवर सतत पेटती ठेवलेली असे. हे स्वयंसेवक त्या सगळ्या वापरलेल्या चिठोऱ्याचे गठ्ठे त्यात नेऊन टाकत. माने सर या बेमालूम व्यवस्थेचे एक एक पैलू चकित होऊन हताश नजरेने आणि विमनस्क मनाने पाहत होते. कधी एकदा तीन तास होतात आणि आपली सुटका होते अस त्यांना झाले होते.

१ चा टोल पडला. दोन तास उलटले होते. आणि इंग्रजीचे कापसे सर दरवाज्यात उभे होते.

“सर चहा वगैरे घेऊन यायचा असेल तर या. मी आहे १० ,मिनिटे.”

माने सरांना चहाची इच्छा राहिली नव्हती.

“ठीक आहे.” म्हणत कापसे सर आत आले.

“मुलांनो पहिला प्रश्न fill in the blanks सोडवला का? नसेल तर पटपट रिकाम्या जागा लिहून घ्या. पहिली रिकामी जागा proportion.”

कापसे सर वर्गात फिरत रिकाम्या जागा सांगू लागले. बंड्याजवळ येताच त्याला प्रपोर्शन लिहिता येत नाहीये हे त्यांच्या लक्षात आले.

“बंड्या अरे नीट लिही. हं ..पी आर ओ .. अरे अरे मुर्खा ते क्यू झाले. पी पी ...”

एक खाडकन कानाखाली वाजवत कापसे सरांनी बंड्याच्या हातातला पेन घेतला. व स्वत:च त्याची रिकामी जागा लिहून दिली.

“ हं तर आता शेवटचा प्रश्न ट्रान्सलेशन. मी सांगतो लिहा भरभर.”

माने सरांना आज धक्क्यावर धक्के बसत होते. त्यांच्या मनातील आदर्श मूल्यांना आणि तत्वांना सुरुंग लागत होता. उघड्या डोळ्यांनी ते शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे पाहत होते.

 शेवटचा अर्धा तास उरला होता. माने सर वर्गात पाठीवर हात टाकून चकरा मारत होते. जाता जाता त्यांच्या ज्ञानज्योती विद्यालयातील एका विद्यार्थिनीच्या पेपरवर त्यांची नजर गेली. ही कुसुम त्यांच्या यंदाच्या बॅचचे आशास्थान होती. जिल्ह्यात किंवा गेला बाजार केंद्रात तरी ती नंबर आणणार अशी सर्वांची अपेक्षा होती. Do’s and don’ts  मधले एक विधान जे do’s मध्ये लिहायला हवे होते ते तिने don’t  मध्ये लिहिले होते. हिचा एक मार्क हमखास जाणार. माने सरांनी विचार केला. इतके सगळे गैरप्रकार इतक्या घाऊक प्रमाणावर इथे सुरु आहेत. त्यात आपणच शुद्ध सात्विक राहून काय बदल होणार आहे? सगळे आपल्या शाळेचे हित पाहत असताना आपण तरी का मागे रहा. आपण एकटे प्रामाणिक राहून काही भारत देश सुधारणार नाही. असा विचार करत ते कुसुम जवळ थांबले. कुसुम ने वर मान करून त्यांच्या कडे बघितले. त्यांनी हलक्या आवाजात तिच्या पेपरवर बोट ठेवत तिला तिची चूक दाखवली.

 थोड्या वेळाने त्यांना आपल्या कृत्याची शरम वाटली. आता या व्यवस्थेचा निषेध करण्याचा नैतिक अधिकार आपण जणू गमावून बसलो आहोत अशी भावना होऊन मघाची त्यांची ताठ मान काहीशी खाली झुकली. डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांची नजर दरवाज्याकडे गेली.

 दरवाज्यात शेजवाल सर उभे होते. हा सर्व प्रकार पाहून ते गालातल्या गालात हसत होते. ‘माने सर तुम्ही खूप लवकर सीझन्ड झालात’ असाच काहीसा भाव त्यांच्या नजरेतून व्यक्त होत होता. माने सरांची मान अधिकच झुकली.  

©सुहास भुसे.



No comments:

Post a Comment