About

Saturday 28 May 2016

आणि माने सर सिझन्ड होतात - भाग 1

    उत्तरपत्रिकांचा गठ्ठा आणि इतर साहित्य घेऊन वेळेच्या आधी अर्धा तास माने सरांनी पेपर हॉल मध्ये प्रवेश केला. अलीकडेच शिक्षक म्हणून  ज्ञानज्योती विद्यालयात रुजू झाल्यानंतर बोर्डाच्या परीक्षेत माने सरांचे आज पहिलेच सुपरव्हिजन होते. त्यामुळे सर चांगलेच उत्साहात होते. आल्या आल्या पोरांना जरा दमात घ्यावे म्हणून एक कठोर नजर या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यन्त फिरवली. त्या चिरपरिचित शिक्षकी नजरेने आपला पूर्ण लेखाजोखा घेतला गेला आहे याची मुलांना पूर्ण जाणीव झाल्यानंतर त्यांनी खास राखून ठेवलेल्या कठोर आवाजात सुचना केली.

"कोणाला एकमेकांना पेन, पेंसिल, रबर किंवा काही साहित्य द्यायचे घ्यायचे असेल किंवा कोणाशी महत्वाचे दोन शब्द बोलायचे असतील किंवा इकडे तिकडे बघुन मानेचे काही व्यायामप्रकार करुन घ्यायचे असतील तर पाच मिनिट वेळ देत आहे. तेवढ्यात काय ते उरकुन घ्या."

तो खास आवाज आणि सरांची एकंदर देहबोली बघुन बिलंदर पोरांच्या पोटात गोळा आला.

"आयला हे जरा कडक प्रकरण दिसते"

"आता कसे रे" अश्या आपसात नेत्रपल्लव्या करुन झाल्या.

या परीक्षा केंद्राची कीर्ति ठावुक असल्याने माने सरांनी दूसरी सुचना त्यापेक्षा वरच्या पट्टीतला आवाज लावून केली.

"सर्वांनी आपापल्या जवळच्या खिडक्या लावून बोल्ट सरकवुन घ्या. कोणाची खिडकी उघडली किंवा किलकिली झाली तर त्याचा पेपर तात्काळ काढून घेऊन त्याची सन्मानपूर्वक बोळवण करण्यात येईल."

घड्याळाकडे बघत बरोबर पाच मिनिटे झाल्यावर सरांनी उत्तरपत्रिका वाटल्या. बारकोड स्टिकर देऊन झाली.

11 च्या ठोक्याला प्रश्नपत्रिका वाटप झाले. काही मुले मान खाली घालून भरभर पेपर सोडवू लागली. निम्म्याच्या वर मुले मात्र अस्वस्थ चूळबुळ करत होती. कोणाची थोडी जरी हालचाल झाली तरी तिचा वेध घेत सरांची कठोर नजर तिथवर पोहोचत होती. पोरांना बांधल्यासारखे झाले होते.

     ही मुले काहीच लिहित नाहीत हे पाहून सर थक्क झाले होते. तीही एक दोन नव्हे तर अर्ध्याच्या वर वर्ग. १० वर्षे ज्ञानमंदिराच्या पायऱ्या झिजवून ३० मिनिटे पेपर लिहायचे ज्ञान यांना मिळाले नसावे हे यांना विस्मयजनक वाटले. असो, तूर्त ही समस्या उकलण्याची ही वेळ नव्हे म्हणून त्यांनी तो विचार झटकला.

 होतास्ता अर्धा तास उलटला. बिलंदर पोरांचा धीर सुटत चालला होता. मागच्या भिंतीच्या खिडकीजवळ बसलेल्या पक्याच्या खिडकीबाहेर खुसपूस झाली. सरांनी तिकडे कान दिला.

“पक्या आर दार उगडून प्रश्न टाक की लगा बाहेर. ५ मिन्टात कॉप्या आणून पोच करतो.”

पक्या सर ऐकत आहेत हे बघून थोडा बिचकला.

“गण्या तू जा लगा. थोड्या वेळानी ये. जरा कडक सर आलय.”

पक्याने जरी खुसपूसत सांगितले तरी वर्गातल्या शांततेमुळे सर्वांना हा संवाद ऐकू आला.

इतक्यात मागच्या खिडकीत बसलेल्या शिर्क्याच्या खिडकीवर टकटक झाली. सरांनी चिडून पुढे होत दार उघडले. तर एक मोठा पैलवान गट्ट्या खिडकीवर चढून गजाना धरून लोंबकाळत होता.

“काय रे काय पाहिजे तुला? चल निघ इकडून. लिहू दे पोरांना पेपर. परत आलास तर पोलिसांना बोलावेन.”

अस म्हणत सरांनी त्याला सज्जड दम दिला. म्हणजे सरांना तस वाटल मनातल्या मनात. पण तो गट्ट्या सरांकडे बघत धमकीवजा हसला.

“सर नवीन आल्यात दिसतय आज. पेपर सुटल्यावर भायेर यायच आहे ना? भायेर आमीच हौत.”

माने सरांच्या अंगाची लाही लाही झाली संतापाने. त्या मूर्खाच्या तोंडी लागण्यापेक्षा त्यांनी धाडकन दार लावत बोल्ट सरकवला. मग एक इरसाल शिवी...मग धप्पकन उडी मारल्याचा बाहेर आवाज आला. एक जळजळीत नजर शिर्क्यावर टाकत सरांनी पूर्ववत आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित केले.

 हा प्रकार होऊन पाच दहा मिनिटे उलटली तोच मुख्य दरवाज्यावर टिकटिक झाली. सरांनी बघितले तर बिल्डींग कंडक्टर शेजवाल सर दारात उभे होते.

“माने सर १० मिनिट रिलीव्ह करायला आलो आहे. स्टाफरूममध्ये चहापानाची सोय केलेली आहे. या आटोपून.”

स्मित करत सरांनी वर्ग त्यांच्यावर सोपवून बाहेर पाऊल टाकले तोच वर्गात हलका कोलाहल सुरु झाला. सर जसे जसे स्टाफरूम कडे पाऊले उचलत होते तसा तसा कोलाहल वाढतच गेला. सर चकित झाले. शेजवाल सर आपल्याला रिलीव्ह करायला आले कि वर्गाला.

चहापान आटोपून सर जरा घाईतच आपल्या वर्गाकडे झप झप पावले उचलत आले. शेजवाल सर वर्गाकडे पाठ करून दोन्ही हात दरवाज्याच्या चौकटीला लावून दारात उभे होते.

 शेजवालाना धन्यवाद देऊन सर वर्गात आले. टेबल समोर उभे राहून समोर पाहताच त्यांना चरकाच बसला. हाच का परीक्षा हॉल जो दहा मिनिटांपूर्वी आपण सोडून गेलो होतो?

 वर्गात काहीजण आपल्या जागा सोडून दुसऱ्यांच्या बेंचवर त्यांच्या शेजारी बसून त्यांची उत्तरे आपल्या उत्तरपत्रिकेत उतरवून घेत होते. काहीजण हातात पुस्तकातील फाडलेली चिठोरी घेऊन ती उत्तरे लिहिण्यात मग्न होते. तर काहीजण चक्क २१ अपेक्षित प्रश्नसंच किंवा नवनीत मार्गदर्शक समोर ठेऊन घरी होम वर्क करत असल्यासारखे उत्तरे पुस्तकात पाहून पेपरात खरडत होते. त्यांच्या आगमनाची साधी दखलही कोणी घेतली नाही. सर थक्क झाले. थक्कहून थक्क झाले. जितक थक्क होता येईल तितके थक्क होऊन झाल्यावर याच्यापेक्षा अधिक थक्क होणे शक्य नाही याची जाणीव होऊन ते शेजवाल सरांकडे वळले.

“शेजवाल सर हा काय प्रकार सुरु आहे?”

शेजवाल सर निघतच होते. त्यांनी खुणेनेच सरांना जवळ बोलावले. सर जवळ आल्यावर शेजवाल सर त्यांच्या कानात खुसपुसले.

“सर हळू बोला, पेपर लिहित आहेत मुले. डीस्टरबन्स होतो त्यांना. एकाग्रता भंग होईल त्यांची.”

सर त्यातल्या त्यात जमेल तेवढे अजून थोडेसे थक्क झाले.

“शेजवाल सर, विनोद करताय का? यांची कसली डोंबलाची एकाग्रता? अहो काय प्रकार आहे हा? परीक्षा आहे की टिंगल?”

शेजवाल सरांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना अजून थोडे बाजूला घेतले. आणि हळू आवाजात त्यांच्या कानात सांगितले.

“सर इथे अशीच असते परीक्षा. आपल्या बापाचे काय जाते? जस चालत आलेले आहे तसे चालू द्यायचे. तुम्ही नवीन आहात. सीझन्ड झालात की सवय होऊन जाईल. काही वाटणार नाही.”

“पण शेजवाल सर, हे अयोग्य आहे. नियमबाह्य आहे. अशी परीक्षा घेऊन आणि देऊन तरी काय उपयोग? ते काही नाही हं. बाकी काय असेल ते असेल. माझ्या वर्गात मी हे चालू देणार नाही.”

“अहो सर, टेन्शन नका घेऊ. तुम्हाला नसेल तुमच्या डोळ्यादेखत हे होऊ द्यायचे तर मघा मी जस दरवाज्यात वर्गाकडे पाठ करून उभा होतो तसे उभे रहा. आता तुमच्या पाठीमागे काय चालते याची जबाबदारी तुमची कशी?”

अस म्हणत शेजवाल सरांनी डोळे मिचकावले. अजून काही ‘सांगून गोष्टी युक्तीच्या चार’ शेजवाल सरांनी तिकडून प्रस्थान ठेवले.

क्रमशः

©सुहास भुसे


No comments:

Post a Comment