About

Monday 17 August 2015

वादग्रस्त इतिहासकार पुरंदरे : अनुत्तरित प्रश्न आणि आक्षेप भाग-2

     मागील लेखात आपण पुरंदरे यांनी शिवजयंती दिनांकाबाबत घोळ घालून मुद्दामहून संभ्रमाचे वातावरण कसे तयार केले, शिवरायांना त्यांची नसलेली गोब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली कशी चिकटवली आणि जेम्स लेन ला संदिग्ध मदत करून त्याचे कौतुक करून कधीही साधा निषेधही कसा व्यक्त केला नाही हे तपशीलवार पाहिले. या उत्तरार्धात आपण इतर आक्षेपांची चर्चा करू पैकी

४ राजमाता जिजाऊची बदनामी करणे
५ मराठा सरदारांचे चुकीचे एकांगी चित्र रंगवून त्यांच्यावर विकृत टीका करणे.

या दोन आक्षेपांबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी पुरंदरे ना पाठवलेल्या पत्रात ( ज्याला पुरंदरे यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही )  सविस्तर मुद्देसूद मांडणी आहे. त्यापेक्षा अधिक काही लिहिण्यासारखे नाही म्हणून मी ती पत्रेच इथ टाकत आहे. या दोन मुद्द्यांसाठी वाचकांनी ती पाहावीत. दोन महत्वाच्या आक्षेपांविषयी चर्चा करू.

६. रामदासाला स्वराज्यप्रेरक व गुरु दाखवणे, व शहाजीराजांच्या स्वराज्यप्रेरक या भुमिकेकडे दुर्लक्ष करणे.

     रामदासांना शिवछत्रपतींचे गुरु व स्वराज्याचे प्रेरक म्हणून दाखवणे ही आणखी एक मोठी लबाडी. या दादोजी व रामदास यांच्या कारस्थानात फक्त पुरंदरेच नाहीत तर अनेक ब्राह्मण इतिहासकार सामील आहेत. रामदासांचे उदात्तीकरण करण्याच्या नादात पुन्हा एकदा धादांत खोटा इतिहास शिवप्रेमींच्या गळ्यात मारण्यात आला.

एका पत्रकार परिषदेत स्वत: बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वत: कबुली दिली आहे की .. “ होय रामदास शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते.” यावर उपस्थित पत्रकारांनी त्यांना विचारले की “ अनेक इतिहासकार तस सिद्ध करत आहेत मग तुम्ही स्पष्ट सांगत का नाहीत हे “ यावर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले.  “ ते म्हणतात ते खोट नाही. ते इतिहास जरा ताणतायत. मी रामदासांना संशयाचा फायदा देतोय.”   असे चक्क हास्यास्पद उत्तर त्यांनी पत्रकार परिषदेत दिले.

हरी नरके याविषयी म्हणतात पहिल्यांदा राजवाडे, ह ना आपटे, बाल टिळक, शक्र श्रीधर देव ,ल रा पांगारकर, अनंत दास रामदासी, न्या रानडे सदाशीव खंडो आळपेकर आदी अनेक मंडळींनी यावर सुपारी घेऊन  १८७० ते २००४  अशी तब्बल १३४ वर्षे काम केले. धन्य ती जात निष्ठा ..धन्य तो वर्चस्ववाद.

रामदास स्वराज्यप्रेरक ? 

     रामदास हे स्वराज्य प्रेरक कसे असू शकत नाहीत हे रामदास चरित्रातला कालानुक्रमच सिद्ध करतो. रामदासांचा जन्म झाला इस १६०८ साली. त्यानंतर त्यांचे १२ व्या वर्षी म्हणजे इस १६२० साली लग्न करण्याचे योजले होते. लग्नमंडपातून त्यांनी पलायन केले. पुढे १२ वर्षे नाशिक येथे तपश्चर्या केली . इस  १६३२ साली ती तीर्थयात्रेला निघाले. सुमारे १४ वर्षे तीर्थयात्रा करून ते इस १६४६ साली महाराष्ट्रात आले. तोपर्यंत इस सन १६४५ साली तोरणा जिंकून शिवछत्रपतींनी स्वराज्याचे तोरण बांधले होते. आता या सर्व कालक्रम पाहिला असता तर रामदासांनी छत्रपतीना प्रेरणा दिली या दाव्यातला फोलपणा लक्षात येतो.

रामदासांची कथित राष्ट्रभक्ती 

     महाराष्ट्रात आल्यानंतर ही रामदासांनी इस १६४९ साली पहिले राममंदिर चाफळ आदिलशाही राज्यात बांधले. अर्थात शत्रूराज्यात. त्यासाठी जमीन बाजी घोरपडे अर्थात पुन्हा शिवरायांच्या शत्रूकडून घेतली. त्यासाठी पुन्हा शिवरायांच्या   शत्रूकडून अर्थात मुरार जगदेव कडून त्यांनी या मंदिरासाठी वर्षासन मिळवले. हे अनुदान किंवा वर्षासन रामदासांना मुरार जगदेवाने मिळवून दिले ते आदिलशहा कडून. थोडक्यात रामदास हे शिवछत्रपतींचे गुरु असले तरी ते काम मात्र आदिलशहाचे करत होते. या संदर्भांवरून रामदासांच्या खूप गवगवा केलेल्या राष्ट्रभक्तीचे धिंडवडे निघतात.

रामदास शिवरायांचे गुरु होते का ?

     रामदास हे शिवरायांचे  गुरु होते हे सांगण्यासाठी एक महत्वाचा पुरावा दिला जातो तो तुकारामांच्या अभंगाचा. तुकाराम महाराज शिवछत्रपतीना मार्गदर्शनासाठी रामदासाकडे पाठवतात. यासाठीचे तुकारामांच्य नावावर गाथेत अ क्र १८८६ ते १८९० हे ५ अभंग रामदासीनी घुसडले. ते अभंग कसे प्रक्षेपित आहेत याची तुफान खिल्ली उडवत पुराव्यानिशी हरी नरके यांनी सिद्ध करून दाखवले आहे. यात हरी नरके यांनी या अभंगातील एकेका शब्दाचा पंचनामा करत रामदासी प्रचारकांचा खोटेपणा उघड पाडला आहे.  इच्छुकांनी हरी नरके यांची या विषयावरील भाषणे ऐकावीत. ती यु ट्यूबवर उपलब्ध आहेत.

रामदास शिवाजी महाराज सबंध 

     रामदासी बखरीत लिहिल्या गेलेल्या विनोदी किस्स्यांविषयी तर न बोललेलंच बरे. बखरकार अनेक खोट्या नाट्या कथा रंगवत म्हणतात की रामदास हे इतके महान संत होते की ते थेट औरंगजेब व शिवराय दोघांच्याही अंतपुरात जात असत. यावर नरहर कुरुंदकर म्हणतात की, “रामदास जर शिवाजी महाराज व औरंगजेबाच्या अन्तपुरात जात असेल तर तिथे फक्त राणी किंवा हिजडा किंवा हेर या तीनच व्यक्तिना प्रवेश असतो. रामदास यापैकी कोण होते? "

     रामदासी बखरीत अजून एक हास्यास्पद किस्सा येतो. तो असा की शिवछत्रपतीना एकदा (इस १६५० साली ) आंब्याच्या मोसमात आंबे खात असताना सद्गुरू रामदासांची आठवण झाली. तेव्हा रामदास आपल्या शिष्याच्या भावना जाणून घेऊन तिथे लगेच प्रकट झाले. तेव्हा छत्रपती रायगडावर आपल्या राण्यांसह बसलेले होते. आंबे खाऊन रामदास अंतर्धान पावले. हा किस्सा बखरीनुसार इस १६५० साली घडला तर रायगड स्वराज्यात सामील झाला इस १६५६ साली. तेव्हा याविषयी अधिक काय लिहावे.

     रामदासी बखरीतल्या आणखी एका घानेरड्या संदर्भा विषयी न लिहिलेलच बर...

     रामदास व शिवाजी महाराज यांची आयुष्यात एकदाही भेट झाली नव्हती अस आता साधार सिद्ध झाल आहे. छत्रपती व रामदास यांची भेट झाली होती अस सिद्ध करू शकणारा एकमेव पुरावा म्हणजे इस १६७८ साली लिहिलेल शिवरायांचे पत्र . १५ सप्टेंबर १६७८ च पत्र हे पत्र पूर्णपणे खोटे आहे अस गजानन भास्कर मेहेंदळे यांनी पुराव्यासह सिद्ध केले आहे. हे बनावट पत्र रामदास भक्तांनी हेतूपुरस्पर नंतर तयार केले आहे.

     रामदासी बखरी या पूर्ण प्रक्षिप्त आहेत. जे दोन रामदासी रामदासांच्या प्रत्यक्ष सोबत होते व रामदासांचे निधन झाल्यावर त्यांनी जे रामदास चरित्र लिहिले त्या समकालीन चरित्रात शिवाजी महाराजांचा साधा उल्लेख देखील नाही.
या सर्व गोष्टीवरून व पुराव्यांवरून रामदासाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील नगण्य स्थान स्पष्ट होते.

खरे स्वराज्यप्रेरक कोण ?

     शिवरायांच्या स्वराज्याला भक्कम पार्श्वभूमी लाभली ती शहाजी राजांची. शहाजी राजांची जी सुप्त इच्छा आपल्या हयातीत पूर्ण झाली नाही ती त्यांनी आपल्या पुत्रामार्फत पूर्ण करण्याचे स्वप्न पाहून त्यासाठी लागणारी सर्व मशागत करून ठेवली व वेळोवेळी करत राहिले. हे शहाजी राजांच्या जयराम पिंडे राधामाधवविलासचंपू या चरित्रावरून स्पष्ट झाले. तिच्या प्रस्तावनेत राजवाडे यांनी पुन्हा रामदासांचा उदो उदो केला आहे. या प्रस्तावने विषयी एक मजेशीर किस्सा ..

     शहाजीराजांच्या दरबारात असलेल्या विद्वान कर्तबगार सल्लागारांमुळे शहाजी राजे घडले आणि मग शहाजीराजांमुळे शिवाजी राजे घडले अशी मांडणी करताना राजवाडे यांनी एक हास्यास्पद बामणी कावा करण्याचा प्रयत्न केला. हे  दाखवताना त्या ७० सल्लागारांत एकही चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण नाही हे राजवाडे यांच्या लक्षात आले. अरेच्चा हे कस शक्य आहे ? मग त्यांनी ओढून ताणून त्यात एक चित्पावन ब्राह्मण घुसडला. या ७० जणांच्या यादीत जे २७ नंबरचे नाव आहे ते म्हणजे गंगाधर अभेद. या अभेद नावाची फोड त्यांनी अभेद म्हणजे  अ + भेद म्हणजे न भिणारा म्हणजे अ + भयंकर म्हणजे अभ्यंकर अशी केली आहे.

     हेच सर्व कारस्थान पुढे रेटत पुरंदरे हे देखील दादोजी ला सर्व श्रेय व महत्व देत प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी शहाजीराजांना गैरहजर दाखवतात. व त्यांचे स्थान शिवचरित्रात नगण्य असल्याचे भासवतात. एका प्रसंगात तर पुरंदरे यांनी अस दाखवल आहे पितृभक्त शिवाजी पित्याच्या सुटकेसाठी कोंढाणा आदिलशाह ला द्यावा लागल्याने चक्क आपल्या पित्याला शिव्या देऊ लागतात त्यावर वृद्ध ब्राह्मण कारभारी त्यांची कानउघडणी करून (साक्षात छत्रपतींची) समजूत घालतो.
   
     असले दिव्य प्रसंग प्रचंड जातीप्रेम असल्याशिवाय कोणी घुसडणे शक्य आहे काय ?

७. दादोजी सारख्या सामान्य आदिलशाही चाकराला प्रचंड वलय प्राप्त करून देऊन त्यांनाही शिवरायांचे गुरुपद चिटकवने

नावापासून लबाडी

     दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु हे आपण सर्वांनी इ. चौथीच्या संस्कारक्षम वयात घोकल्याने इतके पक्के झाले आहे की हे दाधांत खोटे आहे हे स्वीकारणे जड जावे. या खोटे पणाची सुरवात नावापासून सुरु होते. शिवरायांच्या सर्व साथीदारांची नावे व आडनावे इतिहासात येतात. उदा. तानाजी मालुसरे , कोंडाजी फर्जद, बाजीप्रभू देशपांडे इ. इ. अपवाद दोन नावांचा. एक दादोजी कोंडदेव दुसरा दुश्मन कृष्णाजी भास्कर. दादोजी कोंडदेव हा उल्लेख दादोजी कुलकर्णी असा सरळ का येत नाही ? कारण उघड आहे.

दादोजी च्या थापेला विरोध कधीपासून ?

     दादोजीचे सत्य स्वरूप दादोजीचा पुतळा काढला किंवा त्यांच्या नावाचा पुरस्कार रद्द केला तेव्हा उघड झाले नाही तर हे खूप पूर्वीपासून उघड गुपित आहे. दादोजी ला गुरुपदी बसवण्याचे षड्यंत्र साधारणतः पेशवाईच्या उत्तरकाळात सुरु झाले. त्याआधीच्या ऐतिहासिक साधनात अगदी सभासद बखरीत देखील दादोजीचे स्थान नगण्य असल्याने फारसे उल्लेख येत नाहीत. आणि या असत्य इतिहासाची कल्पना सर्वप्रथम महात्मा फुले यांना आली. म्हणूनच शिवरायांच्या गुरुविषयी आपल्या पोवाड्यात ते लिहितात, “ मासा पाणी खेळे गुरु कोण ? “

     पुढे त्याला विरोध राजर्षी शाहू महाराज यांनी केला. आपल्या १९२० साली लिहिलेल्या एका सनदेत ते लिहितात “ दादोजी व रामदास हे श्री शिवछत्रपतींचे गुरु होते ही क्लृप्ती ब्राह्मणांचीच.” हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी त्यांनी छत्रपतींचे सत्य चरित्र लिहावे हा प्रस्ताव त्या काळाच्या मानाने ६००० रुपयांचे घसघशीत मानधन देऊन तात्कालिक इतिहासकार रावबहाद्दूर डी बी पारसनीस यांना दिला. पण ते काम त्यांचेकडून पूर्ण झाले नाही. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनाही हा प्रस्ताव राजर्षीनी दिला होता पण त्यांच्याकडूनही हे कार्य पूर्ण झाले नाही. शेवटी कृष्णाजी अर्जुन केळूसकरांनी त्याकाळी उपलब्ध साधनांनुसार शिवचरित्र पूर्ण केले. हे अस्सल साधने वापरून लिहिले गेलेले पहिले सत्य शिवचरित्र. त्यावेळी बहुजन वृत्तपत्रात हा विषय गाजला पण कालांतराने लोक तो विसरले. शिवाय ब्राह्मनांच्या नगाऱ्यापुढे बहुजनांच्या टिमकीचे आजही फारसे चालत नाही तिथे तो तर जुना काळ होता.

दादोजी विषयी इतिहासकार काय म्हणतात.

१. सभासद बखरीचे संपादक दत्ता भगत - "उत्तरकालीन बखरकारांनी शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत दादोजी कोंडदेवाचे गुरु म्हणून चित्रण करताना दादोजीला अवास्तव महत्व दिले आहे,ते या (सभासद) बखरीत नाही.शिवाजी महाराजांना दादोजीबद्दल आदर असणार पण यांचे संबंध मालक/सेवक (चाकर) आहेत हे सभासदाच्या लक्षात आहे."

२. वा.सी.बेंद्रे  - " शिवाजी-जिजाई यांना दादोजी कोंडदेवाबरोबर पाठविले ही एक काल्पनिक माहीती आहे.अर्थात ती चुकीची आहे."
  वा.सी,बेंद्रे यांनी इ.स.१६४४ मध्ये मुहम्मद अदिलशहाने दादोजी कोंडदेवाचा एक हात कापल्याचे नमुद केले आहे.

३. रा.व्य.जोशी -   "मुघल दरबारच्या एका कागदामध्ये दादोजीचा एक हात अदिलशाहने तोडल्याची बातमी आहे." ("परकियांच्या दृष्टीतुन शिवाजी")

     यावरून इ.स.१६४४ पासून त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजेच इ.स.१६४७ पर्यंत दादोजीला एकच हात आहे.दादोजी शस्त्रकौश्यल्यासाठी प्रसिद्ध असल्याची समकालीन साधनांमध्ये एकही नोंद नाही.त्यातही एक हात तुटलेल्या अवस्थेमध्ये दादोजीने शिवरायांना शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण कसे बरे दिले असेल ?

     या विषयातील पुरावे केळूसकर जयसिंगराव पवार वा सी बेंद्रे ग ह खरे सेतू माधव राव पगडी हरी नरके संजय सोनवणी अश्या जुन्या नव्या इतिहासकारांनी वेळो वेळी दिले आहेत. खूप मोठा आणि विस्तृत विषय आहे. इच्छुकांनी या विषयावरील त्यांची मते वाचावीत. काही लेख इथ शेयर करत आहे.

1. संजय सोनावनी

http://sanjaysonawani.blogspot.in/2010/10/blog-post.html?m=1

http://sanjaysonawani.blogspot.in/2012/02/blog-post_06.html?m=1

2. अनंत दारवटकर

http://dadojikonddev.blogspot.in/2010/10/blog-post_9125.html?m=1

समारोप 

     खूप मोठा विषय आहे. अनेक वर्षे अनेक बहुजन विद्वान हे षडयंत्र उघड करून दाखवत आहेत. लिहित आहेत. व्याख्याने देत आहेत. मी फक्त त्यांनी आपल्यापुढे खुल्या केलेल्या ज्ञानसागरातील काही कण संकलित करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. हळूहळू हे खूप लोकांच्या लक्षात येत आहे. तरीही अजून खूप लोक अज्ञानात आहेत. काहीना सत्य कळून देखील या चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याची त्यांना धास्ती वाटते. या सर्व बहुजन प्रबोधनाचा उद्देश जातीयता पसरवणे हा नसून जातीयतेच्या मुळावर घाव घालणे हा आहे. अनेकजण आपल्या लेखण्या त्यासाठी झिजवत आहेत.

पुरंदरे यांना विरोध म्हणजे ब्राह्मणांना विरोध आहे का ?

     होय . पुरंदरे यांना विरोध प्रतीकात्मक आहे. तो विरोध अश्या सर्व ब्राम्हणी वृत्तीला विरोध आहे जी जातीप्रेमापोटी इतिहास विकृत स्वरुपात प्रक्षेपित स्वरुपात मांडते. हा विरोध ब्राह्मण या पूर्ण जातीला नाही. अनेक इतिहासकार ब्राह्मण असून देखील त्यांनी अत्यंत निष्पक्ष वृत्तीने काम केले आहे. उदा . नरहर कुरुंदकर न र फाटक कमल गोखले वा सी बेंद्रे. किंवा या सर्व प्रबोधनाचा उद्देश वि का राजवाडे यांच्या सारख्या थोर इतिहासकारांचे आयुष्यभराचे कार्य नाकारण्याचाही नाही. पण फक्त त्यांनी जातीप्रेम न दाखवता ते निष्पक्ष वृत्तीने केले असते तर त्याची झळाळी अधिक वाढली असती.
   
     लोकांचे प्रबोधन व्हावे . आपल्या सत्य इतिहासाची त्यांना जाणीव व्हावी. आणि या जागृतीमुळे किमान यापुढे तरी कोणी जातीप्रेम दाखवून इतिहास प्रक्षेपित करून लिहू नये हाच या सर्व बहुजन विद्वान प्रबोधन कारांचा उद्देश आहे. पुरंदरे यांना विरोध, त्यांना पुरस्कार देऊ नये याला विरोध केवळ याच कारणासाठी आहे. त्याला जातीयतेची, ब्राह्मणद्वेषाची लेबले लावून सत्यापासून तात्पुरता पळ काढता येईल. पण फार दिवस नाही .

सत्य परेशान हो सकता है , पराजित नही  !!!
-सुहास भुसे

संदर्भ -
हरी नरके यांचे संशोधनपर लेख..भाषणे
इंद्रजीत सावंत यांचे संशोधनपर लेख
अनंत दारवटकर यांचे संशोधनपर लेख
व इतर अनेक स्फुट संदर्भ






No comments:

Post a Comment