About

Monday 18 January 2016

फॉर्चून मॉडीफायर

आपली कार एकोणचाळीसाव्या मजल्यावरील पार्किंग कडे वळवताना मधुकररावांनी हलकेच मागे वळून पाहिले की कोणी मागून भरधाव येत तर नाही ना? हल्लीची पिढी ज्या सुसाट वेगाने या उडणाऱ्या हवाई कार्स पळवत असे ते मधुकररावांना अजिबात पसंत नव्हते. एकावर एक असे ४० पदरी रस्ते देखील यांना पुरत नव्हते. गाड्या पळवायला. क्लबमध्ये गप्पा मारताना या मुद्द्यावर टीका करणे ही त्यांची आवडती सवय होती. गेटवरील मशीनमध्ये त्यांनी कार्ड इन्सर्ट केले आणि गेट उघडले. कोपऱ्यातल्या पार्किंगवर त्यांनी आपली कार पार्क केली.

      एकोणचाळीसाव्या मजल्यावर त्यांचे ऑफिस होते. बाहेर निऑन साइन्सचा बोर्ड झगमगत होता.
“पुष्पक हवाई टॅक्सी प्रायवेट लिमिटेड.”
त्यांनी बेल दाबल्यावर त्यांच्या रोबो अटेंडनस ने त्यांचे स्वागत केले. प्रसन्न चेहर्याची ही गार्गी त्यांना खूप आवडत असे. तिची वर्चुअल सुंदरता हे तर कारण होतेच. पण तिची कामातली निपुणता. त्याहून त्यांना आवडत असे ते ती स्त्री असूनही कसलेही नखरे करत नसे किंवा त्यांच्या पत्नीप्रमाणे कीटकीट करत नसे. त्यांच्या टेबलसमोरच्या भिंतीवर  परमपूज्य गुरुमहाराज कल्पक्ल्पेशानंद यांच्या एन्लार्ज करून लावलेल्या प्रचंड मोठ्या डिजिटल तसबिरीला त्यांनी वंदन केले. मधुकरराव गळ्यातली रुद्राक्षाची माळ बाहेर ओढत शीर्षगामी रुद्राक्ष दोन्ही डोळ्यांना लावत हलकेच “ गुरु माऊली कृपेची साऊली"  अस भक्तीभावाने पुटपुटले. मग गार्गीने आणलेली भगीरथ मिनरल वाटरची बाटली फोडत त्यांनी दोन घोट घेतले. तोवर गार्गी ने कॉफी मशीन मधून वाफाळती कॉफी आणली. चवीने घोट घेत घेत मधुकरराव टेबलवरील काम चाळू लागले. आणि लवकरच त्यांच्या तोंडाची चव गेली. हल्ली त्यांची कंपनी घाट्यात चालली होती.  भारतात योगी जांबुवंत यांचे सरकार आल्यापासून या उडत्या कार्स च्या किंमती खूप स्वस्त झाल्या होत्या. त्यामुळे जवळ जवळ प्रत्येकाकडे कार असेच. त्यामुळे टॅक्सीने प्रवास करणारे वरचेवर कमी होत चालले होते. शिवाय या क्षेत्रात स्पर्धाही खूप वाढली होती. दीर्घ निश्वास टाकून त्यांनी कामामध्ये डोके खुपसले.

सायंकाळी ४ च्या सुमाराला गार्गीने पुन्हा एकदा कॉफी आणून दिली. कॉफी घेत मधुकरराव विचार करू लागले. आज क्लबात न जाता कुटुंबाला घेऊन बाहेर जेवायला जावे काय कुठे तरी. त्यांनी बायकोला फोन करण्याचा विचार केला. हल्ली त्यांची पत्नी मालतीबाई आणि त्यांची जवळ जवळ भेटच होणे दुरापास्त झाले होते. त्या कधी घरी असतात आणि कधी बाहेर जातात किंवा घरी येतात तरी की नाही याबद्दलच शंका होती. त्या पार्ट्या, डिस्को, मित्रमैत्रिणी यातच मश्गुल असत. त्यांची सिरीयस अफेयर्सही सुरु असावीत अशी त्यांची शंका होती. बभ्रुवाहन.. त्यांचा बावीस वर्षांचा तरुण मुलगा आणि वासवदत्ता त्यांची वीस वर्षांची मुलगी. हे असतील काय घरी? बभ्रुवाहन सतत नशेत असे. हवाई गाड्यांच्या रेसेस मध्ये भाग घेणे हा त्याचा छंद होता. त्याला अंमली पदार्थांचे व्यसन लागले होते. आणि मुलगी वासवदत्ता ही देखील लेट नाईट पार्ट्यामध्येच व्यस्त असे. यापैकी कोणीही घरी नसणार. आज ही नाही आणि पुढेही असा योग येईल याची खात्री नाही. हताशपणे मधुकररावांनी स्वत:शीच मान हलवली. काय आपल्या कुटुंबाची ही वाताहत झाली आहे. पुन्हा त्यांनी गुरु माउलींच्या फोटोकडे पाहून हात जोडले. “बघा माउली ही तुमच्या लेकराची अवस्था.”

 मागच्या भेटीत त्यांनी गुरु माउलीला आपली करूण कहाणी ऐकवली होती. कल्पक्ल्पेशानंद महाराजांनी त्यांना सांगितले होते की मधुकरराव तुमच्या मागे दुर्धर साडेसातीची दशा सुरु आहे. शनी महाराजांना शांत करावे लागेल. अस सांगून त्यांनी एक विजिटिंग कार्डही दिले होते. मधुकर रावांनी ड्रावर उघडत ते विजिटिंग कार्ड हातात घेतले. जोतीर्भास्कर नारायणशास्त्री उपाध्ये. फाॅर्च्युन माॅडिफायर अॅंड फेट केअर टेकर. बस्स ! आज भेटूयाच यांना. मधुकररावांनी ठाम निश्चय केला. गार्गीला हाक मारून त्यांनी लवकर निघत असल्याची सूचना दिली. तिला टेबल आवरण्यास सांगून त्यांनी गुरु माऊलीला वंदन करून ऑफिसमधून प्रस्थान ठेवले.

****************************

९ व्या रस्त्यावरील त्या झगमगत्या पॉश इमारतीतील बहात्तराव्या मजल्यावरील आलिशान ऑफिसमध्ये जोतीर्भास्कर नारायणशास्त्री उपाध्ये यांच्या पुढे मधुकरराव बसले होते. जोतीर्भास्कर त्यांच्या लॅपटॉप मध्ये मधुकररावांची पत्रिका स्टडी करत होते. थ्रीपीस सूट, गोरापान चेहरा, तरतरीत नाक, आणि सोनेरी काड्यांच्या चष्म्याच्या आडून दिसणारे घारे डोळे. प्रथमदर्शनीच छाप पडावी असे उपाध्येबुवांचे व्यक्तिमत्व होते. लॅपटॉपमधून डोके वर काढत उपाध्ये बुवांनी चष्मा हातात घेतला. त्याच्या काचा पुसत घारे डोळे बारीक करत मधुकररावांकडे एक कटाक्ष टाकला.

“ हे पहा मधुकरराव तुमच्या साडेसातीचा कडक काळ सुरु आहे. आम्ही नुसते भविष्य प्रेडीक्ट करत नाही तर ते मॉडीफाय देखील करतो हे तुम्हाला ठावूकच असेल. आमच्या दोन मेथड आहेत. एक परंपरागत स्लो मेथड आहे. आणि एक आहे अत्याधुनिक इंस्टट मेथड. पैकी तुम्हाला हव्या त्या पद्धतीने जाता येईल.”
मधुकरराव नम्र चेहरा करत म्हणाले,

“माफ करा पण मला याबद्दल अधिक सांगाल काय. मी आज प्रथमच येतोय तुमच्याकडे.”

“आमची परंपरागत पद्धती म्हणजे पूर्वी जसे विधी करत असत ते आम्ही आधुनिक पद्धतीने आणि इंस्टंटली करतो. उदाहरणार्थ तुम्हाला नागनारायण बली विधी करायचा आहे. तर आमच्या स्विमिंग टॅंक ला आम्ही अत्याधुनिक ग्राफिक्स विजुअलाएजेशन तंत्राने कुशावर्त कुंडाचे हुबेहूब रूप दिले आहे. त्यात कुशावर्त डोहातील पाणी मिनरलायजेशन करून भरलेले आहे. सगळे मंत्र वगैरे रेकोर्डेड आहेत. ते आम्ही १०x स्पीड ने चालवतो. आणि साधारण हा तीन दिवसांचा विधी आम्ही एका तासात नाशिकला न जाता विधिवत पद्धतीने इथेच उरकून देतो.”

मधुकररावांना हे मनापासून आवडले,

“अच्छा, हे फारच छान ! आणी दुसरी पद्धती कोणती?”

“आम्ही ज्याला फाॅर्चून मॉडीफिकेशन आणि केअर टेकिंग म्हणतो ती ही आमची इंस्टंट रीजल्ट पद्धती. आम्ही काय करतो यामध्ये की समजा एखाद्या मुलीला मंगळ आहे. तर तिला इथेच व्रते साधना वगैरे सांगत बसण्यापेक्षा आम्ही तिला थेट मंगळावरच पाठवतो. तिथल्या इंडियन वसाहतीत आमची खास राखीव जागा आहे. आलिशान सुईट आणि ऑफिस आहे. तिथे साधारण १५ दिवस राहून सर्व इंस्टंट व्रते पार पाडल्यानंतर त्या मुलीचा मंगळ ग्रहाचा प्रभाव पूर्ण नाहीसा होतो. पृथ्वीवर राहिल्याने मंगळाचा होणारा गुरुत्वीय इफेक्ट आणि विकीरणाचा परिणाम देखील नाहीसा होतो. अश्या मुलींना आम्ही मंगळ रिटर्नड सर्टिफिकेट देतो. आमची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे. या सर्टिफिकेट च्या योगे त्या मुलीच्या पत्रिकेतला मंगळ निष्प्रभ ठरून ग्राह्य धरला जात नाही. आणि तिच्या विवाहातील अडचण दूर होते."

मधुकरराव ऐकून थक्क झाले होते. आणि शनीमहाराजांसाठीचा उपाय ऐकण्यास उत्सुक.

“ मग साडेसातीसाठी काय करता आपण?”

उपाध्ये बुवांनी मधुकररावांच्या चेहऱ्यावरील उत्साह ताडून विस्तृतपणे सांगायला सुरवात केली.

  “ साडेसातीवर उपाय ही तर आमची स्पेशालिटी आहे मधुकरराव. मंगळाप्रमाणेच आमची शनीवरील इंडियन वसाहतीत देखील खास जागा आहे. माननीय पंतप्रधान योगीराज जांबुवंत यांच्याकडे वजन खर्ची घालून मी ती मिळवली आहे. आणि एक गुपित सांगू का तुम्हाला मा.पंतप्रधान हे आमचे खास व्ही आय पी क्लायंट आहेत. तुम्हाला शनी ग्रहावरील सुप्रसिद्ध शनीमंदिर तर माहितच असेल. तर जांबुवंतांनी खास प्रयत्न करून आम्हाला त्या शनी मंदिराच्या शेजारची जागा मिळवून दिली आहे. तर आम्ही साडेसातीच्या क्लायंटला साडेसात दिवस थेट शनीग्रहावरच पाठवितो. तिथले आमचे प्रतिनिधी कम मॅनेजर वेदोनारायण आचार्य घाणेकर साडेसात दिवस सर्व शास्त्रोक्त पूजाविधी पार पाडतात. थेट शनीग्रहावर जाऊनच ही पूजा केल्याने साडेसात दिवसात संपूर्ण साडेसाती नाहीशी होते. शनीदेव प्रसन्न होऊन बरकत देतात. अगदी १०० % खात्री बर का.”

हा इंस्टंट माॅडीफिकेशन उपाय ऐकता ऐकताच मधुकररावांनी तो करायचे मनोमन निश्चित केले होते. जाताना जोतीर्भास्कर उपाध्येंच्या कॅशीयर कडे या शनीग्रहवारीची भरगच्च रक्कम भरूनच ते घरी परतले.

*********************
यथावकाश मधुकरराव शनीग्रहावरची शनी वारी आटोपून आले. पाहता पाहता सहा महिने उलटले. त्यांच्या पत्नीच्या मालतीबाईंच्या अफेयर्सनी आता चांगलाच जोर पकडला होता. बब्रुवाहनची व्यसने वाढली होती. वासवदत्तेच्या लेट नाईट पार्ट्यांचे प्रमाणही आता हाताबाहेर गेले होते. पुष्पक टॅक्सी कंपनीची हालत जैसे थे होती. उलट तोटा दिवसेंदिवस वाढत होता. शनीग्रहवारीचा विपरीत परिणाम झाल्यासारखे वाटत होते. मधुकरराव वैतागून गेले होते. एके दिवशी वैतागून त्यांनी जोतीर्भास्कर उपाध्येंचे ऑफिस गाठले.

उपाध्येंच्या टेबलसमोरच्या खुर्चीत बसून मधुकररावांनी आपले सगळे गाऱ्हाणे त्यांना ऐकवले. उपाध्येंनी आपला सोनेरी काड्यांचा चष्मा हातात घेत घाऱ्या डोळ्यांनी मधुकररावांकडे बेरकीपणे पाहिले. मग चष्मा पुसून डोळ्यांवर चढवत त्यांनी लॅपटाॅप समोर ओढला.

“हे पहा मधुकरराव तुमची कुंडली मी परत एकदा नवीन कॅल्क्युलेशन्स मांडून टॅली केली. तुमच्या केस मध्ये एक कॉम्प्लिकेशन निर्माण झाले आहे. अस हजारात एखाद्याच केस मध्ये होते. तुमची दैवगतीच विचित्र दिसते.”
अस म्हणून बुवांनी एक लांबलचक पॉज घेत परत लॅपटाॅप मध्ये डोके खुपसले. ए सी च्या थंडगार हवेत आलेला कपाळावरचा घाम पुसत मधुकररावांनी करूण नजरेने काहीसे हबकून जात उपाध्ये बुवांकडे डोळे लावले. थोड्या वेळाने उपाध्येंनी त्यांच्याकडे पाहत सांगितले.

“मधुकरराव तुमच्या शनीग्रह फेरीच्या वेळी तुमची ग्रहदशा विपरीत होती. त्यामुळे तुमच्या कुंडलीत एक नवीन दोष निर्माण झाला आहे. हा आमचे पुज्य पिताजी जोतीर्भास्कर विश्वंभरशास्त्री उपाध्ये यांचा जोतीषशास्त्रातील नवीन शोध आहे. तुमच्या शनीग्रहावरील वास्तव्याच्या दरम्यान पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचा आणि विकीरणाचा ग्रहदशेवर विपरीत परिणाम होऊन तुमच्या कुंडलीत पृथ्वीची साडेसाती निर्माण झाली आहे.”

मधुकरराव थक्क होऊन उपाध्येबुवांकडे पाहत राहिले. शनी, गुरु, मंगळ, शुक्र नव्हे संपूर्ण आकाशगंगेची साडेसत्तरी मागे लागल्यासारखा त्यांचा चेहरा झाला होता.

© सुहास भुसे.


No comments:

Post a Comment