About

Monday 18 January 2016

साक्षात्कार

Men In Black या सिनेमात एक सीन The Galaxy नावाचा खुप प्रसिद्ध आहे. अवघ्या 1 मिनिटांचा हा संवादविहीन सीन कमालीचा सूचक आहे.

सिनेमाचा नायक आणि नायिका विल स्मिथ आणि लिंडा एका कारमध्ये आहेत. कॅमेरा वरुन विहंगम दृश्य टिपतोय.
मग कॅमेरा प्रचंड वेगाने वर जाऊ लागतो आणि दिसणारा दृश्यपट विस्तारत जातो. आधी तो परिसर, मग ते शहर, मग अमेरिका, सगळे खंड मग पृथ्वी सौरमाला ...
दृश्यपट विस्तारत राहतो आणि दिसणारी प्रत्येक अवाढव्य गोष्ट  लहान ..नगण्य होत जाते.

मग संपूर्ण आकाशगंगा, मग अनेक आकाशगंगा आणि मग दृश्य विश्वाच्याही पलीकडे जाते आणि दिसते हा सर्व विस्तार एका गोटीमध्ये आहे. एका रिंगणात अश्या दोन गोट्या आहेत. एक प्रचंड हात येतो..चार बोटे असणारा, अमानवी आणि विश्वरूपी गोटी उचलून नेम धरतो व ती दूसरी विश्वरूप गोटी उडवून जिंकतो. आणि आनंदाने दोन्ही गोट्या उचलून आपल्या बटव्यात टाकतो. त्यात त्या हाताच्या धन्याने आधीच जिंकलेल्या अनेक गोट्या असतात.

एक मिनिटाचा हा सीन पहिल्यांदा पाहताना आश्यर्याची परमावधी होते. बसल्या जागेवर उडतोच माणूस. आणि नंतर किमान तासभर तरी विचारात पडतो. असही असू शकेल या शक्यतेसोबतच अश्या अनेक शक्यतांचा विस्तृत पट आपल्याला दिसू लागतो. लहान, मोठे, विराट अश्या परिमाणांची सापेक्षता ध्यानात येते. या पटावरील स्वत:चे अतिनगण्य अस्तित्व जाणवते. आणि जाणवते हा जङजव्याळ विश्व विस्तार मानवी बुद्धी च्या आवाक्याबाहेरचा आहे. अंतिम सत्य करोड़ो योजने दूर आहे. जे कदाचित आपणास कधीही गवसणार नाही.

आणि आपल्या ध्यानात येत की आस्तिक नास्तिक वाद , जातीवाद , धर्मसंघर्ष, राष्ट्रवाद अश्या गोष्टी तुलनेने किती तुच्छ व क्षुल्लक आहेत. परिणाम आणि व्याप्तीच्या दृष्टीने सगळी तात्विक आतात्विक भांडणे आणि एकूणच आपले जीवनचक्र नगण्य व निर्रथक वाटू लागते आणि आपले मन एका अनुनुभुत, अद्वितीय साक्षात्काराने भरून जाते.
©सुहास भुसे


No comments:

Post a Comment