About

Sunday 3 January 2016

बेफाम नवकवी

कविता पूर्वी मात्रा, वृत्ते, छंद यांच्या बंधनात बद्ध होती. प्रेम सूचक असे. शृंगार झाडावेली आडून हळूच लाजत बाहेर डोकावत असे. हळू हळू जाणिवांच्या कक्षा रुंदावल्या, क्षितिजे विस्तारली आणि कवितेची घौडदौड मुक्तछंदात सुरु झाली. कवितेला एक नवा आयाम मिळाला. विद्रोही कवितांचे एक युग आले. घुसमटलेल्या जाणीवांना बाहेर येण्यास जागा मिळाली. त्यांनीही कवितेचे दालन समृद्धच केले..

“काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्याचे हात
क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत.”

अश्या धाटणीच्या कवितांवर आमचा पिंड पोसला. हळूवार भावना, प्रेम आणि त्यागाच्या उदात्त कल्पना, रसपूर्ण सौंदर्यनिष्ठ शृंगार, तत्वनिष्ठेसाठी बंड, वीर रस...... ग ह खरे, ना धो महानोर, कुसुमाग्रज, ग्रेस, इंदिरा संत, शांता शेळके, पद्मा गोळे, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, दया पवार, यशवंत, विंदा, बहिणाबाई, बालकवी  अनेकांच्या अनेकानेक कविता वाचल्या. आस्वाद घेतला. मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवल्या. नवरसांचे मिश्रण. सर्व रस ओतप्रेत भरलेले.
 
पण हल्ली ज्या कविता वाचायला मिळतात त्यांनी माझ्या मनातील कविता या संकल्पनेची काव्यमयताच उध्वस्त करून टाकली आहे. त्यातल्या उघड्या नागड्या वास्तवाचे मनावर प्रचंड दडपण येते. शब्द धडाधड मनावर आघात करतात. कल्पना आणि वास्तवाचा नंगानाच भयचकित करतो.

 आठ रसांना पूर्ण फाट्यावर मारून नवकवींनी एकाच रसाचा पूर्ण क्षमतेने मारा सुरु केला आहे तो म्हणजे बीभत्सरस. एखादा कोमल ह्रदयाचा वाचक पूर्व कल्पना नसताना या कविता वाचेल तर तो धक्का बसून  बेशुद्ध पडण्याची दाट शक्यता.

पूर्वी मी कविता करत असे. त्या अश्याच उदात्त प्रेम शृंगार वगैरेंचा अविष्कार करणाऱ्या असत.  (अर्थात त्या बऱ्याचश्या टुकार असत ) पण या नवकविता वाचून माझ्या मनावर अतिशय विपरीत परिमाण झाला. नुकतच एका कवीच्या वाल वर त्याच्या कविता वाचत होतो आणि मला हि काव्य लेखनाची स्फूर्ती झाली मग काय शुभस्य शीघ्रम. धाडकन लिहून टाकली एक कविता.
तर पेश आहे .... 😉😉😉

तिला दूर ढकलत तो धडपडला
“माजलेत साले”  म्हणत भेसूर हसला

" समजता काय भडव्यानो स्वत:ला ?
मी घातल्येय धाड इंद्राच्या जनानखान्यावर
आणि आणलेत तोडून मणी
त्याच्या वज्राचे
गुंफल्येय शब्दांची माळ
डोक्यातल्या कल्पना रात्रीच्या भगभगीत उजेडात
झवत असतात नागड्या वास्तवाला
आणि मग त्या जबरी बलात्कारातून
जन्मतात तेजस्वी कविता

हसताय काय मादरचोदनो
तुम्हालाच फेकून मारणार आहे सटासट
माझ्या कवितांचे दगड.”

रात्रभर बरळत राहिला तो
शब्दांची आय माय एक करत
व्याकुळ होऊन ती पाहत राहिली त्याचा उद्रेक
हताश विकल वांझोटे रुदन

-एक बेफाम नवकवी




No comments:

Post a Comment