About

Sunday 3 January 2016

गोष्ट एका गोष्टीची : भाग 2

कितीतरी वेळ दोघे निशब्द एकमेकांचा निकट स्पर्श अनुभवत बसून होते.  आजूबाजूला अंधार दाटून आला होता. रागिणीने काहीसे भानावर येत विचारले,

“विक्रांत खरे तर अजिबात इच्छा होत नाहीये. पण मला निघायला हवे.”

“हं ..जायलाच हवे का?”

“विक्रांत प्लीज, मला आधीच कठीण होतेय निरोप घेणे.”

ती हळवी झाली होती.

“ठीक आहे. चल निघूया.” विक्रांत जड स्वरात म्हणाला.

एकमेकांच्या हातात हात घालून बिलगून चालत त्यांनी हॉटेलपर्यंतचे अंतर कापले.

“रागिणी आता परत कधी भेट होईल आपली.”

“यावेळीच खूप सायास करून आलेय रे मी भेटीला. पुढे लवकर भेटणे कठीण आहे. पण नक्की भेटू आपण.”

“मला खूप आठवण होईल तुझी.”
“अरे मी टच मध्येच असेन की.”
“हो म्हटले तर एका टचच्या अंतरावर म्हटल तर दोन ध्रुवावर दोघे आपण.”

दोघे खिन्न झाले. परत निशब्दत: दाटून आली.

“रागिणी मी सोडू का तुला गाडीने”
“अरे नको, मी जाईन.”
अचानक विक्रांतच्या लक्षात आले. त्याने रागिणीला एक सुंदर गिफ्ट आणले होते. ते द्यायचेच विसरून गेला तो.
“रागिणी तू ५ मिनिट थांब, मी लगेच आलो.”
“का रे, काय झाले ? कुठे जातोस ?”
“अग मी एक गिफ्ट आणले आहे तुझ्यासाठी. रूम मध्ये आहे घेऊन येतो. पाचच मिनिट थांब.”
“ओके ..पण अरे थांब न मी पण येईन. फ्रेश होते जरा.”

विक्रांत ने बेडवर बसत आपली बॅग उघडून त्यातला छानसा नेकलेस बाहेर काढला. रागिणीला किती शोभून दिसेल हा. रागिणीला कोशॉप ब्रँड ची ज्वेलरी आवडते हे विक्रांत ला ठाऊक होतं. तिला याबद्दल त्याने सांगितले नव्हते तिला सरप्राईज करण्याचा त्याचा विचार होता. हलकेच दरवाज्याचा आवाज झाल्यावर त्याने मान वर केली. बाथरूमच्या दरवाज्यातून ओल्या ताज्या चेहऱ्याने रागीनी बाहेर येत होती. गर्द जांभळ्या पालाझो मधील तिचा ठसठ्शीत बांधा उठून दिसत होता. गोऱ्या चेहऱ्यावर रूळनाऱ्या त्या कुरळ्या केसांच्या महिरपी, तिचा विपुल केशसांभार. इतका वेळ बाहेर ज्या गोष्टी त्याने लक्षपूर्वक पाहिल्या नव्हत्या त्या गोष्टींवर या एकांतात त्याचे डोळे खिळून राहिले.

 आरश्यासमोर उभे राहत रागिणीने चेहऱ्यावर एक हलकासा मेकअप चा हात फिरवला. आणि आरश्यातून आपल्याला पाठमोरे न्याहाळनारी त्याची नजर आणि त्यातली तीव्र ओढ तिला जाणवली. आरश्यातूनच त्याच्याकडे पाहत तिने विचारले,

“अरे अस काय पाहतोस? आणि हातात काय आहे ते नेकलेस ? वॉव किती सुंदर. तुला कधी म्हणाले होते मी सहज मला पण आठवत नाही. आणि तू मात्र पक्के लक्षात ठेवलेस हे."

विक्रांत ने स्मितहास्य करत म्हटले,
“घालून दाखव बघू, मी परत कधी बघेन तुला काय ठावूक?”
“अस काय म्हणतोस रे,”
 ती भावूक होऊन म्हणाली.
“अस बोलत आहेस जणू आपण आता भेटणारच नाही कधी. आण इकडे तो नेकलेस. घालते मी.”

तिच्या प्रतिबिंबाकडे बघत तो उठला व तिच्या मागे आला. क्षणभर दोघे आरश्यात एकमेकांच्या डोळ्यात बघत राहिले. मग तिने मान तिरकी करत आपले मोकळे केस पुढे घेतले. त्याने समजून आपल्या हाताचे तिच्याभोवती कडे करत नेकलेस तिच्या गळ्यात घातला.  त्याचे हात थरथरत होते. दातांनी क्लिप पक्की करताना तिच्या सेंटचा मादक गंध त्याला वेडा करत होता. त्या निकटतेमुळे दोघांचेही श्वासोच्छवास एकमेकांना ऐकू येतील एवढा श्वासांचा आवेग वाढला होता. क्लिप लावून सरळ होत विक्रांत ने तिच्या खांद्यावर हात ठेवत रागिनीला हलकेच आपल्याकडे वळवले. तिचे गाल आरक्त झाले होते आणि नजर झुकली होती. विक्रांतने तिची  हनुवटी वर उचलण्याचा प्रयत्न केला.  लाजुन रागिणी त्याच्या मिठीत शिरली. विक्रांत क्षणभर हडबडला. मग त्यानेही हात पसरत तिला आपल्या बाहूपाशात आवळले.

क्रमश:

क्रमश: शब्द वाचताच वैदेहीचा चेहरा पडला. तिने मेल बॉक्स बंद करत लॅपटॉप झाकला. गोष्ट वाचता वाचता आपलाही श्वासांचा आवेग वाढला आहे हे तिच्या लक्षात आले. तिने आपला श्वास थोडा  नियंत्रित केला. मग आपला सेल उचलत “ क्रमश: ? व्हाट द हेल क्रमश:"  अस पुटपुटत तिने योगेशला फोन लावला.

“अरे योगेश, ही काय जागा आहे का रे क्रमश: करण्याची? गोष्टीच्या सर्वोच्च बिंदूवर आणून तू चक्क क्रमश: लिहितो आणि मला मेल करतो गोष्ट ?”

योगेश तिचा आवेश पाहून खो खो हसू लागला.

“अरे हसतोस काय वरून? आणि मला आधी सांग ही कथा तुला कशी सुचली? तूच विक्रांत तर नाही ना? ही सत्यकथा तर नव्हे ना?”

हे ऐकून योगेश अजूनच हसू लागला.

“अग वेडाबाई, सत्यकथा असती तर मी सांगितली नसती का तुला? अग पूर्ण काल्पनिक कथा आहे ही.”

“बर ठीके. असू दे. पण मला आता पटकन पुढची कथा पाठव तरी किंवा सांग तरी लगेच बर.”

“वैदेही अग मी लिहिली नाही अजून पुढची गोष्ट. आता काय व्हावे पुढे यावर विचार करतोय.”

“योगेश गुमान सांगतोस की देऊ एक गुद्दा? लिहिली नसशील तर काय लिहिणार आहे सांग. आता काय होते पुढे?”

“वैदेही मी असा विचार करतोय की विक्रांत आणि रागिणी त्या प्रेमाच्या अत्युच्च बिंदूकडे पाठ फिरवून मन आवरतात. आणि एकमेकांचा निरोप घेतात.”

“काय ? का मन आवरतात? ते पुढे जात नाहीत? हा काय गाढवपणा योगेश ? अस कस शक्य आहे? आणि पण मी म्हणते त्यांनी का जाऊ नये पुढे ? त्यात काय वाईट आहे?”

“अग वैदेही म्हणजे मी विचार करत होतो कि जर त्यांनी हे टाळले तर त्यांच्या गोष्टीला एक उदात्त टच मिळेल. एक फिलॉसॉफीकल डूब मिळेल. लोकांना प्रेमापेक्षा त्याग आवडतो.”

“योगेश मी सांगते ना तुला. या वळणावरून कोणीही परत फिरू शकत नाही. तू जर तस लिहिले तर तुझी गोष्ट दांभिक होईल. तू संस्कार कथा लिहिणार आहेस की वास्तवकथा? आणि हे बघ त्या जुनाट बुरसटलेल्या परंपरा संस्कार वगैरे कल्पना मला सांगू नको. माणसाची सगळी सुखे कशी नासवता येतील याचा एककलमी कार्यक्रम म्हणजे परंपरा. विक्रांत-रागिणी ने त्याग करूच नये. त्यांचे प्रेम आहे एकमेकांवर आफ्टरऑल.”

“ओके वैदेही. ठीक. मान्य. हे लिहितोच मग.”

“आणि ना आता एक व्हिलन आण गोष्टीत. त्याची बायको किंवा तिचा नवरा. संघर्ष, भांडणे, प्रेमाची कसोटी. मजा येईल.”

“छे छे वैदेही. या गोष्टीत तसले काही होत नाही. मी सुखांत लिहिणार आहे. विक्रांत आणि रागिणी आपापले प्रपंच सांभाळून, जबाबदाऱ्या पार पाडून जर जीवनातील सर्वात सुंदर गोष्टीचा, प्रेमाचा आनंद घेणार असतील तर काय हरकत आहे.? ते असच चॅट करत राहतात. प्रपंच सांभाळून एकमेकांना भेटत राहतात. संसाराच्या रुक्ष वाळवंटात हे ओअॅसीसरुपी प्रेम त्यांना जगण्याची उमेद देत राहील. अशी एखाद्या धावत्या भेटीची शिदोरी त्यांना कित्येक दिवस पुरेल. आणि तुझ म्हणणे पटले मला. त्यांनी सेक्स केला तरी काय हरकत आहे? परपुरुषाचा विचार न करणाऱ्या स्त्रिया किंवा परस्त्रीचा विचार न करणारे पुरुष कितीसे असतील. स्त्रिया जेव्हा सलमान,अक्षय,ऋत्विक वर मरत असतात किंवा पुरुष मल्लिका, करीनाचे सिनेमे पाहतात किंवा सनी च्या क्लिप पाहतात तेव्हा ते काय करत असतात. मग या फिक्शन ला त्यांनी थोडे मुर्त रूप दिले तर काय चुकले ? व्यभिचार हि संकल्पना मान्य करूनच पाहायचे असेल. तर हाही एक प्रकारचा मानसिक व्यभिचारच नाही का?”

योगेश जेव्हा अस बोलत असे तेव्हा वैदेही नेहमी भान हरपून त्याचे बोलणे ऐकत असे. त्याचे विचार तिला खूप आवडत. त्याला अजून बोलत करत ती म्हणाली,

“हो योगेश, हे एकदम परफेक्ट बोललास तू बघ. अगदी पटले. आणि सांग शेवट कसा करणार?”

“वैदेही मी रूढार्थाने या गोष्टीचा शेवट करणारच नाही.  ट्वीस्ट आणायचे काम मी वाचकांवर सोपवणार. म्हणजे अस बघ ही गोष्ट खूपच कॉमन आहे. युनिवर्सल. अनेकांच्या बाबतीत घडली असेल. आता घडत असेल. पुढे घडू शकेल. या सुखांतानंतरचा ट्वीस्ट मी वाचकांवरच सोडून देणार आहे. त्यांनी हवे ते रंग भरावे आणि ही गोष्ट आपली बनवावी.”

“च्या आयला योगेश. तू फार भारी आहेस रे. उगीच नाही मरत तुझ्यावर मी. आणि एक सांगू का? तुझी ही गोष्ट वाचून मलाही तुला भेटण्याची खूप ओढ लागली आहे रे. म्हणजे माझा तसा आग्रह नाही. पण मला खूप आवडेल तुला भेटायला. आपण पण किती दिवस कॉल आणि चॅट वरून बोलणार?”

योगेश फोनवर खो खो हसू लागला.

“थोडक्यात उरलेली गोष्ट घडवून आणून जगायची आहे तर तुला वैदेही !”

“हो..आणि अरे ऐक ना बेल वाजतेय. बहुतेक माझा नवरा आला वाटते. मी फोन ठेवते. चॅटवर ये बोलू आणि तुझे उत्तर सांग कधी भेटायचे ते. चल बाय लव्ह यु .”

अस म्हणत फोन ठेवत वैदेही दरवाजा उघडायला उठली.  

-समाप्त ....

©सुहास भुसे



No comments:

Post a Comment