About

Sunday 3 January 2016

बनारस पानाने कापला गळा

कॉलेजमध्ये असताना पार्क स्टेडियम जवळचे एक पान शॉप कम जनरल स्टोर आमचा टवाळक्या करण्याचा अड्डा होता.  सिगारेटी फुंकणे.. नवीन मेंबरना अनुग्रह देऊन संप्रदाय वाढवणे..जवळच असणाऱ्या चॅट च्या गाड्यावर पोटपूजा करणे असा भरगच्च कार्यक्रम असे. पण मुख्य काम म्हणजे बर्ड वॉचिंग. आमची अख्खी गँग म्हणजे पक्षी प्रेमी. पार्क चौक म्हणजे पक्ष्यांचे अभयारण्य.  कॉलेज वरुन परतणारे, ट्यूशन ला जाणारे, खरेदीसाठी बाहेर पडलेले, चॅट खायला जमणारे.... पक्षीच पक्षी.
आमच्या सौंदर्योपासक मनाला तिथे तासन तास विरंगुळा आणि डोळ्यांना थंडावा मिळे.

जवळ असणाऱ्या नेहरू हॉस्टेलवर मी राहत होतो. हॉस्टेलवरचे पाणी कधी कधी गायब होइ. आठ आठ दिवस पाणी येत नसे. त्या समस्येची भीषणता जे नेहरू हॉस्टेलवर राहिले असतील त्यांनाच् माहिती असेल. त्यावेळी एकच उपाय असायचा. चंबु गबाळे आवरून पाणी येईपर्यन्त गावाकडे सुटायचे. आणि जमेल तस जमेल त्या सोईने अप डाऊन करायचे.

तर तेव्हा असच पाणी गेल होत आणि मी गावाकडे पळालो होतो. अश्या वेळी मी बाइक वरुन कॉलेजला जात असे.   त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर आम्ही सर्व टोळभैरव आमच्या अड्डयावर जमलो. भरपूर चकाट्या पिटुन झाल्यावर मी म्हटल "निघतो आता रे, गावाकडे जायचय, आज उशीर झाला." मित्र म्हणाला " थांब आज मस्तपैकी पान खावून जा. मजा येईल बाइकवर. ट्राय करून बघ."

 पान शॉप वाल्याने एक मस्त 120 320 कडक बनारस पान जमवले. मी पहिली वेळच खात होतो. छान वाटले. बाइक सुसाट सोडली. सोलापूरच्या बाहेर आल्यावर नाक्यावर दोन पोरी सायकल ढकलत जात होत्या हे फार दुरुन हेरले. या बाबतीतली आमची दूरदृष्टी म्हणजे अगदी नाथा कामत च्या तोंडात मारणारी. बहुधा सायकल पंचर होती. मी गाडी एकदम स्लो केली आणि मागुन सौंदर्याचा पाठमोरा आस्वाद घेऊ लागलो. लांबलचक शेपटा. ( मुलींचे केस म्हणजे आपला वीक पॉइंट...असो ..हे उगीच ...तसे पंचवीसएक वीक पॉइंट असतील ) तर तो लांबलचक शेपटा. सिटाच्याही खाली पडणारा. संस्कृतच्या वर्गात सुंदर स्त्रियांची लक्षणे सांगताना त्यांचे केस टाचेपर्यन्त रुळत असत अस आमच्या बॉब कट वाल्या कुलकर्णी मॅडम म्हणाल्या होत्या. तर ते सुंदर केस ..तो कमनीय बांधा ..कमालीची आकर्षक चाल ... उफ्
या पोरीने एकदा वळून बघावे आणि तिच्या सुंदर चेहऱ्याचे दर्शन घडवावे अशी मी मनापासून प्रार्थना करू लागलो.

 आणि माझी बाइक पास होताना त्या मुलीने खरेच वळून बघितले. काय ती अप्रतिम रचना विधात्याची. आणि वरुन तिने चक्क एक गोड स्माइल दिले. मोठ्या मुश्किलिने मी बाइक आवरली रस्त्याच्या खाली जाता जाता.

बहुधा माझ्या प्रार्थनेत मी जास्तच जोर लावला असावा किंवा देव जरा फ्री असावा त्यावेळी. तिने चक्क हात करून लिफ्ट मागितली मला. कहरच .. मी धडधडत्या अंतकरणाने बाइक थांबवली. ती कोमलांगी माझ्या खांद्यावर हात ठेवून मागे बसली. आठ दिवस मला तो स्पर्श फिल होत असे नंतर सतत. सावकाश बाइक चालवु लागलो. तिने विचारले
"कोणत्या कॉलेजला आहेस रे ? "
आणि हाय रे दुर्दैव .... तोपर्यन्त मी विसरूनच गेलो होतो की बनारस पान अगदी मस्त जमले होते तोंडात. मला जाम बोलता येईना. तिला उत्तर न आल्याने अजब वाटले असावे. माझ्या ड्रेस वरुन अंदाज करत ती म्हणाली
"ह दे प्र का ? "
मी हं म्हणून मोठा हुंकार दिला. आता बोलता तर येत नाही .पिंक टाकावी तर इज्जतीचा फालूदा. मनातल्या मनात त्या भेंडी मित्राला, त्या टपरीवाल्याला, सगळ्या गँगला,  स्वत: ला, बनारस पानाचा शोध लावणाऱ्याला मोजून अर्वाच्च शिव्या घालू लागलो. त्या पोरीला मी थोडा शिष्ट किंवा विक्षिप्त वाटलो असेन. थोडी चिकटुन बसली होती ती मागे सरकली. अगदी सुरक्षित अंतर ठेवले आता. मध्येच ब्रेक दाबणे,गोड गोड गप्पा,  ..तिचे नाव कॉलेज वगैरे विचारावे, मग कामत कॅफेमध्ये कॉफी, किल्ला बागेतली ती रमणीय संध्याकाळ, प्रभातला सुंदर मैटिनी शो वगैरे माझ्या शेखचिल्ली स्वप्नांचा पार चुराडा झाला. बाइक स्लो घेण्यात आता अर्थच नव्हता. तिचा स्टॉप येताच उतरली. शिष्टाचार म्हणून एक स्माइल देऊन भरभर मागे वळून न पाहता निघुन गेली.

त्यानंतर मी कधीही बनारस पान खाल्ले नाही. जेव्हा जेव्हा मी बाइक वरुन येई तेव्हा विशिष्ट ठिकाणाच्या 1 किमी आधी आणि 1 किमी नंतर ती दिसते का पाहत असे. पण संधी एकदाच दार ठोठावते असे आमचे गणिताचे प्रौढ अविवाहित कुदळे सर नेहमी सांगत त्याची आठवण होइ.
ती कधी दिसलीच नाही परत.


No comments:

Post a Comment