About

Sunday 3 January 2016

गोष्ट एका गोष्टीची : भाग- १

हॉटेल  रत्नहार पॅलेसच्या आलिशान डायनिंग हॉल मध्ये  बसून तो आतुरतेने तिची वाट पाहत होता. एव्हाना यायला हवी होती ती. त्याने परत बैचेन होऊन घड्याळात पाहिले. दीड वाजत आले होते. एक वाजता त्यांचे भेटायचे ठरले होते. आपल्या या तीव्र ओढीचे त्याला आश्चर्य वाटले. या परिपक्व वयात देखील आपल्या भावना एखाद्या षोडशवर्षीय तरूणाइतक्याच तीव्र असल्याचे त्याला जाणवले. तिलाही तितकीच ओढ वाटत असेल याची त्याला खात्री होती. तरी तिने उशीर का करावा? तस म्हटल आज ते दोघे एकमेकांना पहिल्यांदाच भेटणार होते. तरीही ते दोघे एकमेकांना खूप चांगले ओळखत होते.

 त्याला आठवले त्यांची मैत्री झाली त्याला एव्हाना एक वर्ष लोटले होते. त्यांची ओळख झाली ती फेसबुक वर. तो एक नवोदित कवी होता. त्याच्या भावगर्भ कविता वाचून ती प्रभावित झाली होती. त्यांची हळू हळू मैत्री झाली. मग इनबॉक्समध्ये गप्पा सुरु झाल्या. एकमेकांच्या आवडी निवडी आणि स्वभाव खूप जुळतात अस त्यांच्या लक्षात आले. ती विलक्षण बुद्धीमती होती. चतुर आणि हजरजबाबी. त्याला विशेष आवडला तो तिचा नर्मविनोदी स्वभाव. तिच्याशी बोलायला त्याला खूप आवडायचे. त्याला तिच्याशी बोलणे काहीसे आव्हानात्मक वाटायचे. ती कधी कोणता विसंगत मुद्दा हेरेल आणि त्याला पेचात पकडेल त्याची शाश्वती नसे. त्यामुळे त्याला जपून बोलायला लागायचे. त्यांच्या गप्पात तिचा पती आणि त्याची पत्नी सोडले तर कोणतेच विषय वर्ज्य नसायचे. दोघेही चांगलेच व्यासंगी असल्याने त्यांच्या गप्पांचा वारू विविध विषयात चौखूर उधळायचा. हळू हळू त्यांचे चॅटिंगचे प्रमाण वाढत चालले. शक्य तर दोघे कॉल करत. मिळालेला सगळा मोकळा वेळ ते एकमेकांशी गप्पा मारण्यात घालवत. तिला गाणी खूप आवडायची आणि त्याला पण. कधी कधी एकमेकांना सूचक गाणी पाठवून ते आपल्या भावना व्यक्त करायचे. त्याला ऑनलाईन यायला कधी उशीर झाला आणि ती नाराज असेल तर तो तिला यु रुठो न हसीना किंवा वो है जरा खफा खफा अशी गाणी पाठवे. तिचा आवाज खूप गोड होता. कधी कधी ती तिच्या आवाजात त्याच्यासाठी गाणी रेकॉर्ड करून पाठवे. तिने पाठवलेले तिच्या आवाजातले मै तैनु समझावा की न तेरे बिन लगदा जी तर त्याला इतके आवडले की दिवसातून किमान १० वेळा तो क्लिप ऐकत असे. एकदा त्याने तिला गाणे पाठवले. युही तुम मुझसे बात करती हो या कोई प्यार का इरादा है . हळू हळू दोघांच्या मनाची एकमेंकातली गुंतवणूक दोघांच्याही लक्षात येऊ लागली.

एकदा ती त्याला म्हणाली, “विक्रांत, ज्या माणसाना खाणे आणी गाणे आवडते ती माणसे जातिवंत रसिक असतात. प्रेम करावे तर त्यांनीच.”
एकदा तिने त्याला विचारले "विक्रांत तू ड्रिंक करतोस का ?"
त्यानेही ऑनेस्टली सांगितले "हो करतो न."
 तिने विचारले "कधी कधी करतोस कि नेहमी?"
 त्याने खरे खरे सांगितले. मग तिनेहि कबुली दिली कि तीही ड्रिंक करते. दोघांनी अगदी विविध ब्रांड आणि त्यांची टेस्ट व मजा यावर देखील गप्पा मारल्या. तिचा मोकळा ढाकळा आणि बोल्ड स्वभाव त्याला अजूनच आवडला. लवकरच त्यांचे नाते प्रेमात रुपांतरीत झाले. एकमेकांना दिवसातून शंभरवेळा तरी आई लव्ह यु स्टिकर्स ची देवाण घेवाण होऊ लागली. फ्लाइंग किसेस आणि हग मी च्या स्टिकर्सना उत आला.

एकदा त्याने विचारले,”रागिणी मी आग्रही नाही. पण तू मला प्रत्यक्ष भेटलीस तर मला खूप आनंद होईल.”
तिनेही संमती दर्शवली. आणि त्यांच्या गप्पांना एक नवीन विषय मिळाला. आपण अमुक ठिकाणी भेटू या. तमुक प्रकारे भेटू या. तू समोर आल्यावर मी पहिल्यांदा अस म्हणेन. मी अमुक करेन तमुक करेन. अश्या अनेक नाट्यमय काव्यात्म काहीश्या फिल्मी भेटी त्यांनी गप्पात प्लॅन केल्या.

ती म्हणायची”विक्रांत आपण खूप गप्पा मारू या”
“हो रागिणी, रात्रीच्या निरव शांततेत आपण तलावाच्या काठावर एखाद्या बाकावर गप्पा मारत बसूया”
“हो रे राजा. गोड गुलाबी हवा असेल. मी एक शोल घेतलेली असेल.”
“रागिणी पण माझ्याकडे शॉल नसेल.  मला थंडी वाजेल.”
“मग मी तुला माझ्या शॉल मध्ये आणि माझ्या मिठीमध्ये घट्ट लपेटून घेईन”
“मी तुझ्यावर तिथल्या तिथे एक छानशी कविता करेन”
“मी तुझ्यासाठी मै तैनु समझावा की गाईन.”

एकदा त्याने तिला विचारले, “रागिणी समजा आपल्या भेटीत आपल्याला मोह झाला आणि आपला तोल गेला तर.”
“तोल गेला तर म्हणजे नेमके काय विक्रांत..स्पष्ट शब्दात विचार ”
“म्हणजे समज आपल्याला फिजिकली ऍट्राक्शन वाटले आणि आपण शरीराने जवळ आलो तर? तश्या काही पॉसिबिलीटीज आहेत का?”
“विक्रांत माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू माझ्या मनाविरुद्ध काही करणार नाहीस.”
“म्हणजे तुझ्या मनातहि असे असेल तर हि पॉसिबिलीटी आहेच.”
“माझा तुझ्यावर विश्वास आहे विक्रांत.”
त्याला हसू आले.
“रागिणी हा विश्वास दोन प्रकारचा असू शकतो. एकतर मी तुला अपेक्षित नाही अस काही करणार नाही असा विश्वास किंवा एक तर मी जे करेन ते योग्यच असेल असा विश्वास.”
“विक्रांत लेट मी क्लियर धिस, हे बघ मला नीती अनीतीच्या फोल कल्पना मान्य नाहीत हे तर तुला माहितच आहे, त्यामुळे समज आपल्यात अस काही घडल तर त्याच मला वावड नाही. फक्त ते अस ठरवून करणे मला आवडत नाही. मला मनापासून तस प्रेरित करणारा पुरुष असेल तर ते होईल ही.”

तिला दांभिकपना कधीच आवडत नसे. तिचे स्पष्ट आणि प्रामाणिक उत्तर त्याला मनापासून आवडले.

तिच्या अश्या एक न अनंत आठवणीत तो रंगून गेला होता. खांद्यावरचा हलकासा स्पर्श, लेमोनेड सेंटचा मंद जवळून जाणवणारा मंद गंध आणि हलक्या आवाजात मारलेली विक्रांत अशी हाक याने तो भानावर आला. त्याने वळून वर पाहिले. मंद मंद हसत ती जवळ उभी होती. तो मंत्रमुग्ध होऊन पाहत राहिला. ती फोटोतल्या पेक्षा किती देखणी दिसत होती. त्याची अवस्था पाहून हलकेच हसत ती समोरच्या खुर्चीवर बसली.

“काय रे कसला धक्का वगैरे बसला काय? अस काय पाहतोस.”
त्याने एक मंदस्मित केले.
“रागिणी तू प्रत्यक्षात जास्त सुंदर दिसतेस.”
 ती या स्तुतीने काहीशी सुखावली.
“तूदेखील प्रत्यक्षात जास्तच रुबाबदार दिसतोस.”
"किती उशीर ग पण " तो कुरकुरला.
"विक्रांत खरे सांगू, मी केव्हाच बाहेर आले होते रे. बाहेरच्या पार्किंगजवळ लॉनवर थांबले बराच वेळ. "
"का ?"
"समोर दिसणारी पायरी चढावी की नको या विचारात.. "
" अच्छा ..तर मग शेवटी ओलांडून आलीस तर मग पायरी "
दोघांनीही एकमेकांकडे गहिऱ्या अर्थपूर्ण नजरेने पाहात स्मित केले.

मग त्याने भराभर तिच्या आवडीचे पदार्थ मागवले. तिच्या आवडीची मार्टीनी आणि त्याच्या आवडीची जस्मिन व्होडका मागवली.  दोघांनी हसत गप्पा मारत जेवण उरकले. दोघांनाही अस वाटतच नव्हत की ते पहिल्यांदा भेटत आहेत.  जुने जिवलग मित्र मैत्रिणी रोजच भेटतात तशी सहज भेट असल्यासारखीच वाटत होती. मग त्याने विचारले
“चल बीच वर जाऊ या का?  तिकडे बसू गप्पा मारत.”
तिने होकारार्थी मान हलवली.  पार्किंगकडे जाताना त्याला थांबवून  ती म्हणाली
“अरे गाडी राहू दे इथेच. जवळच तर आहे. चालत जाऊया. गप्पाही होतील. आणि पाय ही मोकळे होतील.”

बीचवर एका खडकावर पाण्यात पाय सोडून ते गप्पा मारत बसले.
“कस वाटल विक्रांत, प्रत्यक्ष भेटून मला.”
“रागिणी तस तर आपण रोजच भेटतो चॅटवर. पण शेवटी कल्पना आणि वास्तव यात फरक आहेच की. आज खूप छान वाटले.”
“ विक्रांत पण  आपण बोलायचो तशी नाट्यमयता या भेटीत नाही ह, फिल्मीपणा नाही. अगदी सरळ साधी भेट झाली आपली.”
“उत्स्फूर्त भावना आणि प्लॅन  यात फरक असणारच की रागिणी.”
 त्यांच्या गप्पाना अंत नव्हता.
संध्याकाळ दाटून  येत होती . मावळतीला रंगांची उधळण सुरु होती. दोघेही निशब्द झाले .
त्याने हलकेच तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ घेतले. तिने विश्वासाने आपली मान त्याच्या खांद्यावर टेकली. स्तब्ध होऊन ते समोर सुरु असलेले रंगनाट्य पाहू लागले.

 क्रमशः

©सुहास भुसे


No comments:

Post a Comment