About

Sunday 3 January 2016

सरस्वती की सावित्री ?

विद्येचे प्रतिक, वाग्देवता म्हणजे सरस्वती मानली जाते. प्रतीके, संकेत, चिन्हे, देवता, धर्म, परंपरा, आणि संस्कृती व समाज यांचे धागे परस्परांत गुंतलेले असतात. सगळ्या गोष्टींचा परस्परावर दृश्य, अदृश्य परिणाम होत असतो.

उदा. एखादी मुलगी आहे जी लहानपणापासून आपल्या घरात एक तसबीर पाहते. त्यात देवी लक्ष्मी शेषशायी विष्णूचे पाय चूरत आहेत आणि विष्णू ऊर्ध्व लावून पहुडले आहेत. अश्या मुलीला नवऱ्याच्या पायाची दासी बनवण्यासाठी इतर फारश्या संस्कारांची गरज पडणार नाही. भारतीय समाजात स्त्रीचे दुय्यम स्थान असण्यात अश्या प्रतीकांचा खूप मोठा वाटा आहे. साहित्यातल्या उपमा पहा. जोडी मधले जे जास्त उदात्त जास्त व्यापक जास्त उत्तुंग असेल ते पुरुषाचे प्रतिक असते तर उलट स्त्रीचे. उदा. पुरुष झाड तर स्त्री लता. पुरुष समुद्र तर स्त्री नदी. पुरुष आकाश तर स्त्री धरा. अश्या प्रतीकांचा, संकेतांचा संस्कारक्षम वयात subconscious mind  वर नकळत खोल परिमाण होत असतो.

विद्येची देवता सरस्वतीची पुराणातली कहाणी देखील अशीच आहे. मुळात ती विद्येची देवता किंवा वाग्देवी का असावी याचे कोणतेही समर्पक कारण सरस्वतीच्या चरित्रात नाही. ज्यायोगे कोणा विद्यार्जन करणाराला प्रेरणा मिळावी. तिचा जन्म ब्रह्मदेवाच्या दाढेपासून झाला. म्हणजे अतिदुय्यम प्रतीकात्मक जन्मकथा. परत ब्रम्हदेव, प्रत्यक्ष पिताच तिच्यावर आसक्त झाला. अबला नारी. स्वत:चे सरंक्षण न करू शकणारी. तिला परत तिचा प्रेमी , स्वामी पुरुरव्याने शाप दिला. म्हणजे पिडीत पुरुषांच्या जुलुमाने पिचलेली शोषिता, सोशिका.

अस प्रतिक कसली प्रेरणा देणार? काय म्हणून विद्येची देवता मानावे सरस्वतीला ? समाजाच्या संक्रमणावस्थेत अश्या प्रतीकांचा त्याग करून नव्या प्रेरणादायी प्रतीकांचा समाजाने स्वीकार केला पाहिजे.  विद्येची अधिष्टात्री देवता म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीकापेक्षा कोणते प्रतिक योग्य असू शकेल ?

 स्त्रियांना आणि शोषिताना आत्मसन्मानाने जगता यावे म्हणून आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या सेवामुर्ती सावित्रीबाई. टवाळखोर सनातन्यांची कुचेष्टा, त्यांचे दगड, शेण अंगावर झेलून आपले कार्य न डगमगता सुरु ठेवणाऱ्या संघर्षमूर्ती सावित्रीबाई. बालहत्या प्रतिबंधक गृह, स्त्रीपुरुष समानता, जातीअंताची लढाई यासाठी हयात खर्च करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई. स्त्रियांसाठी पहिली शाळा काढणाऱ्या पहिल्या स्त्रीशिक्षिका, विविध सामाजिक विषयांवर आपले स्वतंत्र तेजस्वी विचार लिहिणाऱ्या, धार्मिक चिकित्सा करणाऱ्या विदुषी सावित्रीबाई.

या दोन्ही प्रतीकांची तुलना केल्यास कोणते प्रतिक वाग्देवी, विद्येचे प्रतिक म्हणून योग्य वाटते ? सरस्वती की सावित्रीबाई ?

सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात सरस्वती पूजना ऐवजी सावित्री वंदनेने व्हायला हवी. पाटीपूजन करताना सरस्वतीच्या नव्हे सावित्रीच्या चित्राला अभिवादन करायला हवे. सर्वत्र जिथे जिथे सरस्वती देवीचे रूपक वापरले जाते तिथे तिथे हे नवे तेजस्वी प्रेरणादायी सावित्रीबाई फुले यांचे प्रतिक समाजाने स्वीकारायला हवे. यासाठी सर्व सुज्ञ, पुरोगामी, समाजसुधारक, विद्वान, साहित्यिक, अभ्यासक, कलाकार, विद्याप्रेमी लोकांनी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत.

आज या विद्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना ही लेखरूपी लहानशी आदरांजली. _/\_

© सुहास भुसे


No comments:

Post a Comment