About

Monday 18 January 2016

झॉंबी हेअरस्टाईल

पृथ्वीराजची हेअर कटिंग करून घेताना मी जातीने जवळ थांबून लक्ष देतो. समोर वस्तरा लावू नको, कानावर नको, इथे अस कर, तिथे तस कर वगैरे सूचना सुरु असतात. कधी मशरूम कट, सफर , समर कट वगैरे. थोडक्यात पृथ्वीच्या भावी हेअर स्टाईल ची काळजी.

आणि मला आठवत आमची लहानपणीची हेअर स्टाईल. आमच्या लहानपणी आम्ही सलून मध्ये वगैरे जात नसू तर न्हावी आमच्या अंगणात येत असे. मग तिथे पथारी पसरून कटिंग चा कार्यक्रम सुरु होई. साधारण ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी एकच हेअरकट ठरलेला होता. त्यात चॉइसची वगैरे संधी नसे. टोटल इनटॉलरन्स .. त्याचे प्रमुख दोन उद्देश असत. केस ओले राहून सर्दी होऊ नये व परत कटिंगची वेळ लवकर येऊ नये.

तर तो जो कट होता त्याची आठवण देखील भयंकर आहे. न्हावी त्याची मशीन काढायचा. आणि बागेतील हरळी कापावी तस सगळ डोक एकसलग साफ करून टाकायचा. सगळीकडे खुरटी बुडे राहायची फक्त. हे ही सहन करण्यास हरकत नव्हती. पण याच्या पुढचा प्रकार खरा भयंकर. डोक्याच्या वरच्या भागावर जशी शेंडी ठेवतात. तसे न्हावी कपाळावर बरोबर वरच्या बाजूला काही केस समांतर रेषेत राखत असे. बाकी सगळे डोके साफ आणि समोर फक्त केसांचा पूंजका. किती भयंकर दृश्य दिसत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. आणि सुदैवाने त्या दिव्य हेअरस्टाईलीतले आमचे फोटो वगैरे उपलब्ध नसल्याने ती हेअरस्टाईल नामशेष होण्यात आमचाही हातभार.

आणि एक असे... हा सगळ्या गावातील सगळ्याच पोरांचा कॉमन हेअर कट असल्याने कोणी कोणाला हसण्याचा प्रश्न नसे.

हा दिव्य हेअरकट आमच्या न्हाव्याची स्वत: ची व्हर्जनल कलाकृती असावी. दुर्दैवाने तो औंढी सारख्या ब्याकवर्ड गावात जन्मला. तो जर युरोपमध्ये असता तर जुन्या काळातही त्याचा हा युनिक हेअरकट ब्लॉंड, वेज, मोहाक, ग्रूव्ह वगैरे नावाखाली भयंकर लोकप्रिय झाला असता.  गेला बाजार झॉंबी हेअरस्टाईल म्हणून तरी लोकांनी डोक्यावर घेतला असता याबद्दल मला तिळमात्र शंका नाही.
©सुहास भुसे.




No comments:

Post a Comment