About

Sunday 3 January 2016

बूमरँग

पृथ्वीराज म्हणजे आमचे ज्युनियर केजी ला असणारे चिरंजीव अधुन मधून टीचरची काहीतरी तक्रार सांगत असतात. एकदा सांगितले मला टीचरनी मारले. क्षणभर संताप आला. मग त्याला खोदुन खोदुन विचारले.  तर नंतर पृथ्वीराजने विधान बदलले. मग म्हणाला मारले नाही बाबा पण रागावल्या. त्याच्या टीचरना त्याच्या नकळत कॉल करून खात्री केली.

मग पृथ्वीला जवळ घेऊन प्रेमाने समजावून सांगू लागलो. की बाळ खोटे बोलू नये ...अमुक अमुक ..तमुक तमुक...बालमानसशास्त्राचा खास राखीव स्टॉक बाहेर काढला.
थोडा वेळ चिरंजीवांनी ऐकून घेतले आणि नंतर खाडकन म्हणाला, " बाबा, मग तुम्ही कस खोट बोलता ? "

मी सटपटलो. म्हटल आता कुठली कुंडली चिरंजीव बाहेर काढतात. मी उसने अवसान आणून म्हटल , " मी खोटे बोलतो ? कधी बोललो सांग बर "

तर चिरंजीवांनी भेदक यॉर्कर टाकला.
"बाबा तुम्ही फोन आल्यावर घरी असता आणि सांगता मी सोलापूरला आहे पंढरपुरला आहे मोहोळला आहे. "
बाबा क्लीन बोल्ड..त्रिफळाचीत. काही क्षण माझी बोलतीच बंद झाली.

कधी कधी नकोश्या व्यक्तीला टाळण्यासाठी अस सांगत असेन मी क्वचित् ...पण त्या थापा अश्या बूमरँग बनून आमच्यावरच आदळतील अस वाटल नव्हतं ..

बस अजिबात खोट बोलायच नाही कधीच नाही  चुकूनही नाही अस ठरवून टाकल.
मग वाटल यात थोडे कन्सेशन हवे. हे व्रत अंमळ कठीणच.
मग ठरवल फोनवर खोटे बोलायचे नाही.
पण हे ही जरा अवघडच होईल नाही का ?
शेवटी मात्र अंतिम कठोर निश्चय केला. पृथ्वीराजसमोर तर आता अजिबात खोटे बोलायचे नाही. 😎😎


No comments:

Post a Comment