About

Wednesday 6 January 2016

पांढरमिशी पठाण

“भावोजी, ताईला घेऊन जाईन उद्या सकाळी. पाच दिवसांनी कार्यक्रम आहे. तुम्ही पण नक्की या आदल्या दिवशी. "

भावोजी रानातून आल्यावर निवांत जेवणे सुरु होती. मग गणेश ने भीत भीत भावोजींना विचारले. भावोजी म्हणजे एकदम सणकी खोपडी. त्यांना पूर्वीपासून गणेश जरा वचकूनच असे.

“आं ? पाच दिवस अगोदर काय काम आहे? गणेश राव आमी काय हाताने भाकरी थापाव्या मनता काय इतके दिस?”

“आईने आग्रहाने सांगितले आहे. ताईला घेऊनच ये म्हणून..आईला हल्ली उठबस होत नाही जास्त. ताईची मदत होईल तिला ”

“गणेश राव हे काही जमायचं नाही,”

भावोजींनी जेवण आणि विषय संपवत हात धुतला.

“कारेक्रमा दिवशी सकाळी या. घिवून जावा आणि सांच्याला आणून सोडा.”

गणेश खट्टू झाला. प्रचंड राग आला. पण करतो काय? जेवण झाल्यावर आतल्या खोलीत ताईला जाऊन म्हणाला.

“ताई मी काही मुक्काम नाही करत. तुझा सनकी नवरा आणि तू घे बघून कधी यायचे ते. मी जातो आताच.”

“अरे गणेश मी बघते बोलून त्यांच्याशी. आता कुठे जातो इतक्या रात्री परत? ९ वाजलेत. त्यात अमावस्या आहे आज ”

“नको ताई, काळजी करू नको, जाईन मी दीड दोन तासाचा तर रस्ता आहे.”

अस म्हणून ताईचा निरोप घेऊन गणेश घुश्श्यातच बाहेर पडला होता. गावाच्या बाहेर आल्यावर हायवेवर  बरेच ढाबे त्याच्या संतापाला खुणावत होते. त्याच्या गावाकडे रस्ता वळतो तिथल्या वळणावरच्या ढाब्यात गणेश घुसलाच. भावोजींना इरसाल शिव्या हासडत पी पी पिला. शेवटी जास्त झाली आणि तिथेच लूढकला.

थंडी वाजू लागल्यावर गणेश ने डोळे हलकेच उघडत आजू बाजूला पाहिले. आपण ढाब्यावरील एका बाजेवर अस्ताव्यस्त झोपलेले बघून तो जरा दचकलाच. उठून घड्याळात बघितले तर रात्रीचे दोन वाजलेले. कपडे झटकत तो उठला. तो त्याचा थोडासा तोल गेला. म्हाताऱ्या साधूची गुंगी अजून होतीच डोक्यात. पण तरी त्याला विश्वास वाटला की जाईल तो घरी व्यवस्थित. पाय खोडत मोटारसायकलकडे जात गाडी सुरु केली आणि निघाला.

किरर्र अंधार..आजू बाजूला चिल्लारी, रामकाठी बाभळीची झाडे आणि ऊसाचे फड. सगळा रस्ता निर्मनुष्य. औषधालाही एखादी गाडी किंवा माणूस पास होत नव्हते. गणेश ला आता थोडी थंडी जाणवू लागली. हे ठीकच..त्याने विचार केला. थंडी वाजतेय म्हणजे म्हाताऱ्या साधुचा असर आता कमी होतोय. थोडे पुढे गेल्यावर गाडीच्या उजेडात एक म्हातारा आणि एक कुत्रे रस्त्याने जात असलेले त्याला दिसले. च्या आयला रात्रीच्या दोन ला हा थेरडा कुठे चालला म्हणायचा ? वळून त्याच्या कडे बघत गणेश ने त्याला पास केले. म्हातारा उंच निंच आणि ताठ दिसत होता. डोक्यावरचे केस आणि पांढऱ्याधोप मिश्या त्याच्या गाडीच्या उजेडात चमकल्या. म्हातारा सरळ समोर बघत होता. अंगात मांजरपाटाचे बनियन आणि धोतर. आणि सोबतचा तो त्याच्या मिश्या सारखाच पांढराधोप कुत्रा. असो तिच्या मारी म्हणत गणेश ने गाडी दामटली.

थोडे अंतर पुढे गेल्यावर त्याला अजून एक म्हातारा आणि कुत्रा पुढे चालताना गाडीच्या उजेडात दिसला. च्या आयला! म्हातारा साधू पिल्यामुळे मला काय म्हाताऱ्यांची लॉटरी लागली काय म्हणत स्वतशीच हसत गणेश पुढे जाऊ लागला. त्याच्या जवळून जाताना गणेश ने वळून पाहिले आणि तो चरकला. तसेच शुभ्र केस.. पांढऱ्याधोप मिश्या आणि तसाच पेहेराव. कुत्रे देखील सेम. च्या मारी हा म्हाताऱ्या साधूचा झटका म्हणत त्याने मान झटकली आणि पुन्हा गाडी दामटली.

थोडे अंतर पुढे गेल्यावर पुन्हा एकदा उजेडात त्याला एक म्हातारा आणि कुत्रा चालताना दिसला. मग मात्र गणेश घाबरला. तोंडाने हनुमान स्त्रोत्र म्हणत हा म्हातारा तो नसावा अशी प्रार्थना करत सावकाश पुढे जाऊ लागला.   जवळून जाताना त्याने भीत भीत मान वळवली तर तोच म्हातारा. तेच केस, त्याच मिश्या तेच बनियन, धोतर आणि कुत्रा. गणेशचे अंग लटपटू लागले. इतक्यात हलकेच मान वळवत त्या म्हाताऱ्याने गणेशकडे बघितले. त्यांचे लाल गुंजे सारखे डोळे बघून गणेशची पाचावर धारण बसली. ओल्ड मॉन्कची नशा झटक्यात उतरली. थरथर कापत त्याने स्पीड वाढवला. फुल स्पीड मध्ये गाडी सुसाट सोडली.

थोडे पुढे जाताच तो म्हातारा आणि त्याचा कुत्रा परत. गणेश ने देवाचा धावा करत तिकडे न बघत समोर चाकाच्या खाली नजर लावली आणि मुठ ओढली. आता तो म्हातारा आणि त्याचा कुत्रा त्याच्या गाडीसोबत धावू लागले. गणेशने स्पीडमीटर बघितला. ९० चा स्पीड होता. गणेश च्या अंगाला दरदरून घाम फुटला. तसल्या थंडीत त्याचा शर्ट घामाने ओलाकच्च झाला. समोर लक्ष केंद्रित करत तो गाडी दामटू लागला. तो म्हातारा आणि कुत्रा त्याच्या गाडीसोबतच धावत होते. जणू त्यांची रेस लागली होती. गणेशने जितकी मुठ ओढता येईल तितकी ओढून धरली होती. थोडे अंतर पुढे गेल्यावर त्याला एक अतिथंड हवेचा झोत जाणवला. आणि खडखड आवाज करत त्याची गाडी बंद पडली. बजरंग बली चा धावा करत त्याने इकडे तिकडे न बघता  किक मारण्याचा झपाटा सुरु केला. काही केल्या गाडी सुरु होईना. त्याने डोळ्याच्या कोपऱ्यातून बाजूला पाहिले. तिथे कोणीही नव्हते. त्याला त्यातल्या त्यात थोडे हायसे वाटले. कार्बोरेटर आणि पेट्रोल चेक करावे म्हणून तो उतरला. उतरताना त्याची नजर सहज मागे गेली.

१० फुट अंतरावर मागे तो म्हातारा आणि कुत्रा जणू हवेत धावत होते. त्यांचे हात पाय हलत होते पण त्याना जणू कोणी अदृश्य शक्तीने धरून ठेवले होते. म्हाताऱ्याच्या मिश्या एखाद्या बोक्यासारख्या फिस्कारल्या होत्या. चेहऱ्यावर भयंकर संताप दिसत होता. त्याचे गुंजेसारखे लालभडक डोळे त्या अंधारात विस्त्यासारखे चमकत होते. तो रागारागाने हवेत हात मारत होता. जणू गणेशचा गळा पकडण्यासाठी.  तसेच डोळे त्याच्या कुत्र्याचेही दिसत होते. कुत्रा जणू फक्त हाडाचा सापळा असावा. गणेश ने सर्व शक्ती एकवटून एक भयंकर किंकाळी फोडली आणि तो बेशुद्ध होत रस्त्यावर आडवा झाला.

त्याने डोळे कण्हत उघडले तेव्हा एक फेटेवाला म्हातारा त्याच्या चेहऱ्यावर वाकून  बघत होता. गणेश ने गप्पकन डोळे मिटून घेत किंकाळी फोडली. व न थांबता तो किंचाळू लागला. म्हाताऱ्याने सटपटत त्याचा तोंडावर हात दाबला.

“पोरा आर शांत हो. डोळे उघड. भिऊ नगस. तू आता माज्या घरी हाय ”

त्याचा आवाज ऐकून  गणेश ने भीत भीत डोळे उघडले. म्हाताऱ्यावरची नजर काढत आजू बाजूला नजर फिरवली. एक तरूण मुलगी दोन तरुण मुले एक पोक्त माणूस एक म्हातारी त्याच्याकडे कुतूहलाने पाहत होते. त्यांचे मानवी चेहरे पाहून त्याला धीर आला आणि तो उठून बसला.
त्याच्या चेहऱ्यावर मायेने हात फिरवत म्हाताऱ्याने विचारले

“तापीनी फनफनलय प्वॉर.. काय झाल लेकरा? काय दिसला तुला? कशाला भेलास इकत ?”

गणेश थोडेसे भानावर येत त्यांना रात्रीची कथा सांगितली.  म्हातारा तोंडावर हात नेत म्हणाला,

“आर त्यो पांढर मिशी पठाण. लय जालीम हाय त्यो. पण त्यो त्याच्या गावाची शिव वलंडत न्हाय. तू जीत पडलास तीतच शीव त्याची. तुज नशीब बलवत्तर पोरा. जीवानिशी वाचलास. काल आमोशा व्हती .आमोशेला लय फार्मात असतो तो गडी.”

म्हाताऱ्याने दोन्ही गालावर चापट्या मारत राम राम म्हटले.

गणेश घरी आला तेव्हा तापाने फनफनला होता. कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत त्याचा ताप उतरला नाही. गणेशची बातमी कळताच ताईला भावोजीने झक मारत माहेरी आणून सोडले हे एक अजून.

©सुहास भुसे


No comments:

Post a Comment