About

Friday 25 September 2015

सर्वेपि सुखिन: संतु । सर्वे संतु निरामया ।

सर्वेपि सुखिन: संतु । सर्वे संतु निरामया ।

     इंडिया असाच शायनिंग करत राहो. सोबतच भारताचेही थोडेफार धडभले होत राहो.

     त्यांच्या ४० मजली घरांचे ग्रिनीज बुकात रेकॉर्ड नोंद होवो ..
     पण आमच्या पांडबारावांचे घर खूप गळते. यंदा पावसाळ्यात तणसाने घर शाकारून घेण्याइतकी त्यांची ऐपत होवो.

     त्यांच्या पॉर्श, फेरारी ला भारतात आणण्याचे परवाने मिळोत ..
     पण आमच्या आनंदारावांचा एक बैल खूप थकलाय. यंदा सिझन ला जोडीला दुसरा बैल घेण्याची ताकद त्यांच्यात येवो.

     त्यांचे नऊ नऊ लाखांचे सूट अजून चमकत राहोत...
     पण आमच्या गण्याची गणवेशाची चड्डी दोन वर्षे वापरून बुडावर पार विगरून गेली आहे. पुढील वर्षी तरी त्याला नवीन गणवेश घेऊन देण्याची आर्थिक कुवत त्याच्या आईबापात येवो.

     त्यांच्या परदेश दौऱ्यासाठी, सहली, चिंतन सुट्ट्या, वर्ल्ड टूर साठी शुभेच्छा...
     पण आमचे मनोहरराव तिकिटाचे पैसे वाचवण्यासाठी २५ किमीवर राहण्याऱ्या आपल्या लेकीकडे चालत जातात. त्यांच्या पायातले बळ अक्षय राहो.

     त्यांच्या सर्दीवर परदेशात उत्तम उपचार होवोत...
     पण आमच्या कर्जबाजारी सदोबाची म्हाताऱ्याला लाखभर रु ऑपरेशन खर्च भरण्याची ऐपत नाही म्हणून सदोबाने त्यांना दवाखान्यातून घरी परत आणले आहे. त्यांचा शेवटचा प्रवास वेदनामुक्त व समाधानी होवो.

     त्यांच्या स्विमिंग तैंक मधले निळेशार पाणी पूर्ण विषाणूमुक्त राहो...
     पण आमच्या यमनाबाई, सखूबाई, गिरजाबाई तीन मैलावरील आटत चाललेल्या विहिरीतून पाणी आणतात. त्यांची घागर बुडण्याइतके पाणी त्या विहिराला अखंड राहो.

     एखादा तास वीज गेल्याने त्यांचा एसी बंद पडून त्यांच्या जीवाची तगमग न होवो...
     पण आमच्या गोविंदरावांचा वीजपंप दिवसातून दोन तास तरी सुरळीत चालावा एवढी सलग वीज त्यांना मिळत राहो. बाकी १८ तास लोडशेडींगमध्ये उकाड्यात झोपायला त्यांच्या मुलाबाळांना त्यांच अंगण तुझ्या दयेने प्रशस्त आहे.

     त्यांचे पोटातले पाणी न हालावे असे रस्ते, केबल्स, इंटरनेट,विज, पाणी आदी सुविधायुक्त इंफ्रास्ट्रक्चर पूर्ण बहराने पूर्ण होवो...
     पण आमचा हानमा गुडघ्याएवढ्या चिखलातून, काट्याकुट्यातून, 2 ओढे पार करून किराणा आणायला गावात जातो. त्याच्या वस्तीपर्यंत एक साधासा मुरुमाचा रस्ता तेवढा होवो.

     त्यांच्या स्मार्ट सिट्या शांघाय, बीजिंगच्या तोंडात मारतील अश्या उभ्या राहोत...
     सोबतच आमचे औंढी गांवही हागणदारी मुक्त होवो.

     त्यांच्या नवनव्या फॅक्टऱ्या उभ्या करण्यासाठी आय सी सी आय डी बी आय आदी बॅकांची फौज इंडस्ट्रियल कर्जाची पॅकेजेस घेऊन त्यांच्या दारात खेटे घालत राहो...
     पण यंदा पावसाने दगा दिल्याने आमच्या उमाजीरावाने बायकोचे मंगळसूत्र मोडून ही दुबार पेरणी व खतासाठी २० हजार उभे झाले नाहीत. त्यांची नड भागून त्यांच्यावर गळफास लावून घेण्याची वेळ न येवो.

     इंडिया त्यांच्या पैश्याच्या महापुरात पोहत असाच झगमगत राहो...
पण आमचा भारत फक्त नीटनेटक धडुत लेऊन, बऱ्यापैकी छपराखाली, पोटभर दोन घास खाऊन सुखी असो.

सर्वेपि सुखिन: संतु ।
सर्वे संतु निरामया ।।
सर्वे भद्राणि पश्यंतु ।
मा कश्चित दु:खभाद् भवेत ।।

©सुहास भुसे.

No comments:

Post a Comment