About

Sunday 29 November 2015

सत्तेचे डोळे आणि शेतकरी

आटपाट नगर होत. त्या नगराच्या बाहेर हिरवीगार बहरलेली शेते होती. शेतांमध्ये एक मोठी विहीर होती. त्या विहिरीत आजूबाजूच्या शेतकऱ्यांची गरिबांची मुले पोहोत होती. तिथे एक खाकी हाफचड्डी घातलेला मुलगा हातात कमळाचे फुल घेऊन उदास होऊन बसला होता. तो मुलगा आंधळा होता. त्याला मुलांचा कोलाहल ऐकू येत होता. त्यांचे खुशीत हसणे बोलणे ऐकू येत होते तसतसा तो अधिकच बापूडवाणा होत होता.

     वरून शंकर पार्वतीचे विमान चालले होते. पार्वतीने त्या मुलाकडे पाहिले. तिला खूप दया आली त्याची. तिने शंकराला विचारले
“अहो तो कमळ घेऊन बसलेला मुलगा इतका का उदास होऊन बसला आहे?”
शंकर म्हणाले,
“अग तो आंधळा आहे. त्याला बाकीच्या मुलांसारखे पोहता येत नाही म्हणून तो उदास बसला आहे.”
“मग तुम्ही त्याला डोळे द्या ना गडे.”
पार्वतीने शंकराकडे लाडिक हट्ट केला.
शंकर म्हणाले,
“अग बाई त्याला डोळे नाहीत तेच बरे आहे. जस ठेवलेय तस राहू दे.”
“ते काही नाही. त्याला डोळे द्या म्हणजे द्याच.”
शंकराने पार्वतीला परोपरीने सांगून पाहिले. पण ...बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्रीहट्ट. या तीन हट्टापुढे आजवर कोणाचे काय चालले आहे? अगदी देव झाला तरी नवराच तो. दिले शंकराने. त्या आंधळ्या पोराला डोळे दिले.

     काठावर उदास होऊन बसलेल्या त्या आंधळ्या मुलाला अचानक डोळे आले. तो पटकन उठला. इकडे तिकडे बघितले. आणि धाडकन विहिरीत उडी ठोकली. एक दोन मिनिटे नीट पोहोला. मग त्याने सुरु केले. याच्या अंगावर उडी ठोक. त्याच्या तोंडावर पाणी उडव. विहिरीत लाटा कर. शेतकऱ्यांची पोरे बोंबलू लागली. तसा याला अधिकच चेव आला. मग याने निराळाच कार्यक्रम सुरु केला. धर पोराची मुंडी कि बुडव पाण्यात. धर पोराचा पाय कि ओढ पाण्यात. पोरांच्या नाकातोंडात पाणी जाऊन ती गुदमरू लागली. बोंबलू लागली. विहिरीत एकच कोलाहल माजला.

     वर आपल्या विमानातून शंकर पार्वती ते पाहत होते. शंकर म्हणाले, “ बघ प्रिये, मी तुला सांगितले होते की त्याला आंधळा म्हणूनच ठेवला आहे. तेच योग्य आहे त्याला डोळे नकोच. आता काय म्हणणे आहे राणीसरकारांचे?”

      पार्वती सगळा प्रकार पाहून खजील झाली होती. ती म्हणाली,” ठीक आहे घ्या त्याचे डोळे काढून.”
इकडे त्या मुलाचे डोळे अचानक गेले. त्याला काही समजेना काय झाले. मग सावकाश तो काठावर आला. आपली हाफचड्डी घालून कमळाचे फुल हातात घेऊन परत उदास होऊन मुलांचा दंगा ऐकत काठावर बसला.

     साठा उत्तरीची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

तात्पर्य:- सत्ता आली म्हणून धर शेतकरी कि बुडव पाण्यात, धर शेतकरी की बुडव पाण्यात असा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. सत्तेचे डोळे आले म्हणून उतू नये मातु नये. डोळे जसे येऊ शकतात तसेच जाऊही शकतात.
जय भोले शंकर !!!


No comments:

Post a Comment