About

Sunday 29 November 2015

डिजिटल इंडियाच्या कथा

प्रसंग -१
विठोबा नाक्यावर देवबा ची वाट पाहत बसला होता. एक टेम्पो भुर्रकन समोरून निघून गेला. त्यातल्या गुरांकडे ओझरती नजर टाकत विठोबाने पानाची चंची काढली. त्याचा विडा लावून होईस्तो ५-६ असे टेम्पो भर्रकन पास झाले. तितक्यात देवबा आलाच.
“ये मर्दा घे पान” म्हणत विठोबाने चंची पुढे केली.
“मायला लइच घुरदुळ दिसतुया उद्या. आपल कस निभल र देवा?”
“मंजी कस म्हन्तूस?” देवबाने सुपारी कातरत विचारले.
“आर पानाला चुना लावास्तवर पाचसा व्हान गेली गुरे भरून इथन..उद्या कार्तिकी बाजारात चुथडा व्हणार बघ गुरांचा.”
देवबा मन लावून विडा बनवत होता तर विठोबा इकडे विचारात बुडाला. विठोबाची पंधरा एकर शेती आहे. २ गायी २ म्हशी १ करडू असा नांदता गोठा आहे. पण यंदा दुष्काळात गुरांना घालायला काडी मिळत नसल्याने त्याच्या हत्तीसारख्या गायी म्हशी उंदरासारख्या झाल्या आहेत. वैरणीअभावी त्याने आपली प्राणप्रिय गुरे विकून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपुरला उद्याचा कार्तिकी वारीचा मोठा गुरांचा बाजार असतो.
“मंग कस म्हन्तुस विठोबा.” पान तोंडात ठेवत देवबा ने विचारले.
“आर मागच्या साली माझी करडी गाय १ लाख ४० हजार मोजून आपण दोघांनीच आणली नव्हती व्ह्य. आर आता बाजार बगून तिला ३० हजार तरी येत्यात कि न्हाय अस कोड पडलय बघ.”
“आर गेल सालच गेल गेल सालीच विठोबा. आता कुत्रा खाईना गुरांना. जो तो विकत सुटलाय. घेणार कोण? पांढरा दिस उगवतोय. माणसाना काय खायला घालाव पंचत अन गायीची कुठ मया दावतू मर्दा.”
“मंग न्याची तर हायच र. माजा तर कुठ इलाज हाय. पण दीड लाखाचा माल ३० हजारात फुकून याचा म्हणून वाईट वाटतया र. बर उद्या सकाळी वारी हाय फाटे उरक लौकर. म्या हाळी देतोय.”
अस म्हणत पटकुर झटकत विठोबा जड अंतकरणाने तिथून उठला आणि गाईला शेवटचा घास द्यायला गोठयाकडे वळला.
प्रसंग - २
“अहो अनयचा परवा वाढदिवस आहे लक्षात आहे ना?”
पेपराततून बाहेर तोंड काढून लेलेंनी मान डोलावली.
“अर्थात”
“त्याला बर्थ डे गिफ्ट म्हणून मर्सिडीज बेंझ हवीय.”
लेलेंनी पेपर गुंडाळून खाली ठेवला.
“त्याला काय त्याचा बाप संस्थानिक असल्यासारखा वाटतो का? सांगा लेकाला म्हणावे खर्डेघाशी करणाऱ्या सरकारी नोकराचा पोरगा आहे तो राजकुमार नव्हे. मागच्या वाढदिवसाला फोर्ड एन्डेव्होर घेऊन दिली होती तिला काय झाले?”
लेले काकूनी एक लाडीक मुरका मारला.
“इश्श्य. संस्थानिक आणि तुमच्या रुबाबात कितीसा फरक आहे हो. आणि आता सातवा वेतन आयोग लागू होतोय. एकतर मुलगा आहे आपल्याला. त्याला नाही तर कोणासाठी करायचे?”
लेले स्तुतीने थोडेसे पाघळले.
“ठीक आहे करा मनासारखे. उद्या ३० लाख त्याच्या अकौंट ला ट्रान्सफर करतो. दोघे जाऊन घेऊन या.”
“अहो ३० नको ४० लाख ट्रान्सफर करा. उद्या बाहेर जातेयच तर हातासरशी त्या कपूर बाईसारखा डायमंड सेट घेऊन टाकते एक. केव्हाचा मनात भरलाय माझ्या.”
लेले काकुनी एक मागणी पुरे झालेली पाहून दुसऱ्या मागणीचे घोडे पुढे रेटले.
“हम्म..” असा दीर्घ सुस्कारा सोडून लेले सातव्या वेतन आयोगानुसार होणारी पगारवाढ आणी कुटुंबाच्या नव्या मागण्या याचे गणित कॉफीचे फुरके मारता मारता मनातल्या मनात जुळवू लागले.
Declaimer - वरील दोन्ही प्रसंग एकाच राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी घडत आहेत.
#डिजिटल_इंडियाच्या_कथा  

No comments:

Post a Comment