About

Wednesday 18 November 2015

माझे पुस्तक जीवन

     एका छोट्या गावात बालपण गेल्याने पुस्तकांच्या बाबतीत उपासमार व्हायची. म्हणजे तस बरचस मिळायचं वाचायला. पण माझी भूकच अफाट असायची. पाहुण्यारावळ्याकडे गेलो कि पहिले पुस्तके धुंडाळायचो. दिसल पुस्तक कि घाल झडप कि पाड फडशा असा एककलमी कार्यक्रम असायचा. वडील, आजोबा, काकामंडळी देखील वाचनप्रिय होती. त्यांच्या खोल्या, कपाटे धुंडाळून जुनी अडगळीत पडलेली पुस्तके शोधून वाचत बसणे चालायचे. चांदोबा, चंपक आणि कॉमिक्सचा खूप मोठा संग्रह, खूप लहान असताना असल्याचे आठवते. चांदोबातली सुंदर चित्रे बघत फैंटसी कल्पनात तासन तास रमून जाणे हा आवडता छंद होता.

     अकरावीला कॉलेजला सोलापूरला गेल्यानंतर पहिल्यांदा युद्धपातळीवर वाचनालये धुंडाळली. नेहरू होस्टेलपासून जवळच हिरांचद नेमचंद जिल्हा मध्यवर्ती वाचनालयाचा माग लागला. रूमवर गेल्यावर तिसऱ्याच दिवशी तिथे नाव नोंदवले. तीनमजली भव्य वाचनालयातली मोठाल्या हॉलमध्ये हारीने लावून ठेवलेल्या कपाटातील ओसंडून वाहणारा पुस्तकांचा खजिना पाहून अलिबाबाची गुहा सापडल्याचा आनंद झाला. चारआठ दिवसांचा उपाशी माणूस समोर पंचपक्वान्नांच ताट शिगोशीग भरून ठेवल्यावर काय करेल ?

     तर तिथे सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ६ ते ८ ही पुस्तके बदलण्याची वेळ असायची. आणि कॉलेज ७.३० ला असायचं. मी दोन तीन आठवडे पहिला तास बंक मारायचो. पुस्तक घेऊन ८.१५ पर्यंत कॉलेजवर जायचो. मग अधाश्यासारखा त्या पुस्तकाचा फन्ना उडवायचो. तेही संध्याकाळी ७ च्या आत. मग ७ वाजता ते पुस्तक बदलून दुसरे पुस्तक आणायचो. तास सुरु असताना मागे बसून वाचन साधना सुरु असायची. डबा खाताना देखील वाचायचो. जे जे काम करताना पुस्तक वाचणे शक्य असेल ते काम पुस्तक वाचतच करायचो. मला आठवते हिराचंद नेमचंद वाचनालयात एक चष्मीश ग्रंथपाल बाई होती. तिने सकाळी एक आणि संध्याकाळी एक पुस्तक नेणाऱ्या या एलियनकडे चार पाच दिवस दुर्लक्ष केले. पण एके दिवशी सकाळी आदल्या सायंकाळी नेलेली स्वामी कादंबरी मी परत करताना पाहून मात्र तिचा धीर सुटला. “ अरे सुहास, तू पुस्तकांचे नेमके करतोस काय? मी रोज बघतेय तू सकाळी एक संध्याकाळी एक पुस्तक नेतोस. आणि आज तर कहर केलास. स्वामी संपूर्ण वाचलीस एका रात्रीत अस मात्र सांगू नकोस आता” मी त्यांना भीत भीत खरेच सांगितले पण त्यांचा काही विश्वास बसला नाही. मग मात्र थोडेसे लाजून मी फक्त सकाळी आणि एक दोन आठवड्याने एक दिवस गॅप मारून पुस्तके आणायला सुरु केले.



     रद्दीच्या दुकानातून पुस्तके शोधणे हा एक असाच आवडता छंद होता. पुस्तकांचे तर भयंकर वेड. पण किंमती आवाक्याबाहेरच्या. मिळणाऱ्या पॉकेटमनीचा निम्मा धूर विकेंड पार्टीत आणि उरलेला धूर कल्पना टॉकिजवरच व्हायचा. हुतात्मा स्मृती मंदिराच्या गाळ्यात एक आणि मॅकेनिक चौकात एक या दोन रद्दीच्या दुकानातून आणि सोलापूरच्या धी वर्ल्ड फेमस मंगळवार जुन्या बाजारातून मी खूप पुस्तके मिळवली. पुस्तके मासिके आणि दिवाळी अंक. रद्दीवाला पुस्तकाच्या वजनावरुन किंमत करायचा. मी सुहास शिरवळकरांचे लटकंती ५ रुपयात, ना स इनामदारांचे शहेनशहा १० रुपयात तर रणजीत देसाईंचे माझा गाव ७ रुपयात  विकत घेतल्याचे आठवते. अनेक दुर्मिळ पुस्तके मला या शोधातून गवसली तेव्हा. आज मी हवी ती पुस्तके घेऊ शकतो, घेतो पण तेव्हा या रद्दीच्या कोळश्यातुन अचानक हातात एखादा पुस्तकरूपी हिरा यायचा तेव्हा होणारा निर्भेळ आनंद आज नाही.

     आज इतक्या वर्षांनी देखील हे पुस्तकवेड तसूभर देखील कमी झालेले नाही. अजून माझी पुस्तक वाचनाची बैठक तशीच मजबूत आहे. मी आठ आठ तास सलग जागेवरून न उठता आजही पुस्तक वाचू शकतो. आणि आता अजून एक जंगल इंटरनेट नावाच माझ्या या शोधासाठी खुले झाले आहे. माझ्या भ्रमणध्वनीमध्ये सर्वाधिक जागा फक्त पुस्तकांनी अडवली आहे.
©सुहास भुसे.


No comments:

Post a Comment