About

Saturday 29 September 2012

कर्मकांडाचा अतिरेक - १


हिंदू धर्माचा उगम हा अज्ञात आहे . मुळात ही एक सांस्कृतिक विचारधारा असल्याने त्याची अधिकृत अशी स्थापना कधी झालेलीच नाही.( संदर्भ- हिंदू धर्म एक सांस्कृतिक विचारधारा ) म्हणूनच त्याचा उगम अज्ञात आहे . त्याचा कोणी कर्ता नाही. तसेच हिंदू धर्मावर प्राचीन काळापासून अनेक आक्रमणे होत राहिली आहेत. त्या सर्व संकटांना तोंड देत हिंदू धर्म आजही खंबीरपणे उभा आहे. या दृष्टीने पाहीले असता हिंदू धर्माचे अनादी अनंत स्वरूप आपल्या लक्षात येते.

अतिप्राचीन काळात या धर्माचे स्वरूप अतिशय तरल आणि पारदर्शी असल्याचे आपल्या अनेक संदर्भांवरून लक्षात येते. सर्व विचारधारांना सामावून घेत आणि सामान्य माणसाचा विचार करून हा धर्म आपला मार्ग अनुसरत होता. त्यामुळे कोणासही तो सहज अनुसरता येत होता. वर्ण व्यवस्था देखील लवचिक होती. कालांतराने कर्मठ लोकांनी हाती असलेल्या सत्तेचा दुरुपयोग करत या विशुद्ध धर्माचे स्वरूप पार बदलून टाकले . उत्तर वैदिक काळात वर्णश्रेष्ठत्व ,यज्ञयाग ,कर्मकांडे यांचे प्रचंड स्तोम माजवले गेले. हिंदू धर्मातील अनेक मूळ कल्पना आणि संकेत स्वत:च्या स्वार्थासाठी समाजातील उच्च म्हणवल्या जाणा-या (अर्थातच स्वयंघोषित ) वर्गाने पार बदलून टाकले. अनेक गोष्टी स्वत:ला हव्या तशा वळत्या करून घेण्यात आल्या.


उदाहरण म्हणून एक प्रातिनिधिक गोष्ट सांगेन या संदर्भातील. यज्ञ या शब्दाची फोड ' यत् + ज्ञ ' अशी आहे . याचा अर्थ ' ज्यातून ज्ञान येते तो यज्ञ ' . प्राचीन काळात आपली संस्कृती अतिशय प्रगत असल्याचे अनेक पुरावे जगापुढे येत आहेत . त्याविषयी विस्तारपूर्वक पुन्हा केव्हातरी नक्की लिहीन. सर्वच शास्त्रात अनेक हिंदू विद्वान मंडळी पारंगत होती . खगोल ,तर्क ,तत्वज्ञान ,अध्यात्म ,वास्तुशास्त्र , तंत्रज्ञान अश्या सर्वच क्षेत्रात ही संस्कृती अतिशय प्रगत असल्याचे ढीगभर पुरावे आता जगासमोर येत आहेत . आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत आपण जर प्रयोग या शब्दाची व्याख्या केली तर ज्यातून ज्ञान येते किंवा ज्ञान मिळवण्यासाठी जो केला जातो तो प्रयोग ही व्याख्या आपल्या यज्ञ या शब्दाच्या अर्थाशी चपलख जुळते. यज्ञ म्हणजे प्राचीन काळातील शास्त्रज्ञांनी केलेले प्रयोग होत असे अनेक तत्ज्ञांचे मत आहे . परंतु उत्तर वैदिक काळात या शब्दाला निराळाच अर्थ चिकटवला गेला . आणि प्रयोग म्हणून केला जाणारा यज्ञ फक्त एक निरर्थक होम बनून राहिला.यज्ञाच्या नावाखाली उत्तरकाळात चालू झालेल्या प्रकाराला यज्ञ कोणत्या अर्थाने म्हटले जात होते ?त्या निव्वळ कर्मकांडाला दुसरा एखादा अर्थपूर्ण आणि सुसंगत शब्द न सुचण्याइतपत तात्कालिक भाषापंडितांचे शब्ददारिद्र्य होते हा मुद्दा पटत नाही. कालांतराने यज्ञात पशुहत्या आदी प्रकारांची भर पडत त्याचे पूर्ण विकृतीकरण झाले .अशाच प्रकारे इतर अनेक गोष्टींचे विकृतीकरण करून मूळ विशुद्ध हिंदू धर्माचे स्वरूप बदलून टाकण्यात आले.





हिंदू धर्माचे मूळ तत्वज्ञान हे बरेचसे अद्वैती स्वरूपाचे होते .निसर्ग आणि इतर जीवनदायीनी गोष्टींची पूजा हाच लोकांचा खरा धर्म होता. ही इथल्या लोकांमध्ये खोलवर आणि घट्ट रुजलेली संस्कृती होती . तिचे पाळेमुळे समूळ उखाडणे या स्वयंघोषित धर्ममार्तडांना शक्य झाले नाही. आपल्या अनेक परंपरा सणवारांमध्ये तिची पाळेमुळे आपणास जाणवतात. विशेषत: ग्रामीण भागात ही निसर्गपूजक संस्कृती मोठ्या प्रमाणावर जोपासली गेल्याचे आपल्याला अनेक प्रतिकांतून जाणवते. मात्र हळू हळू हिंदू धर्माचा कल स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कष्ट न करता आयते जगण्याची साधने उपलब्ध करण्यासाठी जाणीवपूर्वक वळवण्यात आला. अमूर्त देवतांची पूजा करणारा हा धर्म मूर्तिपूजक बनला. अद्वैती तत्वज्ञान मागे पडून द्वैत तत्वज्ञानाचे महत्व वाढले. पारलौकीकाचे ज्ञान करून घेण्यास आसुसलेले अध्यात्म लौकिक गोष्टींच्या दावणीला बांधण्यात आले. योग साधना ,ध्यान धारणा  अश्या गोष्टींना फाटा देऊन कर्मकांड म्हणजेच धर्माचरण बनवण्यात आले. उत्तर वैदिक काळात अनेक नवनव्या देवांचा उदय झाला . देवालये आली . मग भक्त आणि देव यांच्या मध्ये दलालांची एक साखळी उभी राहिली. आता या नव्या दैवतांच ( बदललेल्या स्वरूपातील अमूर्त -->मूर्त ) सर्व सामान्य भक्ताला निव्वळ दर्शन ही या दलालांच्या कृपेने मिळू लागले. अगदी प्रसादासाठी फोडलेल्या नारळातदेखील या दलालांचा वाटा निर्माण झाला.


आणि अश्या प्रकारच्या धर्माच्या विकृतीकरणाने धर्माचे मुळचे विशुद्ध रूप मागे पडले.आता आपल्या धर्माचा खरा अर्थ समजण्यासाठी भक्ताला या दलालांना शरण जाणे आवश्यक होते . नव्हे ते हेतुपुरस्पर आवश्यक करण्यात आले. कारण आता वेद हे मनुष्यनिर्मित न राहता स्वर्गलोकांतून फ्याक्स ने अवतरलेले साहित्य बनले होते. शिवाय ज्या भाषेत हे धर्मज्ञान होते तिला देवबोली म्हणून जाहीर करण्यात आले. देवाच्या तथाकथित दलालांशिवाय ती शिकण्याचा,वाचण्याचा सर्वसामान्यांना अधिकार उरला नाही. मग काय ‘ बाबा वाक्य प्रमाणमं !’ हे धर्माचे दलाल सांगतील तोच अर्थ मान्य करण्याशिवाय लोकांना पर्यायच उरला नाही. या सर्व खटाटोपामध्ये अतिशय शक्तिशाली असणारी समृद्ध अशी संस्कृत भाषा फक्त धर्माची आणि त्यातही परत कर्मकांडाची भाषा बनून राहिली. अश्या प्रकारे संस्कृत चा गळा घोटण्याचे कार्य तिच्या महान सुपुत्रांनीच केले.


हिंदू धर्म अध्यात्मिक तत्वज्ञानाच्या दृष्टीने परिपूर्ण होता आणि आहे. अनेक विद्वान हिंदू धर्माच्या पुत्रांनी सतत वाद-चर्चा-संवाद यांच्या माध्यमातून सतत लखलखीत ठेवलेले हे तत्वज्ञान काळाच्या उदरात पुढे २१ व्या शतकात समाज शिक्षित आणि शोषणमुक्त होण्याची वाट पाहत पडून राहीले. ‘ सत्याचे ज्ञान म्हणजे धर्म ’ ही धर्माची व्याख्या उत्तर वैदिक काळात पूर्णपणे बदलली.


यतोभ्युदयनि:श्रेयससिद्धी: स धर्म:
अर्थात ज्याच्यापासून विषयसुख व मोक्ष सुख मिळते तो धर्म
(संदर्भ – वैशेषिक दर्शन)



आता वाद-चर्चा-संवादांचे स्वरूप बदलले होते. पूजा करताना घंटा उजव्या हातात असावी की डाव्या? पूजा विधी करताना कलश मांडणी नेमकी कशी केली पाहिजे ? ताम्हन हे शास्त्रशुद्ध की पळी पंचपात्र योग्य ? अश्या चर्चांमध्ये हिंदू धर्ममार्तंड गुंतून पडले. इ स ६ वे शतक उजाडेपर्यंत या मंडळींनी हिंदू धर्माचे पार डबके करून टाकले होते.


                         ( क्रमश:)




                               
   

2 comments:

  1. मस्त लेख , आणखी लेख पुढे आणा मास्तर . शैविक हिंदू धर्मावर आणि चर्वाक ज्ञानावर प्रकाश टाका ....
    या विषयात मला पण आवड आहे, आवड आहे जाणून घेण्याची ...किती सुंदर आणि महान आहे माझा हिंदू धर्म .

    ReplyDelete
  2. शेंडीने कापलाय गळा !!!

    ReplyDelete