About

Monday 14 March 2016

शब्दलालित्य आणि सहजता-सुरेश भट

     कवितांचे वेड अतोनात पूर्वीपासून. सहसा गद्यापेक्षा पद्याकडे ओढा जास्त होता. अश्यात सुरेश भटांचा यल्गार हाती पडला. भटांच्या शब्दसामर्थ्याची अशी काही मोहिनी पडली मनावर की भटांशिवाय काही वाचावेसे वाटेना तेव्हा.  झंझावात, रुपगंधा, रंग माझा वेगळा असे काव्यसंग्रह त्या तंद्रीतच एकामागोमाग एक वाचून झाले.  आजही भटांची एखादी न पाहिलेली रचना कुठे दिसली की आपसूक उडी पडते त्यावर माझी. तसे मला अनेक कवी आवडतात. पण भटांना माझ्या मनातील काव्यविश्वात एक खास स्थान आहे. श्रेष्ठ कनिष्ठ ठरवण्याचा प्रयत्न नाही. पण भटांइतके शब्दलालित्य आणि सहजता दुसऱ्या कोणत्याही कवीमध्ये नाही. अर्थात हा निष्कर्ष माझ्यापुरता मर्यादित आहे.

     सुरेश भटांना प्रतिभादेवीने भरभरून दिले आहे. त्यांच्या कवितेत कधी यमके जुळवण्याची किंवा गेयता आणण्याची कसरत दिसत नाही. भट लिहित जातात आणि गेयता सहजगत्या येत जाते. ‘मालवून टाक दीप’ ही गजल या विधानासाठीचे अप्रतिम उदाहरण ठरावी.

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

     अश्या ओळी भट अगदी सहजगत्या लिहून जातात.

कैक द कैफात माझ्या, मी विजांचे घोट प्यालो
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही.

     अशी प्रवाही अर्थगहनता तर भटांच्या कवितेत ठायी ठायी दिसते. भटांचा आणि भटांनी हाताळलेला रसिकांना सर्वाधिक आवडता काव्यप्रकार म्हणजे गजल. भटांच्या गजला नुसत्या काव्यानंदच देत नाहीत तर आपल्याला अंतर्मुख बनवतात. जगण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देऊन जातात.

बोलू कुणास देई आकांत हा सुखाचा
मागेच दुखि:तांचा टाहो मरून गेला

     सुरेश भट कम्युनिस्ट चळवळीत कार्यरत होते. त्यांच्या सामाजिक जीवनातील संघर्षाचे प्रतिबिंब त्यांच्या अनेक कवितांत पडले आहे. तसेच वैयक्तिक आयुष्यात देखील त्यांना कौटुंबिक संघर्षाचा सामना करावा लागला. त्यांची इस्टेट बळकावून बसलेल्या त्यांच्या सावत्र भावांसोबत त्यांचा प्रदीर्घ न्यायालयीन लढा सुरु होता. या सर्व घडामोडींच्या तीव्रतेचा परिणाम म्हणून अपरिहार्य कडवाहट त्यांच्या कवितांत जाणवत राहते.

सांगा कुणीतरी या आकाश खाजव्यांना
मातीच मोक्ष देई कंगाल नागव्यांना

     या शब्दांतला दाह थेट जाणवतो.

गांजले ज्यांनी मला ते शेवटी माझेच होते
हा कळीचा दंश होता ! तो फुलांचा वार होता !

     हे भटांनीच लिहावे.

     ह्रदयनाथ-लता-सुरेश भट हे त्रिकुट म्हणजे मराठी गीतांच्या मर्मबंधातली ठेव आहे. या तिघांची अनेक सुरेल गीते अजरामर आहेत. याची सुरवात एखाद्या दंतकथेत शोभावा अश्या प्रसंगातून झाली. रस्त्याने जात असताना ह्र्दयनाथांना एक चोपडी सापडली ज्यात सुरेश भटांच्या रचना होत्या. त्या चोपडीवरून पत्ता शोधत ह्र्दयनाथांनी भटांना शोधले. आणि अनेक भावमधुर रचनाना संगीतबद्ध करण्याचे श्रेयस ह्र्दयनाथांच्या नावे झाले.

     या त्रयीच्या अनेक सुमधूर गीतांपैकी ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ हे गीत निव्वळ अप्रतिम आहे. अनेक वर्षे झाली ते रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. शब्द, संगीत, स्वर, अभिनय सर्व अंगांनी झळाळते आहे.

सख्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे,
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे!

      या ओळीतुंन तर भटांची प्रतिभा, हे गाणे, आणि वाचणारे ऐकणारे रसिक एका वेगळ्याच उंचीवर जातात. हे गीत लिहिण्यासाठी भट मुंबईतील एका हॉटेलवर राहिले होते. तिथे त्यांचा मुक्काम 8 दिवस वाढला. पण काही केल्या गाणे काही सुचले नाही.  रूमचे भाडे होते दर दिवशी 500 रु आणि गाण्याचा मिळणारा मोबदला होता 2000 रु. शेवटी हॉटेल सोडण्याचा दिवस आला. त्या बिलाच्या कागदावर पाठच्या बाजुला भटांनी एक सलग 'सुन्या सुन्या मैफिलित' लिहून टाकले. तिथे उपस्थित असणारे बाळ धुरी हा प्रकार पाहुन स्तंभित झाले. त्यांनी लगेच एक 15000 रु चा चेक भटांच्या नावे फाडला. पण मी माझी प्रतिभा विकत नसतो अस उत्तर देऊन त्यांनी तो नाकारला. हा प्रसंग घडतेवेळी तिथे अरुण दाते आणि ह्रदयनाथ उपस्थित होते. हॉटेलचे बिल देखील या दोघांनीच भरले.

     भटांचे जे किस्से ऐकण्यात, वाचण्यात येतात त्यावरून हा प्रतिभाशाली कलावंत काहीसा विक्षिप्त म्हणावा असा स्वत: च्या मस्तीत जगणारा असा होता अस दिसत. नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा अशी प्रतिभा ज्यांच्यावर प्रसन्न असते असे लोक काहीसे कलंदर, आत्ममग्न, मनस्वी  असतातच. भट स्वत:बद्दल म्हणतातच,

रंगुनी सर्व रंगात रंग माझा वेगळा
गुंतूनी सर्व गुंत्यात पाय माझा मोकळा

      आज गजलसम्राट सुरेश भटांची पूण्यतिथी. त्यांना ही भावगर्भ आदरांजली ..
©सुहास भुसे.










No comments:

Post a Comment