About

Wednesday 23 March 2016

वाद आणि वास्तव

     “प्रजेला काबूत ठेवण्यासाठी फक्त दोनच गोष्टी हव्यात, ब्रेड अँड सर्कसेस (भाकरी आणि करमणूक)” हे सुप्रसिद्ध रोमन तत्वज्ञ जुव्हेलीन याचे उद्गार आहेत. हे हताश उद्गार त्याने कॉलासियम मधले रक्तरंजित खेळ बघून काढले होते. आदर्शवाद आणि जगण्याची उच्च मुल्ये यांनी सत्ता आणि मानवाची सुप्त पाशवी वृत्ती यापुढे पत्करलेली शरणागती म्हणजे हे उद्गार. सध्या भारतात आणि महाराष्ट्रात जे काही सुरु आहे त्यावरून यातील भाकरी चा अर्धा भाग वगळून करमणुकीच्या अर्ध्या भागावर देशात मोदी सरकार आणि राज्यात फडणवीस सरकार यांनी पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे असेच दिसते. नक्कीच हे दोघे जुवेलीनचे वाचक असावेत.

     भाजपा सत्तेवर येऊन फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा जणू पेशवाई पुन्हा अवतरली असा जल्लोष अनेकांनी साजरा केला होता. देशात आणि केंद्रात जणू धर्म राज्य आले. साधू, साध्व्या, महंत अश्या धर्माच्या दलालांची किंमत अचानक वाढली. आणि त्यांच्या बेताल जिव्हा अनिर्बंध बडबड करू लागल्या. अनेक वादग्रस्त मुद्दे पुढे आणले जाऊ लागले. पैकी कित्येक मुद्दे तर थेट सरकार प्रायोजित होते. या सर्व मुद्द्यांचा जनतेचे लक्ष विकासाच्या मुद्द्यावरून विचलित करण्यासाठी सफाईदारपणे वापर करून घेण्यात आला.

     आज राज्यात सर्वत्र अभूतपूर्व दुष्काळ आहे. काही मोजक्या भागात नाममात्र सरकारी उपाययोजना हातचे राखून राबवल्या जात आहेत. आणेवाऱ्या बदलून अनेक भाग दुष्काळी योजनांपासून वंचित ठेवण्यात आले आहेत. सर्व शेतमालाचे दर पडले आहेत. शेतातील माल शेतातच अक्षरशः सडत आहे. अनेक भागात पाण्याचे भयंकर दुर्भिक्ष्य आहे. लातूरला महिन्यातून एकदा पाणी येते. तिथे जमावबंदीचे कलम १४४ लागू झाले आहे. लोक पाण्यासाठी एकमेकांचा जीव घेतील अशी भयंकर परिस्थिती आहे. गुरे ढोरे खपाटीला गेलेली पोटे घेऊन शेवटचे आचके देत आहेत. अनेक भागात आज न उद्या चारा छावण्या सुरु होतील या आशेवर शेतकरी आला दिवस ढकलत आहेत. विहिरी बोअर कोरड्या पडल्या आहेत. टँकर चा पत्ता नाही. वीज भारनियमन जैसे थे आहे महागाई गगनाला भिडली आहे. अनेक जीवनावश्यक गोष्टींच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. पेट्रोल डीजेल चे जागतिक दर आणि भारतातील दर यांच्यात प्रचंड तफावत आहे. जगणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. सरकार नावाची व्यवस्था अस्तित्वात तरी आहे का अशीच शंका यावी असे एकंदर वातावरण आहे. शेतकऱ्याच्या आणि शेतीच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. पण यावर कोठे चर्चा होताना दिसत नाही.

     आपण सहज न्यूज चॅनेल वरील चर्चेच्या विषयांवर नजर टाकली किंवा फेसबुक, ट्विटर अश्या सोशल साईटस वर चक्कर टाकली तर काय दिसते? या जीवनाशी निगडीत मुद्द्यांवर कुठेही चर्चा होताना दिसत नाहीत. जणू काही हा दुष्काळ आणि समस्या या वेगळ्या प्लॅनेट वरच्या असाव्यात आणि समांतर प्लॅनेट वर काही वेगळ्याच घडामोडी सुरु असाव्यात. आणि दोहोंचा एकमेकांशी काही सबंध नसावा. सरकारच्या प्रारंभ काळात ब मो पुरंदरेंचा मुद्दा पेटवण्यात आला. गायीला मातेचा दर्जा आणि गोहत्याबंदी चा मुद्दा ऐरणीवर आणला गेला. याकुबची फाशी देखील खूप गाजली. शेषराव मोरे यांच्या पुरोगामी दहशतवादी या वक्तव्याने अनेक दिवस चर्चेला विषय पुरवला. त्यानंतर बाजीराव मस्तानी ने काही दिवस चर्चेला उत आणला. मधूनच सावरकरांना भारतरत्न देण्याची टूम काढली गेली. मधूनच आरक्षण रद्द झाले पाहिजे अश्या आशयाची वक्तव्ये सरसंघचालक करतात. FTII मधील गजेंद्र चौहान च्या नियुक्तीवरून अनेक दिवस रणकंदन माजले. शनी मंदिरात महिलांना प्रवेश आणि Happy to bleed ने गरादोळ माजवला. रोहित वेमुला प्रकरण असेच परस्परविरोधी वक्तव्ये आणि कृती करून पेटवण्यात आले. त्याचे पडसाद विरतात न विरतात तोच JNU मधील कन्हैयाच्या लोकल इश्यु ला नॅशनल इश्यु बनवले गेले. चुकीच्या पद्धतीने प्रकरण हाताळून खोटे विडीओ बनवून धग तेवत ठेवण्यात आली. कायदा आणि यंत्रणा हातात असताना वेगळ्या स्त्रोतांमार्फत वेगळ्या पध्दतीने पद्धतशीरपणे या प्रकरणाला हवा देण्यात आली. देशभक्ती आणि देशद्रोह मुद्द्यावरून सध्या भवंती न भवंती सुरु आहे. आणि आता अगदी ताजे वक्तव्य. श्रीहरी अणे यांचे. विदर्भासोबतच मराठवाडाही स्वतंत्र राज्य झाले पाहिजे.

     सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश झाकण्यासाठी सरकार असे वाद मुद्दाम प्रायोजित करत आहे हे सर्व पूर्वनियोजित पद्धतीने घडवून आणले जात आहे अशी शंका घेण्यास बराच वाव आहे. भावनिक मुद्द्यावर राजकारण करणे ही हिंदुत्ववादी पक्षांची आणि त्यांच्या मातृसंघटनांची खासियत राहिली आहे. तथापि हे सर्व भावनिक मुद्दे बाजूला ठेवून फक्त विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. संविधानाचे निसंदिग्ध पालन केले जाईल अशी ग्वाही देत अच्छे दिनचे स्वप्न दाखवत भाजपा सरकार सत्तारूढ झाले. आणि सत्तेवर येताच हे सर्व हवेत विरून गेले. विकासाला बगल देत आपला जुना नेहमीचा, ठेवणीतला अजेंडाच सरकारने बाहेर काढला आहे.  जनतेच्या करमणुकीची अर्थात सर्कसेसची विविध वादग्रस्त मुद्दे प्रायोजित करून सोय केली जात आहे. आणि याच्या आड आपली कर्तुत्वशून्यता, नाकर्तेपणा आणि अपयश झाकले जाईल अस या लोकांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. जनता सुजाण आहे. ती सत्तेवर आणू शकते तसेच  सत्ता उलथून टाकण्यास ही तिला वेळ लागणार नाही.

© सुहास भुसे


No comments:

Post a Comment